।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।
आसाम
भारताच्या ईशान्य कोपऱ्यातले राज्य. क्षेत्रफळ ७८,५२३ चौ.किमी. २४० ९’ उ. ते २८० १६’ उ. आणि ८९० ४२’ ते ९७० १२’ पू. याच्या वायव्येस व उत्तरेस भूतान, उत्तरेस व ईशान्येस अरुणाचल प्रदेश व त्यापलीकडे तिबेट, पूर्वेस अरुणाचल प्रदेश, नागालँड व मणिपूर, दक्षिणेस मेघालय व मिझोराम, नैर्ऋत्येस त्रिपुरा आणि पश्चिमेस बांगला देश व पश्चिम बंगाल राज्याचे जलपैगुरी व कुचबिहार जिल्हे असून राजधानी शिलाँग आहे.
भूवर्णन : आसामचे तीन नैसर्गिक विभाग पडतात. ब्रह्मपुत्रा खोरे, सुरमा खोरे व या दोन्हीमधल्या डोंगररांगा. ब्रह्मपुत्रा नदीचे ८० ते १६० किमी. रुंदीचे आणि सु. ८०० किमी. लांबीचे पूर्व–पश्चिम खोरे हा आसामचा मुख्य प्रदेश. त्याच्या उत्तरेस हिमालयाच्या पायथ्याकडील टेकड्या असून दक्षिणेला मेघालयाच्या गारो, खासी, जैंतिया तसेच पूर्वेला नागालँडच्या पातकई टेकड्यांचे समूह आहेत. खोऱ्याच्या पूर्व टोकाला अनेक नद्या मिळून प्रचंड झालेला ब्रह्मपुत्रेचा प्रवाह प्रवेश करतो. हिमालयापलीकडे तिबेटमध्ये ब्रह्मपुत्रेला त्सांगपो म्हणतात. ती शेकडो किमी. पूर्वेकडे वाहून नामचा बारवा या उत्तुंग शिखराला वळसा घालून दक्षिणाभिमुख होते व दिहाँग अथवा सिआंग या नावाने अबोर टेकड्यांतून भारतात उतरते. तेथपासून आसामच्या पश्चिमसीमेवरील गोआलपाडापर्यंत ब्रह्मपुत्रा पश्चिमेकडे वाहात जाते. तिबेटमध्ये २,००० मीटरपेक्षा उंचावरून वाहणारा तिचा प्रवाह आसाममध्ये, समुद्र १,१०० किमी. दूर असतानाच अवघ्या १२० मी. उंचीवर येतो. मैदानात उतरल्यावर संथपणे वळणे घेत, दुभंगत, पुन्हा जुळून येत, प्रसंगी कित्येक किमी. रुंदावत तो वाहात असतो. त्याच्या मध्य विभागात मिकीर टेकड्यांपाशी ब्रह्मपुत्रेचे पात्र जरा अरुंद होते. त्याचप्रमाणे तेझपूर व धुब्रीच्या दरम्यान नदीगाळातून मधूनमधून खडक डोकावतात आणि गोआलपाडा भागातील टेकड्यांच्या रांगांमुळे प्रवाहात अनेक बेटे बनतात. एरवी खोऱ्याची सामान्य सपाटी एकसारखी आहे. ब्रह्मपुत्रेच्या विस्तीर्ण व विस्कळीत पात्रामुळे दरवर्षी येणाऱ्या महापुरांनी उभय तीरांवर कित्येक किमी. पर्यंत पाणी पसरते.
खोऱ्याचा बराच भाग काही काळपर्यंत निरुपयोगी होतो. दुसरा नैसर्गिक विभाग सुरमा किंवा बराक नदीखोऱ्याचा होय. हा २०० किमी. लांब व ९६ किमी. रुंद असून हा साधारण सपाट प्रदेश आहे. सुरमा ‘बराक’ या नावाने नाग टेकड्यांच्या सीमेवर उगम पावून मणिपूर प्रदेशसीमेवर तिपैमुख येथे उत्तराभिमुख होऊन आसाम राज्यात प्रवेश करते. काचार भागातून वेड्यावाकड्या मार्गाने पश्चिमेला वाहात ती दुभंगून बांगला देशात शिरते. या खोऱ्यातील नदीकाठ गाळाने उंच झाले आहेत. त्यांवरील खेडी पावसाळी पुरानंतर काही दिवस तळ्यांतली बेटे बनतात. या प्रदेशात मधूनमधून खुज्या टेकड्यांच्या रांगांमुळे दलदली प्रदेश निर्माण झाला आहे. काचारच्या पूर्वेस व दक्षिणेस विस्तृत राखीव वनविभाग आहेत.
दोन नदीखोऱ्यांच्या नैसर्गिक विभागांमधील तिसऱ्या विभागाच्या डोंगररांगा पूर्व–पश्चिम पसरल्या आहेत. भूकंपाची आपत्ती आसामवर पुन:पुन्हा ओढवते गेल्या साडेतीनशे वर्षांत या प्रदेशात सात वेळा मोठाले भूकंप झाले. १९५० चे हादरे जगात नोंद झालेल्या सर्वांत जोराच्या तीव्र भूकंपांपैकी होते आणि १८९७ चा भूकंप तर मानवेतिहासातील सर्वांत तीव्र भूकंपांपैकी एक होता. ब्रह्मपुत्रेच्या अगदी काठालगतची जमीन पुराखाली बुडणारी, तिच्या पलीकडची सखल भूमी पाणी धरून ठेवणारी व पुराच्या हद्दीबाहेरची डोंगरातल्या प्रवाहांनी भिजणारी, या सर्व गाळमातीच्या जमिनी आहेत. सुरमाकाठची जमीन विशेष सुपीक आहे. कारण तिच्या कमी वेगामुळे गाळात वाळूचे प्रमाण कमी असते. नदीगाळाची माती थरांचे खडक झिजून झालेली असून डोंगराळ भागात ती लाल व कंकरमिश्रित असते, तर वनप्रदेशात ती कुजलेल्या पाचोळ्याने बनलेली आहे.कोळसा, चुनखडी, सिलिमॅनाइट व विशेषत: पेट्रोलियम ही राज्यात मिळणारी महत्त्वाची खनिजे होत.
उत्तरेकडून दिबांग, सुबनसिरी, भरेळी, धनसिरी, बोरनदी, मनास, पामती, सरलभंगा व संकोश, पूर्वेकडून लोहित आणि दक्षिणेकडून नोआ, बुरी, दिहिंग, दिसांग, दिखो, झांझी व दक्षिण धनसिरी या मुख्य नद्या ब्रह्मपुत्रेला मिळतात. दक्षिण धनिसिरीच्या संगमानंतर काही अंतरावर ब्रह्मपुत्रेचा एक फाटा कलांग या नावाने नौगाँग जिल्ह्यातून वाहून गौहातीच्या वर १६ किमी.पुन्हा मुख्य नदीला मिळतो त्याआधी कलांगला कपिली व दिग्नू नद्या मिळालेल्या असतात. गौहातीखालीही कलसी व जिंजीराम सारख्या काही नद्या ब्रह्मपुत्रेला मिळतात.सुरमेला मिळणाऱ्या मुख्य नद्या उत्तरेकडून जिरी व जनिंगा आणि दक्षिणेकडून सोनाई व ढालेश्वरी या आहेत. उत्तर सुबनसिरी–ब्रह्मपुत्रा संगमाजवळ
सिबसागरसमोर माजुली हे १,२६१ चौ. किमी. क्षेत्रफळाचे बेट सर्वांत मोठे असून त्याखेरीज अनेक लहानमोठी बेटे नदीच्या पात्रात आहेत.
आसाम राज्यात उन्हाळ्याचे दिवस कमी असून तपमानही सरासरी २९·४० से. च्या वर जात नाही. एप्रिल–मे महिन्यात वर्षांचा सु. पंचमांश (२५ ते ५० सेंमी.) पाऊस पडतो. दक्षिणेकडील वळचणीस (गौहातीला तपमान १६·१०से.) उन्हाळी तपमान २९० से. व सरासरी पाऊस १६८ सेंमी.पडतो. राज्याच्या उत्तर भागात सरासरी २०० सेंमी पाऊस पडतो व अगदी पूर्वभाग अतिवृष्टीचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. उंच टेकड्यांवर हिवाळ्यात कधीकधी हिमपात होतो. पश्चिम भागात उन्हाळ्याच्या अखेरीस वादळे होतात.
सदाहरित वर्षावनांपासून समशीतोष्ण कटिबंधीय झुडुपापर्यंत वनस्पतींच्या सर्व जाती येथे आहेत. त्यांत साल, साग, देवदार, ओक, होलौंग, बंसम, अमारी, गमारी, अझार, सिसू, सिमुल, वेत, कळक, बोरू हे प्रकार प्रामुख्याने दिसतात. हिमालयाच्या पायथाटेकड्यात हत्ती, गेंडा, रानरेडा, अनेक जातीचे हरिण, काळा चित्ता, मलायी अस्वल, सांभर, कस्तुरीमृग, रानडुक्कर व शुभ्रमुख कपी (गिबन) आहेत. शासनाने कझिरंगा व मनास ही दोन विस्तीर्ण अभयारण्ये वन्यपशूंसाठी राखून ठेवली आहेत.
इतिहास : तेराव्या शतकात ब्रह्मदेशातून येऊन ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यात स्थायिक झालेल्या व पुढे राज्य करू लागलेल्या शानवंशीयांना आहोम हे नाव स्थानिक लोकांनी दिले व त्यावरून या राज्याचे नाव पडले असावे (आहोम >आकाम >आसाम). असम या संस्कृत शब्दाशी आहोम भाषेतील अचाम (अपराजित) किंवा बोडो भाषेतील हा–कोण (उंचसखल) या शब्दांचाही संबंध ह्याच्या नावाशी जोडला जातो. पुराणकाळी या प्रदेशाची प्रागज्योतिष व कामरूप ही नावे आढळतात. दिब्रुगड, सदिया, विश्वनाथपूर (दरंग जिल्हा) येथे अश्मयुगातील दगडी हत्यारे मिळाली आहेत. धनसिरी नदीच्या खोऱ्यातील कासोमारी आणि सामुबुरी येथील अवशेषांत आर्यांचा प्रभाव दिसतो, परंतु आर्यसंस्कृतीचा प्रसार या भागात बऱ्याच उशिरा झाला असावा. कालिकापुराण व योगिनीतंत्र या ग्रंथांतून ज्या अनेक प्राचीन राजांची नावे येतात, ते दानव व असुर होते असे उल्लेख आहेत. मार्हरांग वंशाच्या दानवांचा पराभव करून प्राग्ज्योतिषपुरचे राज्य स्थापणारा नरक, नरकाचा मुलगा भगदत्त यांची वर्णने महाभारत–भागवतात येतात.
शांखायन गृह्यसंग्रह व रामायण यांत कामरूपाचा उल्लेख आहे. नरक–भगदत्त, माधव, जितारी आणि आशीर्मत्त या चार वंशांनी प्राचीन आसामात राज्य केले, असे वंशावळींवरून दिसते. परंतु चवथ्या शतकापर्यंतचा आसामचा इतिहास अस्पष्ट आहे. या शतकाच्या मध्यास वर्मन वंशाचा मूळ पुरुष पुष्यवर्मन याने कामरूपात राज्य स्थापले, असा अंदाज आहे. या वंशातील महेंद्रवर्मन (४५०–८०) याच्या काळापासून कामरूपाचे महत्त्व वाढू लागले. सहाव्या शतकाच्या मध्यात भूतिवर्मनने राज्यविस्तार केला. या वंशातील भास्करवर्मन हर्षाचा समकालीन होता. त्याचे व कामरूप राज्याचे वर्णन यूआन च्वांग या चिनी यात्रिकाने केले आहे. हर्षाशी संधी करून भास्करवर्मनने बंगाल्यातील कर्णसुवर्ण राज्य बळकावले, पण तो हर्षाचा मांडलिक होता की नाही, हे अनिश्चित आहे. भास्करवर्मन हा आसामचा थोर, कर्तृत्ववान राजा दिसतो. पुढील तीन शतके शालस्तंभवंशीयांनी कामरूपावर राज्य केले.त्यांतील हर्षदेवाने आठव्या शतकात नेपाळशी विवाहसंबंध जोडले होते. कनोजच्या यशोवर्म्याने त्याचा पराभव केला. या वंशातील प्रलंभ व हरिराज पराक्रमी असले, तरी कामरूप राज्य लहानच राहिले. दहाव्या शतकाच्या अखेरीस पालवंशीयांचे राज्य सुरू झाले व अकराव्या शतकाच्या मध्यापर्यंत टिकले. ते शैवपंथी होते. त्यांतील रत्नपाल हा विशेष पराक्रमी दिसतो. जयपाल हा शेवटचा राजा होय. या काळात बंगालच्या पालांनी कामरूप जिंकून घ्यावा किंवा त्यावर अधिसत्ता गाजवावी, असा प्रकार अधूनमधून झालेला दिसतो. अकराव्या शतकाच्या मध्यास सहाव्या विक्रमादित्य चालुक्याने कामरूप जिंकला होता, असे बिल्हण कवी म्हणतो, पण ते अतिशयोक्त वाटते.
बाराव्या शतकाच्या मध्यास पाल राजांचा मांडलिक तिंग्यदेव याचे बंड मोडण्यासाठी गेलेला सेनापती वैधदेव स्वतःच त्या राज्याचा स्वतंत्र अधिपती झाला. यानंतर बंगालच्या सेन राजांनी कामरूपावर आधिपत्य गाजविले. तेराव्या शतकात लखनावतीच्या मुसलमान राजांनी केलेल्या स्वाऱ्या अयशस्वी ठरल्या. वेगवेगळ्या राजवंशांच्या काळात या प्रदेशातील राज्यांचे विस्तार वेळोवेळी बदलत राहिले. पुष्कळदा अनेक लहानलहान स्वतंत्र राज्ये शेजारी शेजारी असत. विशेषत: सुरमा खोऱ्यातले राज्य कामरूपच्या आधीन नसे, त्याचा इतिहास अस्पष्ट आहे.
ताम्रपटांवरून तेराव्या शतकात गोविंददेव आणि ईशान्यदेव यांनी येथे राज्य केले असे दिसते. पश्चिम आसामात कामता हे प्राचीन राज्य होते. चौदाव्या शतकाच्या सुरुवातीचा येथील राजा दुर्लभनारायण विद्वानांना आश्रय देणारा होता. त्याने वैष्णवपंथाला उत्तेजन दिले. पंधराव्या शतकात या भागात खेणवंशाचा उदय झाला. त्यातला तिसरा राजा नीलांबर याचा पाडाव १४९८ मध्ये बंगालच्या हुसैनशहाने केला. काही वर्षांनंतर पश्चिम आसामातील किरकोळ राजांना जिंकून विश्वसिंगाने कोच राज्य स्थापले. त्यानेच कामाख्या मंदिराचा जीर्णोद्धार केला, आहोमांशी सख्य राखून मुसलमानांना दूर ठेवले. त्याचा मुलगा नरनारायण याने सर्व दिशांना राज्यविस्तार केला (१५३३–८४). या काळात कलावाङ्मय फुलले. त्याने काही काळ आहोमांवरही अधिसत्ता गाजवली. त्याच्या वैभवाचे वर्णन अकबरनाम्यात आहे. पण त्याचा भाऊ व सेनापती शुक्लध्वज याचा पराभव पूर्व बंगालच्या इसाखानाने केला (१४९८). शुक्लध्वजाचा मुलगा रघू याने १५८१ मध्ये बंड केले तेव्हा त्याला संकोश नदीच्या पलीकडे कुचबिहार राज्य तोडून देण्यात आले.
सतराव्या शतकाच्या सुरुवातीस अंत:कलहामुळे कोच राज्याचा काही भाग मोगल साम्राज्यात समाविष्ट झाला व बाकीचा आहोमांच्या अधीन राहिला.