जाणून घ्या बोर लागवड बद्दल संपूर्ण माहिती तेही एका क्लीक मध्ये (Bor Lagwad Mahiti Bor Sheti) – Bor Farming

बोर लागवड । Bor Lagwad । Bor Sheti । बोर पिकाचे उगमस्थान, महत्त्व आणि भौगोलिक प्रसार । बोर पिकाखालील क्षेत्र आणि उत्पादन । बोर पिकास योग्य हवामान । बोर पिकास योग्य जमीन । बोर पिकाच्या सुधारित जाती । बोर पिकाची अभिवृद्धी आणि लागवड पद्धती । बोर पिकाचा हंगाम । बोर पिकाचे लागवडीचे अंतर । बोर पिकास वळण आणि बोर छाटणीच्या पद्धती । बोर पिकास खत व्यवस्थापन । बोर पिकास पाणी व्यवस्थापन । बोर पिकातील आंतरपिके आणि बोर पिकातील तणनियंत्रण । बोर पिकावरील महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण । बोर पिकाच्या फळांची काढणी, उत्पादन आणि विक्री । बोर पिकाच्या फळांची साठवण आणि पिकविण्याच्या पद्धती ।

।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।

अनुक्रम दाखवा

बोर लागवड – Bor Lagwad – Bor Sheti

बोराचे झाड अतिशय कणखर, चिवट आणि दुष्काळी परिस्थितीवर मात करणारे आहे. बोराच्या झाडाची लागवड पडीत जमिनीत करून बोर पिकाच्या लागवडीखालील क्षेत्र वाढविता येईल. दुष्काळी भागात पाण्याच्या अभावी अथवा इतर प्रतिकूल परिस्थितीमुळे इतर कोणत्याही फळझाडांची लागवड करता येत नाही, अशा ठिकाणी कमी खर्चात आणि कमी मेहनतीत बोराची लागवड करता येते. बोराच्या पिकाचे आहार दृष्ट्या आणि व्यापारी दृष्ट्या महत्त्व लक्षात घेता बोराच्या पिकाच्या लागवडीचे तंत्र माहीत करून घेतल्यास उपयुक्त ठरेल.

बोर पिकाचे उगमस्थान, महत्त्व आणि भौगोलिक प्रसार :

बोराचे उगमस्थान दक्षिण-पश्चिम आशिया किंवा मलाया हा देश आहे. बोराचा उगम भारतापासूनच चीन आणि मलेशियापर्यंत झाला आहे असे मानले जाते. सध्या महाराष्ट्रात ओलिताखाली जमिनीचे क्षेत्र फक्त 13% आहे. उरलेले 87% क्षेत्र निव्वळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. म्हणजेच 87% जमीन कोरडवाहू क्षेत्रात प्रामुख्याने अन्नधान्याचीच पिके घेतली जातात. परंतु या कोरडवाहू क्षेत्रातील अत्यंत हलक्या, मुरमाड, डोंगरउताराच्या जमिनीत अन्नधान्याची पिके फायदेशीर होत नाहीत. अशा ठिकाणी सर्वसाधारण शेतकऱ्यांना त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या आर्थिक साधनसंपत्तीचा उपयोग करून बोराची शास्त्रीय पद्धतीने लागवड करणे शक्य आहे. बोराच्या लागवडीपासून कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन मिळू शकते. त्यामुळे बोरीच्या लागवडीस महाराष्ट्रामध्ये भरपूर वाव आहे.

बोरीच्या फळात ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. त्याचप्रमाणे ‘अ’ आणि ‘ब’ ही जीवनसत्त्वेही असतात. सफरचंद आणि बोर या फळांची तुलना केली असता असे दिसते, की बोरामध्ये सफरचंदापेक्षा प्रोटीन्स, कॅल्शियम, कॅरोटीन आणि ‘क’ जीवनसत्त्वाचे प्रमाण जास्त असते. बोराच्या फळापासून जॅम, पाकविलेली बोरे (कॅण्डी), स्क्वॅश, सिरप, सरबत पावडर, वाईन, सुकविलेली बोरे, इत्यादी टिकाऊ पदार्थही तयार करता येतात.

बोरीच्या झाडापासून गोड फळे, जनावरांसाठी चारा, जळण आणि कुंपणासाठी लाकूड मिळते. बोरीची वाळलेली पाने मिसळून जनावरांना चांगला सकस आहार तयार करता येतो. बोरीचे लाकूड शेतीची अवजारे तयार करण्यासाठी आणि बांधकामासाठी वापरता येते. बोरीचे साल आणि पानांमध्ये टॅनिन द्रव्य असल्यामुळे कातडी कमवण्याच्या धंद्यासाठी बोरीच्या सालीचा उपयोग करता येतो. बोराचे औषधी गुणधर्म आयुर्वेदात विस्ताराने दिलेले आहेत. अतिसारावर बोरीची साल उपयुक्त असते. ताप आणि व या विकारांवर बोरीच्या मुळ्यांचा अर्क देतात. बोरीच्या मुळयांची भुकटी जुन्या जखमा बांधण्यासाठी उपयुक्त असते.

आहारदृष्ट्यादेखील बोरात अनेक उत्कृष्ट गुणधर्म आहेत. बोराची फळे खाल्ल्यामुळे रक्तशुद्धी होते तसेच पचनक्रियेला मदत होते.
बोरीची लागवड चीन, भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण, सिरिया, म्यानमार, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, अमेरिका, रशिया, वेस्टइंडिज, श्रीलंका, आफ्रिका, इंडोनेशिया, कोरिया, थायलंड इत्यादी देशांत होते.

उत्तर भारतात बोरीची लागवड मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, पश्चिम बंगाल आणि आसाम ह्या राज्यांत मोठ्या प्रमाणात केली जाते. दक्षिण भारतात बोरीची लागवड महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश आणि तामीळनाडू ह्या राज्यांत केली जाते.

भारतातील प्रत्येक राज्यात कलमी बोरांची अथवा गावठी बोरांची झाडे सर्वत्र आढळून येतात. महाराष्ट्रात प्रामुख्याने सोलापूर, अहमदनगर, उस्मानाबाद, लातूर, पुणे, नाशिक, धुळे या जिल्ह्यांत बोरीची शास्त्रीय पद्धतीने लागवड केलेली आढळून येते.

बोर पिकाखालील क्षेत्र आणि उत्पादन :

बोर या फळझाडाच्या पिकाचे महाराष्ट्रातील क्षेत्र 1982 सालापासून अतिशय झपाट्याने वाढत आहे. 1982-90 अखेर फलोत्पादन खात्यामार्फत एकूण 11 लाख 73 हजार गावठी बोरीच्या झाडांचे सुधारित बोरीच्या जातींत रूपांतर करण्यात आले आणि या सुधारित जातींखाली व्यापलेले एकूण क्षेत्र 12,500 हेक्टर इतके आहे. भारतामध्ये बोर या फळपिकाच्या लागवडीखालील एकूण क्षेत्र 1 लाख 70 हजार हेक्टर असून ते क्षेत्र मुख्यतः मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाना, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश या राज्यात विखुरलेले आहे. महाराष्ट्रात बोराचे वार्षिक उत्पादन 80,000 टन इतके आहे.

बोर पिकास योग्य हवामान आणि बोर पिकास योग्य जमीन :

बोरीची झाडे अती उष्ण हवामान सहन करू शकतात. उष्ण आणि कोरड्या हवामानात बोरीच्या झाडांची वाढ आणि फळांचे उत्पादन चांगले येते. हवेत जास्त आर्द्रता असलेल्या भागात बोरीच्या झाडावर रोग आणि किडींचा मोठ्या प्रमाणावर उपद्रव होतो. जास्त पावसाळी / आर्द्रतायुक्त हवामानात बोरीची लागवड फायदेशीर होत नाही.
बोरीचे पीक सर्व प्रकारच्या जमिनींत येते. अत्यंत हलक्या, मुरमाड जमिनीपासून ते भारी जमिनीत बोरीचे पीक चांगले येते. बोरीच्या पिकाचे सोटमूळ फार जोमाने वाढून थोड्या काळात जमिनीत खोलवर जाते. थोड्याशा पाणथळ आणि क्षारयुक्त जमिनीतही बोरीचे पीक चांगले येऊ शकते. डोंगरउताराच्या जमिनीत बोर यशस्वीरित्या घेता येते.

बोर पिकाच्या सुधारित जाती :

महाराष्ट्रात प्रामुख्याने उमराण, कडाका, सन्नूर नं.2, सन्नूर नं. 6, चुहारा, इलायची या जातींची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते.

उमराण बोर :

या जातीची फळे आकाराने मोठी आणि टोकाला गोल असतात. फळांचा रंग सोनेरी, पिवळा ते चॉकलेटी असतो. फळांची साल पातळ पण घट्ट असते. या जातीच्या फळांचे सरासरी वजन 30 ते 35 ग्रॅम इतके असून फळातील गराचे प्रमाण 96 % असते. फळातील गरात साखरेचे प्रमाण 19.2 % असून या जातीच्या फळाच्या 100 ग्रॅम खाण्यायोग्य भागात 103 मिलिग्रॅम ‘क’ जीवनसत्त्व असते. बोरीची ही जात भुरी या रोगाला आणि फळे पोखरणाऱ्या अळीला लवकर बळी पडते. या जातीच्या एका झाडापासून 150 ते 200 किलो उत्पादन मिळते. या जातीच्या फळांचा रंग आकर्षक असतो. फळे अत्यंत टणक असल्यामुळे लांबच्या बाजारपेठेसाठी ही जात चांगली आहे.

कडाका बोर :

या जातीची फळे आकाराने मोठी, फुगीर आणि शेंड्याकडे निमुळती असून शंकूच्या आकारासारखी दिसतात. फळाचे सरासरी वजन 20 ते 25 ग्रॅम इतके असते. फळातील गरामध्ये साखरेचे प्रमाण 13 % असते. या जातीच्या फळाच्या 100 ग्रॅम खाण्यायोग्य भागात 98 मिलिग्रॅम ‘क’ जीवनसत्त्व असते. या जातीच्या एका झाडापासून दरवर्षी 100 किलो उत्पादन मिळते.

सन्नूर नं. 2 बोर :

या जातीची फळे आकाराने मोठी आणि गोल असतात. या जातीच्या फळांचे सरासरी वजन 20 ते 25 ग्रॅम असून फळाच्या 100 ग्रॅम खाण्यायोग्य भागात 115 मिलिग्रॅम ‘क’ जीवनसत्त्व असते. या जातीच्या फळामध्ये गराचे प्रमाण 94 % असते. फळे आंबट-गोड असून गरामध्ये साखरेचे प्रमाण 17% असते.

चुहारा बोर :

पंजाबी भाषेत चुहारा म्हणजे खारीक होय. बोराच्या या जातीची फळे खारकेसारखी गोड असतात. या जातीची फळे स्वादिष्ट आणि गोड असून आकाराने मोठी असतात. या जातीची पिकलेली फळे टोकाकडे विटकरी रंगाची होतात आणि देठाकडे पिवळसर हिरवी दिसतात. या जातीच्या फळांचे सरासरी वजन 15 ते 20 ग्रॅम असून गरामध्ये साखरेचे प्रमाण 20.8 % इतके असते. फळांच्या 100 ग्रॅम खाण्यायोग्य भागात 70.6 मिलिग्रॅम ‘क’ जीवनसत्त्व असते. या जातीच्या एका झाडापासून 75 ते 80 किलो उत्पादन मिळते.

इलायची बोर :

या जातीची फळे इतर जातींच्या तुलनेत लहान असली तरी अत्यंत स्वादिष्ट असतात. या जातीच्या फळातील बियांचा आकार अत्यंत लहान असून फळामध्ये गराचे प्रमाण जास्त असते. फळांचा रंग सोनेरी पिवळा ते चॉकलेटी असतो. या जातीच्या फळांचे वजन 10 ते 11 ग्रॅम इतके असून फळाच्या 100 ग्रॅम खाण्यायोग्य भागात 140 मिलिग्रॅम ‘क’ जीवनसत्त्व असते. फळाची साल पातळ असते. फळात गराचे प्रमाण 93 % असते. गर तांबूस, मऊ आणि चविष्ट असतो. गरात साखरेचे प्रमाण 20-21 % असते. या जातीची फळे झुपक्याने लागतात. फळे लहान असल्यामुळे ही जात परसबागेसाठी चांगली आहे.

बोर पिकाची अभिवृद्धी आणि लागवड पद्धती :

बोरीची अभिवृद्धी बियांपासून अथवा डोळे भरून करतात. बियांपासून अभिवृद्धी केल्यास फळे उशिरा लागतात. बियांपासून तयार केलेल्या झाडाचे गुणधर्म मातृवृक्षांसारखे असतील याची खात्री देता येत नाही, म्हणूनच बोरीची अभिवृद्धी नेहमी डोळे भरून करावी. त्यासाठी पावसाळयाच्या सुरुवातीला लागवडीसाठी निवडलेल्या जागी योग्य त्या अंतरावर खड्डे घ्यावेत. प्रत्येक खड्ड्यात त्रिकोणात 10 ते 15 सेंटिमीटर अंतर ठेवून बोरीच्या उमराण, गोला यांसारख्या सुधारित जातीच्या अथवा गावठी जातीच्या तीन टिचविलेल्या बिया लावाव्यात. बोरीचे बी गोड असल्यामुळे मुंग्या खातात.

म्हणून बी पेरण्यापूर्वी 15 ते 20 ग्रॅम 10% लिंडेन पावडर प्रत्येक खड्ड्यातील मातीत चांगली मिसळावी. सुमारे 6 ते 7 महिन्यांनी प्रत्येक खड्ड्यात एक जोमदार रोप ठेवावे. पेन्सिलच्या जाडीची बोरीची रोपे तयार झाल्यावर जून महिन्यात टी पद्धतीने बोरीच्या रोपावर डोळा भरावा.

ढाल पद्धतीने मुख्य खुंटावर प्रथम 2 सेंटिमीटर लांबीची उभी चीर घ्यावी. ह्या उभ्या चिरेवर वरच्या बाजूला 1 सेंटिमीटर लांबीची आडवी चीर घेऊन टी (1) चा आकार तयार करावा. चीर घेताना आतील खुंटाला इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. अधिक उत्पादन देणाऱ्या चांगल्या जातीच्या कीड आणि रोग नसलेल्या मातृवृक्षांपासून डोळा फांदी निवडावी. निवडलेल्या डोळा फांदीवरील फक्त मधले डोळेच भरण्यासाठी वापरावेत.

डोळा फांदीवरून ढालीच्या आकाराचा डोळा काढावा. डोळयाला लाकडी भाग चिकटला असल्यास तो भाग तीक्ष्ण चाकूने काढून टाकावा. डोळा खुंटावर केलेल्या टी आकारामध्ये व्यवस्थित बसवावा आणि नंतर पॉलिथीन पेपरच्या पट्ट्यांनी डोळा बांधावा. डोळे बांधण्यासाठी 1 सेंटिमीटर रुंदीची आणि 10 ते 15 सेंटिमीटर लांबीची पट्टी वापरावी.

डोळे बांधल्यानंतर डोळयाचा वरचा खुंटरोपाचा भाग कापून टाकावा. डोळे बांधलेल्या जागेच्या खाली खुंटरोपाला येणारी नवीन फूट वेळच्यावेळी काढून टाकावी. बोरीच्या गावठी झाडांचे सुधारित जातींमध्ये रूपांतर करण्यासाठी मार्च – एप्रिल महिन्यात गावठी बोरीची झाडे जमिनीपासून 20 ते 25 सेंटिमीटर उंचीवर करवतीने कापून टाकावीत. या कापलेल्या खोडापासून वाढलेले आणि खोडाभोवती विखुरलेले किमान 3 धुमारे ठेवून इतर धुमारे कापून टाकावेत. या धुमाऱ्यांवर जुलै-ऑगस्ट महिन्यात पॅच पद्धतीने डोळा भरावा. अशा रितीने डोळा भरून मूळ गावठी झाडांचे सुधारित जातीत रूपांतर करता येते.

बोर पिकाचा हंगाम आणि बोर पिकाचे लागवडीचे अंतर :

हलक्या, उताराच्या अथवा निकृष्ट जमिनीत बोरी लावायच्या असतील तर उताराला आडव्या अशा सम पातळीवर बोरीची झाडे लावावीत. उताराच्या खालच्या बाजूला चंद्रकोरीच्या आकाराचा छोटा बांध घातला तर उताराचे पाणी झाडाच्या जवळपास जमिनीत मुरून झाडांच्या मुळांना उपलब्ध होऊन तसेच उताराच्या जमिनीची धूपही थांबते.

बोरांची नियमित लागवड करावयाच्या ठिकाणी हलक्या जमिनीत 5 x 5 मीटर अंतरावर, मध्यम जमिनीत 6 x 6 मीटर अंतरावर आणि भारी जमिनीत 7 x 7 मीटर अंतरावर बोरीची लागवड करावी. खड़े 60 X 60 X 60 सेंटिमीटर आकाराचे घ्यावेत. खड्ड्याच्या तळाला 10-15 सेंटिमीटरचा पालापाचोळयाचा थर द्यावा. त्यानंतर 15 ते 20 किलो चांगले कुजलेले शेणखत, 1 ते 1.5 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि मातीच्या मिश्रणाने खड्डे भरून घ्यावेत.

खड्डे भरण्यासाठी नदीकाठची पोयटा माती किंवा शेतावरील वरच्या थरातील चांगली माती वापरावी. वाळवीचा आणि मुंग्यांचा त्रास होऊ नये म्हणून प्रत्येक खड्ड्यात वरच्या थरात 100 ग्रॅम 10 % लिंडेन पावडर चांगली मिसळावी आणि पावसाळयात कलमांची लागवड करावी.

बोर पिकास वळण आणि बोर छाटणीच्या पद्धती :

बोरीच्या नवीन झाडांना सुरवातीपासून योग्य वळण देणे आवश्यक आहे. डोळा फुटल्यानंतर खुंटरोपावर येणारी नवीन फूट वेळच्या वेळी काढून टाकून डोळ्यातून येणारी नवीन फूट जोमदारपणे वाढू द्यावी. नवीन फुटींना बांबूच्या काठीचा आधार द्यावा. नवीन फुटीवर 60 सेंटिमीटरपर्यंत येणाऱ्या फांद्या काढून टाकून त्यापुढे 3 ते 4 फांद्या चारी बाजूस समान विभागल्या जातील अशा बेताने दोन फांद्यांत 15 ते 20 सेंटिमीटर अंतर ठेवून वाढू द्याव्यात. मुख्य खोड आणि 3 ते 4 फांद्या आणि त्यांवरील उपफांद्यांचा मजबूत सांगाडा तयार करून घ्यावा. वळण देण्याचे काम पहिल्या तीन वर्षांत पूर्ण करावे. बोरीचा बहार नवीन फुटीवरच येत असल्यामुळे अधिक उत्पादनासाठी झाडांवर जास्तीत जास्त नवीन फूट असणे आवश्यक आहे. त्यामुळे बोरीची छाटणी ही उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाची बाब आहे. यासाठी झाडाची पानगळ झाल्यानंतर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सांगाडा कायम ठेवून सांगाड्यावरील मागील हंगामातील फांद्यांची छाटणी करावी. छाटणी करताना दाटी करणाऱ्या रोगट तसेच अती लहान फांद्या तळापासून काढून टाकाव्यात. झाडाच्या सांगाड्यावरील 4 उपफांद्यांपर्यंत छाटणी करावी. 4 उपफांद्यांपर्यंत छाटलेल्या फांदीवर 14 ते 18 पर्यंत डोळे असतात.

बोर पिकास खत व्यवस्थापन आणि बोर पिकास पाणी व्यवस्थापन :

बोरीचे पीक सर्वसाधारणपणे हलक्या जमिनीत घेतले जात असल्यामुळे खताला चांगला प्रतिसाद देते. बोरीच्या झाडाला खतांच्या पुढीलप्रमाणे मात्रा द्याव्यात.

झाडाचे वय
(वर्षे)
शेणखत
(किलो / झाड)
नत्र
(ग्रॅम / झाड)
स्फुरद
(ग्रॅम / झाड)
पालाश
(ग्रॅम / झाड)
110100100100
220200150150
330360150150
440400200200
550500250250
बोरीच्या झाडाला द्यावयाच्या खताच्या मात्रा

बोरीच्या झाडाला खते देताना स्फुरद आणि पालाश यांचा पूर्ण आणि नत्राचा निम्मा हप्ता जून महिन्यात द्यावा. नत्राचा उरलेला हप्ता फळधारणा सुरू झाल्यावर ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात द्यावा. खत झाडाच्या मुख्य खोडापासून अर्धा मीटर अंतरावर संपूर्ण आळयात समप्रमाणात पसरून द्यावे.
बोर हे सर्वसाधारणपणे कोरडवाहू पीक म्हणून घेतले जाते. महाराष्ट्रात बोरीच्या फुलांची आणि फळांची वाढ पावसाळयाच्या काळात होते, त्यामुळे बोरीच्या झाडाला पाणी देण्याची आवश्यकता नसते. परंतु जास्त काळ पाऊस लांबल्यास बोरीच्या झाडाला 1 ते 2 वेळा पाणी द्यावे. पावसाळा संपताच प्रत्येक आळयात 30 सेंटिमीटर जाडीचा वाळलेल्या पानांचा अथवा उसाच्या पाचटाचा थर द्यावा. त्यामुळे जमिनीतील ओल टिकून झाडांची वाढ चांगली होते. फळधारणेच्या काळात बोरीच्या झाडांना पाणी देणे आवश्यक आहे. बोरीचे पीक हे काही भागांत काळया भारी जमिनीत पाण्यावर घेतले जाते. अशा ठिकाणी दर 8 ते 10 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. खते आणि पाणी वेळेवर दिल्यास फळांचा आकार वाढतो, फळगळ कमी होते. फळांना चकाकी येते, फळांची प्रत सुधारते आणि उत्पादन वाढते.

बोर पिकातील आंतरपिके आणि बोर पिकातील तणनियंत्रण :

बोरीची लागवड हलक्या जमिनीत केली जात असल्यामुळे अशा जमिनीचा पोत आणि कस टिकविण्यासाठी पहिली दोनतीन वर्षे खरीप हंगामात मूग, मटकी, कुलथी, स्टायलो यांसारखी द्विदल पिके आंतरपिके म्हणून घेणे फायद्याचे ठरते. जर जमिनी मध्यम प्रकारच्या असतील तर भुईमूग, एरंडीसारखी पिके घेता येतात. लागवडीनंतर पहिल्या दोनतीन वर्षांत बोरीच्या झाडापेक्षा उंच वाढणारी मका, कडवळ यांसारखी पिके घेऊ नयेत.

तणांचा योग्य वेळी बंदोबस्त न केल्यास बोरीच्या पिकाचे उत्पादन कमी होते. तण जमिनीतील अन्नांश, पाणी, सूर्यप्रकाश आणि हवा यांसाठी मुख्य पिकाबरोबर स्पर्धा करते. त्यामुळे मुख्य पिकाच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. म्हणून तणे वेळच्या वेळी खुरपून, खणून काढावीत. निरनिराळी रासायनिक तणनाशके फवारून तणांचा बंदोबस्त करता येतो. ताग, धैंचा यांसारखी पिके बोरीच्या झाडांच्या मध्ये पेरून तणांचा बंदोबस्त करावा.

बोर पिकावरील महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण :

बोरीच्या झाडावर फळमाशी, साल पोखरणारी अळी या किडींचा तसेच भुरी, पानावरील ठिपके, फळकूज या रोगांचा उपद्रव होतो.

फळमाशी :

या किडीचा उपद्रव सप्टेंबर महिन्यामध्ये फळधारणेच्या वेळी मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. या किडीची मादी चांगल्या पोसलेल्या कच्च्या बोराच्या सालींवर भोके पाडून फळामध्ये अंडी घालते. 2 ते 5 दिवसांत अंड्यातून अळी बाहेर पडते. या अळया बोराच्या आतील गर खाऊन फळात विष्ठा टाकतात. त्यामुळे फळे किडतात, सडतात आणि गळून पडतात.

उपाय : बोराच्या हंगामामध्ये झाडाच्या खालील जमिनीवर पडलेली सर्व फळे वेचून त्यांचा नाश करावा. उन्हाळी हंगामामध्ये बोराच्या बागेतील जमिनीची वरचेवर मशागत करून जमिनीचा पृष्ठभाग चांगला तापू द्यावा. त्यामुळे जमिनीत असणारे अळीचे कोश उघडे पडून मरतात.

एप्रिल – मे महिन्यामध्ये 10 % लिंडेन पावडर बोरीच्या बागेमध्ये जमिनीत मिसळावी म्हणजे जमिनीतील कोश नष्ट होण्यास मदत होईल. फुले येण्याच्या आणि फळधारणा होण्याच्या सुमारास 100 मिलिलीटर मॅलेथिऑन (50 % प्रवाही) आणि 1 किलो गूळ 100 लीटर पाण्यात मिसळून 8 ते 10 दिवसांच्या अंतराने 4 ते 5 वेळा फवारणी केल्यास या किडीचा पूर्णपणे नायनाट होतो.

49 ग्रॅम कार्बारिल (50% पाण्यात विरघळणारे) 10 लीटर पाण्यात किंवा 10 मिलिलीटर रोगार अथवा 4 मिलिलीटर फॉस्फॉमिडॉन 10 लीटर पाण्यात मिसळून 10 दिवासांच्या अंतराने 4 ते 5 वेळा बोरीची फळे वाटाण्याच्या आकाराची झाल्यापासून फवारणी करावी.

साल पोखरणारी अळी (इंडरबेला) :

बोरीच्या झाडाच्या बुंध्याजवळ किंवा फांद्यांच्या बेचक्यात लाकडाचा भुसा आढळून आल्यास झाडावर साल पोखरणाऱ्या अळीची लागण झाली आहे हे ओळखावे. ही अळी दिवसा सालीच्या आतील भागामध्ये लपून बसते आणि रात्री झाडाची साल खाते. या किडीचा जास्त प्रादुर्भाव असल्यास झाडाच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो आणि उत्पादन कमी होते. या किडीचा कीटक तपकिरी रंगाचा असून पंखावर करड्या रंगाचे ठिपके असतात.

उपाय : या किडीच्या नियंत्रणासाठी बाग नेहमी स्वच्छ ठेवावी. खोडावरील आणि फांद्यांवरील भुसकट, जाळी अथवा विष्ठा खरडून टाकावी. त्यानंतर 4 मिलिलीटर न्यूऑन किंवा 2 मिलिलीटर मोनोक्रोटोफॉस 10 लीटर पाण्यात मिसळून स्वच्छ केलेल्या भागावर फवारावे.

केसाळ अळी :

केसाळ अळीची पूर्ण वाढ झालेली अळी तपकिरी रंगाची असते. अळीच्या संपूर्ण शरीरावर भरपूर केस असतात म्हणून या अळीला केसाळ अळी म्हणतात. या किडीची अळी पावसाळयात पानांच्या बाजूला अंडी घालते. 10 ते 15 दिवसांत अंड्यातून अळी बाहेर पडते. ही अळी झाडावरील पाने खरडून खाते. पूर्ण वाढ झालेली मोठी अळी पाने, लहान फळे आणि कोवळी फूट खाते. जून-जुलै महिन्यात लिंडेन पावडर धुरळून या किडीचा बंदोबस्त करावा. नंतरच्या काळात ऑगस्ट ते ऑक्टोबर महिन्यात 10 ग्रॅम कार्बारिल 10 मिलिलीटर एन्डोसल्फॉन 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

पिठ्या ढेकूण :

पिठ्या ढेकूण या किडीची अंडी चकचकीत पिवळया रंगाची आणि आकाराने लंबगोल असतात. या किडीची पिल्ले तसेच प्रौढ कीड कोवळ्या पानांतील आणि शेंड्यातील रस शोषून घेते.

उपाय : या किडींच्या नियंत्रणासाठी बोरीच्या बागेतील जमिनीची हिवाळयात वखरणी करावी, त्यामुळे जमिनीतील अंडी वर येऊन उन्हात त्यांचा नाश होतो. वखरलेल्या जमिनीवर 5% आल्ड्रिन किंवा क्लोरोडेन भुकटी धुरळावी. मिलिबगचा उपद्रव मोठ्या प्रमाणावर वाढल्यास 10 मिलिलीटर मोनोक्रोटोफॉस 10 लीटर पाण्यात या प्रमाणात मिसळून फवारणी करावी.

पाने गुंडाळणारी अळी :

पाने गुंडाळणारी अळी पिवळसर हिरव्या रंगाची असते. अळी पाने खाताना पानाची गुंडाळी करते. अळी पानाची खालची बाजू खाते. गुंडाळलेल्या पानातील पांढऱ्या रंगाच्या पापुद्र्यावर कोश तयार होतात.

उपाय : या किडीच्या नियंत्रणासाठी झाडावरील अळया वेचून नष्ट कराव्यात. किडीचा उपद्रव मोठ्या प्रमाणात आढळून आल्यास बागेवर 10% लिंडेन पावडर हेक्टरी 20 किलो या प्रमाणात धुरळावी.

बोर पिकावरील महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण :

भुरी :

भुरी या रोगाची लक्षणे सुरुवातीला बोराच्या लहानलहान फळांवर दिसून येतात. रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या फळांवर बुरशीचे पांढऱ्या रंगाचे ठिपके दिसतात. हे पांढरे ठिपके एकत्र मिसळून संपूर्ण फळांवर बुरशीची वाढ होते. रोगाची लागण मोठ्या प्रमाणावर झाल्यास पानांवर आणि फळांच्या देठांवर बुरशीची वाढ दिसून येते. फळांच्या वाढीच्या सुरुवातीच्या काळात या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाल्यास फळगळ होते. बोराच्या फळांना चिरा पडतात. बोरे वेडीवाकडी होतात. अशा फळांना बाजारात किंमत मिळत नाही.

उपाय : बोराच्या फळावर रोगाची लक्षणे दिसू लागताच प्रत्येक झाडावर 150 ते 200 ग्रॅम गंधकाची भुकटी धुरळावी. पुढील 2 ते 3 धुरळण्या रोगाच्या तीव्रतेनुसार 15 ते 20 दिवसांच्या अंतराने कराव्यात. रोगाची लक्षणे दिसताच 20 ग्रॅम गंधकाची भुकटी 10 लीटर पाण्यात मिसळून 15 दिवसांच्या अंतराने 2 ते 3 वेळा फवारणी करावी.

तांबेरा :

हा बुरशीजन्य रोग असून या रोगामुळे बोराच्या पानांच्या खालच्या बाजूला लहानलहान तांबूस रंगाचे ठिपके पडतात. तांबेरा रोगाचे ठिपके फुगीर असतात. पूर्ण वाढ झालेले तांबूस ठिपके गर्द तपकिरी ते काळसर रंगाचे होतात. रोगग्रस्त पाने पिवळी पडून गळून पडतात.

उपाय : या रोगाच्या नियंत्रणासाठी पानांवर तांबड्या रंगाचे ठिपके दिसू लागताच

30 ग्रॅम डायथेन एम-45 किंवा डायथेन झेड-78, 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. रोगाच्या तीव्रतेनुसार बुरशीनाशकाच्या 10 दिवसांच्या अंतराने 3 ते 4 फवारण्या कराव्यात.

पानावरील काजळी :

पानावरील काजळी हा एक बुरशीजन्य रोग असून या रोगाच्या उपद्रवामुळे पानाच्या खालील बाजूस लहानलहान काळे ठिपके दिसतात. त्यामुळे पानांवर काळया पावडरचा थर साचतो. वरील बाजूने पाने पिवळसर तपकिरी रंगाची दिसतात. रोगाची लागण झालेली पाने पूर्ण वाढ होण्यापूर्वीच गळून पडतात. मोठ्या प्रमाणात पानगळ झाल्यास उत्पादन कमी होते.

उपाय : या रोगाच्या नियंत्रणासाठी 30 मिलिग्रॅम ब्लायटॉक्स किंवा 20 मिलिग्रॅम डायथेन झेड-75, 10 लीटर पाण्यात मिसळून फवारावे. रोगाच्या तीव्रतेनुसार वरील बुरशीनाशकांच्या 10 ते 12 दिवसांच्या अंतराने 3 ते 4 फवारण्या कराव्यात.

पानावरील ठिपके :

बोरीच्या पानांवर पाच निरनिराळ्या प्रकारच्या बुरशींमुळे ठिपके पडतात.

(अ) अल्टरनेरिया लीफ स्पॉट पानाच्या खालच्या बाजूस लहान आकाराचे गर्द करड्या रंगाचे ठिपके दिसतात. हे ठिपके नंतर मोठे होऊन पूर्ण पानावर पसरतात आणि पाने गळून पडतात.

(आ) सर्कोस्पोरा लीफ स्पॉट : पानावर लहान गोल आकाराचे आणि करड्या रंगाचे ठिपके दिसतात. या ठिपक्यांभोवती लालसर कडा असते. ठिपके वाढत जाऊन पानाच्या दोन्ही बाजूंना दिसतात. रोगट पाने वाळून जातात आणि झाडावरून गळून पडतात.

(इ) आयसोरिऑप्सिस लीफ स्पॉट : पानाच्या खालच्या बाजूला काळे ठिपके दिसतात. ठिपके वाढत जाऊन खालचा भाग संपूर्ण काळा पडतो. पानाच्या वरचा भाग तांबूस रंगाचा दिसतो. नंतर पाने गळून पडतात.

(ई) फोमा लीफ स्पॉट : पानावर काळपट तपकिरी रंगाचे ठिपके पडतात. ठिपके वाढत जाऊन पानाच्या खालचा भाग संपूर्ण काळा पडतो. पानाच्या वरच्या भाग तांबूस रंगाचा दिसतो. नंतर पाने गळून पडतात.

(उ) क्लॅडोस्पोरियम लीफ स्पॉट : पानाच्या वरच्या बाजूस तांबडे ठिपके दिसतात.

उपाय : पानांवर रोगांची लागण दिसताच 20 ग्रॅम डायथेन झेड-78 किंवा डायथेन एम-45, अथवा 10 ग्रॅम फोल्टॉप 10 लीटर पाण्यात मिसळून 10 दिवासांच्या अंतराने 3 ते 4 वेळा फवारावे.

फळकूज :

हा बुरशीजन्य रोग आहे. या रोगाचे प्रमुख लक्षण म्हणजे देठाच्या विरुद्ध बाजूने फळ कुजण्यास सुरुवात होते. कुजलेला भाग तपकिरी काळपट रंगाचा दिसतो. फळवाढीच्या सुरुवातीच्या काळात बुरशीची लागण झाल्यास संपूर्ण फळ तपकिरी काळे पडून गळते.

उपाय : बागेमध्ये फळकुजीची लक्षणे दिसताच 20 ग्रॅम डायथेन एम-45 किंवा डायथेन झेड-78, 10 लीटर पाण्यात मिसळून फवारावे. रोगाच्या तीव्रतेनुसार 8 ते 10 दिवसांच्या अंतराने 3-4 फवारण्या कराव्यात.

बोर पिकाच्या फळांची काढणी, उत्पादन आणि विक्री :

बोरीच्या डोळे भरलेल्या झाडाला साधारणपणे दुसऱ्या वर्षापासून फळे येतात. सुरुवातीचे उत्पादन कमी असते. नंतर झाडाच्या वयाप्रमाणे उत्पादन वाढत जाते. सर्वसाधारणपणे पावसाळी हंगामात जुलै, ऑगस्ट महिन्यात फुलोरा येऊन नोव्हेंबर ते जानेवारीपर्यंत फळे काढणीस तयार होतात. कलमी बोरांच्या फळांची पक्वता खालील लक्षणांवरून ओळखता येते.

(1) उमराण जातीची फळे पिवळसर सोनेरी, कडाका आणि श्यामबेर या जातीची फळे
पांढरट तर चुहारा जातीची फळे देठाच्या विरुद्ध टोकाला तांबूस छटा आल्यावर फळे पक्क झाली असे समजावे.

(2) पक्व फळे हातांनी सहज तोडता येतात. त्यांचे देठ मऊ झालेले असतात.

(3) पक्व झालेल्या फळांना जातीनुसार ठरावीक आकार प्राप्त होतो.

लांबच्या बाजारपेठेसाठी दोन-तीन दिवसांनी पक्क होणारी फिकट पिवळ्या किंवा फिकट पांढऱ्या रंगाची फळे काढावीत. सर्वच फळे एकाच वेळी पक्क होत नाही म्हणून 3 ते 4 वेळा फळांची तोडणी करावी लागते. बोरीच्या पाच वर्षांच्या झाडापासून सरासरी 40 ते 50 किलोपर्यंत तर 8 ते 10 वर्षांच्या झाडापासून 80 ते 100 किलोपर्यंत उत्पादन मिळते. लांबच्या बाजारपेठेत बोरीची फळे विक्रीसाठी गोणपाटाच्या लहान पोत्यात, बांबूच्या करंड्यात किंवा लाकडी खोक्यात भरून पाठविता येतात. लाकडी खोक्यात फळे पाठविल्याने फळांच्या वजनात घट कमी होते आणि फळे खरचटण्याचे प्रमाण सर्वांत कमी असते. सध्या नायलॉनच्या जाळीदार रंगीत पिशवीत एक किलो वजनाच्या मापात फळे पाठवितात.

बोर पिकाच्या फळांची साठवण आणि पिकविण्याच्या पद्धती :

बोरीची फळे झाडावरून काढल्यानंतर त्यांच्यावर निरनिराळया बुरशीनाशकांचा उपयोग करून फळे जास्त दिवस टिकविता येतात. त्यासाठी कॅपटॉफ ह्या बुरशीनाशकाच्या 500 पीपीएम तीव्रतेच्या द्रावणात बुडवून फळे 10 अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानात साठवावीत.

उमराण जातीची व्यवस्थित पिकलेली फळे सर्वसाधारणपणे 30 ते 35 अंश सेल्सिअस तापमानात एक आठवडा चांगल्या स्थितीत राहू शकतात. शीतगृहात ही फळे तीन आठवडे चांगल्या स्थितीत राहू शकतात.
बोरीची फळे झाडावरच पिकतात. त्यामुळे बोरीची फळे काढणीनंतर पिकविण्याच्या वेगळया पद्धती नाहीत.

सारांश :

बोरीची झाडे उष्ण आणि कोरड्या हवामानात आणि अत्यंत हलक्या आणि खडकाळ जमिनीत चांगली वाढतात. महाराष्ट्रात कोरडवाहू क्षेत्रात बोरीची लागवड मोठ्या प्रमाणात वाढत आहे. बोराच्या फळात ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. त्याचप्रमाणे ‘अ’ आणि ‘ब’ जीवनसत्त्वेही यात आहेत.

महाराष्ट्रात लागवडीसाठी उमराण, कडाका, चुहारा, सन्नूर – 2 व 6 आणि इलायची या जाती चांगल्या आहेत. फळांची प्रत आणि उत्पादन चांगले येण्यासाठी बोरीची अभिवृद्धी बियांपासून न करता डोळे भरून ढाल किंवा पॅच आणि फ्ल्यूट पद्धतीने करावी. झाडांची योग्य वेळी छाटणी करावी. त्याचबरोबर वेळोवेळी खते आणि पाणी द्यावे.

जाणून घ्या पपई लागवड बद्दल संपूर्ण माहिती तेही एका क्लीक मध्ये (Papai Lagwad Mahiti) – Papai Farming

Recent Post

Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )