।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।
पितृपूजा : (Pitrupuja)
सामान्यत: सर्व मृत पूर्वजांना ‘पितर’ म्हटले जाते आणि त्यांच्या ठिकाणी देवतांसारखेच विशिष्ट असे अलौकिक सामर्थ्य असल्याचे मानून त्यांची पूजा केली जाते… भारत, चीन, जपान, मेलानीशिया इ. देशांतून पितृपूजा मोठ्या प्रमाणात चालत असे. मृत्यूनंतरही मानवाला अस्तित्व असते आणि त्याला जिवंत व्यक्तींशी संबंध ठेवून त्याच्या जीवनावर प्रभाव पाडता येतो, या श्रद्धेवर पितृपूजेची प्रथा प्रामुख्याने आधारलेली असते. प्रारंभीच्या पितृपूजेतूनच सर्व लोकांची धर्मभावना विकसित झाली, असे मत हर्बर्ट स्पेन्सरने एकोणिसाव्या शतकात मांडले परंतु विद्वानांनी त्यावर अनेक आक्षेप घेतले आहेत…..
पितृपूजेतूनच ‘देव’ ही कल्पना निर्माण झाली काय, याबाबतीतही मतभेद आहेत… मनुस्मृतीत (३.१९२) पूर्वदेव म्हणजे पितर, असे म्हटले आहे. फिजिअन लोकांमध्ये देवांच्या दोन प्रकारांपैकी मृतांचे बनलेले देव, हा एक प्रकार आढळतो. सामान्यत: पितर हे देवांपेक्षा कमी पूज्य असतात आणि त्यांच्या पूजेचे कर्मकांडही देवपूजेपेक्षा वेगळे असते. पितृपूजा हा विधी प्रामुख्याने कौटुंबिक असतो. आणि त्या वेळी विवाहादी कृत्ये निषिद्ध असतात…..
‘पितर’ हे ‘पितृ’ या शब्दाचे बहुवचनी रूप असल्यामुळे पितर या संज्ञेचा शब्दश: अर्थ मृत पिता, पितामह, प्रपितामह इ. पूर्वज असा होतो… प्रारंभी उल्लेखिलेल्या या तिघांना पितृत्रयी मानून त्यांना अनुक्रमे वसू, रूद्र व आदित्य यांचे प्रतीक मानले जाते. चुलते वगैरेंचाही पिररांत अंतर्भाव होतो. पितृप्रधान संस्कृतीमध्ये मातेपेक्षा पित्याला अधिक महत्व असल्यामुळे पितरांनध्ये पितृपरंपरेतील पुरूषाचांच प्राधान्याने अंतर्भाव होत असला, तरी पितृपरंपरेतील आजी, पणजी इ. स्त्रियांचा आणि मातृपरंपरेतील आई, आजोबा इ.स्त्रीपुरूषांचाही पितरांत अंतर्भाव होतोच. ‘मातृ’ व ‘पितृ’ या शब्दांचा समास, होताना ‘पितरौ’ असे रूप होते आणि त्यामुळे ‘पितरौ’ या पितृवाचक शब्दाच्या अर्थात मातेचाही अंतर्भाव होतो, या पाणिनीच्या नियमावरूनही हे स्पष्ट होते…..
याउलट दक्षिण भारतातील नायर, उत्तर भारतातील काही जमाती आणि मेलानीशियातील काही वंश हे मातृसत्ताक पद्धत मानत असूनही पितरांची पूजा करतात, असे आढळले आहे, मृत भाऊ, बहीण, मुलगा, मुलगी इत्यादींसाठीही श्राद्ध वगैरे केले जात असल्यामुळे, लक्षणेने त्यांचाही पितरांत अंतर्भाव करणे शक्य आहे… पितृकल्पना इंडो-यूरोपियन काळातील नसली, तरी इंडो-इराणियन काळाइतकी प्राचीन असावी, असे पां.वा. काणे मानतात…..
मनुस्मृतीच्या मते मरीची इ. ऋषी हे मनूचे पुत्र होत आणि त्या ऋषींचे पुत्र म्हणजे पितृगण होत… ऋषींपासून पितर झाले, पितरांपासून देव व मानव झाले आणि देवांपासून चराचर सृष्टी निर्माण झाली, असे मनुस्मृतीत (३.२०१) म्हटले आहे. ही कल्पना म्हणजे पितरांचे दैवतीकरण करण्याचाच प्रकार दिसतो. देव, दैत्य, मानव, यक्ष, गंधर्व, किन्नर इ. सर्वांना आणि मानवांतील सर्व वर्णांना पितर असतात, असे मनूचे मत आहे. या सर्वांची पूजा हिंदूंच्या श्राद्धात होत असते. स्मृतिपुराणांनी पितरांचे अनेक प्रकार पाडले आहेत. देव व मानव यांच्याप्रमाणे पितरांचाही एक स्वतंत्र समाज असावा, असे मत काही अभ्यासकांनी मांडले आहे. आर्यसमाजाच्या मते वानप्रस्थ आश्रमातील जिवंत लोक म्हणजेच ऋग्वेदातील पितर होत…..
अवेस्तामध्ये पितरांना ‘फ्रवशी’ म्हटले असून दुष्काळाच्या वेळी ते स्वर्गातील सरोवरांतून आपल्या वंशजांसाठी पाणी आणतात, असे मानले जाई… पितरांना अधोलोकांत घर मिळवून दिले, की ते त्रास देत नाहीत, असे रोमन लोक मानत. गाव वसवताना त्याच्या मध्यभागी अधोलोकाचे द्वार म्हणून एक खंदक खणलेला असे व त्यात पितरांसाठी बळी दिले जात. रोममध्ये असे अनेक खंदक होते. विशिष्ट दिवशी दगड व माती बाजूला करून ही द्वारे उघडली जात. ग्रिकांनी मृत वीरांना अमर व श्रेष्ठ मानून त्यांचा आदर केल्याची जी उदाहरणे दिसतात, त्यांवरून त्यांची पितृपूजा ही वीरपूजेत मिसळून टाकली होती, असे दिसते. वंशजांकडून विस्मृत वा वंशजहीन अशा पितरांची दुरवस्था होते, असे चीन, भारत इ. ठिकाणी मानले जाई…..
वंशज नसलेल्या पितरांना तृप्त करण्यासाठी चीनमध्ये एक सार्वजनिक विधीही केला जात असे… प्राचीन पितर नुकत्याच मृत झालेल्या पितरांसाठी जागा सोडून जातात, एखादा राजवंश नष्ट झाला, तर त्याचे पितर नव्या राजवंशाच्या पितरांना आपली जागा देतात, वंशजांचा जगात किती प्रभाव आहे त्यावरून पितरांचा प्रभाव ठरतो इ. कल्पना चीन मध्ये होत्या. पितरांना अर्पण करण्यासाठी जाळल्या जाणार्या कागदी वस्तू तयार करण्यामुळे चीनमध्ये लाखो लोकांना व्यवसाय लाभलेला होता. जपानमध्ये सर्व पितरांचा सन्मान करण्यासाठी एक मोठा वार्षिक उत्सव करीत असत व त्या वेळी सर्व पितर घरी परत येतात, असे मानले जाई. मेलानीशियामध्ये पितृपूजा व शासनव्यवस्था यांचा निकटचा संबंध मानला जातो. कारण वडील जिवंत असताना मुलांना त्यांचा धाकही वाटे व त्यांच्याकडून मार्गदर्शनही मिळे. त्यांच्या मृत्युनंतर त्यांना आवडणारी कृत्ये केली, तर चांगले फळ मिळते आणि त्यांना न आवडणारी कृत्ये केली, तर हानी होते, असे मानले जाई. कित्येकदा मृत गृहप्रमुखाची कवटी दारावर टांगली जाई व ते पारितोषिक वा शिक्षा देतो आणि वंशजांचे रक्षण करतो, असे मानले जाई…..
कोणत्याही शासनव्यवस्थेमागे हे तत्व असतेच… पितरांचे शुद्ध रक्त फक्त ज्येष्ठ पुत्रातच असते, या कल्पनेने त्याचा आदर राखण्याची तेथे प्रथा आहे. ईजिप्तमध्ये प्रारंभी थडग्यातील मृताच्या ‘क’ ची (आत्म्याची) पूजा केली जात होती परंतु पुढे मृताची त्याच्या व्यक्तिगत नावारूपाने पूजा न करता तो ओसायरिस या देवतेशी एकरूप झाला असे मानून त्याची ओसायरिसच्या रूपाने पूजा केली जाऊ लागली. या पूजेचे स्वरूप पितृपूजेहून थोडे वेगळे होते, असे म्हटले पाहिजे. राजा वा जमातप्रमुख यांच्या पूर्वजांची पूजा करण्याची पद्धत ईजिप्त, बॅबिलोनिया, फिजी, आफ्रिका इ. अनेक ठिकाणी होती. पॉलिनीशियामध्ये फक्त सरदारांचे आत्मे मृत्यूनंतर राहतात व सामान्यांचे लगेच नष्ट होतात, असे मानले जाई…..
पितर पितृलोकात राहतात व चंद्रलोक म्हणजेच पितृलोक होय, ते आकाशात वा अधोलोकात राहतात… तारे बनतात, सदैव घराजवळ राहतात, थोडक्यात आसपास एखादा प्राणी वा वनस्पती बनून राहतात इ. कल्पना आढळतात. वनस्पती, प्राणी इत्यादींना पितर मानून देवक समजण्याची कल्पना अनेक ठिकाणी आढळते. गाव वसविणार्या व्यक्तीला गावाचा पितर म्हटले जाते. ऑस्ट्रेलियातील इग्नॉरोट जमातीत गावातील सर्वांचे पितर विशिष्ट असा एकाच वृक्षात राहतात, असे मानले जाते…..
सामान्यत: जगातील सर्व लोकांच्या मते पितर हे बहुतेक बाबतीत जिवंत मानवासारखेच असतात परंतु त्यांच्याजवळ काही अतिमानवी शक्ती असतात आणि त्याबरोबरच वंशजांकडून अन्न, पाणी इ. हवे असल्यामुळे ते त्यांच्यावर अवलंबूनही असतात… त्यांना ऐकता व पाहता येते, वंशजांशी संपर्क साधता येतो, त्यांना तहान, भूक, आनंद, दु:ख, शोक, क्रोध इ. विकार असतात. हिंदूंच्या कल्पनेनुसार मात्र त्यांना लोभ, मोह व भय असले, तरी शोक नसतो, त्यांना मुखाने इच्छा व्यक्त करता येत नाही आणि मनोवेगाने कुठेही जाता येते…..
पितृलोकांत जाण्याचा आणि पिंडतर्पणादींच्या स्वीकारासाठी पृथ्वीवर परत येण्याचा पितरांचा मार्ग म्हणजे पितृयान ( देवयान ) होय… पहिला मृत मानव यम हा पितृपती वा पितृराज, गया हे पितृतीर्थ, गुजरातेतील सिद्धपूर हे मातृतीर्थ, दक्षकन्या स्वधा ही पितरांची आई वा पत्नी, दक्षिण ही त्याची आवडती दिशा आणि अमावास्या ही पितृतिथी वा पितृदिन होय. पितरांमध्ये मी अर्यमा आहे, असे श्रीकृष्णाने गीतेत म्हटले आहे. ऋग्वेदापासूनच पितरांचे निर्देश आढळत असले, तरी हिंदूंच्या धर्मशास्त्रात इतर विषयांच्या तुलनेने पितृपूजेचे महत्त्व कमी दिसते…..
श्राद्ध, तर्पण, प्रार्थना, यज्ञ, बळी, अन्नदान, उत्सव, नृत्ये, संगीत व क्वचित नरबळी इत्यादींद्वारे पितरांची पूजा केली जाते… त्यांच्या स्मतीप्रीत्यर्थ स्तूप, समाध्या, छत्र्या, स्मारके, चौथरे इ. बांधले जातात. बांबू, पाने इत्यादींच्या प्रतिमा तयार करणे, खांब उभारणे, बाहुल्या तयार करणे वा कवटीला मेणाचा लेप देऊन पितरांशी सादृश्य निर्माण करणे इ. प्रकार असतात. त्यांच्या प्रतिमा तयार करण्याच्या प्रथेतूनच कदाचित मूर्ती घडविण्याचा प्रारंभ झाला असेल, असे एक मत आहे. पितरांच्या आवडत्या वस्तू स्त्रियांना प्रसाधने, मुलांना खेळणी इ. अर्पण केल्या जातात. घरात त्यांच्या नावे टाक, नारळ इ. ठेवले जातात आणि तुळस, वड, पिंपळ इत्यादींना पाणी घातले जाते. चीन मध्ये वेगवेगळ्या वंशाची पितृमंदीरे बांधली जात आणि समाध्यांची यात्राही केली जाई. अनैसर्गिक पद्धतीने मृत झालेल्या पितरांना संतुष्ट करण्यासाठी विशेष खबरदारी घेण्याची प्रथा जगभर सर्वत्र आहे. मृत शत्रूंना त्यांच्या वंशजांनी दिलेली द्रव्ये प्राप्त होऊ नयेत, म्हणून त्यांची थडगी उद्ध्वस्त केल्याची उदाहरणे बॅबिलोनियामध्ये आढळतात…..
सर्वच समाजांतून मृतांविषयी काहीना काही विधी करण्याची प्रथा प्राचीन काळापासून प्रचिलित आहे… साठ हजार वर्षांपूर्वी मृतांबरोबर पुरलेल्या वस्तू उत्खननात सापडल्या आहेत परंतु यांतील सर्व विधी पितृपूजेत मोडत नाहीत. कारण पितरांना वस्तू अर्पण करताना अनेकदा पूजेपेक्षा त्यांचे रक्षण करण्याची भावनाच अधिक प्रबळ असते.पितर दुबळे बनलेले असतात, त्यांना आश्रय हवा असतो, श्राद्ध केले नाही तर त्यांना प्रेतात्मा वा पिशाच बनून भटकावे लागते इ. विचारांनी त्यांच्या सद्गतीसाठी वा परलोकात त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना वस्तू अर्पण केल्या जातात. हिंदूंच्या श्राद्धतर्पणादींमध्येही काहीशी हीच भावना असते. अशा कृत्यांना अनेकदा पितृपूजा म्हटले जात असले, तरी तत्वत: ही कृत्ये पितृपूजेहून वेगळी आहेत, असेच म्हटले पाहिजे…..
बहुतेक ठिकाणी पितृपूजेचे दिवस ठरलेले असतात… हिंदू लोक पितरांसाठी करावयाचे विधी कृष्णपक्षात व विशेषत: अमावास्येला करतात. कारण माणसाचा एक महिना म्हणजे पितरांचा एक दिवस व एक रात्र (माणसाचा कृष्णपक्ष म्हणजे त्यांचा दिवस व शुक्लपक्ष म्हणजे रात्र), असे मानले जाते. विशेषत: भाद्रपद कृष्णपक्ष म्हणजे पितृपक्ष आणि भाद्रपद अमावास्या म्हणजे सर्वपित्री अमावास्या, असे म्हटले जाते. द्विजाने दररोज करावयाच्या पंचयज्ञांपैकी पितृयज्ञ हा एक होय. पारशी लोक १० ते २० मार्च या काळात आणि रोमन लोक १३ ते २१ फेब्रुवारी आणि ९,११ व १३ मे या दिवशी या प्रकारचे विधी करीत…..
श्राद्धकर्त्याचे पितर भोजनासाठी निमंत्रित केलेल्या ब्राम्हणांत प्रविष्ट होतात, ब्राम्हणाने (काही ठिकाणी मामाने वा मुलीच्या मुलांनी) खाल्लेले अन्न पितरांकडे जाते इ. कल्पना भारतात आढळतात… मृत व्यक्तीला पुनर्जन्म मिळत असेल, तर पितृपूजेतील अन्न तिच्यापर्यंत कसे पोहोचते ही एक समस्याच आहे. मत्स्यपुराणाच्या मते पितर पुनर्जन्मानंतर देव बनले असले, तर त्यांना दिलेले अन्न अमृत बनते, ते पशू बनले असले, तर अन्न गवत बनते आणि अशा रीतीने ते अन्न त्यांना पोहोचते. हिंदू धर्माची वृत्ती सर्वसमावेशक असल्यामुळे प्रारंभापासून प्रचलित असलेल्या कल्पना स्वीकारण्यात आल्या असाव्यात. असे पां. वा. काणे मानतात…..
ज्या पितराची पूजा करावयाची असेल, त्याच्या नातवाला वा इतर कोणाला तरी त्याचा प्रतिनिधी बनवून त्याची पूजा करण्याची प्रथा चीन, अमेरिकेतील प्वेव्लो जमात इत्यादीं मध्ये होती…..
पितरांविषयी मानवाच्या भावना आदर व भीती अशा संमिश्र स्वरूपाच्या असतात… ते कुटुंबाचे रक्षण करतात, मित्रांना मदत व शत्रूंना शासन करतात, देवांकडे मध्यस्थी करतात, त्यांच्या कृपेने संतती, संपत्ती, पाऊस, पिके इ. गोष्टी लाभतात या समजुतींमुळे त्यांच्याविषयी प्रेम, जिव्हाळा व विश्वास वाटून त्यांची पूजा केली जाते. याउलट, त्यांनी परत येऊन त्रास देऊ नये म्हणून प्रेताचे डोळे मिठणे, परतीच्या वाटेवर काटे पसरणे, दारेखिडक्या लावून घेणे, त्यांची नावे न उच्चारणे इ. प्रकारही केले जातात. भीती वाटत असल्यास त्यांच्यापासून संरक्षण प्राप्त करणे आणि विश्वास वाटत असल्यास त्यांना मदतीसाठी बोलावणे, हे पितृपूजेमागचे मुख्य उद्देश असतात. यांखेरीज भूतकाळाचे स्मरण ठेवणे, वडीलधार्यांच्या शहाणपणाविषयी आदर व्यक्त करणे, त्यांचे आशीर्वाद व मदत प्राप्त करणे, दु:ख दूर करणे इ. उद्देशही असतात. वंशाच्या अखंडतेची भावना, वारसाहक्काने मिळावयाच्या संपत्तीचा विचार, शेजार्यांपेक्षा अधिक प्रभावी विधी करण्याची प्रतिष्ठाची भावना इ. गोष्टीही पितृपूजेच्या मागे असतात…..
दुष्काळाच्या वेळी पितरांच्या समाधीवर पाणी ओतणे, पुरलेल्या प्रेताचा सांगाडा उकरून त्यावर पाणी ओतणे, तो तळ्यात बुडविणे किंवा त्यावर चाळणीतून पाणी ओतणे इ. कृत्ये करण्याची प्रथा न्यू कॅलेडोनिया, रशिया इ. ठिकाणी होती… चीनमध्ये प्रेत पुरले नाही, तर पितरांच्या आत्म्यांना पावसाचा त्रास होतो व म्हणून ते पाऊस पडू देत नाहीत, या कल्पनेने दुष्काळाच्या वेळी न पुरलेल्या मृतांची हाडे पुरली जात. पितृपूजा न केल्यामुळे रागावलेले पितर वंशजांच्या अग्नीत ढकलून, पाण्यात बुडवून वा विजेच्या तडाख्याने मारतात किंवा आत्मतत्व पळवून नेऊन आजारी पाडतात, असे मानले जाई. एकाकीपणाची भावना, जिवंत व्यक्तीचा मत्सर, वंशजांकडून सेवा करून घेण्याची इच्छा, नवीन वंशज मरेपर्यंत कराव्या लागणार्या पहार्यातून सुटका करून घेण्याची इच्छा इत्यादींमुळेही ते बळी घेतात, अशी समजूत असते…..
पितर व वंशज यांत संपर्क असू शकतो. वंशज संकटात असताना त्यांच्या स्वप्नात जाऊन अथवा अन्य एखाद्या मार्गाने पितर त्यांना मार्गदर्शन करतात… मृतांचे छायात्मे जमिनीला भेगा पाडून वर येतात, असे ग्रीक लोक मानतात. शामान हा मृत पितरांशी बोलू शकतो, ही कल्पना अनेक ठिकाणी आढळते. पितरांची इच्छा विशिष्ट पद्धतीने प्रकट होते. उदा., हिंदूंच्या मते कावळ्याने पिंड शिवला की नाही, यावरून पितर तृप्त आहेत की नाही ते कळते. पितर मुलांच्या रूपाने पुन्हा त्याच घराण्यात जल्माला येतात, या कल्पनेने नवजात बालकांना त्यांची नावे ठेवली जातात. अमेरिकन इंडियन लोकांत पितरांच्या मदतीने देशकालातील गोष्टी पाहणारे शामान, जादूगर, पुरोहित इ. असत. पितरांशी संपर्क साधण्याची शक्ती काहीजणांजवळ उपजत असे, काही ती ध्यानाने प्राप्त करीत आणि काहीजण गुंगी आणणार्या वनस्पतीच्या साहाय्याने वा स्फटिकात पाहून त्यांच्याशी संपर्क साधत. ते वंशज व पितर यांत मध्यस्थी करीत. शांत अरण्यात पितरांची पावले ऐकू येतात, असे मानले जाई. मृत्यू जवळ आल्यावर वडील बोलावत आहेत, असे म्हटले जाई…..
चीनमध्ये राजधानीच्या जागेची निवड, वारस व अधिकारी यांची नेमणूक इ. बाबतींत पितर मार्गदर्शन करतात, पूजा चालू असताना पितर आसनावर येऊन बसतात व नंतर लगेच निघून जातात इ. समजुती होत्या. पितरांशी संपर्क साधण्यासाठी प्लांचेटचा उपयोग करण्याची प्रथा अनेक ठिकाणी आढळते…..
आपल्याला आपल्या मृत्यूनंतर पितृपूजा करणारा पूत्र व्हावा, ही भावना हा कुटुंबाचा पाया असतो… कुटुंबाचे पावित्र्य आणि विवाहसंबंधातील दृढता यांना पितृपूजेची प्रथा उपकारक ठरते. पितरांपैकी कुणाचा खून झाला असेल, तर त्याचा आत्मा घराभोवती घुटमळत राहतो व त्याला खुनी व्यक्तीचे रक्त देऊनच तृप्त करता येते, या विचारातून सूडाची भावना तेवत राहते. अशा रीतीने पितृपूजेमुळे कौटुंबिक ऐक्य दृढ होते. चीनमध्ये तर जणू काही जिवंत व्यक्ती व पितर यांचे मिळून एक कुटुंब बनते, अशी कल्पना होती. सामुदायिक रीतीने केलेल्या विधींमुळे वंशामध्ये व समाजामध्येही ऐक्य साधण्यास मदत होते. माणसाला शक्य नसलेल्या गोष्टी पितर करू शकतात, या भावनेमुळे आणि जिवंतपणी त्यांनी मार्गदर्शन केलेले असल्यामुळे संकटप्रसंगी त्यांचा आधार वाटून मन:शांती लाभते. पितृपूजेमुळे कृतज्ञता, आदर, आत्मीयता इ. सद्गुणांची वृद्धी होण्यास मदत होते. चांगले वर्तनच पितरांना आवडते, या श्रद्धेमुळे नीतिमूल्यांचेही संवर्धन होते परंतु पितृपूजेमुळे भीती, अज्ञान, अंधश्रद्धा, पुरोहितांचा स्वार्थ इ. गोष्टींनाही थारा मिळतो. म्हणूनच चार्वाकासारखे बुद्धिवादी लोक पितृपूजेची चेष्टा करताना आढळतात. आधुनिक संस्कृतींमध्ये तंत्रज्ञानाची प्रगती, विभक्त कुटुंबव्यवस्था, आर्थिक स्वावलंबन, जिव्हाळ्याचा अभाव इत्यादींमुळे पितृपूजा क्षीण होत चालली आहे…..