आज्जी (Aaji)______(कथा)

।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।

आज्जी Aaji :

आमच्या एरियात एक आज्जी – आजोबा दोघेच राहायचे. अगदी तू तिथे मी असायचे. तशी माझी आणि त्यांची बोलण्याएवढी ओळख नव्हती पण सकाळी मी फिरायला निघालो की ती दोघेजण बाजूच्या फूटपाथवर असलेल्या गुलमोहोराच्या झाडाखालच्या बाकावर बसलेले दिसायचे.

दोघेही टुकटुकीत होते. आजोबा साधारणपणे ऐंशी आणि आज्जी अंदाजे सत्तर ! कोकणस्थ असावेत कारण दोघेही गोरवर्णी, पेहरावात छानपैकी नेटकेपणा, भडक रंग बिल्कुल नाहीत. फेंट कलर असायचे. लिंबू कलर, व्हॕनिला कलर, फिकट ग्रे.

आजोबा छानशा ट्रॕक सूट मधे असायचे आणि आज्जी छानशी सुती साडी नेसलेल्या आणि हलकासा स्वेटर घालून असायच्या. दोघांच्याही पायात व्हाईट कॕनव्हास शूज असायचे.

आज्जींच्या हातामधे थर्मास असायचा. बहूतेक गरम पाणी असावे असा आपला एक अंदाज. आणि आजोबांच्या हातामधे एखादे वर्तमानपत्र.

सकाळच्या वातावरणातही एकदम प्लिझंट दिसायचे. समाधानाने भरलेले असायचे त्यांचे चेहेरे. त्यांना तिथे बसलेले बघितले की बघणाऱ्याच्या मनात एक अजीब सी ताजगी भरुन यायची आपोआप.

तिथे बाकावर बसून आजोबा शांतपणे वर्तमानपत्र वाचताना दिसायचे आणि आज्जी थर्मासच्या ग्लासमधून ते गरम पाणी किंवा जे काय असेल ते सिप करत छानपैकी आजूबाजूला बघत बसलेल्या असायच्या.

जाणारे येणारे… चेहेरे ओळख असणारे… त्यांच्याकडे बघून ओळखीचे हसायचे… हात हलवायचे… ते दोघेही तसाच प्रतिसाद द्यायचे… प्रसन्न वदने ! बस्स एवढेच…

काय ? कसं काय ? काय विशेष ? तब्ब्येत कशी आहे ? काल दिसला नाहीत, कुठे गावाला गेला होता काय ? अशा कुठल्याही प्रश्नोत्तरांची देवाण घेवाण नाही. पण त्यांच्या एकमेकांच्या तिथल्या बाकावरच्या अस्तित्त्वाची ओळख सकाळी फिरायला येणाऱ्या जाणाऱ्यांच्या नजरेला झालेली.

दोन वर्षे तरी झाली असावीत हे असेच सुरु होते. कधीतरी वाटायचं की त्यांच्या जवळ जाऊन बसावे, त्यांच्याशी बोलावे, ओळख करुन द्यावी, ओळख करुन घ्यावी, त्यांना घरी बोलवावे, एक छान स्नेहबंध तयार करावा आपल्यात आणि त्यांच्यात… पण आज करु, उद्या करु या नादात आणि रोजच्या व्यापात ते राहूनच गेले.

रोज दिसायचे… तसेच बसलेले… रोज हसायचे… रोज ओळखीने हसायचे… दिसलो की हात हलवून हाय वगैरे करायचे… पण जवळ जाऊन भेटणे झालेच नाही… फक्त आठ ते दहा पावले चालत जावे लागणार होते त्यांच्याजवळ पोहोचायला… पण नाही जमले ! राहूनच गेले !

दिड महिन्यापूर्वी… असेच आठ पंधरा दिवस दोघेही दिसली नाहीत तिथे बाकावर ! चुकल्यासारखं वाटलं… काहीतरी चुकतेय हे जाणवत होतं पण विचारायचं कुणाला ? आमच्या ओळखीच्या ग्रुपमधल्या कुणाशीच त्यांचे तसे घरगुती संबंध नव्हते. काहीच माहित नव्हते. कुठेतरी मुलाकडे, मुलीकडे, नातवंडांना भेटायला गेले असावेत असा आपला आमचा आम्हीच अंदाज बांधला आणि रुटीन सुरु ठेवले.

साधारणपणे तीन आठवड्यानंतरच्या सकाळी फिरायला जाताना त्या बाकाकडे लक्ष गेले तर आजोबा एकटेच… नेहमीच्या वेषात ! पण शेजारी आज्जी नव्हत्या… आज ते ओळखीचे हसलेही नाहीत आणि नेहमीप्रमाणे हात हलवून हाय असंही केले नाही आणि हसलेही नाहीत. पूर्ण अनोळखी नजरेने ते समोर बघत बसले होते. वर्तमानपत्राची घडी अजूनही तशीच त्यांच्या हातात घट्ट पकडलेली होती.

तिथे शेजारीच आज्जींचा स्वेटर घडी करुन ठेवलेला, त्या स्वेटरवर असणारी मोगऱ्याची तीन चार ताजी फुले आणि शेजारी आज्जींचा थर्मास ! आजोबा वर्तमानपत्र वाचताहेत आणि मधूनच शेजारी ठेवलेल्या थर्मास कडे आणि स्वेटरच्या घडीकडे बघताहेत… नंतर चष्मा काढून हलके हलके डोळे पुसताहेत !

काय झालं असावे याचा थोडाफार अंदाज आमच्या ग्रुपमधे आला. आजोबांच्या जवळ गेलो… त्यांनी मान वर उचलून बघितले… डोळे पूर्ण भरलेले… बोलता येणं शक्यच नव्हते त्यांना… त्यांनी माझ्याकडे बघितले आणि नंतर स्वेटरच्या घडीकडे बघत बघत माझा हात त्यांच्या हाताने घट्ट पकडला… निःशब्द ! त्यांच्या तळव्यातून जाणवणारी ती थरथर आजोबा आतून किती फुटताहेत आणि तुटताहेत हेच सांगत होती.

काय बोलायचं असतं अशा वेळी ? नाहीच बोलता येत आणि येत असले तरी बोलूच नये… वाहून द्यावे त्या माणसाला… होऊन द्यावे मोकळं… करुन टाकू दे त्याला स्वतःला रितं, रितं ! मी गप्प उभा… तळव्यातला तळवा… थरथरणारा… त्यांचं सगळं शरीर गदबदलेले… प्रसन्न वदनी हास्य मावळलेले… चेहेरा म्लान झालेला… सुरुकुत्या दाटल्यासारखा…

थोडा वेळ तसाच गेला. आजोबा सावरले. माझा तळवा त्यांनी त्यांच्या दोन्ही तळव्यात पकडून ठेवला… थोडावेळ तसेच स्तब्ध झाले. मी पण मग माझा दुसरा तळवा त्यांच्या तळव्यावर ठेवत थोडंसं थोपटल्यासारखं केलं… हात सुटले… मी त्यांच्या पाठीवर हात फिरवत राहिलो…

आजोबा उठले… स्वेटरवरच्या मोगऱ्याच्या फुलांना हातामधे घेऊन, नाकाजवळ नेऊन, श्वासभरुन गंध घेतला आणि शर्टच्या खिशात ठेवली… अलगदपणे स्वेटर हातावर घेतला… थर्मास मधले पाणी प्यायले आणि थरथरत उठत मला म्हणाले, “माझ्या सोबत जरा चालशील त्या पलिकडच्या कोपऱ्यापर्यंत… सोबत हवीय रे आता… एकटं चालणं नाही जमणार आता मला… हात सुटला… ती गेली माझा हात सोडून, मला एकटा ठेवून… खूप घाईत गेली रे… चहा आणते हं असं म्हणून किचनमधे गेली ती परत आलीच नाही… जाताना तिथेच ओट्याला टेकून बसली होती जशी आम्ही दोघे जेवताना बसायची तशीच… बोललीही नाही… विचारलेही नाही, तुम्ही येणारेय का म्हणून !”

चालता चालता आजोबा मोकळे होत राहिले… रिक्त होत गेले… माझ्या हातामधला त्यांचा हात आता माझ्या खांद्यावर विसावला होता… माझ्या खांद्यांना त्यांच्या हाताची थरथर क्षीण होताना जाणवत होती… हलके हलके चालत चालत आम्ही त्यांच्या घराजवळ आलो… घराच्या कंपाऊंडचे दार उघडले त्यांनी… मला खुणेने आत यायला सांगितले… मी आत जाता जाता दरवाज्यावर घराचे नाव वाचले… ‘सुहासिनी’ !

घरात गेलो… घरात आजोबांशिवाय कुणीच नव्हते… समोरच्या शोकेसच्या मध्यभागी आज्जींचा तो तसाच प्लिझंट हास्य आणि अतीव समाधान चेहेऱ्यावर विलसणारा फोटो होता… फोटोवर चंदनी हार… नुकत्याच शांत झालेल्या धूप अगरबत्तीचा दरवळ… दारातून आत आलेले सकाळचे कोवळे सूर्यकिरण फोटोच्या जवळ पसरलेले… आज्जी हसताहेत…

फोटोखाली मला अक्षर दिसतात…

‘कै. सौ. सुहासिनी…’

फोटोसमोरच्या डुलणाऱ्या आरामखुर्चीत आजोबा शांत होऊन बसलेले आणि त्यांनी त्यांच्या छातीवर आज्जींचा स्वेटर घेतलेला…

शेजारच्या घरातून सुरु असलेल्या रेडियोवरचे गाणे ऐकू येतेय…

हा चंद्र ना स्वयंभू
रवी तेज वाहतो हा
ग्रहणात सावल्यांचा
अभिशाप भोगतो हा

प्रितीस होई साक्षी
हा दूत चांदण्यांचा

संपेल ना कधीही
हा खेळ सावल्यांचा…

दरवाज्यातून आत येणाऱ्या किरणांसोबत अंगणातल्या प्राजक्ताची सावली फोटोजवळ येऊन टेकलेली…

रक्षाबंधन (Raksha Bandhan)____(बोधकथा-BodhKatha)

Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )