Mango Farming | आंबा शेती । Amba Sheti । आंबा लागवड । आंब्याच्या सुधारित जाती । आंब्याच्या संकरित जाती । आंबा पिकासाठी योग्य हवामान आणि जमीन । आंब्याच्या जाती । आंब्याच्या संकरित जाती । आंबा कलम पद्धती । आंबा लागवडीचा हंगाम । आंब्याची कोयी रुजवणे । आंबा पीक कलमे लावून बागा वाढविणे । आंबा पिकाचे कलमे लावताना खालील काळजी घ्यावी । आंबा पिकासाठी खते । आंबा पिकासाठी पाणी व्यवस्थापन । आंब्याच्या पिकाला खते कशी द्यावीत । आंबा पिकातील आंतरपिके । आंबा पिकातील तणनियंत्रण । आंबा पिकावरील महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण । आंबा पिकावरील महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण । आंबा पिकावरील शारीरिक विकृती आणि त्यांचे नियंत्रण । आंबा पिकातील पांढरा साका । मीजमाशी । शेंडा पोखरणारी अळी । पिठ्या ढेकूण । आंबा फळ पिकविणे ।
।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।
आंब्याचे उगमस्थान, महत्त्व आणि भौगोलिक प्रसार : Origin, Importance and Geographical Distribution of Mango:
आंब्याच्या उगमस्थानाबद्दल अनेक मतभेद आहेत. तथापि, आंबा हा भारतीय आहे, याबद्दल पुष्कळसे मतैक्य आहे. अगदी अलीकडे लखनौ येथील बिरबल साहनी इन्स्टट्यूट ऑफ पॅलेबॉटनी ह्या संस्थेतील ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सी. मेहरोत्रा यानी संशोधन करून असे सिद्ध केले आहे की, आंब्याचे मूळ स्थान ईशान्य भारतातील मेघालयाच्या दामलगिरी टेकड्यां जवळ आहे. आंब्याचा उगम सुमारे साडेसहा कोटी वर्षांपूर्वीचा आहे, असेही या संशोधनात आढळून आले आहे.
आर्थिक आणि अन्नद्रव्य मूल्यांच्या दृष्टीने आंबा हे सर्वांच्या आवडीचे फळ असून त्याच्या विविध उपयोगांमुळे आणि गुणधर्मांमुळे ह्या पिकास महत्त्व प्राप्त झाले आहे. विविध प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करण्याच्या दृष्टीने आंबा हे फळ सर्वोत्तम मानले जाते. आंब्याच्या फळाच्या वाढीच्या कोणत्याही अवस्थेत- गोटीएवढ्या आकाराच्या फळापासून ते पूर्ण पोसलेल्या पक्व अवस्थेपर्यंतच्या फळापासून विविध खाद्यपदार्थ तयार करता येतात. कैऱ्या चटणी, कढी, पन्हे, मुरंबा, लोणची ह्यांसाठी तसेच पूर्ण पिकलेले फळ खाण्यासाठी, फळाच्या फोडी व रस हवाबंद डब्यात भरण्यासाठी, जॅम, सरबत, टॉफी, आमरस पोळी, आंबावडी, इत्यादी पदार्थ तयार करण्यासाठी वापरतात. कोयीच्या आतल्या दलावर रासायनिक प्रक्रिया करून अन्नपदार्थाची निर्मिती करता येते. तसेच कापडास खळ देण्यासाठी स्टार्च तयार करता येतो. आंब्याच्या लाकडाचा खोकी, दरवाजे, फळ्या, इत्यादी तयार करण्यासाठी तसेच सरपणासाठी उपयोग करतात.
भारतातून दरवर्षी सरासरी सुमारे 12,000 टन आंबाफळांची निर्यात होते. जगातील 53 देशांमध्ये भारतातून आंबाफळे निर्यात केली जातात. त्यांपैकी 95% आंबाफळे ही बहारीन, बांगला देश, कुवेत, मलेशिया, ओमान, कतार, सौदी अरेबिया, सिंगापूर, युनायटेड अरब अमिरात ह्या देशांत निर्यात केली जातात. सन 1985-86 मध्ये भारताने 19 कोटी रुपये किमतीची जवळजवळ 16,451 टन आंबाफळे निर्यात केली. त्याचबरोबर 32 कोटी रुपये किमतीच्या 38,237 टन प्रक्रियायुक्त आंबा उत्पादनाची निर्यात केली. भारतात होणाऱ्या एकूण फळे आणि फळांपासून तयार होणाऱ्या प्रक्रियायुक्त पदार्थांच्या निर्यातीत फक्त आंब्याचा वाटा 60% आहे. आंब्याच्या लागवडीखालील क्षेत्रफळ, उत्पादन, आंबा फळात असलेले पौष्टिक घटक, गुणधर्म आणि रुचीविषयी लोकप्रियता या विशेष गुणांची बरोबरी करू शकेल असे दुसरे एकही फळ नाही. पिकलेला आंबा हा उत्साहवर्धक, शरीरवर्धक आणि आहारदृष्ट्या पौष्टिक मानला जातो. आंब्यात अ ब क जीवनसत्त्वे तसेच खनिजे आणि साखर भरपूर प्रमाणात असतात. शंभर ग्रॅम खाण्यायोग्य आंब्याच्या भागात पुढीलप्रमाणे अन्नद्रव्ये असतात.
आंबा पिकाखालील क्षेत्र आणि उत्पादन : Area under Mango Crop and Production:
भारतात आंबा पिकाखाली फार मोठे क्षेत्र आहे. लागवडीखालील सर्व फळपिकांखाली असलेल्या क्षेत्रांपैकी फक्त आंबा पिकाचा वाटा 11 लाख 12 हजार हेक्टर असून त्यापासून 90 लाख टन फळांचे उत्पादन मिळते. भारतातील जवळजवळ सर्व राज्यांमध्ये आंब्याची लागवड करण्यात येते. सर्वांत जास्त लागवड उत्तर प्रदेशात असून त्या खालोखाल आंध्र प्रदेश आणि बिहारचा क्रमांक लागतो. आंब्याची उत्पादकता आंध्र प्रदेशात सर्वांत जास्त असून त्या खालोखाल गुजरातचा क्रमांक लागतो. क्षेत्रफळाचा विचार केल्यास महाराष्ट्राचा क्रमांक 10 वा लागतो. तर उत्पादकेतच्या बाबतीत 8 वा क्रम लागतो. महाराष्ट्रातील बहुतेक सर्व जिल्ह्यांत आंब्याची लागवड आढळते. रायवळ आंब्याचे उत्पादनक्षम आयुष्य 80 ते 100 वर्षे तर कलमी आंब्याचे उत्पादनक्षम आयुष्य 40 ते 60 वर्षे इतके असते.
आंबा पिकासाठी योग्य हवामान आणि जमीन : Suitable Climate and Land for Mango Crop:
हवामान :
आंबा हे उष्ण हवामानातील पीक आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत आंबा लागवडीस हवामान योग्य आहे. हमखास आणि भरपूर पाऊस होत असलेल्या प्रदेशात जून ते ऑक्टोबर ह्या कालावधीत जमिनीत खोलवर पावसाचे पाणी मुरवून आंबा पीक चांगल्या प्रकारे वाढविता येते आणि त्यापासून चांगले उत्पादन मिळू शकते. पाऊसमान कमी असलेल्या प्रदेशात मोहोर येणाच्या आधी पाण्याच्या 1-2 पाळ्या दिल्यास चांगले उत्पादन मिळते. कडाक्याची थंडी ह्या पिकास विशेषतः नवीन झाडांना मानवत नाही. बहार येण्यापूर्वी कोरडे हवामान असल्यास बहारावर त्याचा चांगला परिणाम होतो.
या पिकाला भरपूर पावसाचा प्रदेश (वार्षिक 75 ते 375 सेंमी. पर्जन्यमान) आणि दमट हवामान मानवत असले तरी फुलोरा येण्याच्या आणि फळधारणा होण्याच्या काळात वादळी पाऊस, धुके, ढगाळ हवामान, गारपीट ह्यांमुळे पिकाचे जबर नुकसान होते. आंबा पिकाच्या उत्तम वाढीसाठी 17.7 ते 26.6 अंश सेल्सिअस तापमान असावे लागते. समुद्रसपाटीपासून 1.500 मीटर उंचीपर्यंत ह्या पिकाची लागवड चांगल्या प्रकारे करता येते.
जमीन :
आंबा हे बहुवर्षीय, उंच वाढणारे झाड आहे. झाडाची मुळे अन्नद्रव्ये आणि पाणी यांच्या शोधात खोलवर पसरतात. झाडाची वाढ चांगली होण्यासाठी योग्य जमिनीची निवड करणे ही आंबा उत्पादनातील महत्त्वाची बाब आहे. आंब्याचे झाड अनेक प्रकारच्या जमिनींत चांगले वाढते. कोकणातील जांभा दगडापासून बनलेल्या खोल जमिनी, तसेच राज्याच्या इतर भागातील गाळवट खोल ते मध्यम खोल आणि चांगला निचरा होणाऱ्या आम्लयुक्त जमिनी ह्या पिकाच्या लागवडीस उत्तम समजल्या जातात.
आदर्श आंबा लागवडीसाठी जमिनीचा आम्लविम्ल निर्देशांक 5.5 ते 7.5 असावा आणि त्यातील पाण्यात विरघळणाऱ्या क्षाराचे प्रमाण 0.05% पेक्षा कमी असावे. जमिनीचा आंबटपणा कमी करणारे क्षार आंब्याच्या लहान रोपांना मारक ठरतात. अशा जमिनीत पाने करपतात आणि पुढे रोपे / कलमे जळतात. पाच ते सहा मीटरपर्यंत कठीण खडक असलेल्या तसेच जास्त खोल भेगा जाणाऱ्या भारी, क्षारयुक्त जमिनीची आंबा लागवडीसाठी निवड करू नये. दोन मीटरच्या वर पाण्याची पातळी (वॉटर टेबल) येत असलेल्या तसेच पाण्याची पातळी एकदम बदलत असलेल्या जमिनीची निवड करू नये. सर्वसाधारणपणे दीड ते दोन मीटर खोलीची आणि त्याखाली मुरूम असलेली जमीन ह्या पिकासाठी निवडावी.
आंब्याच्या सुधारित जाती व संकरित जाती : Improved Varieties and Hybrids of Mango:
राज्याच्या हवामानानुसार, महाराष्ट्राच्या निरनिराळया भागांत आंब्याच्या वेगवेगळया जातींची लागवडीसाठी शिफारस केली आहे, ती अशी :
विभाग | आंब्याच्या शिफारस केलेल्या जाती |
कोकण | हापूस, रत्ना, केसर, सिंधू |
पश्चिम महाराष्ट्र | हापूस, केसर, वनराज, लंगडा, तोतापुरी |
मराठवाडा | केसर, निरंजन, लंगडा, बेनिशान, तोतापुरी, नीलम |
विदर्भ | नागीन, केसर, लंगडा, पायरी, तोतापुरी, बेनिशान |
वरील उन्नत जातींव्यतिरिक्त महाराष्ट्रात विशेषत: विदर्भ आणि मराठवाडा भागात रायवळ आंब्याची झाडे मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यांपैकी काही झाडे नामांकित आणि भरपूर उत्पादन देतात. काही निवडक झाडांची शाखीय पद्धतीने लागवड करून त्यांच्या बागा उभ्या करणे फायदेशीर ठरेल. अशा प्रकारे लोणच्यासाठी व रसासाठी, उशिरा येणाऱ्या अथवा लवकर येणाऱ्या आंब्याच्या झाडाच्या बागा उभ्या करून आर्थिक लाभ मिळविता येईल.
उन्नत आंब्याच्या जाती विषयीची थोडक्यात माहिती खाली दिली आहे : Brief information about advanced mango varieties is given below:
हापूस (अल्फान्सो) : Hapoos
उत्तम स्वाद व चव, आकर्षक रंग व आकार, तंतुविरहित गर, पिकल्यानंतरही बरेच दिवस चांगल्या स्थितीत राहण्याचा गुणधर्म व हवाबंद डब्यामध्ये भरण्यास (कॅनिंग) अनुकूल ह्या सर्व गुणधर्मांमुळे आंब्याच्या जातींमध्ये हापूस ही जात सर्वोत्तम मानली जाते. भारतातून निर्यात होणाऱ्या निवडक जातींमध्ये ह्या जातीचा प्रामुख्याने समावेश होतो. हंगामामध्ये हापूसची फळे इतर जातीपेक्षा लवकर तयार होतात. कोकणच्या उष्ण व दमट हवामानात व जांभा दगडापासून तयार झालेल्या जमिनीत ह्या जातीची वाढ चांगली होऊन भरपूर फळे लागतात. देशावरील हवामानात असलेल्या तुरळक लागवडीतून असे दिसते की, ही जात अशा हवामानात हवी तेवढी पोसत नाही. फळांचा आकार थोडा लहान राहतो. ह्या जातीला एक वर्षाआड फळे धरतात. पांढरा साका हा दोष ह्या जातीच्या फळांत आढळतो. ह्यामुळे फळाच्या गरामध्ये लिबलिबीत स्पंजसारखा भाग तयार होतो. या दोषाचे कारण अद्याप समजलेले नाही. मात्र काही प्रमाणात उपाय केल्यास हे दोष कमी करता येतात.
पायरी : Payari
हापूसच्या खालोखाल पायरी ही दुसरी महत्त्वाची जात आहे. उष्ण-दमट हवामान ह्या जातीस चांगले मानवते. पायरी ही जात देशावरही चांगली पोसते. ह्या जातीची झाडे मोठी होऊन पसरतात. ह्या जातीच्या झाडांना हापूसपेक्षा अधिक फळे लागतात. फळे मध्यम आकाराची असतात आणि पिकल्यानंतर त्यावर आकर्षक लाल रंग येतो. फळे रसाळ असून गर फारच गोड असतो; म्हणून या जातीचा रसासाठी उपयोग केला जातो. मात्र फळे पिकल्यानंतर जास्त दिवस टिकत नाहीत. हापूसप्रमाणेच ह्या जातीला एका वर्षाआड फळे लागतात.
केसर : Kesar
मूळची गुजरातमधील ही जात उत्पादनाच्या दृष्टीने इतर जातीपेक्षा सरस आहे. फळे थोडीशी लांबट आकाराची असतात. केसर आंबा कापून खाण्यासाठी तसेच रसासाठी वापरला जातो. गराची चव गोड व मधुर असते. फळांचा स्वाद उत्तम असतो. या जातीची फळे पिकल्यानंतर 5-6 दिवस टिकतात. हंगामात ही फळे हापूस आणि गोवा मानकूर या जातीनंतर तयार होतात. केसर जातीची वाढ आणि उत्पादन चांगले असल्याचे आढळून आले आहे.
नीलम : Nilam
दक्षिण भारतातील ही प्रमुख जात आहे. फळे पिवळसर केसरी रंगाची आणि आकाराने अंडाकृती असतात. फळे टिकायला चांगली असतात. प्रत साधारण असते. ही जात भरपूर आणि नियमित फळे देते. फळे उशिरा तयार होतात. मोहोर येण्याचा काळ मोठा असल्याने झाडावर लहानमोठी फळे मिळतात.
तोतापुरी : Totapuri
ह्यालाच बंगलोरा ह्या नावाने ओळखतात. कर्नाटकमधील ही प्रमुख जात आहे. फळे दोन्ही टोकांस निमुळती व बाकदार असतात. रंग हिरवट, पिवळसर आणि त्यावर किंचित तांबूस चकाकणारे पट्टे दिसतात. फळ साधारण प्रतीचे पण टिकण्यास उत्तम आहे. भरपूर आणि नियमित उत्पादन मिळत असल्याने तसेच फळे दूरवरच्या गावी पाठविण्यासाठी चांगली असल्याने तोतापुरी ही व्यापारीदृष्ट्या महत्त्वाची जात मानतात
दशेरी : Dasheri
उत्तर भारतात मोठ्या प्रमाणावर लागवडीखाली असलेली ही जात वैशिष्ट्यपूर्ण व अत्यंत मधुर चवीमुळे प्रसिद्ध आहे. फळ मध्यम आकाराचे, लांबट, शेंदरी, पिवळया रंगाचे असते. फळाचा स्वाद आणि चव उत्तम असते. रेषाविरहित गर असल्याने फळ कापून खाण्यासाठी, शीतगृहात साठविण्यासाठी आणि फोडी तयार करून हवाबंद डब्यात टिकविण्यासाठी ह्या जातीची फळे चांगली असतात. उत्तर भारतातील हंगामापेक्षा महाराष्ट्रातील हवामानात फळे लवकर तयार होतात. मोहरातील पर्णगुच्छ ही विकृती या जातीमध्ये अधिक प्रमाणात आढळते.
लंगडा : Langda
उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणावर ह्या जातीची लागवड केली जाते. तसेच ही जात विविध प्रदेशांत वाढू शकते. फळे हिरवट, मध्यम आकाराची, लांबटगोल असतात. गर गोड असून कोय लहान असते. साल पातळ असल्यामुळे फळे पिकल्यानंतर फार काळ टिकत नाहीत.
नागीण : Nagin
विशिष्ट स्वाद आणि गोड रस असलेली ही जात रसासाठी उत्तम मानली जाते. ह्या जातीच्या झाडांचा विस्तार खूप मोठा होतो.
निरंजन : Niranjan
मराठवाडा कृषी विद्यापीठाने औरंगाबाद येथील हिमायत बागेतील बिगर हंगामी फळे देणाऱ्या झाडांपासून ही जात विकसित केली आहे.
आंब्याच्या संकरित जाती : Hybrid Varieties of Mango:
आंब्याच्या वरील उन्नत जाती चांगल्या असल्या तरी नीलम, तोतापुरी या जातीं- व्यतिरिक्त इतर बुहतेक जातींमध्ये कमीअधिक प्रमाणात एक वर्षाआड फळे येण्याची प्रवृत्ती आहे.
दरवर्षी हमखास भरपूर उत्पादन देणारी, चांगल्या प्रतीची फळे असलेली जात विकसित करण्याच्या दृष्टीने मागील काही वर्षांपासून भारतातील वेगवेगळ्या संशोधन केंद्रांवर संशोधन सुरू आहे. त्यामधून खालील काही संकरित वाण प्रसारित झाले असून त्यांची थोडक्यात माहिती दिली आहे.
मल्लिका : Mallika
भारतीय कृषी संशोधन संस्था, नवी दिल्ली येथील फळबागा विभागाने नीलम (मादी) आणि दशेरी (नर) या दोन जातींच्या संकरातून ही जात तयार केली आहे. या जातीची फळे मध्यम आकाराची, रंगाने पिवळी, चवदार आणि भरपूर रस असलेली असतात. कोय लहान असते. झाडे मध्यम आकाराची आणि ठेंगणी असतात. आणि दरवर्षी फळे देतात.
आम्रपाली : Amrapali
भारतीय कृषी संशोधन संस्था, नवी दिल्ली येथील फळबागा विभागाने दशेरी (मादी) आणि नीलम (नर) जातीचा संकर करून आम्रपाली ही जात विकसित केली आहे. झाडे लहान असल्याने दर हेक्टरी झाडांची संख्या वाढविता येते. दरवर्षी फळे देणारी, फळांना उत्तम चव आणि स्वाद असलेली, रेषाविरहित असलेली ही जात थोडी उशिरा तयार होते. उन्हाळयात इतर जातीपेक्षा या जातीला पाण्याची गरज जास्त असते.
रत्ना : Ratna
कोकण कृषी विद्यापीठाने हापूस (मादी) आणि नीलम (नर) या जातींच्या संकरातून रत्ना ही जात निर्माण केली आहे. ही जात दरवर्षी फळे देते. फळे आकाराने हापूसपेक्षा मोठी, घट्ट आणि रेषाविरहित असतात. चव आणि स्वाद हापूससारखा आहे. फळांमध्ये साका तयार होत नाही.
सिंधू : Sindhu
कोकण कृषी विद्यापीठाने रत्ना (मादी) आणि नीलम (नर) या जातीच्या संकरातून ही जात विकसित केली असून या जातीच्या फळात कोय खूपच लहान असते. फळे नियमित येतात व फळातील गर मधुर आहे.
आंबा कलम पद्धती :
आंब्याची कलम वेगवेगळया पद्धतींनी करता येते. कोयीपासून तयार केलेली आंब्याची सर्व झाडे एकसारखी निपजत नाहीत. अशा झाडांच्या फळांत बराच फरक आढळतो. फळे लागण्यासाठी अधिक काळ लागतो. तसेच झाडे फार मोठी वाढतात. झाडांची काळजी घेणे आणि फळे काढणे त्रासाचे होते. यामुळे आंब्याच्या झाडाची अभिवृद्धी नेहमीच शाखीय पद्धतीने करणे अधिक फायद्याचे ठरते. रोपवाटिकेमध्ये कलमे तयार करून त्यांची बागेत योग्य अंतरावर लागवड फार वर्षांपूर्वीपासून केली जाते. आंब्याची कलमे वेगवेगळया पद्धतीने तयार करता येतात. यामध्ये प्रामुख्याने भेट कलम, व्हिनीयर कलम, डोळा भरून कोयकलम, मृदुकाष्ठकलम, इत्यादी पद्धती निरनिराळया भागांत वापरतात. महाराष्ट्रात मागील काही वर्षांपासून जागेवरच ‘मृदुकाष्ठकलम’ पद्धतीने आंब्याच्या कलम बागा मोठ्या प्रमाणावर लावण्यात येत आहेत.
तयार कलमे विकत घेऊन शेतात लावण्याची पद्धत कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत प्रचलित आहे. परंतु महाराष्ट्राच्या इतर भागांत विशेषत: उष्ण आणि कोरड्या हवामानात आंबाकलमे स्थलांतर केल्यानंतर काही महिन्यांतच त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर मर होत असल्याचे दिसून येत असल्याने जागेवरच मृदुकाष्ठ पद्धतीने कलम बांधून बागा तयार करणे जास्त उपयुक्त ठरते. यास स्वयंभू कलम पद्धती असे म्हणतात. अशा बागा मोठ्या प्रमाणावर निर्माण केल्या जात आहेत.
जागेवरच मृदुकाष्ठ पद्धतीने कलम करणे
ह्या पद्धतीने बागा तयार करण्यात खालील मुख्य अवस्था आहेत:
(1) शेतातच ज्या जागेवर बाग तयार करावयाची आहे, त्या ठिकाणी योग्य अंतरावर खड़े
करून ते व्यवस्थित भरणे.
(2) प्रत्येक खड्डयात 3 ते 4 रायवळ (गावरान ) आंब्याच्या कोयी रुजवून रोप तयार
करणे.
(3) अशा रोपांवर वर्षानंतर निवडलेल्या जातीची आंब्याची कलमे बांधणे.
(4) यशस्वी कलमांपैकी प्रत्येक खड्यात एक जोमदार कलम ठेवून ते जोपासणे आणि इतर रोपे / कलमे काढून टाकणे.
वरील पद्धतीने झाडाचे स्थलांतर होत नसल्यामुळे मुळांना इजा होत नाही आणि सोटमूळ व इतर मुळचा नैसर्गिकपणे वाढतात. कलमे स्थानिक परिस्थितीत तयार होत असल्यामुळे त्यांची वाढ चांगली होते. खोलवर मुळे गेलेल्या रोपावरील कलमाची अवर्षणास तोंड देण्याची क्षमता जास्त असते. वरील अवस्था विस्ताराने पुढील मुद्यात नमूद केल्या आहेत.
आंबा लागवडीचा हंगाम : Mango planting season
खड्डे तयार करणे आणि भरणे :
आंबा बागेच्या लागवडीसाठी निवडलेल्या शेतात उन्हाळयात एप्रिल-मे महिन्यात 10 x 10 मीटर अंतरावर किंवा अतिघनता पद्धतीने लागवडीसाठी 15 X 15 मीटर अंतरावर 1 मीटर लांब X 1 मीटर रुंद X 1 मीटर खोल आकाराचे खड्डे तयार करून घ्यावेत. म्हणजे खड्डे काही दिवस उन्हात तापतील. खड्डे खोदताना जमिनीचा 25 ते 30 सेंमी. चा वरचा थर वेगळा ठेवावा आणि खालचा थर वेगळा करावा. वरच्या थरातील चांगली माती किंवा नदीच्या गाळाची माती आणि उत्तम कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत, 2 ते 3 किलो सुपरफॉस्फेट ह्यांचे मिश्रण करून ते खड्डा भरण्यासाठी वापरावे. खड्डे मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात भरावेत. खड्ड्याच्या तळाशी वाळलेल्या पालापाचोळयाचा 15 सेंमी. जाडीचा थर द्यावा. त्यावर 200 ते 250 ग्रॅम कीडनाशकाची भुकटी टाकावी. खड्ड्यात 1 ते 2 किलो सुपर फॉस्फेट घालावे. नंतर खड्डा अर्धा भरून झाल्यानंतर पुन्हा पालापाचोळयाचा 10 ते 15 सेंमी. जाडीचा थर देणे फायदेशीर ठरते. खड्डा जमिनीपर्यंत किंवा जमिनीच्या किंचित वरपर्यंत भरावा. खड्डा भरताना खड्याच्या मधोमध काडी टोकावी. पावसाच्या 2-3 सरीनंतर खड्डा स्थिर होईल आणि मिश्रण आत जाईल. खड्डा भुसभुशीत भरलेला असल्याचे पावसाच्या सरींनंतर तो बराच खाली स्थिर होईल. पावसाच्या सरीनंतर 10 ते 15 सेंमी. खोलीपर्यंत खड्डा मोकळा असावा. म्हणजे पावसाचे पाणी जिरण्यात मदत होईल.
आंब्याचे आयुष्य, झाडाचा होणारा विस्तार आणि कमीत कमी वेळात सोटमूळ खोलवर जाण्यासाठी 1 मीटर लांब X 1 मीटर रुंद X 1 मीटर खोलीचा खड्डा करणे आवश्यक असते.
आंब्याची कोयी रुजवणे :
आंब्याच्या कोयीची उगवणशक्ती कमी काळ टिकते. म्हणूनच कोयी फळातून काढल्यानंतर काही दिवसांतच रोपे तयार करण्यासाठी जून महिन्यात किंवा जुलैच्या सुरुवातीला पेराव्यात. कोयी काढून झाल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुऊन बुरशीनाशकात बुडवून त्यांचा सावलीत ढीग करावा. मधूनमधून पाण्याचा फवारा दिल्यास 20 ते 30 दिवसांपर्यंत उगवणशक्ती चांगली राहते. कोयी खुळखुळया झाल्या की त्यांपासून रोपे तयार होत नाहीत. म्हणूनच शक्य तितक्या ताज्या, स्वच्छ कोयी पेराव्यात. जोमदार फळे वाढणाऱ्या व भरपूर उत्पादन देणाऱ्या गावरान ( रायवळ आंब्याच्या जाड, मोठ्या आणि वजनदार कोयी निवडाव्यात. पेरणीपूर्वी बुरशीनाशकात बुडवून वरीलप्रमाणे भरलेल्या प्रत्येक खड्ड्यात 3 ते 4 कोयी पेराव्यात. कोयी पेरताना खड्डा थोडा उकरून त्यामध्ये 10 सेंमी. खोलीवर कोयी पेराव्यात. कोयींवर थोडासा पालापाचोळयाचा थर देऊन त्यांवर थोडी माती आणि शेणखताच्या मिश्रणाचा थर घालावा. पावसाळयात योग्य प्रमाणात पाऊस असेल तर कोयी तीन आठवड्यांनंतर रुजतात. पाऊस कमी प्रमाणात असल्यास वरून पाणी द्यावे लागते. खड्ड्यात पाणी साचून राहू नये म्हणून काळजी घ्यावी.
ताज्या कोयी वरीलप्रमाणे अथवा चांगल्या काळजीपूर्वक लावलेल्या ढिगातील फुगलेल्या कोयी निवडल्यास अशा कोयींपासून जोमदार रोपे मिळतात. तोतापुरी, नीलम ह्या जातीच्या आंब्याच्या कोयी रोपे तयार करण्यासाठी वापरू नयेत.
रोपांची काळजी रोपांची मुळे कमीत कमी कालावधीत खोलवर जावीत म्हणून वारंवार आणि कमी अंतराने पाण्याच्या पाळ्या देऊ नयेत. गरजेनुसार कमीतकमी पाण्याच्या पाळया द्याव्यात. यामुळे वाढणाऱ्या झाडाची मुळे पाण्याच्या शोधात खोलवर वाढत जातात. खोलवर मुळे गेलेली झाडे पाण्याचा अधिक ताण सहन करून शकतात आणि
काटक बनतात.
उन्हाळयात जमिनीत ओलावा टिकून राहावा म्हणून वाफ्यामध्ये रोपांभोवती पालापाचोळयाचा थर द्यावा. तसेच खोडाभोवती माती मोकळी करावी. उन्हाळयात
रोपांचे कडक उन्हापासून संरक्षण व्हावे म्हणून तुम्हाटी अथवा तशा प्रकारची झुडपे रोपाच्या भोवती आणि वर लावावीत. रोपे शेंडा न वाकता सरळ वाढवावीत. तुडतुडे आणि इतर किडींच्या नियंत्रणासाठी कीटकनाशकाची वेळोवेळी फवारणी करावी. अशा रितीने शेतात वाढविलेल्या रोपांवर 12 ते 15 महिन्यांनी इन सीटू पद्धतीने कलमे करता येते.
कलमे केव्हा करावीत :
महाराष्ट्रातील हवामानात आंब्याला वर्षभरात 3 ते 4 वेळा पालवी फुटते. नव्या फुटीच्या पालवीचा रंग लालसर तांबूस असतो. जसजसी पाने जून होतात तसा त्यांचा रंग हिरवा होत जातो. रोपावरील नवीन पालवीचा रंग तांबूस असताना रोपावर मृदुकाष्ठ कलम केले असता ते अधिक यशस्वी होते. म्हणूनच जेव्हा पालवी फुटते आणि पाने तांबूस रंगाची असतात, अशा वेळीच कलमे करावीत. जुलै, ऑगस्ट अथवा सप्टेंबर महिन्यात 12 ते 15 महिने वयाच्या रोपांवर कलमे करावीत. फेब्रुवारीमध्ये रोपावर नवती (नवीन वाढ) येते. अशा वेळीही कलम करता येते. परंतु त्यानंतर येणाऱ्या उन्हाळयातील कडक उन्हामुळे कोवळ्या फुटींचे नुकसान होण्याची भीती असते. म्हणूनच स्थानिक परिस्थितीनुसार कलम करण्याची वेळ ठरवावी.
आंबा पीक कलमे लावून बागा वाढविणे :
इतर फळझाडांप्रमाणे आंब्याची तयार कलमे रोपवाटिकेमधून आणून त्यांची लागवड करून कलमी आंब्याच्या बागा वाढविता येतात. विशेषतः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागांत आणि तुरळक प्रमाणावर इतर भागांत ह्या पद्धतीचा वापर होतो. ह्यासाठी खात्रीलायक कलमांची निवड करणे ही महत्त्वाची बाब असते. ज्या शेतकऱ्याला शक्य असेल त्याने स्वतःची कलमे स्वत:च तयार करणे उत्तम असते. मात्र तसे शक्य नसल्यास नामांकित, मान्यताप्राप्त, शासकीय किंवा कृषिविद्यापीठाच्या रोपवाटिकांमधून कलमे खरेदी करावीत. कलमे निवडताना झालेली चूक फार घातक ठरू शकते. म्हणूनच जातिवंत, चांगले उत्पादन देणाऱ्या निवडक मातृवृक्षापासून तयार केलेली निरोगी, चांगल्या वाढीची कलमे निवडावीत. ह्याव्यतिरिक्त
शेतकऱ्यांनी खालील गोष्टी बारकाईने पाहून कलमांची खरेदी करावी :
(1) कलमे सरळ उभट वाढणारी असावीत आणि कलमांवर गडद हिरव्या रंगाची भरपूर निरोगी पाने असावी.
(2) खुंट आणि कलम फांदी यांचा जोड (सांधा) एकसंध, भक्कम झालेला असावा. खुंट आणि कलम यांची जाडी एकसारखी असावी. शक्यतो स्थानिक हवामानात तयार केलेली कलमे लावणे चांगले असते. दूरवरून भिन्न हवामानात तयार झालेली कलमे लावण्याअगोदर ती काही महिने कुंडीत वा मोठ्या पिशवीत वाढवून मग शेतात स्थलांतर करणे योग्य ठरते.अशा रितीने आंबा कलमांची निवड केल्यानंतर ती शेतात लावावीत.
आंबा पिकाचे कलमे लावताना खालील काळजी घ्यावी : Following precautions should be taken while grafting mango crop:
(1) पॉलिथीन पिशवीतून अथवा मडक्यातून कलम काढताना मुळास इजा होणार नाही अशा रितीने काढावे.
(2) अगोदरच भरलेल्या आणि पावसाने स्थिर झालेल्या खड्यात मध्य भागाचा 30X
30 सेंमी. जाडीचा मातीचा वरचा थर काढून त्या ठिकाणी कलमे लावावीत. कलमे लावण्याचे काम पावसाळ्यात सुरुवातीचे 3-4 चांगले पाऊस झाल्यावर आणि हवेत गारवा आल्यानंतर करावे. कलमांची लागवड करताना जमिनीत भरपूर ओल असावी. (3) कलम केलेला भाग (जोड) जमिनीत गाडू देऊ नये. पिशवीत अथवा मडक्यात कलमांच्या खुंटांचे खोड जितके खोल असेल तितक्याच खोलीपर्यंत ते जमिनीत गाडावे.
(4) मुळांना इजा न होता अथवा मुळे मुडपली न जाता ती नैसर्गिक अवस्थेत राहतील अशा रितीने त्यांची लागवड करावी.
(5) कलमे खड्ड्यात लावल्यानंतर खोडांभोवती माती घट्ट दाबावी. त्यामुळे मुळांचा जमिनीशी संबंध येऊन मुळांभोवतालची हवा निघून जाईल. खोडाभोवती मातीचा
लहान उंचवटा करावा. कलमे लावल्यानंतर 1-2 दिवसांआड पुन्हा खोडाभोवती माती दाबावी.
(6) झाडांना काठीचा आधार द्यावा, म्हणजे वेगवान वाऱ्यामुळे कलमे मोडणार नाहीत. (7) कलमांना लावणीनंतर जरुरीनुसार पाणी द्यावे.
आंबा लागवडीसाठी हंगाम व लागवडीचे अंतर : Season and Planting Spacing for Mango Planting:
कोणत्याही पद्धतीने (जागेवरच कलम करून अथवा कलमे लावून) आंब्याची लागवड करण्यासाठी उन्हाळयात 1 मीटर x 1 मीटर x 1 मीटर आकाराचे 10X10 मीटर अंतरावर खड्डे घ्यावेत. काही ठरावीक परिस्थितीत आणि हेतूने आंबा लागवड 10X5 मीटर 7.5×7.5 मीटर किंवा 5X5 मीटर या अंतरावरही करता येते.
वळण आणि छाटणी :
साधारणपणे आंब्याच्या झाडांना छाटणीची गरज नसते. परंतु सुरुवातीच्या काळात झाडाला योग्य वळण देणे आवश्यक असते. झाडाची वाढ एकाच खोडावर करून घ्यावी.
त्यासाठी 1 मीटर उंचीपर्यंत येणारी खोडावरील फूट वेळोवेळी काढून टाकावी. त्यानंतर झाडाचा समतोल राहील अशा बेताने 3-4 फांद्या वाढू द्याव्यात. गुंतागुंतीच्या, वाकड्या फांद्या तसेच किडलेल्या फांद्या छाटून काढाव्यात. खुंटावरून येणारी फूट वेळोवेळी काढावी. पहिली चार वर्षेपर्यंत कलमांना मोहोर आल्यास तो खुडावा. आंब्याची फळे एक वर्ष वयाच्या काडीवर येत असल्यामुळे छाटणी करून फारसा फायदा होत नाही. काही प्रमाणात डहाळ्यांची विरळणी करून ठरावीक शेंडे राखून मर्यादित छाटणी केली असता, मोहोर येण्याचे प्रमाण वाढते.
आंबा पिकासाठी खते आणि आंबा पिकासाठी पाणी व्यवस्थापन : Fertilizers for Mango Crop and Water Management for Mango Crop :
आंब्याची झाडे लावल्यानंतर त्याच जमिनीत अनेक वर्षे वाढून फळे देतात. म्हणून आंब्याच्या वाढणाऱ्या झाडांना खताच्या योग्य त्या मात्रा दरवर्षी देणे आवश्यक असते. सुरुवातीच्या चार वर्षांपर्यंत म्हणजे फळे घेण्यास सुरुवात करण्यापूर्वी झाडाला वाढीच्या काळात आवश्यक असलेला अन्नांश उपलब्ध होतो. साधारपणे जून-जुलै, सप्टेंबर- ऑक्टोबर, जानेवारी-फेब्रुवारी महिन्यांत झाडांना खते द्यावीत. फळे येणाऱ्या झाडांना वर्षातून दोनदा जून आणि ऑक्टोबर महिन्यांत खताच्या मात्रा दोन समान हप्त्यांत विभागून द्याव्यात. शेणखत तथा सेंद्रिय खत मात्र पावसाळयाच्या सुरुवातीला द्यावे..
खते किती द्यावीत :
झाडांच्या वयानुसार खताच्या मात्रा द्याव्यात. झाडाचे वय आणि खताच्या मात्रा खालील तक्त्यात दिल्याप्रमाणे द्याव्यात.
झाडाचे वय (वर्ष) | शेणखत (किलो) | युरिया (ग्रॅम) | सुपर फॉस्फेट (ग्रॅम) | म्युरेट ऑफ पोटॅश (ग्रॅम) |
01 | 10 | 300 | 300 | 100 |
02 | 20 | 600 | 600 | 200 |
03 | 30 | 900 | 900 | 300 |
04 | 40 | 1200 | 1200 | 400 |
05 | 50 | 1500 | 1500 | 500 |
06 | 60 | 1800 | 1800 | 600 |
07 | 70 | 2100 | 2100 | 700 |
08 | 80 | 2400 | 2400 | 800 |
09 | 90 | 2700 | 2700 | 900 |
10 | 100 | 3000 | 3000 | 1000 |
म्हणजेच आंब्याच्या दहा वर्षांच्या झाडाला 100 किलो शेणखत, 1500 ग्रॅम नत्र, 1500 ग्रॅम स्फुरद, आणि 500 ग्रॅम पालाश द्यावे. वरील मात्रा कोकणासारख्या भागासाठी आहेत. मराठवाडा आणि विदर्भ भागातील भारी उत्तम कसदार जमिनीस खताच्या मात्रा कमी कराव्यात. म्हणजेच 10 वर्षे वयाच्या झाडाला 1 किलो नत्र, 1 किलो स्फुरद आणि 500 ग्रॅम पालाश अशी मात्रा योग्य ठरते. कोरडवाहू बागेसाठी खताच्या मात्रा अजून कमी म्हणजेच निम्म्यापर्यंत आणाव्यात. खते दिल्याबरोबर पाण्याची पाळी द्यावी. पाणी कमी असलेल्या भागात पावसाच्या सरी पाहून खते द्यावीत. जास्त पावसाच्या प्रदेशात पावसाळा संपताना खते द्यावीत; म्हणजेच ती वाहून जात नाहीत. मात्र खते देताना जमिनीत ओलावा असावा. झाडाच्या गरजेनुसार खते दिल्यानंतर लगेच पाणी द्यावे. आंब्यासाठी खते घालताना मातीपरीक्षण अहवाल ध्यानात घ्यावा; तसेच सेंद्रिय, रासायनिक, जैविक या प्रकारच्या खतांचा संतुलित वापर करावा.
आंबा पिकाला खते कशी द्यावीत : How to Fertilize Mango Crop:
खते अगदी बुंध्याजवळ न देता खोडापासून काही अंतरावर झाडाच्या विस्ताराखाली किंवा किंचित बाहेर 15 सेंमी. खोल गोलाकार चरात द्यावीत. नंतर गरजेनुसार पाणी द्यावे. पाणी व्यवस्थापन : आंबा हे पावसाच्या पाण्यावर वाढणारे कोरडवाडू फळझाड आहे. असे असले तरी रोपांची / कलमांची पहिली 3-4 वर्षे जलद वाढ होण्यासाठी पाणी देणे आवश्यक ठरते. जमिनीचा प्रकार आणि त्या त्या भागातील पावसाचे प्रमाण यानुसार पाण्याच्या पाळ्यांची संख्या ठरविता येते. कलमे लावून केलेल्या झाडांची मुळे खोलवर जात नाहीत. अशा बागांना पाण्याच्या पाळ्या जास्त लागतात. कलमे लावल्यावर येणाऱ्या पहिल्या हिवाळ्यात आठवड्यातून एक वेळ आणि उन्हाळयात दोन वेळा पाणी द्यावे.
दुसऱ्या हिवाळ्यात 15 दिवसांतून एक वेळ आणि उन्हाळ्यात दर आठवड्यात एक वेळ पाणी द्यावे. तिसऱ्या हिवाळ्यात महिन्यातून एक वेळ आणि उन्हाळ्यात एका महिन्यात दोन वेळा पाणी द्यावे. पाणी देण्यासाठी कलमांच्या बुंध्याभोवती गोलाकार आळे करावे आणि प्रत्येक वेळी दोन बादल्या म्हणजे सुमारे 20 ते 25 लीटर पाणी द्यावे. पावसाळ्यात पावसाची कमतरता असल्यास गरजेप्रमाणे पाणी द्यावे. जागेवरच रोपांवर कलमे (स्वयंभू पद्धतीने कलमे) केलेल्या बागेतील झाडांची मुळे खोलवर गेली असल्याने अशी झाडे अधिक काळ पाण्याचा ताण सहन करून शकतात.
म्हणूनच शेतात जास्तीत जास्त पाणी मुरवणे फायदेशीर ठरते. अशा बागांना वारंवार पाणी देऊ नये. वारंवार पाणी दिल्याने मुळे खोलवर जात नाहीत. सुरुवातीच्या 2-3 वर्षांपर्यंत गरजेनुसार पाण्याचा ठरावीक पाळ्या द्याव्यात. खोडाभोवती गवताचा थर द्यावा आणि जमिनीची उकरी करून बाष्पीभवनाचे प्रमाण कमी करावे. मोठ्या झाडांना पाण्याच्या पाळ्या देण्याची जास्त गरज नसते. मोहोर येण्याच्या आधी एक पाणी आणि फळे धरल्यानंतर 1-2 पाळ्या दिल्यास उत्पादनात वाढ होण्यास मदत होते.
आंबा पिकातील आंतरपिके आणि आंबा पिकातील तणनियंत्रण : Intercropping in Mango and Weed Control in Mango :
10 X 10 मीटर अंतरावरील आंब्यामध्ये सुरुवातीला 4-6 वर्षांपर्यंत आंतरपिके घेणे शक्य असते. हवामान, जमिनीची प्रत आणि ओलिताची सोय ह्यांचा विचार करून कोणते आंतरपीक घ्यायचे हे ठरवावे. परंतु ज्वारी – मक्यासारखी उंच वाढणारी आणि खादाड पिके आंतरपिके म्हणून घेऊ नयेत. जास्त खोल मुळे न जाणाऱ्या भाजीपाला पिकांची – टोमॅटो, वांगी, कोबी, वाल, मुळा, पालक, इत्यादी पिकांची आंतरपिके म्हणून लागवड करावी. द्विदल धान्यांमधील वाटाणा, उडीद, मूग, इत्यादींची लागवड फायदेशीर ठरते. जसजसे आंब्याचे झाड वाढत जाईल तसतसे आंतरपिकाचे क्षेत्रफळ कमी करावे. आंतरपिकाला खताची जास्तीची मात्रा द्यावी. पपईचे पीकही आंतरपीक म्हणून घेता येते. आंब्याची बाग रोगकिडीविरहित राहण्यासाठी स्वच्छ ठेवणे आवश्यक असते. सुरुवातीच्या काळात झाडे लहान असताना आंतरपिके घेतल्यास बागेची मशागत आपोआपच होते. पुढे मात्र जेव्हा आंतरपिके घेणे इष्ट नसते अथवा शक्यही नसते तेव्हा बागेत वर्षातून 1-2 वेळा हलकी नांगरणी करावी. जूनमध्ये आणि जरुरीनुसार ऑक्टोबरमध्ये नांगरणी करावी. झाडाभोवतीचा आळ्यातील भाग अधूनमधून खुरपून स्वच्छ ठेवावा. वाफ्यामध्ये वाळलेला पालापाचोळा घातल्यास तणही वाढत नाही आणि ओलावाही टिकून राहण्यास मदत होते.
आंबा पिकावरील महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण : Important pests of mango crop and their control:
आंब्यावर आढळून येणाऱ्या अनेक किडींची नोंद झालेली आहे. त्यांपैकी काही प्रमुख किडी व त्यांवरील उपाय खाली दिले आहेत.
आंबा पिकावरील तुडतुडे :
आंब्याच्या पिकावरील तुडतुडे ही सर्वांत महत्त्वाची कीड असून महाराष्ट्रातील सर्वच भागांत आढळते. तुडतुडे आंब्याची कोवळी पालवी, मोहोर आणि लहान फळांतील रस शोषून घेतात. त्यामुळे मोहोर आणि लहान फळांची गळ होते. तुडतुड्यांनी शरीराबाहेर टाकलेल्या मधासारख्या चिकट द्रावामुळे मोहोरावर आणि पानांवर काळ्या रंगाची बुरशी वाढते. त्यामुळे आंब्याची पाने काळी पडतात आणि पानांतील कर्बग्रहणाची (प्रकाशसंश्लेषण ) क्रिया मंदावते.
उपाय : तुडतुड्याच्या नियंत्रणासाठी पुढीलप्रमाणे उपाययोजना करावी. 0.05% एन्डोसल्फॉन किंवा 0.1 % कार्बारिल किंवा 0.03% डायमेथोएट किंवा 0.05% फेनोएट किंवा 0.5% फॉस्फोमिडॉन किंवा 0.4% मानोक्रोटोफॉस किंवा 0.05% क्विनॉलफॉस या कीटकनाशकांच्या 15 दिवसांच्या अंतराने आलटूनपालटून 5 फवारण्या कराव्यात. पहिली फवारणी झाडावर मोहोर फुटू लागण्यापूर्वी करावी. एकच एक कीटकनाशक फवारणीसाठी वापरू नये.
आंबा पिकावरील वरील मीजमाशी :
मीजमाशीचा उपद्रव झाल्यामुळे मोहोराच्या दांड्यावर प्रथम गाठी तयार होतात आणि नंतर त्या गाठी काळया पडतात. मोहोराची व लहान फळांची गळ होते.
उपाय : 0.05% फॉस्फोमिडॉन किंवा 0.05% डायमेथोएट कीटकनाशकाची फवारणी करावी.
आंबा पिकावरील शेंडा पोखरणारी अळी :
ही अर्क नवीन फुटलेला शेंडा आणि मोहोराचा दांडा पोखरते. त्यामुळे मोहोराची गळ होते.
उपाय : कार्बारिल किंवा निंबोळी अळी या कीटकनाशकांच्या दोन फवारण्या नवीन फूट निघताना कराव्यात आणि नंतर 15 दिवसांच्या अंतराने आवश्यकतेनुसार फवारण्या कराव्यात.
आंबा पिकावरील पिठ्या ढेकूण :
ही कीड आणि तिची पिले आंब्याच्या फळामधून आणि फळाच्या देठामधून रस शोषून घेतात. पिठ्या ढेकणाचा प्रादुर्भाव झालेल्या ठिकाणी कापसासारखी पांढरी वाढ होते.
उपाय : झाडाच्या खाली बुंध्याच्या भोवताली 500 ग्रॅम पॅराथिऑन या कीटकनाशकाची भुकटी टाकावी. झाडावर मेथील पॅराथिऑन ह्या कीटकनाशकाची 0.05 % तीव्रतेची फवारणी करावी.
आंबा कोयीतील कीड :
या किडीची अळी फळ पोखरून कोयीत शिरते आणि कोयीतच वाढते. या किडीच्या सर्व अवस्था कोयीतच पूर्ण होतात. फळे कापल्यावर कोयीजवळचा भाग खराब झालेला आढळतो. नीलम आणि तोतापुरी ह्या जातींमध्ये ह्या किडीचे प्रमाण जास्त आढळते.
उपाय : कीड कोयीमध्ये वाढत असल्यामुळे किडीचे नियंत्रण करणे कठीण जाते.
आंबा पिकावरील वाळवी :
आंब्याच्या लहान रोपांना तसेच मोठ्या झाडांना या किडीचा उपद्रव होतो. वाळवी फांद्यांच्या सांध्यातून खोडात शिरते. नंतर खोडाचा आतील भाग पोखरते. मोठ्या झाडाच्या खोडावर वाळवी मातीचा पापुद्रा तयार करून खोडाची साल खाते. त्यामुळे झाडाचे खोड पोखरले जाऊन त्याची ढोली बनते. वाळवी नवीन कलमांची मुळे खाते. त्यामुळे कलमे मरतात. वाळवीचा प्रादुर्भाव ऑक्टोबर ते जानेवारी महिन्यांत जास्त असतो.
उपाय :
(1) बागेतील आणि आजूबाजूच्या शेतांतील वारुळे खणून त्यांमधील वाळवीच्या राणीचा नाश करावा.
(2) जिवंत वारुळाच्या मध्यभागी असलेल्या छिद्रात 250 मिलिलीटर कार्बन डायसल्फाईड आणि क्लोरोफॉर्मचे मिश्रण ओतून छिद्र चिखलाने बंद करावे.
(3) आंब्याची कलमे लावताना खड्डयातील मातीमध्ये 10% 500 ग्रॅम लिंडेन पावडर मिसळावी.
(4) मोठ्या झाडावर वाळवीमुळे आलेला मातीचा पापुद्रा खरडून काढावा.
आंबा पिकावरील भिरूड :
आंब्यावरील उपद्रवी किडीपैकी भिरूड ही जास्त नुकसान करणारी कीड आहे. अळी प्रथम साल व नंतर खोड पोखरून आत शिरते. आतील गाभा खाते. भिरूड लागलेल्या फांद्या वाळतात. झाड कमजोर बनते. अळीने पाडलेल्या छिद्रातून भुसा व विष्टा बाहेर येते. नियंत्रण केले नाही तर संपूर्ण झाड वाळते.
उपाय :
(1) या किडीच्या नियंत्रणासाठी टोकदार तारेने छिद्रातील जिवंत अळयांचा भोसकून नाश करावा.
(2) खोडावरील ओल्या छिद्रात इ. डी. सी.टी. मिश्रण किंवा बोअरर मिश्रण ( 1 भाग कार्बन डायसल्फाईड + 1 भाग क्रियोसीट तेल) पिचकारीच्या साहाय्याने घालून छिद्रे चिखलाने बंद करावीत.
आंबा पिकावरील महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण : Important diseases of mango crop and their control:
आंब्याच्या झाडावर जवळपास 60 प्रकारच्या वेगवेगळया रोगांची नोंद झाली असून त्यांपैकी भुरी आणि करपा हे महत्त्वाचे रोग आहेत.
भुरी :
भुरी ह्या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव मोहोर आणि फळाच्या देठावर होतो. मोहोर राख पडल्यासारखा भुरकट अथवा राखेच्या रंगाचा दिसतो. काही दिवसांनी मोहोर काळा पडून गळतो तसेच फळांची गळ होते. ढगाळ व दमट हवामानात रोगाचा प्रसार झपाट्याने वाढतो.
उपाय : भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी कीटकनाशकांची फवारणी करतानाच कीटकनाशकाच्या द्रावणामध्ये पाण्यात मिसळणारे गंधक 2 ग्रॅम प्रति लीटर पाण्यात मिसळून फवारावे.
मोहोर फुटण्याच्या दरम्यान आणि नंतर 10 दिवसांनी दोन फवारे द्यावेत. ढगाळ, दमट हवामान व पाऊस आल्यास हा उपाय पुन्हा करावा.
करपा :
हा रोग पाने आणि फांद्यांवरील शेंड्याची मर आणि पानांवरील ठिपके या स्वरूपात आढळतो. कोवळी फूट, फुलोरा, फळे यांवर खोलगट, काळपट ठिपके पडतात. त्यामुळे मोहोर गळतो. फळधारणा होत नाही. कोवळी फूट शेंड्याकडून खाली वाळत जाते. फांद्यांवरही हा रोग आढळतो. फळांच्या साठवणुकीत हा रोग फळांना झाल्यास फळे कुजतात.
उपाय : रोगट फांद्या कापून काढाव्यात. गळालेली पाने आणि फळे जाळून टाकावीत. या रोगाच्या नियंत्रणासाठी झाडाला मोहोर आला असताना 1% बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी. किंवा बेनलेट अथवा 1% बाविस्टीनची फवारणी करावी. 15 दिवसांच्या अंतराने दुसरी फवारणी करावी.
रोपवाटिकेतील रोपावर 1 % बाविस्टीनचा किंवा कोणत्याही ताम्रयुक्त औषधाचा फवारा द्यावा. साधारणपणे सप्टेंबर ते एप्रिल महिन्याच्या दरम्यान 4-5 फवारे द्यावेत.
आंब्यावरील बांडगूळ :
आंब्याच्या फांदीवर वाढणारी ही परोपजीवी वनस्पती आंब्याच्या फांदीतून रस शोषून घेते. बांडगुळाचे बी पावसाळयात झाडाच्या फांदीवर रुजते. त्याची मुळे सालीतून सरळ आत जातात आणि आतील गाभ्यावर वेष्टन तयार करतात. अशा ठिकाणी फांदीवर गाठ दिसते. बांडगुळाचा प्रादुर्भाव झालेल्या आंब्याच्या झाडाने तयार केलेले अन्न बांडगूळ स्वतःसाठी वापरते. त्यामुळे आंब्याच्या फांद्या, झाडे अशक्त होतात. फळेही कमी लागतात.
उपाय : बांडगुळे झाडावर दिसताच ती ताबडतोब संपूर्णपणे कापून त्यावर 30% क्रियोसीट तेल लावावे.
अ.क्र. | फवारणीची वेळ | कीटकनाशक | दहा लीटर पाण्यात प्रमाण | शेरा |
1 | ऑक्टोबरचा पहिला पंधरवडा | 25 टक्के सायपरमेथ्रीन | 3 मिली. | संपूर्ण झाडावर फवारणी करावी |
2 | काडीचे डोळे फुगल्यानंतर | 50 टक्के कार्बारिल | 20 ग्रॅम | संपूर्ण झाडावर फवारणी करावी |
3 | दुसऱ्या फवारणी – नंतर दोन आठवड्यांनी | 25 टक्के क्विनॉलफॉस | 5 मिली. | 10 ग्रॅम | बाविस्टीन मिसळावे. |
4 | तिसऱ्या फवारणीनंतर दोन आठवड्यांनी | 25 टक्के किनॉलफॉस | 20 मिली. | वरीलप्रमाणे किंवा 20 ग्रॅम वेटेबल गंधक मिसळणे |
5 | चौथ्या फवारणीनंतर दोन आठवड्यांनी | 30 टक्के डायमेथोएट | 10 मिली. | 20 ग्रॅम वेटेबल गंधक मिसळणे |
6 | पाचव्या फवारणीनंतर गरजेनुसार | वरीलपैकी | जरूरीप्रमाणे | वरीलप्रमाणे |
आंबा पिकावरील शारीरिक विकृती आणि त्यांचे नियंत्रण : Physiological disorders of mango crop and their control:
आंबा पिकातील अनियमित बहार :
सर्वसाधारणपणे आंब्याच्या झाडाला सुरुवातीची 8-10 वर्षे नियमित फळधारणा होते. पुढे जसजसे झाडाचे वय वाढत जाते तसतसे बहार येण्यामध्ये अनियमितता आढळून येते आणि नंतर एका वर्षाआड फळधारणा होते. हा प्रकार सर्वच फळझाडांमध्ये आढळतो. या कारणाने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. देशात निरनिराळया भागांत झालेल्या संशोधनावरून अनियमित फलधारणा होण्याची पुढील काही कारणे स्पष्ट झाली आहेत. त्यानुसार उपाययोजना करणे फायद्याचे ठरले आहे. तोतापुरी, नीलम आणि बारमासी ह्या जाती सोडल्या तर इतर सर्व प्रमुख जातींमध्ये (हापूस, दशेरी, पायरी, केसर, लंगडा, नागीण, इत्यादी) फळे एक वर्षाआड येण्याची प्रवृत्ती आढळते. तोतापुरी, नीलम आणि बारमासी जातींना मात्र दरवर्षी फळे लागतात. म्हणूनच नियमित फळे देणाऱ्या जातींची लागवड काही प्रमाणावर करावी.
डॉ. बाळासाहेब सांवत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी यांनी विकसित केलेली रत्ना; भारतीय कृषी संशोधन संस्था, नवी दिल्ली यांनी विकसित केलेली आम्रपाली ह्या संकरित जाती दरवर्षी फळे देतात. त्यांची उपयुक्तता निरनिराळया भागांत पडताळून पाहणे आवश्यक आहे.
हापूस जातीमध्ये एका वर्षाआड फलधारणा होते. डॉ. बाळासाहेब सांवत कोकण कृषी विद्यापीठाने आंब्याच्या झाडांना कल्टार ( 25% पॅक्लो ब्युट्रॅझोल) हे रसायन देण्याची शिफारस केली आहे. 10 ते 30 वर्षे वयाच्या झाडाला 20 मिली. (5 ग्रॅम मुख्य घटक) 3 ते 5 लीटर पाण्यात मिसळून झाडाच्या बुंध्याभोवती मातीत मिसळावे. कल्टार दिलेल्या झाडापासून दरवर्षी उत्पादन अपेक्षित असल्यामुळे अशा झाडांना उत्पादनानुसार खताच्या वाढीव मात्रा तसेच कीड / रोग संरक्षणासाठी औषधांचे फवारे देणे आवश्यक असते.
काही फांद्यांवरील फुलोरा पूर्णपणे काढून टाकल्यास त्याच्या पुढच्या वर्षी अशा फांद्यांवर काही फळे मिळू शकतात. जातिपरत्वे कमीअधिक प्रमाणात मिळतात. दशेरी जातीत परिणाम अधिक चांगले मिळतात.
फुलोऱ्याच्या काळात ढगाळ हवामान आणि पाऊस पडत असल्यास, भुरी, करपा, तुडतुड्यांचा उपद्रव कमी करण्यासाठी संरक्षणात्मक कीटक / बुरशीनाशकाची फवारणी करावी.
आंब्याच्या झाडांना दरवर्षी नियमित खते देणे अथवा औषधांची फवारणी करणे, अशी काळजी क्वचितच घेतली जाते. बहुतेककरून बिगर खतपाण्यावरच झाड वाढविले जाते. आंब्याच्या बागेची चांगली मशागत करून खते दिल्यास, रोग / किडींचा बंदोबस्त केल्यास बागेचे स्वास्थ्य चांगले राहून अनेक वर्षे नियमितपणे चांगले उत्पादन मिळते.
फळे न लागणे, फळांची गळ वा कमी फळधारणा ह्या समस्या बऱ्याच बागांमध्ये आढळून येतात. ह्यांची प्रमुख कारणे आणि उपाय पुढीलप्रमाणे आहेत. इतर अनेक कारणांपैकी फुलोरा येण्याचा काळ, निरनिराळया जातींमध्ये नर व उभयलिंगी फुलांचे प्रमाण, स्वपरागीभवनाची क्षमता ह्यांवर प्रामुख्याने फळधारणेचे प्रमाण अवलंबून असते.
उभयलिंगी फुलांपासून फळे मिळतात. अशा फुलांचे प्रमाण जातिपरत्वे आणि निरनिराळ्या भागांत कमीअधिक प्रमाणात आढळते. केसर जातीमध्ये उभयलिंगी फुलांचे प्रमाण जास्त आढळते. दशेरी, लंगडा, चवसा आणि नागीण ह्या जातींमध्ये स्वपरागीकरणामुळे फळधाणा होत नाही. अशा जातींमध्ये परपरागीकरणाची आवश्यकता असते. फुलोरा येण्याच्या व नंतरच्या काळात असणारे हवामान आणि रोग व किडींचा प्रादुर्भाव यांवर फळधारणेचे प्रमाण अवलंबून असते. फळधारणा झाल्यानंतर फळे तयार होईपर्यंत निरनिराळया अवस्थेत फळगळ होत असते. सुरुवातीची फळगळ बऱ्याच वेळा नैसर्गिक असते. परंतु फळे अर्धवट मोठी वाढल्यानंतर गळणे अधिक नुकसानकारक ठरते. या समस्यांवर सुरुवातीपासून पुढील प्रकारे उपाययोजना करणे उचित ठरेल.
(1) बागा लावताना निव्वळ एका जातीची लागवड करू नये. काही प्रमाणात इतर एक अथवा दोन जाती त्यामध्ये लावाव्यात. ह्यामुळे फळधारणा वाढण्यास मदत होते. शिवाय एकाच जातीमुळे होणारे संभाव्य नुकसान कमी होऊ शकते.
(2) फुलोरा निघत असताना आणि त्यानंतरच्या काळात तुडतुडे, भुरी, इत्यादींच्या
बंदोबस्तासाठी कीटकनाशकाची / बुरशीनाशकाची वेळोवेळी फवारणी करावी.
(3) संजीवकाचे फवारे देऊन फळगळ कमी करता येते. ह्यासाठी एन. ए. ए. 10 पी. पी. एम. किंवा 2-4-डीचे 15 पी. पी. एम. दोन फवारे द्यावेत. फळे वाटाण्याएवढ्या आकाराची असताना एक आणि फळे बोराएवढ्या आकाराची असताना दुसरा फवारा
द्यावा.
आंबा पिकातील पांढरा साका (स्पाँजी टिश्यू) :
फळाच्या (विशेषत: पिकलेल्या अवस्थेत ) गरामध्ये लिबलिबीत स्पंजासारखा भाग तयार होतो. ही विकृती हापूस आंब्याच्या फळांत जास्त प्रमाणात आढळते. या विकृतीची कारणे अद्याप सापडलेली नाहीत. परंतु असे दिसून आले, की फळे जसजशी अधिक जून होतात तसतसे पिकल्यानंतर उन्हात अगर तापलेल्या जमिनीवर राहिल्यास अशा फळांत साक्यासारखी विकृती तयार होते. उपलब्ध संशोधन आणि अनुभवातून आंब्याच्या फळांतील पांढरा साका कमी करण्यासाठी उपाय सुचविलेले आहेत:
(1) शेतकऱ्यांनी फळे 85 % तयार झाल्यावर काढावीत.
(2) झाडावरून फळे काढल्यानंतर ती उन्हात अथवा तापलेल्या जमिनीवर ठेवू नयेत.
(3) बागेमधील झाडाखालचे तापमान वाढू नये म्हणून जमिनीवर गवत वाढवावे. किंवा जमिनीवर आच्छादन करावे.
(4) नीलम आणि हापूस यांच्या संकरातून तयार केलेल्या ‘रत्ना’ जातीची लागवड करावी.
(3) मँगो मालफॉर्मेशन: मँगो मालफॉर्मेशन ही आंब्यावरील एक भयंकर समस्या आहे. विशेषतः उत्तर भारतातील आंब्याच्या जातींमध्ये ह्या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आढळून येतो. रोगयुक्त झाडावर पर्णगुच्छासारखे झुपके तयार होतात. झाडावर फुलांचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढते आणि फळधारणा होत नाही.
ह्या विकृतीचे निश्चित कारण समजलेले नाही. निश्चित उपाययोजना जरी सापडली नाही तरीपण रोगट भागाची सुरुवातीलाच छाटणी करून कीटकनाशकाची / बुरशीनाशकाची फवारणी केल्यास आणि ऑक्टोबरमध्ये एनएए ह्या संजीवकाचा 200 पीपीएम तीव्रतेचा फवारा दिल्यास अशा प्रकारच्या पर्णविकृतीचे प्रमाण कमी करता येते.
कलमकाड्या घेताना वा कलमे खरेदी करताना शक्यतो स्थानिक भागातून घेणे इष्ट ठरते. रोगग्रस्त भागातून तसेच रोगट झाडावरील कलमकाड्या वापरू नयेत.
आंबा पिकावरील फळांची काढणी आणि आंबा पिकाचे उत्पादन : Harvesting of fruits from mango crop and production of mango crop:
आंबा काढताना तो पूर्ण पक्व झाला आहे याची खात्री करूनच काढावा. साधारणपणे फळधारणेपासून फळे पक्क होण्यास तीन महिन्यांचा कालावधी लागतो. जातिपरत्वे आणि हवामानानुसार बदल होऊन हा काळ 3.5 ते 4 महिन्यांपर्यंतही लांबू शकतो. आंब्याच्या झाडाला सर्व मोहोर एकदम येत नाही. मोहोर येण्यास सुरुवात झाल्यापासून त्याच झाडावर संपूर्ण मोहोर येण्यास 20 ते 25 दिवस लागतात. नीलम या जातीमध्ये तर हा काळ काही महिन्यांपर्यंत चालू असतो. म्हणून झाडावरील फळेसुद्धा अंतराअंतराने पक्क होतात. ह्याच कारणास्तव प्रत्येक झाडावरील फळांची काढणीदेखील 2-3 हप्त्यांत करणे योग्य ठरते.
फळे पक्व होण्यापूर्वी जर काढणी केली तर ती चांगली पिकत नाहीत. आणि अशा फळांच्या चवीवर व स्वादावर अनिष्ट परिणाम होतो. अशा फळावर सुरकुत्या दिसतात. त्यामुळे योग्य भाव मिळत नाही. तसेच काढणीचा दूरवरच्या विक्रीशी तसेच काही अंशी फळाच्या टिकवणीशीसुद्धा संबंध असल्याने फळे योग्य वेळी तोडणे महत्त्वाचे आहे. फळे पक्क झाली किंवा नाही हे ओळखण्यासाठी निरनिराळया चाचण्या ठरविल्या आहेत. जसे घनता, फळाचा आकार, रंग, फळधारणेपासूनचा काळ, फळातील साखर आणि आम्ल यांचे प्रमाण इत्यादी. तरीपण सर्वांत सोपी पद्धत म्हणजे फळे पाडाला लागली म्हणजे फळे काढणीयोग्य झाली असे समजावे. पूर्ण वाढलेला आंबा गोल आणि भरदार दिसतो. हापूस व पायरी जातीच्या फळांचे खांदे फुगून देठाच्या बाजूला वर वाढतात. फळाचा रंग फिकट होतो. हापूस जातीमध्ये उशिरा फळे तोडली असता साक्याचा प्रादुर्भाव वाढतो. 85-90% पक्वता असताना फळे काढल्यास फळातील साक्याचे प्रमाण कमी होते.
आंब्याच्या पिकावरील फळे कशी काढावीत : How to remove fruits from mango crop:
फळे काढताना किंवा काढणीनंतर फळांची हाताळणी करताना फळांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. अन्यथा फळांचा पृष्ठभाग घासला जाऊन फळे खराब होतात. एक एक फळ खुडीने तोडून ते झेल्यामध्ये अलगदपणे झेलणे योग्य ठरते. फळे तोडताना देठाचा काही भाग फळासोबत ठेवावा. देठ पूर्णपणे मोडल्यास फळातील चीक फळावर पसरतो व फळाचा आकर्षकपणा कमी होतो. अशा फळास देठाच्या बाजूने इजा झाल्यास हवेतील सूक्ष्म जिवाणू फळात प्रवेश करतात आणि देठाच्या बाजूने काळी पडतात. जातिपरत्वे हे प्रमाण कमीअधिक असू शकते. केसर ह्या जातीमध्ये हे प्रमाण अधिक मोठ्या प्रमाणावर आढळून येते. फळे देठासह काढण्यासाठी कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेला नूतन झेला अधिक उपयोगी ठरतो. वर सांगितल्याप्रमाणे एका झाडावरील फळे एकदम न काढता दोन-तीन वेळा काढावीत. फळे काढणीनंतर उन्हामध्ये न ठेवता सावलीत ठेवावीत. विक्री करण्याच्या दृष्टीने प्रतवारी करणे आवश्यक आहे. फळांची आकारानुसार प्रतवारी केली जाते. सडकी, मार लागलेली फळे काढून टाकावीत आणि आकारानुसार प्रतवारी करावी.
फळे दूरवरच्या बाजारात पाठवायची असल्यास प्रतवारी केलेली सारखी फळे लाकडी खोक्यात किंवा नवीन विकसित केलेल्या पट्ट्याच्या खोक्यात पाड लागलेल्या अवस्थेतच पाठवावीत. वाळलेले गवत / भाताचा पेंढा अथवा रद्दीचा पेपर यांच्यामध्ये फळे व्यवस्थित ठेवावीत. म्हणजे फळे एकमेकांस घासणार नाहीत. खोक्यावर आवश्यक माहिती असलेले लेबल लावूनच ती विक्रीसाठी पाठवावीत.
उत्पादन :
कलमी आंब्याची सर्वसाधारणपणे 5 व्या वर्षापासून चांगली फळे मिळतात. 10 वर्षांपर्यंत उत्पादन हळूहळू वाढते. नंतर झाडे वाढल्यानंतर उत्पन्नही वाढते. झाडे 50-60 वर्षांपर्यंत फळे देतात. योग्य काळजी घेतल्यास ती ह्याहीपेक्षा जास्त वर्षांपर्यंत फळे देतात. सुरुवातीची काही वर्षे फळे दरवर्षी मिळतात. पुढे पुढे एक वर्षाआड फळे मिळतात. जातिपरत्वे ह्यात फरक होतो. तसेच उत्पादन कमीजास्त मिळते. सर्वसाधारणपणे वाढलेल्या हापूस आंब्याच्या झाडापासून सरासरी 300 फळे तर केसर, पायरी ह्या जातींच्या झाडापासून 600 ते 700 फळे मिळतात. आकारमानावरून 1 किलोमध्ये 3 ते 5 फळे मावतात.
आंबा फळ पिकविणे आणि फळांची साठवण : Ripening and storage of mango fruit :
आंबा स्थानिक बाजारात विकावयाचा असल्यास त्याची आढी घालावी. बंदिस्त खोलीत 5 ते 7 सेंमी. जाडीच्या भाताच्या पेंढ्याचा वाळलेल्या गवताचा थर टाकून त्यावर आंबे पसरावेत व झाकावेत. 5 ते 8 दिवसांत आंबे पिकतात. 5-6 दिवसांत आढीमधील कुजलेली, सडलेली फळे काढून टाकावीत आणि चांगली फळे गवतावर पुन्हा एका थरात पसरून त्यावर पातळ थर पसरावा. 2-3 दिवसांत सर्व फळे सारखी पिकलेली मिळतील. आढी घातलेल्या खोलीत हवा खेळती असावी.
काही ठिकाणी विशेषत: पाणी दिलेल्या बागेतील आंबे आढीमध्ये घातल्यावर बऱ्याच प्रमाणात सडतात. यासाठी फळे झाडावरून देठासह अलगद काढावीत. आढीत घालण्यापूर्वी सर्व फळे 55 अंश सेल्सिअस तापमान असलेल्या पाण्यात सुमारे 5 मिनिटे (उष्णजलप्रक्रिया) बुडवावीत व नंतर आढीत घालावीत. फळे 19.0 अंश सेल्सिअस ते 21.0 अंश सेल्सिअस ह्या उष्ण तापमानात पिकविली असता फळाची प्रत सुधारते.
आंबा फळांची साठवण :
आंब्याचे फळ लवकर नासते. फळाचे तोडणीनंतरचे आयुष्य वाढविण्यासाठी त्यावर मेणाचा थर देऊन शीतगृहामध्ये साठवण करावी. फळांच्या तोडणीनंतर त्यांवर 6% मेणाचा पातळ थर दिल्यास ती उशिरा पिकतात. अशा रितीने फळांचा साठवणूक काळ वाढविता येतो. मेणामुळे फळे चकाकतात. हळूहळू पिकत असल्याने फळांची चवही चांगली असते.
शीतगृहात 5.5 अंश सेल्सिअस ते 7.5 अंश सेल्सिअस तापमानात पूर्ण पिकलेली फळे 5 ते 7 आठवडे साठवता येतात. कच्ची फळे शीतगृहात पिकत नाहीत आणि खराब होतात. म्हणून अशी फळे शीतगृहात साठवू नयेत.
सारांश :
विविध प्रक्रिया करून निरनिराळे पदार्थ तयार करण्यासाठी सर्वोत्तम फळ, निर्यातीस असलेला वाव, फळांचे पौष्टिक गुणधर्म, लोकांची आवड ह्या अनेक गुणांमुळे आंब्याला फळांचा राजा हा मान मिळालेला आहे. ह्या झाडाची अभिवृद्धी कलमे लावून किंवा जागेवरच शेतात रोपावर कलमे बांधून करता येते. आंब्याच्या वाढीसाठी उष्ण, दमट हवामान आणि मोहोराच्या काळात कोरडे हवामान मानवते. उत्तम निचऱ्याच्या, खोल, कातळ नसलेल्या, मध्यम जमिनीत आंबा चांगला वाढतो. क्षारयुक्त खारवट जमिनीत झाडाची वाढ होत नाही. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत आंबा लागवडीसाठी वाव आहे. कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात हापूसची लागवड मोठ्या प्रमाणात आहे. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात केसर, पायरी, लंगडा, दशेरी ह्या जाती आणि थोड्या प्रमाणावर इतर जाती तसेच रायवळ आंब्यांची लागवड आहे. रत्ना व सिंधू ह्या संकरित जाती मर्यादित प्रमाणावर मुख्यत्वेकरून कोकणात लावण्यात येत आहेत.
आंब्याची लागवड 10 मीटर x 10 मीटर अंतरावर किंवा ठारावीक परिस्थितीत 10 x 7.5 मीटर किंवा 7.5 x 7.5 मीटर किंवा 5 x 5 मीटर अंतरावर करावी. 1 मीटर x 1 मीटर x 1 मीटर लांब, रुंद व खोलीचा खड्डा करून तो पालापाचोळा, खत, माती, कीडनाशक यांनी व्यवस्थित भरून घ्यावा व त्यात लागवड करावी. उष्ण, कोरड्या हवामानात तसेच पाऊस कमी असलेल्या भागात शेतातच जागेवर रोपावर स्वयंभू कलमे ( इन सीटू) करून बागा कराव्यात. सुरुवातीच्या काळात बागेला पाण्याची गरज असते. तसेच कलमे लहान असताना थंडी, उन्हापासून संरक्षण करणे आवश्यक असते. साधारणतः पाच वर्षांनंतर फळे येण्यास सुरुवात होते. दहा वर्षांनंतर उत्पादनात चांगली वाढ हाते. मोहोराचे संरक्षण ही फार महत्त्वाची बाब आंबा उत्पादनामध्ये आहे. त्यासाठी कीटकनाशक आणि बुरशीनाशक फवारण्या वेळेवर करणे आवश्यक असते. मोहोर आल्यापासून ते फळ काढणीसाठी तयार होण्यास 3.5 ते 4 महिन्यांचा कालावधी लागतो. पाड लागल्यावर फळे देठासह अलगद तोडावीत. प्रतवारी करून आढीत पिकवावीत. मेणाच्या द्रावणात बुडवून तसेच शीतगृहाचा वापर करून फळांचा साठवण काळ वाढविता येतो.
आंबा बऱ्याच वर्षांपर्यंत पीक देतो. त्यासाठी खते देणे आणि निगा राखणे आवश्यक असते.