अननस लागवड | Ananas Lagwad | Ananas Sheti | अननस पिकाचे उगमस्थान, महत्त्व आणि भौगोलिक प्रसार | अननस पिकाखालील क्षेत्र |अननस पिक उत्पादन | अननस पिकासाठी योग्य हवामान | अननस पिकासाठी योग्य जमीन | अननसाच्या सुधारित जाती | अननस पिकाची अभिवृद्धी | अननस पिकाची लागवड पद्धती | अननस पिकास योग्य हंगाम | अननस पिकास लागवडीचे अंतर | अननस पिकास खत व्यवस्थापन | अननस पिकास पाणी व्यवस्थापन | अननस पिकातील आंतरपिके | अननस पिकातील तणनियंत्रण | अननस पिकावरील महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण | अननस पिकावरील महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण | अननसाच्या फळांची साठवण आणि फळे पिकविण्याच्या पद्धती | अननसाच्या फळांची हाताळणी आणि विक्रीव्यवस्था |
।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।
अननस लागवड | Ananas Lagwad | Ananas Sheti |
कमी कालावधीत चांगले उत्पादन देणारे हे पीक असून, त्याच्या लागवडीस मर्यादित वाव आहे. अननस या फळझाडाचे मूळस्थान ब्राझील हा देश समजला जातो. अननसाच्या व्यापारी उत्पादनासाठी हवाई बेटे जगात प्रसिद्ध आहेत. भारतात अननसाची लागवड प्रामुख्याने केरळ, तामीळनाडू, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, आसाम, त्रिपुरा या राज्यांत करतात. महाराष्ट्रात कोकणात समुद्र किनापट्टीच्या भागात काही प्रमाणात अननसाची लागवड करतात. हवामान अनुकूल नसल्यामुळे महाराष्ट्राच्या इतर भागांत अननसाची लागवड फायदेशीर ठरत नाही.
अननस पिकाचे उगमस्थान, महत्त्व आणि भौगोलिक प्रसार |
ब्राझील हा देश अननस या पिकाचे उगमस्थान समजला जातो. ब्राझील या देशातूनच या पिकाचा इतर देशांत प्रसार झाला.
अननस हे फळ एकदल वर्गातील आहे. औषधीदृष्ट्या हे फळ महत्त्वाचे असून पित्तनाशक, ग्लानिनाशक, अजीर्ण, जंत व कृमी, इत्यादींवर गुणकारी आहे. ब्रोमेलीन नावाचा पाचक पदार्थ अननसाच्या फळाच्या ताज्या रसात असतो. अननसाच्या रसात भरपूर प्रमाणात ‘क’ जीवनसत्त्व असते.
भारतात केरळ, तामीळनाडू, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, आसाम व त्रिपुरा या राज्यांत अननसाची लागवड मोठ्या प्रमाणावर आहे. तसेच या राज्यांमध्ये अननसाच्या फळांच्या कॅनिंगचा उद्योगही भरभराटीला आलेला आहे. भारतातील इतर राज्यांत या पिकाच्या लागवडीला फारसा वाव नाही. अननस फळाच्या 100 ग्रॅम खाण्यायोग्य भागात खालीलप्रमाणे अन्नद्रव्ये असतात.
अन्नघटक | प्रमाण (%) | अन्नघटक | प्रमाण (%) |
पाणी | 86.50 | शर्करा (कार्बोहायड्रेट्स्) | 12.00 |
प्रथिने (प्रोटीन्स) | 0.60 | तंतुमय पदार्थ | 0.30 |
खनिज द्रव्ये | 0.05 | लोह | 0.90 |
स्फुरद | 0.01 | चुना | 0.02 |
जीवनसत्त्व ‘अ’ | 60 इंटरनॅशनल युनिट | जीवनसत्त्व ‘क’ | 0.07 |
रिबोफ्लेविन | 0.12 | उष्मांक | 50 कॅलरीज |
अननसाची लागवड प्रामुख्याने ब्राझील, अमेरिका, मलाया, जावा, फिलिपाईन्स, सुमात्रा, दक्षिण आफ्रिका, हवाई बेटे, श्रीलंका, सिंगापूर आणि भारत या देशांत करतात. हवाई बेटे अननसाच्या उत्पादनासाठी जगात व्यापारीदृष्ट्या प्रसिद्ध आहेत. तसेच अननसाच्या फळांचे कॅनिंग मोठ्या प्रमाणावर करून हे डबे युरोप, अमेरिका व इतर देशांत निर्यात केले जातात.
अननस पिकाखालील क्षेत्र |अननस पिक उत्पादन |
अननसाची लागवड भारतात प्रामुख्याने केरळ, तामीळनाडू, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, आसाम, त्रिपुरा या राज्यांत करतात. महाराष्ट्रात कोकणात समुद्र किनारपट्टीच्या भागात काही प्रमाणात अननसाची लागवड करतात. भारतात या पिकाखाली सुमारे 8,530 हेक्टर क्षेत्र आहे.
अननस पिकासाठी योग्य हवामान | अननस पिकासाठी योग्य जमीन |
हवामान :
अननसाचे पीक उष्ण व दमट हवामानात चांगले येते. समुद्रसपाटीपासून 1,000 मीटर उंचीपर्यंतच्या डोंगराळ प्रदेशातही या पिकाची लागवड करता येते. अननसाच्या पिकाची वाढ सरासरी 11 ते 23 अंश सेल्सिअस तापमानात चांगली होते. सरासरी 1,200 मिलिमीटर पाऊस पडणाऱ्या प्रदेशात अननसाचे पीक घेतले जाते. भारतात ज्या किनारपट्टीत नैर्ऋत्य आणि ईशान्य मान्सूनचे दोन पाऊस पडतात त्या भागात अननसाची लागवड यशस्वीरित्या होते. हवाई बेटे व मलाया या उष्ण कटिबंधातील देशात पाऊस वर्षभर सारख्या प्रमाणात पडत असतो. त्यामुळे तेथे अननसाचे पीक मोठ्या प्रमाणावर यशस्वीरित्या घेतले जाते. महाराष्ट्रात कोकणात ज्या भागात 1000-1200 मिमी. पाऊस पडतो आणि तापमान 25 ते 32 अंश सेल्सिअस असते, त्या ठिकाणी अननसाची लागवड केली जाते.
जमीन :
अननसाच्या लागवडीसाठी हलक्या ते मध्यम प्रकारच्या तसेच गाळाच्या किंवा पोयट्याच्या जमिनी चांगल्या असतात. वाळूमिश्रित, रेताड, आणि सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण भरपूर असलेल्या जमिनीत अननसाची लागवड चांगली होते. कोकणातील तांबड्या मातीच्या रेतीमिश्रित जमिनी अननसाच्या पिकास योग्य आहेत. भारी, चिकण जमिनीत या पिकाची लागवड यशस्वी होत नाही. अननसाच्या लागवडीसाठी निवडलेल्या जमिनीचा सामू (आम्ल – विम्ल निर्देशांक) 5.5 ते 6.0 च्या दरम्यान असावा. अननसाची मुळे जमिनीत वरच्या 45 ते 60 सेंमी. पर्यंतच्या थरातच पसरत असल्यामुळे अर्धा मीटर मातीचा थर असलेल्या हलक्या जमिनीसुद्धा या पिकाच्या लागवडीसाठी योग्य आहेत. परंतु अशा हलक्या जमिनीच्या अंतर्गत भागात सेंद्रिय पदार्थांचा भरपूर पुरवठा करावा लागतो.
अननसाच्या सुधारित जाती |
भारतात प्रामुख्याने क्वीन आणि जॉयंट क्यू (स्मूथ कॉमन) या दोन जातींची लागवड केली जाते. कोकणात आणि सुरतच्या दक्षिणेकडील भागात मॉरिशस ही अननसाची स्थानिक जात लावतात. आसाम राज्यात जलधूप नावाची स्थानिक जात लावतात.
क्वीन :
अननसाची ही जात सिंगापूर भागातील असून या जातीतील झाडाच्या पानांना अणकुचीदार काटे असतात. या जातीच्या झाडास भरपूर फुटवे येतात. या जातीमध्ये इतर जातींच्या तुलनेने लवकर फळधारणा होते. क्वीन या जातीची फळे 1.5 ते 2.5 किलो वजनाची असून फळांचा गर पिवळ्या रंगाचा, गोड व स्वादिष्ट असतो. परंतु क्वीन ही जात कॅनिंगसाठी योग्य नाही. कारण या जातीत फळावरील डोळे गरामध्ये खोलपर्यंत गेलेले असतात. त्यामुळे फळाच्या चकत्या किंवा फोडी चांगल्या पडत नाहीत.
जॉयंट क्यू (स्मूथ कॉमन ) :
ही जात हळूहळू वाढणारी असून झाडाला कमी फुटवे येतात. या जातीची लागवड हवाई बेटांवर मोठ्या प्रमाणावर करतात. झाडाची पाने राखाडी, करड्या रंगाची आणि काटेरी असतात. या जातीतील फळावरील डोळे रुंद व पसरट असतात. त्यामुळे फळाच्या चकत्या किंवा फोडी चांगल्या करता येतात. म्हणूनच कॅनिंगसाठी जॉयंट क्यू ही जात उत्तम असून जगात प्रसिद्ध आहे. या जातीची फळे मोठी असतात; परंतु फलधारणा उशिरा होते. या जातीतील प्रत्येक फळाचे वजन 3 ते 4 किलो भरते. फळाच्या गराचा रंग फिकट पिवळा असून फळे रसदार आणि मधुर असतात.
मॉरिशस :
या जातीची झाडे लहान, काटेरी पानांची असतात. भरपूर फुटवे येणारी ही जात कोकणात व दक्षिण सुरत भागात लावतात. या जातीची फळे पिवळया व तांबड्या सालीची असतात.
जलधूप :
कीन जातीसारखे गुणधर्म असलेली अननसाची ही जात आसाममधील असून या जातीतील झाडे लहान असतात. या जातीची फळे चवीला गोड असून फळांना मधासारखा उग्र वास येतो.
अलेक्झांड्रा :
ही जात क्वीन जातीपासून निवड पद्धतीने विकसित करण्यात आलेली आहे.
अननस पिकाची अभिवृद्धी | अननस पिकाची लागवड पद्धती |
अननसाची अभिवृद्धी जमिनीलगतच्या मुख्य झाडापासून निघालेले फुटवे (ग्राऊंड सकर्स), फळाच्या खालील भागापासून निघालेले फुटवे (स्लीप) आणि फळावरील तुऱ्याचा भाग (क्राऊन) यांचा उपयोग करून करतात. यापैकी ग्राऊंड सकर्स अननसाच्या अभिवृद्धीसाठी योग्य असतात. कारण अशा प्रकारे अभिवृद्धी केलेल्या झाडांना लवकर फळधारणा होते. क्राऊनचा वापर करून अभिवृद्धी केलेल्या झाडांना फळधारणेसाठी तुलनेने जास्त दिवस लागतात. परंतु क्राऊन पद्धतीने अभिवृद्धी केलेल्या झाडाच्या फळांचा आकार मोठा असतो. अननसाच्या क्राऊनच्या अंकुरापासून 10 ते 15 रोपे तयार करता येतात.
पूर्वतयारी :
अननसाच्या लागवडीसाठी निवडलेल्या जमिनीची 35 ते 40 सेंमी. खोलीपर्यंत उभी-आडवी नांगरणी करावी व जमीन कुळवून घ्यावी. जमिनीमध्ये दर हेक्टरी 70 ते 75 गाड्या कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत घालावे.
लागवड पद्धती :
अननसाची लागवड निरनिराळया भागांत वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. केरळमध्ये सरी आणि वरंबा पद्धतीने तर बंगालमध्ये सपाटीवर अननसाची लागवड करतात. आसाममध्ये अननसाची लागवड दुहेरी आणि तिहेरी ओळीमध्ये करतात. तामीळनाडूमध्ये एकेरी ओळीत ठरावीक अंतरावर रस्ता ठेवून अननसाची लागवड केली जाते. अननसाच्या दोन झाडांमध्ये 1 ते 1.5 मीटर अंतर ठेवतात आणि दोन ओळींमध्ये 1.5 ते 2.0 मीटर अंतर ठेवतात. अननसाच्या लागवडीसाठी सरी पद्धत योग्य आहे. अननसाच्या लागवडीपूर्वी सकर्सचा खालील भाग तासून निमुळता करावा. असे सकर्स सावलीत सात दिवस सुकविल्यानंतर सकर्सचा खालील भाग बोर्डो मिश्रणात (3: 3:50) बुडवावा; त्यामुळे सकर्सला मूळकुजव्या रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही. अननसाचे सकर्स साधारणपणे 10 ते 12 सेंमी. खोल खड्डा करून त्यात लावावेत. सकर्स लावताना पोंग्यात माती जाणार नाही याची काळजी घ्यावी.
अननस पिकास योग्य हंगाम | अननस पिकास लागवडीचे अंतर |
कमी पावसाच्या प्रदेशात अननसाची लागवड जून-जुलै महिन्यामध्ये करतात. भरपूर पाऊस पडणाऱ्या प्रदेशात सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यानच्या काळात तसेच ज्या ठिकाणी पाण्याची सोय आहे तेथे हिवाळयातसुद्धा अननसाची लागवड करतात. अननसाच्या लागवडीसाठी सकर्स, स्लीप किंवा क्राऊन वापरल्यास झाडाच्या गुणधर्मांत फरक पडत नाही. परंतु फळे पक्व होण्याच्या कालावधीत फरक पडतो. क्राऊन लागवडीने अभिवृद्धी केल्यास फळे पक्व होण्यासाठी 24 महिने लागतात. स्लीप वापरून लागवड केल्यास 20 ते 22 महिन्यांत आणि सकर्सचा लागवडीसाठी उपयोग केल्यास 15 ते 18 महिन्यांत फळे पक्क होतात. साधारणपणे 3 ते 4 महिन्यांचे सकर्स लागवडीसाठी वापरतात. 450 ग्रॅम वजनाचे सकर्स किंवा 350 ग्रॅम वजनाचे 10 ते 12 पाने असलेले स्लीप लागवडीसाठी वापरावेत. अननसाची लागवड सरी पद्धतीने करतात. सपाट वाफ्यापेक्षा सरी पद्धत चांगली असते.
सरी पद्धतीने दोन सरींतील अंतर अर्धा ते पाऊण मीटर असते व सरीवर 15 सेंमी. अंतरावर सकर्स एका आड एक पद्धतीने लावतात. चर पद्धतीने अननसाची लागवड करणे अधिक फायद्याचे असते. दोन चरांत 1.5 मीटर अंतर ठेवून 6 मीटर लांब, 1.5 मीटर रुंद आणि 1 मीटर खोलीचे चर खोदून हे शेणखत व मातीने 30 सेंमी. पर्यंत भरतात. सकर्सची लागवड ओळीत 30 सेंमी. वर करतात. सकर्सच्या दोन ओळीत 60 सेंमी अंतर असते. सकर्स लावताना दोन ओळीतील सकर्स सामोरासमोर येणार नाहीत अशा पद्धतीने लागवड करावी. म्हणजे प्रत्येक रोपास वाढीसाठी भरपूर जागा मिळते.
अननस पिकास खत व्यवस्थापन | अननस पिकास पाणी व्यवस्थापन |
खते :
अननसाच्या पिकास चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत हेक्टरी 70 ते 75 गाड्या सुरुवातीला लागवडीपूर्वी जमिनीत मिसळून द्यावे. या पिकास नत्र व पालाश ही खते पुढील तक्त्यात दाखविल्याप्रमाणे द्यावीत.
अन्न घटक द्रव्य | खतांची मात्रा | खताचे हेक्टरी प्रमाण (किलो) | |
प्रत्येक झाडास (ग्रॅम) | हेक्टरी (किलो) | ||
नत्र बागायती पिकास | 12 | 500 | 2,500 (अमोनियम सल्फेट) |
नत्र कोरडवाहू पिकास | 16 | 680 | 3,500 (अमोनियम सल्फेट) |
पालाश बागायती व कोरडवाहू पिकास | 12 | 500 | 1,000 (पोटॅशियम सल्फेट) |
अननसाची झाडे स्फुरदाला विशेष प्रतिसाद देत नाहीत. झाडांना नत्राचे प्रमाण जास्त झाल्यास फळापेक्षा क्राऊनची वाढ जास्त होते. पोटॅशियमच्या मात्रेमुळे फळे वजनदार, मोठी आणि घट्ट होतात. खते तीन हप्त्यांत विभागून द्यावीत. खताचा पहिला हप्ता लावणीनंतर तीन महिन्यांनी, दुसरा हप्ता त्यानंतर पाच महिन्यांनी – मार्चमध्ये व तिसरा हप्ता जुलै महिन्यात म्हणजे लावणीनंतर 12 महिन्यांनी द्यावा. खते दिल्यावर झाडांना मातीची भर द्यावी.
याशिवाय 10 लीटर पाण्यात 100 ग्रॅम युरिया ( 1% युरिया) मिसळून एक महिन्याच्या अंतराने 2-3 फवारण्या केल्यास अननसाची फळे मोठी होतात. तसेच जस्त, लोह या सूक्ष्म अन्नद्रव्यांची झाडाची गरज भागविण्यासाठी 10 लीटर पाण्यात 50 ते 60 ग्रॅम सूक्ष्म अन्नद्रव्ये मिसळून झाडांवर फवारणी करावी.
पाणी व्यवस्थापन :
पावसाळयाचा काळ सोडून इतर वेळी अननसाच्या पिकास आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. जमिनीच्या मगदुरानुसार 7 ते 10 दिवसांच्या अंतराने अननसाला पाणी द्यावे.
अननस पिकातील आंतरपिके | अननस पिकातील तणनियंत्रण |
अननसाच्या लागवडीत दोन ओळींतील व दोन झाडांतील अंतर अननसाच्या झाडांच्या वाढीसाठी व या पिकाच्या मशागतीसाठी पुरेसे असल्यामुळे तसेच अननसाचे उत्पादन दीड ते दोन वर्षांत निघत असल्यामुळे, अननसामध्ये आंतरपिके घेण्यासाठी पुरेशी मोकळी जागा मिळत नाही. म्हणून अननसाच्या बागेत आंतरपिके घेऊ नयेत.
अननसाचे चांगले उत्पादन येण्यासाठी अननसाच्या बागेत वेळच्या वेळी आंतरमशागत करणे महत्त्वाचे आहे. जमिनीत पाणी साचू न देता पाण्याचा योग्य प्रकारे निचरा करावा. अननसाच्या झाडांना सावली करून जमिनीवर आच्छादन करावे. जमिनीत हवा नेहमी खेळती राहण्यासाठी जमीन नेहमी भुसभुशीत ठेवावी. साधारणपणे वर्षांतून तीन वेळा (मार्च, जुलै आणि सप्टेंबर महिन्यात) खोदणी करून झाडांना मातीची भर द्यावी. आंतरमशागत करताना पानास इजा होणार नाही अथवा पाने मोडणार नाहीत याची काळजी घ्यावी.
अननसाच्या फळांची वाढ होत असताना जास्त तापमान असलेल्या भागात अननसाची झाडे अर्धवट सावलीखाली लावावीत. उन्हामुळे फळे खराब होऊ नयेत म्हणून झाडांची पाती शेंड्यांवर बांधून फळे झाकून घ्यावीत. फळे मोठी झाल्यावर अननसाच्या झाडांना आधार द्यावा.
अननसाच्या बागेतील आंतरमशागत करताना तणांचा नायनाट करून बाग नेहमी स्वच्छ ठेवावी. बागेतील तणांचा बंदोबस्त करण्यासाठी निवडक तणनाशकांचाही वापर करता येतो.
अननस पिकावरील महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण |
पिठ्या कीड (मिलिबग्ज) :
ही कीड पांढऱ्या रंगाची असून ती अननसाच्या झाडाच्या कोवळ्या पानांतील तसेच फळांतील रस शोषून घेते. त्यामुळे अननसाचे झाड कमकुवत बनते. या किडीच्या अंगातून एक प्रकारचा चिकट द्रवपदार्थ बाहेर येतो. या द्रवपदार्थामुळे अननसाच्या पानावर काळ्या बुरशीची वाढ होते.
उपाय : या किडीच्या नियंत्रणासाठी मे – जून आणि ऑक्टोबर – नोव्हेंबर महिन्यात झाडांना खते देताना जमिनीत दर हेक्टरी 17 ते 18 किलो थायमेट मिसळावे. हे औषध 100 दिवसांपर्यंत चांगले परिणामकारक ठरते. तसेच दर हेक्टरी 1.75 किलो क्लोरडेन किंवा 2.25 किलो हेप्टाक्लोर जमिनीत मिसळल्यास पिठ्या किडीचा बंदोबस्त होतो.
अननस पिकावरील महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण |
मूळकुजव्या व खोडकुजव्या :
बागेतील दमट वातावरणामुळे मूळकुजव्या व खोडकुजव्या हे बुरशीजन्य रोग दिसून येतात.
उपाय : या रोगाला प्रतिबंध करण्यासाठी बागेत पाणी साचू देऊ नये. बागेत पाण्याचा योग्य निचरा असणे आवश्यक आहे. अननसाची लागवड करताना अभिवृद्धीसाठी निवडलेले सकर्स (फुटवे) 1 % बोर्डो मिश्रणात अथवा 10 लीटर पाण्यात 150 ग्रॅम डायफोलेटॉन है बुरशीनाशक (0.4 %) मिसळून तयार झालेल्या द्रावणात लागवड करावयाचे सकर्स बुडवून लागवड करावी.
या बुरशीजन्य रोगामुळे झाडाच्या पानांवर आणि फळांवर डाग पडतात आणि फळे खराब होतात.
उपाय : 5:5:50 तीव्रतेच्या बोर्डो मिश्रणाची किंवा डायथेन झेड – 78 किंवा डायथेन एम-45 या औषधांची फवारणी करून हा रोग आटोक्यात आणता येतो.
अननस पिकाच्या फळांची काढणी आणि उत्पादन |
अननसाच्या लागवडीपासून 18 ते 24 महिन्यांच्या कालावधीत फळे काढणीसाठी तयार होतात. फळे फेब्रुवारी ते एप्रिल या काळात येतात. जून ते सप्टेंबर या काळात अननसाची पक्व फळे काढणीसाठी मोठ्या प्रमाणावर तयार होतात. फळे काढणीचा हंगाम जातीवर अवलंबून असतो. काही जातींची फळे डिसेंबरपर्यंत तयार होतात. हिवाळयात पक्व होणारी अननसाची फळे चवीला आंबट लागतात. अननसाची फळे कोकणात जून- जुलै महिन्यात तयार होतात. पावसाळी वातावरणामुळे या फळांना बाजारात योग्य भाव मिळत नाही. म्हणून फळे मार्च-एप्रिलमध्ये मिळण्यासाठी 8 ते 10 महिने वयाच्या अननसाच्या झाडावर कॅल्शियम कार्बाईड या रासायनिक द्रव्याचा उपयोग करतात. अशा झाडाच्या पूर्ण पक्व झालेल्या फळाचे वजन जास्त असते.
अननसाच्या फळांची काढणी फळाचा रंग पिवळसर होऊन डोळे गर्द नारिंगी झाल्यावर करावी. अननसाच्या अपक्व फळाला गोडी, स्वाद आणि गरास योग्य रंग येत नाही. पक्क झालेल्या फळावरील डोळे मध्यभागी रुंद होऊन देठाच्या बाजूंना फुगतात. अशी फळे काढणीसाठी तयार झाली असे समजावे. फळे काढताना धारदार चाकूने 2-3 सेंमी. दांडा ठेवून काढावीत. फळावरील शेंड्याचा भाग कापू नये. फळाला शेंड्याचा भाग ठेवल्यास फळे 3 ते 4 आठवडे चांगल्या स्थितीत राहू शकतात. फळे काढताना फळांना कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये याची काळजी घ्यावी. अन्यथा फळे कुजण्याची शक्यता असते. उत्पादन हेक्टरी 30 ते 50 टन असते.
अननसाच्या फळांची साठवण आणि फळे पिकविण्याच्या पद्धती |
अननसाच्या पक्व फळांची काढणी केल्यानंतर फळे पिकविण्याची आवश्यकता नसते. अननसाची पक्व फळे 11 ते 12 अंश सेल्सिअस तापमानात 3 ते 4 आठवडे चांगली राहतात. अननसाची पिकलेली फळे 7 ते 9 अंश सेल्सिअस तापमानात ठेवल्यास 4 ते 6 आठवडे चांगल्या स्थितीत राहतात.
अननसाच्या फळांची हाताळणी आणि विक्रीव्यवस्था |
तयार फळे झाडाच्या बुंध्यापासून फळास इजा न करता काढून व्यवस्थित रचून ठेवावीत. फळावरचा क्राऊन (मुकुट किंवा तुरा) तसाच ठेवावा म्हणजे फळ साठवणीत आणि वाहतुकीत खराब होत नाही.
सारांश |
अननसाचे पीक उष्ण व दमट हवामानात चांगले येते. समुद्र सपाटीपासून 1000 मीटर उंचीपर्यंतच्या डोंगराळ प्रदेशात तसेच समुद्रानजीकच्या भागात या पिकाची लागवड करता येते. सरासरी 500 ते 5000 मिमी. पाऊस पडणाऱ्या प्रदेशात अननसाचे पीक घेतले जाते. अननसासाठी हलक्या ते मध्यम प्रकारच्या तसेच गाळाच्या किंवा सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण भरपूर असलेल्या जमिनीत अननसाची लागवड चांगली होते. महाराष्ट्रात कोकणात समुद्र किनारपट्टीच्या भागात काही प्रमाणात मॉरिशस या अननसाच्या जातीची लागवड करतात. भारतात क्वीन आणि जॉयंट क्यू या अननसाच्या दोन जातींची लागवड केली जाते. अननसाची अभिवृद्धी मुख्य झाडापासून निघालेल्या फुटव्यांपासून (सकर्स) करतात. अननसाची लागवड दोन ओळींमध्ये 1.5 ते 2.0 मीटर व दोन झाडांमध्ये 1 ते 1.5 मीटर अंतर ठेवून करतात. अननसाच्या झाडाला खते व पाणी योग्य वेळी योग्य प्रमाणात देणे महत्त्वाचे असते. अननसाची फळे लागवडीपासून 18 ते 24 महिन्यांत काढणीसाठी तयार होतात.