।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।
अंगारकी चतुर्थी (Angarki Chaturthi) व्रत कसे करावे ?
मंगळवारी वद्य चतुर्थी असेल तर तिला अंगारकी चतुर्थी म्हणतात. कोणत्याही अंगारकीपासून हे व्रत सुरू करता येते. लागोपाठ अंगारकी चतुर्थी प्रत्येक महिन्यात येत नाही. त्यामुळे सलग दरमहा हे व्रत करता येत नाही. तथापि एका अंगारकीचे पुण्य २१ संकष्टी चतुर्थी केल्याइतके असते. व्रताच्या दिवशी सकाळपासून उपोषण करावे. उपासाला चालणारे फलाहार, दूध इत्यादी पदार्थ सेवन करावेत. सायंकाळी पुनः स्नान करून चंद्रोदय झाल्यावर गणेशाची षोडशोपचारे पूजा करावी. पूजेनंतर आरत्या म्हणून मंत्रपुष्प वाहून तुपात तळलेल्या २१ मोदकांचा नैवेद्य गणेशाला दाखवून सर्वांना तो वाटावा. चंद्रदर्शन घेऊन, किंवा पाटावर त्याची आकृती काढून त्यावर गंधफूल वाहून नमस्कार करावा. पूजा झाल्यावर व भोजनापूर्वी अंगारकी माहात्म्याची पोथी वाचावी, इतरांना वाचून दाखवावी. या पोथीच्या तीन प्रती या दिवशी दान देण्यात मोठे पुण्य असते. मग गणेशस्मरणपूर्वक भोजन करावे. हे व्रत कोणीही श्रद्धेने केले तरी चालते. मात्र त्या दिवशी घरात व स्वतःची शारीरिक शुद्धता पाहिजे. कोणत्याही प्रकारे सुतक, अडचण इत्यादी असल्यास फक्त उपोषण करून गणेशस्मरण करावे व रात्री चंद्रोदयानंतर साधे भोजन करून उपास सोडावा. पूजाविधी करू नये.
संकष्टी चतुर्थी (Sankashti Chaturthi) ची फलश्रुति
संकष्टीप्रमाणेच या व्रताच्या आचरणानेही संकटे नष्ट होतात, लग्ने जमतात, पुत्रप्राप्ती होते, परदेशी गेलेली व्यक्ती सुखरूप राहते. उद्योगधंद्यात नुकसान टळते, भरभराट होते, यश मिळते, घरातील भांडणे मिटतात, परीक्षेत यश मिळते, पराक्रम घडतो, कीर्ती प्राप्त होते, मंगळ ग्रहाची उग्रता कमी होते, तो सौम्य होतो. २१ संकष्टी चतुर्थी व एक अंगारकी यांचे फळ सारखेच मिळते.
संकष्टी चतुर्थी ची पूजासाहित्य
दोन पाट, एक स्वतः साठी. दुसरा गणेशमूर्तीसाठी. पाटावर ताम्हनात तांदूळ ठेवून त्यावर गणेशमूर्ती ठेवून पूजा करावी.
दोन ताम्हने एक मूर्तीसाठी. दुसरे आचमनासाठी. एक पळी भांडे, एक पाण्याचा तांब्या.निरांजन, तूप, फुलवात, कापूर, कापूरारती, घंटा, झांजा (आरतीसाठी), लाल फुले, २१ दुर्वा, लाल गंध, उदबत्ती, कापसाचे वस्त्र, जानवे, हळदकुंकू, अबीर, उदबत्तीचे घर, देवमूर्ती पुसण्यासाठी वस्त्र, रेशमी लाल आसन वस्त्र ( मूर्तीसाठी), नैवेद्याला गूळ-साखर- खोबरे, महानैवेद्याचे २१ मोदक, अक्षता (कुंकुम लावलेले तांदूळ मूठभर ), विड्याची पाने, त्यावर ठेवण्यासाठी सुपारी, स्वत: साठी धूतवस्त्र, खांद्यावर उत्तरीय वस्त्र.
गणेशपूजाविधी
देवासमोर बसून प्रथम आचमन करावे. (देवमूर्तीचे मुख पूर्वेस किंवा पश्चिमेस असावे. यांतील पूर्वेस उत्तम. आपण देवासमोर बसल्यास आपले मुख पश्चिमेस किंवा पूर्वेस होईल.)
( १ ) आचमन – ॐ केशवाय नमः । ॐ नारायणाय नमः । ॐ माधवाय नमः । असे म्हणून दोनदा आचमन करावे. ॐ गोविन्दाय नमः । असे प्रत्येक आचमनानंतर म्हणून हातावरून ताम्हनात पाणी सोडावे..
(२) स्मरण हात जोडून पुढील लोक म्हणावा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ । निर्विघ्नं कुरु मे देव शुभकार्येषु सर्वदा ||
(३) आवाहन (देवाला पूजेसाठी बोलावणे) – पुढील श्लोक म्हणावा आगच्छ देवदेवेश तेजोराशे जगत्पते । क्रियमाणां मया पूजां गृहाण गणनायक || आवाहनार्थे दुर्वांकुरं समर्पयामि । ( असे म्हणून दूर्वा वाहाव्यात, अक्षता वाहिल्या तरी चालते.)
(४) स्नान – ॐ महागणपतये नमः । स्नानार्थे शुद्धोदकम् समर्पयामि । असे म्हणून मूर्तीला स्नान घालावे.
(५) वस्त्र ॐ महागणपतये नमः । वस्त्रार्थे कार्पासवस्त्रं समर्पयामि । असे म्हणून कापसाचे, २१ मण्यांचे वस्त्र (कुंकू लावून) वाहावे.
(६) यज्ञोपवीत ॐ महागणपतये नमः । यज्ञोपवीतं समर्पयामि । असे म्हणून जानवे वाहावे. अक्षता वाहायच्या असल्यास यज्ञोपवीतार्थे अक्षतान् समर्पयामि असे म्हणावे.
(७) गंध – ॐ महागणपतये नमः । विलेपनार्थे चंदनं समर्पयामि । हरिद्राकुंकुमं, परिमलद्रव्यं च समर्पयामि । (गंध, हळद, कुंकू, शेंदूर, अबीर, गुलाल वाहावा व नमस्कार करावा.)
(८) भूषण ॐ महागणपतये नमः । अलंकारार्थे अक्षतान् समर्पयामि । (गणेशाला अक्षता वाहाव्या.)
(९) पुष्पे ॐ महागणपतये नमः । यथालब्धपुष्पाणि समर्पयामि । असे म्हणून लाल फूल वाहावे.
(१०) दूर्वा – ॐ महागणपतये नमः । दूर्वांकुरान् समर्पयामि असे म्हणून २१ दूर्वा एकेक नाम म्हणून पुढीलप्रमाणे वाहाव्यात. ॐ गजाननाय नमः । ॐ वक्रतुंडाय नमः । ॐ एकदंताय नमः । ॐ सिद्धिविनायकाय नमः । ॐ हेरंबाय नमः । ॐ चिंतामणये नमः । ॐ लंबोदराय नमः । ॐ सिद्धिविनायकाय नमः । ॐ विकटाय नमः । ॐ उमा पुत्राय नमः । ॐ मयूरेशाय नमः । ॐ सिद्धिविनायकाय नमः । ॐ आत्मने नमः । ॐ परमात्मने नमः । ॐ अंतरात्मने नमः । ॐ सिद्धिविनायकाय नमः । ॐ बुद्धितत्त्वाय नमः । ॐ विद्यातत्त्वाय नमः | ॐ कलातत्त्वाय नमः । ॐ सिद्धिविनायकाय नमः । ॐ मंगलमूर्तये नमः। अशा रीतीने २१ दूर्वा वाहाव्यात. दुर्वांना तीन पाती किंवा पाच पाती असावीत. दुर्वांची टोके आपल्याकडे असावीत. १००० दूर्वा वाहायच्या असल्यास गणेशसहस्रनाम म्हणावे. गणपतीला निर्गंध फुले, बेल व तुळस वाहू नये.
(११) धूपदीप ॐ महागणपतये नमः। धूपं समर्पयामि । ( उदबत्ती लावून घंटा वाजवीत ओवाळून उजवीकडे ठेवावी.) ॐ महागणपतये नमः । दीपं समर्पयामि। (निरांजन लावून घंटा वाजवीत ओवाळून उजव्या बाजूस ठेवावे.) ॐ महागणपतये नमः । कर्पूरार्तिक्यं समर्पयामि । (कापूर पेटवून घंटा वाजवीत ओवाळून उजवीकडे ठेवावा.)
(१२) नैवेद्य – ॐ महागणपतये नमः । गुडोपहार नैवेद्यम् समर्पयामि । असे म्हणून गुळाचा नैवेद्य दाखवावा किंवा शर्करानैवेद्यं समर्पयामि असे म्हणून साखरेचा नैवेद्य दाखवावा. पेढे असल्यास मधुरान्ननैवेद्यं समर्पयामि । असे म्हणावे.
(१३) महानैवेद्य ॐ महागणपतये नमः । महानैवेद्यं समर्पयामि । असे म्हणून मोदक किंवा जे मिष्टान्न,
पक्वान्न केले असेल त्याचा नैवेद्य दाखवावा. त्याभोवती उजव्या हाताने पाणी फिरवून, देवाला नमस्कार करावा. ॐ प्राणाय स्वाहा इत्यादी प्राणाहुती म्हणाव्यात.
(१४) तांबूल, दक्षिणा ॐ महागणपतये नमः । मुखवासार्थे पूगीफलं तांबूलं समर्पयामि । दक्षिणां च समर्पयामि । (विड्याची देठासह दोन पाने त्यावर सुपारी ठेवून व दक्षिणेचे द्रव्य ठेवून देवापुढे ठेवावे. त्यावर उजव्या हाताने उदक सोडावे, नमस्कार करावा.
(१५) आरती यानंतर उभे राहून ‘सुखकर्ता दुःखहर्ता’ ही आरती म्हणावी.
(१६) पुष्पांजली – ॐ महागणपतये नमः । नमस्ते विघ्नसंहर्त्रे नमस्ते ईप्सितप्रद। नमस्ते देवदेवेश नमस्ते गणनायक । असे म्हणून गंधाक्षता व लाल फुले वाहावीत, आणि नमस्कार करावा.
(१७) प्रदक्षिणा ॐ महागणपतये नमः । प्रदक्षिणां करोमि । असे म्हणून प्रदक्षिणा करावी. (स्वतःभोवती उजवीकडून डावीकडे एक फेरी घालावी) नमस्कार करावा.
(१८) प्रार्थना अनेन यथामिलितद्रव्योपचारसाहित्येन कृतपूजनेन श्रीमहागणपतिः प्रीयताम् । मंगलं मे भवतु । असे म्हणून साष्टांग नमस्कार घालावा व मनातील इष्ट हेतू देवाला सांगून, “तो पूर्ण कर” अशी प्रार्थना करावी.
(१९) ही पोथी स्वस्थपणे देवासमोर बसून वाचावी.
(२०) चंद्रदर्शन चंद्राचे दर्शन घ्यावे, किंवा पाटावर चंद्राची आकृती काढावी. गंधाक्षता व फूल वाहावे. नंतर भोजन करून उपवास सोडावा.
अंगारकी चतुर्थी व्रतकथा व माहात्म्य
ॐ श्रीगणपतये नमः। श्रीसरस्वत्यै नमः | श्रीगुरुभ्यो नमः । श्रीमातापितृभ्यां नमः । श्रीसकल ऋषिभ्यो देवेभ्यो नमो नमः ॥ नमन नम्रत्वे ऐसे करुनी । मनी धरुनी पाशांकुशपाणी । उपक्रम करीतसे लेखनी | गणेशव्रतवर्णना
॥ १ ॥ सर्व देवांमाजी जयाला । अग्रपूजेचा मान लाभला । तो श्रीगजानन भला । अग्नीपरी देवमुख ॥ २ ॥ जी जी आहुती अग्नीसी । अर्पण होई यजनेसी । ती ती सर्व देवांसी । प्राप्त होय ज्यापरी
॥ ३ ॥ तैसी जी भक्ती गणेशाची । पत्रपुष्पादिकीं साची । ती सर्व देवांची देवतांची। आपैसी होईल ॥ ४ ॥ अंगारक म्हणजे मंगळ । उग्र असुनीही मंगल । अग्नीपरी जो उज्ज्वल । पुत्र असे भूमीचा
॥ ५ ॥ तया अंगारकावरी । श्रीगणेश कृपा करी । वद्य चतुर्थीसी मंगळवारी । अंगारकी म्हणोनी ॥६॥ ती कथा असे सुलक्षण । गणेशाचे माहात्म्य पूर्ण केले असे वर्णन | गणेशपुराणी
॥ ७ ॥ नारद करी प्रश्न पित्यासी । ब्रह्मदेव कथा सांगे त्यासी । ती कथा इंद्र शूरसेनासी । कथीतसे आदरे ॥ ८ ॥ नैमिषारण्यांत ऋषींते । सूते चरित्र कथियले ते। गणेशपुराणी भक्तांते । कृपाप्रसाद गणेशाचा
॥ ९ ॥ ऐसी कथा वक्ता चतुरानन । नारद करीतसे श्रवण । पूर्वजन्मपापक्षालन । होतसे या व्रताने ॥ १० ॥ दूर होती सर्व संकटे । वैभव सुख संपदा भेटे । संसारी आनंद उत्साह वाटे । मुमुक्षूसी मोक्ष मिळे
॥ ११ ॥ प्रत्येक मासी वद्य चतुर्थी । संकष्टी ‘तिजसी म्हणती । उपोषण करुनी यथारीती। चंद्रोदयी पारणे ॥ १२ ॥ पूजन करावे श्रीगणेशाचे। संकटे कष्ट नष्ट भक्तांचे । त्याहुनी असे अंगारकीचे। माहात्म्य थोर पुराणी
॥ १३ ॥ संकष्टी येतां मंगळवारी । व्रत करिता, भक्तांवरी । हेरंब अधिकचि कृपा करी । वरदान हे भौमासी ॥ १४ ॥ कमलासन म्हणे नारदाते । भरद्वाज ऋषि अवंतीते । आश्रय घेउनी राहतां तेथे । अग्निहोत्र सांभाळी
॥ १५ ॥ वेदशास्त्रामाजी निपुण । भोवती असती शिष्यगण । क्षिप्रा नदीतीरी स्नान । नित्य करी ऋषी तो ॥ १६ ॥ एके दिवशी काय वर्तमान । घडले ते करी श्रवण । भरद्वाज करीत गणेशस्मरण । नदीतीरी पातला
॥ १७ ॥ स्नानाते सज्ज जाहला । ऋषी जलप्रवाही प्रवेशला । तंव तेथ चमत्कार जाहला । अप्सरा दिसे सुंदर ॥ १८ ॥ देवकार्यासाठी अप्सरा । करिती पृथ्वीवरी संचारा। नवनिर्मितीचा आसरा । दैवी योजना अगम्य
॥ १९ ॥ पाहता तिजला ऋषीचे । मन विचलित होई साचे | तेज प्रगट होई तयाचे। संकल्पशक्ति अमोघ ॥ २० ॥ अप्सरा जाहली अंतर्धान । भरद्वाज जाहला विषण्ण । व्रतीपणांत आले न्यून | मानीतसे निजमनी
॥ २१ ॥ परी त्याचे तेज जाण । पृथ्वी करी स्वयें धारण । काही अवधी होतां पूर्ण । बालक उपजे तियेसी॥२२॥ पूर्वकाळी भरद्वाजमुनी । संतानास्तव उत्सुक मनी । नारदाकडुनी उपाय समजुनी । करिती तप दुर्धर
॥ २३ ॥ संतान गणपतिस्तोत्र । पठण करिती ते पवित्र । तेणे घटना घडली विचित्र । पुढती ऐशा रीतीने ॥ २४ ॥ पृथ्वी गर्भ करी धारण । पुत्र जाहला निर्माण । भरद्वाजासी नव्हते स्मरण । परी अप्सरासंगाचे
॥ २५ ॥ बालकाचा असे रक्तवर्ण । जास्वंद पुष्पापरी जाण । पृथ्वीमाता करी संगोपन | पालन पोषण तयाचे ॥ २६ ॥ सप्त वर्षांचा होता बाळ । वारंवार मातेजवळ । प्रश्न विचारी अवखळ | क्रीडा करी नानापरी
॥ २७ ॥ ‘आई माझे कैसे अंग । कैसा याचा तांबुस रंग । कारण काय मला सांग ।’ ऐसे विचारी बालक ॥२८॥ पृथ्वी सांगे तयाला । भरद्वाज पिता तव बाळा । गणेशकृपेने जाहला । जन्म तुझा दिव्यपणे
॥ २९ ॥ गणेशासी रक्तवर्ण । तोच तुजसी मिळाला जाण । बाळ म्हणे ‘मज दर्शन । पित्याचे मम घडवी की ॥ ३० ॥ पृथ्वीने केला विचार। सप्त वर्षांचा झाला कुमर । पुढती करावे संस्कार । तरी जावे ऋषिजवळी
॥ ३१ ॥ बालकासी संगे घेउन । स्त्रीरूपे पृथ्वी येउन || अवंतीमाजी प्रवेश करुन। ऋषीसन्मुख ठाकली ॥ ३२ ॥ म्हणे ऋषिवर्या स्मरावे । क्षिप्रातीरी तुवां कामभावे । तेज सोडिले चिंतनासवे । अप्सरेसी पाहता
॥ ३३ ॥ मी पृथ्वी मूर्तिमंत । सांभाळिला तुझा सुत । आता वर्षे जाहली सात । स्वीकारावे याजला ॥ ३४ ॥ पुत्र पाहुनी भरद्वाज । म्हणे धन्य दिन उदेला आज । संतानगणपतिस्तोत्र-गुज । सफल जाहले दिसतसे
॥ ३५ ॥ स्वागत करुनी पृथ्वीचे । पुत्र आलिंगिला भरद्वाजे । पित्याजवळी तो विराजे । अग्नीपरी तेजस्वी ॥ ३६॥ पृथ्वी कृतकृत्य होउनी । जातसे निजस्थानी फिरुनी । पुत्रासी शुभदिन पाहुनी । उपनयन करी मुनी तो
॥ ३७ ॥ वेदशास्त्रांचे अध्ययन । पुत्र करी लक्ष लावून | गजाननमंत्राचे ग्रहण । पिता करवी त्याकडुनी ॥ ३८ ॥ उपदेश करी तपस्येचा । श्रीगणेश – अनुष्ठानाचा मनोदय मानुनी पित्याचा । पुत्र निघाला तपार्थ
॥ ३९॥ नर्मदा सरितेचिया तीरी । सहस्र वर्षे अनुष्ठान करी । गजानन प्रसन्न समोरी । उभा ठाकला सस्मित ॥ ४० ॥ माघ मास वद्य चतुर्थी । प्रकट जाहला श्रीगणपती । म्हणे भरद्वाजसुताप्रती । वरदान मागावे
॥ ४१ ॥ घडता इष्टदेवाचे दर्शन । दिपून गेले भौमाचे लोचन । सादर धरियले चरण । गजानन मुखी म्हणे ॥४२॥ म्हणे भक्ति असावी आपुली । हीच आशा उरली । स्थान असावे गगनतली। नित्य तेज राहावे
॥ ४३ ॥ स्तब्ध जाहला कुमार । रुद्ध जाहला प्रेमे स्वर। हस्त ठेवी मस्तकावर । गणेश तेव्हा तयाच्या ॥ ४४ ॥ बालक म्हणे अमृत । प्राशना व्हावे मज प्राप्त । तथाऽस्तु तो गणेश म्हणत । वरदान देतसे
॥ ४५॥ मंगळ आता तव नाम । मंगलमूर्ति माझे नाम । तुवां भक्ति केलीसे निःसीम । म्हणुनिया हे सांगतो ॥ ४६ ॥ मंगळवार असे आजला । जे करिती आज उपवासाला । मागतील जे ते तयांला । देईन मी निश्चित
॥ ४७ ॥ अंगारापरी रक्तवर्ण । दिसतोसी तू भूमि-संतान । अंगारक तुज नामाभिधान । प्रख्यात होय भूलोकी ॥ ४८ ॥ आणि ही चतुर्थी । अंगारकी म्हणुनी प्रसिद्ध जगती । उपवास व्रत जे करिती । इष्ट त्यांसी देईन
॥ ४९ ॥ मी तुजवरी होउनी प्रसन्न । ‘मंगल’ नाम केले ग्रहण। ऐसे बोलुनी गजानन । भूमिसुतासी कुरवाळी ॥ ५० ॥ भौमाने केला प्रणिपात । गणेश अंतर्धान पावत। धन्य जाहला जगतात । अंगारक यापरी
॥ ५१ ॥ ब्रह्मा म्हणे नारदासी ॥ जो जो करील या व्रतासी । तयाचिया पुण्यराशीसी । उपमा नाही जगतात ॥ ५२ ॥ मंगळवारी चतुर्थी येता । उत्तम पाळावे उपवासव्रता। तेणे शांति उपजते चित्ता । फलदायी बहु असे
॥५३॥ कलियुगी गजानन । लोकोद्धार हेतु धरून । व्रत सांगे भौमालागुन । दीर्घ तपे वळलासे॥५४॥ ऐहिक सुखे येणे प्राप्त । पारमार्थिक पुण्य मिळत । सद्गतीसी साधक जात । गणरायासन्निध
॥ ५५ ॥ विवाह निर्विघ्न होईल । व्यापार उत्तम वाढेल । राजद्वारी मान मिळेल । उपजीविका न तुटे ॥ ५६ ॥ विद्यार्थी मिळवील यश । परीक्षार्थी तो विशेष । दुःख चिंता लवलेश । नुरती व्रतप्रभावे
॥ ५७॥ बंदीतुनी व्हावया मुक्त। इतरही करिती जरी व्रत । त्याचे पुण्य अर्पितां होत । बंधमुक्त कोणीही ॥ ५८ ॥ पराक्रमी असे मंगळ। गणेशकृपेने होय प्रबळ । उपासनेचे म्हणुनी फळ | दोन्ही देती भक्तांसी
॥ ५९ ॥ गगनी ग्रहरूपाने । स्थान दिले त्यासी विनायकाने । अनंतकोटि ब्रह्मांडनायकाने । मंगळ ग्रह स्थापिला ॥ ६० ॥ ज्याचियां जन्मपत्रिकेत | मंगळ ग्रह असे अनिष्ट । त्यांनी अंगारकी व्रत। श्रद्धेने नित्य करावे
॥ ६१ ॥ प्रतिमासी करावी संकष्टी । मंगळवारी येता चतुर्थी । पूजावा विशेष श्रीगणपती । यथाशक्ति भक्तीने ॥ ६२ ॥ नष्ट होईल उग्रता । ग्रहप्रभावी होय शीतलता । अनुभवसिद्ध व्रत असता । अन्य कासया उपाय
॥ ६३॥ रोगपीडित असेल कोणी । निष्ठा ठेवावी गजाननी | अंगारकी चतुर्थी करुनी । होई रोगमुक्त तो ॥ ६४ ॥ पति मिळावा कुमारिकांसी । सुशील पत्नी पुरुषांसी । पुत्र व्हावा दांपत्यांसी । यास्तव व्रत करावे
॥ ६५ ॥ पूजा अर्पुनी गणेशासी । प्रार्थना करुनिया तयासी । सांगावे आपुल्या मनोगतासी । इच्छा पूर्ण करील ॥ ६६ ॥ दुर्वा वाहाव्या मूर्तीवरी । एकवीस नामांचिया उच्चारी । तेणे प्रसन्न होय विघ्नारि । क्षमायाचना करावी
॥ ६७ ॥ म्हणावे देवा गजानना । जाणतो ना मी पूजना । प्रमाद करितसे ध्याना | मन माझे चंचल ॥ ६८ ॥ क्षमा करावी मजवरी । वेडीवाकडी सेवा जरी । कृपा करुनी स्वीकारी। न्यून पुरते जाणावे
॥ ६९ ॥ पीडा टळो देवा । अपमृत्यू कोणा नसावा । विपत्ती दुर्गती दूर गांवा । आमुच्यापासुनी जावोत ॥ ७० ॥ आधिव्याधि नाना । नष्ट व्हाव्या गजानना । ऐसे म्हणुनी प्रार्थना । नम्रपणे करावी
॥ ७१ ॥ या पोथीचे वाचन । करावे एकाग्र करुनी मन । इष्ट ते प्राप्त होऊन । कार्यसिद्धी होईल ॥ ७२ ॥ दिनभरी करावे उपोषण । सायंकाळी गणेशपूजन । नैवेद्य प्रसाद भोजन । चंद्रदर्शन करोनी
॥ ७३ ॥ चंद्रोदय जाहल्यावर । पूजन त्याचे पंचोपचार | करुनी भोजन नंतर । शांत मनाने करावे ॥ ७४ ॥ गणेशाचिया मंदिरांत । दर्शन करावे मने शांत। प्रसन्न राहील निश्चित। मंगलमूर्ति भक्तासी
॥ ७५ ॥ चतुर्भुज सिंदूरवर्ण । लंबोदर मूषकवाहन । दो हस्तीं वर अभयदान । पाशांकुश दो करीं ॥ ७६ ॥ दिव्य गजमुख सरळ सोंड । मुकुटाचे तेज उदंड । प्रसन्नवदन आमोद | अमेय अमित विनायक
॥ ७७ ॥ प्रसन्न होवो आम्हांसी। ऐसी प्रार्थना तच्चरणासी । सरस्वतीसुत सेवेसी । अर्पण करी विनयाने ॥ ७८ ॥ शके एकोणीसशत । चार वर्षे महिना चैत्र । वद्य दशमी तिथि प्राप्त। ओवीरचना करावया
॥ ७९ ॥ ऐसी ही वाङ्मयीन । पूजा गणेशासी अर्पून । तत्प्रसादे धन्य धन्य । दिवाकर जाहला ॥ ८० ॥
FAQ On Post Related
1} संकष्टी चतुर्थीचे व्रत कसे करावे ?
संकष्टी चतुर्थी व्रत (उपवास):
भक्त सूर्योदयापासून ते चंद्रोदयापर्यंत कडक उपवास करतात आणि चंद्र पाहिल्यानंतरच उपवास सोडतात. हे व्रत समर्पण आणि आत्म-शिस्तीचे प्रतीक आहे, भगवान गणेशाचे आशीर्वाद मिळविण्यासाठी भक्ताची वचनबद्धता दर्शवते.
संकष्टी चतुर्थी का व्रत कैसे करें? संकष्टी चतुर्थी व्रत (उपवास): भक्त सूर्योदय से चंद्रोदय तक सख्त उपवास रखते हैं, और चंद्रमा को देखने के बाद ही इसे तोड़ते हैं । यह व्रत समर्पण और आत्म-अनुशासन का प्रतीक है, जो भगवान गणेश का आशीर्वाद पाने के लिए भक्त की प्रतिबद्धता को प्रदर्शित करता है।
2} संकट चतुर्थीच्या उपवासात काय खावे ?
संकष्टी चतुर्थी उपवासात काय खावे आणि काय…
नियमानुसार, या दिवशीचा उपवास फक्त दूध आणि रताळे खाल्ल्यानेच मोडला जातो. यानंतर तीळ, गूळ इत्यादी प्रसाद म्हणून घ्या. पारणा नंतर रताळे, तीळ, गूळ इत्यादी सोबत अर्पण केलेले अन्न खावे. जर तुम्ही फळांसाठी उपवास करत असाल तर या उपवासात भोग म्हणून अर्पण केलेल्या वस्तूंचे सेवन करू नका.
संकट चतुर्थी व्रत में क्या खाना चाहिए ? संकष्टी चतुर्थी व्रत में क्या खाएं और क्या (नियम के अनुसार इस दिन का व्रत दूध और शकरकंद खाकर ही खोला जाता है. इसके बाद तिल, गुड़ आदि को प्रसाद के रूप में ग्रहण करें. पारण करने के बाद शकरकंद, तिल, गुड़ आदि के साथ चढ़ाएं गए भोग का सेवन करें. फलाहार व्रत कर रही हैं तो इस व्रत के दौरान भोग में चढ़ाई हुई चीजों का सेवन न करें)
3} संकट चतुर्थीचा उपवास कसा सोडावा ?
या दिवशी सकाळी स्नान करून स्त्रिया निर्जला व्रत करतात. चंद्र पाहून उपवास सोडतो. काही ठिकाणी महिला या दिवशी काहीही खात नाहीत. काही ठिकाणी महिला उपवास सोडल्यानंतर खिचडी, शेंगदाणे आणि फळे खातात.
संकष्टी चतुर्थी का व्रत कैसे खोलते हैं ? (सकट चौथ के दिन महिलाएं सुबह स्नान के बाद निर्जला व्रत रखती हैं। चंद्र दर्शन के बाद व्रत को तोड़ती हैं। कुछ स्थानों पर महिलाएं इस दिन कुछ नहीं खातीं। वहीं कुछ स्थानों पर महिलाएं व्रत तोड़ने के बाद खिचड़ी मूंगफली और फलाहार करती हैं।)
4} कोणता उपवास खूप शक्तिशाली आहे ?
संकष्टी चतुर्थी व्रत आणि उपासनेचे वर्णन बविष्यत पुराण आणि नरसिंह पुराणात आहे. भगवान श्रीकृष्णांनी युधिष्ठिरांना संकष्टी चतुर्थीचा महिमा सांगितला. संकष्टी चतुर्थी व्रत पाळणारे भाविक पहाटे लवकर उठून पवित्र स्नान करतात.
कौन सा व्रत बहुत शक्तिशाली है ? संकष्टी चतुर्थी व्रत और पूजा का वर्णन बविष्यत पुराण और नरसिम्हा पुराण में किया गया है। भगवान कृष्ण ने युधिष्ठिर को संकष्टी चतुर्थी की महिमा बताई। संकष्टी चतुर्थी व्रत रखने वाले भक्त सुबह जल्दी उठते हैं और पवित्र स्नान करते हैं।