अंजीर पिकाचे उगमस्थान, महत्त्व आणि भौगोलिक प्रसार । Anjir Sheti । अंजीर पिकासाठी हवामान । अंजीर पिकासाठी जमीन ।अंजीर पिकाच्या सुधारित जाती । अंजीर पिकाच्या अभिवृद्धी । अंजीर पिकाच्या लागवड पद्धती । अंजीर पिकास हंगाम । अंजीर पिकास लागवडीचे अंतर । अंजीर पिकास वळण । अंजीर पिकाची छाटणी । अंजीर पिकास खत व्यवस्थापन । अंजीर पिकास पाणी व्यवस्थापन । अंजीर पिकाचा बहार धरणे । अंजीर पिकातील आंतरपिके । अंजीर पिकातील तणनियंत्रण । अंजीर पिकातील महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण । अंजीर पिकातील महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण । अंजीर पिकाच्या फळांची काढणी, उत्पादन आणि विक्री । अंजीर फळांची साठवण व पिकविण्याच्या पद्धती ।
।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।
अंजीर लागवड – Anjir Lagwad – Anjir Sheti
अंजिराच्या पिकाचे मूळस्थान दक्षिण अरबस्थान हा देश आहे. अरबस्थानातून अंजिराचा प्रसार इतर देशांत झाला. भारतात अंजिराच्या लागवडीखाली सर्वांत जास्त क्षेत्र महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात प्रामुख्याने पुणे जिल्ह्यांत अंजिराची लागवड केली जाते. पुणे जिल्ह्यातील खेड-शिवापूरपासून जेजुरीपर्यंत तसेच पुरंदर, सासवड हा भाग अंजिरासाठी प्रसिद्ध आहे मराठवाड्यातील दौलताबादजवळच्या भागात अंजिराची लागवड फार पूर्वीपासून केली जाते. अंजिराची लागवड मोजक्या ठिकाणी होते. या फळांना शहरातून चांगली मागणी असते. हे एक किफायतशीर फळपीक आहे.
अंजीर पिकाचे उगमस्थान, महत्त्व आणि भौगोलिक प्रसार :
अंजीर या फळझाडाचे उगमस्थान दक्षिण अरबस्थान हा देश आहे. अरबस्थानातून या फळझाडाचा प्रसार भूमध्य समुद्राच्या आसपासच्या प्रदेशात झाला. अंजिराच्या फळातील भरपूर अन्नमूल्ये व पोषणक्षमता यांमुळे अंजिराचे फळ फार पूर्वीपासून खाण्यासाठी उपयोगात आणले जाते. अंजिरामध्ये 10 ते 28% साखर असून फळ चवीला थोडे आंबटगोड असते. अंजिराच्या फळात चुना, लोह तसेच ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. अंजिराच्या फळात इतर फळांच्या तुलनेत भरपूर खनिज द्रव्ये असतात. अंजिराचे फळ त्याच्या औषधी गुणधर्मासाठी प्रसिद्ध आहे. अंजिराचे फळ शक्तिवर्धक, सौम्य रेचक, पित्तनाशक आणि रक्तशुद्धी करणारे आहे. अंजिराची लागवड इटली, स्पेन, पोर्तुगाल, ग्रीस, अल्जेरिया आणि तुर्कस्थान या देशांत फार मोठ्या प्रमाणात होते. भारतामध्ये अंजिराची लागवड व्यापारी दृष्ट्या फक्त महाराष्ट्रातच केली जाते. दक्षिण भारतात पेनकोंडा, बंगलोर, श्रीरंगपट्टण आणि उत्तर प्रदेशात सहारनपूर येथे अंजिराची लागवड तुरळक प्रमाणात केली जाते.
अंजीर पिकाखालील क्षेत्र आणि उत्पादन :
भारतात 500 हेक्टर क्षेत्रावर अंजिराची लागवड केली जाते. यापैकी एकट्या महाराष्ट्रात 400 हेक्टर क्षेत्र या पिकाच्या लागवडीखाली आहे. महाराष्ट्रात प्रामुख्याने पुणे जिल्ह्यात अंजिराचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते आणि या जिल्ह्यात 300 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर या पिकाची लागवड आहे. पुणे जिल्ह्यात नीरा नदीच्या खोऱ्यातील खेड- शिवापूरपासून जेजुरीपर्यंतचा भाग तसेच कन्हा नदीच्या खो-यातील पुरंदर-सासवड तालुक्याचा भाग अंजीर लागवडीसाठी प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे मराठवाड्यातील दौलताबादजवळच्या भागात अंजिराची लागवड फार पूर्वीपासून केली जाते. पुणे जिल्ह्यातील सासवड भागात अंजिराचे दर हेक्टरी उत्पादन 10 ते 12 टन इतके मिळते.
अंजीर पिकासाठी हवामान आणि अंजीर पिकासाठी जमीन :
हवामान अंजिराच्या वाढीसाठी व दर्जेदार उत्पादनासाठी उष्ण आणि कोरडे हवामान पोषक आहे. दमट हवामान अंजिराच्या पिकाला घातक आहे. तापमान कमी असल्यास अंजिराच्या पिकाचे नुकसान होत नाही. ज्या ठिकाणी सरासरी 600 ते 550 मिलिमीटर पाऊस पडतो आणि सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात पाऊस थांबतो अशा ठिकाणी अंजिराची लागवड यशस्वीपणे करता येते. महाराष्ट्रातील अंजिराच्या झाडांची ऑगस्ट- सप्टेंबर महिन्यांमध्ये पानगळ होऊन झाड विश्रांती घेते व ऑक्टोबर महिन्यात झाडावर नवीन फुटीबरोबर फळे येतात. अंजिराची फळे फेब्रुवारी ते एप्रिल या काळात तयार होतात. फळांच्या वाढीच्या काळात हवामान कोरडे असावे.
जमीन :
अंजिराच्या लागवडीसाठी तांबूस रंगाची आणि 1 मीटरच्याखाली मुरुमाचा थर असलेली जमीन योग्य असते. अंजिराची मुळे साधारणपणे 1 मीटर खोल जातात. म्हणून मध्यम खोलीची आणि उत्तम निचऱ्याची जमीन या पिकास मानवते.
अंजीर पिकाच्या सुधारित जाती :
वनस्पतिशास्त्रीय दृष्ट्या अंजिरातील फुलांचे प्रकार व परागीभवन होण्याची क्रिया यावरून अंजिराचे प्रमुख चार प्रकार पडतात. या प्रकारांत अंजिराच्या जगातील प्रमुख जाती येतात.
सामान्य अंजीर (कॉमन अॅड्रिएटिक फिग) :
या प्रकारात परपरागीभवनाची क्रिया न होताच फळे तयार होतात. सामान्य अंजिराच्या फुलांना लांब दांडे असतात. या प्रकारात कॅडोटा, ब्राऊन तुर्की, पूना अंजीर, दौलताबाद अंजीर या जातींचा समावेश होतो. पूना अंजिराची फळे पातळ सालीची, फिकट हिरव्या रंगाची, कडेला तांबूस धारा असलेली असतात. फळांचा गर गुलाबी असून फळे चवीला गोड असतात. पूना आणि दौलताबाद अंजीर या जातींमध्ये फारसा फरक नाही.
कॅप्री अंजीर (जंगली अंजीर) :
या प्रकारातील झाडे नरफुलांची असतात. कैप्री अंजिराची फळे खाण्यासाठी उपयोगी नसतात. आपल्याकडील उंबराची फळे केंप्री अंजिराच्या प्रकारात मोडतात. कॅप्री अंजिराच्या फळात ब्लॅस्टोफॅगा या प्रकारचे फुलकिडे असतात.
स्मीरना अंजीर :
या जातीच्या फळात फक्त मादीफुले असल्यामुळे फळांची वाढ ब्लॅस्टोफॅगा या फुलकिड्यांनी परपरागीभवन केल्याशिवाय होत नाही.
सॅनपॅड्रो अंजीर :
हा प्रकार स्मीरना आणि अँड्रयाटिक या दोन्ही प्रकारांच्या मधला प्रकार आहे.
भारतातील अंजिराच्या सर्व जाती सामान्य अंजीर या प्रकारातच येतात. या जातींमध्ये परपरागीभवनाच्या क्रियेची गरज नसते.
(1) पुणेरी अंजीर ही जात पुरंदर तालुक्यात आणि दौलताबाद परिसरात लागवडीखाली आहे. या जातीस दिवे सासवड असेही म्हणतात. या जातीची फळे 30- 50 ग्रॅम वजनाची असून गराचा रंग तांबूस असतो. साल पातळ असून गरात साखरेचे प्रमाण 14-15 टक्के इतके असते.
(2) दिनकर ही जात मराठवाडा कृषि विद्यापीठाने दौलताबाद परिसरातून निवड
करून वाढविली आहे. या जातीची फळे आणि गोडी, पुणे अंजिरापेक्षा सरस असल्याचे नमूद केले आहे.
अंजीर पिकाच्या अभिवृद्धी आणि अंजीर पिकाच्या लागवड पद्धती :
अभिवृद्धी :
अंजिराच्या झाडाची अभिवृद्धी फाटे कलम किंवा गुटी कलम करून करतात. कलमे तयार करण्यासाठी चांगले उत्पादन देणाऱ्या अंजिराच्या झाडाची निवड करावी. फाटे कलमे तयार करण्यासाठी 8 ते 12 महिने वयाच्या फांद्या निवडाव्यात. या फांद्यांच्या शेंड्याकडचा भाग फाटे कलमे तयार करण्यासाठी वापरावा. फाटे कलम 30 ते 40 सेंमी. लांब, 1 ते 1.25 सेंमी. जाडीचे असावे आणि त्यावर किमान 4-6 फुगीर डोळे असावेत. फाटे कलमे लावण्यापूर्वी त्यांवरील सर्व पाने काढून टाकावीत. फाटे कलमे गादीवाफ्यावर लावावीत. फाटे कलमांना आय. बी. ए. हे संजीवक लावले तर मुळचा लवकर फुटतात.
गुटी कलमे तयार करण्यासाठी जून महिन्यात एक वर्ष वयाच्या फांदीवर साधारणपणे 2.5 सेंमी. रुंदीची गोलाकार साल काढावी. साल काढलेल्या भागावर ओलसर मॉस लपेटून पॉलिथीनच्या कागदाने घट्ट बांधावे. अशा प्रकारे तयार केलेली गुटी कलमे ऑगस्ट- सप्टेंबरपर्यंत तयार होतात.
लागवड पद्धती :
अंजिराच्या लागवडीसाठी निवडलेली जमीन उन्हाळयात तयार करावी. 6X 6 मीटर अंतरावर 60X60X60 सेंमी. आकाराचे खड्डे तयार करावेत. प्रत्येक खड्ड्यात 1.5 किलो सुपर फॉस्फेट टाकून खड्डे 1:2 या प्रमाणात शेणखत व पोयट्याची माती यांच्या मिश्रणाने पावसाळ्यापूर्वी भरावेत. लागवड जून-जुलै महिन्यात तयार कलमे लावून करावी. लागवडीनंतर 3 ते 4 दिवसांच्या अंतराने कलमांना पाणी द्यावे. कलमांना बांबूंचा आधार द्यावा.
अंजीर पिकास हंगाम आणि अंजीर पिकास लागवडीचे अंतर :
अंजिराची लागवड जून-जुलै ते सप्टेंबर-ऑक्टोबर या महिन्यात करावी. लागवडीसाठी जमिनीच्या मगदुराप्रमाणे 6 X 6 किंवा 5 x 5 मीटर अंतर राखावे. ठिबक सिंचन पद्धतीसाठी 6X3 मीटर अंतर सोईचे ठरते.
अंजीर पिकास वळण आणि अंजीर पिकाची छाटणी :
छाटणीमुळे अंजिराच्या झाडाला व्यवस्थित आकार देता येतो. तसेच मशागतीची कामे सुलभतेने करता येतात आणि झाडावर रोग व किडींचा प्रादुर्भावही कमी होतो. अंजिराच्या झाडाच्या छाटणीचा मुख्य उद्देश झाडाला जास्तीजास्त फुटवे आणणे हा असतो. अंजिराच्या झाडावर छाटणीनंतर येणाऱ्या नवीन फुटीवर फलधारणा होते. म्हणून अंजिराच्या झाडाची नियमित छाटणी करणे आवश्यक आहे. पावसाळयात अंजिराची झाडे सुप्तावस्थेत असतात. सप्टेंबरनंतर तापमानात वाढ होते. म्हणून ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मागील वर्षीच्या फांद्यांची योग्य रितीने छाटणी करावी. छाटणी करताना फांदीचा जोर पाहून ती शेंड्याकडील भागाकडून छाटावी. छाटणी केल्यामुळे फांदीच्या राहिलेल्या भागावरील डोळे फुटून नवीन फूट येते आणि नंतर नवीन फुटीवर फळे येतात. एका प्रयोगावरून असे दिसून आले आहे की, अंजिराच्या झाडाच्या प्रत्येक फांदीचा शेंड्याकडील 5 ते 6 सेंमी. लांबीचा भाग छाटून टाकल्यास अथवा झाडाची हलकी छाटणी केल्यास छाटणी केलेल्या भागाच्या खालच्या भागावर 2 ते 3 डोळे फुटून नवीन वाढीवर भरपूर फळे लागतात. छाटणींनंतर अंजिराच्या झाडावर 500 पीपीएम इथरेल या संजीवकाची फवारणी केल्यास अधिक डोळे फुटून भरपूर फुटवे मिळतात. अलीकडे डोळे फुटण्यासाठी हायड्रोजन सायनामाईड- क्रिडोर हे रसायन 1 लीटर 20 मिली. पाण्यात मिसळून वापरल्यास चांगले परिणामकारक होते असे आढळून आले आहे.
फांद्यांना खाचा पाडणे (नॉचिंग) :
अंजिरामध्ये उत्पादन वाढविण्यासाठी छाटणीप्रमाणेच फांद्यांवर खाचा पाडणे ही एक महत्त्वाची आणि उपयुक्त पद्धत आहे.
अंजिराच्या फांदीवरील डोळयाच्या वर 2.5 सेंमी. लांब आणि 1 सेंमी. रुंद तिरकस काप घेऊन खाचा पाडतात. फांदीवर खाच पाडताना साल आणि अल्प प्रमाणात खोडाचा भाग काढला जातो. साधारणपणे 8-9 महिने वयाच्या फांदीवर जुलै महिन्यात खाचा पाडतात, त्यामुळे फांदीवरील सुप्त डोळे जागृत होऊन नवीन फुटव्यांची संख्या वाढते. एका फांदीवरील छाटलेल्या भागाखालील तीन-चार डोळे सोडून खाचा पाडाव्यात.
अंजीर पिकास खत व्यवस्थापन आणि अंजीर पिकास पाणी व्यवस्थापन :
खते : अंजिराच्या झाडाची जोमदार वाढ होण्यासाठी झाडाला सुरुवातीला नियमित खते द्यावीत. पहिल्या वर्षी प्रत्येक झाडाला 10 किलो शेणखत, 100 ग्रॅम नत्र, 50 ग्रॅम स्फुरद आणि 50 ग्रॅम पालाश द्यावे. दरवर्षी या पटीत हे प्रमाण वाढवावे. पूर्ण वाढलेल्या पाच ते सहा वर्षांच्या झाडाला 40 ते 50 किलो शेणखत, 600 ग्रॅम नत्र, 300 ग्रॅम स्फुरद आणि 300 ग्रॅम पालाश द्यावे. शेणखताच्या बरोबरच हिरवळीच्या खताचा वापर अधिक उपयुक्त ठरतो.
अंजीर पिकाचा बहार धरणे :
अंजिराच्या झाडाला वर्षातून दोन वेळा बहार येतो. पावसाळयात येणाऱ्या ‘खट्टा’ बहार आणि उन्हाळयात येणाऱ्या बहाराला ‘मीठा’ बहार असे म्हणतात. खट्टा बहाराची फळे जुलै-ऑगस्टमध्ये तयार होतात; परंतु ही फळे चांगल्या प्रतीची नसतात. मीठा बहाराची फळे मार्च – एप्रिलमध्ये तयार होतात. या फळांचा दर्जा व उत्पादन चांगले असते. म्हणून अंजिरामध्ये प्रामुख्याने मीठा बहार घेतला जातो. मीठा बहार घेण्यासाठी सप्टेंबर महिन्यामध्ये हलकी मशागत करून पाणी न देता झाडांना ताण द्यावा. नंतर छाटणी करून खताची मात्रा द्यावी. वाफे बांधून बागेस पाणी देणे सुरू करावे. यामुळे झाडे सुप्तावस्थेतून बाहेर पडून ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यानच्या काळात झाडावर नवीन फुटीसह फळे येतात.
पाणी व्यवस्थापन :
अंजिराच्या झाडांना ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये 8 ते 10 दिवासांनी, डिसेंबर ते फेब्रुवारीच्या काळात 12 ते 15 दिवसांनी आणि मार्च ते मे या काळात 5 ते 10 दिवसांनी पाण्याच्या पाळया द्याव्यात. ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देण्याची पद्धत अंजिरासाठी सोईची आणि पाण्याचा मोजका वापर करून चांगले उत्पादन घेण्यासाठी योग्य आहे.
अंजीर पिकातील आंतरपिके आणि अंजीर पिकातील तणनियंत्रण :
लागवडीनंतरच्या सुरुवातीच्या दोन ते तीन वर्षांत अंजिराच्या झाडाचा पसारा कमी असल्यामुळे बागेत मोकळी जागा भरपूर असते. या मोकळया जागेत भाजीपाल्याची तसेच ताग, चवळी यांसारखी हिरवळीची पिके आंतरपिके म्हणून घ्यावीत. त्यामुळे बागेची चांगली मशागत होऊन जमिनीची सुपीकता वाढते व आंतरपिकापासून काही प्रमाणात उत्पादन मिळते. जमिनीच्या मगदुराप्रमाणे व पाणीपुरवठा लक्षात घेऊन अंजिराच्या बागेत एक किंवा अधिक हंगामांत आंतरपिके घ्यावीत.
तणनियंत्रण :
अंजिराच्या झाडाच्या मुळांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी अंजिराच्या बागेतील तणांचा बंदोबस्त वेळोवेळी आंतरमशागत करून करावा. सुरुवातीच्या काळात तण नष्ट करण्यासाठी आणि जमीन भुसभुशीत ठेवण्यासाठी बागेत वखरणी करावी. वर्षातून एकदा अंजिराच्या बागेत हलकी मशागत करावी. बागेत नेहमी स्वच्छता ठेवावी, तणनाशके वापरून बागेतील तणांचा बंदोबस्त करता येतो. डॅलॉपान, ग्रामोक्झोन, ग्लायसील ही तणनाशके यासाठी उपयुक्त आहेत.
अंजीर पिकातील महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण :
तुडतुडे :
ही कीड अंजिराच्या झाडाची पाने, कोवळया फांद्या आणि फळातील रस शोषून घेते. यामुळे झाडाची वाढ खुंटते. तसेच फळाची वाढ न होता फळे गळून पडतात.
उपाय : ऑक्टोबर ते नोव्हेंबर या काळात झाडांवर कीटकनाशकाच्या 3-4 वेळा फवारण्या केल्यास या किडीचे नियंत्रण होते.
खवले कीड :
ही कीड झाडाच्या फांद्यांवर, कोवळया फुटीवर आणि नवीन फुटणाऱ्या डोळयांवर आणि फळांवरही प्रामुख्याने दिसून येते. पाने व फळांवरसुद्धा ही कीड दिसून येते. खवलेकीड झाडाच्या फांद्यांतील व फळांतील रस शोषून घेते त्यामुळे फांद्या सुकतात व वाळतात. खवलेकिडीच्या प्रादुर्भावामुळे फळांच्या आकारावर व चवीवर विपरीत परिणाम होतो.
उपाय : खवलेकिडीचे नियंत्रण करण्यासाठी मॅलॅथिऑन कीटकनाशक आणि फिश ऑईल रोझीन सोप यांची फवारणी करावी.
कोळी (माईट्स्) :
कोळी ही कीड झाडाची पाने व फळांतून रस शोषून घेते; त्यामुळे फळांची पूर्ण वाढ न होता फळे गळून पडतात.
उपाय : कोळी किडीच्या नियंत्रणासाठी मीटर, केलथेन ही कोळीनाशके फवारावीत.
पिठ्याकीड :
ही कीड कोवळ्या फांद्या, फांद्यांवरील डोळे, पाने आणि फळांतील रस शोषून घेते. त्यामुळे फांद्या सुकतात आणि फळे गळून पडतात.
उपाय : पिठ्याकिडीच्या नियंत्रणासाठी खवले किडीप्रमाणेच उपाय करावेत.
साल व बुंधा पोखणारी अळी :
अंजिरावरील इतर किडींच्या तुलनेत ही कीड अंजिराच्या झाडाचे अधिक नुकसान करते. अंजिराच्या दुर्लक्षित झाडावर तसेच ज्या झाडाची वाढ झुडपासारखी आहे, अशा झाडावर या किडीचा उपद्रव जास्त असतो. ही अळी झाडाचा बुंधा आणि फांद्या आतून पोखरते. झाडाची साल खाते.
उपाय : साल किंवा बुंधा पोखरणाऱ्या अळीचा उपद्रव कमी करण्यासाठी अंजिराची झाडे झुडपासारखी न वाढू देता झाडांना योग्य वळण द्यावे. झाडांची वेळोवेळी पाहणी करावी. झाडाच्या सालीचा भुसा आणि किडीची विष्ठा असलेल्या ठिकाणी छिद्र शोधून आतील अळीला तारेच्या साहाय्याने बाहेर काढावे किंवा अशा प्रत्येक छिद्रात पेट्रोल अथवा इडीसीटी मिश्रण यांचा बोळा घालावा आणि छिद्रे ओल्या मातीने बंद करावीत. यामुळे अळी छिद्राच्या आतमध्ये गुदमरून नष्ट होते.
इतर किडी : वर उल्लेखिलेल्या मुख्य किडींव्यतिरिक्त पाने खाणारी अळी, मावा, फळे पोखरणारी अळी या किडींचा उपद्रव होतो. मुख्य किडींच्या नियंत्रणासाठी योजण्यात आलेल्या उपायांमुळे या इतर किडींचाही बंदोबस्त होतो.
अंजीर पिकातील महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण :
अंजिरावरील तांबेरा रोग :
हा बुरशीजन्य रोग मुख्यतः अंजिराच्या झाडाच्या पानांवर दिसून येतो. या रोगाचा प्रादुर्भाव पावसाळयात जास्त प्रमाणात होतो. पावसाळयात म्हणजेच नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यानच्या काळात हवेतील दमटपणा कायम राहिल्यास तांबेरा रोग झाडाच्या पानांवर झपाट्याने पसरतो. त्यामुळे झाडाची पाने गळतात. तांबेरा रोगाच्या प्राथमिक अवस्थेमध्ये अंजिराच्या झाडाच्या पानांवर तांबूस रंगाचे लहान लहान ठिपके दिसतात. पानाच्या खालच्या बाजूस शिरांच्या बारीक जाळीत गर्द तपकिरी रंगाच्या पावडरीचे ठिपके दिसतात. झाडाची पाने गळून पडल्यामुळे झाडे कमजोर होतात आणि फळेही पक्क न होता गळतात.
उपाय : अंजिराच्या झाडाची गळून पडलेली सर्व पाने गोळा करून जाळून टाकावीत. ऑक्टोबर महिन्यात नवीन फुटलेल्या फांद्यांवरील पानांवर वरच्या व खालच्या बाजूंनी 3:3:50 तीव्रतेचे बोर्डो मिश्रण किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड 50% ( 1% द्रावण ) आणि 50 % कार्बारिल यांची फवारणी 15 दिवसांच्या अंतराने तीन वेळा करावी. 10 लीटर पाण्यात 20 ग्रॅम बाविस्टीन किंवा 40 ग्रॅम डायथेन एम-45 ही बुरशीनाशके मिसळून चार वेळा फवारणी केल्यास तांबेरा रोगाचा बंदोबस्त होतो.
अंजीर पिकाच्या फळांची काढणी, उत्पादन आणि विक्री :
काढणी :
अंजिराची फळे साधारणपणे 120 ते 140 दिवसांच्या कालावधीत तयार होतात. फळांना फिकट हिरवा विटकरी-लालसर जांभळा रंग आल्यावर फळे पक्क झाली असे समजावे. अंजिराच्या फळांचा हंगाम फेब्रुवारी महिन्याच्या मध्यापासून ते एप्रिल महिन्यापर्यंत असतो. पक्व झालेली फळे त्यांचा कडकपणा जाऊन मऊ होतात. अशी पक्व झालेली फळे चाकूने देठाजवळ कापून अथवा खुडून काढावीत.
उत्पादन :
लागवडीच्या सुरुवातीच्या चार वर्षात अंजिराच्या झाडाची योग्य वाढ होऊ द्यावी. अंजिराच्या झाडाला दुसऱ्या वर्षापासून तुरळक फळे येतात. ही फळे काढून टाकावीत व पहिली दोन वर्षे उत्पादन घेऊ नये. लागवडीनंतर 4-5 वर्षांपासून अंजिराच्या झाडाचे उत्पादन वाढत जाऊन झाडे 30 ते 35 वर्षांपर्यंत भरपूर उत्पादन देतात. अंजिराच्या बागेची योग्य रितीने मशागत केल्यास अंजिराच्या एका झाडापासून सरासरी 25 ते 30 किलो फळे मिळू शकतात. पुणे-सासवड भागात अंजिराचे दर हेक्टरी 10 ते 12 हजार किलोपर्यंत उत्पादन मिळते. अंजिराची पूर्ण पिकलेली फळे लवकर खराब होतात. म्हणून विक्रीसाठी अंजिराची फळे बाहेरगावी पाठविताना फळे थोडी अपक असतानाच काढून पाठवितात. अंजिराची फळे बांबूच्या मजबूत टोपलीत अंजिराच्या पानांचा थर व फळांचा थर एकावर एक देऊन भरतात.
अंजीर फळांची साठवण व पिकविण्याच्या पद्धती :
अंजिराच्या फळांची साठवण दोन दिवसांपेक्षा अधिक काळ करता येत नाही. फळे झाडावरच पक होतात. फळे झाडावरून काढल्यानंतर पिकविण्याची गरज नसते.
सारांश :
अंजिराच्या पिकाच्या दर्जेदार उत्पादनासाठी कोरडे व उष्ण हवामान पोषक असते. तांबूस रंगाची पोयट्याची आणि 1 मीटरच्याखाली मुरुमाचा घर असलेली जमीन या पिकाला योग्य असते. भारतात अंजिराचे सर्वांत जास्त क्षेत्र महाराष्ट्रात आहे. अंजिराची लागवड महाराष्ट्रात प्रामुख्याने पुणे जिल्ह्यात केली जाते. पुणे अंजीर (पूना फिग) ही अंजिराची जात या भागात प्रसिद्ध आहे. ज्या ठिकाणी जून ते ऑगस्ट या महिन्यात 600-650 मिलिमीटर पाऊस पडतो आणि सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात पाऊस थांबतो अशा ठिकाणी अंजिराची लागवड यशस्वीपणे करता येते. महाराष्ट्रात ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यामध्ये अंजिराच्या झाडाची पानगळ होऊन झाडे विश्रांती घेतात आणि ऑक्टोबर महिन्यात झाडावर नवीन फुटीसोबतच फळधारणा होते. अंजिराची फळे मार्च-एप्रिल महिन्यात तयार होतात. अंजिराच्या झाडाची अभिवृद्धी फाटे कलम किंवा गुटी कलम पद्धतीने करतात. झाडांची लागवड 535 मीटर किंवा 6X6 मीटर अंतरावर करतात. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अंजिराच्या झाडावरील मागील वर्षाच्या फांद्यांची छाटणी करतात. अंजिराच्या लागवडीमध्ये खतांचा योग्य वापर, पाणी, रोग व किडींपासून झाडांचे व फळांचे संरक्षण या बाबी महत्त्वाच्या आहेत. अंजिराच्या झाडाला वर्षातून दोन वेळा बहार येतो. पावसाळयात फळे येणाऱ्या बहाराला खट्टा बहार आणि उन्हाळयात फळे येणाऱ्या बहाराला मीठा बहार असे म्हणतात. मीठा बहाराची फळे मार्च-एप्रिलमध्ये तयार होतात. या फळांचा दर्जा व उत्पादन चांगल्या प्रतीचे असते. अंजिराची फळे 120 ते 140 दिवसांच्या कालावधीत तयार होतात. अंजिराचे उत्पादन तिसऱ्या वर्षापासून घेणे व्यापारी दृष्ट्या फायद्याचे असते.