जाणून घ्या अँटिहिनम लागवड बद्दल संपूर्ण माहिती तेही एका क्लीक मध्ये (Antirrhinum Lagwad Mahiti Antirrhinum Sheti) – Antirrhinum Farming / Snapdragon Farming

अँटिहिनम लागवड । Antirrhinum Lagwad | Antirrhinum Sheti | Snapdragon Sheti । Snapdragon Lagwad । अँटिहिनम / स्नॅपड्रॅगन लागवड महत्त्व | अँटिहिनम लागवडी खालील क्षेत्र । अँटिहिनम पिकाचे उत्पादन । अँटिहिनम लागवड योग्य हवामान । अँटिहिनम लागवड योग्य जमीन । अँटिहिनम पिकाच्या उन्नत जाती । अँटिहिनम पिकाची अभिवृद्धी । अँटिहिनम पिकाची लागवड पद्धती । अँटिहिनम पिकास योग्य हंगाम । अँटिहिनम पिकास योग्य लागवडीचे अंतर । अँटिहिनम पिकास खते । अँटिहिनम पिकास पाणी व्यवस्थापन । अँटिहिनम पिकातील आंतरमशागत । अँटिहिनम पिकातील तणनियंत्रण । अँटिहिनम पिक शेंडे खुडणे (पिंचिंग) । अँटिहिनम पिकासाठी संजीवकांची फवारणी । अँटिहिनम पिकावरील महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण । अँटिहिनम पिकावरील महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण । अँटिहिनम फुलांची काढणी, उत्पादन आणि विक्री ।

।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।

अनुक्रम दाखवा

अँटिहिनम लागवड । Antirrhinum Lagwad | Antirrhinum Sheti | Snapdragon Sheti ।

अँटिहिनम या फुलझाडाला ‘स्नॅपड्रॅगन’ असे म्हणतात. हे फुलझाड बहुवर्षायु असून त्याची वार्षिक किंवा द्विवार्षिक लागवड करतात. अँटिहिनम हे नाव ग्रीक भाषेतील अँटि आणि हिनोस या दोन शब्दांपासून बनले आहे. ‘अँटि’ म्हणजे सारखे आणि ‘हिनोस’ म्हणजे ‘सोंड’. या फुलझाडाच्या फुलोऱ्याचा आकार लांब सोंडेसारखा असतो तर फुलाचा आकार हा ड्रॅगनच्या तोंडाच्या आकारासारखा असतो. अंगठा व त्याच्या शेजारी बोटाच्या चिमटीत धरून फूल हळू दाबले असता या फुलाचे ओठ रुंद उघडतात आणि दाब सैल झाला की पाकळ्या मिटतात.

अँटिहिनमच्या फुलझाडाची फुले आकर्षक आणि विविध रंगछटांची असतात. यामुळे ही फुले सहज लक्ष वेधून घेतात. या फुलझाडाची उद्यानामध्ये, घराभोवती, बाल्कनीमध्ये व रॉक गार्डनमध्ये लागवड करता येते. याशिवाय कटफ्लॉवर्स म्हणून या फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. महाराष्ट्रातील हवामानाचा विचार करता कडक उन्हाळ्याचे 2-3 महिने वगळता इतर काळात या फुलझाडाची चांगली लागवड होऊ शकते. या सर्व कारणांमुळे या फुलझाडाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे.

अँटिहिनम / स्नॅपड्रॅगन लागवड महत्त्व |

अँटिहिनमची झाडे उंच (90 ते 100 सेंमी.), मध्यम (60 ते 75 सेंमी.) किंवा बुटकी (30 ते 45 सेंमी.) असतात. जातीनुसार या फुलांचा आकार भिन्न असतो. अँटिहिनमच्या काही जातींची फुले चुरगळल्यासारखी दिसतात, तर काही फुले दुहेरी असतात. फुले आकर्षक, विविध रंगांची, पांढरी, पिवळसर रंगाची किंवा पिवळी असून विविध छटा असतात. अँटिहिनमची झाडे उभी वेलीप्रमाणे वर चढणारी किंवा निम-झुडपी असून पाने एकाआड एक येतात.
उद्यानातील वार्षिक फुलझाडात अँटिहिनमचे स्थान महत्त्वाचे आहे. जगातील विविध हवामानांमध्ये प्रामुख्याने कटफ्लॉवर्ससाठी या फुलझाडाची लागवड करतात. या लहान शेंड्यावर लांब दांड्यासह विविध रंगांची व छटांची फुले लागतात. अँटिहिनमची फुले दीर्घ काळ टवटवीत राहतात. त्यामुळे फुलदाणीत सजावटीसाठी ही फुले मोठ्या प्रमाणात वापरतात. या फुलझाडांची उंची भिन्न असल्याने बागेमध्ये अनेक ठिकाणी ही फुलझाडे विविध उद्देशांसाठी लावली जातात. अँटिव्हिनमची उंच झाडे वार्षिक किंवा मिश्र बॉर्डरच्या पार्श्वभागी किंवा झुडपावळीमध्ये (शबरी) हॉलिहॉक व लार्कस्पर या फुलझाडांसोबत लावता येतात. उद्यानात उंच परिणामासाठी अशा प्रकारची झाडे लावता येतात. वाफ्यात किंवा कुंडीत लावण्यासाठी या फुलझाडाची मध्यम उंचीची झाडे योग्य असतात. वाफ्याच्या किनारीला आणि खडकबागेत लावण्यासाठी बुटकी झाडे योग्य असतात. याशिवाय गादीवाफ्यावर लावण्यासाठी ही झाडे उपयोगी पडतात. खडकबागेसाठी संकरित जातीची लागवड करतात. अँटिहिनमच्या टॉम थम्ब, मॅजिक कार्पेट आणि रॉकेट हायब्रीड या बुटक्या जाती खिडकीतील खोक्यात वाढविण्यासाठी योग्य असतात.

अँटिहिनम लागवडी खालील क्षेत्र । अँटिहिनम पिकाचे उत्पादन ।

अँटिहिनम या फुलझाडाचे उगमस्थान दक्षिण युरोप हे असून दक्षिण युरोपमधून रोमन लोकांनी हे फुलझाड ब्रिटनमध्ये नेऊन तेथील पहाडी प्रदेशात सुरुवातीला लागवड केली. पुढे ब्रिटनमधून या फुलझाडाचा जगात इतरत्र प्रसार झाला. 1150 सालापासून अँटिहिनमच्या नवीन संकरित जाती उपलब्ध झाल्या आहेत. 1151 पासून अँटिहिनमच्या फुलांचा कट फ्लॉवर्स म्हणून उपयोग सुरू झाला. जगातील उष्ण, समशीतोष्ण आणि शीत कटिबंधातील अनेक देशांत या फुलझाडाची लागवड केली जाते.

अँटिहिनम लागवड योग्य हवामान । अँटिहिनम लागवड योग्य जमीन ।

अँटिनिम या फुलझाडाची उष्ण, समशीतोष्ण व शीत कटिबंधातील हवामानाच्या प्रदेशात लागवड करता येते. आपल्या राज्यातील भिन्न हवामानाचा विचार करता कडक उन्हाळ्याचा 2 ते 3 महिन्यांचा कालावधी वगळता इतर काळात या फुलझाडाची चांगली वाढ होऊ शकते. हिवाळ्यात लागवड केल्यास या फुलझाडापासून उत्तम प्रतीची फुले मिळतात. या फुलझाडाची लागवड पावसाळ्यातही करता येते. मात्र फुले येण्याच्या काळात अतिजोराचा पाऊस हानीकारक असतो.

अँटिहिनमची झाडे सुपीक, उत्तम निचऱ्याच्या आणि चुना घातलेल्या जमिनीत चांगली वाढतात. हलक्या जमिनीत हिरवळीचे खत किंवा भरपूर सेंद्रिय पदार्थ वापरून अँटिव्हिनमची लागवड करता येते. अँटिहिनमची झाडे कुंडीत लावण्यासाठी कुंडीतील माध्यम भुसभुशीत, उत्तम निचऱ्याचे आणि हवेशीर असावे आणि त्यात भरपूर सेंद्रिय पदार्थ असावेत. अँटिहिनमच्या फुलझाडाची चांगली वाढ आणि चांगली फुलधारणा होण्यासाठी जमिनीचा सामू 6 ते 6.5 इतका असावा. तसेच जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता चांगली असावी. अँटिहिनमच्या फुलझाडाच्या मुळ्यांच्या चांगल्या वाढीसाठी जमिनीत हवा खेळती राहणे आवश्यक आहे. त्यासाठी जमिनीची चांगली पूर्वमशागत करावी. अतिघट्ट जमिनीत या फुलझाडाची खुरटी वाढ होते आणि ‘कमजोर मुळ्या राहून फुलधारणा उशिरा सुरू अँटिहिनमच्या फुलझाडाची कुंडीत लागवड करण्यासाठी आणि झाडाची चांगली वाढ आणि फुलधारणा होण्यासाठी कुंड्या भरावयाच्या मिश्रणात 1:1 या प्रमाणात पीट आणि परलाईट किंवा 1:1:1 या प्रमाणात पीट, माती आणि परलाईट यांचे मिश्रण किंवा 1:1 या प्रमाणात माती आणि वाळू यांचे मिश्रण वापरावे. या माध्यमामुळे झाडाच्या मुळ्यांना पुरेशी हवा, पाणी व पोषक द्रव्ये योग्य प्रमाणात मिळतात.

अँटिहिनम पिकाच्या उन्नत जाती ।

अँटिहिनम या फुलझाडाच्या सुमारे 32 प्रजाती आहेत. झाडांच्या उंचीनुसार अँटिहिनमच्या जातींचे उंच, मध्यम बुटकी आणि अतिलहान असे प्रकार पडतात.

(अ) उंच जाती ।

अँटिहिनमच्या फुलझाडांच्या उंच प्रकारातील जातींची झाडे 70 ते 100 सेंमी. उंच वाढतात.

(1) अँटिन्हिनम माजस मॅक्सिमम :

या जातीची फुले एक किंवा अनेक रंगछटांची असतात. यामध्ये पांढरा, शेंदरी, गुलाबी, जांभळा, फिकट जांभळा, ताम्रवर्णी पिवळा आणि इतर विविध रंगांचा समावेश होतो. ही जात वाफ्यात लागवडीसाठी किंवा कटफ्लॉवर्ससाठी योग्य आहे.

(2) टिपटॉप :

या जातीच्या बुडखातून फुटवे वाढतात. ही जात कटफ्लॉवर्ससाठी उत्तम आहे. या जातीची फुले नारिंगी-गुलाबी, शेंदरी, गुलाबी, गर्द लाल, पिवळी आणि पांढरी अशा विविध रंगांची असतात..

(3) रॉकेट हायब्रीड (एफ1 ) :

या जातीच्या काटक खोडावर लांब फुलोरा वाढतो. ही जात वाफ्यातील लागवडीसाठी आणि कटफ्लॉवर्ससाठी चांगली आहे. या जातीची फुले पांढरी, गुलाबी, गुलाबी-लाल, सोनेरी पिवळी, चेरी, लाल व ब्राँझ अशी विविधरंगी असतात.

(आ) मध्यम उंचीच्या जाती

या प्रकारातील जातीच्या झाडांची उंची 50 ते 75 सेंटिमीटरपर्यंत असते.

(1) माजस नानम :

ही जात वाफ्यात लागवडीसाठी आणि कटफ्लॉवर्ससाठी लोकप्रिय आहे. या जातीच्या फुलांचे रंग पांढरा, गुलाबी, गर्द लाल, आगीसारखा लाल, गर्द पिवळा, नारिंगी-पिवळा असे असतात.

(2) टेट्रा रफल्ड :

या जातीची फुले मोठी असतात. फुलोरा लांब व आटोपशीर असतो. या जातीच्या झाडाचे खोड मजबूत असून झाडाला विविध आकर्षक रंगाची फुले येतात.

(3) कारिओका (एफ 1 ) :

या जातीच्या झाडाच्या बुडखातून फांद्या वाढतात व झाडांची वाढ समान जोमाने होते. ही जात वाफ्यात लागवडीसाठी योग्य असून या जातीची फुले विविध रंगांची असतात.

(4) कोरोनेट (एफ 1) :

ही जात काटक असून वाफ्यात लागवडीसाठी योग्य आहे.

(इ) बुटक्या जाती

या प्रकारातील जातींची झाडे झुडपी असून 15 ते 30 सेंटिमीटर उंचीची असतात. या जातींमध्ये फुलोऱ्याची संख्या जास्त असते. ही झाडे किनारीवर, वाफ्यात, खडकबागेत, खोक्यात आणि कुंडीत लावण्यासाठी योग्य असतात.

(1) फ्लोरल कार्पेट (एफ 1 ) : या जातीची झाडे बुटकी आणि चेंडूच्या आकाराची असतात. झाडावर भरपूर प्रमाणात फुलदांडे लागतात.

(2) लिटल डार्लिंग : या जातीची झाडे झुडपी असून फुलांचा मधला भाग वर असतो.

(3) कोलिब्री (एफ 1 ) : या जातीला विविध रंगांची फुले लवकर लागतात.

(4) टॉम थम्ब : या जातीची झाडे बुटकी आणि पसरट वाढीची असतात. ही जात बॉर्डरवर लावण्यासाठी योग्य आहे.

(5) अतिलहान किंवा मॅजिक कार्पेट : या जातीच्या झाडांची उंची 10 ते 15 सेंटिमीटर असते. ही जात किनारीसाठी आणि खडकबागेत लागवड करण्यासाठी योग्य आहे.

हिवाळ्यात लवकर व उशिरा लागवड करण्यासाठी अँटिहिनमच्या संकरित जाती विकसित केल्या आहेत. उंच व मध्यम उंचीच्या गटातील संकरित जाती तांबेरा या रोगाला प्रतिकारक आहेत. अलीकडे टिंकरबेल व ज्युलियाना या दोन जाती नव्याने विकसित केल्या आहेत.

अँटिहिनम पिकाची अभिवृद्धी । अँटिहिनम पिकाची लागवड पद्धती ।

अँटिनिमची अभिवृद्धी बियांपासून रोपे तयार करून करतात. त्यासाठी बियांची गादीवाफ्यावर, खोक्यात, परातीत (पॅन) अथवा कुंड्यांत पेरणी करतात. अँटिहिनमचे बी उगवण्यास साधारणपणे 3 ते 4 दिवस लागतात. 18 ते 21 अंश सेल्सिअस तापमानात बियांची उगवण चांगली होते. प्रकाशामुळे बियांची उगवण लवकर होते. बियांच्या पेरणीसाठी गादीवाफ्यात सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण भरपूर असावे. गादीवाफ्याची माती भुसभुशीत असल्यास रोपांच्या मुळ्यांची चांगली वाढ होते. अँटिहिनम या फुलझाडाचे बी बारीक असल्यामुळे पेरणी काळजीपूर्वक करावी. बियांची पेरणी करताना पेरणीची खोली व बियांमधील अंतर महत्त्वाचे असते. त्यासाठी बियांत तीन-चार पट बारीक वाळू मिसळून पातळ पेरणी करावी.
गादीवाफ्यावर बी खोल पेरू नये. पेरणीनंतर बियांवर वाळूचा किंवा पानांच्या खताचा पातळ थर द्यावा आणि गादीवाफ्यांना लगेच परंतु काळजीपूर्वक पाणी द्यावे. पाणी देताना बारीक बी पाण्याबरोबर वाहून जाणार नाही याची काळजी घ्यावी. बियांच्या उगवणीनंतर गादीवाफ्यावर रोपांची दाटी करू नये. त्यासाठी विरळणी करून प्रत्येक चौरस मीटर जागेत सुमारे 300 रोपे ठेवावीत. बियांच्या पेरणीनंतर साधारणतः 4 ते 5 आठवड्यांनंतर प्रत्येक रोपावर चार पाने आल्यानंतर व रोपे 7-8 सेंटिमीटर उंच वाढल्यानंतर त्यांचे मुख्य जागी स्थलांतर करावे.
अँटिव्हिनम या फुलझाडाची गादीवाफ्यावरील रोपे लागवडीसाठी तयार होण्यापूर्वी जमीन किंवा लागवडीचे माध्यम पूर्णपणे तयार ठेवावे. रोपे तयार झाल्यानंतर शिफारस केल्याप्रमाणे योग्य अंतरावर रोपांची लागवड करावी. या फुलझाडाची कुंडीत लागवड करण्यासाठी 25 सेंटिमीटर व्यासाच्या कुंड्या लागवडीसाठी निवडाव्यात आणि त्यात रोपांची लागवड करावी. रोपांच्या लागवडीनंतर पिकाला लगेच पाणी द्यावे.

अँटिहिनम पिकास योग्य हंगाम । अँटिहिनम पिकास योग्य लागवडीचे अंतर ।

आपल्याकडे अँटिहिनम या फुलझाडाचे पीक हिवाळी हंगामात चांगले येत असले तरी पावसाळा आणि उन्हाळी हंगामातही या पिकाची लागवड करता येते. मैदानी प्रदेशात सप्टेंबर किंवा ऑक्टोबर या महिन्यात गादीवाफ्यावर अँटिहिनमच्या बियांची पेरणी करावी. जेथे पर्जन्यमान कमी असते अशा ठिकाणी जून-जुलै महिन्यांत पेरणी करावी. डोंगरी प्रदेशात फेब्रुवारी-मार्च किंवा ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यांत अँटिन्हिनमच्या बियांची पेरणी करावी. कुंड्यांत रोपे लावायची असल्यास यापेक्षा उशिरा पेरणी करावी.
परदेशात या पिकाच्या लागवडीकरिता हिवाळी हंगामासाठी 7.5 सेंटिमीटर x 15 सेंटिमीटर किंवा 10 सेंटिमीटर x 12.5 सेंटिमीटर ह्या अंतरावर; तर उन्हाळी हंगामासाठी 7.5 सेंटिमीटर x 10 सेंटिमीटर किंवा 7.5 सेंटिमीटर x 12.5 सेंटिमीटर अंतरावर लागवड करण्याची शिफारस केली आहे. आपल्याकडे बहुतेक जातींची लागवड 30 सेंटिमीटर x 30 सेंटिमीटर अंतरावर केली जाते. बुटक्या जातींची लागवड 10 सेंटिमीटर x 10 सेंटिमीटर अंतरावर; तर मध्यम उंचीच्या जातींची लागवड 15 सेंटिमीटर x 15 सेंटिमीटर अंतरावर करावी.

अँटिहिनम पिकास खते । अँटिहिनम पिकास पाणी व्यवस्थापन ।

इतर फुलझाडांच्या तुलनेत अँटिहिनम या फुलझाडाला खतांची आवश्यकता अतिशय कमी प्रमाणात असते. जास्त प्रमाणात खते दिल्यामुळे या फुलझाडाच्या फुलांच्या प्रतीवर वाईट परिणाम होतो. त्यासाठी रोपांच्या लागवडीनंतर सुमारे एक महिन्याच्या अंतराने प्रत्येक झाडाला प्रत्येकी एक चमचाभर अमोनियम सल्फेट आणि सल्फेट ऑफ पोटॅश ही खते वरखते म्हणून द्यावीत. त्यामुळे झाडाची शाखीय वाढ चांगली होऊन फुलधारणा भरपूर प्रमाणात होते. खत देताना खुरप्याच्या साहाय्याने झाडाच्या बुंध्याजवळ मातीत खत चांगले मिसळावे आणि त्यानंतर झाडाला लगेच पाणी द्यावे.
अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे अँटिहिनमच्या फुलझाडामध्ये निरनिराळ्या प्रकारच्या

विकृती दिसून येतात. नत्राच्या अभावामुळे झाडाची वाढ खुरटी होते आणि पाने पिवळी पडतात. झाडे सडपातळ व कडक बनून बाजूच्या फांद्या आखूड राहतात. स्फुरदाच्या अभावामुळे झाडाची वाढ खुंटते. कोवळी पाने गर्द हिरवी बनतात आणि पानांची टोके खाली व मध्य खोडाकडे वळतात. पालाशाच्या अभावामुळे कोवळ्या पानांतील शिरांच्या मधला भाग पिवळा (क्लोरोसीस) बनतो. जुन्या पानांच्या कडा व टोके पिवळी बनतात. कॅल्शियमच्या अभावामुळे रोपांच्या मुळ्या बारीक आणि खुरट्या राहतात. इतर झाडे एक किंवा दोन आठवड्यांत सुकतात आणि मरतात. सल्फरच्या अभावामुळे झाडाची वरची पाने फिकट पिवळसर ते हिरवी राहतात आणि शिरा उर्वरित पानांच्या रंगापेक्षा फिकट दिसतात.
या फुलझाडाच्या योग्य वाढीसाठी वाढीच्या सर्व अवस्थांमध्ये पुरेशा प्रमाणात पाणी देणे आवश्यक आहे. जमिनीचा प्रकार आणि हवामान यांनुसार पाणी देण्याच्या वेळा ठरवाव्यात. या फुलझाडाला सकाळी 8 ते 9 च्या दरम्यान पाणी द्यावे. पाण्याच्या कमतरतेमुळे अँटिनिमच्या कटफ्लॉवर्सची प्रत खालावते. फुलदांड्याची लांबी कमी होते, प्रत्येक फुलदांड्यावरील फुलांची संख्या कमी होते. याशिवाय खोडाची लांबी कमी होते. या फुलझाडाला जास्त पाणी दिल्यामुळे मुळ्यांची कूज होते.

अँटिहिनम पिकातील आंतरमशागत ।

अँटिऱ्हिनम या फुलझाडामध्ये तणनियंत्रण, शेंडे खुडणे व संजीवकाची फवारणी करणे यांसारखी आंतरमशागतीची कामे करावी लागतात.

(1) अँटिहिनम पिकातील तणनियंत्रण

अँटिन्हिनमच्या पिकातील तणांचे नियंत्रण विशेषतः झाडांच्या सामान्य वाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेत करणे आवश्यक असते. अँटिन्हिनमच्या झाडाची चांगली वाढ होण्यासाठी 4-5 वेळा निंदणी करावी. तणांच्या नियंत्रणासाठी रासायनिक तणनाशकाचा वापरही करता येतो. त्यासाठी दर हेक्टरी दोन किलो सिमॅझीन (टॅफाझीन) हे तणनाशक 1,000 लीटर पाण्यात मिसळून तणे उगवण्यापूर्वी (जुलै महिन्यात) जमिनीवर फवारावे. फवारणी करतेवेळी जमिनीत पुरेशा प्रमाणात ओलावा असणे आवश्यक आहे. या पद्धतीने तणांचे चांगले नियंत्रण करता येते. याशिवाय मूळ फुलझाडाला कोणत्याही प्रकारची इजा होत नाही.

(2) अँटिहिनम पिक शेंडे खुडणे (पिंचिंग)

अँटिहिनमच्या झाडांना आधार देण्याची आवश्यकता नसते. अँटिहिनमच्या झाडांचे शेंडे खुडल्यामुळे झाडाच्या फांद्यांची आणि फुलांची संख्या वाढते. हे काम झाडाच्या वाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेत आणि फुलधारणा होण्यापूर्वी करावे. त्यामुळे फांद्या मजबूत बनतात. झाडांचे शेंडे खुडल्यामुळे झाडांची उंची कमी होते; परंतु फुलदांड्यांची (स्पाईक) संख्या वाढते. काही शेतकरी झाडाची झुडपी वाढ होण्यासाठी मुख्य खोडाचा शेंडा खुडतात. त्यानंतर झाडाच्या बाजूच्या फांद्या सुमारे 15 सेंटिमीटर लांब वाढल्यानंतर त्या फांद्यांचे शेंडे खुडतात. या फुलझाडाच्या फुलोऱ्यांची संख्या वाढवण्याऐवजी उंच झाडे हवी असल्यास या फुलझाडा शेंडे खुडण्याची आवश्यकता नसते.

(3) अँटिहिनम पिकासाठी संजीवकांची फवारणी ।

अँटिहिनम या फुलझाडांच्या रोपांची लागवड केल्यानंतर 17 दिवसांनी 20 पीपीएम तीव्रतेच्या आयएए या संजीवकाची एक फवारणी केली असता शाखीय वाढीत सुधारणा होऊन फुलधारणा उशिरा होते; परंतु 60 पीपीएम तीव्रतेच्या आयएए संजीवकाची फवारणी केल्यास शाखीय वाढीला प्रतिबंध होऊन फुलधारणा लवकर होते.
अँटिहिनमच्या फुलझाडावर जीए 3 या संजीवकाची फवारणी केल्यास या फुलझाडांची उंची वाढते आणि फुलाच्या दांड्याची लांबी वाढते. इथेपॉनच्या 1,000 पीपीएम तीव्रतेच्या फवारणीमुळे अँटिहिनमच्या झाडांची उंची कमी होते. 50 ते 1,200 पीपीएम तीव्रतेच्या सीसीसी या संजीवकाची अँटिन्हिनमच्या झाडांवर फवारणी केली असता फुलोऱ्यातील फुलांची संख्या वाढते. रोपांच्या लागवडीपासून 4 आठवड्यांनी आणि त्यानंतर एक महिन्याने 250 ते 2,000 पीपीएम तीव्रतेच्या साध या संजीवकाची फवारणी केल्यास झाडांची उंची कमी होते आणि फुलधारणा उशिरा होते. मात्र फुलोऱ्यातील फुलांची संख्या वाढते.

अँटिहिनम पिकावरील महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण ।

इतर फुलझाडांची तुलना करता अँटिहिनमच्या झाडावर किडींचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो. या फुलझाडावर मावा, लाल कोळी, उंटअळ्या व घाटेअळ्या प्रामुख्याने आढळून येतात.

मावा :

ही कीड पानाच्या खालच्या बाजूने आणि कोवळ्या फुटीच्या शेंड्यावरील पानांमधून रस शोषण करते. यामुळे पाने विकृत आकाराची व फिकट रंगाची बनतात.

उपाय : या किडीच्या नियंत्रणासाठी 10 लीटर पाण्यात 20 मिलिलीटर मॅलॅथिऑन (50% प्रवाही) किंवा 20 मिलिलीटर मिथिल डिमेटॉन मिसळून 10 दिवसांच्या अंतराने 4 ते 5 वेळा झाडावर फवारणी करावी.

लाल कोळी :

या किडीपासून प्रामुख्याने कोरड्या हवामानात पिकाला जास्त प्रमाणात उपद्रव होतो. हे किडे पानाच्या मागील बाजूस जाळी तयार करून त्यात राहतात आणि पानांतील तसेच फुलांच्या पाकळ्यांतील अन्नरस शोषून घेतात. त्यामुळे पानांवर पिवळसर तपकिरी डाग पडून पाने निस्तेज होतात.
उपाय : या किडीच्या नियंत्रणासाठी 10 लीटर पाण्यात 15 मिलिलीटर डिकॉफॉल (18.5% प्रवाही) मिसळून तयार केलेल्या द्रावणाच्या दर आठ दिवसांच्या अंतराने 3 ते 4 फवारण्या कराव्यात.

घाटे अळी :

आपल्या देशात अँटिहिनमच्या फुलझाडावर घाटेअळ्यांचा मोठ्या प्रमाणात उपद्रव होतो. या अळ्या फुलांच्या कळ्या, फुले आणि शेंगा यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करतात. यामुळे फुलांची प्रत आणि बियांच्या उत्पादनावर दुष्परिणाम होतो.
उपाय : या किडीच्या नियंत्रणासाठी 10 लीटर पाण्यात 20 मिलिलीटर एन्डोसल्फॉन (35% प्रवाही) या प्रमाणात मिसळून फुलझाडावर फवारणी करावी.

अँटिहिनम पिकावरील महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण

रोपे मरणे :

हा रोग बुरशीमुळे होतो. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे रोपवाटिकेतील रोपे मलूल होऊन कोलमडतात आणि शेवटी मरतात. जमिनीत जास्त ओलावा व जास्त तापमान असलेल्या परिस्थितीत या रोगाचा उपद्रव वाढतो.
उपाय : रोपवाटिकेत स्वच्छता राखल्यास या रोगाला काही प्रमाणात आळा बसतो. या रोगाच्या प्रतिबंधासाठी रोपे तयार करण्यापूर्वी जमीन निर्जंतूक करावी. त्यासाठी 10 लीटर पाण्यात 40 ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड किंवा कॅपटान हे बुरशीनाशक मिसळून तयार केलेल्या द्रावणाने गादीवाफे भिजवून घ्यावेत.

अँथँक्नोज :

सामान्यपणे हरितगृहामध्ये ह्या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आढळून येतो. या रोगामुळे खोडावर व पानावर फिकट पिवळसर हिरव्या रंगाचे करडे ठिपके पडतात. या ठिपक्यांभोवती लहान किनार असते.
उपाय : या रोगाच्या नियंत्रणासाठी 10 लीटर पाण्यात 26 ग्रॅम डायथेन एम-45 (78% प्रवाही) किंवा 40 ग्रॅम कॅपटान ( 50% प्रवाही) हे बुरशीनाशक मिसळून तयार केलेल्या द्रावणाची खोडावर व पानांवर फवारणी करावी. तसेच पानांचा रोगट भाग काढून नष्ट करावा.

करपा रोग :

या रोगामुळे पानांवर फिकट तपकिरी रंगाचे ठिपके पडतात. झाडाच्या खोडावर राखेसारख्या करड्या रंगाचे ठिपके पडतात. या रोगाचा प्रामुख्याने उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येतो.
उपाय : या रोगाच्या नियंत्रणासाठी 10 लीटर पाण्यात 26 ग्रॅम डायथेन एम-45 किंवा 20 ग्रॅम बाविस्टीन मिसळून तयार केलेल्या द्रावणाची झाडावर फवारणी करावी.

पानांवरील ठिपके :

या रोगामुळे पानांवर लहान गोलाकार, मध्यभागी फिकट जांभळट तपकिरी कडा असलेले ठिपके पडतात.
उपाय : या रोगाच्या नियंत्रणासाठी झाडाची रोगग्रस्त वाळलेली पाने खुडून गोळा करावीत व त्यांचा नाश करावा. झाडावर 10 लीटर पाण्यात 26 ग्रॅम डायथेन एम-45 (78% प्रवाही) मिसळून तयार केलेल्या द्रावणाची फवारणी करावी.

तांबेरा :

हा रोग शेतात उघड्यावर व हरितगृहात आढळून येतो. रोगग्रस्त झाडाच्या पानांवर आणि खोडावर तपकिरी पुरळ दिसून येतात. कोरड्या हवामानात या रोगाची तीव्रता जास्त असते. त्यामुळे झाडाचे खोड अशक्त होऊन खाली वाकते.
उपाय : या रोगाच्या नियंत्रणासाठी तांबेरा प्रतिबंधक जातींची लागवड करावी. रोगाच्या नियंत्रणासाठी 10 लीटर पाण्यात 27 ग्रॅम वेटासुल किंवा सल्फेक्स हे पाण्यात मिसळणारे गंधक (70-80% प्रवाही) आणि 26 ग्रॅम डायथेन झेड-78 (78% प्रवाही) हे बुरशीनाशक मिसळून तयार केलेल्या द्रावणाची झाडावर फवारणी करावी.

भुरी रोग

या रोगामुळे झाडाच्या कोवळ्या खोडावर आणि पानांच्या दोन्ही बाजूंवर पांढऱ्या रंगाची भुकटी दिसून येते. बुरशीच्या भुकटीचे आवरण दिसून येते. कोरडी जमीन व अतिदमट हवामान अशा परिस्थितीत या रोगाची तीव्रता जास्त असते.

उपाय : या रोगाच्या नियंत्रणासाठी 10 लीटर पाण्यात 27 ग्रॅम वेटासुल किंवा सल्फेक्स किंवा 21 ग्रॅम कॅराथेन (70% प्रवाही) मिसळून तयार केलेल्या द्रावणाची झाडावर फवारणी करावी.

केवडा :

या रोगामुळे पानांच्या खालच्या बाजूवर पिठाप्रमाणे पांढरे चट्टे दिसतात. यामुळे झाडे खुरटी राहून अशक्त बनतात.
उपाय : या रोगाच्या नियंत्रणासाठी 10 लीटर पाण्यात 26 ग्रॅम डायथेन एम-45 (78% प्रवाही) हे बुरशीनाशक मिसळून 15 दिवसांच्या अंतराने झाडावर फवारणी करावी.

विषाणुजन्य रोग :

रोपवाटिकेतील अँटिहिनमच्या रोपांच्या पानांवर मोझाईक या विषाणुजन्य रोगाची लक्षणे दिसून येतात. या रोगाची लक्षणे काकडीवरील मोझाईक रोगाप्रमाणे असतात. या रोगामुळे झाडे कायमची खुरटी राहून पाने लहान होतात.
उपाय : या रोगाच्या नियंत्रणासाठी विषाणुरोगाचा प्रसार करणाऱ्या मावा या किडीचा वेळीच बंदोबस्त करावा. रोगट झाडे उपटून लगेच नष्ट करावीत.

अँटिहिनम फुलांची काढणी, उत्पादन आणि विक्री ।

अँटिऱ्हिनम या फुलझाडाच्या रोपांच्या लागवडीनंतर दीड ते दोन महिन्यांत फुले येऊ लागतात. फुले उमलल्यानंतर 50 ते 60 दिवस या फुलांची शोभा टिकून राहते. कटफ्लॉवर्स म्हणून फुलांचा उपयोग करावयाचा असेल तर सामान्यपणे दांड्यावरील एकतृतीयांश भागावरील फुले उमलल्यानंतर फुलदांड्याची कापणी करतात. फुलदांडे कापताना पूर्ण झाडच कापावे लागते. प्रत्येक झाडावर किमान एक तर जातीनुसार 3 ते 4 फुलदांडे मिळतात. कटफ्लॉवर्सचे उत्पादन घेण्यासाठी जास्त फुलदांडे येणाऱ्या जाती अधिक किफायतशीर असतात. या जातींची काढणी करताना तळापासून झाड कापून घ्यावे आणि त्यानंतर तीन रंगांची तीन झाडे एकत्रित बांधून विक्रीसाठी पाठवावीत. यामुळे चांगला बाजारभाव मिळतो. बंगलोरच्या हवामानात या फुलझाडाला वर्षातून दोन वेळा म्हणजे सुरुवातीला डिसेंबर ते जानेवारी आणि त्यानंतर ऑगस्ट ते सप्टेंबर या काळात फुले येतात. अँटिन्हिनमच्या झाडावरील रंग उतरलेला फुलोरा (स्पाईक) मधूनमधून काढून टाकावा. त्यामुळे बीजधारणा होत नाही व फुलधारणेचा अवधी लांबतो. सामान्यपणे एकतृतीयांश भागावरील फुलदांड्याची फुले उमलल्यावर काढणी केली जात असली तरी परदेशातील काही शेतकरी फुलोऱ्यातील एक किंवा दोन फुले उघडल्यानंतर फुलदांड्याची कापणी करतात. त्यानंतर फुलांची प्रतवारी फुलोऱ्याची लांबी, दांड्याचे वजन आणि दांड्यावरील उघडलेली फुले यांनुसार करतात. अँटिहिनमच्या फुलांच्या हाताळणीत फुले गळणे आणि फुलोऱ्याचा दांडा वाकणे या दोन समस्या आहेत. फुलांभोवतीच्या वातावरणात इथिलीन वायूचे प्रमाण जास्त असल्यास फुले गळतात. हे टाळण्यासाठी इथिलीन वायूला प्रतिबंध करणाऱ्या रायझोबिटॉक्सिनसारख्या रसायनाची फुलावर पूर्वप्रक्रिया करावी. अँटिहिनमच्या फुलांच्या कापणीनंतरच्या हाताळणी फुलोऱ्याचा शेंडा वाकणे ही महत्त्वाची समस्या असते. असे वाकलेले फुलदांडे वाहतुकीसाठी सोयीचे नसतात. फुलोऱ्याचे दांडे ताठ उभे न ठेवता इतर स्थितीत ठेवल्यास फुलदांडे वाकण्याचे प्रमाण जास्त असते. म्हणून काढणीनंतर फुलदांडे नेहमी उभे ठेवावेत.
अँटिहिनमच्या फुलांची पुष्परचना करण्यासाठी आणि पुष्पगुच्छ बनविण्यासाठी वर्षभर विक्री होते. ग्राहकांना पिवळ्या आणि गुलाबी रंगाची अँटिन्हिनमची फुले जास्त पसंत असतात. अँटिहिनमच्या फुलांची काढणी केल्यानंतर समान आकाराचे फुलांचे 12 दांडे एका जुडीत बांधतात. वाहतुकीमध्ये या जुड्या उभ्या ठेवतात. अन्यथा शेंडे वाकतात. अशा फुलदांड्यांना बाजारात कमी मागणी असते.

अँटिहिनम फुलांची साठवण ।

अँटिहिनमची फुले फुलदाणीत नळाच्या पाण्यात किंवा शुद्ध (डिस्टिल्ड) पाण्यात सुमारे एक आठवडा चांगली टिकतात. फुलदाणीतील पाण्यात संरक्षक रसायन वापरल्यास अँटिनिमची फुले 2 ते 3 आठवडे चांगली टिकतात. त्यासाठी फुलदाणीत 300 पीपीएम 8- हायड्रॉक्सी क्विनोलीन सायट्रेट आणि 1.5 % सुक्रोजचे द्रावण वापरावे. प्रकाश आणि संरक्षक रसायनांमुळे उमललेल्या फुलांचा रंग चांगला खुलतो. मात्र अंधारात ठेवलेल्या फुलांचा रंग त्या प्रमाणात खुलत नाही.

सारांश ।

अँटिहिनम हे बहुवर्षायु फुलझाड आहे. या फुलझाडाच्या नैसर्गिक प्रजातींपासून वार्षिक जातींचा विकास केला आहे. अँटिव्हिनमच्या आधुनिक जातींचे उंच (70 ते 100 सेंटिमीटर), मध्यम 50 ते 75 सेंटिमीटर) आणि बुटकी (15 ते 30 सेंटिमीटर) असे तीन मुख्य प्रकार आहेत. या जातींच्या संकरातून विविध रंगांच्या फुलांच्या जाती निर्माण केल्या आहेत.
बागेत विविध उद्देशांसाठी या फुलझाडाची मोठ्या प्रमाणावर लागवड करतात. उंच जाती झुडपात, मिश्र किनारीकरिता आणि पानोळ्याच्या झाडाकरिता लावतात. मध्यम उंचीच्या जाती वाफ्यांत किंवा कुंड्यांत लावतात. उंच तसेच मध्यम उंचीच्या जाती कटफ्लावरसाठी उत्तम आहेत. वाफ्याच्या किनारीवर लावण्यासाठी अँटिहिनमच्या बुटक्या जाती योग्य आहेत. खडकबागेत लावण्यासाठी बुटक्या संकरित जातींचा वापर करतात. अँटिनिमची फुले विविध रंगांची म्हणजे पांढरी, फिकट पांढऱ्या रंगाची व पिवळी आणि त्यांवर गुलाबी, स्कार्लेट, लाल, नारिंगी, विटकरी लाल, इत्यादी विविध रंगांच्या छटा असलेली असतात.
अँटिन्निमची झाडे उत्तम निचऱ्याच्या सुपीक किंवा हलक्या जमिनीत भरपूर सेंद्रिय खते घालून तयार केलेल्या जमिनीत चांगली वाढतात. झाडाच्या उत्तम वाढीसाठी भरपूर सूर्यप्रकाश आवश्यक असतो.

अँटिहिनमच्या फुलझाडाचे बी बारीक असल्यामुळे त्यामध्ये 3 ते 4 पट वाळू मिसळून गादीवाफ्यावर किंवा पसरट कुंडीत (सीड पॅन) बियांची पातळ पेरणी करावी. बियांची पेरणी मैदानी प्रदेशात सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांत आणि कमी पावसाच्या प्रदेशात जून-जुलै महिन्यांत करतात तर डोंगरी प्रदेशात फेब्रुवारी-मार्च किंवा ऑगस्ट-सप्टेंबर या महिन्यांत गादीवाफ्यांवर बियांची पेरणी करतात. बी उगवल्यानंतर रोपांची विरळणी करून गादीवाफ्यांवरील रोपे 7 ते 8 सेंटिमीटर उंचीची झाल्यावर योग्य अंतरावर रोपांची लागवड करावी. बियांच्या पेरणीपूर्वी बियांवर 1 लीटर पाण्यात 4 ग्रॅम थायरम किंवा 1 लीटर पाण्यात 10 ग्रॅम कॅपटान (50%) मिसळून तयार केलेल्या द्रावणाची बीजप्रक्रिया करावी.

बंगलोर व पुण्यासारख्या सौम्य हवामानाच्या प्रदेशात वर्षातून कमीत कमी दोन हंगाम मिळतात. पहिला हंगाम डिसेंबर-जानेवारी महिन्यांत असतो आणि दुसरा हंगाम ऑगस्ट- सप्टेंबर महिन्यांत असतो. रोपाच्या लावणीपासून साधारणपणे अडीच ते चार महिन्यांनी अँटिन्हिनमला फुलधारणा सुरू होते.

अँटिहिनमला जास्त प्रमाणात खते दिल्यामुळे फुलांची प्रत खालावते. हलक्या जमिनीसाठी प्रत्येक झाडाला रोपांच्या लागवडीपासून एक महिन्याच्या अंतराने प्रत्येकी एक चमचाभर अमोनियम सल्फेट ऑफ पोटॅश ही वरखते द्यावीत. त्यामुळे झाडाची शाखीय वाढ व फुलधारणा चांगली होते. अँटिव्हिनमला जास्त पाणी देण्याचे टाळावे. कारण त्यामुळे मुळ्यांची कूज होते. अँटिहिनमच्या मुख्य खोडाचा शेंडा खुडल्यामुळे झाडाची झुडपी वाढ होते. याशिवाय बाजूच्या फांद्या 15 सेंटिमीटर लांबीच्या वाढल्यानंतर त्यांचे शेंडे खुडतात.

त्यामुळे झाडे आणखी झुडपी बनतात. यामुळे फुलोऱ्यांची (स्पाईक) संख्या वाढते. परंतु झाडांची उंच वाढ आणि फुलांची चांगली प्रत हवी असल्यास झाडांचे शेंडे खुडू नयेत.
अँटिहिनमवर तांबेरा या रोगाचा जास्त प्रादुर्भाव दिसून येतो. त्याच्या नियंत्रणासाठी उपलब्ध असलेल्या तांबेरा प्रतिकारक जातींची लागवडीसाठी निवड करावी.

जाणून घ्या डेझी लागवड बद्दल संपूर्ण माहिती तेही एका क्लीक मध्ये (Deji flower Lagwad Mahiti Deji Sheti) – Deji Farming

Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )