।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।
अपरा एकादशी किंवा अचला एकादशी (Apara Ekadashi or Achala Ekadashi)
॥ ॐ नमो नारायणाय ॥
॥ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॥
श्री विष्णू सहस्रनाम पठण – Shree Vishnu Sahasranama Pathan
सोमवार दि. ०३ जून २०२४ रोजी वैशाख मासातील कृष्ण पक्षातील अपरा एकादशी आहे. ह्या एकादशीला अचला एकादशी म्हणून सुद्धां संबोधले जाते. प्रत्येक एकादशी व्रताला अनन्य साधारण महत्व आहे. तसेच या एकादशीलाही महत्व आहे. नावातच एकादशीचं महत्व विशद केले आहे. अपार फळ देणारी, अपार धन, मान – सन्मान देणारी सर्वत्र अपार विजय देणारी तसेच महापापविनाशिनी अशा ह्या एकादशीला श्री विष्णूची पूजा, श्री विष्णू सहस्रनाम पठण करावे. अपार धन देणारी, पापांचं क्षालन करणारी, केदारनाथ तसेच बद्रिनाथाचं दर्शन घेतल्याईतके पुण्य ह्या एकादशीला केलेल्या साधनेमुळे प्राप्त होतं. ह्या एकादशीला श्री विष्णूंच्या वामन अवताराची पूजा केली जाते.
वैष्णवांची एकादशी ०३ जून रोजी आहे. जरी एकादशी पहाटे ०२. ४३ ला विश्राम पावत असली तरी द्वादशी युक्त एकादशी श्री विष्णू भगवन्ताला स्वीकारार्ह आहे. त्यामुळे भागवतांनी ०३ जून ला एकादशी करायची आहे आणि स्मार्त संप्रदायानी २ जूनला एकादशी करायची आहे असे शास्त्र सांगते
तेव्हा आपण सर्वांनी ह्या एकादशीला श्री विष्णू सहस्रनामाची जास्तीत जास्त आवर्तने करून श्री विष्णूंची सेवा करु या. सकाळ पासून ते रात्री पर्यंत आपण आपल्या सोयीच्या वेळेत आपापल्या घरीच राहून ही आवर्तने करायची आहेत. एकाच बैठकीत सर्व आवर्तने करावीत असे बंधन नाही. पण दिवस भरात जेव्हा सवड असेल तेव्हा तेव्हा ही आवर्तने करायची आहेत.
वैशाख व. एकादशी
अपरा एकादशी – Apara Ekadashi
हे एकादशी व्रत करणार्याने दशमीच्या दिवशी जव, गहू, मूग आदी पदार्थ असलेले भोजन एकवेळ करावे. एकादशी दिवशी प्रात:स्नानादी नित्यकर्मे करून उपवास करावा व द्वादशी दिवशी पारणे करून जेवावे. या एकादशीचे ‘अपरा’ असे नाव आहे.
या व्रताच्या आचरणाने अपार पापे दूर होतात. जे चांगले वैद्य असूनही गरिबांना औषध देत नाहीत, दशग्रंथी विद्वान असूनही अनाथ मुलांना शिकवत नाहीत, चांगले शासक (राजा) असूनही प्रजेचा सांभाळ करीत नाहीत, बलवान असूनही दीनदुबळ्यांना संकटमुक्त करत नाहीत आणि श्रीमंत असूनही संकटग्रस्त कुंटुबांना मदत करीत नाहीत, ते नरकात जाण्यासच योग्य असतात. परंतु ‘अपरा’ एकादशीचे व्रत केले असता त्याच्या प्रभावाने ते देखील वैकुंठाला जातात.
अपरा एकादशी कथा Apara Ekadashi Story
युधिष्ठिर म्हणाला, ‘जनार्दना, वैशाख कृष्ण पक्षात जी एकादशी येते तिचे नाव काय व महात्म्य काय? हे ऐकण्याची मला इच्छा आहे. तेव्हा ते सर्व सांग.’
श्रीकृष्ण म्हणाले, ‘राजा तू लोकांचे कल्याण व्हावे म्हणून चांगला प्रश्न विचारला आहेस. या एकादशीचे नाव अपरा असून ती अपार फल देणारी आहे. राजा, ती खूप पुण्य देणारी असून महापातकांचाही नाश करते. जो या अपरा एकादशीचे व्रत करतो त्याला या जगात खूप कीर्ती लाभते. या अपरा एकादशीचे व्रत केल्यामुळे ब्रह्महत्येचे पाप केलेला, गोत्राचा नाश करणारा, गर्भहत्या करणारा, खोटे आरोप करणारा, परस्त्रीवर भाळणारा, अशा सर्वांची पापे निश्चितपणे नाहीशी होतात. खोटी साक्ष देणारे, खोटा तराजू वापरणारे, खोटी वजने वापरणारे, लबाडीने वेदाध्ययन करणारा, लबाडीने गणित करणारा ज्योतिषी, लबाडीने खोटी चिकित्सा करणारा वैद्य, हे सर्वजण खोटी साक्ष देणार्या इतकेच दोषी असतात आणि ते नरकात जातात. राजा, परंतु या लोकांनी जर अपरा एकादशीचे व्रत केले तर त्यांची त्या त्या पापातून मुक्तता होते.
जो क्षत्रिय आपला क्षात्रधर्म सोडून युद्धातून पळ काढतो, तो आपल्या धर्मातून भ्रष्ट होऊन घोर नरकात पडतो. परंतु त्याने जर अपरा एकादशी केली तर तो त्या पापातून मुक्त होऊन स्वर्गाला जातो. जो शिष्य गुरूकडून विद्या मिळवल्यावर त्याची निंदा करतो त्याला महापातक लागते. आणि त्याला दारुण नरकवास प्राप्त होतो. परंतु त्याने अपरा एकादशीचे व्रत केल्यास त्या माणसाला सद्गती लाभते. तीन प्रकारच्या पुष्कर तीर्थात कार्तिक मासात स्नान केल्याने जे पुण्य मिळते, तेच पुण्य ही एकादशी केल्यामुळे मिळते.
तसेच माघ मासात मकर संक्रातीला प्रयाग क्षेत्रात स्नान केल्याचे पुण्य, काशी क्षेत्रात शिवरात्रीचा उपवास केल्याचे पुण्य, सर्व सुवर्ण दान दिल्यामुळे मिळणारे पुण्य, अशी सर्व दाने, तसेच गुरू ग्रह, सिंह राशीत आला असता गोदावरीत स्नान केल्याचे पुण्य, कुंभ संक्रातीला बद्रिकेदारला दर्शन घेतल्याचे पुण्य, बद्रिनारायणाची यात्रा केल्याचे व तेथील तीर्थ सेवनाचे पुण्य, अशी सर्व पुण्ये या एकाच अपरा एकादशीचे व्रत केल्याने मिळत असतात.
कुरुक्षेत्रात सूर्यग्रहणाच्या वेळी स्नान केल्याने मिळणारे पुण्य हत्ती, घोडा, सोने दान दिल्याने मिळणारे पुण्य; यज्ञामध्ये आपले सर्व सुवर्ण दान दिल्यामुळे पुण्य, अशी सर्व पुण्ये या अपरा एकादशीच्या व्रताने मिळतात.
अर्ध प्रसूत गाईचे दान देऊन किंवा सुवर्णदान देऊन किंवा पृथ्वी दान देऊन जे पुण्य मिळते तेच पुण्य या एकादशीच्या व्रतामुळे मिळते.
अपरा एकादशीचे हे व्रत म्हणजे पापरूपी वृक्षाचा छेद करणारी कुर्हाड आहे. पापरूपी इंधन जाळणारा, रानातला वणवा आहे. किंवा पापरूपी अंधकार नाहीसा करणारा सूर्य आहे किंवा पापरूप हरीण खाऊन टाकणारा सिंह आहे.
‘राजा, ज्याला पापाची भीती वाटत असेल, त्याने ही एकादशी करावी. जे लोक एकादशीव्रत करीत नाहीत, ते पाण्यावरच्या बुडबुड्याप्रमाणे निरर्थक जन्माला येतात, किंवा लाकडाच्या बाहुलीप्रमाणे केवळ मरणासाठीच जन्मलेले असतात.
अपरा एकादशीचे उपोषण करुन जो मनुष्य त्रिविक्रम देवाची पूजा करतो. तो सर्व पापातून मुक्त होऊन विष्णुलोकाला जातो.
धर्मराजा, ही कथा लोकांच्या कल्याणाकरता मी तुला सांगितली आहे. ही कथा वाचली किंवा ऐकली तरीही सर्व पापातून मुक्तता होते.
॥ब्रह्मांडपुराणातील अपरा एकादशीचे महात्म्य संपूर्ण झाले॥
॥श्रीकृष्णार्पणमस्तु॥
॥ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॥
विष्णुमूल मंत्र
ॐ नमो नारायणाय ॥
भगवते वासुदेवाय मंत्र | ओम नमो: भगवते वासुदेवाय
विष्णु गायत्री मंत्र
ओम श्री विष्णुवे च विद्महे वासुदेवाय धीमही । तन्नो विष्णुः प्रचोदयात् ।
श्री विष्णु मंत्र
मंगलम् भगवान विष्णु, मंगलम् गरुध्वज. मंगलम् पुंद्रीक्षा, मंगलय तनो हरी
अपरा एकादशी व्रताचे फायदे :
- अपरा एकादशी व्रत केल्याने व्यक्तीला अपार पुण्य आणि आनंद प्राप्त होतो.
- अपरा एकादशीचे व्रत केल्याने मनुष्याला ब्रह्महत्या, निंदा आणि दुष्ट आत्म्यांसारख्या सर्व पापांपासून मुक्ती मिळते.
- एकादशीचे व्रत केल्याने मानसिक शांती मिळते.
- अपरा म्हणजे अपार, म्हणूनच या दिवशी उपवास केल्याने अपार संपत्ती मिळते.
- या एकादशीचे व्रत केल्याने माणूस जगात प्रसिद्ध होतो.
- धार्मिक श्रद्धेनुसार, गंगा नदीच्या तीरावर पितरांना पिंडदान अर्पण केल्याने, कुंभ किंवा बद्रीनाथमध्ये केदारनाथला जाऊन, सूर्यग्रहणाच्या वेळी सोन्याचे दान केल्याने जे फळ मिळते, तेच फळ अपरा एकादशीच्या उपवासानेही प्राप्त होते.