आरोग्यदायी आपट्याची पाने (Apta Leaves)

।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।

आपट्याची पाने. (Apta Leaves)

विजयादशमी या दिवशी आपट्याच्या झाडाची पाने सोने म्हणून एकमेकांना वाटून दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या जातात… विजयादशमीच्या दिवशी आपट्याची पाने ‘सोने’ म्हणून लुटण्याविषयी अनेक कथा प्रचलित आहेत. पण, या आपट्याच्या पानाचे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व फार कमीजणांना ठाऊक आहे. तेव्हा, आज दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ही आपट्याची पाने किती गुणकारी आहेत, याची माहिती करुन घेऊया…..

आपटा ही एक अत्यंत बहुगुणी औषधी वनस्पती असून या झाडाची पाने, शेंगांच्या बिया, फुले, साल औषध म्हणून वापरली जाते… आपट्याच्या सालीपासून दोरखंडही बनवले जातात. तसेच आपट्याच्या झाडापासून डिंकही मिळतो. आपट्याला ‘अश्मंतक’ म्हणूनही ओळखले जाते. ‘अश्मंतक’ म्हणजे दगडाचा, खडकाचा नाश करणारा. अशा या आपट्याची मुळे जमिनीत खोलवर रुजतात. ही मुळे खडकाच्या फटीत शिरून वाढतात, कालांतराने फटी मोठ्या होऊन खडक फुटतात. त्यामुळे खडकाळ, उघड्या टेकड्यांवर हमखास आपट्याच्या झाडाची लागवड केली जाते. तसेच ‘अश्मंतक’ याचा दुसरा अर्थ मुतखडा होऊ न देणारा किंवा तो जिरवणारा. धन्वंतरीने ‘निघण्टू’मध्ये आपट्याच्या झाडाचे आणखी औषधी उपयोग विशद केले आहेत…..

अश्मन्तक महावृक्ष महादोष निवारण । इष्टानां दर्शनं देही कुरू शत्रुविनाशनम् ॥

या श्लोकानुसार, आपट्याचे झाड हे महावृक्ष असून ते अनेक महादोषांच्या निवारणाचे काम करते… इष्ट(देवतेचे) दर्शन घडवितो व शत्रूंचा विनाश करतो. अशाप्रकारे पुराणांमध्ये आणि आयुर्वेदातही आपट्याच्या झाडाचे वैद्यकीय दृष्टिकोनातून महत्त्वाचे संदर्भ आढळतात…..

पित्त-कफदोषावर गुणकारी ।

अश्मन्तकः कषायस्तु हिमः पित्तकफापहः। मधुरः शीतसंग्राही दाहतृष्णाप्रमेहजित् ॥

म्हणजेच आपट्याची पाने ही पित्त आणि कफदोषांवर गुणकारी आहेत… दाह, तृष्णा आणि प्रमेह यांच्यावर विजय मिळण्यासाठी आपट्याची पाने उपयोगी ठरतात…..

लघवीवरील जळजळीवर रामबाण उपाय ।

लघवीच्या वेळी खूप जळजळ होत असल्यास आपट्याच्या पानांचा हमखास चांगला परिणाम दिसून येतो… आपट्याची पाने शुष्क असल्यामुळे त्यांचा रस निघत नसल्यामुळे ही पाने पाण्यात घालावी व मग ओली पाने नीट वाटून घ्यावी. या रसामध्ये त्याच प्रमाणात दूध व साखर टाकावी आणि तयार काढ्याचे दिवसातून चार-पाच वेळा सेवन करावे. यामुळे लघवीच्या वेळी होणारी जळजळ थांबण्यास मदत होते. आपट्याच्या शेंगा मूत्रल असल्यामुळे पाण्यात उकळून साखरेबरोबर दिवसातून दोन-तीन वेळ प्यायल्याने लघवी स्वच्छ होते व इतर त्रासही उद्भवत नाही

जखमेवर गुणकारी ।

त्वचेवर जखम झाल्यास, व्रण उठल्यास त्यावर आपट्याची साल बांधण्याचा सल्लाही आयुर्वेदिक डॉक्टरांकडून दिला जातो… आपट्याच्या सालीचा काढा थंड झाल्यानंतर त्यामध्ये मध टाकून सेवन करावा. यामुळे जीर्ण व्रण बरे होतात…..

पोटाच्या विकारांवरील औषध ।

केवळ आपट्याचे पानच नाही, तर आपट्याच्या बियाही तितक्याच उपयोगी आहेत… या बियांचे बारीक चूर्ण करावे. ते चूर्ण गाईच्या तुपात घोटून त्याचे मलम तयार करावे. ही मलम मग कीटकांचा दंश झालेल्या ठिकाणी लावल्यानंतर बरे वाटते. आपट्याच्या बीयुक्त घृताचे सेवन केल्यास कृमी शौचावाटे बाहेर पडतात. मधाबरोबर आपट्याच्या सुक्या फुलांचे चूर्ण १० ग्रॅम साखरेबरोबर घेतल्यास पोटातील मुरडा बरा होतो

गालगुंड व कंठरोग ।

गंडमाळा, गंडरोग, गालगुंड व कंठरोग झाला असल्सास आपट्याच्या सालीचा अर्धा लिटर पाण्यात अष्टमांश काढा मंदाग्नीवर शिजवून घ्यावा… तो थंड झाल्यावर त्यामध्ये मध घालावा. तसेच गंडमाळेवर आपट्याची साल बांधावी. असे केल्यास गंडमाळा व गळ्याचे व्रण बरे होण्यास मदत होते…..

विंचवाचे विष उतरवण्यासाठी ।

शरीरावर विंचू चावल्यास त्यावरून आपट्याची शाखा फिरवायला सांगितले जाते… असे केल्यास विंचवाचे विष उतरते. पण, तरीही अशा घटनांमध्ये इस्पितळ गाठणे केव्हाही योग्यच…..

हृदयाची सूज ।

आपट्याच्या मुळाची साल ही हृदयाची सूज कमी करण्यास मदत करते… आपट्याच्या मुळाची साल पाण्यात उकळावी व ते मिश्रण गाळून प्यावे…

Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )