पद्मा एकादशी,महाएकादशी,आषाढी एकादशी,शयनी एकादशी
।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।
आषाढी एकादशी ( Ashadi Ekadashi ):
दर महिन्यात शुक्ल पक्षात एक व क्रुष्ण पक्षात एक अशा दोन एकादश्या असतात.म्हणजेच वर्षात चोवीस एकादश्या.अधिक महिना आला तर त्याच्या दोन एकादश्या वाढतात.
या एकादश्यांत आषाढ महिन्यात व कार्तिक महिन्यात येणाऱ्या एकादशींना खास महत्त्व आहे.
आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला महाएकादशी म्हणतात.पद्मा एकादशी,आषाढी एकादशी,शयनी एकादशी या नावांनीही संबोधली जाते.
या दिवशी सूर्य मिथून राशीत प्रवेश करतो.या आषाढी एकादशी दिवशी,श्रीहरी विष्णू त्यांच्या शेषनागावर
झोपतात.यादिवसापासून चार महिने म्हणजे कार्तिक महिन्यातील एकादशीपर्यंत झोपतात.
म्हणून या एकादशीस शयनी एकादशी असेही म्हणतात. दोन महिन्यानंतर भाद्रपद मासात ते कुस बदलतात म्हणून भाद्रपदातल्या शुक्ल पक्षातील एकादशीला परिवर्तनी एकादशी म्हणतात.
तर कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला ते उठतात.म्हणून त्या एकादशीला प्रबोधिनी एखादशी म्हणतात.
या कालावधीस चातुर्मास असे म्हणतात.
यासंदर्भात पुराणात कथा आहे.
म्रुदुमान्य नावाचा राक्षस भोळ्या शंकराची उपासना,भक्ती करतो व शंकराकडून तो अमरत्वाचा वर प्राप्त करतो.
म्रुदुमान्य उद्दाम,उन्मत्त होतो.
तो सर्व देवांवर चालून जातो.
ब्रह्मा,विष्णू व महेश त्या राक्षसापासून आपला बचाव करण्यासाठी एका गुहेत लपतात.
म्रुदुमान्यला याबाबतचा सुगावा लागतो.
तो त्या गुहेच्या दारापाशी येतो.
त्याच्या अवाढव्य शरीरामुळे तो गुहेत प्रवेश करु शकत नाही.
तो तिथेच गुहेबाहेर उभा रहातो.
तीन दिवस झाले तरी हे त्रिदेव(अनिल कपूरचा त्रिदेव नाही हं) गुहेतून बाहेर येईनात.
या त्रिदेवांच्या तीन दिवसांच्या श्वासोश्वासातून एक देवता बाहेर येते.तिला एकादशी असे संबोधले गेले.
एकादशी या उद्दाम,उन्मत्त राक्षसाचा वध करते
व देवांचे रक्षण करते.हा दिवस आषाढीतला होता व त्या दिवशी पाऊस पडत होता.त्यामुळे देवांना स्नान व उपवास घडतो.म्हणून या दिवशी उपवास करतात.
देवाला उपवासाचा नैवेद्य दाखवतात.
या दिवसापासून चतुर्मास सुरु होतो.पुढे या शब्दाचा अपभ्रंश चातु्र्मास असा झाला. हा चातुर्मास आषाढातील शुक्ल पक्षातील एकादशीला सुरू होतो व कार्तिक महिन्यातील एकादशीला संपतो.
या कालावधीत घरोघरी,मंदिरांत धार्मिक ग्रंथांचे पारायण होते.
लोक स्वत:चे आचरण शुद्ध ठेवण्यासाठी विविध व्रत वैकल्ये या कालावधीत करतात.
ती निर्विघ्न पार पडण्यासाठी श्रीहरीविष्णूची मनोभावे प्रार्थना करतात.
विष्णूला एक हजार किंवा एकशे आठ दुर्वा अर्पण करतात.
एकादशीच्या आधी सुमारे वीस दिवस महाराष्ट्रातील तीर्धक्षेत्रांतून पालख्या पंढरपूरला निघतात.यात लाखोंनी वारकरी सामिल होतात.
शेगावहून गजानन महाराजांची,
आळंदीहून ज्ञानेश्वर माऊलींची, देहुहुन तुकारामांची,पैठणहून संत एकनाथांची,त्र्यंबकेश्वरहून निव्रुत्तीनाथांची पालखी निघते.
या दिंडीत लाखो वारकरी सामिल होतात.
विठूनामाचा गजर करतात.
गळ्यात तुळशीच्या माळा,कपाळाला गंध व मुखामध्ये विठ्ठलनाम.
सारा आसमंत विठ्ठलमय होऊन जातो.
पंढरीच्या वारीतस्त्रीपुरुष,लहानमोठे सगळेच सहमागी होतात.
प्रत्येकजण दुसर्याला माऊली म्हणतो.
काही वारकरी वारीत पाणीवाटप करतात.
काहीजण थकलेल्या वारकर्यांच्या पायाला मालीश करतात.
वारीत तीन उभी व चार गोल रिंगणे होतात.
रिंगण सोहळ्यानंतर उडीचा कार्यक्रम सुंदर असतो.
वारीत सकाळी,दुपारी गायच्या अभंगांचा क्रम व नियम ठरलेला असतो.
आषाढी एकादशीदिवशी हे वारकरी चंद्रभागेतिरी स्नान करतात व आपल्या विठ्ठल रुक्माईचे दर्शन घेतात.
या दिवशी सर्वजण उपवास करतात व देवाला उपवासाचा नैवेद्य दाखवतात.
श्रीहरी विष्णू म्हणजेच नारायण.नारा म्हणजे पाणी व पाण्यात ज्याचे आयन (घर) आहे असा हा आपला विठ्ठल पर्जन्यमय आहे.त्याच्यामुळे ढगातून पर्जन्यधारा बरसतात.तापलेली धरती हिरवीगार होते.शेतं पीकांनी डोलू लागतात.
प्राणीमात्रांना अन्न,पाणी मिळते.सुखसम्रुद्धी व भरभराट होते.