ॲस्टर लागवड । Aster Lagwad | Aster Sheti | ॲस्टर लागवडीचे महत्त्व ।ॲस्टर लागवडी खालील क्षेत्र । ॲस्टर पिक उत्पादन ।ॲस्टर फुलास योग्य हवामान । ॲस्टर फुलास योग्य जमीन । ॲस्टर फुलाच्या उन्नत जाती । ॲस्टर पिकाची अभिवृद्धी । ॲस्टर फुलाची लागवड पद्धती । ॲस्टर फुल पिकास हंगाम । ॲस्टर फुल पिक लागवडीचे अंतर । ॲस्टर फुल पिकास खत व्यवस्थापन । ॲस्टर फुल पिकास पाणी व्यवस्थापन । ॲस्टर फुल पिकावरील महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण । ॲस्टर फुल पिकावरील महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण । ॲस्टर फुल पिकातील तणांचे नियंत्रण । ॲस्टर फुलांची काढणी, उत्पादन आणि विक्री ।
।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।
ॲस्टर लागवड । Aster Lagwad | Aster Sheti |
ॲस्टरच्या फुलझाडाला वेगवेगळ्या रंगांची फुले येतात. अॅस्टरला शास्त्रीय भाषेत कॅलिस्टेपस चायनेनसीस असे म्हणतात. ग्रीक भाषेत कॅलिस्टेपस म्हणजे अत्यंत सुंदर मुकुट असा अर्थ होतो. कटफ्लॉवरसाठी या फुलांना पुणे, मुंबई आणि नाशिक यांसारख्या मोठ्या शहरांतून वर्षभर सतत मागणी असते. अॅस्टरच्या फुलांचे ताटवे अतिशय मोहक दिसतात. गणेशोत्सव, दसरा, दिवाळी, नाताळ या सणांमध्ये या फुलांना विशेष महत्त्व असते. याशिवाय लग्नसराईमध्ये या फुलांना अधिक मागणी असते.
इतर हंगामी फुलझाडांशी तुलना करता ॲस्टरची लागवड सोपी, कमी खर्चाची व कमी कालावधीत पूर्ण होत असल्यामुळे सामान्य शेतकरीसुद्धा या फुलपिकाची लागवड सहज करू शकतो. आपल्याकडे या फुलाला चांगला बाजारभाव मिळतो. महाराष्ट्रातील पुणे परिसरात विशेषतः हवेली, खेड आणि जुन्नर तालुक्यांत या फुलांची शेती केली जात आहे. अॅस्टरच्या फुलशेतीला इतर भागांतही बराच वाव आहे. आधुनिक पद्धतीने अॅस्टरची शेती केल्यास या फुलपिकापासून शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा मिळू शकतो.
ॲस्टर लागवडीचे महत्त्व । Importance of Aster Cultivation.
ॲस्टरच्या फुलांचे कटफ्लॉवर म्हणून जेवढे महत्त्व आहे तेवढेच उद्यानांची शोभा वाढविण्यासाठी ही फुले उपयुक्त आहेत. ॲस्टरची लांब दांड्यांची फुले फुलदाणीत 8 ते 10 दिवस चांगल्या प्रकारे टिकतात. या फुलांपासून उत्तम प्रतीचे गुच्छदेखील तयार करता येतात. म्हणून या फुलांना कटफ्लॉवरसाठी, सणा-उत्सवांच्या दिवसांत, सभा-समारंभामध्ये तसेच मोठ्या शहरांतून व मोठमोठ्या हॉटेल्समधून सजावटीसाठी सतत मागणी असते. अॅस्टरच्या फुलांपासून उत्कृष्ट हार बनविता येतात. तीर्थक्षेत्री आणि समारंभातून या फुलांच्या हारांना विशेष मागणी असते. अॅस्टरच्या फुलांमधील विविध रंगछटांमुळे या फुलझाडांची उद्यानात किंवा इमारतीच्या सभोवतालचा परिसर सुशोभित करण्यासाठी ताटव्यात लागवड करतात. याशिवाय लग्नसमारंभातील स्टेज सजावटीसाठी आणि तोरण बांधण्यासाठी या फुलांचा उपयोग केला जातो.
ॲस्टर लागवडी खालील क्षेत्र । ॲस्टर पिक उत्पादन । Areas under Aster Cultivation. Aster Production.
ॲस्टरचे मूळस्थान चीन हा देश असून तेथून युरोप आणि नंतर इतर देशांत या फुलझाडांचा प्रसार झाला. भारतातील महाराष्ट्र, कर्नाटक आणि पश्चिम बंगाल या राज्यांतून अॅस्टरची व्यापारी तत्त्वावर लागवड केली जाते. महाराष्ट्रात या पिकाखाली 300 हेक्टर क्षेत्र असून त्यातील जवळपास 200 हेक्टर क्षेत्र पुणे जिल्ह्यातील खेड, हवेली आणि जुन्नर तालुक्यांत एकवटलेले आहे. हवेली आणि खेड तालुक्यातील सोलू, मरकळ, च-होली, आळंदी, वडगाव धेनंद आणि रासे आणि जुन्नर तालुक्यातील बल्हाळवाडी, येणेरे, कुसूर, धामणखेल, नारायणगाव या गावांतून अॅस्टरचे पीक खूप मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.
ॲस्टर फुलास योग्य हवामान । ॲस्टर फुलास योग्य जमीन । Suitable climate for aster flower. Land suitable for aster flower.
ॲस्टरचे पीक भरपूर सूर्यप्रकाश, बेताचा पाऊस आणि 20 ते 30 अंश सेल्सिअस तापमान असलेल्या हवामानात चांगले येते. अॅस्टरचे पीक प्रामुख्याने हिवाळी हंगामात घेतले जात असले तरी मध्यम प्रकारच्या सौम्य हवामान असलेल्या ठिकाणी उन्हाळयातसुद्धा हे पीक घेता येते. अॅस्टरच्या पिकाला अतिकडक थंडी, कडक उन्हाळा आणि दीर्घ काळ पडणारा पाऊस अशा प्रकारचे हवामान हानीकारक असते. कोकण व महाबळेश्वरसारख्या जास्त पाऊस पडणाऱ्या भागात खरीप हंगामात, विर्दभातील नागपूर व अकोला यांसारख्या ठिकाणी कडक उन्हाळयात आणि नाशिक परिसरात कडक हिवाळयात ॲस्टरची लागवड यशस्वी होत नाही.
ॲस्टरचे पीक हलक्या, मध्यम प्रतीच्या अथवा सुपीक पोयट्याच्या जमिनीत चांगले येते; परंतु त्यासाठी जमिनीत निचरा चांगला होणे आवश्यक असते. अॅस्टर अगदी हलक्या जमिनीत चांगले वाढू शकते; परंतु भारी, चुनखडीयुक्त आणि अयोग्य निचरा होणाऱ्या जमिनी ॲस्टरच्या लागवडीसाठी योग्य नसतात. ॲस्टरच्या पावसाळी हंगामातील पिकात जास्त काळ पाणी साचून राहिले तर उभे पीक सुकून जाण्याचा धोका असतो.
ॲस्टर फुलाच्या उन्नत जाती । Advanced varieties of Aster flower.
ॲस्टरचे वनस्पतिशास्त्रीय नाव कॅलिस्टेपस चायनेनसीस असे आहे. अॅस्टरच्या झाडाची वाढ, फुलांचा आकार व फुलांतील पाकळ्यांची संख्या यांनुसार सिंगल अथवा डबल प्रकारच्या ॲस्टरच्या अनेक जाती उपलब्ध आहेत. परदेशातील खाजगी कंपन्यांकडून नवनवीन जातींची यामध्ये सतत भर पडत असते. मात्र वर्षानुवर्षे ॲस्टरची शेती करणाऱ्या परिसरात स्थानिक प्रकारच्या जातींचीच मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. अॅस्टरचे स्थानिक प्रकार आणि इतरत्र प्रसिद्ध असलेल्या जाती खालीलप्रमाणे आहेत :
रामकाठी अथवा उभट वाढणारा प्रकार :
या प्रकारातील अॅस्टरच्या फुलझाडांच्या फांद्या सरळ उभट वाढतात. झाडाचा पसारा 1 फुटापर्यंत होतो. झाडे 2 ते 3 फूट उंच वाढतात. लागवडीनंतर या प्रकारच्या जातींना अडीच-तीन महिन्यांत फुले लागतात आणि पुढे 1 महिन्यापर्यंत फुले येत राहतात. फुलांचा व्यास 5 ते 7 सेंमी. एवढा असतो. या प्रकारातील झाडे, फुले उमलल्यावर जमिनीलगत कापून घेतात आणि नंतर कटफ्लॉवरसाठी पाठविली जातात. पुणे परिसरातील आळंदी, सोलू, च-होली, मरकळ, वडगाव धेनंद येथे या प्रकारच्या ॲस्टरची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. या प्रकारातील फुलांमध्ये निळा, जांभळा, गुलाबी, लालसर, पांढरा, इत्यादी रंगांच्या सर्व रंगछटा दिसतात.
पसऱ्या अथवा गरवा प्रकार :
या प्रकारातील फुलझाडांचा पसारा 1.5 ते 2.5 फूट एवढा असून ही झाडे 60 ते 90 सेंमी. उंच वाढतात. या फुलांचा व्यास 5 ते 8 सेंमी. एवढा असतो. या प्रकारातील जातीला लागवडीनंतर अडीच ते तीन महिन्यांनी फुले येतात आणि पुढे 2 महिने फुले फुलत राहतात. या प्रकारातील फुलांची 15 ते 20 सेंमी. लांबीचे देठ ठेवून काढणी करतात. यानंतर फुलांच्या जुड्या बांधून विक्रीसाठी बाजारात पाठविल्या जातात. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात या प्रकारातील अॅस्टरची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. या प्रकारातील फुलांमध्येसुद्धा सर्व प्रकारच्या रंगछटा दिसून येतात…
पावडर पफ प्रकार :
हा एक उभट वाढणारा प्रकार असून इतर ॲस्टरच्या प्रकारांपेक्षा याचे खास वैशिष्ट्य म्हणजे या प्रकारातील जातींची फुले उमलल्यानंतर भरगच्च दिसतात. याचे मुख्य कारण म्हणजे मध्यभागी असलेल्या पूर्ण फुलातील पाकळ्यांची चांगली वाढ होऊन इतर फुलांप्रमाणे मधला भाग उघडा दिसत नाही. या फुलांचा व्यास 6 ते 8 सेंमी. एवढा असून ह्या प्रकारातील झाडे उंच वाढतात. लागवडीनंतर 70 ते 80 दिवसांत या प्रकारातील जातींना फुले फुलू लागतात आणि पुढे एक महिनाभर या फुलांची काढणी चालते. या प्रकारामध्ये निळा, जांभळा, गुलाबी, पांढरा असे रंग असतात. या प्रकारात अॅस्टरच्या सुपर जायंट, अझुरे ब्ल्यू, परफेक्शन परपल, ब्ल्यू स्काय, आस्ट्रीय प्लम ब्ल्यू, रोझ पिंक, स्नो व्हाईट, यलो मारबल अशा अनेक जाती देशी-विदेशी कंपन्यांकडून बाजारात आलेल्या आहेत. पुणे येथील अखिल भारतीय समन्वित पुष्पसुधार योजनेअंतर्गत देश-परदेशातून अठरा विविध प्रकारचे वाण संकरित करण्यात आले आहेत. त्यांच्या तौलनिक अभ्यासातून 5-7 वर्षांच्या संशोधनातून फुले गणेश पांढरा, फुले गणेश गुलाबी, फुले गणेश तांबडा आणि फुले गणेश निळा असे चार वाण प्रसारित करण्यात आले आहेत व आता शेतकरी त्यांची मोठ्या प्रमाणावर लागवड करीत आहेत.
ॲस्टर पिकाची अभिवृद्धी । ॲस्टर फुलाची लागवड पद्धती । Growth of aster crop. Cultivation method of Aster flower.
ॲस्टरची अभिवृद्धी बियांपासूनच करतात. ॲस्टरमध्ये जवळपास 90% स्वपरागीभवन होत असल्यामुळे मोठ्या आकाराच्या निवडक आणि निरोगी फुलांचे बी लागवडीसाठी वापरता येते. अॅस्टरच्या फुलातून बी काढल्यानंतर सुकवून ते बंद डब्यामध्ये ठेवतात. अॅस्टरचे बी उघडे ठेवले तर त्याची उगवणक्षमता फार लवकर कमी होत जाते. एक वर्षांनंतर अॅस्टरचे बी उगवत नाही. म्हणून शक्यतो मागील हंगामात व्यवस्थित साठवून ठेवलेले बी रोपे तयार करण्यासाठी वापरावे. एक हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यासाठी अॅस्टरची चांगली उगवणक्षमता असलेले 700 ते 800 ग्रॅम बी आवश्यक असते.
ॲस्टरची लागवड रोपांपासून करतात. म्हणून लागवडीसाठी रोपे तयार करणे आवश्यक आहे. त्यासाठी पोयटा माती आणि उत्तम कुजलेले शेणखत टाकून आधी वाफे तयार करावेत. प्रत्येक वाफ्यावर 10% क्लोरडेन भुकटी चांगली मिसळावी. गादीवाफ्यावरील रोपांची मर होऊ नये म्हणून लागवडीपूर्वी गादीवाफ्यावर 10 लीटर पाण्यात 25 ग्रॅम ब्लायटॉक्स अथव डायथेन एम-45 हे ताम्रयुक्त बुरशीनाशक मिसळून तयार केलेले द्रावण शिंपून गादीवाफ्य वरचा थर भिजवून घ्यावा. यानंतर दोन ओळींत 10 ते 12 सेंमी. अंतर ठेवून रुंदीला समांतर ओळीत बी पेरावे. जमीन हलकी आणि उत्तम निचऱ्याची असल्यास सपाट वाफ्यामध्ये बी पेरून रोपे तयार केली तरी चालतात. बियांच्या पेरणीपासून साधारणतः 35 ते 40 दिवसांत रोपे लागवडीयोग्य होतात. जास्त वयाची रोपे लागवडीसाठी वापरल्यास पिकाची वाढ चांगली होत नाही. म्हणून रोपांची लागवड योग्य वेळी करावी.
ॲस्टर फुल पिकास हंगाम । ॲस्टर फुल पिक लागवडीचे अंतर । Aster flower season. Aster flower Cultivation Spacing.
ॲस्टर लागवडीचे खरीप आणि रब्बी असे दोन प्रमुख हंगाम पडतात. खरीप हंगामातील पिकाची लागवड जून-जुलै महिन्यात करतात आणि रब्बी हंगामातील पिकाची लागवड ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये करतात. महाबळेश्वरसारख्या जास्त पावसाच्या प्रदेशात पावसाळयात, तर नागपूर व अकोला यालगतच्या परिसरात कडक उन्हाळी हंगामात अॅस्टरची लागवड किफायतशीर ठरत नाही. महाबळेश्वरसारख्या अती पाऊस आणि अती थंडीच्या भागात अॅस्टरचे पावसाळी पीक न घेता उन्हाळी पीक घेतात. उन्हाळी पिकाची लागवड तेथे जानेवारी-फेब्रुवारी या महिन्यामध्ये करतात. सौम्य हवामानात ॲस्टरच्या उन्हाळी पिकाचे उत्पादन कमी येते; परंतु बाजारभाव मात्र चांगला मिळतो. गणेशोत्सव, दसरा, दिवाळी, नाताळ आणि लग्नसमारंभ यांचा विचार करून योग्य वेळी जर या फुलझाडांची लागवड केली तर या फुलांना चांगला बाजारभाव मिळतो.
ॲस्टरच्या लागवडीसाठी 45 ते 60 सेंमी. अंतरावर सऱ्या काढून सरीच्या दोन्ही बाजूंनी 15 ते 20 सेंमी. अंतरावर 4 ते 6 पानांवर आलेल्या रोपांची लागवड करावी. साधारणपणे 35 ते 40 दिवसांनंतर रोपे 4 ते 6 पानांवर येतात. ही रोपे लागवडीसाठी योग्य असतात. लागवडीपूर्वी या रोपांची मुळे कॉपर ऑक्सिक्लोराईडच्या द्रावणात बुडवून लागवड करावी म्हणजे अॅस्टरच्या रोपांना येणारा मर रोग टाळता येतो.
हलक्या जमिनीत रब्बी अथवा उन्हाळी हंगामात सपाट वाफ्यात लागवड केली तरी चालते. कारण त्या वेळी जमिनीत पाणी साचून राहण्याचा धोका नसतो. रोपांची लागवड दुपारी ऊन कमी झाल्यावर अथवा सकाळी लवकर करावी.
ॲस्टर फुल पिकास खत व्यवस्थापन । ॲस्टर फुल पिकास पाणी व्यवस्थापन । Fertilizer management for Aster flower crops. Water management for aster flower crop.
ॲस्टरच्या चांगल्या प्रतीच्या भरपूर उत्पादनासाठी योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात सेंद्रिय खते तसेच रासायनिक खते देणे आवश्यक असते. अॅस्टरच्या लागवडीपूर्वी हेक्टरी 15 ते 25 टन चांगले कुजलेले शेणखत अथवा कंपोस्ट खत जमिनीत चांगले मिसळून द्यावे. लागवडीच्या वेळी हेक्टरी 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश ही रासायनिक खते द्यावीत. लागवडीनंतर एक महिन्याच्या अंतराने हेक्टरी 50 किलो नत्रखत द्यावे.
ॲस्टरची लागवड केल्यानंतर पहिले पाणी एक दिवसाच्या अंतराने आणि दुसरे पाणी चार ते पाच दिवसांनी द्यावे. यानंतर जमिनीचा मगदूर आणि हवामानाचा विचार करून 7 ते 8 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. पावसाळ्यामध्ये या पिकाला पाणी देताना जास्त काळजी घ्यावी. शेतात पाणी साचून राहिल्यास मर रोगाचे प्रमाण वाढते.
ॲस्टर फुल पिकावरील महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण । Important pests of Aster flower crop and their control.
अॅस्टरवर मावा, फुलकिडे, पाने खाणाऱ्या अळचा, फुलांच्या कळया पोखरणाऱ्या अळया आणि खोड कुरतडणाऱ्या अळया यांचा उपद्रव होतो. खोड कुरतडणाऱ्या अळया काळसर रंगाच्या असून जमिनीत लपून राहतात. झाडाच्या खोडाच्या वाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये या अळया जमिनीलगत खोड कुरतडतात. त्यामुळे झाडे वाळून जातात. या अळीच्या नियंत्रणाकरिता लागवडीच्या वेळी हेक्टरी 50 किलो 10% क्लोरडेन पावडर शेतात पसरवून टाकावी.
मावा आणि फुलकिडे या किडी पानांतील आणि फुलांतील रस शोषून पिकाचे नुकसान करतात. पाने खाणाऱ्या अळया झाडाची कोवळी पाने खातात. फुलांच्या कळ्या पोखरतात.
मावा आणि फुलकिडे या किडींच्या नियंत्रणासाठी 10 लीटर पाण्यात 15 मिलिलीटर डायमेथोएट या प्रमाणात मिसळून 15 दिवसांच्या अंतराने आलटून-पालटून फवारणी करावी. सर्व किडींसाठी रोगोर, कार्बारिल, नुवाक्रॉन यांसारख्या प्रभावी कीटकनाशकांचे फवारे द्यावेत. विशेषतः पाने खाणाऱ्या आणि फुलांच्या कळ्या पोखरणाऱ्या अळयांच्या नियंत्रणाकरिता 10 लीटर पाण्यात 10 मिलिलीटर रिपकार्ड (5 % प्रवाही) या प्रमाणात मिसळून फवारले असता जास्त प्रभावी ठरले आहे.
ॲस्टर फुल पिकावरील महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण । Important diseases of Aster flower crop and their control.
अॅस्टरचे पीक बऱ्याच रोगांना बळी पडते. अॅस्टरमध्ये मर रोग, पानावरील ठिपका, केवडा व भुरी या रोगांची लागण दिसून येते.
मर रोग :
मर रोगाची लागण झाल्यामुळे रोपे कोलमडणे, मूळकूज व खोडकूज असे विविध प्रकार दिसून येतात. हा रोग प्रामुख्याने फ्युजॅरियम, रोयझोक्टोनिया, फायटोप्थोरा यांसारख्या बुरशींमुळे होतो. या रोगामुळे अॅस्टरचे अतोनात नुकसान होते. या रोगाचे प्रमाण पावसाळ्यात जमिनीत पाणी जास्त वेळ साचून राहिल्यास जास्त दिसून येते. या रोगामुळे झाडे रोप अवस्थेपासून ते संपूर्ण फुललेल्या अवस्थेपर्यंत बळी पडतात आणि नंतर मरतात.
उपाय : मर रोगाच्या नियंत्रणाकरिता ॲस्टरच्या रोगप्रतिबंधक जातींची निवड करावी. लागवडीसाठी उत्तम निचरा होणाऱ्या जमिनीची निवड करावी. सरी-वरंबा पद्धतीने अॅस्टरची लागवड करावी. यानंतरही रोगाची लागण दिसून आल्यास झाडाच्या मुळाशी 3:3:50 तीव्रतेचे बोर्डो मिश्रण किंवा 10 लीटर पाण्यात 10 ग्रॅम बाविस्टीन हे बुरशीनाशक मिसळून आलटून-पालटून दोन वेळा मुळयांच्या परिसरात झाडाच्या बुडाशी ओतावे.
पानांवरील ठिपके :
हा रोग प्रामुख्याने अल्टरनेरिया, सरस्कोस्पोरा, बोट्रायटीस यांसारख्या बुरशींमुळे होतो. या रोगामुळे पानांवर तांबूस तपकिरी रंगाचे ठिपके पडून पाने करपू लागतात.
उपाय : या रोगाच्या नियंत्रणासाठी 10 लीटर पाण्यात 25 ग्रॅम डायथेन एम-45 बुरशीनाशक या प्रमाणात मिसळून फवारणी करावी.
केवडा :
या रोगामुळे अॅस्टरची पाने पिवळसर पडून नंतर करपू लागतात. तसेच झाडांची वाढ खुंटते व पाने वेडीवाकडी होतात.
उपाय : या रोगाच्या नियंत्रणासाठी 10 लीटर पाण्यात 40 ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड या प्रमाणात मिसळून फवारणी करावी. झाडांची वाढ खुंटली असेल व पानांची वाढ वेडीवाकडी आढळली तर रोगट झाडे उपटून काढावीत व पिकावर तुडतुड्याच्या नियंत्रणासाठी कीटकनाशके फवारावीत.
ॲस्टर फुल पिकातील तणांचे नियंत्रण । Control of weeds in aster flower crop.
ॲस्टरच्या पिकामध्ये घोळ, पांढरी फुली, हरळी, लव्हाळा, शिंपी यांसारखी अनेक प्रकारची तणे उगवून येतात. पिकाला 2-3 खुरपण्या करून या तणांचा वेळीच बंदोबस्त करावा.
ॲस्टर फुलांची काढणी, उत्पादन आणि विक्री । Harvesting, production and sale of Aster flowers.
जातीनुसार अडीच ते साडेतीन महिन्यांत अॅस्टरला फुले येतात आणि फुलांची काढण सुरू होते. फुलांची काढणी 1 ते 2 महिने चालू राहते. अॅस्टरच्या फुलांची काढणी करतेवेळी पूर्ण वाढलेली आणि उमललेली फुले 10 ते 20 सेंमी. लांब दांड्यासह काढून घ्यावीत व नंतर त्यांच्या 10 ते 12 फुलांची एक याप्रमाणे जुड्या बांधाव्यात. यानंतर या जुड्या बांबूच्या करंड्यांत प्रत्येकी 250 ते 400 या प्रमाणात भरून विक्रीसाठी पाठवाव्यात. अॅस्टरच्या दर हेक्टर क्षेत्रापासून 20 ते 25 हजार जुड्या मिळू शकतात.
अॅस्टरच्या रामकाठी अथवा उभट वाढणाऱ्या प्रकारातील झाडावरील 50 ते 60 % फुले उमलली म्हणजे संपूर्ण झाड जमिनीलगत कापून घ्यावे. यानंतर 10 ते 12 झाडांची एक याप्रमाणे जुड्या बांधतात. नंतर अशा 25 ते 30 जुड्यांचा एक याप्रमाणे गठ्ठा बांधतात. ॲस्टरच्या एक हेक्टर क्षेत्रावरील लागवडीपासून साधारणतः 350 ते 500 गठ्ठे मिळू शकतात. ॲस्टरच्या फुलांची विक्री महाराष्ट्रातील बाजारपेठेत वजनावर न होता ती फुलांच्या नगांवर म्हणजेच जुड्यांवर होते. अॅस्टरच्या फुलांच्या आणि झाडांच्या जुड्यांना शेकडा 15 30 रुपये या प्रमाणात बाजारभाव मिळू शकतो. बाजारात फुले विक्रीला पाठविण्यासाठी त्यांचे पॅकिंग करणे आवश्यक असते. यासाठी ॲस्टरची फुले झाडावरून काढून घेतल्यानंतर जुड्या बांधून बांबूच्या टोपल्यात बाजूला लिंबाचा पाला अथवा गवत लावून भरतात. वरचा भाग बारदान लावून शिवतात आणि मग या टोपल्या फुलांच्या विक्रीसाठी दूरच्या बाजारपेठेत पाठवितात. रामकाठी प्रकारातील अॅस्टरची संपूर्ण झाडे बुडापासून कापल्यानंतर त्यांच्या जुड्या बांधून गठ्ठे तयार करतात. या फुलांच्या गठ्यांभोवती उपलब्ध गवत लपेटतात आणि नंतर हे गठ्ठे टेम्पो अथवा ट्रकमध्ये भरून दूरच्या बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवितात. ॲस्टरची फुले फुलदाणीत जास्त दिवस टिकविण्यासाठी पूर्ण उमलल्यानंतर लांब दांड्यासह फुलांची काढणी करावी. फुलदाणीत ताजी फुले ठेवल्यानंतर दररोज ताजे पाणी फुलदाणीत भरावे आणि दररोज पाण्यात बुडालेला थोडा भाग छाटून टाकला तर किमान 8 दिवस अॅस्टरची फुले टवटवीत राहतात. फुलदाणीत 2% साखरेचे द्रावण टाकल्यास आणि त्यात फुले ठेवल्यास फुले आणखी 2-3 दिवस टिकतात.
सारांश ।
ॲस्टरच्या फुलझाडांना अनेक रंगांची फुले येतात. उद्यानातील आणि इमारतींच्या परिसरातील ॲस्टरच्या फुलांचे ताटवे अतिशय मोहक दिसतात. ॲस्टरच्या सुट्या फुलांना हार, तोरणे आणि मखर, मंडप व स्टेज यांच्या सजावटीसाठी, लांब दांड्याच्या फुलांना फुलदाणीत ठेवण्यासाठी आणि गुच्छ तयार करण्यासाठी मोठ्या शहरांतूनच सतत मागणी असते. अॅस्टरचे पीक बेताचा पाऊस आणि सौम्य हवामानात चांगले येते. खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामांत अॅस्टरची लागवड करतात.
ॲस्टरची लागवड प्रामुख्याने रोपे लावून करतात. त्यासाठी गादीवाफ्यावर ॲस्टरची रोपे तयार करावीत. चांगली उगवणक्षमता असलेले 700 ते 800 ग्रॅम बी एक हेक्टर लागवडीस पुरेसे असते. गादीवाफ्यावर बी पेरल्यावर 35 ते 40 दिवसांत रोपे लागवडीस तयार होतात. रोपे लागवडीस तयार होण्यापूर्वी अॅस्टर लागवडीच्या जमिनीत दर हेक्टरी 15 ते 25 टन या प्रमाणात चांगले कुजलेले शेणखत टाकावे. यानंतर जमिनीची सुपीकता पाहून 45 ते 60 सेंमी. अंतरावर वरंबे तयार करून वरंब्याच्या दोन्ही बाजूंना रोपांची लागवड करावी.
अॅस्टर लागवडीच्या वेळी दर हेक्टरी 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश ही खते सऱ्यांमध्ये चांगली मिसळून द्यावीत. यानंतर रोपांची लागवड करावी. ही लागवड सरीच्या दोन्ही बाजूंनी 15 ते 20 सेंमी. अंतरावर करावी.
लागवडीनंतर अडीच ते साडेतीन महिन्यांत अॅस्टरच्या फुलांची तोडणी सुरू होते. ॲस्टरची लांब दांड्याच्या 10 ते 12 फुलांच्या एक याप्रमाणे जुड्या बांधतात आणि बांबूच्या टोपल्यांत भरून पाठवितात. या पद्धतीने दर हेक्टरी 9 ते 15 हजार जुड्या मिळतात. आपल्याकडे ॲस्टरच्या फुलांची विक्री नगावर होते. फुलांच्या 100 जुड्यांना आणि झाडांच्या 100 जुड्यांना अनुक्रमे 6 ते 12 रुपये आणि 15 ते 30 रुपये असा बाजारभाव मिळू शकतो.