आवळा लागवड |Avala Lagwad | Avala Sheti |आवळा पिकाचे उगमस्थान, महत्त्व आणि भौगोलिक प्रसार । आवळा पिकाच्या लागवडीखालील क्षेत्र । आवळा पिकाचे उत्पादन ।आवळा पिकासाठी योग्य हवामान । आवळा पिकासाठी योग्य जमीन ।आवळा पिकाच्या सुधारित जाती ।आवळा पिकाची अभिवृद्धी । आवळा पिकाची लागवड ।आवळा पिकास योग्य हंगाम । आवळा पिकास योग्य लागवडीचे अंतर ।आवळा पिकास वळण । आवळा पिकास छाटणी । आवळा पिकास खत व्यवस्थापन । आवळा पिकास पाणी व्यवस्थापन ।आवळा पिकातील आंतरपिके । आवळा पिकातील तणनियंत्रण ।आवळा पिकातील महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण ।आवळ्याच्या फळांची काढणी, उत्पादन आणि विक्री ।आवळ्याच्या फळांची साठवण आणि पिकविण्याच्या पद्धती ।
।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।
आवळा लागवड |Avala Lagwad | Avala Sheti |
आवळा पिकाचे झाड अत्यंत काटक असते. आवळयाच्या झाडाची फारशी काळजी न घेताही या फळझाडापासून चांगले उत्पादन मिळते. आवळ्याचे झाड सदाहरित असून 20 ते 22 मीटर उंचीपर्यंत वाढते. आवळ्याची फळे चवीला तुरट, आंबट असतात. आवळ्याच्या झाडापासून कमी खर्चात मिळणारे उत्पादन, आवळयाच्या फळाचे आहारदृष्ट्या महत्त्व आणि औषधी उपयुक्तता यामुळे आवळ्याच्या लागवडीस महाराष्ट्रात भरपूर वाव आहे. उत्तर प्रदेशात आवळयाची लागवड व्यापारी तत्त्वावर केली जाते. महाराष्ट्रात कोरडवाहू भागात, हलक्या मुरमाड जमिनीत आवळयाची मोठ्या प्रमाणात लागवड करणे सहज शक्य आहे.
आवळा पिकाचे उगमस्थान, महत्त्व आणि भौगोलिक प्रसार ।
आवळा या फळझाडाचे उगमस्थान दक्षिणपूर्व आशियातील मध्य आणि दक्षिण भारतात आहे. हिमालयाच्या पायथ्यापासून ते दक्षिणेकडे श्रीलंकेपर्यंत हे झाड चांगले वाढते. भारतात समुद्रसपाटीपासून तेराशे मीटर उंचीपर्यंत आवळ्याची वाढ चांगली होते.
आवळयाच्या फळात ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. आवळ्यामध्ये ताज्या संत्र्याच्या 20 पट ‘क’ जीवनसत्त्व असते. आवळ्याच्या फळापासून मुरंबा, सॉस, कॅन्डी, वाळलेल्या चकत्या (आवळकाठी), मोरावळा, च्यवनप्राश, आवळा सुपारी, जेली, लोणचे, टॉफी, पावडर, इत्यादी पदार्थ मोठ्या प्रमाणावर तयार करतात. आवळयाचे फळ वाळविल्यानंतरही फळातील ‘क’ जीवनसत्त्व नष्ट होत नाही. ‘क’ जीवनसत्त्वाची कमतरता घालविण्यासाठी कृत्रिम ‘क’ जीवनसत्त्वापेक्षा आवळयाच्या पावडरचा उपयोग जास्त फायदेशीर ठरतो. आवळ्याच्या फळांमध्ये औषधी गुणधर्म असतात. ताप, हगवण आणि मधुमेहावर आवळयाचा उपयोग करतात. आवळयाचे तेल केसांच्या वाढीसाठी अतिशय गुणकारी मानले जाते. आवळा खाल्ल्यामुळे पोटाचे विकार कमी होतात. पचनक्रिया सुधारते. आवळ्याच्या 100 ग्रॅम खाण्यायोग्य भागात खालीलप्रमाणे अन्नघटकांचे प्रमाण असते.
अन्नघटक | प्रमाण | अन्नघटक | प्रमाण |
पाणी | 81 | शर्करा (कार्बोहायड्रेट्स) | 14.0 |
प्रथिने (प्रोटीन्स) | 0.50 | स्निग्धांश (फॅट्स) | 0.1 |
खनिजे | 0.7 | तंतुमय पदार्थ | 3.4 |
चुना (कॅल्शियम) | 0.05 | स्फुरद (फॉस्फरस) | 0.02 |
लोह | 1.2 | जीवनसत्त्व ‘ब’ | 0.03 |
निकोटिनिक अॅसिड | 0.0002 | जीवनसत्त्व ‘क’ | 0.6 |
उष्मांक (कॅलरी) | 59 | — | — |
आवळयाची लागवड आशिया खंडातील भारत, म्यानमार, श्रीलंका, अंदमान- निकोबार या उष्ण कटिबंधातील प्रदेशांत होते. भारतात समुद्रसपाटीपासून 1,300 मीटर उंचीपर्यंत या झाडाची वाढ चांगली होते. भारतात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, आसाम, इत्यादी राज्यांत आवळयाची लागवड होते. महाराष्ट्रात सह्याद्री, सातपुडा, अजिंठ्याच्या रात आणि अकोला, बुलढाणा, सातारा, कोल्हापूर, अमरावती, चंद्रपूर, भंडारा, नागपूर, जळगाव, यवतमाळ या भागातील जंगलात ही झाडे आढळतात.
आवळा पिकाच्या लागवडीखालील क्षेत्र । आवळा पिकाचे उत्पादन ।
आवळयाच्या झाडाची स्वतंत्रपणे मोठ्या प्रमाणावर लागवड अलीकडच्या काळात सुरू झाली आहे. महाराष्ट्रात या पिकाखाली अंदाजे 2,000 हेक्टर क्षेत्र असून वार्षिक उत्पादन 25,000 टनांच्या जवळपास आहे.
आवळा पिकासाठी योग्य हवामान । आवळा पिकासाठी योग्य जमीन ।
आवळा हे समशीतोष्ण हवामानातील फळझाड आहे. तथापि, उष्ण हवामानातही हे झाड चांगले वाढते. उन्हाळयात जास्त तापमान आणि हिवाळयात अती थंडी असणाऱ्या भागात आवळयाची झाडे चांगली वाढतात. आवळयाची मोठी झाडे अती उष्ण तापमान आणि गोठवणारी थंडी सहन करू शकतात. परंतु लहान रोपांच्या लागवडीनंतर सुरुवातीच्या 2-3 वर्षांच्या काळात अती उष्णता आणि थंडीपासून आवळ्याचे संरक्षण करणे आवश्यक आहे. हलक्या ते भारी अशा विविध प्रकाराच्या जमिनीत आवळयाची लागवड करता येते. अत्यंत हलकी, खडकाळ, भरड, गाळाची, मुरमाड, भारी, आणि सामू 6.5 ते 9.5 पर्यंत असलेल्या जमिनीत आवळयाची लागवड करता येते. परंतु चुनखडीयुक्त रेताड जमीन आवळ्याच्या लागवडीस योग्य नसते.
आवळा पिकाच्या सुधारित जाती ।
बनारसी आवळा :
उत्तर प्रदेशात बनारसी जातीची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. या जातीची फळे आकाराने मोठी असून चकचकीत, पिवळसर रंगाची असतात. या जातीच्या फळांचे वजन 40 ते 45 ग्रॅम असते. या जातीची फळे मुरंबा आणि लोणच्यासाठी उत्तम समजली जातात. कारण या जातीच्या झाडांच्या फांदीवर मादी फुलांचे शेकडा प्रमाण फारच कमी म्हणजे 0.3 % असते. त्यामुळे या जातीमध्ये फळधारणा कमी होते. या जातीच्या फळांमध्ये साखरेचे प्रमाण 12.5% आणि आम्लता 1.5% असते. या जातीच्या फळांच्या 100 ग्रॅम खाण्यायोग्य भागात 650 मिलिग्रॅम ‘क’ जीवनसत्त्व असते.
कृष्णा आवळा (एन.ए.-5) :
उत्तर प्रदेशातील नरेंद्र देव कृषी विद्यापीठाने ही जात बनारसी जातीच्या झाडांमधून निवड पद्धतीने शोधून काढली आहे. म्हणून या जातीला नरेंद्र आवळा 5 असेही म्हणतात. या जातीची फळे मध्यम ते मोठ्या आकाराची, मऊ सालीची, चमकदार, पिवळसर रंगाची, लाल छटा असलेली असतात. या जातीच्या फळांचे वजन 35 ते 40 ग्रॅम असते. मुरंब्यासारखे टिकाऊ पदार्थ तयार करण्यासाठी ही जात उत्तम आहे. या जातीच्या झाडांवर मादी फुलांचे शेकडा प्रमाण 1.0% असते. या जातीच्या फळात साखरेचे प्रमाण 11.5% आणि आम्लता 1.4% असते. या जातीच्या फळांच्या 100 ग्रॅम खाण्यायोग्य भागात 475 मिलिग्रॅम ‘क’ जीवनसत्त्व असते.
चकिया आवळा :
ही जात उशिरा तयार होणारी असून नियमित आणि भरपूर उत्पादन देणारी आहे. या जातीची फळे मध्यम आकाराची, चपटी आणि रंगाने हिरवट असतात. फळांचे वजन 30 ते 32 ग्रॅम असते. लोणच्यासाठी ही जात उत्तम असून नेक्रॉसिस या रोगास ही जात बळी पडत नाही ; आणि या जातीमध्ये फळगळ होत नाही. म्हणून आवळ्याच्या व्यापारी उत्पादनासाठी या जातीची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. या जातीच्या झाडावर मादी फुलांचे शेकडा प्रमाण 4.0 % इतके असते. या जातीच्या फळांच्या 100 ग्रॅम खाण्यायोग्य भागात ‘क’ जीवनसत्त्वाचे प्रमाण 500 मिलिग्रॅम असते. लोणचे आणि इतर टिकाऊ पदार्थ तयार करण्यासाठी ही जात चांगली आहे.
कांचन आवळा (एन. ए. – 4) :
उत्तर प्रदेशातील नरेंद्र देव कृषी विद्यापीठाने ही जात चकिया जातीच्या झाडांमधून निवड पद्धतीने शोधून काढली आहे. म्हणून या जातीला नरेंद्र आवळा – 4 असेही म्हणतात. ही जात भरपूर उत्पादन देणारी असून या जातीची फळे मध्यम आकाराची आणि पिवळसर रंगाची असतात. या जातीच्या फळाचे वजन 30 ते 32 ग्रॅम असते. फळांमध्ये साखरेचे प्रमाण 10% आणि आम्लता 1.45 % असते. फळाच्या 100 ग्रॅम खाण्यायोग्य भागात 500 मिलिग्रॅम ‘क’ जीवनसत्त्व असते. या जातीच्या झाडाच्या फांदीतील मादी फुलांचे शेकडा प्रमाण 4.7% असते. ही जात त्रिफळाचूर्ण आणि लोणच्यासाठी उत्तम आहे…
हाथीझूल आवळा (फ्रेंन्सिस) :
फ्रेंन्सिस या जातीच्या झाडांच्या फांद्या हत्तीच्या झुलीप्रमाणे लोंबकळत असतात, म्हणून या जातीस ‘हाथीझूल’ असे म्हणतात. या जातीची फळे आकाराने मोठी आणि हिरवट पिवळ्या रंगाची असतात. फळाचे वजन 40 ते 41 ग्रॅम असते. फळातील गर मऊ असून फळात साखरेचे प्रमाण 12.0% आणि आम्लता 1.7 % असते. फळाच्या 100 ग्रॅम खाण्यायोग्य भागात 385 मिलिग्रॅम ‘क’ जीवनसत्त्व असते. या झाडाच्या फांदीवर मादी फुलांचे शेकडा प्रमाण 3% असते. ही जात नेक्रॉसिस या रोगास लवकर बळी पडते. ह्या जातीची फळे टिकाऊ पदार्थ तयार करण्यासाठी मध्यम प्रकारची समजली जातात.
रायआवळा किंवा टरपर रेवडी आवळा :
रायआवळा ही महाराष्ट्रातील आवळयाची स्थानिक जात आहे. या जातीची फळे खाचा असलेली आणि फिकट पिवळ्या रंगाची असतात. फळातील गर रसदार असून तुरटपणा कमी असतो. या जातीची झाडे आवळयाच्या इतर झाडांपेक्षा उंचीला कमी आणि विस्ताराने लहान असतात. पानांचा आकारही वेगळा असतो.
लाल आवळा :
लाल आवळा ही उत्तर प्रदेशातील स्थानिक जात आहे. या जातीची फळे छोटी आणि जास्त टणक असून फळाच्या देठाकडे आकर्षक दाट गुलाबी छटा असते.
नरेंद्र आवळा । नरेंद्र 6 :
ही जात चकियापासून संशोधित केलेली आहे. ही मध्यम वेळेत तयार होते. फळे मध्यम गोल आकाराची असतात. फळांचा रंग हिरवट पिवळसर असतो. पृष्ठभाग चिकण चमकदार असतो. गर पिवळा असतो. गरात रेषा (दशा) अजिबात नसतात.
गर मुलायम असतो. व्हिटॅमिन ‘सी’ मध्यम प्रमाणात असते. मादी फुलांची संख्या प्रति फांदीस चांगली असते. एका फांदीस मादी फुले 10-11 तर नरफुले 300 पर्यंत असतात. मुरंबा, कँडी, बनविण्यास ही जात चांगली आहे. फळे चमकदार, रोगरहीत असल्यामुळे बाजारात या मालाचा उठाव लवकर होतो. त्यामुळे नरेंद्र देव कृषी विद्यापीठाने या जातीची शिफारस केलेली आहे.
नरेंन्द्र आवळा । नरेंन्द्र 7 :
ही जात फ्रॅन्सिस जातीच्या आवळ्यांपासून संशोधित केलेली आहे. ही झाडे सरळ वाढतात. नोव्हेंबर ते डिसेंबरमध्ये फळे तयार होतात. फळे मोठ्या आकाराची असतात. वजन 40 ते 50 ग्रॅम प्रति फळ असते. आकार लंबगोलाकार असतो. पृष्ठभाग चमकदार, फिकट पिवळया रंगाचा असतो. गरात रेषा अजिबात नसतात. मादी फुलांची संख्या 9-10 व नरफुलांची 500 पर्यंत प्रतिशाखा असल्यामुळे अधिक उत्पादनक्षमता असणारी ही आहे. यांना कलमे केल्यानंतर तिसऱ्या-चौथ्या वर्षी भरपूर फळे येतात. यात फ्रेंन्सिस- प्रमाणे क्रॉसिस रोग दिसून येत नाही. या जातीची देखील नरेंद्र देव कृषी विद्यापीठाने शिफारस केली आहे.
नरेंद्र आवळा । नरेंद्र 10 (बलवंत आवळा) :
बलवंत राजपूत कॉलेज, आगरा येथील विद्यार्थ्यांनी बनारस आवळ्यापासून संशोधित केलेली ही जात आहे. या जातीची रोपे नरेंद्र देव कृषी विद्यापीठात लावलेली आहेत. हिचेच नामकरण नरेंद्र आवळा – 10 असे करण्यात आलेले आहे. अजून ही जात संशोधन अवस्थेत आहे. तरीही येणाऱ्या भविष्यकाळात ही जात उत्कृष्ट समजली जाणार आहे.
गुजरात कृषी विद्यापीठाने खेडा जिल्हयातील विविध प्रकारच्या जवळजवळ 14 जातींचा अभ्यास करून आनंद आवळा 1, आनंद आवळा 2, आणि आनंद आवळा 3 या जाती संशोधित केल्या आहेत. त्यांपैकी आनंद 2 ही सर्वांत चांगली जात समजली जाते.
आनंद आवळा । आनंद 1 :
हे झाड मध्यम उंचीचे असते. फांद्या पसरणाऱ्या असतात. याची साल पांढरी असते. फळे मोठी, गोल, सफेद रंगाची, रेषाहीन, गुलाबी छटा असलेली पारदर्शक असतात. फळाचे वजन 35 ग्रॅम असून जीवनसत्त्व ‘क’ 770 मि.ग्रॅ. प्रति 100 ग्रॅम असते. बी लहान असते. उत्पादन शक्ती चांगली आहे. प्रत्येक झाडास 75 ते 80 किलो फळे येतात.
आनंद आवळा । आनंद 2 :
ही झाडे मध्यम ते मोठी (उंच) वाढणारी असतात. जास्त निळसर रंगाची पाने असतात. खोडाची साल भुरक्या रंगाची असते. फळ मोठे असून वजन 45 ग्रॅम भरते. या जातीची फळे गोल, निळसर, अर्धपारदर्शक असून गर निळ्या रंगाचा, रेषाहीन असतो. जीवनसत्त्व ‘क’ चे प्रमाण 100 ग्रॅमला 775 मि. ग्रॅ. असते. उत्पादन 100 ते 125 किलो येते.
आवळा पिकाची अभिवृद्धी । आवळा पिकाची लागवड ।
आवळ्याची लागवड प्रामुख्याने बियांपासून केली जाते. परंतु बियांपासून तयार केलेल्या झाडांना लागवडीनंतर उशिराने फळे लागतात. उत्पादन कमी येते, फळांची प्रत निकृष्ट असते. मातृवृक्षांचे सर्व गुणधर्म येत नाहीत. म्हणूनच आवळयाच्या झाडाची अभिवृद्धी कलम पद्धतीने किंवा डोळे भरून करावी. अभिवृद्धीसाठी उत्तम दर्जाची, मोठी फळे देणारी आवळयाची जात निवडावी. निवडलेल्या झाडांची डोळकाडी अथवा डोळे वापरून आवळ्याची अभिवृद्धी करावी. ढाल ( शील्ड ) पद्धतीने डोळे भरून आवळयाची अभिवृद्धी करण्याची पद्धत जास्त यशस्वी ठरली असून या पद्धतीमध्ये 70 ते 80 % यश मिळते. उत्तर भारतात आवळ्याच्या झाडाच्या खुंटरोपाच्या खोडावर इंग्रजी ‘टी’ आकाराचा काप घेऊन त्यात सुधारित जातीचा ढालीच्या आकाराचा डोळा बसवतात. डोळे भरण्याचे काम जून-जुलै किंवा ऑगस्ट-सप्टेंबर अथवा फेब्रुवारी-मार्च महिन्यात करतात. डोळे भरण्यासाठी 1 वर्षे वयाचा खुंट वापरावा. जागेवरच खुंटरोपे वाढवून त्यांच्यावर डोळे भरल्यास चांगले यश मिळते. आवळ्याच्या झाडाच्या फांदीवर नर आणि मादी फुले वेगवेगळ्या भागांवर येतात. मादीफुले फांदीच्या टोकाकडील भागातच येतात. फळे फक्त मादी फुलांवरच येतात. म्हणून डोळकाडी निवडताना मादी फुलांचे प्रमाण जास्त असणारी फांदी निवडावी. नरफुलांचे प्रमाण जास्त असणाऱ्या फांदीवरून डोळे घेतल्यास तयार होणाऱ्या कलमापासून उत्पादन न मिळण्याची शक्यता असते.
आवळा पिकास योग्य हंगाम । आवळा पिकास योग्य लागवडीचे अंतर ।
लागवडीपूर्वी जमिनीची मशागत करावी. नंतर पावसाळ्यापूर्वी मे महिन्यात 0.60 X 0.60 X 0.60 मीटर आकाराचे खड्डे जमिनीचा मगदूर आणि उतार पाहून 8 ते 9 मीटर अंतरावर घ्यावेत. खड्डे उन्हाळ्यात महिनाभर चांगले तापू द्यावे. त्यानंतर खड्डे माती अथवा पोयटा माती अधिक 10 ते 15 किलो शेणखत अधिक 1 किलो सुपर फॉस्फेट आणि 100 ग्रॅम लिंडेन पावडर मिसळून भरून घ्यावेत. त्यानंतर डोळे भरून तयार केलेली कलमे अथवा रोपे पावसाळ्यात लावावीत. लागवडीनंतर रोपांना बांबूच्या काठीचा आधार द्यावा. कमी पाऊस पडणाऱ्या प्रदेशात जागेवरच बी पेरून रोपे वाढवून त्यावर एक वर्षानंतर डोळे भरावेत; म्हणजे डोळे जगण्याचे प्रमाण जास्त मिळते. रोपांची लागवड केल्यावर रोपांची पाने गळतात आणि थोड्याच दिवसांत रोपांना नवीन पालवी फुटते.
आवळा पिकास वळण । आवळा पिकास छाटणी ।
आवळयाच्या झाडाला सुरुवातीपासून योग्य प्रकारे वळण देणे आवश्यक आहे. आवळ्याच्या झाडाचे लाकूड अतिशय ठिसूळ असते. त्यामुळे आवळयाच्या फांद्या फळांच्या भाराने वाकून मोडतात; म्हणूनच सुरुवातीच्या काळात झाडाचा सांगाडा बळकट होण्यासाठी आणि झाडांची योग्य वाढ होण्यासाठी आवळयाच्या झाडाला योग्य वळण देणे आवश्यक आहे. आवळ्याच्या झाडाला जमिनीपासून 1 मीटर उंचीवर 5-6 जोमदार फांद्या योग्य अंतरावर चारही दिशांना विखुरलेल्या स्थितीत वाढतील अशा ठेवाव्यात. खोडावर 1 मीटरच्या खाली येणारी फूट काढून टाकावी. फळांचा हंगाम संपल्यावर रोगट, कमजोर, वाळलेल्या आणि वेड्यावाकड्या वाढलेल्या फांद्या छाटून टाकाव्यात.
आवळा पिकास खत व्यवस्थापन । आवळा पिकास पाणी व्यवस्थापन ।
मोठी फळे आणि भरपूर उत्पादन मिळण्यासाठी सप्टेंबर-ऑक्टोबर या महिन्यात प्रत्येक लहान झाडाला 15 ते 20 किलो आणि मोठ्या झाडाला 30 ते 40 किलो चांगले कुजलेले शेणखत द्यावे. प्रत्येक झाडाला 100 ग्रॅम नत्र, 50 ग्रॅम स्फुरद आणि 100 ग्रॅम पालाश दोन हप्त्यांत समप्रमाणात विभागून सप्टेंबर-ऑक्टोबर आणि एप्रिल-मे महिन्यात द्यावीत. खारवट जमिनीत नत्राचा पुरवठा करण्यासाठी अमोनियम सल्फेट या नत्रखताचा वापर करावा. या खतांच्या मात्रेत झाडाच्या वयाच्या वाढीनुसार रासायनिक खतांची वाढ 10 वर्षांपर्यंत करीत जावी आणि नंतर वाढीव खताची मात्रा दरवर्षी द्यावी. आवळ्याच्या झाडाची सुरुवातीच्या काळात जोमदार वाढ झाल्यास आवळयाची फुले लहान असताना फुलांची गळ होते. झाडाची जोमदार वाढ होण्यासाठी उन्हाळयात प्रत्येक झाडाला 30 ग्रॅम नत्र देऊन पाणी द्यावे. जमिनीत पालाशाची कमतरता असल्यास पिकाला योग्य प्रमाणात पालाशाची मात्रा द्यावी. त्यामुळे फळांची गळ कमी होते.
रोपांच्या अथवा कलमांच्या लागवडीनंतर पावसाळ्यात पाणी देण्याची आवश्यकता नसते. आवळयाची नवीन लागवड केल्यानंतर पहिली दोन वर्षे झाडांना उन्हाळयात 15 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. तसेच उन्हापासून आणि अती थंडीपासून लहान कलमांचे अथवा रोपांचे संरक्षण करण्यासाठी कलमांवर गवताचे छप्पर बांधावे. रोपांना किवा कलमांना बांबूंचा आधार द्यावा. झाडे मोठी झाल्यावर त्यांना पाणी द्यावे लागत नाही. मात्र फळधारणेच्या काळात 15 दिवसांच्या अंतराने पाणी दिल्यास आवळ्याच्या फळांचे उत्पादन वाढते. जमिनीतील पाण्याचा ओलावा टिकून राहण्यासाठी तसेच तणांची वाढ होऊ नये म्हणून प्रत्येक झाडाच्या खोडाभोवती गवताचे आच्छादन करावे.
आवळा पिकातील आंतरपिके । आवळा पिकातील तणनियंत्रण ।
आवळ्याची लागवड हलक्या ते मध्यम जमिनीत केली जात असल्यामुळे अशा जमिनीचा पोत आणि कस टिकविण्यासाठी चवळी, उडीद, मूग, वाटाणा, हरभरा, इत्यादी पिके आंतरपिके म्हणून घेता येतात. खारवट चोपण जमिनीत आवळ्याच्या दोन झाडांमधील जागेमध्ये तसेच जमिनीची सुपीकता आणि पोत सुधारण्यासाठी धेंच्याची लागवड करून हे पीक फुलावर येण्यापूर्वीच जमिनीत हिरवळीचे खत म्हणून गाडून टाकावे.
तणांचा योग्य वेळी बंदेबस्त न केल्यास आवळ्याच्या पिकाची वाढ आणि उत्पादन यावर वाईट परिणाम होतो. म्हणून बागेतील तणे वेळोवेळी उपटून, खुरपून काढून टाकावीत. ताग, धैंचा ही पिके दोन झाडांमधील मोकळ्या जागेत वाढविल्यास तणांचे नियंत्रण होते… शिवाय ही पिके जमिनीमध्ये गाडल्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो.
आवळा पिकातील महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण ।
आवळ्याचे झाड काटक असते. या झाडावर रोग आणि किडींचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो.
खोडअळी :
ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात या किडीचा उपद्रव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. या किडीची अळी रात्रीच्या वेळी फांद्यांची साल पोखरून आत शिरते आणि सालीचा आतील भाग खाते. अळीने पाडलेल्या छिद्रातून अळीची विष्ठा बाहेर दिसते.
उपाय : या अळीच्या नियंत्रणासाठी फांद्यांवर आणि खोडावर असणाऱ्या अळया काढून टाकून नष्ट कराव्यात. अळीने केलेल्या छिद्रात रॉकेल किंवा पेट्रोलमध्ये भिजविलेला कापसाचा बोळा झाकून छिद्र मातीने लिंपावे..
गॉल माशी :
ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात या अळीचा उपद्रव दिसून येतो. या किडीची अळी खोडावर छिद्र पाडून आत शिरते आणि आतील भागावर उपजीविका करते. अळीमुळे नुकसान झालेल्या भागावर फोडासारखी वाढ दिसते..
उपाय : या किडीच्या नियंत्रणासाठी किडलेल्या फांद्या तोडून नष्ट कराव्यात. 10 लीटर पाण्यात 40 मिलिलीटर पॅराथिऑन हे कीटकनाशक मिसळून फवारावे…
आवळा पिकातील महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण ।
तांबेरा :
आवळ्याच्या देशी जाती तांबेरा रोगाला मोठ्या प्रमाणावर बळी पडतात, तर बनारसी आणि चकिया या जाती तांबेरा रोगास प्रतिकारक आहेत. तांबेरा रोगाच्या प्रादुर्भावामुळे पानांवर आणि फळांवर तपकिरी रंगाचे ठिपके आढळतात…
उपाय : तांबेरा या रोगाच्या नियंत्रणासाठी 10 लीटर पाण्यात 30 ग्रॅम डायथेन एम-45 या प्रमाणात मिसळून फवारावे.
ब्ल्यू मोल्ड :
हा रोग पेनिसिलियम आईसलॉन्डिकम या बुरशीच्या प्रादुर्भावामुळे होतो. तपकिरी रंगाचे लिबलिबीत ठिपके फळांवर दिसून येतात. या ठिपक्यांवर निळसर हिरव्या रंगाची बुरशी वाढलेली दिसते.
उपाय : बागेत स्वच्छता राखावी. बोरॅक्स किंवा मिठाच्या द्रावणाची फळांवर प्रक्रिया करावी.
नेक्रॉसिस :
या रोगामुळे आवळयाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. आवळ्याच्या फळांवर काळपट रंगाचे डाग पडतात. त्यामुळे अशा डाग पडलेल्या आवळयांना बाजारात कमी किंमत मिळते.
नियंत्रण : नेक्रॉसिस या रोगाच्या नियंत्रणासाठी 10 लीटर पाण्यात 40 ग्रॅम बोरॅक्स पावडर या प्रमाणात मिसळून फवारणी करावी.
आवळ्याच्या फळांची काढणी, उत्पादन आणि विक्री ।
आवळ्याच्या रोपांची लागवड केल्यापासून 6 व्या ते 7 व्या वर्षी फळे मिळण्यास सुरुवात होते. आवळ्याच्या झाडाची डिसेंबर – जानेवारीमध्ये पानगळ होते आणि मार्च- एप्रिल महिन्यात फुलोरा येतो. फुले दाट आणि गुच्छदार असून पानांच्या बेचक्यात येतात. फुलांच्या गुच्छामध्ये नर आणि मादी अशी दोन्ही प्रकारची फुले वेगवेगळी असतात. नर आणि मादी फुले यांचे प्रमाण जवळजवळ 400 नरफुलांत एक मादीफूल असे असते. फळे सुरुवातीला हिरवट दिसतात; पण पक्व झाल्यावर हिरवट पिवळी किंवा विटकरी रंगाची दिसतात. हिवाळ्यात फळे काढणीस तयार होतात. ऑक्टोबर-नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत फळांची तोडणी करता येते. पक्व फळे टणक असतात. फळे आकडीने अगर बांबूने हलवून काढतात. चांगल्या पूर्ण वाढलेल्या कलमी आवळयाच्या झाडापासून 150 ते 200 किलो फळे दरवर्षी मिळतात. एका फळाचे वजन जातीनुसार 30 ते 40 ग्रॅम भरते आणि एका किलोत 35 ते 40 फळे बसतात. आवळयाची फळे गोण्यांत भरून विक्रीसाठी पाठवितात. फळधारणेच्या वेळी जिब्रेलिक अॅसिड या संजीवकाच्या 30 ते 50 पी.पी.एम. तीव्रतेच्या द्रावणात किंवा प्लॅनोफिक्स या संजीवकाच्या 20 ते 60 पी.पी.एम. तीव्रतेच्या द्रावणाचा फवारा मारल्यास फळांचा आकार वाढतो आणि फळांची गळ थांबते.
आवळ्याच्या फळांची साठवण आणि पिकविण्याच्या पद्धती ।
आवळयाची पूर्ण तयार झालेली फळे काढणीनंतर गोणपाटाच्या पिशव्यांत भरून बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवावीत. काढणीनंतर आवळयाच्या फळांची साठवण जास्त दिवस केली जात नाही. परंतु ही फळे 8 ते 10 दिवस साठविता येतात. आवळ्याची फळे झाडावरच पक्व होतात; म्हणून काढणीनंतर ही फळे पिकविण्याची आवश्यकता नसते.
सारांश
आवळ्याचे झाड माळरानावरील किंवा कोणत्याही निकृष्ट जमिनीत चांगले येते. या फळाच्या उत्पादनास अतिशय कमी खर्च येतो. आवळ्याच्या फळात ‘क’ जीवनसत्त्वाचे प्रमाण इतर फळांपेक्षा जास्त आहे, त्यामुळे आहारात आवळ्याच्या फळाला जास्त महत्त्व आहे. आवळ्याच्या फळापासून विविध प्रकारचे टिकाऊ पदार्थ बनविता येतात.
ढाल (शील्ड) पद्धतीने डोळे भरून आवळ्याची अभिवृद्धी केल्यास भरपूर आणि चांगल्या दर्जाची फळे मिळतात. आवळ्याच्या झाडावर रोग आणि किडींचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो. आवळयाच्या लागवडीनंतर सहाव्या ते सातव्या वर्षापासून फळे मिळण्यास सुरुवात होते.