बिबा लागवड । Biba Lagwad । Biba Sheti । बिबा या पिकाचे उगमस्थान, महत्त्व आणि भौगोलिक प्रसार । बिबा पिकाखालील क्षेत्र आणि उत्पादन । बिबा पिकास योग्य हवामान । बिबा पिकास योग्य जमीन । बिबा पिकाच्या सुधारित जाती । बिबा पिकाची अभिवृद्धी । बिबा पिकाची लागवड पद्धती । बिबा पिकास योग्य हंगाम । बिबा पिकास योग्य लागवडीचे अंतर । बिबा पिकास वळण । बिबा पिकास छाटणीच्या पद्धती । बिबा पिक खत व्यवस्थापन । बिबा पिक पाणी व्यवस्थापन । बिबा पिकातील आंतरपिके । बिबा पिकाच्या फळांची काढणी, उत्पादन आणि विक्री । बिबा पिकाच्या फळांची साठवण आणि पिकविण्याच्या पद्धती ।
।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।
बिबा लागवड : Biba Lagwad : Biba Sheti :
कोरडवाहू फळबागांपासून शेतकन्यांना भरपूर उत्पादन मिळू शकते. जमिनीची धूप थांबविणे, इमारती लाकूड, अवजारांसाठी लाकूडफाटा, इंधन, इत्यादींचा पुरवठा करणे, काही अंशी हवेचे प्रदूषण थांबविणे, इत्यादी उद्दिष्टे पूर्ण करण्यास मदत होते. बिबा हे फळझाड अत्यंत काटक असून दुष्काळी भागात तग धरून राहू शकते. कोणत्याही प्रकारच्या हलक्या जमिनीत किंवा डोंगराळ भागात, शेताच्या बांधावर, नदीनाल्याच्या काठावर अथवा उपलब्ध जागेत या फळझाडाची लागवड करता येते. बिबा फळांचा विविध उद्योगधंद्यांसाठी उपयोग लक्षात घेता या फळझाडाच्या लागवडीस भरपूर वाव आहे.
बिबा या पिकाचे उगमस्थान, महत्त्व आणि भौगोलिक प्रसार :
बिबा या फळझाडाच्या उगमस्थानाबाबत निश्चित माहिती उपलब्ध नसली तरी फार पुरातन काळापासून या फळझाडाची लागवड भारतात आढळून येते. कोरडवाहू फळझाडांमध्ये बिबा हे एक महत्त्वाचे फळझाड असून त्याची लागवड प्रामुख्याने अवर्षणग्रस्त भागात आणि हलक्या जमिनीत केली जाते. महाराष्ट्रात सुमारे 87 % क्षेत्र कोरडवाहू आहे. या क्षेत्रामध्ये प्रामुख्याने अन्नधान्यांची पिके घेतली जातात. परंतु हलक्या ते अत्यंत हलक्या जमिनीत, मुरमाड, बरड वरकस जमिनीत, जांभा खडकाच्या जमिनीत, माळरानावरील आणि डोंगर उतारावरील जमिनीत, अन्नधान्यांची पिके घेणे फायदेशीर ठरत नाही अशा जमिनींत बिबा या कोरडवाहू फळझाडाची लागवड अतिशय फायदेशीर आहे; कारण बिबा हे अत्यंत काटक फळझाड असून दुष्काळी परिस्थितीत तग धरून राहू शकते. या फळझाडाची लागवड नदीकाठाची जागा, पाण्याच्या कॅनालच्या बाजूने, विहिरीच्या जवळ अथवा उपलब्ध जागेत करता येते. या फळझाडापासून 25 ते 30 वर्षांपर्यंत भरपूर उत्पादन मिळते. बिबा फळांना ग्रामीण आणि शहरी भागामध्ये उद्योगधंद्यासाठी मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. बिबा फळांचा उपयोग प्रामुख्याने औषधी तेल, रंगकाम, खुणा करण्यासाठी शाई आणि दंतमंजन तयार करण्यासाठी करतात. बिब्याचे तेल जहाजे, बोटी रंगविण्याकरिता वापरतात. बिब्याच्या फळाला दोन भाग असतात. फळाच्या खालच्या टोकाला नारंगी रंगाचे फूल चिकटलेले असते. हे फूल खाण्याकरिता फळापासून वेगळे करतात. बिब्याचा फळातील गर खाण्यासाठी वापरतात या गराला गोडंबी (बी) असे म्हणतात. गोडंबी पौष्टिक असून शक्तिवर्धक म्हणून लोक आवडीने खातात. बिबा फळांची आणि फुलांची मागणी, लागवडीचा कमी खर्च, कोणत्याही जमिनीत येणारे, अवर्षणास तोंड देऊ शकणारे, आर्थिक दृष्ट्या फायदेशीर उत्पादन देणारे आणि उद्योगधंद्यासाठी उपपयुक्त असे फळझाड असल्यामुळे बिबा या फळझाडाच्या लागवडीस मोठ्या प्रमाणात वाव आहे. भारतामध्ये गुजरात राज्यात काही प्रमाणात बिब्याची लागवड दिसून येते, तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बिब्याची झाडे वाढलेली दिसतात. महाराष्ट्रात अकोला जिल्हातील पातूर, बाळापूर, मालेगाव, वाशिम, बुलढाण्यापासून माहूरपर्यंत, तसेच नागपूर, भंडारा, अमरावती (मेळघाट), चंद्रपूर, सिरोंचा, अहेरी, इत्यादी डोंगराळ आणि उताराच्या भागात बिब्याची फळझाडे मोठ्या प्रमाणावर आढळून येतात.
बिबा पिकाखालील क्षेत्र आणि उत्पादन :
बिबा हे अत्यंत काटक आणि उपयुक्त फळझाड आहे. परंतु दुर्लक्षित राहिल्यामुळे या फळझाडाच्या शास्त्रीय लागवडीचे क्षेत्रवाढीच्या दृष्टीने फारसे प्रयत्न झाले नाहीत. त्यामुळे या फळझाडाची स्वतंत्रपणे व्यापारी तत्त्वावर लागवड केलेली दिसून येत नाही. बिबा या फळझाडाच्या लागवडीखालील क्षेत्र आणि उत्पादन याविषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही.
बिबा पिकास योग्य हवामान आणि बिबा पिकास योग्य जमीन :
बिबा हे फळझाड अत्यंत काटक असून बिब्याची झाडे जंगलात पठारावर आणि सपाट परंतु भरपूर झाडे असणाऱ्या क्षेत्रात, समशीतोष्ण हवामानात नैसर्गिकरित्या वाढतात. बिबा या फळझाडाला कोरडे आणि उष्ण हवामान मानवते. उष्ण आणि दमट हवामान असलेल्या कोकण विभागातही हे झाड चांगले वाढते. बिब्याच्या झाडाची लागवड कोणत्याही प्रकारच्या हलक्या जमिनीत किंवा मुरमाड आणि डोंगराळ भागातसुद्धा चांगली होते. या फळझाडाला तांबडी जमीन (लॅटेराटिक) मानवते. भारी, काळचा, पाणी साठवून ठेवणाऱ्या अल्कलीयुक्त जमिनी या फळझाडास योग्य नसतात.
बिबा पिकाच्या सुधारित जाती :
महाराष्ट्रात बिब्याच्या सुधारित जाती उपलब्ध नाहीत; परंतु उपलब्ध असणाऱ्या प्रचलित जातींमधून भरपूर उत्पादन देणाऱ्या दर्जेदार फळांच्या झाडांपासून निवड पद्धतीने लागवडीसाठी रोपे तयार करावीत.
बिबा पिकाची अभिवृद्धी आणि बिबा पिकाची लागवड पद्धती :
बिब्याची लागवड प्रामुख्याने बियांपासून रोपे तयार करून केली जाते. त्यासाठी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात, उत्तम वाढ झालेल्या, अधिक उत्पादन देणाऱ्या झाडांची पूर्ण पक्व झालेली, मोठी, निवडक फळे बियांसाठी निवडावीत. झाडांची पूर्ण पोसलेली फुले नारंगी रंगाची आणि ‘बी’ काळया रंगाचे होणे आवश्यक आहे. अशी फळे झाडावरून तोडून या फळांपासून नारंगी रंगाचे फूल खाण्याकरिता वेगळे करावे आणि बियाणे रोपे तयार करण्यासाठी वापरावे. असे बियाणे स्वच्छ आणि कोरड्या ठिकाणी एक ते दीड वर्षांपर्यंत साठवून ठेवता येते. बिब्याची रोपे पॉलिथीनच्या पिशव्यांमध्ये तयार करून पावसाळयामध्ये शेतात कायमच्या जागी लावावीत. बिब्याच्या बियाण्याची उगवण लवकर होण्यासाठी बिब्याच्या बियाण्यावर गंधकाची प्रक्रिया करावी. त्यासाठी बिब्याचे पक्व झालेले, रोगमुक्त बियाणे तीव्र सल्फ्युरिक अॅसिडमध्ये अर्धा ते एक मिनीट बुडवून नंतर बाहेर काढावे. हे बियाणे 2 ते 3 वेळा पाण्यात स्वच्छ धुऊन लगेच 15 x 22 सेंटिमीटर आकाराच्या पॉलिथीन पिशवीत किंवा गादीवाफ्यावर पेरून वाफ्यांना पाणी द्यावे. अशा प्रकारे पेरणी केल्यास बिब्याची 65 ते 75% रोपे मिळू शकतात. बिब्याचे बियाणे पातळ शेणामध्ये 3 ते 4 दिवस भिजवून नंतर पेरणी केल्यास बियाण्याची उगवण चांगली होते.
बिब्याच्या लागवडीसाठी पावसाळयापूर्वी जमिनीचा मगदूर आणि उतार पाहून योग्य अंतरावर 60 x 60 x 60 सेंटिमीटर आकाराचे खड्डे घ्यावेत. खड्डे पावसाळयापूर्वी शेणखत, सुपर फॉस्फेट, पोयटा माती आणि लिंडेन भुकटी (10%) यांच्या मिश्रणाने भरावेत. प्रत्येक खड्ड्यात पावसाळयाच्या सुरुवातीला बिब्याचे एक रोप लावावे. साधारणपणे 12-15 महिन्यांची बिब्याची रोपे लागवडीसाठी योग्य असतात.
बिबा पिकास योग्य हंगाम आणि बिबा पिकास योग्य लागवडीचे अंतर :
जुलै-ऑगस्ट महिन्यात बिब्याच्या रोपांची लागवड करावी. हलक्या आणि डोंगर उतारावरील माळरान आणि मुरमाड जमिनीत 5 x 5 मीटर अंतरावर आणि मध्यम जमिनीत 6 X 6 मीटर अंतरावर खड्डे घ्यावेत. बिब्याची रोपे पावसाळा संपल्यानंतर एकदा जगली की नंतर अवर्षणाला तोंड देत वाढू शकतात.
बिबा पिकास वळण आणि बिबा पिकास छाटणीच्या पद्धती :
बिब्याच्या झाडाची वाढ जोमाने होण्याकरिता आणि चांगली आणि जास्त फळे
मिळण्यासाठी बिब्याच्या झाडाची छाटणी करावी. छाटणी करताना सुरुवातीच्या वाढीच्या काळात झाडाला योग्य वळण द्यावे. त्यासाठी झाडावरील अनावश्यक फांद्या काढून टाकाव्यात. अन्यथा छाटणी केल्यानंतर जमिनीपासून अनेक फांद्या फुटून झुडूप तयार होते.
बिबा पिक खत व्यवस्थापन आणि बिबा पिक पाणी व्यवस्थापन :
बिबा या फळझाडाकरिता खताची गरज कमी प्रमाणात असते. फळझाडांची वाढ चांगल्या प्रकारे होण्याकरिता, उत्कृष्ट फळे येण्याकरिता खालीलप्रमाणे शेणखत आणि रासायनिक खते द्यावीत.
झाडाचे वय (वर्षे) | शेणखत (किलो) | नत्र (ग्रॅम) | स्फुरद (ग्रॅम) | पालाश (ग्रॅम) |
1 | 5 | 25 | 25 | 25 |
2 | 10 | 50 | 50 | 50 |
3 | 15 | 100 | 50 | 50 |
4 | 20 | 200 | 100 | 100 |
5 आणि त्यापुढे | 25 | 250 | 125 | 125 |
पावसाळयाच्या सुरुवातीस पूर्ण शेणखत आणि पावसाळयानंतर रासायनिक खताची अर्धी मात्रा द्यावी. उरलेला हप्ता 3 ते 4 आठवड्यांनी एक किंवा दोन समान हप्त्यांत द्यावा. बिब्याचा फळझाडाला नियमित पाण्याची आवश्यकता नसते. केवळ पावसाच्या पाण्यावरही बिब्याचे चांगले उत्पादन येते. मात्र झाडाला पहिले 3-4 वर्षे उन्हाळयात पाणी दिल्यास झाडाची वाढ चांगली होते. झाडास खते दिल्यानंतर पाऊस नसल्यास पाणी द्यावे. फळधारणेनंतर साधारणपणे 1 ते 2 पाण्याच्या पाळ्या दिल्यास भरपूर आणि मोठी फळे मिळतात.
बिबा पिकातील आंतरपिके :
बिब्याचे झाड लहान असेपर्यंत ह्यात जमिनीच्या मगदुराप्रमाणे चवळी, भुईमूग, सोयाबीन, घेवडा, हरबरा, कलिंगड, इत्यादी पिके घेता येतात.
बिबा पिकाच्या फळांची काढणी, उत्पादन आणि विक्री :
रोपांच्या लागवडीनंतर 6 ते 7 वर्षांनंतर बिब्याच्या झाडांना फळे येतात. जुलै- ऑगस्ट महिन्यात बिब्याच्या झाडाला फुले येण्यास सुरुवात होते. फुले आल्यानंतर साधारणपणे 5 ते 6 महिन्यांनी जानेवारी-फेब्रुवारी मध्ये फळे पक्व होऊन काढणीसाठी तयार होतात. सुरुवातीला 2 ते 3 वर्षे फळांचे उत्पादन कमी असते. 6 ते 7 वर्षे वयाच्या प्रत्येक झाडापासून साधारणपणे 10 ते 12 किलो बिब्याची फळे, 20 ते 25 किलो बिब्याची फुले आणि 2 ते 3 किलो गोडंबी (बी) मिळते. बिब्याच्या झाडावरील पूर्ण पोसलेली फुले नारंगी रंगाची तर बी काळया रंगाचे झाल्यानंतर अशी फळे झाडावरून तोडून त्यापासून नारंगी रंगाचे फूल खाण्याकरिता वेगळे करून बियाणे जमा करावे. फुले लगेच विक्रीकरिता पाठवावीत. बिब्याची फुले चेंगरल्यानंतर त्यांची प्रत खराब होते. यासाठी लांबच्या बाजारात फुले विक्रीसाठी पाठविताना फुलांची तोडणी केल्यानंतर लगेच टोपलीत पॅकिंग करून बाजारात विक्रीसाठी पाठवावीत. बिब्याची फळे मात्र बाजारात केव्हाही पाठविली तरी खराब होत नाहीत.
बिबा पिकाच्या फळांची साठवण आणि पिकविण्याच्या पद्धती :
बिब्याची फुले वेगळी केल्यानंतर बियाण्याची प्रतवारी करून मोठ्या आकाराचे बियाणे वेगळे करावे. असे बियाणे स्वच्छ आणि कोरड्या ठिकाणी एक ते दीड वर्षे साठवून ठेवले तरी त्याची उगवण चांगल्या प्रकारे होऊ शकते.
सारांश :
बिबा हे एक अत्यंत काटक फळझाड असून कोरडवाहू लागवडीसाठी उपयुक्त फळझाड आहे. बिब्याच्या फळझाडाला उष्ण आणि कोरडे हवामान चांगले मानवते. बिब्याच्या झाडाची लागवड बियांपासून रोपे तयार करून केली जाते. रोपे जोमाने वाढण्यास सुरुवात झाल्यानंतर त्यांना खते आणि पाणी देण्याची फारशी आवश्यकता नसते. बिब्याच्या पूर्ण वाढलेल्या झाडापासून 10 ते 12 किलो बिब्याची फळे, 20 ते 25 किलो बिब्याची फुले आणि 2 ते 3 किलो गोडंबीचे उत्पादन मिळते. बिब्याची फुले नाशवंत असून काढणीनंतर त्यांची लगेच विक्री करणे आवश्यक आहे. बिब्याची फळे मात्र काढणीनंतर जास्त काळ टिकविता येतात.