जाणून घ्या कार्नेशन लागवड बद्दल संपूर्ण माहिती तेही एका क्लीक मध्ये (Carnation flower Lagwad Mahiti Carnation Sheti) – Carnation Farming

कार्नेशन लागवड । Carnation Lagwad | Carnation Sheti | कार्नेशन लागवड महत्त्व । कार्नेशन लागवडी खालील क्षेत्र । कार्नेशन पिकाचे उत्पादन । कार्नेशन पिकास योग्य हवामान । कार्नेशन पिकास योग्य जमीन । कार्नेशन पिकाच्या उन्नत जाती ।कार्नेशन पिकाची अभिवृद्धी । कार्नेशन पिकाची लागवड पद्धती | कार्नेशन पिकास योग्य हंगाम । कार्नेशन पिकास योग्य लागवडीचे अंतर | कार्नेशन पिकास वळण । कार्नेशन पिकास आधार देण्याची पद्धत | कार्नेशन पिकास खत व्यवस्थापन । कार्नेशन पिकास पाणी व्यवस्थापन | कार्नेशन पिकावरील महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण | कार्नेशन पिकावरील महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण | कार्नेशन पिकामधील शारीरिक विकृती आणि त्यांचे नियंत्रण | कार्नेशन पिकामधील तणांचे नियंत्रण | कार्नेशन फुलांची काढणी, उत्पादन आणि विक्री | कार्नेशन फुलांचे पॅकेजिंग आणि साठवण |

।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।

अनुक्रम दाखवा

कार्नेशन लागवड । Carnation Lagwad | Carnation Sheti |

कार्नेशन हे एक सुंदर फूल आहे. पाश्चिमात्य देशांत गुलाबानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर कार्नेशनच्या फुलाला मागणी असते. भारतामध्ये सर्वसामान्य माणसाला नवीन असणारे हे फूल फुलदाणीत ठेवण्याकरिता उत्कृष्ट समजले जाते. या फुलांचे गुच्छही चांगले होतात. कार्नेशनच्या फुलांना जागतिक बाजारपेठेत भरपूर मागणी असून बाजारभावही चांगला मिळतो. हे थंड हवामानात येणारे पीक असल्यामुळे महाराष्ट्रातील महाबळेश्वर, पुणे, नाशिक यांसारख्या थंड हवामानाच्या प्रदेशात या पिकाची शेतात लागवड करता येते. मात्र पॉलिहाऊसमध्ये वर्षभर कार्नेशनच्या चांगल्या प्रतीच्या फुलांचे उत्पादन घेता येते, हे नाशिक येथील प्रगतशील शेतकरी श्री. फिरोज मसानी यांनी सिद्ध करून दाखविले आहे. त्यांनी पॉलिहाऊसमध्ये वाढविलेली कार्नेशनची फुले निर्यातीसाठीदेखील उत्कृष्ट आहेत. कार्नेशनच्या फुलांच्या आधुनिक शेतीसाठी महाराष्ट्रामध्ये चांगला वाव आहे.

कार्नेशन लागवड महत्त्व । Importance of carnation cultivation.

कार्नेशनची फुलझाडे उद्यानातील आणि इमारतीच्या परिसरातील शोभा वाढविण्यासाठी लावतात. कार्नेशनचे झाड 2 ते 3 फुटांपर्यंत उंच वाढते. कार्नेशनच्या खोडावर हिरवी गवतासारखी पाने असतात. फुले खोडाच्या शेंड्यावर लागतात. कार्नेशनच्या फुलामध्ये पिवळा, लाल, गुलाबी, गर्द गुलाबी, जांभळा, पांढरा, तपकिरी अशा विविध रंगांच्या छटा असतात. एकाच फुलामध्ये एकाहून अधिक रंगछटाही दिसतात. रॉकगार्डनमध्येही या फुलांची लागवड केली जाते. गुच्छ तयार करण्यासाठी आणि फुलदाणीत ठेवण्याकरिता कार्नेशनची फुले उत्तम समजली जातात. कार्नेशनच्या फुलांना लवंगेसारखा मंद सुवास असतो. म्हणून कटफ्लॉवरसाठी या फुलांना जागतिक बाजारपेठेत चांगली मागणी आहे. पुणे, मुंबई, दिल्ली, कोलकाता, बडोदा यांसारख्या मोठ्या शहरांतील पंचतारांकित हॉटेल आणि श्रीमंत लोकांच्या दिवाणखान्यांमध्ये सजावटीसाठी या फुलांना चांगली मागणी असते.थंड आणि कोरड्या हवामानात उघड्या शेतात लागवड करून कार्नेशनचे उत्पादन घेता येते. पॉलिथीन -गृहामध्ये नियंत्रित वातावरणात कार्नेशनची लागवड केल्यास वर्षभर चांगल्या प्रतीची फुले मिळतात. या फुलांना असलेली मागणी आणि त्यांचे उत्पादन यांचा विचार करता या फुलांच्या लागवडीस सौम्य हवामानाच्या प्रदेशात आणि पॉलिथीनगृहात लागवड करण्यास भरपूर वाव आहे. परदेशात या फुलांपासून सुगंधी तेलही काढतात. . कार्नेशनपासून औषधी द्रव्येसुद्धा बनवितात.

कार्नेशन लागवडी खालील क्षेत्र । कार्नेशन पिकाचे उत्पादन । Areas under Carnation Cultivation. Production of carnation crop.

कार्नेशन या फुलझाडाचे उगमस्थान युरोपीय देशातील असून तेथून जगात इतरत्र या फुलझाडाचा प्रसार झाला. जगामध्ये इटली, कोलंबिया, फ्रान्स, जर्मनी, हॉलंड, इंग्लंड, कॅलिफोर्निया, ऑस्ट्रेलिया, केनिया, भारत, इस्राईल, इत्यादी देशांत या फुलांची लागवड केली जाते. भारतामध्ये हिमाचल प्रदेश, पंजाब, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, कर्नाटक, महाराष्ट्र, इत्यादी राज्यांत कार्नेशनची लागवड केली जाते. महाराष्ट्रात पुणे, नाशिक, सातारा, सांगली येथे थंड हवामान असलेल्या भागात कार्नेशनचे पीक चांगले येते. महाबळेश्वर येथे हिवाळी आणि उन्हाळी हंगामांत या पिकाची लागवड करता येते. नाशिक येथे श्री. फिरोज मसानी यांनी पॉलिथीन गृहामध्ये या फुलांची शेती यशस्वीरित्या केली आहे.या पिकाचे उत्पादन लागवडीचा हंगाम, लागवडीची पद्धत, लागवडीसाठी निवडलेली जागा या गोष्टींवर अवलंबून असते.

कार्नेशन पिकास योग्य हवामान । कार्नेशन पिकास योग्य जमीन । Suitable climate for carnation crop. Suitable land for carnation crop.

कार्नेशनच्या वाढीसाठी भरपूर सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. भरपूर सूर्यप्रकाश आणि थंड हवामानात कार्नेशनच्या पिकाची वाढ चांगली होते आणि चांगल्या प्रतीची फुले येतात. अतिप्रखर सूर्यप्रकाश आणि जोरदार पाऊस या पिकाला हानीकारक असतो. कार्नेशनच्या झाडाला 14 तास सूर्यप्रकाश मिळाला तर फुले लवकर येण्यास मदत होते. सरासरी 15 ते 18 अंश सेल्सिअस तापमानामध्ये वाढ झालेल्या कार्नेशनच्या फुलांचे रंग आकर्षक दिसतात. कार्नेशनच्या फुलझाडासाठी कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 14 अंश सेल्सिअस इतके असावे. रात्रीचे किमान तापमान 10 अंश सेल्सिअसपेक्षा कमी असल्यास कार्नेशनच्या फुलांच्या कळ्या उमलत नाहीत.

मध्यम प्रतीच्या काळ्या अथवा पोयट्याच्या आणि पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या जमिनीत कार्नेशनचे पीक चांगले येते. पाण्याचा निचरा चांगला झाला नाही तर कार्नेशनच्या पिकावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो. कार्नेशनच्या लागवडीसाठी जमिनीचा सामू 6 ते 7 असावा.
पॉलिथीन गृहामध्ये कार्नेशनची लागवड करताना पोयटा माती आणि उत्तम कुजलेले शेणखत टाकून जमीन तयार करतात. एक भाग पोयटा माती, एक भाग पीट आणि एक भाग वाळू यांचे मिश्रण कार्नेशनच्या लागवडीसाठी वापरल्यास फुलांचे भरपूर उत्पादन मिळते. पीट उपलब्ध नसल्यास त्याऐवजी चांगले कुजलेले शेणखत अथवा कंपोस्ट खत वापरावे.

कार्नेशन पिकाच्या उन्नत जाती । Improved varieties of carnation crop.

कार्नेशनच्या जातींचे खालीलप्रमाणे विविध प्रकार आहेतः

चबाऊड अथवा मार्गारेट कार्नेशन ।

या प्रकारामध्ये कार्नेशनच्या हंगामी प्रजातींचा समावेश होतो. या प्रकारातील कार्नेशनची फुले मोठ्या आकाराची आणि एकेरी अथवा दुहेरी असतात. मात्र काढणीनंतर ही फुले जास्त काळ टिकत नाहीत. या प्रकारातील कार्नेशनची अभिवृद्धी बियांपासून केली जाते.
या प्रकारात जायंट चबाऊड कॉम्पॅक्ट ड्वार्फ चबाऊड, एनफन्ट डी नाईस, फ्ल्यू डी कॅमेलिया, मार्गारिटा, इत्यादी जाती आहेत.

बॉर्डर आणि पिकोटी कार्नेशन ।

या प्रकारात फुलांचे समान भाग पडणारी गोलाकार फुले येतात. या प्रकारातील फुलांच्या पाकळ्या रुंद असतात आणि फुलांमध्ये एका रंगाच्या अथवा विविध रंगांच्या छटा दिसतात. या प्रकारातील कार्नेशनच्या झाडाला पहिल्या वर्षी एकच लांब दांडा येतो. नंतर मात्र झाड झुडपाप्रमाणे वाढते. बॉर्डर कार्नेशनचे फुलांच्या रंगानुसार बिझारीज, फ्लेक्स, सेल्फस, फॅन्सीज आणि पिकोटीज असे अनेक प्रकार आहेत.

(1) बिझारीज : उदाहरणार्थ, क्रिमझन बिझारीज, पिंक बिझारीज, पर्पल बिझारीज.

( 2 ) फ्लेक्स उदाहरणार्थ, स्कारलेट फ्लेक्स.

( 3 ) पिकोटी : या प्रकारातील फुले पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगांची असतात.

परपेच्युअल फ्लॉवरिंग कार्नेशन ।

या प्रकारात कार्नेशनच्या संकरातून निर्माण झालेल्या जातींचा समावेश होतो. या प्रकारातील कार्नेशनला वर्षभर फुले येतात. ही फुले चांगल्या प्रतीची असून काढणीनंतर जास्त दिवस टिकत असल्यामुळे दूरच्या बाजारपेठेत पाठवता येतात. शिवाय त्यांचे दांडे लांब असल्यामुळे त्यांना कटफ्लॉवरसाठी चांगली मागणी असते.

मालमिसन कार्नेशन ।

या प्रकारातील झाडांची पाने रुंद असतात. फुले मोठ्या आकाराची, दुहेरी आणि गुलाबी रंगाची असतात. फुले खूप सुगंधी असतात.
कार्नेशनचे वरील विविध प्रकार असले तरी फुलांच्या वापरानुसार स्टँडर्ड कार्नेशन आणि स्प्रे कार्नेशन असे दोन प्रमुख गट पडतात. स्टँडर्ड कार्नेशनला लांब दांड्यावर मोठ्या आकाराची फुले येतात. ह्या प्रकारची फुले थंड हवामानात चांगली येतात. स्प्रे कार्नेशनला फुलांचे दांडे आखूड असतात. फुलांचा आकारही लहान असतो आणि थोड्या उष्ण हवामानात ही फुले चांगली वाढतात.
कार्नेशनच्या काही महत्त्वाच्या जाती आणि त्यांचे रंग पुढीलप्रमाणे आहेत.

अ. क्र.फुलांचा रंगजातींची नावे
1पांढरा व्हाईट सीम, व्हाईट परफेक्शन, फ्रेंग्रंट ॲन, जॉर्ज ऑलवूड, आइसकॅप, मॅडोना, स्नोक्लोव्ह.
2गुलाबीबेलीज स्प्लेंडर, बेलीज सुप्रीम, पींक हेलेना, क्राऊली सीम, लिंडा, पिंक सीम, ऑलवूड्स् पिंक, शॉकिंग पिंक
3गर्द गुलाबी
(सालमन पिंक)
लेडी सीम, मेरी, प्रिन्सेस ऑफ वेल्स, पॅरिस पोर्ट्रेट
4गर्द लाल
(स्कारलेट)
ब्रिटानिया, रॉयल मेल, स्केनिया, विल्यम सीम, अॅलेक्स स्पार्क्स
5नारिंगी
(क्रिमझन)
बेलीज मास्टरपीस, डिप्लोमॅट, जोकर, रॉयल क्रिमसन
6पिवळायलो सीम, मेरी चबाऊड, ब्युटी ऑफ केंब्रिज, गोल्डन रेड, ऑलवूड्स् यलो, हेलिऑस
7जांभळा आणि लव्हेंडरमार्गारिट, स्टार्म, लॉ रायल
8अॅप्रिकॉट सेल्फस्हार्वेस्ट मून, मंडारीन सीम, टॅजेरीन सीम
9मिश्र रंगछटा
(फॅन्सीज्)
ऑर्थर सीम, कँडी सीम, डस्टी सीम, बेलीड अॅमॅरिल्लो, ऑरेंज ट्रायंफ, टँजेटी, लापका, डॅझलर, डस्टी रोज, सीम स्ट्राईप, रेड एज स्कायलाईन
फुलांच्या रंगानुसार कार्नेशनच्या जाती

कार्नेशन पिकाची अभिवृद्धी । कार्नेशन पिकाची लागवड पद्धती | Growth of carnation crop. Cultivation method of carnation crop |

कार्नेशनची अभिवृद्धी बियांपासून आणि शाखीय पद्धतीने करता येते. मार्गारिट म्हणजेच हंगामी कार्नेशनची अभिवृद्धी बियांपासून, पर्पेच्युअल फ्लॉवरिंग कार्नेशनची अभिवृद्धी छाट कलम पद्धतीने तर बॉर्डर कार्नेशनची अभिवृद्धी गुटी कलम पद्धतीने करतात..

बियांपासून अभिवृद्धी |

कार्नेशनची बियांपासून अभिवृद्धी करण्यासाठी उत्तम कुजलेले शेणखत आणि पोयटा माती टाकून गादीवाफे तयार करावेत. लाकडी खोकी किंवा बांबूच्या टोपल्यांत शेणखत आणि पोयटा माती आणि पानांचे खत सम प्रमाणात भरून त्यावर कार्नेशनचे बी पेरावे. बियांची पेरणी ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यांत करावी. बी पेरल्यापासून 5 ते 10 दिवसांत उगवून येते. नंतर 20 दिवसांत रोपे लागवडीसाठी तयार होतात.

छाटकलम पद्धतीने अभिवृद्धी |

मातृवृक्षाच्या खोडावर आणि फांद्यांवर फुटणाऱ्या बगल फुटींचा आणि शेंड्याकडील फाटे कलमांचा उपयोग करून कार्नेशनची अभिवृद्धी मोठ्या प्रमाणावर केली जाते. ज्या जातीची लागवड करायची आहे, त्या जातींची जातिवंत निरोगी कलमे खात्रीलायक ठिकाणाहून आणून मातृवृक्षाची लागवड करावी. पूर्ण वाढलेल्या एक वर्षाच्या मातृवृक्षापासून 15 ते 25 फाटे कलमे तयार होतात. फाटे कलम लावताना खालील बाबी लक्षात घ्याव्यातः

(1) कार्नेशनच्या फाटे कलमांना मुळे चांगली फुटण्यासाठी 15 ते 20 अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते. पॉलिथीन -गृहात नियंत्रित वातावरणात वर्षभर कार्नेशनची फाटे कलमे तयार करता येतात. परंतु नैसर्गिक हवामानात अशी छाट कलमे तयार करताना हवामानाचा विचार करणे आवश्यक आहे. पुणे, नाशिक आणि महाबळेश्वर या ठिकाणी जुलै महिन्यात किमान 7 फूट उंचीवर पॉलिथीनचे आच्छादन टाकून छाट कलमे तयार करतात. नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये छाट कलमे तयार केल्यास त्यांना चांगली मुळे फुटून मोठ्या प्रमाणावर छाट कलमे तयार करता येतात. उन्हाळ्यात छाट कलमांना चांगली मुळे फुटत नाहीत.

(2) छाट कलमे लावण्याकरिता योग्य माध्यम निवडण्याची गरज असते. एक भाग पोयटा माती, एक भाग पीट अथवा उत्तम कुजलेले शेणखत आणि एक भाग वाळू यांच्या मिश्रणात छाट कलमे लावली तर त्यांना चांगली मुळे फुटतात. वाळू, परलाईट, व्हर्मिक्युलाईट आणि ओले शेवाळ या माध्यमात छाट कलमांना चांगली मुळे फुटतात.

(3) खोडावरून अथवा उपफांद्यांवरून येणाऱ्या बगलफुटीचा 10 ते 15 सेंटिमीटर लांबीचा शेंडा काढून घ्यावा. त्यावर 4 ते 6 पानांच्या जोड्या असाव्यात. अशा प्रकारे निवडलेल्या छाट कलमाचा खालचा 1 सेंटिमीटर लांबीचा भाग एन. ए. ए. किंवा आय.बी.ए. किंवा आय. ए. ए. या संजीवकाच्या 250 ते 400 पीपीएम तीव्रतेच्या द्रावणात बुडवून लागवड केल्यास त्याला लवकर आणि जास्त मुळे फुटतात. लागवड करण्यापूर्वी छाट कलमे 10 लीटर पाण्यात 10 ग्रॅम बाविस्टीन या प्रमाणात मिसळून तयार केलेल्या द्रावणात भिजवून घ्यावीत. नंतर लागवड करताना कलमाची खालची दोन पाने जमिनीला टेकणार नाहीत अशा बेताने लावावीत. पाने जमिनीला टेकल्यास त्यावर बुरशीजन्य रोगाची वाढ सुरू होण्यास मदत होते. छाट कलमांची लागवड 5 सेंटिमीटर अंतरावर करावी. लागवडीनंतर 3 आठवड्यांत मुळे फुटतात आणि पुढे एक आठवड्यात मुळांची चांगली वाढ होते.

(4) मुळे फुटलेली छाट कलमे शीतगृहामध्ये 2 महिने तर मुळ्या न फुटलेली छाट कलमे 6 महिन्यांपर्यंत साठवून ठेवता येतात. शेतात कार्नेशनची लागवड करण्यासाठी जमिनीची नांगरट करून, कुळवून चांगली मशागत करावी. नंतर चांगले कुजलेले शेणखत मातीत मिसळावे. गादीवाफे तयार करावेत. गादीवाफ्यावरून पाण्याचा निचरा चांगला होतो. त्यामुळे मर रोगाचा उपद्रव कमी होतो. लागवडीपूर्वी वाफे फॉरमॅल्डिहाईडच्या द्रावणाने पूर्ण निर्जंतूक करून घ्यावेत. लागवडीपूर्वी ठिबक संचाची मांडणी करून घ्यावी.

कार्नेशन पिकास योग्य हंगाम । कार्नेशन पिकास योग्य लागवडीचे अंतर | Suitable season for carnation crop. Suitable planting distance for carnation crop |

कार्नेशनची लागवड खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामांत उघड्या शेतात करता येते. महाबळेश्वरसारख्या जास्त पावसाच्या प्रदेशात जोरदार पाऊस संपल्यावर म्हणजेच नोव्हेंबर महिन्यात या पिकाची लागवड करता येते. कारण नंतरच्या थंड हवामानात हे पीक चांगले येते. पुणे, नाशिक, सातारा आणि कोल्हापूर येथे कमी पाऊस पडणाऱ्या परंतु हवामान सौम्य असणाऱ्या भागात खरीप हंगामासाठी जून-जुलै महिन्यांत तर रब्बी हंगामासाठी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांत लागवड करता येते. जोरदार पावसाच्या किंवा कडक उन्हाळ्याच्या काळात कार्नेशनची लागवड करू नये.
पॉलिहाऊसमध्ये हवामानाचे घटक नियंत्रित केलेले असतात. त्यामुळे या पिकाची केव्हाही लागवड करता येते आणि वर्षभर उत्पादन मिळविता येते. कार्नेशन पिकासाठी लागवडीचे अंतर 15 X 15 सेंटिमीटर असावे. सर्वसाधारणपणे स्टँडर्ड कार्नेशन 20 X 15 सेंटिमीटर अंतरावर लावतात. अशा रितीने दर चौरस मीटर क्षेत्रामध्ये 30 ते 40 झाडे बसतात. पॉलिथीन -गृहात कार्नेशनच्या लागवडीसाठी 1 मीटर रुंद, 20 सेंटिमीटर उंच आणि 15 ते 20 मीटर लांबीचे गादीवाफे तयार करावेत. गादीवाफ्यावर 20 X 20 सेंटिमीटर अंतरावर रोपांची लागवड करावी. या अंतरावर लागवड केल्यास दर चौरस मीटर जागेत 25 झाडे बसतात.

कार्नेशन पिकास वळण । कार्नेशन पिकास आधार देण्याची पद्धत | Carnation crop rotation. Method of supporting carnation crop

कार्नेशनच्या पिकामध्ये शेंड्याकडील कळी खुडल्यास बाजूच्या फांद्यांची संख्या वाढते आणि एका झाडावर एका वेळी बरीच फुले घेता येतात. कार्नेशनच्या लागवडीनंतर सुमारे 4 आठवड्यांनी झाडाला 5 ते 6 पानांच्या जोड्या येतात. त्यानंतर जमिनीपासून 15 ते 25 सेंटिमीटर उंचीवर कार्नेशनच्या झाडाचा शेंडा खुडून टाकावा. त्यामुळे खोडावरील पानांच्या बगलेतील अंकुरांना वाढीची चालना मिळून जास्त फांद्या फुटतात. सर्व झाडे एकाच वेळी खुडणीस येत नसल्यामुळे 3 ते 4 आठवडे शेंडा खुडणीचे काम करावे. शेंडा खुडणीनंतर प्रत्येक झाडाला 5 ते 6 उपफांद्या वाढतात. कार्नेशनच्या स्टँडर्ड टाईपमध्ये जास्तीत जास्त 6 उपफांद्या ठेवून बाकीचे खालचे फुटवे काढावेत. फांदीच्या शेंड्याकडे कळी येण्यास सुरुवात झाल्यावर प्रत्येक झाडाजवळ बांबूच्या काठीचा आधार देऊन फांद्या 2-3 ठिकाणी ठरावीक उंचीवर बांधून झाडांना आधार द्यावा किंवा जमिनीच्या सपाटीपासून 12.5 सेंटिमीटर उंचीवर झाडांच्या ओळीतून वाफ्याच्या लांबीनुसार उभी-आडवी तार बांधावी. पिकाची उंची वाढत जाईल त्याप्रमाणे प्रत्येक 12.5 सेंटिमीटर उंचीवर उभ्या-आडव्या तारा बांधाव्यात. तारांना मधूनमधून लाकडी खांबांचे आधार द्यावेत. अशा पद्धतीने तारांचे जाळे बनवून फांद्यांना आधार दिल्यास फांद्या न मोडता लांब दांड्याची फुले मिळू शकतात.
कार्नेशनमध्ये काही जातींत कळीचे फुलात रूपांतर होताना कळी फुटून फूल खराब होते. खताची प्रमाणापेक्षा जास्त मात्रा देणे, जास्त तापमान, रात्रीच्या तापमानात अचानक बदल होणे, नत्राची मात्रा कमी होणे, बोरॉनची कमतरता असणे, इत्यादी कारणांमुळे कळी फुटण्याचे प्रमाण वाढते. हे टाळण्यासाठी मुख्य फांदीच्या शेंड्याकडील कळीने रंगाची छटा दाखवेपर्यंत बाजूच्या कळ्या खुडू नयेत. मुख्य फांदीवरील मोठ्या कळीला देठापासून एकतृतीयांश लांबीवर रबर बँड अडकवावा.

कार्नेशन पिकास खत व्यवस्थापन । कार्नेशन पिकास पाणी व्यवस्थापन | Fertilizer management of carnation crop. Carnation Crop Water Management |

कार्नेशनच्या चांगल्या वाढीसाठी आणि चांगल्या प्रतीच्या उत्पादनासाठी योग्य प्रमाणात खते देण्याची गरज असते. नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि बोरॉन ही रासायनिक द्रव्ये ठरावीक प्रमाणात दिल्यास चांगल्या प्रतीची अधिक फुले मिळतात. नत्रामुळे झाडाची शाखीय वाढ चांगली होऊन फुलांचे उत्पादन वाढते आणि प्रत सुधारते. नत्राची कमतरता असल्यास झाडांची वाढ जोमदार होत नाही. खोड बारीक राहून पाने कडक राहतात. जास्त प्रमाणात नत्र दिल्यास फुले उशिरा येतात आणि ही फुले जास्त दिवस टिकत नाहीत. स्फुरद आणि पालाशामुळे फुलांची प्रत सुधारते तसेच झाडाची रोगप्रतिकारकक्षमता वाढते.
बियांपासून लागवड केलेल्या कार्नेशनच्या हंगामी पिकाला हेक्टरी 150 किलो नत्र, 100 किलो स्फुरद आणि 125 किलो पालाश द्यावे. पॉलिथीन गृहामध्ये लागवड केलेल्या कार्नेशनच्या पिकाला पाणी देताना त्यातून 180-200 पीपीएम नत्र आणि 200 पीपीएम पालाश दिल्यास अधिक उत्पादन मिळते. कार्नेशनच्या पिकाला 50 मिलिग्रॅम नत्र, 62.5 मिलिग्रॅम स्फुरद आणि 75 मिलिग्रॅम पोटॅश लागवडीच्या वेळी दर चौरस मीटर क्षेत्रास आणि नंतर दरमहा 1.5 ग्रॅम नत्र आणि 2.25 ग्रॅम पालाश दर चौरस मीटर क्षेत्रास याप्रमाणे खते दिल्यास चांगल्या प्रतीची जास्त फुले मिळतात. नाशिक येथील प्रगतशील शेतकरी फिरोज मसानी हे लागवडीच्या वेळी 19:19:19 मिश्र खत हेक्टरी 250 किलो या प्रमाणात देऊन नंतर नत्र, स्फुरद आणि पालाश 200 पीपीएम तीव्रतेने पाण्याबरोबर देतात. कार्नेशनच्या पिकाला जरुरीपुरते परंतु नियमित पाणी द्यावे. जास्त प्रमाणात पाणी दिल्यास बुरशीजन्य रोगांचा उपद्रव होतो. पॉलिथीन -गृहात आर्द्रतेचे प्रमाण चांगले राखण्यासाठी आवश्यकतेप्रमाणे दिवसातून दोनदा ते चारदा पाण्याचा फवारा (मिस्टिंग) मारावा लागतो. कार्नेशनची झाडे मृदकाष्ठमय असल्याने त्यांच्याशी पाण्याचा सरळ संपर्क येऊ देऊ नये.

कार्नेशन पिकावरील महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण | Important pests of carnation crop and their control

कार्नेशनच्या पिकावर लाल कोळी, मावा, तुडतुडे, टॉरट्रिक्स मॉथ, सूत्रकृमी, इत्यादी किडींचा उपद्रव होतो.

लाल कोळी :

लाल कोळी कार्नेशनच्या पानाच्या खालील बाजूस राहतात आणि पानांतील रस शोषून घेतात. त्यामुळे पाने पिवळसर दिसू लागतात. पानांवर कोळ्यांची जाळी तयार होतात. किडीचा उपद्रव खूप वाढल्यास झाडांची वाढ खुंटते आणि फुलांची प्रतही कमी
होते.

उपाय : या किडीच्या नियंत्रणासाठी 10 लीटर पाण्यात 20 ग्रॅम पाण्यात मिसळणारे गंधक अथवा 10 मिलिलीटर डायमेथोएट या प्रमाणात मिसळून पिकावर फवारावे.

मावा :

मावा या किडीची पिल्ले आणि प्रौढ किडे झाडाच्या पानांतील रस शोषून घेतात. त्यामुळे पाने पिवळी पडू लागतात. पाने निस्तेज होतात आणि त्यांची वाढ खुंटते. ही कीड पानाफुलांच्या देठांवर तसेच फुलांच्या पाकळ्यांवर राहून रस शोषून घेते. त्यामुळे फुलांची प्रत खराब होते.
उपाय : या किडीच्या नियंत्रणासाठी 10 लीटर पाण्यात 10 मिलिलीटर मॅलॅथिऑन (50%) अथवा 10 मिलिलीटर रोगार (डायमेथोएट 30%) या प्रमाणात मिसळून पिकावर फवारावे.

फुलकिडे :

ही कीड पानांच्या मागील बाजूस राहते आणि पानांतील अन्नरस शोषून घेते. अन्नरस शोषून घेण्यासाठी ही कीड पानाचा वरचा भाग खरवडते. त्यामुळे पानाच्या मागील बाजूस खरचटल्यासारखे डाग दिसतात. कळ्या आणि फुलांच्या पाकळ्यांवरही ही कीड राहते. त्यामुळे कळ्या आणि फुले काळपट पडतात. त्यांची प्रत खराब होते.
उपाय : या किडीच्या नियंत्रणासाठी पिकावर 10 लीटर पाण्यात 10 मिलिलीटर मेथोएट या प्रमाणात मिसळून फवारावे.

टॉरॅट्रिक्स मॉथ :

या किडीच्या अळ्या चंदेरी रंगाच्या धाग्यांच्या साहाय्याने कार्नेशनची काही पाने एकत्र गुंडाळतात आणि त्यात लपून राहून अधाशाप्रमाणे पाने खातात. ही अळी झाडाचे शेंडे खाते तसेच कळ्यांमध्ये घुसून आतील भागावर उपजीविका करते. अळीने पाने गुंडाळून त्यात राहण्यास सुरुवात केल्यानंतर अळीचे नियंत्रण करणे अतिशय कठीण असते.
उपाय : या अळीच्या नियंत्रणासाठी 10 लीटर पाण्यात 10 मिलिलीटर पॅरॅथिऑन या प्रमाणात मिसळून फवारावे.

सूत्रकृमी :

कार्नेशनच्या पिकावर सूत्रकृमींच्या 15 ते 20 जातींचा उपद्रव होतो. सूत्रकृमी झाडाच्या मुळांमधील पेशींमध्ये राहून आतील अन्नरसावर उपजीविका करतात. त्यामुळे झाडाच्या मुळांची वाढ खुंटते. झाडाला अतिशय कमी प्रमाणात फुले येतात.
उपाय : या किडीच्या नियंत्रणासाठी कार्नेशनची लागवड करताना निर्जंतूक केलेली माती वापरावी.

कार्नेशन पिकावरील महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण | Important diseases of carnation crop and their control

कार्नेशनच्या पिकावर मर रोग, खोडकूज, पानावरील ठिपके, इत्यादी रोगांचा प्रादुर्भाव होतो.

मर रोग :

कार्नेशनच्या पिकाला मर (फ्युजेरियम बिल्ट) या रोगाची फार मोठ्या प्रमाणावर लागण होऊन पिकाचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. या रोगामुळे झाडाची पाने पिवळी पडून सुकतात. झाडांची वाढ खुंटते. जमिनीलगतच्या खोडावरील साल काळपट पडल्यासारखी दिसते. रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यास संपूर्ण झाड सुकून वाळून जाते.

उपाय : या रोगाचे नियंत्रण करण्यासाठी सुरुवातीपासून काळजी घ्यावी लागते. पिकांच्या लागवडीसाठी पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन आणि रोगप्रतिकारक जातींची निवड करावी. रोगाची लागण झालेली दिसताच अशी झाडे उपटून नष्ट करावीत. या रोगाची बुरशी मातीत वाढते. म्हणून लागवडीपूर्वी माती निर्जंतूक करून घ्यावी.

खोडकूज :

कार्नेशनच्या पिकावर फ्युजेरियम रोझियम नावाच्या बुरशीमुळे खोडकूज हा रोग होतो. या बुरशीची लागण जमिनीजवळील खोडाजवळ जास्त प्रमाणात होते आणि बुरशी खोडाच्या आतील भागात प्रवेश करते. त्यामुळे खोड कुजून संपूर्ण झाड मरते.
उपाय : या रोगाची बुरशी जमीनीत वाढते. म्हणून लागवडीसाठी निर्जंतूक केलेली माती वापरावी.

पानावरील ठिपके :

या बुरशीजन्य रोगामुळे कार्नेशनच्या पानांवर आणि खोडावर ठिपके पडतात. त्यामुळे पाने वाळतात आणि पूर्ण वाढ होण्यापूर्वीच गळून पडतात.
उपाय : या रोगाच्या नियंत्रणासाठी 10 लीटर पाण्यात 25 ग्रॅम डायथेन एम-45 या प्रमाणात मिसळून पिकावर फवारावे.

कार्नेशन पिकामधील शारीरिक विकृती आणि त्यांचे नियंत्रण | Physiological disorders in carnation crop and their control

कळी फुटणे (कॅलिक्स स्प्लिटिंग) :

कार्नेशनमध्ये कॅलिक्स स्प्लिटिंग म्हणजेच फुलाचा निदलपुंज फाटणे ही विकृती दिसून येते. सुमारे 10 ते 20% फुलांमध्ये ही विकृती दिसून येते. निदलपुंज फाटल्यामुळे फुलांचे भाग व्यवस्थित ठेवण्याचे कार्य नीट होत नाही आणि निदलपुंज एका बाजूस फाटून फुलांचे आतील भाग बाहेर पडलेले दिसतात. अशा फुलांना बाजारात किंमत मिळत नाही. ही विकृती एक तर आनुवंशिक असते किंवा वातावरणातील तापमान आणि इतर घटकांचा परिणाम तसेच नायट्रोजन आणि बोरॉन या द्रव्यांची कमतरता झाल्यामुळे दिसून येते.
उपाय : या विकृतीस बळी न पडणाऱ्या जातींची लागवडीसाठी निवड करावी. फुले कळीच्या अवस्थेत असताना तापमानात बदल होण्याची शक्यता असेल तर कळीभोवती रबर बँड गुंडाळावे.

चुरगळलेले शेंडे (कर्ली टिप) :

या विकृतीमध्ये फांद्यांचे शेंडे चुरगळल्यासारखे दिसतात. अशा चुरगळलेल्या शेंड्यांची वाढ होत राहिल्यास त्यांना विशिष्ट नागमोडी आकार येतो. कमी सूर्यप्रकाश आणि कमी तापमानात ही विकृती आढळून येते. नत्राची कमतरता असल्यास काही प्रमाणात ही विकृती दिसून येते..
उपाय : या विकृतीच्या नियंत्रणासाठी पिकाला स्वच्छ सूर्यप्रकाश मिळेल अशी व्यवस्था करावी. योग्य तापमान राखावे. पिकाला नत्र खताचा योग्य प्रमाणात पुरवठा करावा.

कार्नेशन पिकामधील तणांचे नियंत्रण | Control of Weeds in Carnation Crop |

कार्नेशन हे बहुवर्षायु पीक म्हणून लावले जाते म्हणून सुरुवातीपासूनच तणनियंत्रणाबाबत योग्य काळजी घ्यावी. कार्नेशनच्या पिकाला तारांचा आधार द्यावा लागत असल्यामुळे लागवडीनंतर शेतात आंतरमशागत करणे कठीण जाते. म्हणूनच लागवडीपूर्वी हरळी, लव्हाळा, कुंदा यांसारख्या तणांच्या नियंत्रणासाठी खोल नांगरणी करून तणांची मुळे काढून टाकावीत. लागवडीनंतर शेतात उगवणारी घोळ, दीपमाळ, पांढरी फुली, आघाडा, शिंपी, कोंबडा यांसारखी तणे खुरपणी करून काढून टाकावीत.

कार्नेशन फुलांची काढणी, उत्पादन आणि विक्री | Harvesting, production and sale of carnation flowers |

चबाऊड (हंगामी) कार्नेशनची लागवड केल्यापासून अडीच ते तीन महिन्यांत फुले येतात. ही फुले लांब दांड्यासह काढून विक्रीसाठी पाठवतात.
परपेच्युअल फ्लॉवरिंग (बहुवर्षायु) कार्नेशनची लागवड केल्यानंतर सुमारे 5 महिन्यांनी फुलांची काढणी सुरू होते. फूल 75% उमलल्यानंतर लांब दांड्यासह छाटून घ्यावे आणि लगेच पाण्यात ठेवावे. उन्हाळ्यामध्ये हिवाळी हंगामाच्या तुलनेत थोडे लवकर म्हणजे जास्त उमलण्यापूर्वी फुलांची काढणी करावी. स्टँडर्ड कार्नेशनची फुले दूरच्या बाजारपेठेत पाठवायची असतील तर काढल्यानंतर काही काळ थंड जागी ठेवतात. स्टँडर्ड कार्नेशनसाठी फुलांच्या बाहेरील सर्व पाकळ्यांवर रंगाची छटा दिसू लागल्यावर म्हणजेच फुलाच्या कळीतील बाहेरील रंगाच्या पाकळ्या देठाशी 90 अंशांचा कोन करतात, अशा अवस्थेत फुलांची काढणी करावी. स्कार्नेशनच्या बाबतीत फुलांच्या दांड्यावरील दोन फुले पूर्ण उमलल्यानंतर आणि इतर फुले रंग दाखवू लागल्यानंतर फुलांची काढणी करावी. फुले धारदार चाकूने छाटून घ्यावीत. फुलांची काढणी 8 महिने चालू राहते आणि या काळात प्रत्येक झाडापासून फुलांचे 6 ते 8 दांडे मिळतात. दर चौरस मीटर क्षेत्रातून फुलांचे सुमारे 200 दांडे मिळतात.

कार्नेशन फुलांचे पॅकेजिंग आणि साठवण | Packaging and Storage of Carnation Flowers |

फुले काढल्यानंतर फुलांचे दांडे लगेच 2-4 तास पाण्यात अथवा संरक्षक द्रावणात बुडवून ठेवावेत. त्यानंतर फुलांचे प्रीकूलिंग करावे. प्रीकूलिंगसाठी 0.6 ते 0 अंश सेल्सिअस तापमान आणि 90% सापेक्ष आर्द्रता असावी किंवा 10 अंश सेल्सिअस तापमान आणि 98% सापेक्ष आर्द्रता असावी. नंतर फुलांची प्रतवारी करावी. कार्नेशनची प्रतवारी करताना फुलांच्या दांड्याची लांबी, फुलांचा आकार, रंग, रोगाचा आणि कॅलिक्स स्प्लिटिंगचा अभाव या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात.
कार्नेशनच्या फुलांच्या रंगानुसार आणि आकारानुसार 20 ते 25 फुलांची एक याप्रमाणे जुड्या बांधतात. 8 ते 10 जुड्या प्लास्टिक क्रेटमधून अथवा पुठ्याच्या खोक्यात भरून विक्रीसाठी पाठवितात.
0 अंश सेल्सिअस तापमान आणि 90% आर्द्रता अशा नियमित शीतगृहात 4 ते 6 आठवड्यांपर्यंत कार्नेशनची फुले साठवून ठेवता येतात.

सारांश |

कार्नेशन हे एक सुगंधी, आकर्षक आणि फुलदाणीत जास्त काळ टवटवीत राहणारे फूल असून देशी व परदेशी बाजारपेठेत त्याला चांगली मागणी आहे. थंड आणि कोरड्या हवामानात कार्नेशनचे पीक चांगले येते. मध्यम प्रतीच्या अथवा सुपीक पोयटा मातीच्या पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत कार्नेशनच्या पिकाची वाढ चांगली होते.
पॉलिहाऊसमध्ये कार्नेशनचे पीक जोमदारपणे वाढून चांगल्या प्रतीची भरपूर फुले मिळतात. कार्नेशनचे (1) चबाऊड अथवा मार्गारेट, (2) बॉर्डर आणि पिकोटी, (3) परपेच्युअल, आणि (4) मालमिसन असे चार प्रकार आहेत. कार्नेशनची फुले मोठ्या आकाराची आणि लांब दांड्यावर येतात, तेव्हा त्यांना स्टैंडर्ड स्प्रे कार्नेशन असे म्हणतात. आखूड दांड्यावर लहान आकाराची फुले येतात तेव्हा त्यांना स्प्रे कार्नेशन असे म्हणतात. कार्नेशनचे झाड 2 ते 3 फूट उंच वाढते. कार्नेशनची फुले फुलदाणीत ठेवण्यासाठी आणि गुच्छासाठी मोठ्या प्रमाणावर वापरली जातात.

हंगामी कार्नेशनची (चबाऊड) अभिवृद्धी बियांपासून करतात. परपेच्युअल कार्नेशनची अभिवृद्धी छाट कलमापासून करतात. छाट कलम तयार करण्यासाठी झाडाच्या खोडावरील 10 ते 15 सेंटिमीटर लांबीची बगल फूट घेऊन गादीवाफ्यावर अथवा पॉलिथीनच्या पिशवीत लावतात. चार आठवड्यांत या छाटाला मुळे फुटून तीन आठवड्यांत मुळांची वाढ पूर्ण होते. उघड्या शेतामध्ये पावसाचा जोर कमी झाल्यावर छाट कलमांची लागवड करतात. पॉलिहाऊसमध्ये वर्षभरात केव्हाही कार्नेशनची लागवड करता येते. लागवडीचे अंतर 15X15 अथवा 20 X 20 सेंटिमीटर ठेवतात. लागवडीनंतर 4 आठवड्यांनी पिकाला 5 ते 6 पानांच्या जोड्या आल्यावर 15 ते 25 सेंटिमीटर उंचीवर झाडाचा शेंडा खुडतात. त्यामुळे झाडाला अनेक उपफांद्या फुटतात. झाडाला ओळीमधून आडव्या आणि उभ्या (पूर्व-पश्चिम आणि दक्षिणोत्तर) तारा ओढून आधार देतात.

लागवड केल्यानंतर 5 महिन्यांनी फुलांची काढणी सुरू होते आणि पुढे 8 महिने सतत चालू राहते. कार्नेशनचे फूल 75 % उमलल्यावर लांब दांड्यासह फुलाची काढणी करावी. काढणीनंतर फुलाचा दांडा लगेच 2 ते 4 तास पाण्यात ठेवावा. नंतर 20 ते 50 फुलांची एक जुडी याप्रमाणे फुलांच्या जुड्या बांधून प्लास्टिक क्रेट्स् अथवा अन्य खोक्यांतून विक्रीसाठी पाठवितात. दर चौरस मीटर क्षेत्रातून कार्नेशनचे सुमारे 200 फुलांचे दांडे मिळतात.

Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )