चारोळी लागवड |Charoli Lagwad | Charoli Sheti| चारोळी पिकाचा उगमस्थान, महत्त्व आणि भौगोलिक प्रसार । चारोळी पिकाखालील क्षेत्र । चारोळी पिक उत्पादन ।चारोळी पिकास योग्य हवामान । चारोळी पिकास योग्य जमीन । चारोळी पिकाच्या सुधारित जाती ।चारोळी पिकाची अभिवृद्धी । चारोळी पिकाची लागवड ।चारोळी पिकास हंगाम । चारोळी पिकास लागवडीचे अंतर ।चारोळी पिकास खत व्यवस्थापन । चारोळी पिकास पाणी व्यवस्थापन ।चारोळी पिकातील आंतरपिके । चारोळी पिकातील आंतरमशागत ।चारोळीच्या फळांची काढणी, उत्पादन आणि विक्री ।
।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।
चारोळी लागवड |Charoli Lagwad | Charoli Sheti|
महाराष्ट्रात चारोळी हे एक महत्त्वाचे कोरडवाहू फळझाड आहे. कोकणातील उष्ण आणि दमट हवामानापासून विदर्भातील हिवाळयात कडक थंडीतही चारोळीची झाडे चांगली वाढतात आणि भरपूर उत्पादन देतात. आदिवासी भागात या झाडाला ‘चार’ असे म्हणतात. पोषणमूल्याच्या बाबतीत चारोळीची तुलना बदामाशी केली जाते. चारोळी लागवड आणि उत्पादनांला महाराष्ट्रात चांगला वाव आहे.
चारोळी पिकाचा उगमस्थान, महत्त्व आणि भौगोलिक प्रसार ।
चारोळीच्या उगमस्थानाबाबत निश्चित माहिती उपलब्ध नाही. परंतु भारतातील विविध राज्यांत जंगलांमध्ये आणि डोंगराळ भागात चारोळीची झाडे आढळून येतात. महाराष्ट्रात शहरी आणि ग्रामीण भागात चारोळी लोकप्रिय असून चारोळीला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. परंतु भारतात अथवा महाराष्ट्रात चारोळीची स्वतंत्र लागवड केली जात नाही. चारोळीचे उत्पादन केवळ जंगलात आणि अतिशय कमी प्रमाणात होते. म्हणूनच चारोळीच्या लागवडीस महाराष्ट्रात भरपूर वाव आहे.
चारोळीचा उपयोग बासुंदी, श्रीखंड, बर्फी, आइस्क्रीम आणि इतर मिठाईच्या पदार्थांमध्ये फार मोठ्या प्रमाणात केला जातो. चारोळीचे बी अत्यंत पौष्टिक असून त्यामध्ये प्रथिने, शर्करा आणि तेल (फॅट्स) भरपूर प्रमाणात असतात. चारोळीचे बी पित्त, वायू आणि रक्तदोषावर गुणकारी आहे. चारोळीच्या झाडाच्या सालीपासून डिंक आणि टॅनीन मिळते. चारोळीची पाने जनावरांना चारा म्हणून देतात.
चारोळी पिकाखालील क्षेत्र । चारोळी पिक उत्पादन ।
चारोळीची लागवड भारतात स्वतंत्रपणे केली जात नाही. त्यामुळे चारोळी लागवडीखालील क्षेत्र आणि चारोळीचे उत्पादन यांविषयी माहिती उपलब्ध नाही. भारतात कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, ओरिसा, इत्यादी राज्यांतील जंगलांमध्ये आणि डोंगराळ भागात चारोळीची झाडे आढळतात. महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यातील नांदेड भागातील किनवटच्या जंगलात, विदर्भातील बुलढाणा, अकोट, रामटेक आणि भंडारा भागात तर कोकणातील रत्नागिरी, राजापूर, मालवण, आणि ठाणे जिल्ह्यात चारोळीची झाडे दिसून येतात.
चारोळी पिकास योग्य हवामान । चारोळी पिकास योग्य जमीन ।
चारोळीच्या झाडाला उष्ण आणि कोरडे हवामान चांगले मानवते. उष्ण आणि दमट हवामानातही चारोळीची झाडे चांगली वाढतात. कमी पावसाच्या तसेच अतीपावसाच्या प्रदेशात चारोळीची झाडे वाढलेली दिसून येतात.
चारोळी कोकणातील तांबड्या जमिनीत, डोंगरउतारावरील जमिनीत, दुष्काळी भागातील हलक्या जमिनीत, मध्यम काळ्या जमिनीत, पोयट्याच्या जमिनीत, नदी ओढे अथवा नाले यांच्या काठांवरील उंचसखल जमिनीत चांगले वाढते.
चारोळी पिकाच्या सुधारित जाती ।
चारोळीची स्वतंत्रपणे लागवड केली जात नाही, तसेच चारोळीच्या जातीबाबत फारसे संशोधन झालेले नाही. चारोळीच्या जास्त उत्पादन देणाऱ्या सुधारित जाती उपलब्ध नाहीत. चारोळीची लागवड करताना खात्रीशीर ठिकाणाहून जास्त उत्पादन देणाऱ्या झाडाचे बी मिळवून चारोळीची लागवड करावी.
चारोळी पिकाची अभिवृद्धी । चारोळी पिकाची लागवड ।
चारोळीची अभिवृद्धी बियांपासून करतात. चारोळीची फळे आकाराने करवंदापेक्षा लहान किंवा काही वेळा करवंदाएवढी असतात. चारोळीची फळे सुरुवातीला हिरव्या रंगाची असतात. फळे पिकल्यानंतर काळसर रंगाची होतात. चारोळीच्या फळांमधील कठीण कवच असणाऱ्या बियांना चारोळी असे म्हणतात. या बियांचा उपयोग चारोळीची रोपे तयार करण्यासाठी करतात. चारोळीची रोपे एप्रिल-मे महिन्यात पॉलिथीनच्या पिशव्यांमध्ये तयार करावीत. 15 सेंटिमीटर रुंद आणि 20 ते 22 सेंटिमीटर लांबीच्या पॉलिथीनच्या पिशव्या शेणखत आणि पोयटा मातीच्या मिश्रणाने भरून त्यामध्ये चारोळीचे बी पेरावे. गादीवाफ्यावर बिया पेरूनही चारोळीची रोपे तयार करता येतात. बियांची पेरणी करण्यासाठी फळांमधील कठीण कवच फोडून आतील मऊ बी काढून ते पिशवीत पेरावे. बिया पेरल्यावर पिशव्यांना लगेच पाणी द्यावे. त्यानंतर रोज नियमित पाणी द्यावे. सुमारे 8 ते 10 दिवसांत या बियांची उगवण होते. चारोळीची रोपे आंबा, चिंच, बोर, काजू या कोरडवाहू फळझाडांच्या रोपांप्रमाणे जोमदार वाढत नाहीत. रोपांची वाढ जोमदारपणे होण्यासाठी पिशव्यांतील माती अधूनमधून हलवावी आणि अगदी थोडा थोडा युरिया रोपांना देऊन ताबडतोब भरपूर पाणी द्यावे. ही रोपे पुढील वर्षीच्या पावसाळयात लागवडीयोग्य होतात. चारोळीची लागवड चौरस पद्धतीने करावी. रोपांच्या लागवडीसाठी 60 X 60X60 सेंटिमीटर आकाराचे खड्डे घ्यावेत. खड्डे भरताना खड्ड्याच्या तळाशी वाळलेला पालापाचोळा, वाळलेले गवत, भाताचा पेंढा किंवा उसाचे पाचट यांचा एक वीतभर जाडीचा थर द्यावा. त्यात अधूनमधून लिंडेन भुकटी (10%) मिसळावी. नंतर खड्डे चांगले कुजलेले शेणखत, 1 किलो सुपर फॉस्फेट यांच्या मिश्रणाने भरावेत. शेणखतात लिंडेन (10%) भुकटी मिसळावी. प्रत्येक खड्डयात चारोळीचे एक रोप लावावे. लागवडीनंतर रोपांना लगेच पाणी द्यावे.
चारोळी पिकास हंगाम । चारोळी पिकास लागवडीचे अंतर ।
चारोळीच्या रोपांची लागवड 5 x 5 मीटर अंतरावर करावी. पावसाळ्याच्या सुरुवातीला जून-जुलै महिन्यात चारोळीच्या रोपांची शेतात लागवड करावी. लागवडीनंतर रोपांना लगेच पाणी द्यावे.
चारोळी पिकास खत व्यवस्थापन । चारोळी पिकास पाणी व्यवस्थापन ।
चारोळीच्या रोपांची जोमदार वाढ होण्यासाठी आणि भरपूर उत्पादन मिळण्यासाठी प्रत्येक रोपाला पहिली 3-4 वर्षे मिश्रखत द्यावे. त्यानंतर 3 ते 4 आठवड्यांच्या अंतराने प्रत्येक रोपास दोन वेळा 50 ग्रॅम युरिया द्यावे. लागवडीनंतर 5 वर्षांपासून पुढे प्रत्येक झाडास 4 ते 5 घमेली शेणखत आणि 500 ग्रॅम युरिया द्यावा. पाऊस नसल्यास खते दिल्यानंतर रोपांना भरपूर पाणी द्यावे. चारोळीच्या रोपांची वाढ हळू होते. रोपांची जोमदार वाढ होण्यासाठी रोपांना सुरुवातीची दोन वर्षे हिवाळयात 5-6 दिवसांच्या अंतराने तर उन्हाळ्यात 2-3 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. पावसाळा संपल्यानंतर प्रत्येक झाडाभोवती आळयात गवताचे, भाताच्या पेंढ्यांचे किंवा उसाच्या पाचटाचे आच्छादन करावे.
चारोळी पिकातील आंतरपिके । चारोळी पिकातील आंतरमशागत ।
सुरुवातीची 2-3 वर्षे चारोळीच्या झाडामध्ये श्रावणघेवडा, गवार, मूग, उडीद, मटकी, तीळ, कारळी, चवळी, झेंडू तसेच झाडे थोडी मोठी झाल्यावर तूर, करडई, एरंडी, शेवगा, कढीपत्ता, इत्यादी आंतरपिके घ्यावीत.
चारोळीच्या फळांची काढणी, उत्पादन आणि विक्री ।
चारोळीच्या रोपांपासून लागवडीनंतर 7 ते 8 वर्षांनंतर उत्पादन मिळण्यास सुरुवात होते. साधारणपणे दहा वर्षांनंतर चारोळीच्या झाडापासून भरपूर उत्पादन मिळण्यास सुरुवात होते. चारोळीच्या प्रत्येक झाडापासून 10 किलो फळे मिळतात. दरवर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यांमध्ये चारोळीच्या झाडांना मोहोर येतो आणि एप्रिल-मे महिन्यांत फळे पक्व होऊन चारोळी मिळण्यास सुरुवात होते. चारोळीच्या फळांचा रंग काळा झाल्यानंतर फळे पक्क झाली असे समजून फळांची काढणी करावी. काढणीनंतर फळे पाण्यात सुमारे 3 ते 4 दिवस भिजत ठेवावीत. नंतर फळांचा काळा गर हाताने चोळून काढून टाकावा आणि बी वेगळे करावे. हे कठीण कवच असलेले बी सावलीत वाळवितात.
वाळलेली कठीण फळे जात्यावर अगदी हलकेच भरडतात. त्यामुळे कठीण कवच फुटून आतील बी वेगळे होते. यालाच चारोळी म्हणतात. चारोळीच्या चांगल्या वाढलेल्या प्रत्येक झाडापासून सुमारे दोन किलो चारोळी मिळते. जसजसे झाडाचे वय वाढत जाते तसतसे चारोळीचे उत्पादन वाढत जाते.
सारांश ।
चारोळी हे एक महत्त्वाचे कोरडवाहू फळझाड आहे. चारोळीच्या बियांमध्ये प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स् आणि फॅट्स् (तेल) भरपूर प्रमाणात असतात. महाराष्ट्रात चारोळीचा उपयोग प्रामुख्याने बासुंदी, श्रीखंड, बर्फी, आइस्क्रीम आणि इतर मिठाईच्या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. परंतु महाराष्ट्रात चारोळी पूर्णपणे इतर राज्यांतून आयात करावी लागते. म्हणून महाराष्ट्रात चारोळी लागवडीस फार मोठा वाव आहे. चारोळीची झाडे उष्ण, दमट तसेच उष्ण आणि कोरड्या हवामानात चांगली वाढतात. चारोळीच्या लागवडीसाठी विशिष्ट प्रकारच्या जमिनीची आवश्यकता नसते. अत्यंत हलक्या ते भारी जमिनीत चारोळीची झाडे लावता येतात.
चारोळीच्या सुधारित जाती उपलब्ध नाहीत. चारोळीच्या अधिक उत्पादन देणाऱ्या झाडांच्या बियांपासून रोपे तयार करून चारोळीची लागवड करावी. चारोळीची स्वतंत्रपणे लागवड करताना 5 x 5 मीटर अंतरावर झाडे लावावीत.
रोपांच्या लागवडीनंतर 7-8 वर्षांनी उत्पादन मिळण्यास सुरुवात होते. चारोळीच्या पूर्ण वाढलेल्या झाडापासून 10 ते 15 किलो फळे आणि दोन किलो चारोळी मिळतात.