छत्रपती महाराणी ताराबाई भोसले (Chhatrapati Maharani Tarabai Bhosale)

।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।

छत्रपती महाराणी ताराबाई भोसले – Chhatrapati Maharani Tarabai Bhosale

छत्रपती महाराणी ताराबाई भोसले (१६७५ – १७६१) ह्या छत्रपती राजाराम महाराज यांच्या पत्‍नी होत्या. या छत्रपती शिवाजी महाराज यांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या होती. ताराबाईंचे लग्न छत्रपती राजाराम महाराजांशी १६८७ च्या सुमारास झाले. २५ मार्च १६८९ रोजी मोगलांनी रायगडास वेढा घातला असता त्या छत्रपती राजाराम यांच्यासह रायगडावरून निसटून गेल्या. छत्रपती राजाराम जिंजीला गेल्यानंतर महाराणी ताराबाई, राजसबाई व अंबिकाबाई या विशाळगड येथे राहिल्या. रामचंद्रपंत अमात्य यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विशाळगड येथे लष्करी व मुलकी व्यवहाराची माहिती घेतली. १६९४ साली त्या तिघी जिंजीला पोहचल्या. ९ जून १६९६ रोजी महाराणी ताराबाईंना शिवाजी द्वितीय हा पुत्र झाला.

राजाराम महाराजांच्या निधनानंतर राज्यकारभाराची सर्व सूत्रे हाती घेउन ताराबाईंनी मोगली फौजांना मागे सारण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी मराठेशाहीतील मुत्सद्यांना काळाचे गांभीर्य समजावून देऊन शेवटपर्यंत या सगळ्यांबरोबर एकजुटीने राहून शत्रू थोपवून धरला. त्या स्वतः लष्करापुढे येउन लष्कराचा आत्मविश्वास वाढवित. मराठ्यांची खालावलेली आर्थिक परिस्थिती उंचावण्यासाठी त्यांनी मोगली मुलुखावर स्वाऱ्या करून चौथाई आणि सरदेशमुखी गोळा करून आर्थिक बळ वाढवले.

ताराबाईंनी करवीर राज्याची म्हणजे कोल्हापूरच्या राजगादीची त्यांनी स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यामागे त्यांनी समर्थपणे राज्याची धुरा सांभाळली. सरसेनापती संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांना बरोबर घेऊन त्यांनी मोगलांना सळो की पळो करून सोडले.

दिल्ली झाली दीनवाणी| दिल्लीशाचे गेले पाणी | ताराबाई रामराणी | भद्रकाली कोपली ||
ताराबाईच्या बखते | दिल्लीपतीची तखते | खचो लागली तेवि मते | कुराणेही खंडली ||
रामराणी भद्रकाली | रणरंगी कृद्ध झाली | प्रलयाची वेळ आली | मुगलहो सांभाळा || “

असे तत्कालीन कवि गोविंद यांनी ताराबाईचे वर्णन केले आहे.

ताराबाई औरंगजेबाच्या प्रचंड मुघल सैन्याविरुद्ध उभ्या ठाकल्या असताना केवळ २४ ते २५ वर्षांच्या होत्या. त्यांनी औरंगजेबासारख्या मुत्सदी, नृशंस व कपटी सम्राटाशी सलग साडेसात वर्षे लढा दिला.

महाराणी ताराबाई भोसले यांचे जीवन – Life of Maharani Tarabai Bhosale

सन १७०० साली छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्याचे उत्तराधिकार छत्रपती शाहू महाराजांकडे वारसाहक्काने जायला हवे होते. त्यावेळी शाहूराजे त्यावेळी वयाने खूपच लहान होते आणि नंतरच्या काळात मोगलांच्या कैदेत होते. ताराबाईंनी आपला मुलगा शिवाजी ह्याला गादीवर बसवले, आणि रामचंद्रपंत अमात्य यांच्या सल्ल्याने मराठा राज्याचा कारभार पाहण्यास सुरुवात केली.

औरंगजेबाच्या मृत्यूनंतर संभाजी राजांचे पुत्र शाहू यांची मोगलांनी सुटका करताना महाराष्ट्रात दुहीचे बीज पेरले. शाहू हेच मराठा राज्याचे उत्तराधिकारी असल्याचे अनेक सरदार, सेनानी यांना वाटू लागले. दोन्ही बाजूंनी छत्रपतीपदाच्या वारसा हक्कावरून संघर्ष सुरू झाला. या काळात ताराबाईच्या पक्षातले खंडो बल्लाळ, बाळाजी विश्वनाथ, धनाजी जाधव यांसारखे सेनानी आणि मुत्सद्दी शाहूंच्या पक्षात गेले. शाहूराजांनी महाराणी ताराबाई आणि त्यांचा पुत्र शिवाजी दुसरा यांच्याविरुद्ध युद्ध पुकारले. १७०७ साली खेड येथे झालेल्या लढाईत बाळाजी विश्वनाथ ह्या पेशव्याच्या कुशल नेतृत्वाखाली शाहूराजांची सरशी झाली. ताराबाईंनी जिंकलेले सर्व किल्ले शाहूला मिळाले. शाहूच्या पक्षात गेलेले बाळाजी विश्वनाथ यांनी ताराराणीच्या पक्षातील उदाजी चव्हाण, चंद्रसेन जाधव, कान्होजी आंग्रे , पिलाजी गोळे आदी सेनानींना शाहूच्या बाजूला वळवून घेतले. त्यामुळे शाहूचा पक्ष बळकट झाला. शाहूंनी साताऱ्याला गादीची स्थापना केली आणि ताराबाईंनी साताऱ्याहून माघार घेऊन, कोल्हापूर येथे वेगळी गादी स्थापन केली. परंतु १७१४ मध्ये राजारामची दुसरी विधवा, राजसाबाई यांनी ताराबाई पदच्युत करून स्वतःचा मुलगा संभाजी (दुसरा) याला गादीवर बसवले. ताराबाई आणि तिच्या मुलाला दुसऱ्या संभाजीने कैद केले. शिवाजी (दुसरा) १७२६ मध्ये मरण पावला. ताराबाई नंतर १७३० मध्ये छत्रपती शाहूंशी समेट करून कोणताही राजकीय अधिकार न ठेवता सातारा येथे राहायला गेल्या.

राजकीय परिस्थिती

सन १७०० साली जिंजी मोगलांच्या ताब्यात आली. पण तत्पूर्वी राजाराम जिंजीहून निसटून महाराष्ट्रात परतले. ताराबाई व इतर लोक मात्र मोगलांचा सेनापती जुल्फिखारखान यांच्या तावडीत सापडले. पण जुल्फिखारखानने सर्वांची मुक्तता केली. ३ मार्च १७०० रोजी छत्रपती राजाराम यांचा सिंहगड किल्ल्यावर मृत्यू झाल्यानंतर मराठी साम्राज्याची सूत्रे ताराबाईंच्या हाती आली. त्यांच्या सैन्यामध्ये बाळाजी विश्वनाथ, उदाजी चव्हाण, चंद्रसेन जाधव, कान्होजी आंग्रे ,पिलाजी गोळे, गिरजोजी यादव आदी मातबर सेनानी होते. त्यांनी मोगलांची पळता भुई थोडी अशी अवस्था केली. सन १७०५ साली त्यांनी मोगलांच्या ताब्यातील पन्हाळा किल्ला जिंकून कारंजा ही राजधानी बनविली.

राज्याला, गादीला आणि समाजाला खंबीर नेतृत्व दिले, सर्वाचे नीतिधैर्य टिकवून ठेवले. वयाच्या ८६व्या वर्षी ताराबाईचे सिंहगडावर निधन झाले. मराठ्यांच्या इतिहासात महाराणी ताराबाई हे एक ज्वलंत पर्व आहे. या काळात तिने मुघल सत्तेच्या विरुद्ध लढे देऊन मराठी राज्याला नेतृत्व बहाल करण्याचे काम केले, व आपले कार्य आणि कर्तृत्त्व निर्विवादपणे सिद्ध केले. राजारामांनतर मराठी राज्याला नेतृत्व नसताना, ताराबाई यांनी मराठी राज्य टिकवूना ठेवले. मराठी राज्य जिंकण्यासाठी आलेल्या औरंगजेबाच्या देहाची आणि कीर्तीची कबर महाराष्ट्राच्या भूमीतच खोदली गेली.

Related Post

छत्रपती राजारामराजे भोसले (Chhatrapati Rajaram Raje Bhosale)

Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )