।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।
छत्रपती रामराजे – Chhatrapati Ramraje
छत्रपती रामराजे (१७२२ — ९ डिसेंबर १७७७). सातारा संस्थानचे छत्रपती. सातारा गादीचे पहिले संस्थापक छत्रपती शाहू (१६८२—१७४९) यांच्या मृत्यूनंतर छ. राजाराम व महाराणी ताराबाई यांचा नातू व दुसरे शिवाजीराजे यांचे पुत्र रामराजे हे सातारा गादीचा वारस म्हणून आले.
छ. राजाराम महाराज (१६७०—१७००) यांच्या मृत्यूनंतर ताराबाईंनी पन्हाळा येथून मराठी राज्याची धुरा संभाळली. यावेळी दुसरे शिवाजीराजे यांना पन्हाळ्यावर राज्याभिषेक करून स्वत: ताराबाईंनी मोगलांविरुध्द कडवी झुंज देत मराठी राज्य राखले. दुसरे शिवाजीराजे यांचा विवाह घाटगे घराण्यातील भवानीबाई यांच्याशी झाला. त्यांचे पुत्र म्हणजे रामराजे. दरम्यान कोल्हापूर गादीवरून ताराबाईंच्या घरात यादवी माजली. छ. राजारामपत्नी राजसबाई यांनी ताराबाईंना सपुत्र कारावासात पाठवून मुलगा संभाजीराजे (दुसरे) यांना कोल्हापूर गादीवर नेमले. चुलते संभाजीराजे (दुसरे) व चुलती जिजाबाई (दुसरी) यांच्यापासून धोका असल्यावरून ताराबाईंनी रामराजेंना गुप्तपणे प्रथम बावडा, नंतर पानगाव येथे ठेवले. तेथेच त्यांचा सांभाळ झाला.
सातारा संस्थानचे छ. शाहूंच्या पोटी मूलबाळ नसल्याने त्यांनी दत्तक विधान घेण्याची धडपड सुरू केली, तेव्हा ताराबाईंनी रामराजे यांचे नाव शाहूंना सांगून त्यांना गादीवर बसवावे, अशी विनंती केली. परंतु छ. शाहूंनी ते मूल जन्मताच दगावले असे ऐकल्याची शंका उपस्थित केली. तेव्हा ताराबाईंनी सर्व हकीकत सविस्तर सांगितली, ‘मूल जन्माला आले असता पन्हाळा मुक्कामी त्याच्या वडिलास दाखवून, आनंद साजरा करून, संकट पाहून, मूल दगावले असा बहाणा केला आणि ते मूल पन्हाळ्याखाली पाठवून दिले. दुसरे दिवशी मुलास अफू खाऊ घातलेने त्याचे चलनवलन थांबले व ते मूल एका विश्वासू रजपूत बाईच्या हवाली केले व तिला बावड्यास बाजीराव अमात्य यांच्याकडे पाठवून दिले.’ ही हकीकत ऐकल्यावर छ. शाहूंनी सांगितले की, ‘बाजीराव अमात्य यांना हे सत्य कृष्णेचे पाणी माझ्या हाती सोडून हे शपथपूर्वक सांगावे लागेल.’ या गोष्टीस बाजीराव अमात्य तयार झाले आणि छ. शाहूंची रामराजांच्या खरेपणाविषयी खातरी पटली. तथापि रामराजांना दत्तक घेण्यास सकवारबाई यांनी प्रतिनिधींच्या साहाय्याने विरोध केला. त्यामुळे कलह टाळण्यासाठी छ. शाहूंनी रामराजांना आपल्या पश्चात आणण्याविषयी सूचना केल्या.
छ. शाहूंचे सातारा येथे निधन झाले (१७४९) त्या वेळी सकवारबाई सती गेल्या. छ. शाहूंच्या मृत्यूनंतर लगेचच दुसऱ्या दिवशी पेशव्यांनी महादोबा पुरंदरे, खंडेराव चिटणीस, लिंगोजी अनंत, इंद्रोजी कदम असे प्रमुख गृहस्थ रामराजास आणण्यासाठी पानगाव येथे पाठविले. सोबत हत्ती घोडे, फौज, कारखाने, शागिर्दपेशा पाठवून दिले. पानगाव येथे रामराजांची बहीण दर्याबाई निंबाळकर व भगवंतराव अमात्य हे रामराजांची व्यवस्था पहात होते. पाच हजार इनाम व ताराबाई यांनी दिलेली खूणेची अंगठी घेऊन रामराजे सर्व लोकांनीशी सातारा येथे येण्यास निघाले. सातारला वडूज येथे त्यांचा काही काळ मुक्काम पडला आणि छ. शाहूंच्या तेराव्याचे भोजन उरकून ४ जानेवारी १७५० मध्ये रामराजे सातारा गादीवर बसले. बहीण दर्याबाई निंबाळकर या अडचणीच्या वेळी त्यांना सल्ला देत. छ. रामराजे गादीवर येताच सातारा गादीभोवती अनेक संकटे घोंगावू लागली. अशातच जेव्हा छत्रपतींच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला, तेव्हा रघूजी भोसले, दर्याबाई निंबाळकर, ताराबाई हे छत्रपतींचे महत्त्व टिकवण्यासाठी प्रयत्न करीत होते. छ. शाहूंनी पेशव्यांकडे सर्वाधिकार दिले होते; मात्र राज्याची मालकी आपल्याकडे ठेवली होती. पेशवे व रामराजे यांत २५ सप्टेंबर १७५० रोजी सांगोला येथे करार झाला. त्यानुसार पेशव्याने छत्रपतींच्या नावे दौलतीचा कारभार करावा, असे ठरले. बाळाजी बाजीरावांनी त्यांना सालिना ६५ लाख रुपये नेमणूक करून दिली. रामराजे पेशव्यांच्या कच्छपि जात आहेत, हे पाहून ताराबाईंनी संधी साधून रामराजांना कैद केली (१७५५). अशातच रामराजे वारसदार नाहीत, हे जाहीर करून ताराबाईंनी नवीनच प्रश्न उपस्थित केला.
पुढे ताराबाईंच्या मृत्यूनंतर छ. रामराजांना राज्यकारभार करण्यास मुक्तपणा मिळाला. दुर्गाबाई व सगुणाबाई या त्यांच्या दोन पत्नी. छ. रामराजेंचे अधिकतर आयुष्य अज्ञातवास, नजरकैद यांमध्येच गेले. छ. रामराजे यांच्याकडून सर्वाधिकार व हक्क पेशव्यांना मिळाल्याने पेशवाईत मराठी राज्याचा विस्तार अटकेपार गेला. रामराजे गादीवर असतानाच मराठे व अफगाण यांच्यात पानिपतची लढाई झाली (१७६१).
छ. रामराजांच्या अखेरच्या दिवसांत त्यांना संतती नसल्यामुळे सखारामबापू बोकील व नाना फडणीस यांनी वावी येथील त्र्यंबकराजे यांचे ज्येष्ठ पुत्र विठोजी यांस १५ सप्टेंबर १७७७ रोजी दत्तक घेऊन त्यांचे नाव धाकटे (दुसरे) शाहूराजे ठेवले.
छ. रामराजेंचे सातारा येथे निधन झाले.