चिकू लागवड । Chiku Lagwad । Chiku Sheti । चिकू पिकाचा उगमस्थान, महत्त्व, भौगोलिक प्रसार । चिकू पिक लागवडी खालील क्षेत्र । चिकू पिक उत्पादन । चिकू पिकासाठी योग्य हवामान । चिकू पिकासाठी योग्य जमीन । चिकू पिकाच्या सुधारित जाती । चिकू पिकाच्या अभिवृद्धी, कलमांची निवड आणि लागवड पद्धती । चिकू पिकास योग्य हंगाम । चिकू पिकास योग्य लागवडीचे अंतर । चिकू पिकास वळण । चिकू पिकास छाटणीच्या पद्धती । चिकू पिकास खत व्यवस्थापन । चिकू पिकास पाणी व्यवस्थापन । चिकू पिकातील आंतरपिके । चिकू पिकातील तणनियंत्रण । चिकू पिकातील महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण । चिकू पिकावरील महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण । चिकू पिकावरील शारीरिक विकृती आणि त्यांचे नियंत्रण । चिकू पिकासाठी पीक संजीवकांचा वापर । चिकू पिकाच्या फळांची काढणी आणि उत्पादन । चिकू पिकाचे फळे पिकविणे आणि साठवण ।
।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।
चिकू लागवड : Chiku Lagwad : Chiku Sheti :
चिकू ह्या पिकाचे उगमस्थान मेक्सिको हा देश असून तेथून त्याचा प्रसार मध्य अमेरिका, फ्लोरिडा, श्रीलंका, जमैका, फिलिपाईन्स, भारत इत्यादी देशांत झाला. भारतात चिकूची पहिली बाग महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात घोलवड ह्या गावी 1898 मध्ये लावण्यात आली. महाराष्ट्र, गुजरात, तामीळनाडू ह्या राज्यांत चिकूची लागवड मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. चिकू हे अतिशय काटक पीक असून महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या जमिनींत येऊ शकते. चिकू या पिकामध्ये बहार दरवर्षी हमखास येतो. इतर फळझाडांच्या तुलनेत चिकूवर रोग आणि किडींचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात आढळतो. चिकू हे पीक कमी पाण्यावरही जगू शकते. म्हणूनच तुलनेने कमी निगा राखून ह्या पिकाच्या लागवडीस महाराष्ट्रात भरपूर वाव आहे. काही वर्षांतच चिकू हे एक प्रमुख फळपीक म्हणून निश्चितच लोकप्रिय झाले आहे.
चिकू पिकाचा उगमस्थान, महत्त्व, भौगोलिक प्रसार ।
चिकूचे मूळ स्थान मेक्सिको हा देश असून तेथून त्याचा प्रसार इतर देशांत व भारतात झाला. भारतात चिकू ह्या पिकाचा प्रवेश केव्हा झाला याबाबतची माहिती नाही. तरी पण हे फळझाड भारतात आता चांगलेच स्थिरावले आहे.
जमीन आणि हवामानाच्या बाबतीत चिकू हे पीक विशेष चोखंदळ नाही. महाराष्ट्रातील सर्व भागात या फळझाडाची लागवड किफायतशीर होऊ शकते. चिकूचे झाड काटक असते आणि कमीत कमी पाण्यावरही जगू शकते. या पिकावर विशेष घातक असे रोग किंवा किडी पडत नाहीत. खास उपाययोजना न करता दरवर्षी हमखास बहार येत असल्यामुळे चिकूची लागवड महाराष्ट्रातील सर्व भागांत वाढत आहे. इतर फळझाडांच्या तुलनेत कमी श्रमांत अधिक उत्पादन देणारे हे फळपीक आहे.
चिकूला वर्षभर फुले आणि फळे येत असतात. ताजी पिकलेली चिकूची फळे खाण्यासाठी वापरतात. तसेच आइस्क्रीम, फ्रुटसॅलड, टॉफी यांमध्येही चिकूच्या गराचा उपयोग करतात. चिकूची फळे गोड असून साल पातळ असते. चिकूच्या एका फळामध्ये 2 ते 4 बिया असतात. चिकूच्या फळाच्या प्रत्येक 100 ग्रॅम खाण्यायोग्य भागात तत्काळ एकरूप होणारे कार्बोहायड्रेट्स् आणि खाण्यायोग्य भाग यांचे प्रमाण भरपूर असल्यामुळे मानवी शरीराला पोषक असे भरपूर उष्मांक मिळतात. चिकूच्या फळाच्या प्रत्येक 100 ग्रॅम
खाण्यायोग्य भागात खालील तक्त्यात दिल्याप्रमाणे अन्नद्रव्ये असतात.
अन्नघटक | प्रमाण (%) |
पाणी | 74.00 |
कार्बोहायड्रेट्स् (शर्करा) | 21.40 |
प्रोटीन्स (प्रथिने) | 0.70 |
फॅट्स् (स्निग्धपदार्थ) | 1.10 |
खनिज द्रव्ये | 0.50 |
लोह | 0.02 |
स्फुरद | 0.03 |
चुना | 0.03 |
कॅरोटीन | 0.10 मिलिग्रॅम |
थायमिन | 0.02 मिलिग्रॅम |
रिबोफ्लेवीन | 0.03 मिलिग्रॅम |
जीवनसत्त्व ‘ब’ | 6.00 मिलिग्रॅम |
जीवनसत्त्व ‘क’ | 6.00 मिलिग्रॅम |
चिकूचे उगमस्थान दक्षिण मेक्सिको हा देश असून तेथून त्याचा प्रसार फिलिपाईन्स,
इंडोनेशिया, फ्लोरिडा, श्रीलंका, भारत आणि बांगला देशात झाला. चिकूची पहिली बाग महाराष्ट्रातील ठाणे जिल्हयातील घोलवड ह्या गावात 1898 मध्ये लावण्यात आली. त्यानंतर ह्या फळाचा प्रसार इतर राज्यांत झाला.
चिकू पिक लागवडी खालील क्षेत्र । चिकू पिक उत्पादन ।
अलीकडच्या आकडेवारीनुसार भारतात चिकू पिकाखाली 25,000 हेक्टर क्षेत्र आहे. त्यानुसार कर्नाटक राज्याचा चिकू लागवडीमध्ये क्षेत्र आणि उत्पादकतेच्या दृष्टीने प्रथम क्रमांक लागतो. चिकू उत्पादन करणारी प्रमुख राज्ये, क्षेत्र, उत्पादकता खालील तक्त्यात दिली आहे.
उपलब्ध असलेल्या ताज्या आकडेवारीवरून महाराष्ट्रात चिकूखालील क्षेत्र अंदाजे 5,000 हेक्टर असल्याचे दिसून येते. चिकूचे पीक महाराष्ट्रातील सर्व विभागात घेतले जात असून विभागवार क्षेत्र पुढीलप्रमाणे आहे.
विभाग | क्षेत्र (हेक्टर) |
कोकण | 2,850 |
नाशिक | 250 |
पुणे | 800 |
अहमदनगर | 700 |
कोल्हापूर | 100 |
छ.संभाजी नगर | 100 |
लातूर | 50 |
अमरावती | 50 |
नागपूर | 50 |
इतर | 50 |
एकूण | 5,000 |
सन 1990 पासून चिकू लागवड क्षेत्रात मोठी वाढ होत आहे. रोजगार हमी योजने अंतर्गत फळबागा लागवड कार्यक्रमात या पिकाचा समावेश केला गेल्यामुळे तसेच अभिवृद्धी तंत्रात सुधारणा झाल्यामुळे चिकू लागवडीस वेग आलेला आहे.
चिकू पिकासाठी योग्य हवामान । चिकू पिकासाठी योग्य जमीन ।
महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत चिकूची लागवड यशस्वी होऊ शकते. मूळच्या उष्ण प्रदेशातील ह्या फळाला उष्ण व दमट हवामान चांगले मानवते. चिकूच्या पिकाच्या फुलोऱ्याच्या काळात तापमान 43 अंश सेल्सिअसच्या वर गेल्यास फुलोरा गळतो, तसेच किमान तापमान 10 अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाल्यास झाडाची वाढ खुंटते. अशा वेळी लहान झाडांची विशेष काळजी घ्यावी लागते. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या उत्तर भागात उन्हाळयात चिकूच्या पिकाला पाण्याच्या जास्त पाळया द्याव्या लागतात. कमी पावसाच्या प्रदेशात बागेला पाण्याच्या पाळ्या वाढवून चिकूची लागवड करता येते.
चिकूच्या पिकाला सर्व प्रकारची जमीन मानवते. तथापि नदीकाठची, गाळवट, पोयट्याची, समुद्र किनाऱ्याजवळची जमीन अधिक चांगली असते. काळया व भारी जमिनीत निचऱ्यासाठी चर खणून चिकूची लागवड करावी. पाणथळ भागात किंवा जमिनीत 1 ते 1.5 मीटरच्या खाली पक्का कातळ असलेल्या भागात अथवा अती हलक्या उथळ जमिनीत चिकूच्या झाडाची वाढ चांगली होत नाही. पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसलेल्या आणि चुनखडीचे प्रमाण जास्त असलेल्या जमिनीत चिकूची लागवड करू नये.
चिकू पिकाच्या सुधारित जाती :
महाराष्ट्रात चिकूच्या कालीपत्ती व क्रिकेट बॉल ह्या प्रमुख जाती लागवडीखाली आहेत. कालीपत्ती : या जातीच्या झाडाची पाने गडद हिरव्या रंगाची आणि रुंद असतात. झाड पसरत वाढते. या जातीची फळे मोठी, अंडाकृती आणि भरपूर गरयुक्त असतात. फळांचा गर मऊ आणि गोड असतो. फळात बियांचे प्रमाण कमी असून प्रत्येक फळात 2 ते 4 बिया असतात. फळाची साल पातळ असते. महाराष्ट्रात ह्या जातीच्या लागवडीसाठी शिफारस केली आहे.
क्रिकेट बॉल :
या जातीच्या झाडाची पाने गडद हिरव्या रंगाची असतात. फळे आकाराने मोठी असतात; परंतु फळांचा गर दाणेदार व कमी गोड असतो. या जातीच्या फळांची प्रत मध्यम असून उत्पादन कमी येते.
चिकू पिकाच्या अभिवृद्धी, कलमांची निवड आणि लागवड पद्धती ।
चिकूची अभिवृद्धी बियांपासून, तसेच शाखीय पद्धतीने, गुटी कलम, भेट कलम व मृदकाष्ठ कलम अशा प्रकारे करता येते. चिकूची बियांपासून अभिवृद्धी केल्यास फळे लागण्यास अधिक काळ लागतो आणि सर्व झाडे सारख्या गुणवत्तेची निपजत नाहीत. म्हणूनच शाखीय पद्धतीने अभिवृद्धी करावी. गुटी कलम पद्धतीत चिकूची अभिवृद्धी करता येत असली तरी या पद्धतीने यश कमी प्रमाणात मिळते. भेट कलम किंवा मृदुकाष्ठ कलम लावून केलेली लागवड ही झाडांपासून मिळणारे उत्पादन, वाढविस्तार व कणखरपणा या दृष्टीने अधिक फायद्याची असल्यामुळे ह्या पद्धतीने चिकूची अभिवृद्धी मोठ्या प्रमाणावर केली जाते. भेट कलम आणि मृदुकाष्ठ कलम या दोन्ही पद्धतींत खिरणी (रायणी) या खुंटाचा चिकूची कलमे बांधण्यासाठी उपयोग करतात. खिरणीची रोपे अतिशय हळू वाढतात. खिरणीच्या रोपाला भेट कलम करण्यायोग्य जाडी येण्यासाठी साधारणपणे दोन वर्षे लागतात. कलम बांधणीसाठी खुंटरोपाची कमतरता तसेच कलम तयार होण्यासाठी लागणारा काळ ह्यामुळे चिकूची कलमे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाहीत. चिकूच्या कलमांची खरेदी करताना पुढील काळजी घ्यावी.
(1) खुंट आणि डोळकाडी सारख्याच जाडीचे असावेत.
(2) कलम सरळ वाढलेले आणि त्यावर भरपूर निरोगी पाने असावीत.
(3) कलम केलेला भाग (सांधा) हा एकरूप झालेला असावा. कलमांची उंची अर्धा मीटर असावी.
(4) कलम खिरणीच्या (रायणी) खुंटावरच केलेले असावे. मोहाच्या रोपावरील चिकूची कलमे खरेदी करू नयेत.
(5) स्वतः तयार केलेली कलमे अथवा शासकीय किंवा कृषी विद्यापीठाच्या किंवा मान्यताप्राप्त नामांकित रोपवाटिकेतील चिकूची कलमे लागवडीसाठी वापरावीत.
चिकू पिकास योग्य हंगाम । चिकू पिकास योग्य लागवडीचे अंतर ।
चिकूची लागवड करण्यापूर्वी उन्हाळयात जमीन 45 सेंमी. खोलपर्यंत नांगरून घ्यावी आणि ढेकळे फोडून त्यातील कुंदा, हरळी ह्यांसारख्या तणांचा नाश करावा आणि जमीन सपाट करावी. जमीन सपाट करताना जमिनीवरचा सुपीक मातीचा थर जमिनीत खोल गाडला जाऊ नये. लागवडीपूर्वी बागेची आखणी करावी. पश्चिम दिशेकडून येणारा जोराचा वारा थोपविण्यासाठी बागेच्या पश्चिम आणि दक्षिण बाजूला बागेपासून कमीत कमी 5 मीटर अंतरावर शेवरी किंवा उंच वाढणारी झाडे लावून वाराविरोधक तयार करून घ्यावा. असा वाराविरोधक तयार न केल्यास चिकूची झाडे जोराच्या वाऱ्यामुळे पूर्वेकडे झुकतात आणि सरळ वाढत नाहीत. तसेच जोराच्या वाऱ्यामुळे झाडांचे आणि बहाराचे नुकसान होते. चिकूची झाडे 60-70 वर्षांपेक्षा अधिक काळापर्यंत उत्पादन देतात. चिकूची झाडे सावकाश परंतु खूप मोठी वाढतात. म्हणूनच चिकूची लागवड 10 x 10 मीटर अंतरावर करावी. लागवडीसाठी 1 X 1 X 1 मीटर आकाराचे खड्डे खोदून घ्यावेत. खड्डे उन्हाळयात 20-25 दिवस चांगले तापू द्यावेत. पावसाळयाच्या सुरुवातीला खड्ड्याच्या तळाशी 2 किलो सुपर फॉस्फेट घालून खड्डा कुजलेले शेणखत आणि पोयटा माती यांच्या मिश्रणाने जमिनीच्या थोडा वरपर्यंत भरावा. पावसाच्या सरी आल्यानंतर खड्डा स्थिर होऊन जमिनीपर्यंत भरतो.
कमी पावसाच्या भागात चिकूच्या कलमांची लागवड पावसाळयाच्या सुरुवातीला करावी. ज्या भागात पाऊस जास्त होतो आणि पावसाचे पाणी साचून राहते, तेथे पाऊस कमी झाल्यावर लागवड करावी. कलमे लावताना ती खड्ड्याच्या मधोमध लावावीत. पिशवीत किंवा कुंडीत कलमाचा जेवढा भाग मातीत असेल तेवढाच भाग लागवडीनंतर जमिनीत राहील अशा रितीने कलमाची लागवड करावी. कलम केलेला भाग (सांधा ) जमिनीत गाडला जाणार नाही आणि त्यास पाणी लागणार नाही याची काळजी घ्यावी. कलम लावल्यानंतर खोडाभोवतीची माती सैल झालेली असल्यास पुन्हा दुसऱ्या दिवशी घट्ट दाबून घ्यावी म्हणजे मुळांचा जमिनीशी संबंध येऊन लागवड यशस्वी होईल.
चिकू पिकास वळण । चिकू पिकास छाटणीच्या पद्धती ।
चिकू हे सदाहरित फळझाड असल्यामुळे चिकूच्या झाडाची नियमित छाटणी करावी लागत नाही. मात्र सुरुवातीच्या काळात झाडाला योग्य आकार देण्यासाठी आवश्यकतेनुसार छाटणी करावी. अनावश्यक आणि व्यवस्थित न वाढलेल्या फांद्या छाटून झाडाला योग्य आकार द्यावा. नवीन झाडांना काठीच्या आधाराने सरळ वाढवावे. झाडाच्या खोडावर जमिनीपासून 50 सेंटिमीटर उंचीपर्यंत येणारी नवीन फूट वेळोवेळी काढून टाकावी. 50 सेंटिमीटर उंचीपर्यंत मुख्य बुंधा सरळ वाढवावा आणि त्यानंतर 4 ते 5 चांगल्या फांद्या सर्व दिशांना येतील अशा प्रकारे ठेवून झाडाला वळण द्यावे. वळण देण्याचे काम झाडे लहान असतानाच काळजीपूर्वक केल्यास झाड समतोल आणि जोमदार वाढते.
कलमाच्या खिरणीच्या खुंटावर येणारी फूट वेळोवेळी काढून टाकावी; अन्यथा ही फूट झपाट्याने वाढू लागते. त्यामुळे कलम केलेल्या डोळकाडीची वाढ मंदावते. चिकूच्या कलमांना पहिल्या वर्षापासून फुलोरा येतो व फळे लागतात; परंतु झाडाची वाढ चांगली होण्यासाठी सुरुवातीला तीनचार वर्षे फळे घेऊ नयेत. म्हणूनच सुरुवातीस तीनचार वर्षे फुलोरा काढून टाकावा.
चिकू पिकास खत व्यवस्थापन । चिकू पिकास पाणी व्यवस्थापन ।
खते : झाडाच्या जोमदार वाढीसाठी आणि अधिक उत्पादनासाठी चिकूच्या झाडाला खतांची योग्य मात्रा देणे आवश्यक असते. चिकूच्या झाडाची वाढ सुरुवातीला फार हळू होते. चिकूच्या झाडाची जलद वाढ होण्यासाठी झाडांना वर्षातून दोन ते तीन वेळा खताचे हप्ते द्यावेत. साधारण पाऊस असलेल्या भागात खताच्या मात्रा जुलै, सप्टेंबर आणि जानेवारी या तीन महिन्यांत विभागून द्याव्यात. जास्त पाऊस असलेल्या भागात खते ऑगस्ट आणि जानेवारी महिन्यांत दोन सारख्या हप्त्यांत विभागून द्यावीत. उत्पादन सुरू झाल्यानंतर म्हणजेच पाच वर्षांनंतर खताच्या मात्रा दोन समान हप्त्यांत ऑगस्ट आणि जानेवारी या दोन महिन्यांत विभागून द्याव्यात.
वय | शेणखत (कि.ग्रॅ.) | नत्र (ग्रॅम) | स्फुरद (ग्रॅम) | पालाश (ग्रॅम) |
01 | 10 | 150 | 150 | 150 |
02 | 20 | 300 | 300 | 300 |
03 | 30 | 450 | 450 | 450 |
04 | 40 | 600 | 600 | 600 |
05 | 50 | 750 | 750 | 750 |
06 | 60 | 900 | 900 | 900 |
07 | 70 | 1050 | 1050 | 1050 |
08 | 80 | 1200 | 1200 | 1200 |
09 | 90 | 1350 | 1350 | 1350 |
10 | 100 | 1500 | 1500 | 1500 |
पंधरा वर्षे वयाच्या झाडास प्रत्येकी 2 किलोग्रॅम नत्र, 2 किलोग्रॅम स्फुरद व 2 किलोग्रॅम पालाश द्यावे. 20 वर्षे वयाच्या पूर्ण वाढलेल्या झाडास प्रत्येकी 3 किलोग्रॅम नत्र, 3 किलोग्रॅम स्फुरद व 3 किलोग्रॅम पालाश द्यावे. शेणखताचा जास्तीत जास्त उपयोग करावा. पालाश जास्त असलेल्या जमिनीत शिफारसी केलेल्या पालाशाची मात्रा निम्म्याने कमी करावी.
चिकूच्या झाडाला खते देताना घ्यावयाची काळजी
(1) कुजलेले शेणखत पावसाळयाच्या सुरुवातीलाच वाफ्यामध्ये झाडाभोवती घालावे.
(2) रासायनिक खते वर सुचविल्याप्रमाणे हप्त्याहप्त्याने द्यावीत.
(3) रासायनिक खते जमिनीची उकरी करून आणि चर खोदून त्यामध्ये टाकावीत.
(4) खते खोडाजवळ देऊ नयेत. झाडाच्या विस्तारासाठी 20 सेंटिमीटर खोलीचा चर खोदून लगेच पाणी द्यावे.
(5) झाडांची पूर्ण वाढ झाल्यानंतर म्हणजेच झाडांमधील सर्व जागा व्यापल्यानंतर दोन ओळींमध्ये मधोमध चर काढून त्यात खते द्यावीत.
पाणी :
चिकूचे झाड काटक असते आणि त्यामुळे ते कमीत कमी पाण्याच्या उपलब्धतेवरही जगू शकते. झाडाची चांगली वाढ आणि त्यापासून भरपूर उत्पादन मिळण्यासाठी पाण्याच्या नियमित पाळया द्याव्या लागतात. जमिनीचा मगदूर, हवामान आणि पावसाचे प्रमाण यानुसार पाण्याच्या दोन पाळ्यांमध्ये अंतर कमी-जास्त करावे. पावसाळयात चिकूच्या झाडाला शक्यतो पाणी देण्याची आवश्यकता नसते. हिवाळयात 10 ते 15 दिवसांच्या अंतराने आणि उन्हाळयात 8 ते 10 दिवसांनी चिकूच्या झाडाला पाणी द्यावे. सुरुवातीला चिकूची झाडे लहान असताना झाडाभोवती आळे करून पाणी द्यावे. पुढे झाडे मोठी झाल्यावर झाडांच्या विस्तारानुसार वाफे करून पाणी द्यावे. झाडाच्या बुंध्याभोवती मातीचा उंचवटा करावा किंवा दुहेरी आळी पद्धतीचे वाफे करावेत त्यामुळे झाडाच्या बुंध्याला पाणी लागणार नाही. पावसाळयात आळे अथवा वाफे बुजवून जास्त झालेले पाणी काढण्यासाठी चर काढावेत.
फुलोरा धरण्याच्या मुख्य काळात तसेच फळधारणेच्या अवस्थेत चिकूच्या झाडाला पाण्याचा ताण पडल्यास फळांचा आकार लहान राहतो.
चिकू पिकातील आंतरपिके । चिकू पिकातील तणनियंत्रण ।
आंतरपिके :
चिकूच्या लागवडीपासून आठ ते दहा वर्षांनंतर चिकूचे व्यापारी उत्पादन सुरू होते. सुरुवातीच्या काळात चिकूची बाग विकसित करण्यासाठी बराच खर्च येतो. चिकूचे झाड फार सावकाश वाढणारे असल्यामुळे सुरुवातीच्या पाच-सहा वर्षांच्या काळात चिकूच्या बागेत आंतरपिके घ्यावीत. टोमॅटो, वांगी, कोबी, मिरची यांसारखी भाजीपाल्याची पिके तर लिली, निशिगंध यांसारखी फुलांची किंवा उडीद, मूग, हरबरा यांसारखी द्विदल पिके आंतरपिके म्हणून घ्यावीत. आंतरपिकांना मात्र पुरेसे खत आणि पाणी दिले पाहिजे. आंतरपिकांपासून उत्पादन तर मिळतेच पण चिकूच्या बागेची वेगळी मशागत करावी लागत नाही.
तणनियंत्रण :
चिकूची झाडे लहान असेपर्यंतच म्हणजेच वयाच्या 5-6 वर्षापर्यंत तणांचा बंदोबस्त करणे महत्त्वाचे असते. खुरपणी, निंदणी, आच्छादन, तसेच तणनाशकांचा वापर करून तणांचा वेळीच बंदोबस्त करावा. बासालीन, ग्रामोक्झोन, ग्लायसील यासारखी तणनाशके वापरावीत.
चिकू पिकातील महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण ।
चिकूवर पाने आणि कळया खाणारी अळी मोठ्या प्रमाणावर पडते. खोडकिडा, पिठ्या ढेकूण, तुडतुडे थोड्याफार प्रमाणात दिसून येतात.
पाने आणि कळया खाणारी अळी :
पाने खाणाऱ्या किडीची अळी तोंडातून स्रवणाऱ्या रेशमासारख्या धाग्याने फांदीवरील कोवळी पाने एकत्र गुंडाळून जाळी तयार करते आणि आतील बाजूनी पाने खाते. फळांच्या कळयांना छिद्र पाडून आतील भाग पोखरते. कीडग्रस्त झाडावर ठिकठिकाणी वाळलेली पाने दिसतात.
उपाय : या किडीच्या नियंत्रणासाठी चिकूच्या झाडावर लिंडेन (50%) 25 ग्रॅम 10 लीटर पाण्यात मिसळून फवारावी. अळीने पानावर तयार केलेली जाळी अळीसह काढून नष्ट करावी.
खोडकिडा :
उन्हाळयात पाण्याचा भरपूर पुरवठा केलेल्या आणि मशागतीकडे दुर्लक्ष केलेल्या चिकूच्या बागेत ह्या किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणावर दिसून येतो. या किडीची अळी झाडाची साल पोखरून आतील भागावर जगते आणि मुळांच्या दिशेने खाली जाते. या किडीची लागण झालेल्या चिकूच्या झाडाची पाने निस्तेज व पिवळसर दिसतात.
उपाय : खोडकिडीच्या नियंत्रणासाठी धुरीजन्य कीटकनाशकाचा वापर करावा. झाडावरील किडीची छिद्रे शोधून त्यामध्ये कार्बनडायसल्फाईड, इटीसीटी मिश्रण किंवा बोरर सोल्युशन किंवा ह्यापैकी काहीही न मिळाल्यास पेट्रोलमध्ये कीटकनाशकाचे काही थेंब टाकून हे द्रावण ड्रॉपरने किंवा कापसाच्या बोळयाने खोडकिडीच्या छिद्रांमध्ये टाकावे आणि छिद्रे ओल्या मातीने बंद करावीत.
चिकू पिकावरील महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण ।
चिकूच्या झाडावर कोळशी, मूळकूज आणि पानावरील ठिपके या रोगांचा उपद्रव दिसून येतो.
कोळशी :
माव्यासारख्या किडी बऱ्याच वेळा चिकूच्या पानांवर चिकट विष्ठा टाकतात. या विष्ठेवर काळ्या रंगाची बुरशी वाढते. ही बुरशी कधीकधी पानांचा संपूर्ण भाग व्यापून टाकते. पानांवर काळया रंगाचा थर जमा होतो आणि त्यामुळे कर्बग्रहणक्रिया मंदावते.
उपाय : कोळशी या बुरशीजन्य रोगाचा बंदोबस्त करण्यासाठी प्रथम माव्यासारख्या किडींचा बंदोबस्त करावा. यासाठी कोणतेही कीटकनाशक निवडून 10 लीटर पाण्यात 20 मिलिलीटर कीटकनाशक मिसळून 1-2 फवारण्या कराव्यात.
मूळकूज (रूटरॉट) :
चिकूच्या बागेत बराच काळ पाणी साचून राहत असल्यास अथवा चिकूची बाग खोलगट भागात असल्यास चिकूच्या झाडाची मुळे आणि जमिनीलगतचा खोडाचा भाग बुरशीमुळे कुजतो, सडतो; अशा वेळी संपूर्ण झाड वाळण्याची शक्यता असते.
उपाय : चिकूची बाग खोलगट भागात असल्यास बागेमधून उताराला आडवे असे चर काढून घ्यावेत. बागेत साचणाऱ्या पाण्याचा निचरा करून द्यावा आणि झाडाच्या खोडाभोवती आळे करून घ्यावे. 10 लीटर पाण्यात 250 ग्रॅम मोरचूद मिसळून प्रत्येक आळयात खोडाभोवती 1 लीटर द्रावण चहूबाजूंनी ओतावे.
चिकूच्या पानावर हवेतील बुरशीजन्य रोगाचे जणू रुजतात आणि या बीजाणूंपासून तयार झालेली बुरशी पानांमध्ये शिरते आणि पानांवर रोगाचे ठिपके पडतात. या ठिपक्यांमुळे झाडाची उत्पादकता कमी होते आणि फळे कमी लागतात.
उपाय : चिकूच्या पानावरील ठिपक्यांच्या नियंत्रणासाठी 10 लीटर पाण्यात 20 ग्रॅम
डायथेन-एम-45 किंवा डायथेन झेड-78 हे बुरशीनाशक मिसळून झाडावर फवारणी करावी.
चिकू पिकावरील शारीरिक विकृती आणि त्यांचे नियंत्रण :
चिकूच्या झाडावर पुढील प्रकारच्या विकृती तुरळकपणे आढळून येतात.
चपटा शेंडा :
या विकृतीत फांद्यांचा शेंडा चपटा होतो. प्रतिकूल हवामानात तसेच शेंडा पोखरणारी अळी यामुळे ही विकृती उद्भवते. अळीचा बंदोबस्त केल्यावर आणि हवामानात सुधारणा झाल्यावर ही विकृती कमी होते.
विजोड :
भेट कलमाच्या भागावर ही विकृती दिसून येते. कलम करताना खुंटाची निवड चुकल्यास तसेच जमिनीत पक्का खडक अगर चुनखडीचा थर लागल्यास ही विकृती बळावते. खुंटांची निवड, कलम करताना योग्य काळजी, तसेच जमिनीची निवड यांसंबंधी काळजी घेतल्यास ही विकृती टाळता येते.
चिकू पिकासाठी पीक संजीवकांचा वापर :
चिकू लागवडीमध्ये पीक संजीवकांचा वापर पुढीलप्रमाणे केल्यास फायदा होतो.
(1) चिकूची अभिवृद्धी करताना दाब कलम अथवा गुटी कलम करताना कापावर ‘आयबीए’ या संजीवकाची 1000 पीपीएम तीव्रतेने मेणातून मात्रा वापरल्यास कलमास लवकर व भरपूर मुळ्या येतात.
(2)भेटकलम अथवा शेंडा कलमाचे झाड वाढत असताना, खोडावर, खुंटावर वाढ / फुटी न वाढण्यासाठी ‘टीबा’ या संजीवकाचे मलम खोडावर लावावे. (1,000 पीपीएम)
(3) फुलांची व लहान फळांची गळ थांबविण्यासाठी 100 पीपीएम एनएए अथवा 10 पीपीएम सीक्सबीए या संजीवकाची फवारणी परिणामकारक ठरते.
चिकू पिकाच्या फळांची काढणी आणि उत्पादन :
चिकूच्या झाडावर पाचव्या वर्षापासून बहार घ्यावा. महाराष्ट्रातील काही भागांत चिकूच्या झाडास वर्षभर फळे येत असली तरी साधारणपणे वर्षातून दोन वेळा फळे जास्त प्रमाणात मिळतात. म्हणजेच चिकूला बहार येण्याचे दोन मुख्य हंगाम आहेत. फुलांचा पहिला बहार सप्टेंबर ते नोव्हेंबरमध्ये येतो व त्यापासून जानेवारीत फळे मिळतात. फुलांचा दुसरा बहार फेब्रुवारीमध्ये येतो आणि यापासून मे-जूनमध्ये फळे मिळतात. चिकूच्या पहिल्या बहाराची फळे महाराष्ट्रातील सर्वच भागात मिळतात; परंतु दुसऱ्या बहाराची फळे ज्या भागात तापमान जास्त वाढते अशा भागात कमी मिळतात. साधारणपणे फुले आल्यानंतर फळधारणा होऊन फळे पक्व होण्यासाठी 5-6 महिन्यांचा काळ लागतो. चिकूचे फळ हाताने देठासह काढावे. पूर्ण वाढलेली फळे झाडावरून काढावीत. चिकूचे फळ तोडणीस तयार झाल्याचे पुढीलप्रमाणे ओळखावे.
(1) पूर्ण तयार झालेल्या फळावर फिकट तपकिरी रंगाची चमक दिसते, आणि फळावरील खडबडीत साल गुळगुळीत बनते.
(2) तयार फळाच्या सालीवर नखाने ओरखडा ओढल्यास पिवळसर रंग दिसतो आणि चीक येत नाही.चिकूच्या झाडावरील सर्व फळे एकाच वेळी तयार होत नाहीत. म्हणून जसजशी फळे तयार होतील तसतशी वेळोवेळी काढणी करावी.
चिकूची तयार फळे तोडल्यावर ती सावलीत चटईवर थोडा वेळ पसरून ठेवतात. त्यामुळे तोडल्यानंतर फळांच्या देठाजवळचा चीक वाळतो आणि फळे चीक लागून खराब दिसत नाहीत. काही ठिकाणी फळे तोडल्यावर ती लगेच पाण्यात टाकतात आणि नंतर कोरडी करतात. यामुळेसुद्धा फळाला चीक चिकटत नाही आणि फळ स्वच्छ दिसते.
चिकूच्या फळाच्या आकारमानावर फळांचा भाव अवलंबून असतो. मोठ्या आकारमानाच्या फळांना चांगला भाव मिळतो. म्हणून फळांच्या देठाजवळचा चीक वाळल्यानंतर आकारमानाप्रमाणेच चिकूच्या फळांची प्रतवारी करून बांबूच्या करंड्यांत भरून फळे खराब होऊ नयेत म्हणून करंड्यांच्या तळाशी आणि बाजूंनी वाळलेल्या गवताचा थर द्यावा.
चिकूच्या फळांचे उत्पादन हे चिकूच्या झाडाच्या वयावर आणि विस्तारावर अवलंबून असते. पाचव्या वर्षी एका झाडापासून 250 पर्यंत, सातव्या वर्षी 800 पर्यंत, 10 ते 15 वर्षांच्या दरम्यान 1,500 ते 2,000 पर्यंत फळे मिळतात. पुढे झाड पूर्ण भरात असताना एका झाडापासून वर्षभरात 2,500 ते 3,000 फळे मिळतात. सर्वसाधारणपणे 40 ते 50 वर्षांपर्यंत चिकूचे झाड उत्पादन देते. चांगली काळजी घेतल्यास चिकूच्या बागा 70-75 वर्षांपर्यंत फायदेशीर उत्पादन देतात. एक किलो वजनात मध्यम आकाराची सरासरीने 10 फळे मावतात म्हणजेच चिकूचे उत्पादन हेक्टरी 18-20 टनांपर्यंत मिळते.
चिकू पिकाचे फळे पिकविणे आणि साठवण ।
चिकूची फळे पिकविण्यासाठी उबदार जागेत ठेवतात अथवा बंद खोलीत पोत्याखाली झाकून पिकवितात. अशा रितीने तोडणीनंतर साधारणपणे 5 दिवसांनी चिकूची फळे नरम होऊन पिकण्यास सुरुवात होते आणि ती 7 ते 8 दिवसांत पूर्णपणे पिकतात.
2.2.16 फळांची हाताळणी आणि विक्रीव्यवस्था
चिकूची पिकलेली फळे हाताळण्याच्या दृष्टीने जास्त नाजूक असतात. त्यामुळे ती काढल्याबरोबर टोपलीत किंवा खोक्यात व्यवस्थित साठवावीत. प्रत्येक थरानंतर आणि बाजूंनी गवत किंवा कागदाच्या कात्रणाची भर द्यावी म्हणजे फळे दूरच्या बाजारात पोहोचेपर्यंत पक्व होतात. पिकलेली फळे दूरच्या बाजारात पाठविल्यास फळे खराब होतात आणि आर्थिक नुकसान होते.
सारांश ।
चिकूच्या पिकाला उष्ण आणि दमट हवामान चांगले मानवते. अती उष्ण आणि कोरडे हवामान चिकूच्या वाढीला आणि उत्पादनाला पोषक ठरत नाही. तापमान 43 अंश सेल्सिअसच्या वर आणि 10 अंश सेल्सिअसच्या खाली जास्त काळ राहिल्यास चिकू पिकाच्या फळधारणेला आणि वाढीला हानीकारक ठरते. कमी पर्जन्यमानाच्या आणि कोरड्या हवामानाच्या भागात पाणीपुरवठ्याची नियमित व्यवस्था केल्यास चिकूचे चांगले उत्पादन येते. जमिनीच्या बाबतीत हे पीक चोखंदळ नाही. तरीसुद्धा पोयट्याच्या जमिनी योग्य असतात. महाराष्ट्राच्या दृष्टीने विचार केल्यास हे पीक राज्यातील सर्व भागांत येऊ शकते. काटक, कमी खर्चात दरवर्षी खात्रीने उत्पादन देणारे हे पीक असल्याने फार कमी वेळात लोकप्रिय झाले आहे. कोकण आणि पुणे विभागात चिकूची लागवड जास्त असून महाराष्ट्रातील सर्वच भागांत कमीअधिक प्रमाणात चिकूची लागवड दिसून येते. चिकूची लागवड खिरणीच्या रोपावर बांधलेले भेट कलम अथवा मृदुकाष्ठ कलम लावून करतात. चिकूची लागवड 10 x 10 मीटर अंतरावर करावी. 1 मीटर लांबी, रुंदी आणि खोलीचा खड्डा खणून तो माती व शेणखताच्या मिश्रणाने भरावा. त्यापूर्वी खड्याच्या तळाशी 2 ते 3 किलो सुपर फॉस्फेट घालावे. लागवडीनंतर झाडाच्या खोडावर म्हणजेच कलमावरील सांध्याच्या खालील भागावरून येणारे फुटवे वेळोवेळी काढावेत. सुरुवातीच्या 4-5 वर्षांच्या काळात वर्षातून तीनदा तर पुढे वर्षातून दोनदा रासायनिक खतांच्या मात्रा द्याव्यात. चिकूच्या झाडांना सुरुवातीलाच योग्य वळण द्यावे. चिकूचे झाड सावकाश वाढणारे असून त्याचे आयुष्य जास्त असते. सरुवातीच्या 5-6 वर्षांच्या काळात चिकूच्या बागेत आंतरपिके घेणे फायद्याचे असते. भाजीपाला, मिरची किंवा द्विदल कडधान्य पिके ही आंतरपिके म्हणून घेता येतात. चिकूच्या झाडावर गंभीर अशी कीड अथवा रोग सहसा पडत नाही. पाने आणि कळी खाणारी अळी, खोडकीड, पिठ्या ढेकूण ह्या किडी चिकूच्या झाडावर दिसून येतात. वर्षातून साधारणपणे दोन वेळा योग्य त्या कीटकनाशकाची फवारणी करून तसेच बाग स्वच्छ ठेवल्यास कीड-रोगांचा उपद्रव टाळता येतो.
चिकूच्या लागवडीनंतर 5-6 वर्षांनंतर बहार घ्यावा. 10 वर्षांपासून पुढे म्हणजे झाडाची चांगली वाढ झाल्यावर 1,500 ते 2,000 फळे आणि झाडाची पूर्ण वाढ झाल्यावर 2.500 ते 3,000 फळे प्रत्येक झाडापासून मिळतात. महाराष्ट्रातील हवामानात सप्टेंबर ते नोव्हेंबर या काळात चिकूला बहार येतो आणि त्यापासून 5 ते 6 महिन्यांनी म्हणजे जानेवारी ते एप्रिल या काळात फळे मिळतात. कोकण तसेच इतर भागांत जेथे उन्हाळा तीव्र नसतो अशा भागात फेब्रुवारी-मार्चच्या बहारापासून तसेच मधूनमधून येणाऱ्या बहारापासून जवळजवळ वर्षभर फळे मिळतात. चिकूचे झाड 70-75 वर्षांपर्यंत उत्पादन देऊ शकते.