चिंच लागवड । Chinch Lagwad । Chinch Sheti । चिंच पिकाखालील क्षेत्र आणि उत्पादन । चिंच पिकासाठी हवामान । चिंच पिकासाठी जमीन । चिंच पिकाच्या सुधारित जाती । चिंच पिकाची अभिवृद्धी । चिंच पिकाची लागवड पद्धती । चिंच पिकासाठी हंगाम । चिंच पिक लागवडीचे अंतर । चिंच पिकास वळण । चिंच पिक छाटणी । चिंच पिकाचे खत व्यवस्थापन । चिंच पिकाचे पाणी व्यवस्थापन । चिंच पिकातील आंतरपिके । चिंच पिकातील तणनियंत्रण । चिंच पिकातील महत्त्वाच्या किडी, रोग आणि त्यांचे नियंत्रण । चिंच पिकाच्या फळांची काढणी, उत्पादन आणि विक्री । चिंच पिकाच्या फळांची साठवण आणि पिकविण्याच्या पद्धती ।
।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।
चिंच लागवड : Chinch Lagwad : Chinch Sheti :
चिंच हे भारतात सर्वत्र आढळणारे उपयुक्त फळझाड आहे. चिंचेचे झाड काटक, कणखर, आणि दुष्काळी परिस्थितीत तग धरून राहणारे आहे. चिचेच्या झाडांची उंची 25 मीटर आणि विस्तार 8 मीटरपर्यंत वाढतो. चिंचेच्या झाडावर किडी आणि रोगांचा उपद्रव कमी प्रमाणात होतो. चिंचेचा गर उन्हात वाळवून वर्षभर साठविता येतो. म्हैसूर येथील सेंट्रल फूड टेक्नॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूटने चिंचेपासून पाण्यात विरघळणारा घट्ट गर’ आणि ‘चिंचेची पावडर तयार करण्याच्या पद्धती शोधून काढल्या आहेत. सध्या भारतात चिंचेचा पाण्यात विरघळणारा घट्ट गर तयार करण्याचे दोन कारखाने असून प्रत्येक कारखान्यातून दरवर्षी सुमारे 100 टन घट्ट गर तयार केला जातो. चिंचेच्या गरापासून पावडर तयार करण्याचा कारखाना भारतात कलकत्ता येथे आहे. चिंचेचा घट्ट गर काही प्रमाणात मध्यपूर्वेकडील देशांत निर्यात केला जातो. महाराष्ट्रात चिंचेच्या लागवडीस भरपूर वाव आहे. कमी खर्चात अनेक वर्षे कमी पावसाच्या प्रदेशातही कोरडवाहू फळपीक म्हणून चिंच महत्त्वाची आहे.
चिंच पिकाचे उगमस्थान, महत्त्व आणि भौगोलिक प्रसार ।
उगमस्थान :
चिंच या फळझाडाचे उगमस्थान मध्य आफ्रिकेतील आहे. तेथूनच चिंचेचा प्रसार भारतात झाला. भारतामध्ये काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत चिंचेची झाडे वाढलेली आढळतात.
भारतात रोजच्या आहारात चिंचेचा वापर केला जातो. चिंचगुळाची आमटी, चिंचेचे सार, चिंचेची चटणी, चिंचेचा कोळ, अर्क, इत्यादी अनेक रूपांत चिंच वापरली जाते. अलीकडे चिंचेपासून पावडर तयार करतात. उन्हाळयात उष्णतेचा त्रास कमी करण्यासाठी चिंचेच्या गराचे सरबत पितात. औषधी म्हणून जुना चिंचगर जास्त चांगला समजला जातो. औषधी गुणांमुळे चिंचेला अरब लोक ‘भारतीय खजूर’ असे म्हणतात. चिंचेचा गर काढून राहिलेल्या चिंचोक्यांचा उपयोग घोंगड्यांना खळ करण्यासाठी होतो. चिंचेचे लाकूड फर्निचर, बैलगाड्यांची चाके, भात गिरणीतील उखळी, तेल घाण्याच्या उखळी तयार करण्यासाठी वापरतात. चिंचेच्या झाडाचे लाकूड उत्कृष्ट दर्जाचे समजले जाते. चिंच औषधी तसेच औद्योगिक उत्पादनासाठीही वापरली जाते. अलीकडच्या काळात चिंच किंवा चिंचेपासून तयार केलेल्या पदार्थांना परदेशात मागणी वाढत आहे. त्यामुळे चिंचेला बाजारात भरपूर मागणी आहे. भारतातून मध्यपूर्वेकडील देशांत चिंचेची निर्यात होते. चिंचेच्या वाळलेल्या गरामध्ये 7.2 % पोटॅसिक बाय टार्टरेट, 9.1% टार्टरिक अॅसिड आणि 2.2. % सायट्रिक अॅसिड तसेच अल्प प्रमाणात मॅलिक अॅसिड असते. 100 ग्रॅम खाण्यायोग्य भागात पुढील अन्नघटक असतात.
अन्नघटक | प्रमाण (%) |
पाणी | 21.0 |
शर्करा (कार्बोहायड्रेट्स्) | 67.4 |
प्रथिने (प्रोटीन्स) | 3.0 |
स्निग्धांश (फॅट्स्) | 0.1 |
खनिजे | 3.0 |
तंतुमय पदार्थ | 5.6 |
स्फुरद | 0.2 |
लोह | 0.9 |
उष्मांक (कॅलरी) | 283 |
चिंच पिकाखालील क्षेत्र आणि उत्पादन ।
भारतात सर्वसाधारणपणे चिंचेची लागवड ही शेताच्या बांधावर, रस्त्याच्या अथवा नदीच्या कडेला किंवा डोंगरावर आढळते. चिंचेची शास्त्रीय पद्धतीने स्वतंत्रपणे केलेली लागवड कमी प्रमाणात दिसते. महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या रोजगार हमी योजनेशी निगडित फलोत्पादन विकासाच्या अंतर्गत या पिकाच्या लागवडीखालील क्षेत्र वाढत आहे. सन 1998 च्या गणतीच्या प्रमाणे महाराष्ट्रात उत्पादनक्षम चिंचेचे क्षेत्र 8,000 हेक्टर एवढे आहे.
चिंच पिकासाठी हवामान । चिंच पिकासाठी जमीन ।
चिंचेचे झाड विविध प्रकारच्या हवामानांत चांगले वाढते. कोकणासारख्या भरपूर पाऊस पडणाऱ्या भागात तसेच नगर, सोलापूरसारख्या अतिशय कमी पाऊस पडणाऱ्या दुष्काळी भागात चिंचेची झाडे वाढतात. चिंचेच्या झाडाला ठारावीक प्रकारच्या जमिनीची आवश्यकता नसते. अत्यंत हलक्या जमिनीत माळरानामध्ये, डोंगरउतारावर, मध्यम काळचा, भारी काळया आणि पोयट्याच्या जमिनीत चिंचेची झाडे चांगली वाढून उत्पादन देतात; परंतु अत्यंत दलदलीच्या, पाणी साचून राहणाऱ्या भागात चिंचेच्या झाडाची वाढ होत नाही.
चिंच पिकाच्या सुधारित जाती ।
चिंचेच्या जातींचे दोन मुख्य प्रकार आहेत. एका प्रकारची चिंच पिवळसर रंगाची असते किंवा चॉकलेटी रंगाची अथवा लालसर पिवळया रंगाची असते. या चिंचेचा उपयोग घरगुती वापरासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. ही चिंच वाळवून बाराही महिने वापरली जाते. दुसऱ्या प्रकारची चिंच रक्तासारखी लाल असते. ही चिंच ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये तयार होते. ती कच्चीच खाल्ली जाते. ही चिंच पिकल्यानंतर वाळवून तिचा उपयोग पिवळ्या चिंचेप्रमाणे करतात. मात्र ही चिंच कमी आंबट असते म्हणून या चिंचेला गोड चिंच असे म्हणतात. यात योगेश्वरी जात चांगली आहे. महाराष्ट्रात मराठवाडा कृषी विद्यापीठाने ‘प्रतिष्ठान’ नावाची चिंचेची जात निवड पद्धतीने शोधून काढली आहे. या जातीच्या चिंचेच्या फळांची लांबी 7.5 सेंटिमीटर, रुंदी 2.5 सेंटिमीटर आणि जाडी 1.8 सेंटिमीटर असून फळे सरळ आकाराची असतात. फळांच्या टरफलाचा रंग तांबूस तपकिरी आणि गर पिवळसर तांबड्या रंगाचा असतो.
चिंच पिकाची अभिवृद्धी । चिंच पिकाची लागवड पद्धती ।
चिंचेच्या झाडाची अभिवृद्धी बियांपासून रोपे तयार करून अथवा गुटी कलमे, भेट कलमे तयार करून केली जाते. बियांपासून तयार केलेल्या रोपांचे खात्रीलायक उत्पादन मिळेलच याची खात्री नसते. म्हणूनच चिंचेची व्यापारी तत्त्वावर लागवड करताना कलमे वापरून लागवड करावी.
कायमच्या जागी बी लावून लागवड करणे :
चिंचेच्या रोपांची मुळे सुरुवातीला जोमदार वाढतात. पॉलिथीनच्या पिशव्यांत तयार केलेल्या रोपांची मुळे 3 ते 4 महिन्यांत पिशव्यांतून बाहेर येऊन जमिनीत जातात. पॉलिथीनच्या पिशव्यांच्या तळाशी रोपांची मुळे आडवी झाल्यामुळे वाकडी वाढू लागतात. यासाठी चिंचेच्या झाडांची सुरुवातीपासून जोमदार वाढ व्हावी म्हणून कायमच्या जागी बी लावून चिंचेची लागवड केली जाते. अशा प्रकारे लागवड करण्यासाठी खड्ड्याच्या मध्यभागी एकमेकांपासून 15 सेंटिमीटर अंतरावर त्रिकोणात तीन बिया टाकाव्यात. बियांची रुजवण झाल्यावर प्रत्येक खड्ड्यात एकच जोमदार रोप ठेवून बाकीची रोपे काढून टाकावीत.
रोपे वापरून लागवड करणे :
चिंचेची रोपे तयार करण्यासाठी 10 सेंटिमीटर रुंदीची आणि 30 सेंटिमीटर लांबीची 300 गेज पॉलिथीनची पिशवी घ्यावी. पिशवीच्या खालच्या निम्म्या भागावर पंचने भोके पाडावीत. त्यानंतर पिशव्या चांगले कुजलेले शेणखत आणि पोयटामातीने भरून घ्याव्यात. मे-जून महिन्यात प्रत्येक पिशवीत ताजे चिंचोके लावावेत. रोपे 40 ते 50 सेंटिमीटर उंचीची झाल्यावर रोपांची खड्ड्यात लागवड करावी.
कलमे वापरून लागवड करणे :
चिंचेच्या झाडावर गुटी कलम बांधण्यासाठी झाडाच्या फांदीच्या शेंड्याकडून पाठीमागे सुमारे तीन सेंटिमीटर अंतरावरील फांदीचा भाग निवडावा. या ठिकाणची पाने काढून टाकावीत. फांदीवर 3 ते 4 सेंटिमीटर लांबीचा गोलाकार काप घेऊन साल काढावी. फांदीच्या टोकाकडील कापाच्या बाजूस 3,000 पी.पी.एम. तीव्रतेचे इंडॉल ब्युटीरिक अॅसिड हे संजीवक लावावे. त्यानंतर साल काढलेल्या जागेवर ओलसर शेवाळ बांधून पॉलिथीनच्या कागदाने गुटी बांधावी. चांगली मुळे आल्यानंतर गुटी कलम मातृवृक्षापासून वेगळी करावे. चिंचेच्या झाडावर भेट कलम तयार करण्यासाठी प्रथम पॉलिथीन पिशवीत रोपे तयार करून घ्यावीत. यासाठी 30 X 15 सेंटिमीटर आकाराच्या आणि 300 गेजच्या पॉलिथीन पिशव्या घ्याव्यात. पिशव्यांच्या खालील निम्म्या भागात 8 ते 10 भोके पाडावीत. पिशव्या 1 : 1 या प्रमाणात चांगले कुजलेले शेणखत आणि माती यांच्या मिश्रणाने भराव्यात. या पिशव्यांमध्ये फेब्रुवारी-मार्च महिन्यात चिंचोके टोकून पाणी द्यावे. ही रोपे सप्टेंबर ते नोव्हेंबरपर्यंत कलम करण्याजोगी होतात. या रोपांची जाडी पेन्सिलच्या जाडीपेक्षा किंचित कमी असावी. दरवर्षी नियमितपणे दर्जेदार आणि भरपूर फळे देणारे चिंचेचे झाड डोळकाडीसाठी निवडावे. या झाडावरील खुंटरोपाच्या जाडीइतक्या जाडीच्या फांद्या निवडाव्यात. खुंटरोप आणि डोळकाडीवर सारख्या आकाराचे 5 ते 6 सेंटिमीटर लांबीचे काप घेऊन ते एकमेकांवर बसवून कलमाचा हा जोड पॉलिथीन कागदाच्या पट्टीने घट्ट बांधावा. 3 ते 4 महिन्यांनी कलमाचा जोड एकजीव झाल्यावर कलम मातृवृक्षापासून वेगळे करावे.
रोपांची अथवा कलमांची लागवड करण्यासाठी 1 X 1 X 1 मीटर आकाराचे खड्डे खणून घ्यावेत. खड्डे भरताना तळाशी 10-15 सेंटिमीटर उंचीपर्यंत पालापाचोळा टाकावा. नंतर खड्डे चांगले कुजलेले शेणखत आणि माती यांच्या मिश्रणाने भरावेत. मातीत 100 ग्रॅम लिन्डेन (10%) पावडर मिसळावी. पावसाळयाच्या सुरुवातीला प्रत्येक खड्डयात चिंचेचे एक रोप अथवा कलम लावावे आणि लगेच पाणी द्यावे.
चिंच पिकासाठी हंगाम । चिंच पिक लागवडीचे अंतर ।
चिंचेची लागवड करताना दोन झाडांमध्ये 10 मीटर आणि दोन ओळींमध्ये 10 मीटर अंतर ठेवावे. एकदोन चांगले पाऊस पडल्यानंतर रोपांची अथवा कलमांची मुख्य शेतात लागवड करावी. त्यामुळे पावसाळ्यात जास्तीत जास्त पावसाचा आणि पावसाळी दमट हवामानाचा झाडांच्या वाढीसाठी भरपूर फायदा होतो. झाडांची मर कमी होते आणि वाढ जोमाने होते.
चिंचेच्या रोपांचे जनावरांपासून संरक्षण करण्यासाठी प्रत्येक खड्ड्याच्या भोवती बाभळीच्या काट्यांचे कुंपण करावे. चिंचेची लागवड करण्यापूर्वी चिंचेच्या बागेभोवती घायपाताची दोन ओळींत दाट लागवड करावी, त्यामुळे चिंचेच्या क्षेत्राचे जनावरांपासून संरक्षण होते आणि घायपातापासून उत्पन्नही मिळते.
चिंचेच्या रोपांच्या लागवडीनंतर रोपांची जोमदार वाढ व्हावी म्हणून पावसाळयाच्या शेवटी आच्छादनांचा वापर करावा. त्यासाठी प्रत्येक रोपाच्या खोडाभोवती आळयात 10 % लिन्डेन या कीडनाशकाची 100 ग्रॅम पावडर टाकावी आणि त्यावर किमान 20 ते 30 सेंटिमीटर जाडीचा वाळेलल्या गवताचा, पालापाचोळयाचा, उसाच्या पाचटाचा लाकडाच्या भुश्याचा किंवा भाताच्या काडाचा थर देऊन आच्छादन तयार करावे. असे आच्छादन सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात घालणे फार महत्त्वाचे आहे. त्यामुळे जमिनीत ओलावा टिकून राहतो.
चिंच पिकास वळण । चिंच पिक छाटणी ।
चिंचेच्या झाडांची नियमित छाटणी करण्याची आवश्यकता नाही. दरवर्षी चिंचेची फळे काढून झाल्यावर झाडाच्या वाळलेल्या फांद्या कापून काढाव्यात. झाडाला सुरुवातीला वळण देण्यासाठी रोप 1 मीटर उंचीचे झाल्यावर त्याचा शेंडा खुडावा आणि त्यानंतर चारी दिशांना विखुरलेल्या चार फांद्या राहतील अशा ठेवाव्यात. चिंचेचे झाड वाढत असताना त्याची हलकी छाटणी केल्यास झाडाची वाढ जोमदार होते. चिंचेच्या झाडाला येणाऱ्या आडव्या-तिडव्या फुटी आणि फांद्या आणि कलमी झाडाचे खुंटावरील फुटवे काढीत जावे; त्यामुळे मुख्य खोड मजबूत होऊन जोमाने वाढू लागते.
चिंच पिकाचे खत व्यवस्थापन । चिंच पिकाचे पाणी व्यवस्थापन ।
चिंचेच्या झाडांना खते देण्याची पद्धत नाही. चिंचेच्या झाडांची लागवडीनंतर सुरुवातीच्या सुमारे 6-7 वर्षांत चांगली जोमदार वाढ होऊन ती लवकरात लवकर फळांवर यावीत यासाठी त्यांना शेणखत आणि रासायनिक खते द्यावीत. रोपे एक वर्षाची झाल्यानंतर खते देण्यास सुरुवात करावी. पाऊस पडताच जून महिन्यात, पाऊस उशिरा झाल्यास जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेणखत आणि मिश्रखत द्यावे. सुमारे तीन आठवड्यांनी पावसाचा अंदाज घेऊन अमोनियम सल्फेटमधून नत्रयुक्त खत द्यावे. अन्यथा युरिया वापरावा. यानंतर पुन्हा तीन आठवड्यांनी पावसाचा अंदाज घेऊन नत्राचा दुसरा हप्ता द्यावा. खताचे प्रमाण मुख्यतः झाडांच्या वाढीवर अवलंबून असते.
झाडाचे वय (वर्षे) | शेणखत (किलो) | मिश्रखत (ग्रॅम) | नीमपेंड (ग्रॅम) | डायअमोनियम फॉस्फेट (ग्रॅम) |
1 | 5 | 100 | 100 | 50 |
2 | 10 | 150 | 150 | 75 |
3 | 15 | 175 | 200 | 100 |
4 | 20 | 200 | 200 | 100 |
5 | 20 | 250 | 250 | 125 |
6 | 25 | 250 | 300 | 125 |
7 | 25 | 250 | 300 | 150 |
8 | 30 | 300 | 300 | 150 |
9 | 30 | 350 | 500 | 200 |
10 आणि त्यापुढील प्रत्येक वर्षी | 40 | 500 | 500 | 250 |
पहिल्या दोन वर्षांत उन्हाळयात झाडांभोवती आच्छादन करावे आणि प्रत्येक झाडाला दर दहा दिवसांनी 10 ते 15 लीटर पाणी द्यावे. झाडे मोठी झाल्यावर शक्य असल्यास झाडे फुलावर असताना आणि फळे लागल्यानंतर पाणी दिल्यास उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होते.
चिंच पिकातील आंतरपिके । चिंच पिकातील तणनियंत्रण ।
चिंचेच्या लागवडीनंतर सुरुवातीची 8-10 वर्षे झाडांच्या दोन ओळींमधील मोकळया जागेत शेवगा, एरंडी, तूर यांपैकी एक अथवा अनेक प्रकारची झाडे आंतरपिके म्हणून घेता येतात.
तणनियंत्रण :
चिंच झाड लहान असतानाच खोडाभोवती चाळणी करून आळी तणविरहित ठेवावीत, पावसाळ्यानंतर खोडाभोवती गवताचे आच्छादन करावे.
चिंच पिकातील महत्त्वाच्या किडी, रोग आणि त्यांचे नियंत्रण ।
चिंचेच्या फळझाडांवर नुकसानकारक रोग आणि किडींचा उपद्रव शक्यतो होत नाही. काही वेळा खोडअळी आणि गॉलमाशीचा प्रादुर्भाव झाडावर दिसून येतो. खोडअळीच्या नियंत्रणासाठी, खोडावरील छिद्रांमध्ये रॉकेल अथवा पेट्रोलने भिजविलेल्या कापसाचा बोळा टाकून छिद्रे ओल्या मातीने बंद करावीत.
चिंच पिकाच्या फळांची काढणी, उत्पादन आणि विक्री ।
चिंचेच्या झाडाची वाढ अतिशय सावकाश होते. बियांपासून रोपे तयार करून लागवड केलेल्या झाडांना लागवडीनंतर सुमारे 10 वर्षांनी फळे येण्यास सुरुवात होते. कलमी झाडापासून लागवडीनंतर साधारणपणे सातव्या वर्षापासून उत्पादन मिळण्यास सुरुवात होते. चिंचेच्या झाडाला जून-जुलै महिन्यात फुलोरा येतो आणि मार्च – एप्रिल महिन्यात चिंचा काढणीस तयार होतात. चिंचा पिकण्यास सुरुवात झाल्यावर सालीचा अथवा टरफलाचा हिरवा रंग बदलून तपकिरी रंग येतो. पक्व फळांची साल पूर्णपणे वाळून गरापासून वेगळी होते. चिंचेच्या 10 वर्षे वयाच्या एका झाडापासून बिया आणि टरफले वेगळी केलेली 100 ते 150 किलो चिंच मिळते. झाडांचा विस्तार वाढल्यानंतर चिंचेच्या उत्पादनात वाढ होते. चिंचेच्या पूर्ण वाढ झालेल्या वीस वर्षे वयाच्या झाडापासून 500 किलोपर्यंत चिंच मिळते. टरफले, शिरा आणि बिया वेगळी केलेली चिंच बाजारात विक्रीसाठी पाठवितात. वाळविलेल्या चिंचेच्या गराची विक्री पूर्ण वर्षभर केली जाते. चांगल्या जमिनीत चिंचेचे उत्पादनक्षम आयुष्य 100 वर्षे असते.
चिंच पिकाच्या फळांची साठवण आणि पिकविण्याच्या पद्धती ।
चिंचेच्या फळांची काढणी चिंचेची फळे झाडावरच पक्क झाल्यावर केली जाते. त्यामुळे फळे पिकविण्याच्या स्वतंत्र पद्धती नाहीत. चिंचेच्या फळांची काढणी केल्यानंतर टरफले, चिंचोके आणि शिरा काढून उरलेला गर वाळवितात. काही वेळा टरफलासह चिंच उन्हात 7-8 दिवस वाळवितात आणि नंतर गर वेगळा करतात. असा वाळविलेला चिंचेचा गर कोणतीही प्रक्रिया न करता तसाच साठविला जातो.
सारांश :
चिंच हे फळ अनेक प्रकारच्या जमिनीत तसेच विविध पाऊसमानाच्या प्रदेशात वाढते. चिंचेच्या फळाच्या गरातील रंगावरून चिंचेचे पिवळी चिंच आणि लाल चिंच असे दोन प्रकार पडतात. चिंचेच्या झाडाची अभिवृद्धी बियांपासून रोपे तयार करून तसेच कलमे तयार केली जाते. चिंचेच्या 20 वर्षे वयाच्या एका झाडापासून बिया आणि टरफले वेगळी केलेली सुमारे 500 किलो चिंच मिळते.