कॉफी लागवड | Coffee Lagwad | Coffee Sheti | कॉफी पिकासाठी हवामान | कॉफी पिकासाठी जमीन | कॉफी पिकाचे उगमस्थान, महत्त्व, भौगोलिक विस्तार | कॉफी पीक लागवडीचे क्षेत्र | कॉफी पीक उत्पादन | कॉफी पिकाची अभिवृद्धी | कॉफी पिकाची लागवड पद्धती | कॉफी पिकास लागवड योग्य हंगाम | कॉफी पिकास लागवडीचे अंतर | कॉफी पिकाच्या उन्नत जाती | कॉफी पीक खत व्यवस्थापन | कॉफी पीक पाणी व्यवस्थापन | कॉफी पिकात आंतरपिकाची लागवड | कॉफी पिकावरील महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण | कॉफी पिकावरील महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण | कॉफीच्या फळांची काढणी, हाताळणी आणि विक्रीव्यवस्था | कॉफीच्या फळावरील आवरण काढणे |
।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।
कॉफी लागवड : Coffee Lagwad : Coffee Sheti :
भारतात कॉफीचे स्थान लागवड पिकांपैकी ( प्लैंटेशन क्रॉप) प्रथम क्रमांकावर आहे. या पिकाची लागवड दक्षिण भारतातील कर्नाटक, केरळ, तामीळनाडू व आंध्र प्रदेशात होते. कॉफीची लागवड काही प्रमाणात अरुणाचल प्रदेश, आसाम, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, ओरिसा, सिक्किम, त्रिपुरा व पश्चिम बंगाल या राज्यांत केली जाते. महाराष्ट्र राज्यातही कॉफीची लागवड वाढत असून नाशिक जिल्हयात प्रथमच वनशेतीच्या माध्यमातून कॉफी लागवड वाढत आहे. आजमितीला एकट्या नाशिक जिल्हयातील कॉफीचे क्षेत्र 500 एकरच्या वर गेले आहे. जगभर कॉफीचा वापर उत्साहवर्धक पेय म्हणून केला जातो. त्यातही भारतामध्ये तयार होणारी कॉफी ही उत्कृष्ट प्रतीची मानली जाते. कॉफी लागवडीपासून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होतो. कॉफी लागवडीमुळे जंगलाचे मोठ्या प्रमाणावर संवर्धन होते. कॉफी लागवड ही प्रामुख्याने पश्चिम व पूर्व घाट भागात एकवटली असून तिच्या योग्य उत्पादनासाठी समान पसरलेल्या पावसाची नितांत आवश्यकता असते. उन्हाळयात येणारा पाऊस हा कॉफीला फुले येण्यास अत्यंत उपयुक्त ठरतो.
कॉफी पिकाचे उगमस्थान, महत्त्व, भौगोलिक विस्तार |
इथोपिया देशातील कफ्फा प्रदेश हे कॉफीचे मूळ असून येमेनमध्ये अरब बऱ्याच वर्षांपासून बागायती कॉफीचे उत्पादन घेत होते. कॉफीची लागवड ते प्रामुख्याने सुवासिक फुलांसाठी करीत असत. मध्य अफ्रिका हे रोबुस्टा कॉफीचे घर आहे.
इ.स. 1600 पूर्वी अरेबिका कॉफी ही भारतात मुस्लिम धर्मगुरू बाबा बुदान यांनी प्रथम आणली. बाबा बुदान यांनी येमेन येथून कॉफीची सात बीजे आणून त्यांनी ती कर्नाटक राज्यातील चिकमंगळूरच्या डोंगराळ भागात लावली होती.
कॉफी पीक लागवडीचे क्षेत्र | कॉफी पीक उत्पादन |
अरेबिका व रोबुस्टा या कॉफीच्या दोन प्रमुख प्रजातींची व्यापारीदृष्ट्या लागवड केली जाते. भारतात एकूण कॉफी पिकाखालील 2.92 लाख हेक्टर क्षेत्रापैकी 50% क्षेत्र हे अरेबिका, रोबुस्टा प्रजातींखालील आहे. कॉफीचे वार्षिक सरासरी उत्पादन 2.00 लाख मे. टन असून त्यापैकी 60% उत्पादनाची निर्यात होते. त्यापासून जवळपास 900 कोटी रुपयांचे परकीय चलन मिळते. आज भारतात जवळपास 9.40 लाख शेतकरी कॉफीची लागवड करतात.
कॉफी पिकासाठी हवामान | कॉफी पिकासाठी जमीन |
कॉफीच्या पिकाला उष्ण आणि दमट हवामानाची आवश्यकता असते. तापमान 20-30 अंश सेल्सिअस आणि वातावरणात आर्द्रतेचे प्रमाणही 70-80% असावे. आर्द्रतेचे प्रमाण कमी असले तरी कॉफी लागवडीत सिल्व्हर ओकची दाट लागवड करून आर्द्रतेचे प्रमाण वाढविता येते.
कॉफीच्या पिकासाठी 75 सेंमी. खोलीची हलकी ते मध्यम आणि पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन आवश्यक असते. पावसाचे प्रमाण कमी असलेल्या ठिकाणी भारी काळ्या जमिनीतही कॉफीची लागवड यशस्वी होते.
अ.क्र. | घटक | अरेबिका | रोबुस्टा |
1 | समुद्रसपाटीपासून उंची | 1,000-1,500 मी. | 500-1,000 मी. |
2 | वार्षिक पर्जन्यमान | 1,600-2,500 मिमी. | 1000-2000 मिमी. |
3 | तापमान | 15-25 अंश सेल्सिअस | 20-30 अंश सेल्सिअस |
4 | आर्द्रता | 70-80 % | 80-90 % |
5 | जमीन | खोल, पाणी टिकवून धरणारी पीएच 6-6.5 | अरेबिकासारखी |
6 | उतार | सपाट ते मध्यम | सपाट व थोडासा उतार |
कॉफी पिकाच्या उन्नत जाती |
कॉफी पिकाचे प्रामुख्याने अरेबिका कॉफी आणि रोबुस्टा कॉफी असे दोन प्रकार पडतात. अरेबिका कॉफीचे रोप झुडपासारखे वाढते आणि ह्या झाडात स्वपरागीभवन होते, तर रोबुस्टा प्रकारातील कॉफीचे रोप उंच झाडासारखे वाढते आणि ह्या झाडात परपरागीभवन होते. म्हणून व्यापारी लागवडीसाठी अरेबिका प्रकारातील कॉफीची निवड करावी. अरेबिका कॉफीच्या अनेक जाती लागवडीसाठी उपलब्ध आहेत. मात्र कॉफीची कावेरी किंवा सिलेक्शन -12 ही संकरित जात पानांवरील तांबेरा या रोगाला प्रतिबंधक असल्यामुळे तिची व्यापारी लागवडीसाठी निवड करावी.
सिलेक्शन – 6 :
ही जात रोबुस्टा आणि अरेबिका प्रकारातील जातींच्या संकरामधून निर्माण करण्यात आलेली आहे. या जातीची झाडे अरेबिका प्रकारातील झाडांसारखी दिसतात. पुष्पगुच्छ घट्ट असून झाड उंच वाढते. ही जात तांबेरा रोगाला प्रतिकारक आहे. समुद्रसपाटीपासून 400 ते 500 मीटर उंचीपर्यंत या जातीची वाढ चांगली होते. या जातीपासून एकरी 800 ते 1,000 किलो कॉफीचे उत्पादन मिळते.
सिलेक्शन 12 :
या जातीलाच कावेरी असे म्हणतात. ही संकरित जात असून अती घनता (High Density) पद्धतीने लागवड करण्यासाठी उत्तम आहे. या जातीच्या झाडाला भरपूर फांद्या येतात आणि फलधारणा झाल्यानंतर फांद्या फळांच्या वजनाने जमिनीकडे झुकतात.
फांद्यांची कांडी आखूड असल्यामुळे फांद्यांवर फुले आणि त्यांनतर फळे लांब, घट्ट वेणीसारखी दिसतात. ही जात तांबेरा रोगास प्रतिकारक असून एकरी 1,000 ते 1,200 झाडे बसतात आणि एकरी 1,000 ते 1,200 किलोपर्यंत उत्पादन मिळते.
कॉफी पिकाची अभिवृद्धी | कॉफी पिकाची लागवड पद्धती |
कॉफीची अभिवृद्धी बियांपासून रोपे तयार करून करतात. कॉफी बियांस सुप्तावस्था नसते. पेरणीपासून 45 दिवसांत त्यांचे अंकुरण होते. बियांची निवड करताना कॉफी झाडाचे उत्पादन, रोग कीड प्रतिकारकशक्तीबाबत निरीक्षणे घेऊन निवड करावी. पेरणीसाठी पक्व कॉफी फळे एका विशिष्ट अवस्थेत काढून लगेचच त्याचा रस काढून टाकावा. नंतर त्या बिया स्वच्छ पाण्यात धुऊन त्या लाकडी भुशाबरोबर मिसळाव्यात. त्यानंतर सावलीत वाळत घालाव्यात. दिवसातून 2 ते 3 वेळा हलवाव्यात. जेणेकरून एकसारख्या सुकतील. नंतर सुकलेल्या बियांस बाविस्टीन अर्धा ग्रॅम प्रति किलो बियाण्याला चोळावे. नंतर त्यांची पेरणी करावी.
कॉफीची शाखीय पद्धतीने अभिवृद्धी पान, मूळ, फांदी तसेच कलम पद्धतीनेही करता येते. कॉफीची लागवड आयताकृती किंवा चौरस पद्धतीने करतात. यामध्ये दोन झाडांमधील अंतर साधारण: 6 ते 8 फूट तर दोन ओळींतील अंतर 8 ते 10 फूट एवढे ठेवावे.
कॉफी पिकास लागवड योग्य हंगाम | कॉफी पिकास लागवडीचे अंतर |
कॉफीची लागवड करताना वातावरणाचा व जमिनीचा प्रकार, सूर्यप्रकाश, रोग व कीड यांचा प्रादुर्भाव, एकरी झाडांची संख्या या सर्व बाबींचा विचार करून अंतर ठरवावे. दोन ओळींतील अंतर जास्त ठेवल्यास पश्चिमेकडील सूर्यप्रकाशामुळे कॉफीच्या झाडाची वाढ व्यवस्थित होत नाही. याउलट दोन ओळींमधील अंतर कमी ठेवल्यास कॉफी पिकासाठी जास्त सावली हानीकारक असते. त्यामध्ये रोग व किडींचा प्रादुर्भाव वाढतो.
कॉफीच्या झाडाला आवश्यक सूर्यप्रकाशाचा पुरवठा न झाल्यास कॉफीच्या झाडांची पालेदार वाढ होऊन फळे देण्याची क्षमता कमी राहते. तणे, रोग व कीड नियंत्रण करणे कठीण जाते. कमी अंतरामुळे कॉफीच्या झाडांच्या मुळांना कमी कार्यक्षेत्र मिळत असल्यामुळे वर्षानुवर्षे झाडांची उत्पादनक्षमता कमी होत जाते. म्हणून कॉफी लागवडीपूर्वी आखणीच्या अंतराचा विचार करणे अत्यंत फायदेशीर ठरते. कॉफीच्या जातीनुसार पुढील अंतरे फायदेशीर ठरतील.
(1) अरेबिका 7′ x 6′ किंवा 8′ x 6′ किंवा 9′ x 6′
(2) रोबुस्टा 10 x 10 किंवा 8′ x 8 किंवा 9 x 9′
कॉफी लागवडीचे अंतर एकदा कायम केल्यानंतर जमिनीचा प्रकार व पोत यावरून 1′ x 1′ x 1′ किंवा 11⁄2′ x 1 x 1 ‘ खोलीचे खड्डे करून ते 15 – 20 दिवस उन्हात चांगले तापू द्यावेत. कॉफीची लागवड साधारणतः जुलै ते सप्टेंबर महिन्यांत करावी.
खड्डे खणल्यानंतर खड्यामध्ये चांगले कुजलेले 1 टोपली शेणखत + अर्धा किलो सुपरफॉस्फेट टाकून शेणखत व्यवस्थित मातीत मिसळून खड्डा मातीने भरून घ्यावा. त्यानंतर खड्ड्यात पाणी सोडून खड्डे लागवडीसाठी तयार ठेवावेत.
रोगमुक्त व जोमाने वाढणाऱ्या रोपांची शेतात लागवडीसाठी निवड करावी. वाढ खुंटलेली तसेच कमजोर मुळे असलेली रोपे घेऊ नयेत. कॉफी या पिकासाठी आच्छादन झाडांची लागवड करणे गरजेचे असते. त्यासाठी सिल्व्हर ओक या लवकर वाढणाऱ्या जातीची निवड करून कॉफी लागवडीच्या वेळेस त्यांची लागवड करावी लागते. त्यासाठी आच्छादक झाडांच्या रोपांची उपलब्धता लागवडीच्या वेळेस असणे अत्यंत गरजेचे असते कॉफीची लागवड करताना प्रथम सिल्व्हर ओकची 3 फूट अंतर ठेवून व ओळीच्या शेवटीसुद्धा 3′ फूट अंतर ठेवून लागवड करावी. कारण या दोन झाडांच्या सावलीमुळे पुढील लागवड होणाऱ्या कॉफीच्या झाडाचे कडक उन्हापासून संरक्षण होते.
साधारणपणे वाफ्यात तयार केलेली 6-8 महिन्यांच्या रोपांची पावसाळा सुरू होताच जुलै ते सप्टेंबर दरम्यान लागवड करावी.
कॉफीची लागवड करत असताना एक झाड सिल्व्हर ओक, एक झाड कॉफी – या पद्धतीने लागवड करावी. म्हणजे दोन सिल्व्हर ओकच्या झाडांदरम्यान एका कॉफी रोपाची लागवड करावी. उदाहरणार्थ, कॉफीच्या लागवडीसाठी 8′ x 6′ अंतर असेल, लागवडीच्या वेळी दोन ओळींतील अंतर 8 फूट असेल, तसेच दोन सिल्व्हर ओक झाडांतील अंतर 6 फूट तसेच दोन कॉफीच्या झाडांतील अंतर 6 फूट असेल; पण सिल्व्हर ओक व कॉफी या दोन झांडातील अंतर 3 फूट असेल म्हणजेच दोन सिल्व्हर ओकच्या दरम्यान एका कॉफी रोपाची लागवड करावी.
कॉफी पीक खत व्यवस्थापन | कॉफी पीक पाणी व्यवस्थापन |
कॉफीच्या पिकासाठी द्यावयाच्या खताच्या मात्रा ह्या त्या जातीची उत्पादनक्षमता आणि जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्य यांवर अवलंबून असतात. कॉफीचे भरघोस उत्पादन घेताना सुरुवातीला झाडाची पालेदार वाढ करून घेण्यासाठी नत्रयुक्त खतांचा पुरवठा करावा. मात्र फळधारणा झाल्यानंतर फळांच्या निरोगी वाढीसाठी पोटॅश खताचा पुरवठा करावा लागतो. स्फुरदयुक्त खतांचा पुरवठा हा लागवडीच्या वेळीच करावा; म्हणजे झाडांच्या मुळांची वाढ चांगली होते.
सर्वसाधारणपणे कॉफीच्या पिकाला एकरी 120 किलो नत्र, 90 किलो स्फुरद आणि 120 किलो पालाश वर्षातून दोन वेळा विभागून द्यावा. कॉफीच्या पिकाला सुरुवातीची तीन वर्षे जमिनीच्या मगदुराप्रमाणे आवश्यकतेनुसार पाणीपुरवठा करावा. ठिबक सिंचनाचा वापर केल्यास कॉफीची वाढ अधिक चांगली होते. कॉफी आणि सिल्व्हर ओक यांची वाढ झाल्यानंतर जमीन पूर्ण झाकली जाते. त्यामुळे जमिनीला दिलेले पाणी बाष्पीभवनाने उडून जात नाही. त्यामुळे वारंवार पाणी देण्याची आवश्यकता नसते. तथापि, फळधारणा झाल्यानंतर अथवा रासायनिक खते घातल्यानंतर कॉफीच्या पिकाची पाण्याची गरज वाढते.
कॉफीच्या पिकाला ठिबक सिंचनातून दररोज 10 लीटर अथवा दिवसाआड 10 लीटर पाणी द्यावे. मोकाट पद्धतीने पाणी दिल्यास पाण्याची पाळी उन्हाळयात 8-10 दिवसांनी, हिवाळयात 10-12 दिवसांनी आणि पावसाळ्यात आवश्यकतेप्रमाणे द्यावी.
उत्पादन किलोमध्ये | फुलोऱ्या पूर्वी | फुलोऱ्या नंतर | पावसाळया दरम्यान | पावसाळया- नंतर | एकूण |
अरेबिका कॉफी | |||||
500 | 20:15:20 | 20:15:20 | — | 20:15:20 | 60:45:60 |
750 | 30:20:20 | 30:20:30 | — | 30:20:30 | 90:60:90 |
1,000 | 30:20:30 | 30:30:30 | 30:20:30 | 30:20:30 | 120:90:120 |
1,250 | 40:30:40 | 30:30:40 | 30:20:30 | 30:20:30 | 130:100:130 |
रोबुस्टा कॉफी | |||||
500 | 20:15:20 | — | — | 20:15:20 | 40:30:40 |
750 | 30:20:20 | — | — | 30:20:30 | 60:40:60 |
30:20:30 | — | — | 30:20:30 | 90:60:90 |
कॉफी पिकात आंतरपिकाची लागवड |
कॉफीची लागवड केल्यानंतर पहिल्या आणि दुसऱ्या वर्षी झाडे लहान असताना जमिनीत भुईमूग आणि सोयाबीनसारखी कमी कालावधीची पिके घेता येतात. मात्र तिसऱ्या वर्षापासून अशी पिके घेऊ नयेत; कारण तिसऱ्या वर्षी कॉफीच्या पिकामध्ये सावलीसाठी आणि आर्द्रता वाढविण्यासाठी लागवड केलेली सिल्व्हर ओकची झाडे सुमारे 20 फुटांपर्यंत वाढलेली असतात.
तिसऱ्या वर्षी भुईमुगासारखे आंतरपीक घेण्याऐवजी सिल्व्हर ओकच्या झाडाच्या खोडाजवळ काळी मिरीची लागवड करून काळी मिरीचे वेल सिल्व्हर ओकच्या खोडावर वाढू द्यावेत. काळी मिरी हे कॉफी पिकामधील कायमस्वरूपी आंतरपीक म्हणून राहू शकते. एका एकरात सिल्व्हर ओकच्या झाडांइतकीच काळी मिरीची रोपे लावता येतात. मसाल्याच्या इतर पिकांप्रमाणेच काळी मिरीला सावलीची आवश्यकता असते. कॉफीच्या लागवडीमध्ये एका वर्षांनंतर सिल्व्हर ओकच्या झाडापासून 30 सेंमी. अंतरावर पूर्व व उत्तर दिशेला एक – एक असे दोन वेल लावावेत.
एक एकर कॉफीच्या शेतात 900 झाडे कॉफीची, 900 झाडे सिल्व्हर ओकची आणि 900 झाडे काळी मिरीची अशी मिळून 2700 झाडे वाढवून अति घनता पीक उत्पादन पद्धतीचा अवलंब करून एकाच जमिनीमधून एकाच वेळी तीन पिकांचे उत्पादन घेता येते.
कॉफी पिकावरील महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण |
कॉफीच्या पिकाचे पांढरा खोडकिडा, फळे पोखरणारी अळी, पिठ्या ढेकूण आणि खवले कीड या किडी प्रामुख्याने नुकसान करतात.
पांढरा खोडकिडा :
पांढरा खोडकिडा हा भारतामध्ये अरेबिका कॉफीला जास्त प्रभावित करतो. हा खोडकिडा 1 ते 2 सेंमी. लांब असतो. पंख काळपट पांढरे पट्टे असलेले असतात. नर मादीपेक्षा लहान असतो.
प्रादुर्भाव झालेल्या कॉफीच्या झाडाच्या खोडावर ठळकपणे उभे पट्टे दिसतात. काही दिवसांनंतर ती झाडे पिवळी पडतात व त्यांची पाने वाळतात. या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर एप्रिल-मे व ऑक्टोबर – डिसेंबर महिन्यांमध्ये दिसून येतो.
या किडीची नियंत्रणासाठी मोकळी झालेली खोडावरील साल वेळोवेळी काढून टाकावी. न्युऑन 500 मिली. किंवा मेथोमिल 1,000 मिली. किंवा लिंडेन 20 इसी 1,300 मिली. प्रति 200 लीटर पाण्यात घेऊन साधारणतः खोडावर किंवा दाट असलेल्या कांड्यावर फवारणी करावी.
कॉफी फळे पोखरणारी किडी :
कॉफीच्या पिकावर या किडीचा फार मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होतो. वयस्क फळे पोखरणारी अळी ही लहान, काळसर, निमुळत्या आकाराची असते. अंगावर दाट केस असतात. कॉफीच्या शेतात सावली जास्त असेल तर किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. प्रादुर्भाव झालेल्या फळांच्या टोकाकडे छिद्रांतून भुसा बाहेर पडताना दिसतो. किडीमुळे फळे गळून पडतात. या किडीच्या नियंत्रणासाठी एन्डोसल्फान 400 मिली. किंवा मेथोमिल 700 मिली. 200 लीटर पाण्यात घेऊन फवारावे.
शेंडा पोखरणारी अळी :
शेंडा पोखरणारी अळी ही रोबुस्टा कॉफीची महत्त्वाची कीड आहे. पूर्ण वाढलेली कीड ही तपकिरी व काळसर रंगाची असते. मादी गर्द रंगाची असून नरापेक्षा मोठी असते. किडीच्या अंगावर बारीक केस असतात. किडीचा प्रादुर्भाव प्रथम हिरव्या तजेलदार भागावर होतो. नवीन झाडांच्या शेंड्यावर प्रथम या किडीची सुरुवात होते. ही कीड शेंड्याकडून मुळाकडे पोखरत पोकळी निर्माण करून त्यात अंडी घालते. अंड्यातून पिले बाहेर पडल्यानंतर ती कोवळ्या शेंड्यांवर हल्ला करतात. ह्या किडीचा प्रादुर्भाव सप्टेंबर ते जानेवारी दरम्यान जास्त असतो. उन्हाळा सुरू झाल्यानंतर हळूहळू कमी होतो. कॉफीच्या झाडांवर जास्त आच्छादन असलेल्या ठिकाणी जास्त प्रादुर्भाव दिसून येतो. प्रादुर्भाव झालेल्या फांद्या वाळतात. त्यामुळे उत्पादन देणाऱ्या फांद्यांचे प्रमाण कमी होत जाते. या किडीच्या नियंत्रणासाठी प्रादुर्भाव झालेल्या फांद्या काढून टाकाव्यात. 500 मिली. न्युऑन किंवा क्लोरोपायरिफॉस 200 लीटर पाण्यासाठी घेऊन फवारणी करावी. कॉफीच्या शेतात कमीत कमी आच्छादन राहील याची दक्षता घ्यावी.
मिलिबग्ज :
मिलिबग्जचा प्रादुर्भाव हा कडक उन्हात मोठ्या प्रमाणावर होतो. मिलिबग्ज हे मुळाजवळ तयार होतात. नंतर फांद्या व पानांवर हल्ला करतात. मिलिबग्ज पानांतील, फळांतील पेऱ्यांमधील रस शोषतात. त्यामुळे पाने काही दिवसांनी वाळतात. फळांचा आकार लहान राहतो. मिलिबग्जने सोडलेल्या चिकट द्रव्यावर बुरशी तयार होते. त्यानंतर ती बुरशी काळी पडते. मिलिबग्जचा प्रादुर्भाव हा रोबुस्टा व अरेबिका ह्या दोन्ही जातींवर होतो.
या किडीच्या नियंत्रणासाठी कॉफीच्या शेतात गरजेपुरती सावली ठेवावी. मिथील पॅराथिऑन 2% पावडरची बागेत धुरळणी करावी. तसेच क्विनॉलफॉस 300 मिली. किंवा क्लोरोपायरिफॉस 500 मिली. किंवा डायक्लोरोव्हॉस 500 मिली. 200 लीटर पाण्यात घेऊन फवारणी करावी.
कॉफी पिकावरील महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण |
कॉफीच्या पिकावर प्रामुख्याने तांबेरा, ब्लॅक रॉट, करपा या रोगांचा प्रादुर्भाव होतो.
सतत ढगाळ वातावरण व 22 ते 23 अंश सेल्सिअस उष्णतामान ह्या रोगाच्या वाढीस अनुकूल ठरते. हा रोग कॉफी पिकामध्ये वर्षभर आढळून येतो. परंतु ऑगस्ट ते नोव्हेंबर या काळात रोगांची तीव्रता जास्त दिसते. या रोगांच्या प्रादुर्भावामुळे पानाच्या खालच्या बाजूस फिकट पिवळे डाग दिसतात. नंतर ते नारिंगी पिवळे होऊन त्यावर भुरीसारखी लक्षणे दिसून येतात. त्यामुळे पानगळ मोठ्या प्रमाणावर होऊन नुकसान होते.
या रोगाच्या नियंत्रणासाठी 0.5% बोर्डो मिश्रण मे व सप्टेंबरमध्ये झाडांवर फवारावे. प्लॅन्टवॅक्स 20 इसी 0.03 % किंवा बेलेटॉन 25 WP 0.02% या बुरशीनाशकाचे फवारे द्यावेत. तसेच तांबेरा प्रतिबंधक जातींची लागवड करावी.
ब्लॅक रॉट :
सतत पाऊस त्यानंतर कोरडा पावसाळा व आर्द्रता या रोगाच्या वाढीस अनुकूल ठरतात. लागण झालेल्या पानांचा रंग काळा पडतो. त्यानंतर पान कुजून गळून पडते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पानगळ व फळगळ होते. या रोगाच्या नियंत्रणासाठी रोगट पाने व फळांचा नाश करावा. 1% बोर्डो मिश्रणाचा फवारा जून, जुलै महिन्यांत
द्यावा.
करपा :
ह्या रोगाचा प्रादुर्भाव पाने, शेंडे तसेच फळांवर होतो. ह्या रोगाच्या बुरशीमुळे इतर बुरशीजन्य रोगांची वाढ होते. या रोगाच्या नियंत्रणासाठी 1% बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी. झाडाची जास्त दाटी होणार नाही याची काळजी घ्यावी.
कॉफीच्या फळांची काढणी, हाताळणी आणि विक्रीव्यवस्था |
कॉफीची काढणी :
पार्चमेंट व चेरी कॉफी तयार करण्यासाठी कॉफीच्या फळांची काढणी योग्य वेळी होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामध्ये कॉफीच्या प्रक्रियायोग्य अशाच फळांची तोडणी करावी. फळे पूर्णपणे पिकलेली असावीत. हळूच दाबल्यानंतर फळातील बिया बाहेर येत असतील तर कॉफी काढावयास तयार आहे असे समजावे. अर्धी पिकलेली किंवा जास्त पिकलेली फळे पार्चमेंट कॉफीसाठी निवडू नये. त्यामुळे कॉफीच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. कॉफी फळांची अर्धवट किंवा जास्त पिकलेल्या फळांची काढणी केली तर पुढील हंगामात पोचट कॉफी तयार होण्याचे प्रमाण वाढत जाते. कॉफी काढणीच्या वेळी सर्व फळे एकाच वेळी काढावी लागतात; म्हणून अर्धी किंवा जास्त पिकलेल्या फळांची प्रतवारी करून त्यांची प्रक्रिया वेगळी करणे फायदेशीर ठरते. अशा अर्ध्या व जास्त पिकलेल्या फळांपासून चेरी कॉफी बनवावी. कॉफी काढणीसाठी वापरात असलेल्या पिशव्या प्रत्येक दिवशी वाळवून व धुऊन घ्याव्यात. खतांच्या, औषधे असलेल्या पिशव्या कॉफी काढणीसाठी वापरू नयेत. कॉफीच्या हंगामाच्या शेवटी कॉफी सर्व झाडांवरून काढून घ्यावी. कॉफीच्या फळांचा एकाच ठिकाणी ढीग मारून ठेवू नये. त्याचप्रमाणे काढणीनंतर कॉफीच्या फळांची प्रक्रिया जेवढ्या लवकर आटोपेल तेवढे चांगले असते. फळांच्या काढणीनंतर कॉफीची फळे 10 तासांनंतर कुजायला लागतात.
कॉफीची प्रक्रिया खालील प्रकारच्या दोन पद्धतीनी केली जाते.
(1) वेट प्रक्रिया किंवा पार्चमेंट कॉफी
(2) ड्राय प्रक्रिया किंवा चेरी कॉफी
पार्चमेंट कॉफीला शक्यतो बाजारपेठेत चांगली व मोठ्या प्रमाणावर मागणी असते. चेरी कॉफीमध्ये कॉफीच्या फळांवर असलेले आवरण जसेल्या तसेच राहत असल्यामुळे बाजारपेठेत त्यांना विशेष अशी मागणी नसते. त्यामुळे मार्केटमध्ये उत्तम बाजारभावासाठी जास्तीत जास्त कॉफी पार्चमेंट कशी तयार करता येईल असे पाहावे.
पल्पिंग : वेट पद्धतीने पार्चमेंट कॉफी तयार करण्यासाठी फळावरील साल काढणे किंवा पल्पिंग करणे आवश्यक असते. त्यासाठी बाजारात विविध प्रकारचे व क्षमतेचे पल्पर उपलब्ध आहेत. फळांची काढणी केल्यानंतर त्याच दिवशी पल्पिंग होणे गरजेचे असते. अन्यथा फळे सडण्याचे प्रमाण वाढते व त्याचा परिणाम कॉफीच्या गुणवत्तेवर होतो. पल्परमध्ये फळांची साल व्यवस्थित निघण्यासाठी विशेष दक्षता घ्यावी. फळांचा भरणा पल्परमध्ये सारखा करावा. निघालेला पल्प गाळून फळे वेगळी करावीत. पल्पिंगमध्ये निघालेली फळांवरील आवरणे वेळीच बाजूला करावीत. कॉफीच्या फळांबरोबर आवरणाचे मिश्रण झाल्यास कॉफीच्या गुणवत्तेवर परिणाम होतो.
कॉफीच्या फळावरील आवरण काढणे :
पार्चमेंट कॉफीच्या फळावरील आवरण काढण्याच्या चार पद्धती आहेत.
(1) नैसर्गिक फरमेंटेशन, ( 1 ) अल्कलीबरोबर प्रक्रिया, (3) संप्रेरकाची प्रक्रिया, (4) घर्षण पद्धत.
वरीलपैकी कोणत्याही एका पद्धतीने फळावरील आवरण काढल्यानंतर कॉफी 12- 24 तास पाण्यात बुडवून ठेवावी. यामुळे कॉफीच्या फळांना चकाकी येते. त्यानंतर पार्चमेंट कॉफी सूर्यप्रकाशात वाळवून पाण्याचे प्रमाण 10% पर्यंत खाली आणावे. यामुळे कॉफीची साठवणक्षमता टिकवून ठेवता येईल. सूर्यप्रकाशात वाळविण्यासाठी साधारणपणे 7- 10 दिवस लागतात. अशा प्रकारे कॉफीच्या बियांची वाळवण झाल्यानंतर त्याची साठवणूक करावी. साठवणुकीत बियांची फेरपालट करणे गरजेचे असते. शेवटी कॉफीची प्रतवारी करून 50 किलोच्या गोणीत भरून मार्केटमध्ये विकण्यास पाठवावी.
पावडर स्वरूपातील कॉफी तयार करण्यासाठी बिया प्रथम योग्य तापमानाला भाजून नंतर ग्राइंडिंग मशीनमध्ये घालून दळतात. वेगवेगळ्या चाळण्या वापरून आणि चिकोरीच्या रसाचे ब्लेंडिंग करून वेगवेगळ्या दर्जाची कॉफी तयार होते.
सारांश |
भारतात लागवड पिकांमध्ये कॉफी पिकाचे स्थान प्रथम क्रमांकावर आहे. जगात कॉफीचे पीक ब्राझील, मेक्सिको, केनिया या देशांत मोठ्या प्रमाणात घेतले जाते. भारतात पिकणाऱ्या 70% कॉफीची रशिया, इटली, जर्मनी, अमेरिका आणि जपान या पाच देशांत निर्यात होते. आपल्या देशात कर्नाटक, तामीळनाडू आणि केरळ या राज्यांत कॉफीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. महाराष्ट्र राज्यात या पिकाखालील क्षेत्र वाढत असून नाशिक जिल्हा या पिकाच्या लागवडीत आघाडीवर आहे. कॉफीच्या लागवडीसाठी आर्द्रतायुक्त उष्ण आणि दमट हवामान आवश्यक असते. कॉफीच्या लागवडीसाठी हलकी ते मध्यम आणि पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन निवडावी. कॉफी पिकाचे प्रामुख्याने अरेबिका आणि रोबुस्टा कॉफी असे दोन प्रकार पडतात. अरेबिका कॉफीच्या अनेक जाती उपलब्ध आहेत. यांपैकी कावेरी किंवा सिलेक्शन 12 ही संकरित जात पानावरील तांबेरा या रोगाला प्रतिबंधक असल्यामुळे तिची व्यापारी लागवडीसाठी निवड करावी. कॉफीची अभिवृद्धी बियांपासून रोपे तयार करून भारी जमिनीत 8X6 फूट तर हलक्या जमिनीत 7X 6 फूट अंतरावर लागवड करावी. कॉफीच्या झाडाला सावली किंवा अच्छादनाची आवश्यकता असल्यामुळे दोन कॉफीच्या झाडांत एक सिल्व्हर ओकच्या झाडाची लागवड करून त्यावर काळी मिरीचा वेल चढवावा. कॉफी पिकावर पांढरा खोड किडा, फळ पोखरणारी अळी, पिठ्या ढेकूण या किडींचे आणि तांबेरा व काळी सड या रोगांचा प्रादुर्भाव होतो. त्यांचे वेळीच नियंत्रण करावे. कॉफीची लागवड उन्हाळयात योग्य अंतरांवर खड़े घेऊन पावसाळयात सिल्व्हर ओक व कॉफीची एकाच वेळी लागवड करावी तर एक वर्षानंतर सिल्व्हर ओकच्या खोडापासून 30 सेंमी. अंतरावर पूर्व आणि उत्तर दिशेला काळी मिरीचे वेल सोडावेत. अशा प्रकारे एकाच शेतात सिल्व्हर ओक, कॉफी आणि काळी मिरी अशी तीन पिके घेता येत असल्यामुळे ही पीकपद्धती फायद्याची ठरत आहे. कॉफीच्या झुडपांना फेब्रुवारी महिन्यात फुलांचे बहार येतात आणि साधारणपणे नऊ महिन्यामंध्ये फळे पक्व होऊन डिसेंबर महिन्यात काढणीस येतात. पक्व झालेला फळांना लालबुंद रंग येतो. या फळांना पल्परमध्ये टाकून फळांचा गर आणि बिया वेगळया कराव्यात व वाळवल्यानंतर पोत्यात भरून ठेवाव्यात. पार्चमेंट कॉफीला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यासाठी फळांचे आवरण काढण्यासाठी योग्य पद्धत वापरून बियांवरील कडक आवरण वेगळे करावे व उन्हात वाळवावे. वाळवलेल्या बियांना योग्य तापमानाला भाजून नंतर दळतात. वेगवेगळ्या चाळण्यांतून गाळून व त्यानंतर ब्लेडिंग करून वेगवेगळ्या दर्जाची कॉफी तयार होते.