दत्त कवच स्तोत्र मराठी अर्थ सहित (Datta Kavach Stotra with Marathi Meaning)

।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।

दत्त कवच स्तोत्र (Datta Kavach Stotra)

प. प. श्री वासुदेवानंदसरस्वती टेंब्ये स्वामी महाराजांनी रचलेल्या स्तोत्रांचे फलित.

  • १. श्रीघोरकष्टोध्दरण स्तोत्र :- आकस्मिक अरिष्टाचे (संकटाचे) निवारण करणारे आणि भक्तीवात्सल्याने ओतप्रोत भरलेले स्तोत्र म्हणजे आपत्ती निवारणाच्या आध्यात्मिक स्वरूपाचे प्रात्यक्षिकच आहे.
  • २. श्रीदत्तमाला मंत्र :- रोज मनोभावे कमीत कमी १०८ वेळा जपला असता मानवी देहाचेच तीर्थक्षेत्र होते.
  • ३. श्रीदत्तात्रेय कवच :- सर्व शारीरिक संरक्षण.
  • ४. श्रीदत्त स्तोत्र :- राग कमी होणे, मनशांती व रक्तदाबाचा विकार कमी होणे.
  • ५. श्रीपाद श्रीवल्लभ स्तोत्र :- देहरुपी श्रीसदगुरुप्राप्तीसाठी.
  • ६. अपराधक्षमापनस्तुति :- नित्य पूजा केल्यानंतर म्हणावयाचे स्तोत्र.
  • ७. श्रीदत्तभावसुधारस स्तोत्र :- पूर्ण वाचनाने श्रीगुरुचरित्र वाचनाचे फल मिळते. (मंत्र क्रं ६३ भगवदभक्त संतान होण्यासाठी व मंत्र क्रं ६६ पोटदुखी कमी होण्यासाठी असे सांगितले आहे.)
  • ८. सप्तशती श्रीगुरुचरित्र :- घरामध्ये अखंड शांतता राहण्यासाठी, उत्तम आरोग्य व मनकामनापूर्तीसाठी.
  • ९. श्रीदत्तलीलामृताब्धिसार :- घरामध्ये अखंड शांतता राहण्यासाठी, उत्तम आरोग्य व मनकामनापूर्तीसाठी.
  • १०. श्रीदत्तमाहात्म्य :- घरामध्ये अखंड शांतता राहण्यासाठी, उत्तम आरोग्य व मनकामनापूर्तीसाठी.
  • ११. वासुदेवमननसार- प्रपंचामध्ये राहून अध्यात्म कसे साधावे.
  • १२. सार्थ श्रीबालाशिष स्तोत्र- कुमारांना व कुमारिकांना दृष्ट, नजर लागू नये व अर्भकांना ग्रहादि पीडा पासून मुक्त करणारे.
  • १३. मंत्रात्मक श्लोक :- जप कसा करावा, कर्ज निवारण्याचा व सौभाग्याचा मंत्र.
  • १४. चाक्षुषोपनिषद :- डोळ्यांचे सर्व विकार व नंबर कमी होण्यासाठी व वंशामध्ये कोणालाही नेत्रविकार न होण्यासाठी.

मेशं केशं सुशम्भुं भुवनवनवहं मारहं रत्न रत्नं ।
वन्दे श्री देवदेवं सुगुणगुरुगुरुं श्रीकरं कंज कंजम ।।

|| शुभं भवतु ||

श्रीमद प.प. वासुदेवानंदसरस्वती स्वामी महाराज यांच्या अनेक श्रीदत्तात्रेयांच्या स्तोत्रांपैकी श्री दत्तात्रेयकवच हे एक सुंदर स्तोत्र आहे. एका मधुर तालात श्रीगुरूंनी हे रचिले आहे.

श्रीदत्तात्रेय कवचम्

श्रीपादः पातु मे पादावूरु सिद्धासनस्थितः ।
पायाद्दिगंबरो गुह्यं नृहरिः पातु मे कटिं ॥ १ ॥

मराठी अर्थ : श्री म्हणजे लक्ष्मी ज्याच्या पायाचा आश्रय निरन्तर करुन राहते तो श्रीपाद दत्तात्रय माझ्या पायांचे रक्षण करो. सिद्धासनस्थ असलेला दत्त माझ्या मांड्यांचे रक्षण करो. दिगंबर म्हणजे दिशा हेच ज्याचे वस्त्र आहे असा दत्तात्रेय माझ्या गुद व जननेंद्रिय यांचे रक्षण करो. माझ्या कंबरेचे रक्षण नृहरि दत्तात्रेय करो.

नाभिं पातु जगतस्त्रष्टोदरं पातु दलोदरः ।
कृपालुः पातु हृदयं षड्भुजः पातु मे भुजौ ॥ २ ॥

मराठी अर्थ : सर्व जगाला निर्माण करणारा म्हणजे ब्रह्मदेव हे रुप धारण करणारा दत्तात्रेय माझ्या नाभीचे रक्षण करो. पिंपळाच्या पानाप्रमाणे पातळ उदर असलेला दत्तात्रेय माझ्या उदराचे रक्षण करो. कृपाळू दत्तात्रेय माझ्या हृदयाचे रक्षण करो. सहाभुजा असलेला दत्तात्रेय माझ्या भुजांचे रक्षण करो.

स्त्रक्कुंडी-शूल-डमरु शंख-चक्र-धरः करान् ।
पातु कंठं कंबुकंठः सुमुखः पातु मे मुखम् ॥ ३ ॥

मराठी अर्थ : माला, कमंडलु, त्रिशूल, डमरु, शंख व चक्र धारण करणारे दत्तात्रेय माझ्या हातांचे रक्षण करोत. कंबू म्हणजे शंख त्याच्याप्रमाणे ज्यांचा कंठ आहे असे दत्तात्रेय माझ्या कंठाचे रक्षण करोत. सुंदर मुख असलेले दत्तात्रेय माझ्या मुखाचे रक्षण करोत.

जिह्वां मे वेदवाक् पातु नेत्रे मे पातु मे दिव्यदृक् ।
नासिकां पातु गंधात्मा पातु पुण्यश्रवाः श्रुती ॥ ४ ॥

मराठी अर्थ : सर्व वेद ज्या विराटस्वरुप दत्तात्रेयाचे वागिंद्रिय आहे असे दत्तात्रेय माझ्या जिभेचे रक्षण करोत. ज्यांची दृष्टी दिव्य आहे असे दत्तात्रेय माझ्या दोन्ही डोळ्यांचे रक्षण करोत. ज्यांचे शरीर सर्वदा व स्वभावतःच सुगंधी आहे आणि जे गंधरुप आहेत असे दत्तात्रेय माझ्या नाकाचे रक्षण करोत. ज्याच्या स्वरुपाचे व गुणांचे श्रवण पुण्यकारक आहे असे दत्तात्रेय माझ्या कानांचे रक्षण करोत.

ललाटं पातु हंसात्मा शिरः पातु जटाधरः ।
कर्मेन्द्रियाणि पात्वीशः पातु ज्ञानेन्द्रियाण्यजः ॥ ५ ॥

मराठी अर्थ : हंसरुप दत्तात्रेय माझ्या ललाटाचे रक्षण करोत. जटा धारण करणारे दत्तात्रेय माझ्या मस्तकाचे रक्षण करोत. सर्वांचा ईश असलेला दत्तात्रेय माझ्या वाणी,जननेन्द्रिय, गुद, हात व पाय अशा पांच कर्मे्द्रियांचे रक्षण करो. ज्याला जन्म नाही असा म्हणजे जन्मानंतरचे विकार नसलेला दत्त डोळे, नाक, कान, जीभ व त्वचा या पांच ज्ञानेद्रियांचे रक्षण करो.

सर्वान्तरोन्तः करणं प्राणान्मे पातु योगिराट् ।
उपरिष्टादधस्ताच्च पृष्ठतः पार्श्वतोऽग्रतः ॥ ६ ॥

मराठी अर्थ : सर्वांच्या आंत राहणारा दत्त माझ्या अंतःकरणाचे रक्षण करो. सर्व योग्यांचा राजा माझ्या प्राणापानादि दशवायूंचे रक्षण करो. वरती, खाली, पाठीमागे, डाव्या उजव्या दोन्ही बाजूंना व पुढच्या बाजूला अशा दश दिशांना दत्तात्रेय माझे रक्षण करोत.

अन्तर्बहिश्च मां नित्यं नानारुप धरोऽवतु ।
वर्जितं कवचेनाव्यात्स्थानं मे दिव्यदर्शनः ॥ ७ ॥

मराठी अर्थ : नानारुप धारण करणारा दत्त आत-बाहेर म्हणजे घराच्या किंवा शरीराच्या आत व बाहेर माझे रक्षण करो. ज्या स्थानांना कवच लागले नाही त्या स्थानांचेही दिव्यदृष्टी असणारा दत्तात्रेय रक्षण करो.

राजतः शत्रुतो हिंस्त्राद्दुष्प्रयोगादितोऽघतः ।
आधि-व्याधि-भयार्तिभ्यो दत्तात्रेयः सदावतु ॥ ८ ॥

मराठी अर्थ : राजापासून, शत्रूपासून, हिंस्त्र प्राण्यांपासून जारण-मारणापासून दुष्ट प्रयोगांपासून, पापांपासून, मानसिक व्यथेपासून, शारीरिक व्यथेपासून तसेच इतर भयांपासून व पीडांपासून गुरु दत्तात्रेय माझे सदा रक्षण करोत.

धन-धान्य-गृह-क्षेत्र-स्त्री-पुत्र-पशु-किंकरान् ।
ज्ञातींश्च पातु नित्यं मेऽनसूयानंदवर्धनः ॥ ९ ॥

मराठी अर्थ : माझ्या पैशाचे, धान्याचे, घराचे, शेताचे, स्त्रीचे, मुलांचे, पशुंचेसेवकांचे व इतर सर्व कुटुंबाचे अनसुयेचा आनंद वाढविणार्या मुलाने म्हणजेच श्रीदत्तात्रेयाने रक्षण करावे.

बालोन्मत्त पिशाचाभोद्युनिट्संधिषु पातु माम् ।
भूत-भौतिक-मृत्युभ्यो हरिः पातु दिगंबरः ॥ १० ॥

मराठी अर्थ : केंव्हां केव्हां लहान मुलासारखा वागणारा केंव्हां केव्हां उन्मत्त होणारा श्रीगुरुदेव दत्त दिवसा, रात्री व दिवसरात्रीच्या संधीत पंचमहाभूते व त्यापासून उत्पन्न झालेल्या पदार्थापासून व मृत्यु पासून माझे रक्षण करो.

य एतद्दत्तकवचं संनह्याद्भक्तिभावितः ।
सर्वानर्थविनिर्मुक्तो ग्रहपीडाविवर्जितः ॥ ११ ॥

मराठी अर्थ : हे दत्तकवच जो कोणी भक्तीने युक्त होऊन जपेल व पाठ करेल तो सर्व अनर्थांतून मुक्त होईल. तसेच सर्व ग्रहांच्या पीडेपासून मुक्त होईल.

भूतप्रेतपिशाचद्यैर्देवैरप्यपराजितः ।
भुक्त्वात्र दिव्य भोगान् स देहांतेतत्पदंव्रजेत् ॥ १२ ॥

मराठी अर्थ : भूत, प्रेत व पिशाच्च यांचे हे कवचधारण करणारापुढें काहीही चालणार नाही. देवसुद्धा त्याला पराजित करु शकणार नाहीत. या लोकांत स्वर्गांत असलेल्या सुखांप्रमाणे सर्व सुखे मिळतील. देहान्ती कवच जपणारा दत्तस्वरुपास प्राप्त होईल.

॥ इति श्री परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानंदसरस्वती विरचितं श्रीदत्तात्रेय कवचं संपूर्णम् ॥
अशारीतीने हे परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानंदसरस्वतीनीं रचिलेले श्रीदत्तात्रेय कवच संपूर्ण झाले.

Related Post

भारतातील श्री दत्त तिर्थक्षेत्र (Shri Datta pilgrimage site in India)

दत्तजयंती महत्त्व अणि दत्त जन्म कथा (Datta Jayanti Importance and Datta Birth Story)

Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )