सनातन हिंदू धर्मात दीप अमावस्या (Deep Amavasya) / दीप पूजन का साजरी केले जाते काय आहे या मागील कथा ?

।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।

दीप अमावस्या / दीप पूजन :

आषाढ अमावस्या म्हणजेच दिव्यांची अमावस्या. घरातील दिव्यांना दुध पाण्याने धुउन स्वच्छ करावेत. पाटावर वस्त्र घालून त्यावर हे दीप ठेवून, प्रज्वलित करून त्यांची पूजा करावी!

या दिवसापासून पत्रीचे महत्त्व सुरु होते. आघाडा, दुर्वा, पिवळी फुले यांनी दिव्यांची पुजा करावी. गोडाचा नेवैद्य अर्पण करावा.

आपल्या घरातील मुलांचे औक्षण करावे. (वंशाचा दिवा असतो नं म्हणून.) आता मुलगा मुलगी हा भेद करत नाहीत. त्यामुळे आपल्या दिव्याचे किंवा पणतीचे नक्की औक्षण करावे. दुर्वा ही वंश वृद्धीचे प्रतिक आहे, त्यामुळे ते ही अर्पण करून प्रार्थना करावी. या दिवशी सुवासिनी स्त्रिया घरातले दिवे घासून-पुसून एकत्र मांडतात. त्याच्या भोवती रांगोळ्या घालतात व ते दिवे प्रज्ज्वलित करून त्याची पूजा केली जाते.

पूजेमध्ये पक्वान्नांचा महानैवैद्य दाखविला जातो. त्यावेळी पुढील मंत्राने दिव्याची प्रार्थना करतात, ती प्रार्थना अशी ••

‘‘दीप सूर्याग्निरुपस्त्वं तेजसां तेज उत्तमम्‌ । गृहाण मत्कृतां पूजां सर्वकामप्रदो भव॥

त्याचा अर्थ असा •• ‘‘हे दीपदेवते, तू सूर्यरुप व अग्निरुप आहेस. तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस. माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर.’’

या पूजाव्रताची कथा खालीलप्रमाणे सांगितली आहे.
तमिळ देशाच्या पशुपती शेट्टी नावाच्या श्रेष्ठीला विनीत व गौरी अशी दोन मुले होती. लहानपणीच दोघांनी असं ठरविले की गौरीला ज्या मुली होतील त्या तिने विनीतच्या मुलांना द्याव्या. पुढे गौरीला तीन मुली व विनीतला तीन मुले झाली. गौरीच्या धाकट्या मुलीचे नाव सगुणा होते. गौरीच्या घरात लक्ष्मी नांदत होती. परंतु विनीतचे दैव फिरल्याने तो दरिद्री झाला.

भाऊ गरीब झालेला पाहून ती वचन विसरली व पहिल्या दोन मुलींची लग्नं श्रीमंतांच्या घरात केली. नंतर सगुणेचा विचार करू लागली. गौरीने (आईने) भावाला दिलेले वचन मोडले ही गोष्ट ऐकून सगुणेला वाईट वाटले. तिने विनीतच्या धाकट्या मुलाशी लग्न करायचे ठरविले.

गौरी तिच्यावर संतापली. परंतु तिने हेका सोडला नाही. लग्न होऊन ती विनीतच्या घरी आली. गरिबीतच संसार सांभाळू लागली. एके दिवशी त्या नगराचा राजा स्नानासाठी गेला असता त्यांची रत्नजडीत अंगठी जी कट्‌ट्यावर ठेवली होती ती एका घारीने उचलून नेली. अंगठी घेऊन घार सगुणेच्या घराच्या छपरावर येऊन बसली. ती खाद्यवस्तू नाही असे समजून तिथेच टाकून उडून गेली. नंतर ती सगुणेला मिळाली. ती राजाची आहे हे समजताच तिने ती राजाला नेऊन दिली. राजाने प्रसन्न होऊन तिला बक्षीस दिले व अजून काही हवे तर माग, असे सांगितले.

सगुणेने मागितले की, ‘फक्त येत्या शुक्रवारी राज्यात फक्त माझ्याच घरी दिवे असावे व दुसर्‍या कोणाच्याच घरात ते दिवे लावू नयेत असा हुकूम काढा.’’

राजाने तसे केले. मग शुक्रवारी सगुणेने सर्व घरभर दिवे लावले. तिने उपवास केला. राज्यात कोणाच्याच घरात दिवे नव्हते. आपल्या दोन्ही दीरांना पुढच्या व मागच्या बाजूला उभे केले व येणार्‍या सवाष्ण बाईकडून परत जाणार नाही अशी शपथ घाल व घरातून मागच्या बाजूने जाणार्‍या बाईकडून परत येणार नाही अशी शपथ घाल.

त्याप्रमाणे त्यांनी केले. अशारितीने फक्त लक्ष्मी तिच्या घरात राहिली व अवदसा घरातून निघून गेली. या घटनेमुळे सगुणेच्या घरात लक्ष्मी कायमची राहिली व घरात धनधान्य खूप झाले. राज्यातले लोक सगुणेला लक्ष्मीचा अवतार मानू लागले.
अशी ही कथा दीप अमावस्येसाठी (Deep Amavasya) सांगितली आहे. परंतु आपल्या लोकांनी तिला ‘गटारी’ करून टाकली याला काय म्हणावे ?

अशी करा गिरनार परीक्रमा

Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )