जाणून घ्या डेझी लागवड बद्दल संपूर्ण माहिती तेही एका क्लीक मध्ये (Daisy flower Lagwad Mahiti Daisy Sheti) – Daisy Farming

डेझी लागवड । Daisy Lagwad | Daisy Sheti | डेझी लागवड महत्त्व | डेझी लागवडी खालील क्षेत्र । डेझी पिकाचे उत्पादन | डेझी पिकास योग्य हवामान । डेझी पिकास योग्य जमीन | डेझी पिकाच्या उन्नत जाती | डेझी पिकाची अभिवृद्धी । डेझी पिकाची लागवड पद्धती |डेझी पिकास योग्य हंगाम । डेझी पिकास योग्य लागवडीचे अंतर | डेझी पिकास खत व्यवस्थापन । डेझी पिकास पाणी व्यवस्थापन | डेझी पिकावरील महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण । डेझी पिकावरील महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण | डेझीच्या फुलांची काढणी, उत्पादन आणि विक्री |

।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। .

अनुक्रम दाखवा

डेझी लागवड । Daisy Lagwad | Daisy Sheti |

उद्यानातील परिसर, इमारतींचा परिसर आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पिवळ्या आणि निळसर रंगछटा असलेले डेझीचे ताटवे लावल्यास ते वर्षभर फुलत राहतात. त्यामुळे डेझीला फुलझाडांच्या लागवडीत महत्त्वाचे स्थान आहे. फुलांचा आकर्षक पिवळा रंग, लांब दांडा आणि फुलदाणीत ठेवल्यानंतर जास्त दिवस टिकणारी फुले म्हणून डेझीला फुलांच्या बाजारपेठेत चांगली मागणी असते.
लागवडीच्या सुटसुटीत पद्धती आणि कीड-रोगांचा फारसा प्रादुर्भाव होत नसल्यामुळे सर्वसामान्य शेतकरी या पिकाची लागवड करून भरपूर आर्थिक उत्पन्न मिळवू शकतो. मात्र आज महाराष्ट्रात या पिकाची लागवड अत्यंत मर्यादित क्षेत्रावर केली जात आहे.या फुलपिकाच्या लागवडीखालील क्षेत्र वाढविण्यास भरपूर वाव आहे.

डेझी लागवड महत्त्व | Importance of Daisy Cultivation |

निळा, जांभळा, लाल, पांढरा, गुलाबी आणि सोनेरी रंगछटा असलेले डेझीचे विविध प्रकार वेगवेगळ्या कारणांसाठी वापरले जातात. डेझीला सॉलिडंगो डेझी अथवा गोल्डन रॉड किंवा सोनतुरा असेही म्हणतात. आकर्षक पिवळ्या रंगामुळे आणि लांब दांड्यावर निमुळत्या होत गेलेल्या आणि एकामागून एक उमलत जाणाऱ्या फुलांच्या नैसर्गिक पुष्परचनेमुळे सोनतुरा हा फुलदाणीचे वैभव समजला जातो. सोनतुऱ्याचे एक ते तीन फुलदांडे आणि इतर रंगांची काही फुले फुलदाणीत ठेवून केलेली पुष्परचना मन वेधून घेते. शहरातील उंच इमारतींमध्ये गॅलरीतील कुंड्यांत, घरातील अथवा घराबाहेरील सजावटीत आणि फुलदाणीत निरनिराळ्या प्रकारच्या पानाफुलांमध्ये डेझीचे तुरे लक्ष वेधून घेतात. डेझीच्या लांब फुलदांड्यावर असणारी फुले एकाच वेळी न उमलता अनेक दिवस उमलत राहतात. डेझी हे बहुवर्षायु पीक असल्यामुळे वर्षभर डेझीची फुले उपलब्ध असतात. डेझीच्या फुलांचे गुच्छही उत्कृष्ट होतात. त्यामुळे पुण्या-मुंबईसारख्या मोठ्या शहरांतून डेझीच्या फुलांना हार आणि गुच्छासाठी वर्षभर सतत मागणी असते आणि म्हणून डेझीच्या पिकाखालील क्षेत्र वाढवून भरपूर उत्पन्न मिळविण्यास चांगला वाव आहे. डेझी बहुवर्षायु असल्यामुळे इमारतीभोवती, उद्यानात आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असलेला परिसर सतत फुललेला ठेवण्याचे काम डेझीचे विविध प्रकार लावून साधता येते.

डेझी लागवडी खालील क्षेत्र । डेझी पिकाचे उत्पादन | Area under Daisy cultivation. Production of Daisy Crop |

डेझीच्या बहुसंख्य प्रकारांचे उगमस्थान उत्तर अमेरिकेत असून काही प्रकार दक्षिण अमेरिका, पश्चिम युरोप आणि आशिया खंडातील आहेत. तेथून डेझीचा प्रसार इतर देशांत झाला. महाराष्ट्रात डेझीची लागवड प्रामुख्याने पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर केली जाते. डेझीला लागणारे हवामान आणि जमीन लक्षात घेता मोठ्या शहरांजवळच्या भागात या पिकाची किफायतशीर लागवड करता येईल.

डेझी पिकास योग्य हवामान । डेझी पिकास योग्य जमीन | Suitable climate for daisy crop. Land suitable for daisy crop

डेझीच्या पिकाला भरपूर सूर्यप्रकाश आणि थोडे दमट हवामान चांगले मानवते. कडक थंडीमध्ये या फुलांचा बहर कमी येतो. पुणे परिसरात असलेल्या हवामानात या पिकाचे उत्पादन चांगले येते. प्रखर सूर्यप्रकाश आणि विरळ सावलीतही डेझीच्या झाडांची चांगली वाढ होते. डेझीचे पीक मध्यम काळ्या तसेच सुपीक परंतु पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमिनीत चांगले येते. डेझीचे काही प्रकार मात्र पाणथळ जमिनीतही येतात.

डेझी पिकाच्या उन्नत जाती | Improved Varieties of Daisy Crop |

डेझीमध्ये अनेक प्रकार आणि जाती आहेत. त्यामध्ये माईचलमस डेझी, आफ्रिकन डेझी, इंग्लिश डेझी, स्पॅन सिल्व्हर डेझी, शास्ता डेझी, पेंटेड डेझी, सॅलिडंगो किंवा गोल्डन रॉड, इत्यादी प्रकार आढळतात. या प्रकारात पिवळी, पांढरी, लालसर, निळसर, गुलाबी, नारिंगी अशा मनमोहक रंगांची फुले येतात. महाराष्ट्रात सॅलिडंगो आणि माईचलमस हे प्रकार जास्त प्रमाणात प्रचलित आहेत.
सॅलिडंगो डेझी : सॅलिडगो डेझीला गोल्डन रॉड अथवा सोनतुरा असेही म्हणतात. या प्रकारातील फुलांचा रंग गर्द पिवळा म्हणजेच सोनेरी असतो. लांब दांड्यावर सुरुवातीला लांब देठ आणि नंतर टोकाकडे आखूड देठ असल्यामुळे फुलाच्या दांड्याला तुऱ्यासारखा आकार आलेला असतो. फुलदांड्याची उंची 60 ते 90 सेंटिमीटर असते. फुले एकाच वेळी न उमलता हळूहळू उमलत जातात. म्हणूनच फुलदाणीत ठेवण्याकरिता आणि गुच्छाकरिता हा प्रकार उत्कृष्ट समजला जातो.

माईचलमस :

माईचलमस डेझी हा एक उंच, बुटक्या अशा अनेक प्रकारच्या डेझींचा समूह आहे.

उंच वाढणाऱ्या डेझीचे तीन प्रमुख प्रकार दिसून येतात.

(1) या प्रकारात झाडाची उंची 40 ते 80 सेंटिमीटर असून पानांवर सुक्ष्म केस असतात. फुलांचा रंग गुलाबी किंवा निळा असतो.

(2) या प्रकारात झाडांची उंची 80 ते 120 सेंटिमीटर वाढते. फुलांचा दांडा आणि पाने गुळगुळीत असतात. दांडा अथवा पानांवर सुक्ष्म केस नसतात. फुलांचा रंग पांढरा, जांभळा, निळा, गुलाबी किंवा लालसर असतो.

(3) या प्रकारात झाडांची उंची 120 ते 180 सेंटिमीटर वाढते. संपूर्ण झाडावर सूक्ष्म केस असतात. फुले नाजूक, भरगच्च पाकळ्यांची आणि निळसर जांभळ्या, गुलाबी किंवा लालसर रंगाची असतात.

ठेंगू किंवा बुटक्या प्रकारातील डेझीची झाडे 30 ते 40 सेंटिमीटर उंच वाढतात. ही झाडे अत्यंत कणखर असल्याने विविध प्रकारच्या हवामानांत आणि जमिनींत वाढतात. या झाडांची पाने गर्द हिरव्या रंगाची असतात. या प्रकारातील झाडांची दाट लागवड केल्यास जमिनीवर हिरव्या रंगाच्या गालिचाचे आच्छादन पसरविले आहे असे वाटते आणि त्यावर फुलणारी निळी, जांभळी, पांढरी आणि गुलाबी रंगाची फुले अतिशय सुंदर दिसतात.

डेझी पिकाची अभिवृद्धी । डेझी पिकाची लागवड पद्धती | Daisy crop growth. Cultivation method of daisy crop |

डेझीची लागवड डेझीच्या जुन्या झाडाला फुटलेल्या सकर्स (फुटवे) पासून करतात. लागवडीसाठी सकर्स काढताना पूर्वीचे पीक निरोगी असल्याची खात्री करून घ्यावी. कारण रोगट झाडांपासून घेतलेले सकर्स पुढे रोगाला लवकर बळी पडतात आणि त्यांच्यापासून चांगले उत्पादन मिळत नाही. बियांपासूनही डेझीची लागवड करतात. डेझीची लागवड बागेत, इमारतींच्या प्रांगणात आणि रस्त्याच्या दुतर्फा करताना हंगामानुसार सुरुवातीला जमीन चाळून भुसभुशीत करून घ्यावी आणि नंतर वाफे तयार करून डेझीची लागवड करावी.
मोठ्या प्रमाणावर शेतात डेझीची लागवड करताना उभी-आडवी नांगरट करून जमीन भुसभुशीत करावी. कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन सपाट करून ठेवावी. डेझीची लागवड शक्यतो पावसाळ्यात सुरुवातीला करावी. लागवडीपूर्वी शेणखत जमीनीत टाकून ते मातीत चांगले मिसळून घ्यावे. नंतर जमीन भारी असेल तर सऱ्या काढाव्यात. सपाट वाफे तयार करून घ्यावेत.

डेझी पिकास योग्य हंगाम । डेझी पिकास योग्य लागवडीचे अंतर | Suitable season for daisy crop. Planting distance suitable for daisy crop |

डेझीची लागवड सर्वसाधारणपणे पावसाळी हंगामात केली जाते. सॅलिडंगो डेझीला फुले येण्यासाठी कोणत्याही हंगामातील हवामान मानवते. त्यामुळे सॅलिडंगो डेझीची लागवड वर्षभरात कोणत्याही काळात करता येते.
सॅलिडंगो डेझी जास्त जोमाने वाढत असल्यामुळे दोन ओळींत 45 ते 60 सेंटिमीटर आणि एका ओळीतील दोन झाडांमध्ये 45 ते 60 सेंटिमीटर अंतर ठेवावे. माईचलमस डेझीमधील उंच प्रकाराची 40 X 40 सेंटिमीटर अंतरावर तर बुटक्या प्रकाराची 30X30 सेंटिमीटर अंतरावर लागवड करावी.

डेझी पिकास खत व्यवस्थापन । डेझी पिकास पाणी व्यवस्थापन | Fertilizer management of daisy crop. Daisy Crop Water Management |

डेझीचे पीक लागवडीनंतर अनेक वर्षे शेतात राहत असल्यामुळे लागवडीपूर्वी हेक्टरी 20 ते 25 बैलगाड्या चांगले कुजलेले शेणखत अथवा कंपोस्ट खत घालावे. पिकाला हेक्टरी 100 किलो नत्र, 75 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश द्यावे. स्फुरद आणि पालाशाच्या पूर्ण मात्रा लागवडीनंतर एक महिन्याच्या अंतराने द्याव्यात. डेझीच्या पिकाला हंगाम आणि जमिनीच्या मगदुरानुसार 7 ते 10 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.

डेझी पिकावरील महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण | Important pests of daisy crop and their control |

डेझीच्या पिकावर किडींचा प्रादुर्भाव अतिशय कमी प्रमाणात होतो. काही वेळा मावा, फुलकिडे आणि पाने खाणाऱ्या अळ्या यांचा उपद्रव दिसून येतो. या किडींच्या नियंत्रणासाठी 10 लीटर पाण्यात 15 मिलिलीटर मॅलॅथिऑन किंवा 15 मिलिलीटर डायमेथोएट (30%) या प्रमाणात मिसळून पिकावर 2 ते 3 वेळा फवारणी करावी.

डेझी पिकावरील महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण | Important diseases of daisy crop and their control |

डेझीच्या फुलपिकावर विशेषतः गोल्डन रॉडवर भुरी रोगाचा उपद्रव होतो. रोगाची लागण झालेल्या पानांवर, खोडावर आणि फुलांवर पांढऱ्या रंगाची पावडर दिसून येते. फुले गळून पडतात. पाने वाळतात. या रोगाच्या नियंत्रणासाठी 10 लीटर पाण्यात 10 12 ग्रॅम कॅलिक्झिन अथवा कॅराथेन हे बुरशीनाशक मिसळून पिकावर फवारणी करावी.

डेझीच्या फुलांची काढणी, उत्पादन आणि विक्री | Harvesting, Production and Marketing of Daisy Flowers |

डेझी फुलपिकाच्या लागवडीनंतर दीड ते दोन महिन्यांनी डेझीची झाडे फुलू लागतात आणि पुढे सतत ती फुलत राहतात. फुलांच्या दांड्यावरील खालची फुले उमलू लागताच फुलांचा दांडा जमिनीपासून खोडावर 4 ते 5 डोळे ठेवून छाटून घ्या. दांड्याची लांबी आणि फुलांचा रंग यांनुसार फुलदांड्यांची प्रतवारी करावी. नंतर दहा ते बारा फुलदांडे एकत्र बांधून जुड्या तयार कराव्यात. दांड्याच्या टोकाला रबर बँड लावावा. नंतर जुड्या एकत्र बांधून बाहेरून गवत लावून त्यांचे गठ्ठे तयार करावेत.
फुलांच्या दांड्यावरील खालची फुले उमलू लागल्यानंतर फुलांचे दांडे जास्त काळ टिकवून ठेवता येत नाहीत. म्हणून फुलांच्या दांड्यांचे बांधलेले गठ्ठे टेम्पो अथवा ट्रकमध्ये भरून मोठ्या बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवितात. सॅलिडंगो डेझीचे दरवर्षी दर हेक्टरी सुमारे 2.5 ते 3.0 लाख फुलदांडे इतके उत्पादन मिळते.

सारांश |

फुलांचा लांब दांडा, एकामागून एक उमलत जाणारी फुले, फुलांचा आकर्षक पिवळा, निळा, जांभळा, गुलाबी रंग, मशागतीच्या सोप्या पद्धती यांमुळे डेझीला कटफ्लॉवर म्हणून चांगली मागणी आहे. उद्यानातील आणि इमारतीभोवतालचे सतत फुलत राहणारे डेझीचे ताटवे मनमोहक असतात. डेझीचे फुलपीक अत्यंत कणखर असल्याने विविध प्रकारच्या जमिनींत आणि हवामानांत चांगले वाढते. एकदा लागवड केल्यावर बराच काळ डेझीची फुले मिळत राहतात. त्यामुळे शहराजवळच्या परिसरात डेझीची लागवड करून भरपूर उत्पन्न मिळविता येते.
डेझीच्या सॅलिडंगो आणि माईचलमस या दोन प्रकारांची महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. डेझीची लागवड 40 X 40 अथवा 60 X 60 सेंटिमीटर अंतरावर जुन्या झाडांचे फुटवे निवडून सरी-वरंब्यावर अथवा सपाट वाफ्यांत करतात. डेझीच्या पिकाला हेक्टरी 10 ते 15 टन शेणखत, 100 किलो नत्र, 75 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश देतात. लागवडीनंतर दीड ते दोन महिन्यांत फुलांची काढणी सुरू होते आणि ती वर्षभर चालू राहते. डेझीच्या एक हेक्टर लागवडीपासून सुमारे 2 ते 3 लाख फुलांचे दांडे मिळतात. डेझीच्या फुलांच्या जुड्या बांधून आणि नंतर बाहेरून गवत लावून लहान गठ्ठे बांधून फुले ट्रक अथवा टेम्पोतून बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवितात.

जाणून घ्या जरबेरा लागवड बद्दल संपूर्ण माहिती तेही एका क्लीक मध्ये (Gerbera flower Lagwad Mahiti Gerbera Sheti) – Gerbera Farming

Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )