।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।
धवळ्या
झुंजूमुंजू झालं.. पक्ष्यांचा किलबिलाट कानी गुंजारव करू लागल्याने तात्यांना जाग आली. तात्या लगेच उठले, आवरून तयार झाले. गोदाक्का त्यांच्या आधीच उठलेली होती. तिने लवकर उठून चार भाकऱ्या थापल्या आणि तात्यांसाठी न्याहारी तयार केली. तात्यांनी चहा घेतला आणि न्याहारीचं गाठोडं घेऊन ते गोदाक्काला म्हणाले,” राम्याला सांग आज लवकर जनावरं चारायला घेऊन जा, मी सांच्याला येतो” असं बोलतच तात्या घराबाहेर पडले.
तात्यांना आज तालुक्याच्या बाजाराला जायचं होतं. दुसऱ्या दिवशी पिठोरी अमावस्या होती. त्यांच्या जीवाभावाच्या सर्जा- राजाचा सण म्हणजेच ‘पोळा’ होता. सर्जाराजा साठी सजावटीचं सामान आणायचं होतं, त्यासाठी तात्या बाजाराला निघाले. तात्या त्यांना आपल्या लेकरांसारखं समजायचे. वर्षभर शेतात राबणाऱ्या माझ्या लेकरांना उद्या हक्काची सुट्टी मिळणार, म्हणून तात्या एकदम खुश होते.
त्यांच्या आनंदाचं अजून एक कारण होतं, ते म्हणजे यावर्षी दोन नव्हे तर तीन बैलांची पूजा होणार होती. कारण महिन्यापूर्वीच त्यांच्या गाईने एका खोंडाला जन्म दिला होता. पांढऱ्या शुभ्र रंगाचा, कपाळावर तांबड्या रंगाचा चट्टा, काळेशार टपोरे डोळे, नेहमीच टवकारलेले कान,असं ते गोंडस वासरू बघून घरात सगळ्यांचे डोळे दिपून गेले होते. ते खट्याळ वासरू सतत त्याच्या आईच्या पायाशी घुटमळत असायचं.
तात्यांनी त्याचं नाव प्रेमाने ‘धवळ्या’ ठेवलं होतं. ‘धवळ्या’ घरात सगळ्यांचाच लाडका. इतर गुरांसोबत राम्या त्यालाही रानात चरायला घेऊन जायचा. सर्जा, राजा आणि धवळ्यासाठी लागणाऱ्या सामानाची मनात यादी करतच, तात्या लाल बसमधून तालुक्याच्या बाजारापाशी उतरले. बाजारात चांगलीच गर्दी होती. सगळे शेतकरी आपल्या बैलांसाठी सामान घेण्यासाठी आलेले होते. तात्यांनी पण त्यांच्या बैलांसाठी सुरेख नक्षीकाम केलेली झूल, अंगावर ठिपके ठेवण्यासाठी गेरू, शिंगांना लावायला बेगड, डोक्याला बांधायला बाशिंग, गळ्यात बांधायला घुंगरांच्या माळा, नवी वेसन, नवा कासरा आणि धवळ्यासाठी चांदीचे तोडे घेतले.
या सर्व सामानाने सजवलेले सर्जा, राजा आणि धवळ्या त्यांच्या डोळ्यासमोर दिसू लागले. तात्यांनी राम्यासाठीही नवीन कपडे घेतले. त्यानंतर न्याहारी करून थोड्या वेळाने तात्या बसमध्ये चढले. प्रवासातच तात्यांनी उद्याचा बेत आखला होता. सकाळीच तिघांना घेऊन नदीवर जायचं. त्यांना स्वच्छ आंघोळ घालायची. नंतर चारुन घरी आणायचं. राम्या त्यांना छान सजवेल. गोदाक्का पूरणावरणाचा नैवेद्य करेल. मग मी तिघांना घेऊन मारुतीच्या देवळात जाईल आणि गावातील मिरवणुकीसोबत सुद्धा त्यांना पाठवेल. त्यानंतर घरी आल्यावर गोदाक्का त्यांना ओवाळून पुरणपोळी खाऊ घालेल. असा विचार करतच तात्या संध्याकाळी घरी पोहोचले.
घरी पाहिलं तर घराचं रूपच पालटलेलं होतं. गोदाक्का दारात बसून आसवं गाळत होती. तात्यांची मुलंही सैरभैर होऊन काहीतरी शोधत होती. गोठ्यात गाईचा हंबरडा ऐकू येत होता. राम्या कुठेतरी बाहेर गेलेला होता.
तात्यांनी गोदाक्काला विचारलं,” काय ग, असं दारात टीपं गाळत का बसली? काय झालंय तरी काय म्हणायचं?”
गोदाक्का रडतच म्हणाली, “आवं समदी जनावरं घराकडं परतल्यात पर धवळ्या काय आला नाय.. राम्यानं समदीकडं शोधलं.. कुटंच गावंना..” हे ऐकताच तात्यांच्या हातातली पिशवी निसटली. तात्या मटकन खालीच बसले. त्या पिशवीतून धवळ्यासाठी घेतलेले तोडे घरंगळत बाजूला जाऊन पडले. त्याच्याकडे बघुन दोघं नवरा- बायको रडू लागले. तेवढ्यात राम्या पळत पळत आला. त्याला बघताच तात्या उठले. “राम्या बरं झालं बाबा आलास कुटाय माझा धवळ्या? गावला नावं ? गोठ्यात बांधलं का त्याला? त्याची माय सैरभैर झालीय बाबा…” असं म्हणत तात्या त्याच्या खांद्याला धरून विचारू लागले.
राम्याने खाली मान घातली. म्हणाला,” तात्या समदं गाव पालथं घातलं कुटंच गावना.”
अख्ख्या घराला एक उदासीनता आली. सगळे डोक्याला हात लावून बसले. तात्या गोठ्यात गेले. गाय दावं तोडायचा प्रयत्न करत होती. सारखी हंबरडा फोडत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू गळत होते. साहजिकच होतं… तिचं लेकरू अजून परतलेलं नव्हतं.. तात्यांनी तिच्या पाठीवरून हात फिरवला. तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. ती तात्यांचा हात चाटू लागली. जणू काही विचारत होती.. कुठेय माझं बाळ? घेऊन या त्याला माझ्याकडे.. अख्खी रात्र अशीच गेली.. कोणीही जेवलं नाही आणि कोणाचा डोळा देखील लागला नाही..
पहाट झाली, गोदाक्का तात्यांना म्हणाली,” आवं आज पोळा हाय. आपलं एक लेकरू परतलं नाय, पण दुसऱ्या दोघांवर अन्याय करता येणार नाही आपल्याला. त्यांची पूजा कराया पाहिजे. त्यांना नैवेद्य कराया पाहिजे. उटा तुमी त्यांना घेऊन नदीवर जा. मी नैवैद्य कराया घेते.” असं म्हणत गोदाक्का आत गेली. तात्याही निराश मनाने उठले. सर्जा, राजा ला सोडायला गोठ्यात गेले.
तेवढ्यात बाहेरून आवाज आला. “कोण हाय का घरात” ?तात्या आणि गोदाक्का लगबगीने बाहेर आले. एक माणूस उभा होता. “हे तुमचं वासरू का? हे ऐकताच तात्या धावतच त्याच्याजवळ गेले. पाहिलं तर, त्या माणसा पाठोपाठ धवळ्या उभा होता. तात्यांना बघताच धवळ्या हुंदडतच त्यांच्याजवळ आला. त्यांचा हात चाटू लागला. कुटं व्हतास रं लेकरा? म्हणत तात्या त्याला कुरवाळू लागले..
गोदाक्का ही येऊन त्याला बिलगली.. मुलंही धावतच बाहेर आली.. सगळे त्याच्याभोवती गलका करू लागले. त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. तेवढ्यात तो माणूस म्हणाला, “रानात वाट चुकलं होतं वासरू.. नदीच्या पलीकडं पोचलं.. मला दिसलं, आणि ईचारत ईचारत आलो बगा.. कव्हा धरनं याच्या मालकाला शोधत व्हतू..” तात्यांनी हात जोडले आणि म्हणाले “लई उपकार झालं बाबा तुझं”..
आवं उपकार कसलं म्या बी एक शेतकरी हाय.. शेतकऱ्यासाठी त्याची जनावरं लेकरावाणी असत्यात.. त्यामुळं सगळी कामं बाजूला टाकून आदी हिकडं आलो बगा.. माजी बी अशीच दोन लेकरं हाय.. त्यांना मला सजवायच हाय, मला आता निरोप द्या..”असं म्हणतात तात्यांचा निरोप घेऊन तो दिसेनासा झाला.
पूर्ण घरात आनंदीआनंद पसरला. पोळ्याचा उत्साह परत सगळ्यांच्या डोळ्यात दिसू लागला. गोदाक्काने मीठ, मिरच्या आणून धवळ्याची नजर काढली. तात्यांनी त्याला गोठ्यात नेलं. आईला बघताच ते तिचं चुटुचुटु दूध पिऊ लागलं. त्याची आई देखील त्याला चाटू लागली.. अखेर तिचं लेकरू परतलं होतं…
पोळा अतिशय आनंदात साजरा झाला. तात्यांची तिघं लेकरं एकदम उठून दिसत होती.. तिघांचं रूप खुललं होतं.. धवळ्याच्या पायातल्या चांदीच्या तोड्याला मात्र एक वेगळीच चमक आलेली होती.