द्राक्ष पिकाचे उगमस्थान | Draksh Sheti । द्राक्ष पिकाखालील क्षेत्र आणि उत्पादन | द्राक्ष पिकासाठी हवामान | द्राक्ष पिकासाठी जमीन | द्राक्ष पिकाच्या सुधारित जाती | द्राक्ष पिकास जरुरी हंगाम | द्राक्ष पिकास लागवडीचे अंतर | द्राक्ष पिकास वळण | द्राक्ष पिकास छाटणीच्या पद्धती | द्राक्ष पिकास खते व्यवस्थापन | द्राक्ष पिकास पाणी व्यवस्थापन | द्राक्ष पिकातील आंतरपिके । द्राक्ष पिकातील आंतरमशागत । द्राक्ष पिकातील तणनियंत्रण । द्राक्ष निर्यातीस संधी । द्राक्ष फळांची साठवण । द्राक्ष फळे पिकविण्याच्या पद्धती । द्राक्ष फळांची काढणी, उत्पादन आणि विक्री । द्राक्ष पिकावरील शारीरिक विकृती आणि त्यांचे नियंत्रण । द्राक्ष पिकावरील महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण । द्राक्ष पिकावरील महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण ।
।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।
द्राक्ष पिकाचे उगमस्थान, महत्त्व आणि भौगोलिक प्रसार :
द्राक्षाचे उगमस्थान रशियामधील अरमेनिया जिल्हा आहे. भारतात द्राक्षाचा इराण व अफगाणिस्थानातून प्रसार झाला. द्राक्षाचा उपयोग मुख्यतः तीन प्रकारे केला जातो. पहिल्या प्रकारात द्राक्षे ताजी खाण्यासाठी (टेबल द्राक्षे) वापरतात. दुसऱ्या प्रकारात द्राक्षे वाळवून, टिकवून खाण्यासाठी वापरतात. तिसऱ्या प्रकारात मद्य आणि इतर पेये बनविण्यासाठी द्राक्षांचा उपयोग केला जातो. जगातील द्राक्षांच्या एकूण उत्पादनापैकी 80% उत्पादनाचा वापर मद्य आणि विविध प्रकारची पेये बनविण्यासाठी केला जातो. 10% द्राक्षे ताजी खाण्यासाठी आणि 10% मनुका तयार करण्यासाठी वापरतात.
भारतात महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यांतील द्राक्षे त्यांच्या उच्च प्रतीमुळे प्रसिद्ध आहेत. द्राक्षाच्या पिकापासून सर्वांत जास्त आर्थिक लाभ होत असल्यामुळे इतर जिल्ह्यांतही द्राक्षाची लागवड वाढत आहे.
100 ग्रॅम द्राक्षफळांत खालीलप्रमाणे अन्नद्रव्ये आढळतात.
क्र. | अन्नघटक | ताजी द्राक्षे | मनुका/बेदाणे |
१ | पाणी (%) | 85.5 | 18.5 |
२ | पिष्टमय पदार्थ (%) | 10.2 | 77.3 |
३ | प्रथिने (%) | 0.8 | 2.0 |
४ | स्निग्धांश (%) | 0.1 | 0.2 |
५ | खनिज द्रव्ये (%) | 0.1 | 2.0 |
६ | तंतुमय पदार्थ (%) | 3.0 | – |
७ | चुना (%) | 0.3 | 0.1 |
८ | स्फुरद (%) | 0.02 | 0.08 |
९ | लोह (%) | 0.2 | 4.0 |
१० | उष्मांक (कॅलरी) | 45 | 319 |
११ | जीवनसत्त्व ‘अ’ | 15 मिग्रॅ. | – |
१२ | जीवनसत्त्व ‘ब’ | 40 मिग्रॅ. | 60 मिग्रॅ. |
१३ | रिबोफ्लेवीन | 0.3 मिग्रॅ. | – |
१४ | निकोटीन आम्ल | 0.3 मिग्रॅ. | 0.5 मिग्रॅ. |
१५ | जीवनसत्त्व ‘क’ | 3 मिग्रॅ. | – |
द्राक्षाला जागतिक बाजारपेठेत प्रमुख स्थान आहे. इटली, स्पेन, फ्रान्स, अमेरिका, तुर्कस्थान, ग्रीस, इराण, दक्षिण आफ्रिका, रशिया, अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया हे द्राक्षे पिकविणारे प्रमुख देश आहेत. भारतात द्राक्षाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, आणि कर्नाटक या राज्यांत घेतले जाते. महाराष्ट्रात नाशिक, पिंपळगाव बसवंत आणि उगाव येथे मोठ्या प्रमाणावर द्राक्षाची लागवड आहे. याशिवाय बारामती, पुणे, तासगाव, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, बीड व परभणी या जिल्ह्यांतही या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते.
द्राक्ष पिकाखालील क्षेत्र आणि उत्पादन :
भारतातील द्राक्ष लागवडीखालील एकूण 40,000 हेक्टर क्षेत्रापैकी 25,000 हेक्टर क्षेत्र एकट्या महाराष्ट्र राज्यात आहे. यापैकी नाशिक, सांगली, सोलापूर, पुणे, नगर, आणि उस्मानाबाद हे जिल्हे द्राक्ष लागवडीत अनुक्रमे आघाडीवर आहेत. महाराष्ट्र राज्यात द्राक्षाचे एकूण उत्पादन 4 ते 5 लाख टनांपर्यंत होते आणि दर हेक्टरी सरासरी 20 टन उत्पादन होते. यापैकी एकट्या नाशिक जिल्ह्यात निम्म्याहून अधिक उत्पादन निघते.
द्राक्ष पिकासाठी हवामान आणि द्राक्ष पिकासाठी जमीन :
हवामान :
उष्ण व कोरड्या हवामानामध्ये द्राक्षवेलींची वाढ चांगली होऊन चांगल्या प्रतीचे उत्पादन मिळते. द्राक्षाची वाढ कमी पावसाच्या प्रदेशात आणि उष्ण कोरडे हवामान असलेल्या प्रदेशात चांगली होते. फुले व फळधारणेच्या काळात पावसाळी आणि दमट हवामान या पिकाला अपायकारक आहे. हवेमध्ये 60% पेक्षा जास्त आर्द्रता असल्यास भुरी आणि करपा यांसारख्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव जास्त होतो. उन्हाळयात कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त आणि हिवाळयातील किमान तापमान 12 अंश सेल्सिअसपेक्षा कमी असल्यास या पिकाच्या वाढीवर आणि उत्पादनावर अनिष्ट परिणाम होते. सरासरी कमाल तापमान 36 ते 40 अंश सेल्सिअसच्या आसपास आणि किमान सरासरी तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली जात नाही अशा ठिकाणी द्राक्षाची लागवड यशस्वीरित्या होऊ शकते.
जमीन :
या पिकाला मध्यम काळी, कसदार आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन चांगली असते. तरीपण द्राक्षाचे पीक निरनिराळ्या प्रकारच्या जमिनींत येऊ शकते. द्राक्षाची मुळे जमिनीच्या वरच्या 60 सेंमी. खोलीच्या थरात पसरतात. मातीचा वरचा 60 सेंमी. थर व त्याखाली ठिसूळ मुरूम असल्यास अशा जमिनीत द्राक्षे चांगली येतात. जमिनीचा सामू (पी.एच.) 6.5 ते 8.5 च्या दरम्यान असावा.
द्राक्ष पिकाच्या सुधारित जाती :
महाराष्ट्रात सुरुवातीला भोकरी, फकडी आणि बंगलोर पर्पल या जाती लागवडीखाली होत्या. नंतरच्या काळात अनाबेशाही, काळी साहेबी आणि चिमा साहेबी या जातींची लागवड झाली. या सर्व जाती आता मागे पडल्या असून थॉम्पसन सीडलेस, किशमिश चोर्नी, फ्लेम सीडलेस, तास ए गणेश, सोनाका या जातींची लागवड सर्वांत जास्त प्रमाणात केली जात आहे. काही प्रमुख जातींची माहिती खाली दिलेली आहे.
थॉम्पसन सीडलेस :
भारतात या जातीची लागवड व्यापारी तत्त्वावर फार फायदेशीर ठरलेली आहे. द्राक्षाच्या बिनबियांच्या जातींमध्ये उत्कृष्ट प्रतीचे उत्पादन देणारी ही जात आहे. या जातीचे उत्पादन हेक्टरी 20 ते 25 टन असून घड मध्यम, भरगच्च मण्यांनी भरलेला असतो. परंतु मण्यांचा आकार लहान असतो. मण्यांचा आकार वाढविण्यासाठी गर्डलिंग आणि जिब्रेलिक अॅसिड यांचा वापर केल्यास घडाचे वजन जवळजवळ दुप्पट वाढते. साखरेचे प्रमाण 20 ते 22% असल्यामुळे बेदाणे करण्यास या जातीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.
अनाबेशाही :
भारतात ही जात प्रसिद्ध असून आंध्र प्रदेशात हैद्राबाद सभोवतालच्या प्रदेशात या जातीची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. या जातीचे हेक्टरी उत्पादन 20 ते 25 टनांपर्यंत असून घडाचा आकार मध्यम, मणी मोठे, टपोऱ्या आकाराचे, फिकट पिवळया रंगाचे असतात. यात साखरेचे प्रमाण 15 ते 16% असून साल जाड, चिवट आणि गर घट्ट असतो. ही जात वाहतुकीला सोयीची असल्यामुळे भारतात सर्व राज्यांत पाठविण्यास चांगली आहे.
गुलाबी :
या जातीला मस्कती स्वाद असून ही जात रस तयार करण्यासाठी चांगली आहे. घड निमुळत्या आकाराचे असून मणी मध्यम आकाराचे आणि काही मणी बिनबियांचे असतात. घडामध्ये मणी विरळ भरलेले असून मणी एकसारख्या आकाराचे नसतात. मणी एकाच वेळी पक्क होत नाहीत. या जातीचे हेक्टरी उत्पादन 8-10 टन येते.
बंगलोर पर्पल :
काळ्या गुलाबी रंगाच्या द्राक्षांत ही जात प्रसिद्ध आहे. हेक्टरी उत्पादन 20 ते 25 टन येत असल्यामुळे व्यापारी दृष्ट्या या जातीखाली क्षेत्र जास्त आहे. या जातीवर करपा रोग येत असल्यामुळे पावसाळी प्रदेशातील लागवडीस योग्य आहे. मणी गोलाकार, मोठा असून रंग लालसर काळा असतो. साल जाड, गर घट्ट आणि साखरेचे प्रमाण 18% असून द्राक्षाची प्रत तितकी चांगली नाही. या जातीचा वापर प्रामुख्याने मद्य तयार करण्यासाठी करतात.
काळी साहेबी :
या जातीचा घड मोठा असून घडात काळया रंगाचे लांबट मणी विरळ असतात. ही जात उशिरा तयार होणारी असून साखरेचे प्रमाण 18-20% असते. मणी एकाच वेळेला पक्व होत नाहीत.
फकडी :
ही जुनी जात असून घड मोठ्या आकराचे परंतु विरळ मण्यांनी भरलेले असतात. साल नाजूक व पातळ असून प्रतीला एवढी चांगली नाही. मात्र रसाकरिता चांगली जात आहे.
तास-ए-गणेश :
सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे ही जात थॉम्पसन सीडलेस जातीमधूनच निवड पद्धतीने शोधून काढण्यात आली. या जातीचे घड घट्ट नसून मणी आकाराने लांब, सोनेरी रंगाचे व साठवणुकीस योग्य असतात.
सोनाका :
ही जात नानज जिल्हा सोलापूर येथे थॉम्पसन सीडलेस या जातीमधून निवड पद्धतीने शोधून काढण्यात आली. या जातीचे वैशिष्ट्य म्हणजे पानांचे देठ तांबूस असून मणी 1 ते 1.5 इंच लांबीचे, टपोरे, पातळ सालीचे असतात. मण्यांचा रंग पिवळसर तांबूस असून देठ मजबूत असल्यामुळे वाहतुकीस योग्य अशी जात आहे. साखरेचे प्रमाण 24 ते 26% असल्यामुळे बेदाणे करण्यास चांगली जात आहे.
किशमिश चोर्नी :
या जातीस शरद सीडलेस नावानेही ओळखले जाते. मूळची ही जात रशियन असून रंगाने काळी आणि बिनबियांची आहे. लवकर तयार होणारी ही जात मनुके करण्यासाठी उत्तम आहे.
फ्लेम सीडलेस :
ही जात काळया रंगाची (पूर्ण पिकल्यावर) व बिनबियांची आहे. लवकर तयार होणारी गोड अशी ही जात थोड्या काळात लोकप्रिय झाली आहे. या जातींव्यतिरिक्त मद्यनिर्मितीसाठी काही खास जातींची लागवड शँपेन / इंडेज वाइन्स यांनी नारायणगाव परिसरात केली आहे. त्यात चारडोणी पिनो वला, मेरलाट, कॅबरनेट या जातींचा समावेश आहे.
अभिवृद्धी आणि लागवड पद्धती :
अभिवृद्धी :
द्राक्षाची लागवड छाट कलमापासून केली जाते. जोमदार, निरोगी आणि अधिक उत्पन्न देणाऱ्या वेलींपासून विशिष्ट जातीची छाट कलमे ऑक्टोबर छाटणीच्या वेळी घ्यावीत. 15 ते 20 सेंमी. लांबीची छाट कलमे करावीत. द्राक्षबागेची लागवड दोन पद्धतींनी करतात :
(1) छाट कलमे कायमच्या जागी ऑक्टोबर महिन्यात लावून आणि
(2) रोप वाटिकेत छाट कलमांना मुळ्या फुटल्यानंतर जानेवारी महिन्यात रोपवाटिकेतून काढून बागेत लागवड करतात. अलीकडे द्राक्षात खुंट वापरून इच्छित जातीची कलमे करून लागवड करण्यात येत आहे. सूत्रकृमी, चुनखडी तसेच पाण्याचा ताण यावर मात करण्यासाठी खुंट (रूटस्टॉक) वापरून यश मिळविता येते. डॉगरीज, रामसे 1613, इत्यादी जाती खुंट म्हणून वापरतात. शेंडा कलम अथवा डोळे भरून रोपवाटिकेत अथवा स्वयंभू पद्धतीने बागेतच कलमे करता येतात.
पूर्वमशागत :
सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यापूर्वी 0.60X0.60 मीटर खोली रुंदीचे दक्षिणोत्तर चर खोदावेत. हे चर चांगली माती आणि खताच्या मिश्रणाने भरून घ्यावेत. खतमातीच्या मिश्रणात हेक्टरी 20 किलो या प्रमाणात 10% कीडनाशक भुकटी मिसळावी, म्हणजे वाळवीचा प्रतिबंध होतो. चर भरण्यापूर्वी चराच्या तळाला प्रत्येक वेलीस 1 किलो सुपर फॉस्फेट टाकावे. नंतर चर भरून पाणी देऊन लागवडीस तयार ठेवावे.
लागवड पद्धती :
ऑक्टोबर महिन्यात लावलेली छाट कलमे जानेवारीपर्यंत (अडीच ते तीन महिन्यांत) शेतात लावण्यासाठी तयार होतात. चांगल्या मुळ्या फुटलेली छाट कलमे थोडी पाने काढून आणि कोवळा शेंडा खुडून मुळांना इजा होऊ न देता मातीच्या हुंडीसह काढून कायम जागी लावावीत.
द्राक्ष पिकास जरुरी हंगाम आणि द्राक्ष पिकास लागवडीचे अंतर :
द्राक्षामध्ये लागवडीचे अंतर हे जमीन, हवामान, जातीचा प्रकार, वळण देण्याची पद्धत आणि लागवडीची पद्धत या बाबींवर अवलंबून असते. द्राक्षबागेत आंतरमशागतीची कामे सुलभ होण्यासाठी प्रचलित जाती लावताना दोन ओळींतील अंतर किमान 2 ते 3 मीटर ठेवावे. दोन वेलींमधील व ओळींतील अंतर ठरविताना वेली दाटणार नाहीत आणि बागेत भरपूर सूर्यप्रकाश आणि मोकळी हवा राहील याकडे लक्ष देणे अधिक उत्पादन आणि रोगकिडीच्या प्रादुर्भावाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. गुलाबी, भोकरी आणि बंगलोर पर्पल जातींची लागवड कमी अंतरावर करतात. थॉम्पसन सीडलेस ही जात मध्यम अंतरावर लावतात. अनाबशाही, काळी साहेबी, चिमा साहेबी यांसारख्या जोमाने वाढणाऱ्या जाती अधिक अंतरावर मांडव पद्धतीचा वापर करून लावतात. अंतर ठरविताना बाग लागवडीची तत्त्वे समजून घेतली तर योग्य जातीसाठी योग्य अंतर ठरविता येते. जेणेकरून दर चौरस मीटर क्षेत्रात कमीतकमी दहा घड मिळाले पाहिजेत.
द्राक्ष पिकास वळण आणि द्राक्ष पिकास छाटणीच्या पद्धती :
द्राक्षाच्या वेलीची वाढ आणि वेलीपासून मिळणारे उत्पादन हे वेलीला दिलेल्या वळणावर अवलंबून असते. म्हणून उन्हाळ्याच्या महिन्यांत वेलींची जोमदार वाढ करून त्यांना वळण देण्याचे काम पावसाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण करावे लागते. वळण देताना वेलीला आधार देऊन जमिनीपासून 1.5 ते 2 मीटर उंचीवर जमिनीला समांतर अशी ओलांड्याची वाढ करून घेतात. यामुळे वेलींना भरपूर आणि सारख्या प्रमाणात सूर्यप्रकाश मिळतो. द्राक्षवेलींना वळण देण्याच्या निरनिराळया पद्धती आहेत. उदाहरणार्थ टी, वाय, डब्लू, व मांडव पद्धत इत्यादी. या पद्धतींच्या अनुभवावरून सोईची पद्धत निवडावी.
मांडव पद्धत :
छाट कलमे कायम जागी बागेत लावल्यानंतर एक जोमदार फूट जमिनीपासून 2 मीटर उंचीपर्यंत सरळ उंच वाढवत न्यावी. याला मुख्य खोड असे म्हणतात. या खोडावरील बगल फूट वेळोवेळी काढून टाकावी. फोटोत दाखविल्याप्रमाणे मांडवाच्या तारा ओढून त्यांवर मुख्य ओलांडे आणि दुय्यम ओलांडे तारेवर वाढवावेत. या दुय्यम ओलांड्यांवरच फळकाड्या (मालकाड्या) वाढतात. द्राक्षाची जात आणि वेलीतील अंतर यांवरूनच मांडव पद्धतीची आखणी करता येते.
ओव्हरहेड ट्रेनीज पद्धत :
मध्यम जोराने वाढणाऱ्या द्राक्षाच्या जातीसाठी या पद्धतीची वापर करतात. निफेन पद्धतीत असलेले दोष या पद्धतीत दूर करता येतात. ही पद्धत सर्वच जातींमध्ये उपयोगात आणता येते. या पद्धतीत द्राक्षवेलीची लागवड 3X3 मीटर अंतरावर करतात. आकृतीत दाखविल्याप्रमाणे मांडवाची उभारणी करावी. या पद्धतीने द्राक्षवेलींना वळण दिल्यास वेलींना भरपूर हवा आणि सूर्यप्रकाश मिळतो. यामुळे वेलीवर रोग आणि किडींचा प्रादुर्भाव कमी होतो. मांडव करताना 3-4 तारांचे जमिनीला समांतर आणि जमिनीपासून 2 मीटर उंचीवर छत तयार करतात. या पद्धतीत वेलीची वाढ चांगली होऊन उत्तम प्रतीचे घड तयार होतात. पीक संरक्षण उपाययोजनाही सुलभ करता येते.
द्राक्ष पिकास छाटणीच्या पद्धती :
महाराष्ट्रातील हवामानात द्राक्षवेलींची वर्षभर कमीअधिक प्रमाणात वाढ होतच असते. त्यामुळे फुले व फळधारणा होण्यासाठी वेलींच्या फांद्यांमध्ये आवश्यक असा अन्नाचा साठा होत नाही. फांद्यांत अन्नाचा साठा होण्यासाठी वेलींची छाटणी करून वेलींना विश्रांती द्यावी लागते. वेलींमध्ये आवश्यक असा अन्नसाठा झाल्याशिवाय वेलींवर फुले व फळे धरण्याची क्रिया घडत नाही. द्राक्षाच्या भरपूर आणि चांगल्या प्रतीच्या उत्पादनाकरिता द्राक्षवेलींची जोरदार वाढ करून घेऊन फांद्यांमध्ये जास्तीचा अन्नसाठा करून ठेवणे या दोन बाबी फार महत्त्वाच्या आहेत. या दोन्हीही क्रिया घडवून आणण्यासाठी महाराष्ट्रात द्राक्षवेलीची वर्षातून दोनदा छाटणी करतात. एप्रिल छाटणी ही वेलीची भरपूर शाखीय वाढ करून घेण्यासाठी आणि ऑक्टोबर छाटणी ही वेलीवर फुले आणण्यासाठी करतात.
द्राक्षाची एप्रिल छाटणी :
द्राक्षाच्या एप्रिल छाटणीत फक्त खोड आणि ओलांडे राखून वेलीचा बाकीचा सर्व भाग छाटून टाकावा लागतो. म्हणून या छाटणीला ‘खरड छाटणी’ असे म्हणतात. खरड छाटणी करताना ओलांड्यावर मागील हंगामाच्या काडीवर एक डोळा ठेवून छाटणी करावी. एप्रिल छाटणीनंतर राखून ठेवलेल्या डोळयांतून नवीन फूट येते आणि या फुटीतून ऑक्टोबर महिन्यापर्यंत फळे देणाऱ्या नवीन काड्या तयार होतात. एप्रिल छाटणी शक्यतो एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण करावी. पावसाळा सुरू होण्यापूर्वी म्हणजे एप्रिलच्या छाटणीनंतर 50 ते 60 दिवसांत नवीन फुटीची वाढ पूर्ण होणे आवश्यक असते. कारण पावसाळयात काड्या पक्व होण्याची क्रिया मंदावते. हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे रोग आणि किडींचा उपद्रव वाढू लागतो. म्हणून पावसाळा सुरू होण्यापूर्वी काड्यांची वाढ पूर्ण करून शेंडा मारण्याचे कामही पूर्ण होणे आवश्यक असते. काड्यांची अपेक्षित वाढ पूर्ण झाल्यानंतर त्यांची पुढील वाढ थांबविण्यासाठी वेलींचा शेंडा मारणे आवश्यक असते.
द्राक्षाची ऑक्टोबर छाटणी :
ऑक्टोबर महिन्यात ही छाटणी करतात म्हणून तिला ऑक्टोबर छाटणी असे म्हणतात. या छाटणीची वेळ ठरविताना एप्रिल छाटणीपासून किमान 150 दिवस पूर्ण होणे आवश्यक असते. अन्यथा लवकर किंवा उशिरा छाटणी केल्यास बऱ्याच वेळा काड्यांवर वांझ फुटी येतात. ऑक्टोबर छाटणीची योग्य वेळ ठरविताना त्या वेळचे हवामान, काड्यांची अवस्था, द्राक्षाची जात आणि द्राक्ष उत्पादन बाजारात जाण्याची अंदाजित वेळ लक्षात घ्यावी लागते.
द्राक्षवेलींचा एक वर्षांचा आयुष्यक्रम हा एप्रिल आणि ऑक्टोबर छाटणीच्या 6-6 महिन्यांच्या दोन कालखंडांत विभागला आहे. एप्रिल छाटणी अथवा खरड छाटणीपासून ऑक्टोबर महिन्यापर्यंत सहा महिन्यांत काड्या परिपक्व होतात. या काड्यांची ऑक्टोबर मध्ये हलकी छाटणी करतात. छाटणीनंतर मार्च-एप्रिल महिन्यात फळे पक्व होतात. फळांच्या काढणीनंतर पुन्हा एप्रिलमध्ये वेलीची खरड छाटणी करतात. अशा प्रकारे दुसऱ्या सहा महिन्यांचा ऑक्टोबर ते मार्चपर्यंतचा कालावधी फलोत्पादनाचा असतो. काड्यांची वाढ, पक्वता आणि घड लागण्याची क्षमता या बाबी त्या त्या जातीनुसार बदलतात.
ऑक्टोबर छाटणी करताना काडीची पक्कता लक्षात येण्यासाठी काडीवरील पाने एक- दोन दिवस अगोदर काढावीत. यावेळी कमजोर, रोगट काड्याही काढून टाकाव्यात. ऑक्टोबर छाटणीच्या वेळी काडीवर किमान 6 व कमाल 9 डोळे राखावेत. छाटणीपूर्वी डोळयात सूक्ष्मघडांची निर्मिती कोणत्या डोळयात चांगली झाली आहे. हे तपासूनही छाटणी कितव्या डोळयावर करावी हे ठरविता येते. जातीनुसार ठरावीक डोळे काड्यांवर ठेवून छाटणी करावी लागते. ऑक्टोबर छाटणीनंतर द्राक्षबागेत सर्व बाबतींत स्वच्छता ठेवणे आवश्यक असते. बागेत स्वच्छता राहावी म्हणून छाटणीनंतर जमिनीवर पडलेली सर्व पाने व काड्या जमा करून नष्ट कराव्यात. खोडावर तसेच मुख्य ओलांड्यावर चुन्याची सफेदी लावावी. छाटलेल्या काड्यांवर कीडोर हॅड्रोजन सायनामाईड हे रसायन 3 मिली. प्रति लीटर पाण्यात मिसळून लावावे. म्हणजे फूट लवकर व एकसारखी होते व उत्पादनक्षमता वाढते. यामुळे काड्यांवरील न फुटलेले डोळे फुटू लागतात. या वेळी नवीन फुटीवर बुरशीनाशक आणि कीटकनाशकाची फवारणी करावी. खते व पाणी द्यावे.
द्राक्षाच्या चांगल्या प्रतीच्या अधिक उत्पादनासाठी जसे वळण, छाटणी आणि पीक संरक्षण, खते व पाण्याचे व्यवस्थापन या आवश्यक बाबी आहेत तसेच गर्डलिंग, विरळणी आणि संजीवकांचा वापर केल्यास द्राक्षाचे उत्पादन व गुणवत्ता या दोन्हींमध्ये भर पडते.
द्राक्षामध्ये गर्डलिंग करणे :
द्राक्षवेलीच्या खोडावरील, फांदीवरील किंवा काडीवरील ठरावीक 3-4 मिलिमीटर रुंदीच्या वर्तुळाकार साल काढण्याच्या क्रियेला गर्डलिंग असे म्हणतात.
गर्डलिंग ऑक्टोबर छाटणीनंतर 60-70 दिवसांनी करतात. द्राक्षाच्या वेलीवरील फळधारणा वाढविण्यासाठी, मण्यांचा आकार वाढविण्यासाठी आणि फळे लवकर तयार होण्यासाठी गर्डलिंग करतात. याशिवाय फळांची गोडी वाढविण्यासाठी, फळांना आकर्षक रंग येण्यासाठी आणि सर्व मणी एकसारखे पक्व होण्यासाठी गर्डलिंग केले जाते.
वेलीच्या मुळांनी जमिनीतून शोषण केलेली अन्नद्रव्ये तिच्या सालीच्या खालील भागात असलेल्या काष्ठ ऊतींमधून ( झायलेम) पानांकडे वाहून नेली जातात. तेथे सूर्यप्रकाशात प्रकाशसंश्लेषणाची क्रिया होऊन पानांत कच्च्या अन्नद्रव्यांचे रूपांतर तयार अन्नपदार्थांमध्ये (कार्बोहायड्रेट) होते. तयार अन्नपदार्थ वेलीच्या वरील सालीतील प्रकाष्ठ ऊतींमधून (फ्लोएम) खोडाकडे व तेथून पुढे मुळाकडे आणि वेलीच्या इतर सर्व भागांकडे जातात. वेलीच्या वरील खोडावर गर्डलिंग केल्यामुळे तयार अन्नपदार्थ गर्डलिंग केलेल्या वरच्या भागाला मिळतात. गर्डलिंगची जखम उघडी आहे तोपर्यंत खालील भागाकडे अन्नपदार्थ जात नाहीत. त्यामुळे गर्डलिंगवरील भागाकडे पक्क्या अन्नाचा भरपूर पुरवठा होतो.
द्राक्षवेलीवर बऱ्याच वेळा तिच्या शक्तीपेक्षा जास्त घड लागतात, अशा वेळी फळांच्या गुणवत्तेवर अनिष्ट परिणाम होतो. साधारणपणे एक चौरस फुटामध्ये एक घड असावयास पाहिजे. प्रमाणापेक्षा जास्त घड असल्यास ते विरळणी करून कमी करणे आवश्यक असते. उशिरा आलेले, लहान, रोगग्रस्त अथवा विकृत घड काढून टाकावे लागतात. विरळणीमध्ये मुख्यतः मोहोर, घड किंवा मणी यांची संख्या कमी करतात. विरळणी करून पीक मर्यादित ठेवल्यामुळे पानांची प्रत्यक्ष संख्या अथवा कार्यक्षमता कमी न करता वेलीची उत्पादनक्षमता वाढविली जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात फळांच्या दर्जात सुधारणा घडवून आणता येते.
मोहोराची विरळणी करताना कोवळ्या फुटींवर येणारा मोहोर हातांनी सहज खुडून टाकता येतो. घडाची अथवा मण्यांची विरळणी मात्र अतिशय काळजीपूर्वक करावयास पाहिजे. घडांची विरळणी करताना लहान, वेड्यावाकड्या आकाराचे आणि रोगट घड कमी करतात. मण्यांची विरळणी करताना आकाराने फार मोठ्या व घट्ट असलेल्या घडातील काही पाकळया हाताने तोडून तसेच पाकळ्यांतील काही मकळया अथवा शेंड्याकडील 20-25% घडाचा भाग कात्रीच्या साहाय्याने कापून विरळणी करतात.
द्राक्षावर जिबरेलिक अॅसिडचा वापर करणे :
महाराष्ट्रात द्राक्षवाढीसाठी जिबरेलिक अॅसिड हे संजीवक फार मोठ्या प्रमाणात वापरले जाते. या संजीवकाचा प्रमुख गुणधर्म असा, की याच्या वापरामुळे वनस्पतीतील पेशी लांबट होतात. जिबरेलिक अॅसिडच्या
वापरामुळे मण्याचे आकारमान वाढते. तसेच जिबरेलिक अॅसिडचा फवारा दिल्यामुळे काही प्रमाणात फुलांची आणि त्यामुळे मण्यांची संख्या मर्यादित करता येते. जिबरेलिक अॅसिड- शिवाय इतरही संजीवके वापरून द्राक्षाचे उत्पादन आणि गुणवत्ता वाढविता येते. पीक संजीवकांचा इच्छित परिणाम मिळण्यासाठी ठरावीक संजीवके, त्यांचे प्रमाण तसेच घडांची ठरावीक अवस्था यांत समन्वय साधला पाहिजे. अवाजवी प्रमाण वापरल्यास घडात विकृती तयार होण्याचा धोका असतो.
द्राक्ष पिकास खते व्यवस्थापन आणि द्राक्ष पिकास पाणी व्यवस्थापन :
खते :
द्राक्षवेलींना लागणाऱ्या सर्व आवश्यक अन्नद्रव्यांचा पुरवठा हा वेलीची वाढ, उत्पादन आणि गुणवत्ता यांवर अवलंबून असतो. म्हणून एप्रिल आणि ऑक्टोबर छाटणीचा
काळ हा खते देण्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. वेलींना लागणाऱ्या सर्व अन्नद्रव्यांचा पुरवठा करताना जमिनीचा पोत टिकवून ठेवणे महत्त्वाचे आहे. यासाठी रासायनिक खते आणि सेंद्रिय खते यांचा समतोल वापर करावा लागतो. रासायनिक खते देताना जमिनीमध्ये सेंद्रिय खतांची मात्रा योग्य प्रमाणात असावी. वेलीच्या पालेदार वाढीकरिता नत्रखते तसेच मुळांच्या वाढीसाठी स्फुरदाची आवश्यकता असते. म्हणूनच द्राक्षाच्या लागवडीपूर्वी चरातून किंवा खड्ड्यातून स्फुरदयुक्त खते देणे आवश्यक आहे. द्राक्षाच्या काड्या लावल्यापासून पीक येईपर्यंतच्या काळात खते देणे आवश्यक आहे. तिसऱ्या वर्षापर्यंत खालील तक्त्यात दिल्याप्रमाणे प्रत्येक वेलीला खते द्यावीत.
खताचे नाव | पहिले वर्ष | दुसरे वर्ष | तिसरे वर्ष | |||
प्रत्येक महिन्याला (किलो) | एप्रिल छाटणीनंतर (किलो) | ऑक्टो. छाटणीनंतर (किलो) | एप्रिल छाटणीनंतर (किलो) | ऑक्टो. छाटणीनंतर (किलो) | ऑक्टो. छाटणीनंतर 60 दिवसांनी (किलो) | |
हिरवळीचे खत | – | – | – | 30.00 | 30.00 | – |
शेणखत खत | – | 75.00 | – | 150.00 | – | – |
अमोनियम सल्फेट | – | 0.500 | 0.500 | 1.200 | 0.800 | – |
युरिया | 0.100 | 0.250 | 0.250 | 0.600 | 0.400 | – |
सुपर फॉस्फेट | 0.200 | 1.00 | 1.00 | 2.00 | 2.00 | – |
पोटॅशिअम सल्फेट | – | 0.750 | 0.750 | – | 1.500 | 1.500 |
निंबोळी / एरंड / करंज पेंड | – | 2.500 | 2.500 | 5.00 | 5.00 | – |
मासळी किंवा हाडाचे खत | – | 1.00 | 1.00 | 2.00 | 2.00 | – |
एप्रिल छाटणीनंतर वेलीवर पानांची जोमदार वाढ होण्यासाठी नत्रयुक्त खताची या वेळी अधिक आवश्यकता असते. खरड छाटणीच्या वेळी वेलीला वर्षभरात द्यावयाच्या एकूण नत्राचा 60% पुरवठा करावा. सेंद्रिय खते आणि उशिरा उपलब्ध होणारी वरखते ऑक्टोबर
छाटणीपूर्वी 15 ते 20 दिवस अगोदर द्यावीत. एकूण नत्राच्या 40% उरलेला नत्र ऑक्टोबर छाटणीच्या वेळी द्यावा. नत्र आणि स्फुरदाचा संबंध वेलीवरील काड्या परिपक्क होण्याशी आहे. तसेच नत्र व पालाशाचा संबंध घडाच्या वाढीसाठी तसेच घड चांगल्या प्रकारे पक्क होण्याशी आहे. सारांशरूपाने नत्र आणि स्फुरदाचा पुरवठा खरड छाटणीनंतर नवीन फूट, त्यांची वाढ, काड्यांची लांबी व काड्यांची एकसारखी पक्कता यांसाठी आवश्यक आहे. तसेच ऑक्टोबर छाटणीनंतर नवीन फूट, वांझ काड्या, घडांची संख्या, फळांचा रंग व गोडी, इत्यादींकरिता नत्र आणि पालाशाची वेलींना गरज असते. खाली दिलेल्या तक्त्यात दाखविल्याप्रमाणे द्राक्षवेलींना वर्षभर खालीलप्रमाणे दर हेक्टरी खतांची मात्रा द्यावी.
काळ | सेंद्रिय खत (टन) | नत्र (किलो) | स्फुरद (किलो) | पालाश (किलो) |
एप्रिल छाटणीच्या वेळी | 25 | 450 | 300 | 300 |
नवीन फूट 20 सेंमी. आल्यानंतर | – | 150 | – | – |
ऑक्टोबर छाटणीच्यापूर्वी | 25 | – | 200 | 200 |
ऑक्टोबर छाटणीनंतर | – | 300 | – | – |
घड बाहेर पडल्यानंतर | – | 50 | – | 100 |
फळधारणा सुरू होताना | – | 50 | – | 100 |
सूक्ष्म अन्नद्रव्ये :
विक्रमी उत्पादन देणाऱ्या द्राक्षवेलींना सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज भासते. ही गरज भागविली नाही तर वेलींची उत्पादनक्षमता घटून वेलींचे आयुष्यमान कमी होते. विशेषतः भारी व चुनखडीयुक्त जमिनीत वेलींना लोह उपलब्ध होत नाही. लोहाबरोबरच बोरॉन, जस्त, मँगेनीज, मॅग्नेशियम यांपैकी एक अथवा अनेक अन्नद्रव्यांची उणीव आढळल्यास पानांचा आकार लहान होऊन ती पिवळी पडतात. या सूक्ष्म अन्नद्रव्यांची उणीव एप्रिल छाटणीनंतर आलेल्या फुटीवर उन्हाळयात दिसू लागते. नवीन पानांवर यांची लक्षणे दिसतात. अशी लक्षणे आढळल्यास ताबडतोब उपाययोजना करावी. या सूक्ष्म अन्नद्रव्यांची जमिनीतील उपलब्धता वाढविण्यासाठी निरनिराळया ‘चिलेटेड कंपाउंड’ चा वापर करावा.
द्राक्षवेलींची सर्व प्रकारच्या अन्नद्रव्यांची गरज भागविण्यासाठी सेंद्रिय खते आणि रासायनिक खते 60:40 किंवा 50:50 या प्रमाणात वापरावीत. खते देताना जमिनीचा प्रकार व द्राक्षाची जात यांचा विचार करावा. भारी जमिनीत हिरवळीच्या खताचा वापर करावा. यासाठी द्राक्षाच्या बागेत तागाचे पीक घेऊन गाडून टाकावे. तागाची वाढ भरपूर होऊन तो जमिनीत दाबल्यास लवकर कुजतो व त्यापासून भरपूर अन्नद्रव्ये मिळतात. हलक्या जमिनीत शेणखत किंवा कंपोस्ट खत अधिक वापरावे.
पाणी व्यवस्थापन :
द्राक्षवेलीला पाणी अधिक लागत नसले तरी योग्य वेळी पाणी देणे फार महत्त्वाचे आहे. एप्रिल छाटणीनंतर (खरड छाटणी) पाण्याच्या किमान तीन पाळया द्याव्यात. ऑक्टोबर छाटणीनंतर हलके पाणी द्यावे. नंतर मात्र 20 ते 25 दिवस पाणी देऊ नये. नंतर फलधारणा झाल्यावर फळे तयार होईपर्यंत बागेला नियमित पाणी द्यावे. पाण्याची टंचाई भासल्यास वेलीवरील घडांची संख्या कमी करावी, तसेच जमिनीवर पालापाचोळा किंवा काळचा पॉलिथीनचे आच्छादन टाकावे म्हणजे जमिनीतील ओलावा टिकून राहतो. ठिबक सिंचन पद्धतीने पिकांची पाणी वापरण्याची क्षमता 25 टक्क्यांनी वाढते. यामुळे उपलब्ध पाण्याचा योग्य वापर होऊन बागायती क्षेत्र वाढविता येते.
आंतरपिके, आंतरमशागत आणि तणनियंत्रण :
द्राक्ष पिकातील आंतरपिके :
द्राक्षबागेमध्ये आंतरमशागतीची कामे वारंवार करावी लागत असल्यामुळे आंतरपिके घेणे विशेष फायदेशीर ठरत नाही. तरीसुद्धा सुरुवातीच्या एक-दीड वर्षाच्या काळात शेंगवर्गातील उडीद, मूग, भुईमूग तसेच हिरवळीच्या खतासाठी ताग, इत्यादी पिके घेता येतात.
द्राक्ष पिकातील आंतरमशागत :
द्राक्षवेलींची लागवड केल्यानंतर तणांचा बंदोबस्त करणे, जमीन भुसभुशीत करून पाणी देण्यासाठी वाफे तयार करणे, हिरवळीची खते देणे, जमिनीत खते मिसळणे व पाणी देणे, रोग-किडींचा बंदोबस्त करणे, इत्यादी बाबींचा विचार करून आंतरमशागत केली जाते. थंडी आणि वाऱ्यापासून द्राक्षवेलींचे संरक्षण करण्यासाठी बागेभोवती आडोसा करावा. जास्त थंडी पडल्यास बागेला पाणी द्यावे. बागेत वाळलेली पाने अथवा खराब क्रूड ऑईल जाळून शेकोट्या पेटवाव्यात. त्यामुळे बागेतील तापमान फार •खाली जात नाही. बागेतील तापमान 1 अंश सेल्सिअसच्या खाली गेल्यास द्राक्षाची कोवळी पाने, फूट आणि घडाला इजा होते.
द्राक्ष पिकातील तणनियंत्रण :
द्राक्ष हे बारमाही ओलिताचे पीक असल्यामुळे द्राक्षाच्या बागेत तणांचा उपद्रव सुरुवातीच्या एक-दोन वर्षांच्या काळात अधिक होतो. तणांची वाढ रोखण्यासाठी तागाचे पीक घ्यावे व फुले येण्यापूर्वी जमिनीत हलक्या नांगराच्या साहाय्याने गाडावे, म्हणजे तणांचे नियंत्रण होऊन जमिनीची सुपीकतासुद्धा वाढते. याशिवाय वेळच्या वेळी मजुरांकडून तणे काढून टाकावीत. तणांचे नियंत्रण तणनाशके वापरूनसुद्धा करता येते. ग्रामोक्झोन 1.5 लीटर अधिक फर्नोक्झोन 3 किलो 500 लीटर पाण्यात मिसळून दर हेक्टरी फवारल्यास तणांचा नाश होतो. याशिवाय वेलीच्या खोडाजवळ जमिनीवर काळचा पॉलिथीन पेपरचे आच्छादन केल्यास तणांचे नियंत्रण होऊन वेली कमी पाण्यावर वाढविता येतात व पाण्याची बचत होते.
बागेतील तणे काढून हलकी मशागत करावी व झाडांच्या बुडाशी मुळांभोवती जमीन भुसभुशीत ठेवून जमिनीत हवा खेळती ठेवावी. यामुळे झाडाची मुळे कार्यक्षम व निरोगी राहून अन्न व पाणी चांगल्या प्रकारे शोषून घेऊ शकतात.
द्राक्ष पिकावरील महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण :
द्राक्षवेलीवर एप्रिल आणि ऑक्टोबर छाटणीनंतर नवीन येणाऱ्या फुटीवर निरनिराळया किडींचा उप्रदव होतो. या किडींचा बंदोबस्त केला नाही तर द्राक्षाच्या पिकाचे फार नुकसान होते. हे नुकसान टाळण्याकरिता योग्य वेळी कीटकनाशकांची फवारणी करणे आवश्यक असते. द्राक्षवेलीवर उडद्या, फुलकिडे (थ्रिप्स), कोळी (माईट्स्), मिलिबग्ज (पिठ्या ढेकूण), इत्यादी किडी मोठ्या प्रमाणावर उपद्रव करतात.
उडद्या भुंगेरा :
ही कीड एप्रिल आणि ऑक्टोबर छाटणीनंतर नवीन फुटून येणाऱ्या कोंबांना कुरतडून खाते. परिणामी वेलीवर नवीन फुटीचा नाश होतो. किडीचा उपद्रव मोठ्या प्रमाणावर झाल्यास तीन ते चार दिवसांतच नवीन फुटी घड दिसण्यापूर्वीच खाऊन टाकतात. ही कीड मोठी झालेली पक्व पानेसुद्धा खाते, यामुळे पानांवर लांबट आकाराची छिद्रे दिसतात.
उपाय : छाटणीनंतर मॅलॅथिऑन, फॉस्फॉमिडॉन अथवा मिथील डिमेटॉन या कीटकनाशकांचे 2-3 फवारे सकाळी किंवा सायंकाळी द्यावेत. ऑक्टोबर व एप्रिल छाटणीच्या वेळी खोडावरील सैल झालेली साल काढून घ्यावी. खोडावर चुन्याची सफेदी लावताना त्यामध्ये एखादे कीटकनाशक मिसळावे. मॅलॅथिऑन किंवा फास्फॉमिडॉन किंवा मिथील डिमेटॉन यांपैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची फवारणी करावी.
फुलकिडे (थ्रिप्स) :
ही कीड सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्यात घड फुलोऱ्यावर असताना जास्त प्रमाणात असते. पानाच्या मागच्या भागातील रस शोषण करून पानाचा भाग प्रथम पांढरा व नंतर तपकिरी रंगाचा दिसतो. या किडीमुळे घडातील फुले व मणी गळून पडतात. उपाय : या किडीच्या नियंत्रणासाठी मोनोक्रोटोफॉस हे कीटकनाशक 10 लीटर पाण्यात 15 मिलिलीटर या प्रमाणात मिसळून फवारणी करावी.
कोळी (माईट्स्) :
ही कीड अतिशय लहान आकाराची असून कोवळ्या पानांच्या वरच्या भागातून रस शोषून घेऊन पानावर जाळी तयार करते आणि यामुळे पानांवर तपकिरी
डाग पडतात.
उपाय : ह्या किडीच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट 30 % प्रवाही 10 मिली. किंवा कॅलथेन 40% प्रवाही 7.5 मिली. 10 लीटर पाण्यात या प्रमाणात मिसळून फवारणी करावी.
पिठ्या कीड (मिलीबग्ज) :
पांढरट रंगाची ही कीड कोवळया फुटीतील तसेच फळातील रस शोषून घेते. मिलिबग्ज या किडीच्या शरीरामधून चिकट गोड असा द्रवपदार्थ बाहेर पडतो. या चिकट गोड पदार्थावर काळया रंगाच्या बुशीची वाढ होते. त्यामुळे पानांतील प्रकाशसंश्लेषणक्रिया मंदावते.
उपाय : या किडीचा उपद्रव सुरू होण्यापूर्वीच कीटकनाशकाची फवारणी करावी. किडीचा प्रादुर्भाव झाल्यावर कीटकनाशकांचा फारसा उपयोग होत नाही. डायमेथोएट 0.05 %, फॉस्फोमिडॉन अथवा डीडीव्हीपी या कीटकनाशकाची फवारणी खरड छाटणीनंतर 15 दिवसांच्या अंतराने दोन वेळा करावी.
वरील किडीशिवाय पाने गुंडाळणारी अळी, साल पोखरणारी अळी, केसाळ अळी, खवले कीड आणि हुमणी या किडींचासुद्धा द्राक्षाच्या बागेला उपद्रव होतो. याशिवाय वाळवी आणि निमॅटोड या किडींचाही थोड्याफार प्रमाणात प्रादुर्भाव होतो.
द्राक्ष पिकावरील महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण :
पावसाळयात द्राक्षवेलीवर अनेक प्रकारचे रोग येतात. यामध्ये प्रामुख्याने केवडा, करपा आणि भुरी हे प्रमुख रोग आहेत. वेलीची कोवळी पाने, शेंड्याचा भाग, लहान घड व लहान मणी यांवर प्रामुख्याने हे रोग येतात.
कवडा रोग (डावनी मिल्ड्यू) :
हा रोग दमट हवामानात फ्लाझमोफोरा व्हिटीकोला नावाच्या बुरशीमुळे होतो. या रोगाचा प्रसार पाने व कोवळ्या फांद्यांवर झपाट्याने होतो. पानांवर फिकट हिरव्या अथवा पिवळट रंगाचे तेलकट, पारदर्शक डाग दिसतात. यामुळे पानांतील पेशी मरतात. पाने वाळून गळून पडतात. फुलोरा अथवा लहान फळांवर रोगाची लागण झाल्यास ती जळतात. या रोगाची बुरशी सुप्तावस्थेत बरेच दिवस टिकून राहते आणि योग्य हवामान मिळताच पुन्हा रोगाच्या स्वरूपात द्राक्षवेलीवर दिसून येते.
करपा रोग (अँथँक्नोज) :
जून ते ऑक्टोबर या काळात ओलसर दमट हवामानात ग्लिओस्पोरियम अम्पेलोफॅगम या बुरशीमुळे हा रोग होतो. या रोगामुळे कोवळी फूट, फुलोरा तसेच फळांवर काळसर, खोलगट चट्टे पडतात. पानांवर गोल, काळे ठिपके पडून पानांचा मध्यभाग भुरकट राखी रंगाचा होतो. पेशी सुकून पाने वेडीवाकडी होतात.
उपाय : केवडा व करपा रोगाचा बागेत उपद्रव होऊ नये म्हणून प्रतिबंधक उपाययोजना करावी. या दोन्ही रोगांची एकदा लागण झाल्यानंतर त्यांवरील उपाय फारसे फलदायी होत नाहीत. यासाठी बागेत स्वच्छता ठेवावी. पावसाळ्यापूर्वी वेलीवरील रोगट भाग काढून जाळून टाकावेत. एप्रिल छाटणीनंतर नवीन फुटीवर 5:5:50 बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी. पावसाळयात बोर्डो मिश्रणाच्या दोन-तीन फवारण्या कराव्यात. ऑक्टोबर छाटणीनंतर 1:1:50 बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी. दोन आठवड्यांनी पुन्हा 2:2:50 तीव्रतेचे बोर्डो मिश्रण फवारावे. नवीन वाढीची फूट 15 ते 20 सेंमी. लांबीची झाल्यावर त्यावर 5:5:50 तीव्रतेचे बोर्डो मिश्रण फवारावे. यानंतरच्या काळात वेगवेगळया ताम्रयुक्त बुरशीनाशकांची आवश्यकतेनुसार फवारणी करावी.
भुरी रोग (पावडरी मिल्ड्यू) :
अॅन्सिन्युला निकेटर नावाच्या बुरशीपासून भुरी रोग होतो. हा रोग फळधारणेच्या काळात उष्ण व दमट हवामान असताना होतो. या रोगाची लागण झाल्यामुळे द्राक्षाचा फुलोरा जळून जातो. पांढऱ्या रंगाच्या बुरशीचा थर मण्यावर येऊन मणी तडकतात व फुटतात.
उपाय : वातावरणात 60 ते 80% आर्द्रता आणि ढगाळ हवामान असल्यास 300 मेश गंधकाची भुकटी धुरळावी. भुरी रोगाचे नियंत्रण करण्यासाठी गंधकाची फवारणीसुद्धा करावी. घडावरील भुरीच्या नियंत्रणासाठी कॅराथेन 0.05% द्रावणात घड बुडवावेत.
वरील रोगांशिवाय फांद्यामर (डेड आर्म) हा रोग द्राक्षबागेत मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. अनाबेशाही जातीत हा रोग जास्त प्रमाणात आढळतो.
झान्थोमोनास नावाचा रोग अणुजीवामुळे (बॅक्टेरिया) पावसाळयात वेलीवर दिसून येतो. या रोगाच्या नियंत्रणासाठी ताम्रयुक्त बुरशीजनक व स्ट्रेप्टोमायसीन या प्रतिजैविक औषधाची फवारणी करावी.
द्राक्ष पिकावरील शारीरिक विकृती आणि त्यांचे नियंत्रण :
वांझ फुटी :
द्राक्षाच्या ऑक्टोबर छाटणीनंतर छाटलेल्या काड्यांवरील डोळे फुटून फुलाचा घोस येणे महत्त्वाचे असते. परंतु बऱ्याच वेळा छाटणीनंतर डोळे उशिरा फुटणे, काड्यांवरील डोळे न फुटणे, काड्यांवरील वांझ फुटीचे प्रमाण अधिक असणे तसेच नवीन फूट येण्याची क्रिया जास्त दिवस चालणे या बाबी आढळून येतात. या त्रुटी दूर करण्यासाठी जमिनीची वरचेवर हलकी मशागत करावी. न फुटलेल्या काड्यांना दोन डोळयांच्या मध्ये पीळ द्यावा. तसेच थायोयुरिया किंवा 500 पीपीएम जिबरेलिक अॅसिड किंवा सँडोलिन ए वगैरे रसायनांची छाटणीनंतर वेलीवर फवारणी करावी. म्हणजे काड्यांवर नवीन फूट येण्यास मदत होते व त्यावर फुलांचा घड येतो. कधी कधी नवीन फूट अधिक आल्यास या फुटीवर फुलांचा घड येत नाही, अशा वांझ फुटी काढून टाकाव्यात. यास डोळे पुसणे असेही म्हणतात.
ममीफिकेशन :
द्राक्षाच्या घडाच्या शेंड्याकडील भागावर सुरकुतलेले आणि आंबट मणी तयार होतात. या मणी सुरकुतण्याच्या क्रियेला ममीफिकेशन असे म्हणतात. थॉम्पसन सीडलेस या जातीत ही विकृती आढळते. खते व पाणी वेळच्या वेळी देऊन ममीफिकेशन कमी करता येते. प्रत्येक वर्षी सारख्या प्रमाणात उत्पादन घ्यावे. घडाचा शेंडा खुडून विरळणी करावी. वेलीवर भरपूर पाने वाढू द्यावीत.
शॉट बेरीज :
द्राक्षाच्या घडातील मणी एकसारखे न राहता लहान-मोठे होतात. काही मणी अगदी लहान, खुरटलेले आणि गोल आकाराचे असतात. अशा मण्यांना शॉट बेरीज असे म्हणतात. शॉट बेरीजमुळे घडात चांगले मणी वाढत नाहीत. घड चांगले वाढण्यासाठी जिबरेलिक अॅसिडचा वापर करतात. परंतु यात काही उणीव राहिल्यास शॉट बेरीजचे प्रमाण वाढते.
पिंक बेरीज :
ही विकृती पांढऱ्या रंगाच्या जातींत म्हणजेच थॉम्पसन सीडलेस, तास-ए-गणेश, सोनाका या जातींत उद्भवते. द्राक्ष पिकण्यास आरंभ होताच ही विकृती दिसू लागते. नैसर्गिक पिवळा अगर दुधी रंगाऐवजी मण्यावर गुलाबी रंग येतो. असे घड तात्पुरते चांगले दिसत असले तरी ते टिकत नाहीत. अशी द्राक्षे निर्यातीस बाद ठरतात. ही विकृती उद्भवू नये यासाठी पुढीलप्रमाणे उपाययोजना करावी :
(1) जमिनीतून पाण्याचा निचरा वाढवावा,
(2) कच्चे शेणखत वापरू नये,
(3) काही कीडनाशकांचा वापर टाळावा,
(4) पोषण समतोल साधावा,
(5) जैविक-सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करावा.
द्राक्ष फळांची काढणी, उत्पादन आणि विक्री :
द्राक्षांची काढणी : द्राक्षाचे पक्व झालेले घड वेलीवरून काढावेत. अपक्व घड काढल्यास इतर फळांसारखे काढणीनंतर ते पक्व होत नाहीत. द्राक्षाच्या फळांचा रंग पक्क झाल्यावर जातीनुसार बदलतो व फळे पारदर्शक होऊन फळाला गोडी येते. काढणीच्या वेळी मुळात साखरेचे प्रमाण अधिक असले पाहिजे. वेलीवरील सर्वच घड एका वेळी काढणीस तयार नसतात. घड जसे पक्क होतात तसे काढावेत. थॉम्पसन सीडलेस या जातीच्या घडाची काढणी घड पिवळसर किंवा फिकट रंग आल्यावर करावी. हैंड रिफ्रेंक्टोमीटरचा उपयोग करून एकूण विद्राव्य घटकांचे (टी.एस.एस.) प्रमाण 18 ते 22 च्या दरम्यान आहे किंवा नाही हे पाहावे. द्राक्षाचा घड कात्रीने कापावा. घड एकावर एक न ठेवता लहान ट्रेचा उपयोग करावा. द्राक्षाची काढणी शक्यतो सकाळी करावी.
उत्पादन : द्राक्षाचे उत्पादन हे जातिपरत्वे कमी-अधिक येते. चवथ्या वर्षापासून द्राक्षवेलीचे खरे उत्पादन मिळणे चालू होते. थॉम्पसन सीडलेस या जातीचे सरासरी हेक्टरी उत्पादन 20 ते 25 टन येते आणि उत्पन्न हेक्टरी 1.5 ते 2.0 लाख रुपये मिळते. अनाबेशाहीचे उत्पादन जरी जास्त असले तरी भाव कमी असल्यामुळे फायदा कमी होतो.
विक्री : घडांची काढणी झाल्यानंतर घड विक्रीसाठी तयार करावेत. घडातील खराब, वाळलेले, लहान मणी कात्रीच्या साहाय्याने काढावेत व घड स्वच्छ करून घडांच्या आकाराप्रमाणे घडांची प्रतवारी करावी. मोठे व लहान घड वेगवेगळया खोक्यांत भरावेत. लाकडी किंवा पुठ्याची चार किलो द्राक्षे बसतील अशी 45X22.5 X 10 सेंमी. आकाराची चौकोनी खोकी वापरावीत. खोक्यात तळाला वाळलेले गवत अंथरून त्यावर कागद ठेवून द्राक्षघडांची घट्ट मांडणी करावी. त्यावर दुसरा रंगीत कागद ठेवून त्यावर वाळलेले गवत ठेवून खोके बंद करावे व विक्रीस पाठवावे.
द्राक्ष फळांची साठवण आणि द्राक्ष फळे पिकविण्याच्या पद्धती :
द्राक्षाच्या घडांची काढणी केल्यानंतर घड साधारणपणे 8 ते 10 दिवसांपर्यंत चांगला राहू शकतो. द्राक्षाच्या घडांची साठवण 2 ते 3 अंश सेल्सिअस तापमानाला दोन महिन्यांपर्यंत करता येते. ग्रेप गार्डचा वापर करून आणि प्री-कूलिंग करून द्राक्षे शीतगृहात साठविणे शक्य होते.
द्राक्ष निर्यातीस संधी :
आपल्याकडे जेव्हा द्राक्ष पिकतात तेव्हा युरोपमध्ये द्राक्षे नसतात; त्यामुळे आपल्या द्राक्षांना तिकडे निर्यातीस चांगली संधी आहे. जी द्राक्षे निर्यात करायची असतात त्यांची गुणवत्ता पुढीलप्रमाणे असावी लागते :
(1) द्राक्षजात: थॉम्पसन सीडलेस (2) घडाचे वजन : अर्धा किलो (3) घडात मणी संख्या 100 ते 130 (4) मण्यांचा रंग : दुधी (5) मण्याचा आकार 27X 18 मिमी. (6) मण्याचे वजन 4 ग्रॅम (7) मण्यात गोडी 18 ते 20 टक्के साखर (8) फळावर औषधाचे डाग नको (9) रसात विषारी शेषांश नको. (10) सर्व मणी एकसारखे (11) सर्व घड एकसारखे व तजेलदार. निर्यात होणाऱ्या द्राक्षास चांगले दर मिळतात. तथापि, एकूण व्यवहार काळजीचा व जोखमीचा असतो.
सारांश :
द्राक्षाची चांगली वाढ व उत्पादनासाठी उष्ण व कोरडे हवामान पोषक असते. पावसाळी व दमट हवामान या पिकाला अपायकारक आहे. अशा हवामानात या पिकावर भुरी, करपा व केवडा हे रोग येतात. या पिकासाठी मध्यम काळी, कसदार व पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन चांगली असते. भारतात द्राक्षाखाली महाराष्ट्रात सर्वांत जास्त क्षेत्र लागवडीखाली आहे. महाराष्ट्रात नाशिक, सांगली, सोलापूर जिल्ह्यांत द्राक्षाची सर्वांत जास्त लागवड केली जाते. थॉम्पसन सीडलेस व इतर सीडलेस जातींची लागवड महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर आहे. द्राक्षाची अभिवृद्धी छाट कलमापासून करतात. ही कलमे ऑक्टोबर महिन्यात लावतात. महाराष्ट्रात द्राक्षाची छाटणी दोन वेळा म्हणजे एप्रिल व ऑक्टोबर महिन्यात करावी लागते. साधारणतः फेब्रुवारी ते एप्रिल या काळात द्राक्षे काढणीस तयार होतात. छाटणीच्या वेळी खतांची मात्रा देणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे पाण्याचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने करावे लागते. द्राक्षाचे रोग व किडींपासून संरक्षण करणे फार महत्त्वाचे असते. चवथ्या वर्षापासून द्राक्षवेलीचे चांगले उत्पादन मिळणे सुरू होते. थॉम्पसन सीडलेस या जातीचे सरासरी हेक्टरी उत्पादन 20 ते 25 टन मिळते. द्राक्षापासून बेदाणे आणि मद्य बनविण्यास तसेच द्राक्षे निर्यात करण्यास चांगली संधी आहे.