।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।
गुढीपाडवा (Gudi Padwa ka sajara kartat)
आंब्याच्या हिरव्याकंच पानांसोबत पिवळ्या झेंडूचे तोरण. दाराच्या समोर पाटावर बांबूच्या काठीला सुंदर वस्त्र गुंडाळून, कडुलिंबाची पाने, आंब्याच्या डहाळ्यांनी आणि साखरेच्या पांढऱ्या गाठीचा हार घालून नटलेली गुढी आणि घरात गुढीसाठी केलेला गोडाचा नैवेद्य. सारंच कसं मनमोहक आणि उत्साही. मनाला नवी उमेद देणारा हा सण.
चैत्राच्या टक्क उन्हातही मनाला उभारी देणारा हा गुढीपाडव्याचा सण मराठी माणसांच्या आयुष्यात नवचैतन्य घेऊन येतो. चैत्राच्या महिन्यात पिवळ्या रंगात न्हाऊन निघालेला निसर्ग आणि वसंताची बहार घेऊन येणा-या या गुढीपाडव्याला महाराष्ट्रात अनन्य साधारण महत्त्व आहे.
अंगणात मोगर्याचा सुगंध दरवळायला लागतो, आंबाही हिरव्या कंच पानांच्या शालूने नटतो, आंब्याची डाळ, पन्हे, हा सारा थाट, वसंताच्या आगमनाची चाहूल असते. असा हा गुढीपाडवा सगळ्यांच्या जीवनात वसंत फुलवतो.
काय आहे गुढीपाडव्याचा इतिहास ?
गुढीपाडवा साजरा करण्यामागे अनेक पौराणिक कथा (गुढीपाडवा इतिहास) सांगितल्या जातात. असं म्हणतात की, महाभारताच्या आदिपर्वात उपरिचर राजाने इंद्राने त्याला दिलेली कळकाची काठी जमिनीत रोवली आणि नवीन वर्षाच्या सुरूवाताला तिची पुजा केली. या परंपरेचा आदर राखण्यासाठी गुढी पुजन केले जाऊ लागले. इतिहासात या दिवशी ब्रम्हदेवाने विश्व निर्मिती केली असं वेदात म्हटल्याचा उल्लेख आहे. पौराणिक कथेनुसार श्रीराम वनवासातून पुन्हा अयोध्येला परत आले म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो. म्हणूनच यशाची गुढी उभारून हा दिवस साजरा केला जातो. गुढीपाडवा का साजरा करतात यामागे अनेक कथा सांगितल्या जातात. एका कथेनुसार पार्वती आणि शंकराचे लग्न पाडव्याला ठरलं आणि तृतीयेला झालं होतं. म्हणूनच या दिवशी आदिशक्ती पार्वतीची पुजा केली जाते.
गुढीपाडव्याचे महत्व –
गुढीपाडव्याशी फक्त सांस्कृतिक, धार्मिक गोष्टीच जोडलेल्या नाहीत तर त्यात निसर्गाचा, पर्यावरणाचाही विचार आहे. आल्हाददायक वसंत ऋतूनंतरचा उन्हाळा बाधू नये, म्हणून वर्षांच्या सुरुवातीलाच कडुनिंबाची पाने खावीत, असे सांगितले आहे. सृष्टी निर्माण केल्यानंतर ब्रह्मदेवाने सृष्टीला चालना दिली तो पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा, असे समजले जाते. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक. त्यामुळे नवीन उद्योगाचा, व्यवसायाचा आरंभ करण्यास हा उत्तम मुहूर्त समजला जातो. यामध्ये नूतन संवत्सराची सुरुवात, म्हणून चैत्र शुद्ध प्रतिपदेचा दिवस हा महत्त्वाचा शुभ मानला जातो. या दिवशी गुढी उभारुन नव्या संकल्पाचा शुभारंभ केला जातो.
गुढीपाडवा हा सण साजरा करण्यामागे पौराणिक कथेत अनेक संदर्भ सापडत असले तरी आजही हा सण तितक्याच उत्साहात साजरा केला जातो. आजच्या आधूनिक युगातही या सणाला ऐतिहासिक सांस्कृतिक आणि नैसर्गिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. चैत्र महिन्यापासून वसंत ऋतूच्या आगमनाला सुरूवात होते. त्यामुळे वातावरणात बदल झालेले असतात. जुनी सुकलेली पानं गळून झाडांना नवी पालवी फुटते, आंब्याला मोहोर येतो याचं प्रतिक म्हणून गुढीला आंब्याची डहाळी बांधली जातात. पूर्वीपासून या नैसर्गिक बदलाचे स्वागत करण्याची पद्धत असावी. वातावरणात वाढलेल्या उन्हाची काहिली कमी करण्यासाठी गुढीमध्ये कडूलिंबाची पाने लावली जातात. प्राचीन काळापासून चैत्र शुद्ध प्रतिपदेला ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि साखर हे कडुनिंबाच्या पानांबरोबर वाटून खातात. यामुळे पचनक्रिया सुधारणं, पित्ताचा नाश करणं, त्वचारोग बरं करणं, धान्यातील किड थांबवणं हे सर्व यामुळे शक्य होतं. कडुनिंबामध्ये अनेक गुण असल्यामुळे आयुर्वेदातही याला खूप महत्त्व आहे. शरीराला थंडावा देणारी कडुनिंबाची पानं आंघोळीच्या पाण्यात घालून आंघोळही केली जाते. ती वाटून खाल्ल्यामुळे आरोग्याला चांगला लाभ होतो.
नववर्षाचे स्वागत करण्यासाठी घरोघरी गुढी उभारण्याचा कार्यक्रम केला जातो. यासाठी घरातील सर्वजण लवकर उठून गुढी उभारण्याची तयारी करतात. एक उंच बांबूच्या काठीला धुवून स्वच्छ केले जाते. त्याला रेशमी साडी अथवा वस्त्र नेसवून त्यावर चांदीचा अथवा तांब्याचा तांब्या, कडूलिंब, आंब्याची पाने, साखरेची माळ, फुलांचा हार बांधून तिला सजवले जाते. घराच्या दारात अथवा खिडकीत गुढी उभारण्यात येते. गुढी हे स्नेहाचे, मांगल्याचे, उत्साहाचे आणि आनंदाचे प्रतिक मानले जाते. ज्यामधून विजयपताका उभाल्याचा आनंद व्यक्त होत असतो. घराबाहेर रांगोळी काढली जाते.
गुढीपाडव्याला घरात गोड पदार्थ केले जातात
या दिवशी खास पदार्थ तयार केले जातात. या दिवशी गोड भाकरी, आमटी, पुरणपोळी केली जाते. गुढीपाडव्याबद्दल असे म्हटले जाते की, रिकाम्या पोटी पुरणपोळीचे सेवन केल्याने त्वचाविकारांची समस्याही दूर होते.
अनेक घरात पाडव्याच्या दिवशी गोड शिरा, श्रीखंड, बासुंदी, पुरण पोळी असे गोड पदार्थ केले जातात. सकाळी कडुलिंबाची पाने खाऊन दिवसाची सुरूवात तर, गुढी उतरवल्यानंतर रात्री संपूर्ण कुटुंब एकत्रित गोड जेवणाचा आस्वाद घेतात.
गुढीपाडव्याची पूजा कशी केली जाते ?
गुढीपाडव्याची पूजा पद्धत आणि परंपरा
गुढीपाडव्याला लोक अंगाला तेल लावून सूर्योदयाच्या वेळी स्नान करतात. घराचे मुख्य प्रवेशद्वार आंब्याची किंवा अशोकाची पाने आणि फुलांनी सजवून रांगोळी काढली जाते. ध्वज घराबाहेर किंवा घराच्या काही भागात फडकवला जातो. या दिवशी लोक ब्रह्मदेवाची पूजा करतात आणि नंतर गुढी उभारतात.
देशाच्या विविध भागात वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो
गोवा आणि केरळमधील कोकणी समाज गुढी पाडवा संवत्सर पाडवा म्हणून साजरा करतात. कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये गुढीपाडव्याचा सण युगाडी म्हणून ओळखला जातो. काश्मिरी हिंदू हा दिवस नवरेह म्हणून साजरा करतात.
विदर्भातील गुढीपाडवा
विदर्भात गुढीपाडव्याच्या दिवशी प्रत्येकच घरात गुढी ऊभारण्याची परंपरा पूर्वी नव्हती. आता बदलत्या काळानुसार अनेक घरांमध्ये ही गुढी ऊभारली जाते. मात्र, या दिवशी सकाळी प्रत्येक दारावर आंब्याच्या पानाचे तोरण लावून या शुभ दिवसाची सुरूवात होते. गुढीपाडव्याच्या दिवशी प्रत्येक घरात शेतात पीकलेली ज्वारी, गहू, चणा, बाजरी, वाल अशा नवीन पीकलेल्या सर्व कडधान्याच्या मिश्रणाची उसळ केली जाते. ती आंब्याच्या चटणी सोबत खातात. गोड शिरा केला जातो.
गुढी का उभारतात ? गुढीपाडव्याच्या परंपरेला प्रामुख्याने तीन घटना कारणीभूत आहेत.
याच दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रभू रामाने वालीचा वध करून त्याच्या छळातून प्रजेला मुक्त केले होते. घरातून वालीचा, आसुरी शक्तींचा रामाने दैवी शक्तीने नाश केला याचे गुढी ही सूचक आहे. याच दिवशी प्रभू रामांचा चौदा वर्षांचा वनवासही संपला होता, म्हणून हा आनंदोत्सवाचा दिवस.
ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हाच पवित्र दिवस. भगवान विष्णूंनी मत्स्य रूप धारण करून शंकासुराचा वध केला, त्या मत्स्यरूपी विष्णूंचा जन्म चैत्र-शुद्ध प्रतिपदेचाच हा दिवस.
प्रभू रामचंद्रांनी चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी अयोध्येत प्रवेश केला. त्यावेळी जनतेने गुढ्या-तोरणं उभारून त्यांचं स्वागत केलं. तेव्हापासून दर चैत्र शुक्ल प्रतिपदेला गुढ्या-तोरणं उभारून आनंदाचा विजयोत्सव दिन साजरा होऊ लागला.
दुसऱ्या एका कथनांन्वये वसू नावाचा राजा तपश्चर्या करून मनुजेंन्द्र झाला. स्वर्गातल्या अमरेंद्राने याच तिथीला वस्त्रालंकार देऊन त्याचा गौरव केला म्हणून हा दिवस आनंदोत्सव म्हणून साजरा केला जातो.
तिसऱ्या कथेप्रमाणे शालिवाहन राजाने अत्याचारी शक लोकांचा पराभव करून त्यांच्या जाचातून जनतेची मुक्तता केली. या विजयाप्रित्यर्थ पाडव्याच्या तिथीपासून शालिवाहन शकाला प्रारंभ झाला. ज्यांनी विजय मिळवला तो ‘शालिवाहन’ आणि ज्यांच्यावर विजय मिळविला ते ‘शक’ असा दोघांचाही अंतर्भाव ‘शालिवाहन शक’ यामध्ये करण्यात येतो.