गुलाब । गुलाब लागवड । गुलाब शेती । गुलाब शेतीसाठी खते आणि गुलाब शेतीसाठी पाणी व्यवस्थापन । गुलाबाचे महत्त्व । गुलाब लागवड क्षेत्र आणि उत्पादन । गुलाब लागवडीसाठी हवामान आणि जमीन । गुलाब लागवडीसाठी उन्नत जाती । गुलाबाच्या खुंटरोपावर डोळे भरणे । गुलाब लागवड हंगाम आणि लागवडीचे अंतर । गुलाब शेतीतील महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण । गुलाब रोपातील शारीरिक विकृती आणि त्यांचे नियंत्रण । गुलाब रोपवरील महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण । गुलाबाच्या फुलांची काढणी, उत्पादन आणि विक्री । Gulab Farming । rose farming । rose farming in open field | rose farming in maharashtra | rose farming in polyhouse | Importance Of Rose | Rose Flower Production In Maharashtra | Climate For Rose Farming | Best Verity Of Rose | Rose Plantation | Best Time For Rose Plantation | Rose Plant Pruning types | Rose Farming insect damage and Solution | Measure Disease In Rose Farming | Rose Harvesting Rose Production And Sales | Physical Deformity In Rose Farming And Control |
।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।
गुलाब :
महाराष्ट्रात फुलशेतीचा प्रसार झपाट्याने होत आहे. फुलशेतीतून दर हेक्टरी इतर अन्नधान्ये, डाळी, तेलबिया यांपेक्षा जास्त उत्पादन मिळते. गुलाब हे एक महत्वाचे फुलपीक आहे. गुलाबामध्ये अनेक आकर्षक जाती, विविध रंगळटा आणि सुवास असल्यामुळे या फुलांचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात सातत्याने केला जातो. गुलाबापासून अत्तर, गुलाबपाणी, गुलकंद, जॅम, इत्यादी महत्त्वाचे पदार्थ तयार केले जातात. याशिवाय बागेमध्ये सुशोधनासाठी गुलाबाला महत्वाचे स्थान आहे. गुलाब हवा शुद्ध राखतो. रक्तदाबाचे विकार कमी करतो आणि मानसिक संतुलन कायम राखतो. महाराष्ट्रातील हवामानात गुलाब वर्षभर फुलतो. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मुंबईसारखी बाजारपेठ उपलब्ध असल्यामुळे गुलाबफुलांच्या शेतीतून जास्त फायदा मिळू शकतो.
गुलाबाचे महत्त्व : Importance Of Rose
फुलांमध्ये गुलाबाचे स्थान सर्वांत वरचे आहे. या फुलाला ‘फुलांचा राजा’ असे म्हणतात. माणसाला प्रेम व्यक्त करण्यासाठी लागणाऱ्या विविध साधनांत गुलाब मानाचे स्थान मिळवतो. प्रेम, आदर, कृतज्ञता, आनंद, दुःख, इत्यादी सर्व भावना व्यक्त करताना गुलाबाची फुले दिलो जातात. जुर््या संस्कृत साहित्यात गुलाबाला ‘तरणी पुष्प’ किंवा ‘अतिमंजुळा’ किंवा ‘सीमांतिका’ असे म्हटले आहे. आयुर्वेदात गुलाबाच्या औषधी गुणधर्माविषयी भरपूर माहिती. उपलब्ध आहे. उपवनांमध्ये म्हणूनच गुलाबाच्या ताटव्यांना अतिशय महत्व होते. गुलाब सभोवतालचे वातावरण शांत, प्रसन्न आणि शुद्ध ठेवत असल्यामुळे अलीकडच्या औद्योगिक क्रांतीच्या युगातही या फुलांचा वापर बागांमध्ये शोभेसाठी तसेच प्रदूषण रोखण्यासाठी होतो. गुलाबापासून अत्तर, गुलाबपाणी, जॅम, जेली, सरबत, गुलकंद त्याचप्रमाणे उच्च्रतीचे मद्यही तयार करतात. गुलाबाच्या पाकळयांमधील साखर आजारी माणसासाठी उत्तम समजली जाते. आधुनिक युगात गुलाबाची फुले ‘कट फ्लॉवर’ म्हणून वापरतात. विविध फुलांच्या जगभर होणाऱ्या उलाढालीत गुलाबाचा नंबर पहिला लागतो.
जगात नेदरलँड (हॉलंड), जर्मनी, इंग्लंड, कोलंबिया, केनिया, भारत, टांझानिया या देशांत गुलाबाची व्यापारी पद्धतीने शेती केली जाते. भारतात महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात या राज्यांत गुलाबाचे कट फ्लॉवर्ससाठी (लांब दांड्याची फुले) उत्पादन घेतले जात असून महाराष्ट्र राज्य लांब दांड्याच्या फुलांचे उत्पादन करण्यासाठी आघाडीवर आहे. नाशिक, पुणे, सांगली, सोलापूर, अहमदनगर, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांत गुलाबाच्या लागवडीखाली एकूण 1,000 हेक्टर क्षेत्र आहे. या भागात गुलाबाच्या लागवडीसाठी योग्य हवामान उपलब्ध आहे. शिवाय पुणे-मुंबई बाजारपेठा आणि मुंबई बाजारपेठेचा परदेशी बाजारपेठांशी असलेला जवळचा संबंध यांमुळे गुलाबाची फुले आखाती आणि युरोपीय देशांना पाठविणेही शक्य आहे. परदेशात चांगल्या लांब दांड्याच्या, आकर्षक रंगाच्या गुलाबांना नोव्हेंबर ते मार्च या कालावधीत मोठ्या प्रमाणावर मागणी असते. याशिवाय देशातील विविध भागांत गुलाबाच्या फुलांना मोठ्या प्रमाणावर मागणी असल्यामुळे गुलाब हे भरपूर उत्पन्न मिळवून देणारे फुलपीक आहे.
गुलाब लागवड क्षेत्र आणि उत्पादन : Rose Flower Production In Maharashtra
गुलाब शेती ही प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रात विखुरलेली असून गुलाबाच्या शेतीमध्ये नाशिक जिल्ह्याचा सिंहाचा वाटा आहे. नाशिकहून दररोज 8-10 ट्रक गुलाब मुंबई बाजारात पाठविला जातो. पुणे जिल्ह्यातून 5-6 ट्रक भरून गुलाब मुंबई बाजारपेठेत जातो. महाराष्ट्रातील गुलाबाच्या पिकाखालील जिल्हावार क्षेत्र पुढील तक्त्यात दिले आहे.
जिल्हा | क्षेत्र (हेक्टर) |
नाशिक | 300 |
पुणे | 200 |
सांगली | 200 |
अहमदनगर | 100 |
सातारा | 100 |
सोलापूर | 30 |
धुळे | 20 |
जळगाव | 20 |
कोल्हापूर | 20 |
इतर जिल्हे | 100 |
याशिवाय निर्याताभिमुख गुलाब प्रकल्प देशात सर्वप्रथम महाराष्ट्रात सुरू झाले आहेत. आत्तापर्यंत महाराष्ट्रात असे वीस प्रकल्प कार्यान्वित असून त्यातून सरासरी एक कोटी रुपयांची लांब दांड्यांची गुलाब फुले म्हणजेच एकूण 25 कोटी रुपयांची फुले निर्यात होत आहेत आणि स्थानिक बाजारपेठांतही तेवढीच फुले विकली जात आहेत.
गुलाब लागवडीसाठी हवामान आणि जमीन : Climate For Rose Farming
पाच ते सहा तास स्वच्छ सूर्यप्रकाश असलेल्या ठिकाणी गुलाबाची चांगली वाढ होऊन चांगली फुले मिळतात. गुलाबाच्या झाडांची वाढ सावलीत नीट होत नाही म्हणून गुलाबाच्या लागवडीसाठी निवडलेल्या जागेच्या आजूबाजूस उंच इमारती किंवा झाडी असू नये. अतिवेगाने वारे वाहणाऱ्या ठिकाणी गुलाबाची लागवड करावयाची असल्यास लागवडीपूर्वी वाराप्रतिबंधक पट्टा (विंड ब्रेक) तयार करावा. यासाठी शेताच्या पश्चिम आणि दक्षिण दिशेकडून 3 ते 4 दाट ओळींत शेवरी किंवा सुरू यांसारखी उंच वाढणारी झाडे लावावीत. गुलाबाचे पीक उष्ण तसेच समशीतोष्ण हवामानात चांगले येत असले तरी उत्तम दर्जाची फुले मिळविण्यासाठी दिवसाचे सरासरी तापमान 25 ते 32 अंश सेल्सिअस आणि रात्रीचे सरासरी तापमान 15 ते 17 अंश सेल्सिअस इतके असावे; तर सापेक्ष आर्द्रता 60 ते 65% असावी. अशा प्रकारचे हवामान महाराष्ट्रात नोव्हेंबर ते मार्च या कालावधीत असते. पावसाळ्यात जरी असे हवामान असले तरी रोग आणि किडींचा उपद्रव जास्त प्रमाणात होतो. त्यामुळे दर्जेदार गुणवत्तेची फुले नोव्हेंबर ते मार्च या काळातच मिळतात. या काळात युरोपात अतिथंड हवामान असल्यामुळे गुलाबाच्या फुलांचे उत्पादन अजिबात होत नाही. मात्र या काळात युरोपात ख्रिसमस (नाताळ), नवीन वर्ष, इस्टर, इत्यादी महत्त्वाचे सण असतात. त्यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणात फुले आयात करावी लागतात. अशा वेळी आपल्याकडील हवामानाचा फायदा घेऊन आपण नोव्हेंबर ते मार्च या कालावधीत गुलाबाची फुले पैदास करून परदेशी पाठवून परकीय चलन मिळवू शकतो. मात्र त्यासाठी फुलांची गुणवत्ता आंतरराष्ट्रीय स्तराची असावी लागते. गुलाबाला हलकी ते मध्यम जमीन मानवते. हलक्या ते मध्यम जमिनीत पाण्याचा योग्य निचरा होतो. परंतु या जमिनी कसदार नसतात. म्हणून अशा जमिनींमध्ये हिरवळीची खते किंवा शेणखताचा भरपूर वापर करावा. भारी आणि दलदलीच्या जमिनीतून पाण्याचा निचरा नीट होत नाही आणि त्याचा झाडाच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो. झाडाची पाने पिवळी पडून पानांवर काळे ठिपकेही पडतात. शेवटी पाने गळून जातात, त्यामुळे फुलांचे उत्पादन कमी होते. चुनखडी असलेली जमीन गुलाबाच्या पिकास मानवत नाही. अशा जमिनीत झाडाची पाने पिवळी पडतात आणि उत्पादन खुंटते. साधारणपणे जांभ्या दगडापासून तयार झालेली आम्लयुक्त आणि 5.6 ते 6.8 इतका सामू असलेली जमीन गुलाबाच्या लागवडीसाठी उत्तम आहे. पाणथळ व चोपण जमिनी गुलाबाच्या लागवडीसाठी निवडू नयेत
गुलाब लागवडीसाठी उन्नत जाती : Best Verity Of Rose
जगात गुलाबाच्या 20,000 जाती उपलब्ध आहेत. प्रत्येक जातीचे ठळक वैशिष्ट्य आहे. त्यामुळे गुलाबाची व्यापारी लागवड करण्यासाठी योग्य जातींची निवड करण्यास भरपूर वाव आहे. गुलाबाच्या व्यापारी उत्पादनात योग्य जातींची निवड हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. गुलाबाच्या निरनिराळ्या जातींमध्ये फुलांचा आकार, प्रकार, रंग, सुवास, झाडाच्या वाढीची सवय, इत्यादी बाबतीत अतिशय भिन्नता आढळून येते. त्यानुसार गुलाबाच्या वेगवेगळया जातींची वेगवेगळ्या हेतूने लागवडीसाठी निवड केली जाते. बागेत लावण्यासाठी, फुलदाणी, गुच्छ सजावटीसाठी, प्रदर्शनात भाग घेण्यासाठी, परदेशी पाठविण्यासाठी गुलाबाच्या ठरावीक जातींची त्यांच्या गुणधर्मानुसार निवड केली जाते.
(अ) बागेत लावण्यासाठी :
या गटात प्रामुख्याने भरपूर प्रमाणात फुले येणाऱ्या फ्लोरिबंडा, मिनिएचर आणि काही हायब्रीड प्रकारातील जातींची निवड करावी. सर्वसाधारणपणे या जाती जोमदार वाढणाऱ्या, रोग व किडींना बळी न पडणाऱ्या आणि त्या भागातील हवामानात उत्तम वाढ होणाऱ्या असाव्यात. उदाहरणार्थ, ओलगोल्ड, चायनाटाऊन, युरोपियाना, टॉमटॉम, पास्ता, कोरोना, क्वीन एलिझाबेथ, रॉबिनसन, मॅनॉन, डॅनिश गोल्ड, इत्यादी.
(आ) फुलदाणी, गुच्छ सजावटीसाठी :
ज्या फुलांचा आकार, पाकळयांची ठेवण, रंग, सुवास व फुलांचा लांब दांडा आणि पानांना चांगला तजेलदारपणा आहे, अशा जाती कटफ्लॉवर म्हणून लावण्यास योग्य असतात. यामध्ये ग्लॅडिएटर, सोनिया, इलोना, गोल्डन टाइम्स, गारनेट, बक्कारा, रक्तगंधा, राजा सुरिंदर सिंग, सोनोरा, डबल डिलाईट, लँडोरा, इत्यादी जातींचा समावेश होतो.
(इ) प्रदर्शनासाठी :
प्रदर्शनासाठी अत्यंत मोठ्या आकाराची फुले, मोठा दांडा, भरपूर पाकळया आणि पाकळ्यांची उत्तम ठेवण असलेल्या जातींची लागवड करावी. गुलाबाच्या फुलांचा आकार, रंग, सुवास, पाकळयांची संख्या आणि ठेवण, दांड्याची लांबी, झाडांच्या वाढीची सवय यांनुसार गुलाबाच्या जातींचे निरनिराळे प्रकार पडतात.
गुलाबाच्या जातींचे प्रमुख प्रकार खालीलप्रमाणे आहेत : (1) हायब्रीड टी, (2) फ्लोरिबंडा, (3) पॉलिएन्था, (4) मिनिएचर, (5) वेलवर्गीय गुलाब, (6) सुवासिक गुलाब.
(1) हायब्रीड टी :
हायब्रीड टी या गुलाबाच्या प्रकाराची निर्मिती हायब्रीड परपेच्युअल आणि टी रोझेस या गटातील जातींच्या संकरातून झाली आहे. लांब दांड्याच्या फुलांसाठी या प्रकारच्या गुलाबाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. या प्रकारातील झाडे मध्यम ते जोमदार वाढतात. तसेच प्रत्येक फांदीवर 1-3 लांब दांड्यावर फुले येतात. फुले मोठी, दुहेरी, आकर्षक रंगाची आणि झुपकेदार आकाराची असतात. या प्रकारातील जातींमध्ये अमेरिकन हेरिटेज, अॅनविल स्पार्क्स, आरिना, ॲव्हॉन, बेलएंज, ब्ल्यू मून, ख्रिश्चन डायर, डॉ. होमी भाभा, , आयफेल टॉवर, फर्स्ट प्राइज, गार्डन पार्टी, गोल्डन जायंट, ग्रॅनडा, जॉन एफ. केनेडी, लँडोरा, ग्लॅडिएटर, मारिया कॅलास, पापा मिलांड, पुसा सोनिया, रेड डेव्हिड, रोझ गझार्ड, रॉयल हायनेस, स्नो गर्ल, समर सनशाईन, सुपर स्टार, व्हिर्गों, इत्यादी जातींचा समावेश होतो.
(2) फ्लोरिबंडा :
हायब्रीड टी आणि पॉलिएन्था या प्रकारातील जातींच्या संकरातून ‘फ्लोरिबंडा’ गुलाबाची निर्मिती झाली आहे. या प्रकारातील फुले लहानलहान झुपक्यांत येतात. प्रत्येक फूल हे मोठ्या आकाराचे असते. मात्र फुलांचा आकार हायब्रीड टी पेक्षा लहान असतो. झुपक्यात येणारी फुले आणि फुलांचा टिकाऊपणा यांमुळे फुलांच्या ताटव्यामध्ये लागवडीसाठी हा प्रकार उपयुक्त आहे. या प्रकारात बंजारन, ऑलगोल्ड, चंद्रमा, चार्लस्टन, डिअरेस्ट, डिव्होशन, मर्सडीज, पावडर पफ, दिल्ली प्रिन्सेस, हिमांगिनी, आइसबर्ग, मधुरा, नव सदाबहार, निलांबरी, प्रेमा, सीपल, समर स्नो, इत्यादी जातींचा समावेश होतो.
(3) पॉलिएन्था :
या प्रकारातील झाडे मध्यम उंचीची असून फुले एकेरी, लहान, पसरट आणि झुपक्याने येतात. कुंडीत, परसबागेत आणि कुंपणाला लावण्यासाठी या प्रकारातील जातींचा उपयोग केला जातो. या प्रकारात एको, पिंकशॉवर, प्रीती, रिशी बंकीम, व्हॅटरटॅग, इत्यादी जातींचा समावेश होतो.
(4) मिनिएचर :
लहान झाड, लहान आणि झुपक्याने येणारी फुले, लहान पाकळ्या, लहान आणि नाजूक देठ असलेला हा छोटा गुलाब असतो. या प्रकारातील झाडे लहान आणि काटक असून कमी जागेत अथवा कुंडीत लावण्यासाठी हा प्रकार उत्तम आहे. या प्रकारातील जातींमध्ये चंद्रिका, डार्क ब्युटी, ड्वार्फ किंग, मॅजिक मिस्ट, पिक्सी, रोझमरिन, इत्यादी जाती येतात.
(5) वेलवर्गीय गुलाब :
या प्रकारात वेलीसारखे आणि जोमदार वाढणारे गुलाब येतात. कुंपण, भिंती, कमानी आणि मांडव यांवर चढविण्यासाठी या प्रकारातील जातींचा उपयोग होतो. या प्रकारात कॅसिनो, कॉकटेल, फाउंटन, गोल्डन शॉवर्स, हैंडेल, पिनाटा, रॉयल गोल्ड, सिल्वर मून, इत्यादी जाती येतात.
(6) सुवासिक गुलाब :
या प्रकारात सुगंध देणाऱ्या गुलाबाच्या जातींचा समावेश होतो. प्रत्येक जातीच्या फुलांचे रंग आणि गंध वेगवेगळे असतात. अत्तर, सुगंधी तेल, गुलाब पाणी, इत्यादी तयार करण्यासाठी या प्रकारातील जातींची लागवड केली जाते. या प्रकारात अॅव्हान, ब्ल्यू मून, कॉन्फिडन्स, क्रिमझन ग्लोरी, फ्रेंग्रंट क्लाऊड, आयफेल टॉवर, किस ऑफ फायर, सुगंधा, डबल डिलाईट, अनल फेस, आम्रपाली, नूरजहाँ, मधुरा, रूपाली, पिंक पॅराकेट, इत्यादी जातींचा समावेश होतो.
अभिवृद्धी आणि लागवड पद्धती : Rose Plantation
गुलाबाची अभिवृद्धी बी, फाटे कलम, गुटी कलम आणि डोळा भरून करता येते. यांपैकी फाटे कलमाने गुलाबाच्या खुंटाची निपज केली जाते. गुटी कलमाने वेलवर्गीय गुलाबाची अभिवृद्धी केली जाते तर व्यापारी जातीची अभिवृद्धी करण्यासाठी डोळा भरून कलमे केली जातात.
(1) बिया :
गुलाबाला फुले येऊन गेल्यानंतर त्याला छोटी गोल फळे (हीप्स) लागतात. ही फळे पिकल्यानंतर आत लहान आकाराच्या बिया असतात. या बिया गादीवाफ्यावर पेरून गुलाबाची रोपे तयार करतात. परंतु या बियांची उगवण होण्यास बराच काळ लागतो. गुलाबाच्या बियांवर शीतक्रिया केल्यास त्यांची उगवण लवकर होते. त्यासाठी गुलाबाच्या बिया ओल्या रेतीत किंवा शेवाळामध्ये बांधून त्या शीतगृहात 4 ते 5 अंश सेल्सिअस तापमानाला एक ते दोन महिने ठेवून नंतर बाहेर काढून रेतीत अथवा थंड ठिकाणी ठेवल्यास उगवण लवकर होते. गुलाबाच्या फळातून बिया बाहेर काढल्यानंतर त्या सुकू देऊ नयेत. पेरणी होईपर्यंत बिया ओलसर राहण्यासाठी त्या ओल्या शेवाळात अथवा ओल्या रेतीत ठेवाव्यात. बिया लावून गुलाबाची अभिवृद्धी केल्यास तयार होणारी रोपे मातृवृक्षासारखीच निपजत नाहीत. म्हणून सर्वसाधारणपणे कलमी गुलाबाची अभिवृद्धी बिया पेरून न करता शाखीय पद्धतीने केली जाते. मात्र गुलाबाच्या संकरित जाती तयार करण्यासाठी गुलाबाची अभिवृद्धी बिया पेरूनच केली जाते.
(2) फाटे कलम :
गुलाबाच्या काही ठरावीक जातींची अभिवृद्धी फाटे कलमाने केली जाते. जंगली गुलाब, वेली गुलाब, मिनिएचर गुलाब यांची अभिवृद्धी फाटे कलमाने केली जाते. मात्र ही पद्धत प्रामुख्याने गुलाबाची खुंटरोपे वाढविण्यासाठी वापरली जाते. गुलाबाच्या पक्व फांदीपासून फाटे कलम तयार करतात. फाटे कलमे पावसाळयात केल्यास अधिक यशस्वी होतात. इतर काळात फाटे कलमे करावयाची असल्यास त्यांना मुळे येण्यासाठी संजीवकांचा वापर करावा लागतो. फाटे कलमासाठी 15-20 सेंटिमीटर लांबीची, पेन्सिलइतक्या जाडीची, 3-4 रसरशीत डोळे असलेली फांदी निवडावी. निवडलेली फांदी अतिजून अथवा अतिकोवळी असू नये. फांदी कापताना तीक्ष्ण कात्रीने तिरकस काप घ्यावा. कलमांना लवकर मुळे येण्यासाठी फांदीचे एक टोक सिरॅडिक्ससारख्या संजीवकात थोडा वेळ बुडवून नंतर पाण्यात बुडवावे. त्यानंतर या फांद्या जमिनीत अथवा पॉलिथीन पिशवीत लावाव्यात. काड्या 10-12 सेंटिमीटर खोलीवर लावाव्यात. काड्या जमिनीत लावताना त्या 15 सेंटिमीटर अंतरावर लावाव्यात आणि लगेच पाणी द्यावे. नंतर नियमितपणे रोपांना पाणी द्यावे. साधारणपणे 4 ते 6 महिन्यांत रोपे डोळे भरण्यासाठी चांगली तयार होतात.
(3) दाब कलम :
गुलाबाच्या वेलीसारख्या वाढणाऱ्या प्रकारातील जातींची अभिवृद्धी लांब आणि नरम फांद्यांवर दाब कलम करून केली जाते. लांब, नरम आणि मध्यम आकाराची जमिनीजवळची फांदी घेऊन तिच्यावरील 2-3 सेंटिमीटर लांबीची साल काढून ओलसर जमिनीत हा कापलेला भाग दाबतात. दाबलेली फांदी वर येऊ नये यासाठी त्या भागावर दगड अथवा वीट ठेवून फांदी दाबलेल्या स्थितीत ठेवावी. एक ते दीड महिन्यांनी कापलेल्या जागेवर मुळे तयार होतात. त्यानंतर मुळे आलेल्या जागेपासून 5 ते 6 सेंटिमीटर अंतरावर मागच्या बाजूला फांदी कापावी. मुळे आलेली फांदी जमिनीत तशीच राहू द्यावी. फांदीपासून रोप तयार होऊन त्याला पाने फुटतात. नंतर ते तयार रोप काढून पॉलिथीन पिशवीत अथवा दुसऱ्या जागी लावावे.
(4) गुटी कलम :
गुलाबाच्या फांद्यांवर गुटी कलम करणे सोपे असून अशा प्रकारच्या कलमांना लवकर मुळे फुटतात. परंतु काही ठरावीक जातींमध्ये अभिवृद्धीसाठी ही पद्धत वापरली जाते. गुटी कलम करण्यासाठी 15 सेंटिमीटर लांबीच्या पक्व काडीवरील पाने, काटे आणि नवीन पानांच्या फुटी काढून टाकून तेथे 3 ते 4 सेंटिमीटर रुंदीची गोलाकार साल काढून टाकावी. साल काढलेल्या भागावर ओले शेवाळ गुंडाळून त्यावर पॉलिथीन कागद सुतळीने घट्ट बांधावा. त्यानंतर दीड महिन्यांनी साल काढलेल्या जागी मुळे येतात. नंतर कलम मातृवृक्षापासून वेगळे करून स्वतंत्र जागी लावावे.
(5) डोळे भरणे :
ही गुलाबाची अभिवृद्धी करण्यासाठी वापरली जाणारी सर्वांत महत्त्वाची व्यापारी पद्धत आहे. सर्वसाधारणपणे इंग्रजी टी पद्धतीने गुलाबावर डोळे भरले जातात. गुलाबावर डोळे भरताना जमिनीत वाढलेल्या झाडाच्या फांद्यांवर डोळे भरून इनसिटू बडिंग करतात अथवा पॉलिथीन पिशवीत अथवा वाफ्यात स्वतंत्र खुंटरोप तयार करून त्यावर डोळे भरतात. खुंटरोप (रूट स्टॉक) तयार करणे : खुंटरोपासाठी योग्य जात निवडावी. रोझा इंडिका- ओडोरॉटा, रोझा मल्टिफ्लोरा, एडवर्ड, थॉर्नलेस (दिल्ली), थॉर्नलेस (बंगलोर) या 5 जातींपैकी रोझा इंडिका-ओडोरॉटा ही जात खुंट म्हणून चांगली आहे. ज्या जमिनीचा सामू 7.5 पेक्षा कमी आहे अशा ठिकाणी रोझा मल्टिफ्लोरा खुंट वापरावेत. रोझा इंडिका-ओडोरॉटा या जातीला ‘पुना ब्रायर’ अथवा ‘ब्रायर’ असेही म्हणतात. खुंटरोप तयार करण्यासाठी खात्रीच्या ठिकाणाहून योग्य जातीची फाटे कलमे मिळवावीत. लागवडीपूर्वी फाटे कलमाचा खालील भाग 0.5 % बोर्डो नियंत्रणाच्या किंवा 0.2% ब्लायटॉक्सच्या द्रावणात अर्धा तास बुडवावा. खुंटरोपाच्या लागवडीपूर्वी चर खोदून ते खतमातीने भरून घ्यावेत. चरामध्ये 50 सेंटिमीटर अंतरावर फाटे कलमाची लागवड करून त्यांना नियमित खत-पाणी द्यावे. या रोपांपासून तयार झालेल्या झाडांना मातृवृक्ष असे म्हणतात. मातृवृक्षापासून जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात अथवा जून महिन्यात किंवा सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांत छाटणी करून फाटे कलमे तयार करावीत. ही फाटे कलमे पॉलिथीन पिशवीत वाढवून
खुंटरोपे तयार करावीत. कमी वेळात, कमी खर्चात अधिक यशस्वी कलमे तयार करण्यासाठी ‘पॉलिबॅग’ पद्धत वापरतात. या पद्धतीत पॉलिथीन पिशव्यांत खुंट लावून त्यास मुळे फुटल्यावर मूळ काडीवरच डोळा भरतात. कलम यशस्वी झाल्यानंतर मोठ्या पिशवीत कलम बदलून घ्यावे. कलमाची विक्री अथवा वापर होईपर्यंत कलम याच पिशवीत वाढवावे. खुंट निवडलेल्या फांद्या या रोग अथवा कीडमुक्त आणि रसरशीत असाव्यात. या फांद्यांची फाटे कलमे करून खतमातीने भरलेल्या पिशव्यांत लागवड करावी. पिशवीत चांगले कुजलेले शेणखत 1 भाग, पोयट्याची चाळून घेतलेली माती 1 भाग, भाताचे तूस 1 भाग यांचे मिश्रण भरावे. जरुरीप्रमाणे त्यात फॉलीडॉल डस्ट आणि ब्लायटॉक्स भुकटी एकूण मिश्रणाच्या 1 टक्का मिसळावी. पाण्याचा निचरा होण्यासाठी पिशवीला भोक पाडावे. पिशवीत अथवा जमिनीत फाटे कलमांची लागवड केल्यानंतर दीड ते दोन महिन्यांनी रोपे डोळे भरण्यायोग्य होतात.
गुलाबाच्या खुंटरोपावर डोळे भरणे :
योग्य जातीची कलम केलेली झाडे निवडून त्या झाडांवरील फुगीर डोळे असणाऱ्या फांद्या निवडा. 4 ते 6 डोळे असलेल्या कलम फांद्या कापून ओल्या फडक्यात अथवा शेवाळात गुंडाळून ठेवा. खुंटरोपावर ज्या ठिकाणी डोळा भरावयाचा आहे त्या जागी इंग्रजी ‘टी’ आकाराचा काप घेऊन साल मोकळी करावी. कलम फांदीवरील डोळा काळजीपूर्वक काढून तो खुंटरोपावरील खाचेत बसवावा आणि पॉलिथीन पट्टीने घट्ट बांधावा. डोळयाचे टोक बांधलेल्या जागी नेहमी वर असावे. या डोळयांमधून 8-10 दिवसांत फूट येण्यास सुरुवात होते. ऑक्टोबरपासून मार्च महिन्यापर्यंत गुलाबावर डोळे भरता येतात. मात्र जास्त पावसात अथवा जास्त उन्हात डोळे भरू नयेत. अतिपावसामुळे डोळे भरलेल्या जागी पाणी जाऊन डोळे सडण्याची शक्यता असते तर अतिउन्हात हवेत आर्द्रता कमी असल्यामुळे डोळे वाळून जाण्याची शक्यता असते. गुलाबाची लागवड करण्यापूर्वी उन्हाळयात जमिनीची खोल नांगरट करावी. हरळी किंवा लव्हाळा या तणांचा नायनाट करून जमीन तयार करावी. मोठ्या प्रमाणात लागवड करावयाची असल्यास चर खोदावेत तर मध्यम प्रमाणात लागवड करण्यासाठी खड्डे खोदावेत. गुलाबाची लागवड दोन पद्धतीने करता येते. पहिली पद्धत म्हणजे शेतात खुंटरोप वाढवून त्यावर डोळे भरणे आणि दुसरी पद्धत म्हणजे तयार कलमे चरात लावणे, यांपैकी सोयीस्कर पद्धत निवडावी. उत्पादन लवकर सुरू होण्यासाठी तयार कलमांची लागवड करावी. कलमांची लागवड करण्यासाठी ठरावीक अंतरावर 1.5 फूट लांब, 1.5 फूट रुंद आणि 1.5 फूट खोल या आकाराचे खड्डे खणावेत अथवा योग्य आकाराचे चर घ्यावेत. खड्डे अथवा चर शेणखत आणि माती यांच्या मिश्रणाने (1:1) भरून घ्यावेत.
कलमांची लागवड जून महिन्यात करावी. लागवडीला उशीर झाल्यास पावसाचा जोर कमी झाल्यावर सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांत लागवड करावी. कलम जमिनीत लावताना पिशवी फाडून कलम मोकळे करावे. खराब मुळे, खराब पाने, खुंटरोपावरील फुटवा काढून टाकावा. कलमाची हुंडी खड्यात अथवा चरात बसवून बाजूने माती दाबून बसवावी. नंतर थोडे पाणी द्यावे.
गुलाब लागवड हंगाम आणि लागवडीचे अंतर : Best Time For Rose Plantation
गुलाबाची लागवड पावसाळी हंगामात केल्यास झाडाची लागण चांगली होते. पावसाळयात हवेत आर्द्रता जास्त असते. झाडातील बाष्पीभवन क्रिया कमी वेगाने होते. गुलाबाच्या रोपाची लागवड शक्यतो संध्याकाळी 4 वाजेनंतर करावी, म्हणजे रात्रीच्या थंड हवेमुळे रोपे चांगली लागतात. गुलाबाच्या झाडाला अती थंडी अथवा अती उन्हाळा सहन होत नाही. म्हणून गुलाबाची लागवड पावसाळयाच्या सुरुवातीला जून महिन्यात करावी. लागवडीला उशीर झाल्यास पावसाचा जोर कमी झाल्यावर सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांत लागवड करावी. अती थंडीत लागवड करणे टाळावे. गुलाबासाठी लागवडीचे अंतर ठरविताना जमिनीचा प्रकार, गुलाबाची जात, मजुरांची उपलब्धता, खते पाणी देण्याची पद्धत, इत्यादी गोष्टी लक्षात घ्याव्यात. सर्वसामान्यपणे गुलाबाच्या लागवडीसाठी जमिनीच्या मगदुराप्रमाणे आणि गुलाबाच्या जातीनुसार – 20 x 30 सेंटिमीटर किंवा 30 x 30 सेंटिमीटर किंवा 40 x 30 सेंटिमीटर किंवा 50 x 30 सेंटिमीटर किंवा 60 x 30 सेंटिमीटर किंवा 75 x 30 सेंटिमीटर किंवा 75X75 सेंटिमीटर अथवा 125 x 75 सेंटिमीटर किंवा 150 X 75 सेंटिमीटर अशा विविध अंतरांचा उपयोग करावा. हरितगृहात गुलाबाची लागवड करावयाची झाल्यास गादीवाफ्यांवर (30 सेंमी. उंचीच्या) दुहेरी ओळ पद्धतीने लागवड करावी. त्यासाठी दोन ओळींत 50 सेंमी. व दोन झाडांत 15 सेंमी. अंतर ठेवावे. दोन दुहेरी ओळींच्या वाफ्यात 60 सेंमी. अंतर चालण्यासाठी अथवा आंतरमशागतीसाठी ठेवावे. या पद्धतीने लागवड केल्यास हेक्टरी 60 ते 70 हजार कलमांची लागवड करता येते.
गुलाब वळण आणि छाटणीच्या पद्धती : Rose Plant Pruning types
गुलाब हे बहुवार्षिक पीक असल्यामुळे गुलाबाला सुरुवातीला योग्य वळण देणे अत्यंत आवश्यक आहे. वळण पहिल्या सहा महिन्यांत द्यावे. गुलाबाच्या झाडाला योग्य वळण देण्यासाठी त्याची छाटणी करून झाडाची वाढ नियंत्रित ठेवावी. झाडावर जास्त फुले मिळविण्यासाठी गुलाबाची छाटणी महत्त्वाची आहे. छाटणीमुळे रोगट फांद्याही काढल्या जातात. गुलाबाच्या झाडाची छाटणी प्रामुख्याने पुढील कारणांसाठी केली जाते :
(1) किडक्या, रोगट, मोडक्या, वाळलेल्या, कमकुवत आणि अनुत्पादित फांद्या काढून टाकणे. अनेकदा जिथे झाडाला इजा झालेली आहे किंवा डायबॅकसारखा रोग अथवा खवलेकीड यांची लागण जास्त झालेली आहे, अशा फांद्या काढून टाकून रोगांचा अथवा किडीचा प्रसार थांबविण्यासाठी झाडांची छाटणी करणे आवश्यक असते.
(2) झाडाला योग्य आकार देणे, उंच अथवा बाहेरच्या बाजूला वाढलेल्या फांद्या काढून टाकणे, संपूर्ण झाडामध्ये हवा खेळती राहण्यासाठी आणि सर्व पानांवर सूर्यप्रकाश येण्यासाठी दाट वाढलेल्या फांद्या काढून टाकणे.
(3) गुलाबाचे झाड बहुवर्षायु असून त्यापासून चार ते पाच वर्षे उत्पादन मिळते. गुलाबाच्या झाडाची वाढ भरपूर प्रमाणात होते आणि झाडाला अनेक फांद्या फुटत राहतात. गुलाबाचे झाड तसेच वाढू दिल्यास अतिशय कमी फुले लागतात. अशा वेळी झाडाची वाढ नियंत्रित करून झाडाला जास्तीत जास्त चांगल्या दर्जाची फुले येण्यासाठी झाडाची छाटणी करणे आवश्यक असते. महाराष्ट्रासारख्या समशीतोष्ण हवामान असणाऱ्या भागात गुलाबाची दोन वेळा छाटणी केली जाते.
(अ) उन्हाळी छाटणी अथवा खरड छाटणी : ही छाटणी उन्हाळा संपताना करतात. साधारणपणे मे महिन्याच्या मध्यास ही छाटणी केली जाते. मात्र छाटणी लवकर केल्यास कोवळया कोंबांना कडक उन्हामुळे इजा होते. या छाटणीपासून फुलांचा हंगाम ऑगस्ट महिन्यापर्यंत चालतो. या हंगामातील पिकांवर पावसामुळे रोग आणि किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो, तणांचा प्रादुर्भावही मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे फुलांचा दर्जा चांगला ठेवता येत नाही.
(आ) हिवाळी छाटणी : फुलांचा पहिला बहर कमी झाल्यावर पावसाळा संपताना पुन्हा छाटणी केली जाते. हिवाळयात फुलांच्या वाढीसाठी हवामान अनुकूल असते, रोग व किडींचा तसेच तणांचा उपद्रव कमी होतो. ही छाटणी ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला केली जाते. या फुलांचा हंगाम जानेवारीपर्यंत चांगला राहतो आणि पुढे तो कमी होत जातो. या दोन छाटण्यांव्यतिरिक्त तिसरी छाटणी फेब्रुवारी महिन्यात करून उन्हाळयात फुलांचा हंगाम घेता येतो. उन्हाळी हंगामात कडक ऊन, कोरडी हवा आणि पाणीटंचाई असल्यास फुले लहान आणि कमी प्रमाणात निघतात. मात्र या हंगामात फुलांना जास्त मागणी असल्यामुळे जास्त भाव मिळतो. गुलाबाच्या झाडाची छाटणी तीन प्रकारे केली जाते :
(1) हलकी छाटणी (लाईट प्रूनिंग) : या प्रकारात झाडाच्या वाढलेल्या फांद्या सुमारे निम्म्या उंचीवर छाटल्या जातात. या छाटणीमध्ये झाडावर फांद्यांची संख्या जास्त असते, त्यामुळे फुलांची संख्याही जास्त असते. मात्र फुले आखूड दांड्याची आणि लहान निपजतात.
(2) जोरकस छाटणी (हेवी प्रूनिंग) : या प्रकारात झाडाच्या खोडाजवळ फांद्यांवर 3- 4 डोळे राखून छाटणी करतात. मोठ्या दांड्यावर मोठी फुले आणण्यासाठी ही छाटणी केली जाते. मात्र फुलांची संख्या कमी मिळते.
(3) मध्यम छाटणी (मिडियम प्रूनिंग) : या प्रकारात फार खरडून अथवा अती उंचीवर छाटणी न करता मध्यम छाटणी केली जाते. काही फांद्या मध्यम उंचीवर छाटून तर काही फांद्या खरडून ही छाटणी केली जाते. काही फांद्या तळापासून छाटून विरळणी केली जाते. गुलाबाच्या झाडाची छाटणी करताना झाड कोणत्या गटातील आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे. निरनिराळ्या गटांतील झाडांच्या वाढीची पद्धत भिन्न असते.
(अ) गुलाबाच्या हायब्रीड टी झाडांची छाटणी : वाळलेल्या, रोगट, कीडग्रस्त आणि वेड्यावाकड्या वाढणाऱ्या फांद्या मुळापासून छाटून टाकाव्यात. जमिनीपासून येणाऱ्या 4 ते 5 फांद्या ठेवून बाकीच्या फांद्या मुळापासून छाटून टाकाव्यात. जोमदार वाढणाऱ्या जातींची हलकी छाटणी करावी. सुपरस्टार आणि हॅपीनेस या जातींमध्ये निर्यातयोग्य फुलांचे उत्पादन घेण्यासाठी कलमाच्या जोडाच्या वर 10 सेंटिमीटर अंतरावर छाटणी करावी. पिकाची जोरकस छाटणी केल्यास फुलांची संख्या कमी होते; परंतु फुलांचा आकार आणि फुलांची लांबी वाढते.
(आ) फ्लोरिबंडा झाडांची छाटणी : या गटातील गुलाबाच्या झाडांची छाटणी भरपूर फुले मिळविण्यासाठी केली जाते. झाडाची छाटणी करताना जुन्या झालेल्या, रोग आणि कीडग्रस्त फांद्या छाटून टाकाव्यात. नवीन फांद्यांची छाटणी त्यांच्या एकूण लांबीच्या अर्ध्या लांबीवर अथवा त्यांच्या एकतृतीयांश लांबीवर करावी. झाडाला भरपूर फुले येण्यासाठी संपूर्ण झाडाची हलकी अथवा मध्यम छाटणी करावी.
(इ) पॉलिएन्था झाडांची छाटणी या गटातील गुलाबाच्या झाडांची छाटणी प्रामुख्याने मोठ्या आकाराची फुले मिळविण्यासाठी आणि झाडाला योग्य आकार देण्यासाठी केली जाते. पहिल्या वर्षी या गटातील झाडांची जोरकस छाटणी करावी; परंतु त्यानंतर अतिशय हलकी छाटणी करावी. रोगट, वाळलेल्या आणि वेड्यावाकड्या वाढणाऱ्या फांद्या छाटून टाकाव्यात. फुले येऊन गेलेल्या फांद्यांच्या टोकाला अत्यंत हलकी छाटणी करावी.
(ई) मिनिएचर झाडांची छाटणी : सर्वसाधारणपणे या गटातील झाडांची छाटणी केली जात नाही. रोगट, वाळलेल्या आणि वेड्यावाकड्या वाढणाऱ्या फांद्यांची छाटणी करावी. काही वेळा काही जातीच्या झाडांना जोमदार आणि उंच वाढणाऱ्या फांद्या येतात. झाडाचा आकार झुडपासारखा राखण्यासाठी अशा फांद्यांची संपूर्ण छाटणी करावी.
(3) वेलवर्गीय गुलाबाच्या झाडांची छाटणी : या गटातील झाडांना छाटणीची आवश्यकता नसते. या झाडांना फुले येण्यासाठी बाजूने वाढणाऱ्या फांद्यांची वाढ होणे आवश्यक असते. चांगल्या दर्जाची फुले येण्यासाठी फांद्याच्या टोकाची अत्यंत हलकी छाटणी करावी. झाडाला अनेक फांद्या फुटण्यासाठी तीन ते चार वर्षांनी झाडाची जमिनीपासून येणाऱ्या एक ते दोन मुख्य फांद्यांची संपूर्ण छाटणी करावी. गुलाबाच्या झाडावर तीन प्रकारचे कोंब अथवा डोळे असतात. फांदीच्या वाढणाऱ्या टोकावर असलेल्या डोळयास अग्रस्थ डोळा (टर्मिनल बड) असे म्हणतात. हा डोळा जोमदार फांदीवर असल्यास त्याचे फुलात रूपांतर होते. जर फांदी कमकुवत असेल तर बऱ्याच वेळा या डोळयाचे रूपांतर न वाढणाऱ्या पानांच्या झुपक्यात होते. अशा वेळी या डोळयाला वांझ किंवा अंधळा डोळा असे म्हणतात. या कोंबाची वाढ ही त्याच्या टोकाला असणाऱ्या पानात तयार होणाऱ्या एक प्रकारच्या रासायनिक द्रव्यामुळे होते. त्याला ऑक्झिन असे म्हणतात. ज्या वेळी ही टोकाची पाने कापली जातात त्या वेळी पानात तयार झालेले ऑक्झिन फांदीवर राहिलेल्या टोकाच्या डोळयामध्ये कार्यरत होते.. खालच्या पानाच्या बेचक्यात असणाऱ्या डोळयांना बाजूचे डोळे (लॅटरल बड) असे म्हणतात. याशिवाय झाडाच्या खोडावर अथवा जुन्या फांद्यांवर निद्रिस्त डोळे (डॉर्मंट लॅटरल बड) असतात. हे डोळे झाडाची त्या ठिकाणी छाटणी केल्यावर किंवा ज्या वेळी हवामान अनुकूल असेल त्या वेळी जागृत होतात.
गुलाबाच्या झाडाची छाटणी करताना पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्यात :
(1) सर्वप्रथम छाटणीची वेळ आणि प्रकार निश्चित करावा.
(2) निर्जीव झालेल्या सर्वच फांद्यांची छाटणी करावी.
(3) कीड आणि रोगाने ग्रासलेल्या फांद्या छाटून नष्ट कराव्यात.
(4) कोवळ्या फांद्या तसेच दाटी करणाऱ्या फांद्यांची छाटणी करावी.
(5) झाडाच्या खुंटरोपापासून आलेल्या सर्व फांद्यांची तळापासून छाटणी करावी.
(6) चांगल्या डोळयावर सुमारे 5 सेंटिमीटर अंतर ठेवून धारदार सिकेटरने 45 अंशांचा कोन करून फक्त एकाच कापात छाटणी करावी.
(7) छाटणी केल्यानंतर कापलेल्या भागावर बोर्डो पेस्टचा थर लावावा.
गुलाब शेतीसाठी खते आणि गुलाब शेतीसाठी पाणी व्यवस्थापन : Fertilizers for Rose Farming and Water Management for Rose Farming:
चांगल्या प्रतीची भरपूर फुले मिळविण्यासाठी गुलाबाला खते देणे महत्त्वाचे ठरते. गुलाबाचे पीक मोठ्या प्रमाणावर जमिनीतील अन्नद्रव्यांचा वापर करते. त्यामुळे जमिनीचा कस कमी होत जातो. म्हणून उत्तम दर्जाची फुले घेण्यासाठी आणि जमिनीचा पोत चांगला राखण्यासाठी वरखते देणे आवश्यक आहे. निरनिराळ्या पेंडी (ऑईल केक) किंवा ‘बोनमील’ या खतामधून मिळणाऱ्या अन्नद्रव्यांना गुलाबाचे झाड उत्तम प्रतिसाद देते. झाडांच्या सभोवती, बांगडी पद्धतीने किंवा पट्टा पद्धतीने गुलाबाच्या झाडांना खालीलप्रमाणे खते एकत्रित करून प्रत्येक झाडास 100 ग्रॅम मिश्रण वर्षातून दोन ते तीन वेळा द्यावे.
भुईमूग पेंड | ५ किलो |
बोनमील | ५ किलो |
अमोनियम फॉस्फेट | 1 किलो |
सिंगल सुपर फॉस्फेट | 2 किलो |
पोटॅशियम सल्फेट | 1 किलो |
एकूण मिश्रण | 14 किलो |
वरील खते बागेत कमी झाडे असल्यास द्यावी. ग्लॅडिएटर जातीच्या गुलाबाला दर हेक्टरी 100 टन शेणखत, 600 किलो नत्र, 100 किलो स्फुरद आणि 200 किलो पालाश दिल्यास फुलांच्या उत्पादनात लक्षणीय वाढ होते. या खतांपैकी निम्मा हप्ता जून महिन्यात छाटणीनंतर आणि निम्मा हप्ता डिसेंबर महिन्यात द्यावा. नत्राच्या मात्रा पुन्हा 2 ते 3 समान हप्त्यांत विभागून द्याव्यात. महाराष्ट्रातील हवामानात आणि जमिनीत झाडाला इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये जमिनीतूनच उपलब्ध होतात. म्हणून ही सूक्ष्म अन्नद्रव्ये स्वतंत्रपणे देण्याची आवश्यकता नसते. परंतु दिवसेंदिवस असे दिसून आले आहे की, गुलाबाला लोह, ताम्र, जस्त, बोरॉन, मॉलिब्डेनम यांसारख्या सूक्ष्म द्रव्यांचे फवारे दिल्यास उत्पादन आणि गुणवत्ता चांगली मिळते. त्यासाठी वरील अन्नद्रव्यांच्या मिश्रणाचे अर्धा टक्का तीव्रतेचे द्रावण महिन्यातून एक वेळा फवारावे. जमिनीच्या मगदुराप्रमाणे आणि हवामानाचा अंदाज बघून पावसाळयात पावसाने बराच काळ ताण दिल्यास वरून पाणी द्यावे. आवश्यकतेप्रमाणे 2 ते 3 पाण्याच्या पाळया द्याव्यात. हिवाळी हंगामात हलक्या जमिनीत आठवड्याच्या अंतराने तर मध्यम जमिनीत 10 दिवसांनी पाणी द्यावे. उन्हाळयात हेच प्रमाण अनुक्रमे 4 दिवसांनी आणि 6 दिवसांनी ठेवावे. पाणी देण्यासाठी वाफे भक्कम बांधून घ्यावेत. दांडात अथवा वाफ्यात फार तण वाढू देऊ नये. शक्यतो पाण्याचा मुख्य खोडाशी संपर्क येऊ देऊ नये. पाण्याचा मुख्य खोडाशी संपर्क आल्यास खोडाच्या जोडाजवळ रोग होण्याची शक्यता असते. जेथे पाण्याचे प्रमाण कमी आहे तेथे उसाचे पाचट, गव्हाचा कोंडा, भाताचे काड किंवा वाळलेला पालापाचोळा आच्छादन म्हणून वापरावे. त्यामुळे दर तीन पाण्याच्या नेहमीच्या पाळ्यांपैकी 1 पाण्याची पाळी वाचते. शिवाय जमीन उन्हाळयात थंड तर हिवाळयात उबदार राहते. तणे कमी होतात व जमिनीतून अन्न घेण्याची झाडाची कार्यशक्ती वाढते. याशिवाय जमिनीत सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढते. ठिबक सिंचन (ड्रिप) पद्धतीने पाणी देण्याची सोय गुलाबाला चांगलीच आहे. यासाठी प्रत्येक झाडास हंगामानुसार दररोज 3 ते 5 लीटर पाणी मिळणे आवश्यक आहे. छाटणीनंतर फुले येण्याच्या कालावधीत कधीही पाण्याचा खंड पडता कामा नये. अन्यथा झाडाच्या वाढीवर आणि फुलांच्या प्रतीवर त्याचा अनिष्ट परिणाम होतो.
आंतरपिके :
गुलाबाची लागवड जास्त अंतरावर केली असल्यास झाडाच्या दोन ओळींत बरीच जागा शिल्लक राहते. या जागेचा योग्य वापर करण्यासाठी शेजारच्या दोन दुहेरी ओळींतील मोकळया जागेत एक किंवा दोन ओळींत मेथी, कोथिंबीर, शेपू यांसारख्या बुटक्या, न पसरणाऱ्या पालेभाज्या घेता येतात. अंतर जास्त असल्यास कोबी, मुळा यांसारख्या भाज्याही आंतरपीक म्हणून घेता येतात. तसेच या पिकात बुटका झेंडू, अॅस्टर, जरबेरा, जिप्सोफिला, अँटिहिनम अशी कमी पसरणारी फुलझाडे आंतरपीक म्हणून घेता येतात. गुलाबाच्या झाडांच्या दोन्ही बाजूला जरबेराचे एक-एक झाड आंतरपीक म्हणून लावल्यास जरबेराच्या पिकापासून प्रत्येक झाडास 20 फुले आठ महिन्यांत मिळतात. आंतरपिकांमुळे मिळणारे उत्पन्न मुख्य पिकाच्या लागवडीसाठी लागणारा मशागतीचा खर्च भरून काढते. शिवाय मुख्य झाडांना वापरलेली खते, पाणी यांचा उपयोग जास्तीत जास्त प्रमाणात करून घेता येतो.
गुलाब शेतीतील महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण : Rose Farming insect damage and Solution
महाराष्ट्रात फुलशेतीमधील गुलाब या महत्त्वाच्या व्यापारी पिकाची लागवड झपाट्याने वाढत आहे. शेतकऱ्यांना गुलाबाच्या पिकापासून चांगले उत्पन्न मिळत असल्यामुळे गुलाबाच्या लागवडीखालील क्षेत्र वाढत आहे. या पिकाच्या लागवडीच्या तंत्राइतकीच महत्त्वाची बाब म्हणजे या झाडावर वेळोवेळी होणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव होय. बऱ्याच वेळा विशिष्ट पोषक हवामानामुळे काही किडींचा प्रादुर्भाव इतका मोठ्या प्रमाणावर होतो की, पीक हातचे जाते. असे होऊ नये म्हणून योग्य ती खबरदारी आधीच घ्यावी..
(1) खवलेकीड (स्केल्स) :
ही अतिशय सूक्ष्म कीड असून ती स्वतःभोवती मेणासारख्या चिकट पदार्थाचे कवच तयार करून त्यामध्ये राहते. ही कीड फांद्यांच्या सालीवर किंवा पानांवर सतत एकाच ठिकाणी राहून अन्नरस शोषण करते. या किडीने स्वतःभोवती तयार केलेल्या मेणासारख्या कवचामुळे फांद्यांच्या सालीवर किंवा पानांवर खवल्यांच्या आकाराचे छोटे, भुरकट, तांबूस रंगाचे असंख्य मेणचट डाग पडल्यासारखे दिसतात. त्यात मध्यभागी खवले कीटक राहत असल्यामुळे डागाचा मधला भाग फुगीर दिसतो. खवलेकिडीचा प्रादुर्भाव झालेल्या झाडाच्या फांद्या आणि पाने सुकून जातात.
उपाय: खवले किडीच्या नियंत्रणासाठी 10 लीटर पाण्यात 25 मिलिलीटर डायमेथोएट (रोगोर 30% प्रवाही) अथवा 10 मिलिलीटर फॉस्फोमिडॉन ( 85 % प्रवाही) या प्रमाणात मिसळून 15 दिवसांच्या अंतराने पिकावर फवारावे.
(2) फुलकिडे (थ्रिप्स) :
हे भुरकट काळसर रंगाचे किडे पानांच्या मागील बाजूस तसेच झाडाच्या कोवळया भागावर राहतात. हे किडे पाने आणि फुलांच्या पाकळया खरडतात आणि त्यातून पाझरणारा अन्नरस शोषून घेतात. रस शोषलेला भाग प्रथम पांढरट आणि नंतर तपकिरी रंगाचा होतो. फुलकिड्यामुळे गुलाबाच्या झाडाची पाने आणि फुले आकसतात व वेडीवाकडी होतात.
उपाय : या किडीच्या नियंत्रणासाठी 10 लीटर पाण्यात 10 मिलिलीटर फेनिट्रोथिऑन (50% प्रवाही) किंवा 20 मिलिलीटर क्विनॉलफॉस (95% प्रवाही) या प्रमाणात मिसळून पिकावर फवारावे.
(3) तुडतुडे (जसिड्स) :
हे भुरकट हिरव्या रंगाचे कीटक पाने आणि फांद्यांच्या कोवळया भागातील रस शोषून घेतात. त्यामुळे पानांची कडा प्रथम फिकट हिरवी होऊन नंतर पिवळट हिरवी आणि शेवटी लाल होते. पाने चुरगळतात. उपाय : या किडीच्या नियंत्रणासाठी 10 लीटर पाण्यात 10 मिलिलीटर डायमेथोएट (30% प्रवाही) किंवा 3 मिलिलीटर फॉस्फोमिडॉन ( 85% प्रवाही) या प्रमाणात मिसळून पिकावर फवारावे.
(4) मावा (अफिड्स् ) :
या किडीची पिवळसर हिरवट रंगाची पिल्ले तसेच काळसर तपकिरी रंगाचे प्रौढ किडे कोवळे शेंडे, कळया आणि पानांच्या मागील बाजूस पुंजक्याने राहून अन्नरस शोषण करतात. त्यामुळे पाने, शेंडे आणि कळया निस्तेज होऊन त्यांची वाढ खुंटते. पाने पिवळी पडून वाळतात.
उपाय : या किडीच्या नियंत्रणासाठी 10 लीटर पाण्यात 20 मिलिलीटर मॅलॅथिऑन (50% प्रवाही) किंवा 40 मिलिलीटर मेथिल डिमेटॉन (मेटॅसिस्टॉक्स 25% प्रवाही) किंवा 33 मिलिलीटर डायमेथोएट ( रोगार 30%) या प्रमाणात मिसळून पिकावर फवारावे.
(5) उडद्या भुंगेरे (चाफर बीटल) :
हे लालसर, काळपट तपकिरी रंगाचे भुंगेरे दिवसा झाडाच्या बुंध्याजवळील मातीत लपून बसतात आणि रात्री झाडावर येऊन पाने कुरतडतात. त्यामुळे पानावर वेडीवाकडी छिद्रे दिसतात. या भुंगेऱ्यांच्या अळया मातीत राहून झाडाची मुळे खातात.
उपाय : या किडीच्या नियंत्रणासाठी जमिनीत दर हेक्टरी 50 किलो अल्ड्रीन भुकटी (5% किंवा 50 किलो हेप्टाक्लोर 5%) भुकटी मिसळून द्यावी.
(6) फांदी पोखरणारी माशी (डिगर वॉस्प) :
ह्या माश्या छाटणीनंतर कापलेल्या टोकावर छिद्र पाडून त्यात राहतात. या छिद्रामध्ये बुरशीची लागण होऊन काळी फांदीमर या बुरशीजन्य रोगाचा प्रसार होतो.
उपाय : या किडीच्या नियंत्रणासाठी किडीने केलेल्या छिद्रांमध्ये रोगोर किंवा डिमेक्रॉनचे काही थेंब टाकून छिद्रे कापसाच्या बोळयाने बंद करावी. या किडीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून छाटणी केल्यानंतर कापलेल्या भागावर पुढील औषधी मिश्रण ब्रशच्या साहाय्याने लावावे. चहाचा एक सपाट चमचा कार्बारिल (50%), चहाचा एक सपाट चमचा डायथेन एम-45 (75%), चहाचे 3-4 चमचे पाणी.
(7) पिठ्या ढेकूण (मिलिबग्ज) :
ह्या किडीची पिल्ले आणि प्रौढ कीड फांद्यांच्या खोबणीत, पानांच्या देठांच्या खोबणीत तसेच खोडावर पांढऱ्या पुंजक्याच्या स्वरूपात राहून झाडातील अन्नरस शोषून घेतात. त्यामुळे गुलाबाच्या कळ्या उमलत नाहीत; तर उमललेल्या फुलांच्या पाकळया सुकून गळून पडतात.
उपाय : या किडीच्या नियंत्रणासाठी 10 लीटर पाण्यात 30 मिलिलीटर मॅलॅथिऑन (50% प्रवाही) या प्रमाणात मिसळून पिकावर फवारावे.
(8) वाळवी (टरमाईट) :
ही एक अतिशय उपद्रवी कीड आहे. गुलाबाचे झाड लावल्यानंतर ते पूर्णपणे रुजण्यापूर्वीच झाडाला वाळवी लागते. वाळवीचे कीटक जमिनीत वारूळ करून राहतात. हे कीटक झाडाच्या मुळया कुरतडतात. त्यामुळे झाडे मरू लागतात. अशी झाडे उपटल्यास मुळांजवळ मातीत पांढऱ्या रंगाचे लहान किडे दिसतात.
उपाय : एकदा या किडीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर तिचे नियंत्रण करणे अतिशय कठीण जाते. म्हणून किडीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. यासाठी गुलाबाची रोपे जमिनीत लावण्यापूर्वी प्रत्येक खड्ड्यात 3 ते 5 ग्रॅम हेप्टाक्लोर (5%) अथवा क्लोरडेन (5%) भुकटी मातीत मिसळावी.
(9) हुमणी (व्हाईट ग्रब ) :
या जाडसर पांढऱ्या अळया शेणखतात वाढतात. या अळया जमिनीत राहून झाडाची मुळे कुरतडून खातात. त्यामुळे झाडे हळूहळू सुकून वाळू लागतात. असे झाड उपटल्यास मुळाजवळ मातीत मोठमोठ्या पांढऱ्या अळया आढळतात.
उपाय : आंतरमशागतीच्या वेळी सापडणाऱ्या अळया गोळा करून नष्ट कराव्यात. अळीच्या नियंत्रणासाठी जमिनीत हेक्टरी 25 किलो फोरेट (10%) अथवा कार्बोफ्युरॉन (3%) ही दाणेदार कीटकनाशके मिसळावीत.
(10) कळया खाणारी अळी :
या अळया हिरवट राखी रंगाच्या असून त्यांच्या अंगावर उभे पट्टे असतात. या अळया कळया किंवा उमलणाऱ्या फुलांना छिद्रे पाडून आतील भाग खातात. अळयांचा अर्धा भाग कळीच्या बाहेर असतो.
उपाय : या अळीच्या नियंत्रणासाठी 10 लीटर पाण्यात 20 मिलिलीटर एन्डोसल्फॉन (35% प्रवाही) किंवा 20 मिलिलीटर क्विनालफॉस या प्रमाणात मिसळून पिकावर फवारावे.
(11) पाने कुरतडणारी माशी (लीफ कटिंग बी) :
मधमाशीसारख्या दिसणाऱ्या या माश्या मध्यम आकाराच्या आणि केसाळ असतात. या माश्यांचा रंग काळा असून पोटाला लालसर रंग असतो. या माश्या वाळलेल्या फांद्यांवर मातीची घरे करून त्यात राहतात. तसेच पानाच्या कडाही सफाईदारपणे अर्धवर्तुळाकार रितीने कुरतडतात. या कुरतडलेल्या पानांचा उपयोग माश्या आपले घर तयार करण्यासाठी करतात. गुलाबाच्या पिकाला या माशीचा उपद्रव अतिशय कमी प्रमाणात होतो.
उपाय : या माशीच्या नियंत्रणासाठी 30 ग्रॅम कार्बारिल (50%) 10 लीटर पाण्यात मिसळून झाडांवर फवारावे.
(12) लाल कोळी (रेड माईट) :
हे लालसर रंगाचे लहान अंडाकृती किडे पानांच्या मागील बाजूस जाळी तयार करून त्यामध्ये राहतात आणि पानातील अन्नरस शोषून घेतात.
त्यामुळे पानांवर पिवळसर किंवा तांबूस डाग पडून पाने निस्तेज होऊन गळू लागतात. किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाल्यास पानावर मोठ्या प्रमाणात जाळी दिसून येते आणि पानगळही मोठ्या प्रमाणात होते.
उपाय : या किडीच्या नियंत्रणासाठी पाण्यात मिसळणारे गंधक 10 लीटर पाण्यात 25 ग्रॅम या प्रमाणात मिसळून फवारणी करावी.
(13) सूत्रकृमी (निमॅटोड) :
सूत्रकृमी हे अतिसूक्ष्म प्राणी असून ते उघड्या डोळ्यांनी दिसून येत नाहीत. सूत्रकृमी ओलसर दमट जमिनीत राहतात. ही सूक्ष्म कीड गुलाबाच्या झाडाच्या मुळांतून आत शिरते आणि अन्नरस शोषते. या किडीचा उपद्रव मोठ्या प्रमाणात झाल्यास झाडे खालून वर वाळत जातात. काही सूत्रकृमींमुळे पिकांच्या मुळावर गाठी येतात, परिणामी झाडे पिवळी पडतात, त्यांची वाढ खुंटते आणि नंतर झाडे मरतात.
उपाय : सूत्रकृमींच्या नियंत्रणासाठी दर हेक्टरी 25 किलो दाणेदार फोरेट (10%) अथवा 2 टन निंबोळी पेंड जमिनीत मिसळून द्यावी.
गुलाब रोपवरील महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण : Measure Disease In Rose Farming
(1) भुरी (पावडरी मिल्ड्यू) :
हा बुरशीजन्य रोग गुलाबाच्या झाडावर सर्वत्र आढळून येतो. या रोगामुळे गुलाबाचे कोवळे शेंडे, पाने, कळया आणि त्यांचे देठ यांवर पांढरट रंगाच्या बुरशीची वाढ दिसून येते. बुरशीचा प्रादुर्भाव झालेल्या भागाची वाढ खुंटते आणि पुढे ते भाग सुकून वाळतात. या रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यास बुरशी फुलापर्यंत पोहोचते. त्यामुळे फुले चांगली उमलत नाहीत आणि काही वेळा वाळून जातात. या रोगाचा प्रादुर्भाव विशेषतः हिवाळयात जास्त प्रमाणात होतो.
उपाय : या रोगाच्या नियंत्रणासाठी 10 लीटर पाण्यात 20 ग्रॅम एवढी पाण्यात मिसळणाऱ्या गंधकाची भुकटी अथवा 10 ग्रॅम कराथेन (48%) भुकटी या प्रमाणात मिसळून 10 ते 15 दिवसांच्या अंतराने पिकावर फवारावी.
(2) काळे ठिपके (ब्लॅक स्पॉट) :
या बुरशीजन्य रोगामुळे गुलाबाच्या पानांवर गोलाकार, 2 ते 5 मिलिमीटर आकाराचे काळे अथवा काळसर तपकिरी रंगाचे ठिपके पडतात. या ठिपक्यांच्या कडा वेड्यावाकड्या असतात. या रोगामुळे पाने पिवळी होऊन गळून पडतात आणि झाडाची वाढ थांबते. झाडांच्या जमिनीकडील पानांवर रोग प्रथम येतो आणि तो हळूहळू वरील पानांवर पसरतो. भारी जमीन, अती पाणी अथवा पाऊस आणि योग्य निचरा न होणाऱ्या जमिनीत या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो.
उपाय : या रोगाच्या नियंत्रणासाठी 10 लीटर पाण्यात 25 ग्रॅम डायथेन एम-45 किंवा 20 ग्रॅम बाविस्टीन (50%) या प्रमाणात मिसळून 10 ते 20 दिवसांच्या अंतराने पिकावर फवारावे. रोगट पालापाचोळा गोळा करून नष्ट करावा आणि बागेत स्वच्छता राखावी.
(3) फांदीमर (डायबॅक) :
फांदी वरून खाली काळी पडत जाणे हे या रोगाचे प्रमुख लक्षण आहे. या बुरशीजन्य रोगामुळे फुले तोडलेल्या किंवा नुकत्याच छाटलेल्या फांद्या वरच्या बाजूने टोकाकडून काळपट तपकिरी किंवा काळचा होऊन वाळू लागतात. फांद्या वरून खाली वाळत जात असल्यामुळे या रोगाला डायबॅक असे म्हणतात. फांदी पोखरणाऱ्या माशीमुळे या रोगाच्या बुरशीच्या प्रसारास अधिक मदत होते.
उपाय : रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या फांद्या छाटून नष्ट कराव्यात आणि बागेत स्वच्छता राखावी. प्रत्येक छाटणीनंतर फांद्यांच्या कापलेल्या भागावर पुढील औषधाचे मिश्रण ब्रशच्या साहाय्याने लावावे… चहाचा एक सपाट चमचा बी. एच.सी. (50%) + चहाचा एक सपाट चमचा डायथेन एम-45 (75%) + चहाचे 3-4 चमचे पाणी.
(4) करपा :
हा बुरशीजन्य रोग प्रामुख्याने गुलाबाच्या जुन्या फांद्यांवर दिसून येतो. या रोगामुळे फांद्यांवर काळपट तांबूस रंगाचे ठिपके पडतात. नवीन फुटीवर हे ठिपके फारसे आढळत नाहीत.
उपाय : या रोगाच्या नियंत्रणासाठी 25 ग्रॅम ब्लायटॉक्स अथवा फायटोलॉन 10 लीटर पाण्यात मिसळून पिकावर फवारावे.
(5) केवडा (डाऊनी मिल्ड्यू) :
या रोगाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने झाडाचे कोवळे शेंडे, पाने, कळया आणि पाकळया यांवर होतो. या बुरशीजन्य रोगामुळे पानांवर वरच्या बाजूस जांभळट, लालसर ते गर्द तपकिरी रंगाचे वेड्यावाकड्या आकाराचे डाग पडतात. पाने पिवळी पडून गळू लागतात. शेंडे व कळयांची वाढ खुंटून त्या पूर्ण करपतात. थंड व दमट हवामानात पानांच्या मागील बाजूस बुरशीचे बीजाणू भुरकट पांढऱ्या रंगाच्या स्वरूपात तयार होतात. या बीजाणूंमुळे रोगाचा प्रसार झपाट्याने होतो.
उपाय : या रोगाच्या नियंत्रणासाठी 25 ग्रॅम ब्लॉयटॉक्स अथवा फायटोलॉन अथवा कॉपर ऑक्सिक्लोराईड 10 लीटर पाण्यात मिसळून पिकावर फवारावे.
(6) फांदीवरील खैरा (स्टेम कैंकर) :
या रोगामुळे जून फांद्यांच्या सालीवर तपकिरी किंवा राखी रंगाचे मोठे चट्टे पडतात. अशा फांद्यांना नवीन फूट येत नाही किंवा आली तरी ती कमजोर राहते. नीट वाढत नाही. त्यामुळे झाडाची फुले येण्याची क्षमता कमी होते.
उपाय : रोगट फांद्या पूर्णपणे काढून नष्ट कराव्यात.
(7) मोझॅइक व्हायरस :
या विषाणूजन्य रोगामुळे झाडाच्या फांद्या वेड्यावाकड्या आकाराच्या होतात, पाने चुरगळलेली दिसतात. शेंड्याची वाढ थांबते. त्यामुळे फुले लागत नाहीत. रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्यास संपूर्ण झाड मरते.
उपाय : या रोगाच्या नियंत्रणासाठी कोणतीही खात्रीशीर उपाययोजना नाही. या रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून रोगट झाडे उपटून जाळून नष्ट करावीत.
गुलाब रोपातील शारीरिक विकृती आणि त्यांचे नियंत्रण : Physical Deformity In Rose Farming And Control
गुलाबाच्या फुलांचे उत्पादन घेताना बाह्य वातावरण आणि झाडातील शारीरिक बदलामुळे फुलात काही वेळा विकृती निर्माण होतात.
(1) बसकी कळी (बुल हेड्स् ) :
या प्रकारच्या विकृतीत फुलांच्या पाकळ्यांची पूर्ण वाढ होत नाही. काही वेळा पाकळया अतिशय लहान राहतात आणि त्यांची संख्या मात्र जास्त असते. काही वेळा फुलांमध्ये एकच स्त्रीकेसर असले तर दोन कळया एकत्र येऊन फूल तयार झाल्यासारखे दिसते. अशी अवस्था अनेकदा फुलकिडीच्या उपद्रवामुळे निर्माण होते. परंतु कधीकधी फुलकिड्यांचा प्रादुर्भाव नसतानाही अत्यंत जोमदार दांड्यावर अशा प्रकारची विकृती आढळून येते. या विकृतीचे निश्चित कारण माहीत नसले तरी फुलकिडीचा बंदोबस्त केल्यास आणि झाडावर फांद्यांची योग्य संख्या राखल्यास ही विकृती टाळता येते.
(2) फूल वाकणे (बेंट नेक) :
फुलांची काढणी केल्यानंतर ताबडतोब त्यांची शीतगृहात साठवण न केल्यास फुले शेंड्याकडून वाकतात. जर फुलाचा दांडा बारीक आणि फूल मोठे असेल तर किंवा अन्नद्रव्ये कमी पडत असतील तर अथवा फुले काढणीनंतर पाण्यात ठेवली नसतील तर ही विकृती दिसून येते. ही विकृती दोन प्रकारची असते. पहिल्या प्रकारात वाकलेले फूल कालांतराने ताठ किंवा सरळ होते ( रिकव्हरेबल) आणि दुसऱ्या प्रकारात फुले ताठ होतच नाही (नॉन रिकव्हरेबल).
(3) पाने गळणे (लीफ ड्रॉप) :
गुलाबाच्या झाडाच्या वाढीच्या वेगात अचानक बदल झाल्यास काही प्रमाणात पानगळ होते. विशेषतः छाटणीनंतर फांद्यांची जोमदार वाढ होत असताना ही विकृती आढळून येते. कधीकधी पावसाळी हवामानात पानांवर काळे ठिपके पडतात किंवा तांबड्या कोळयाचा प्रादुर्भाव होतो. यामुळेही झाडाची पानगळ होते.. ही विकृती टाळण्यासाठी पावसाळयात काळे ठिपके पडणाऱ्या रोगाचा बंदोबस्त करावा. तसेच कोळी या किडीचा उपद्रव आढळल्यास कोळीनाशकांच्या 2-3 फवारण्या दर आठवड्याच्या अंतराने कराव्यात.
(4) पाने आणि फांद्या आकसणे :
काही वेळा ‘फेनॉक्सी’ युक्त तणनाशकांची फवारणी केल्यास त्यांचा पानांच्या वाढीवर दुष्परिणाम होतो. पाने आकसलेली, चुरगळलेली आणि लहान होतात. एकाच नवीन डोळयातून अनेक लहान पाने येऊन त्या ठिकाणी पानांचा गुच्छ दिसतो. ही विकृती टाळण्यासाठी तणनाशके काळजीपूर्वक फवारावीत. फुलकिडे आणि कोळी यांचा त्वरित बंदोबस्त करावा.
(5) पारायुक्त रसायनांची जखम (मर्क्युरी इंज्युरी) :
या प्रकारची विकृती प्रामुख्याने ग्रीन हाऊसमध्ये लागवड केलेल्या झाडांमध्ये आढळून येते. ग्रीन हाऊस बांधण्यासाठी वापरलेले लाकूड खराब होऊ नये म्हणून त्यावर अनेकदा पारायुक्त रंग दिला जातो. या रंगातील पाऱ्याची वाफ होऊन त्याचा अनिष्ट परिणाम नवीन येणाऱ्या फांद्यांवर होतो. या कोवळ्या फांद्यांची टोके सुकतात आणि मरतात. पारायुक्त रंग जमिनीवर सांडल्यास अथवा तापमापक फुटल्यास पारा मातीत मिसळतो. अशी पारायुक्त माती लगेच काढून टाकणे आवश्यक आहे.
तणे आणि त्यांचे नियंत्रण :
गुलाब हे बहुवर्षीय पीक असल्यामुळे पीक जमिनीवर सतत 5 ते 7 वर्षे राहते. गुलाबाच्या पिकात प्रामुख्याने हरळी, लव्हाळा ही बहुवार्षिक तणे तसेच लहान व मोठी घोळ, गाजरगवत ही हंगामी तणे मोठ्या प्रमाणावर येतात. गुलाबाची लागवड केल्यानंतर पहिल्या वर्षी दोन रोपांमधील बरीच जागा मोकळी राहते. या जागेत तणांची वाढ होते. तणांच्या नियंत्रणासाठी वेळोवेळी निंदणी करावी. पालापाचोळा वापरून आच्छादन केलेल्या बागेत तणे कमी येतात. ग्लिरीसिडिया या झुडपाचा पाला आच्छादनासाठी वापरल्यास झाडांच्या वाढीवर त्याचा चांगला परिणाम होतो आणि हरळी, लव्हाळा या तणांचे प्रमाणही कमी होते.
गुलाबाच्या फुलांची काढणी, उत्पादन आणि विक्री : Rose Harvesting Rose Production And Sales
गुलाबाची फुले काढताना ती पूर्ण वाढ झालेली असावीत; मात्र उमललेली नसावीत. साधारणपणे गुलाबाची छाटणी केल्यापासून सहा ते आठ आठवड्यांनी गुलाबाच्या ताटव्यांवर फुले तयार होतात. फुलांची काढणी करताना ती कोणत्या बाजारपेठेत पाठवावयाची आहेत त्यानुसार कोणत्या अवस्थेतील फुलांची काढणी करावी हे ठरवावे. उदाहरणार्थ, स्थानिक बाजारपेठेसाठी फुलांच्या पहिल्या दोन पाकळ्या उमलण्याच्या अवस्थेत, लांब बाजारपेठेसाठी एक पाकळी उमलण्याच्या अवस्थेत तर अती लांबच्या बाजारपेठेसाठी फुलांच्या कळीवरील सर्व हिरवी दले उघडण्यास सुरुवात होऊन कळीचा रंग पूर्णपणे स्पष्ट दिसत असताना तर परदेशी बाजारपेठेत पाठविण्यासाठी बंद कळीच्या अवस्थेत फक्त वरील एक हिरवे दल उघडत असताना काढणी करावी. हार तयार करण्यासाठी, अत्तर तयार करण्यासाठी, देवाला वाहण्यासाठी अथवा गुलकंद, इत्यादी पदार्थ तयार करण्यासाठी पूर्ण उमललेल्या फुलांची काढणी करावी. फुलांची काढणी सकाळच्या अथवा संध्याकाळच्या वेळी करावी. त्यामुळे फुलांचे काढणीनंतर उन्हामुळे होणारे नुकसान टळून त्यांचे काढणीनंतरचे आयुष्य वाढते. फुले काढताना फुलांचा दांडा किती लांब ठेवून कापावा हे ज्या बाजारपेठेत फुले पाठवावयाची आहेत त्यानुसार ठरवावे. फुलाच्या दांड्याची लांबी साधारणपणे स्थानिक बाजारपेठेसाठी 20 ते 30 सेंटिमीटर, लांबच्या बाजारपेठेसाठी 30-45 सेंटिमीटर, अतिलांबच्या बाजारपेठेसाठी 45 ते 60 सेंटिमीटर तर परदेशी बाजारपेठेसाठी 60 सेंटिमीटरपेक्षा जास्त असावी. फुलाचा दांडा जेवढा लांब तेवढे फुलांचे काढणीनंतरचे आयुष्य जास्त असते. कारण लांब दांड्यातील अन्नसंचय फुलांना जास्त काळ पुरतो.
गुलाबाच्या फुलांची काढणी करताना पुढील गोष्टी कराव्यात :
(1) प्रथम कोणत्या अवस्थेतील फुलांची काढणी करावयाची आहे ते ठरवावे.
(2) धारदार कात्रीने फुलाच्या दांड्यावर पहिली पाच पाने असलेल्या भागाच्या वर तिरकस काप घेऊन दांड्यासह फूल कापावे.
(3) फुलांचे दांडे बुडतील इतके पाणी बादलीत भरून त्यात गुलाबाच्या फुलांचे दांडे बुडवून ठेवावेत.
(4) फुले थंड ठिकाणी सावलीत आणून अथवा शीतगृहात 2 अंश सेल्सिअस तापमानात 4 ते 5 तास पाण्यात ठेवावीत.
(5) फुलांच्या काढणीनंतर कापलेल्या झाडाच्या भागास एक भाग चुना, एक भाग मोरचूद आणि दहा भाग पाणी एकत्रित करून बोर्डो पेस्ट तयार करून लावावी. त्यामुळे फांद्याच्या कापलेल्या भागावर मररोगाच्या बुरशीची लागण होण्यास अटकाव होतो. फुलांची प्रतवारी करून एक किंवा दोन डझनांच्या जुड्या बांधाव्यात. काढणीनंतर फुलांच्या या जुड्या वर्तमान- पत्रांच्या कागदात गुंडाळून ठेवाव्यात. लांबच्या बाजारपेठेत पाठविण्यासाठी फुले 10 अंश सेल्सिअस तापमानाला 6 तास साठवावीत. नंतर कागदी पुट्ट्याच्या खोक्यात नीट मांडणी करून खोकी बंद करावीत आणि बाजारात पाठवावीत.