अश्यापद्धतीने करा हळद लागवड आणि मिळवा भरगोस उत्पन्न

Halad, हळद ,हळद लागवड । हळदीचे गुणधर्म । हळदिच्या जाति । हळद किड नियंत्रन । हळद रोग नियंत्रण । हळद लागवडीच्या पद्धती आणि लागवडीचा हंगाम ।

।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।

हळद हे एक मसाले वर्गातील प्रमुख नगदी पीक म्हणून ओळखले जाते. भारतामध्ये या पिकाखालील क्षेत्र १,२५,८०० हेक्टर असून उत्पादन ५,५०,१८५ मे. टन इतके आहे. जगातील उत्पादनापैकी जवळजवळ ८०% उत्पादन भारतामध्ये होते, परंतु त्यापैकी १५ ते २० % फक्त हळद निर्यात होते. महाराष्ट्रामध्ये या पिकाखाली ८,५०० हेक्टर क्षेत्र असून उत्पादन ४२,५०० मेट्रिक टन इतके होते. महाराष्ट्रातील वातावरण हळद लागवडीस अतिशय अनुकूल असल्यामुळे हळदीच्या क्षेत्रात वाढ होण्यास महाराष्ट्रात वाव आहे. त्यामध्ये सतत होणार्‍या हळदीच्या दरामधील चढउतार, उन्नत जातीच्या लागवडीखालील अपुरे क्षेत्र, सेंद्रिय खतांची कमतरता, मोठ्या प्रमाणात करावा लागणारा मशागत खर्च, नियंत्रित बाजारपेठेचा अभाव, यांत्रिक पद्धतीने काढणी करणे इत्यादी बाबींचा विचार करून जास्तीत जास्त उत्पादन काढण्याचे प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे.

हळदीचे गुणधर्म

डाळीच्या पिठामध्ये थोडी हळद, थोडा पिसलेला कापूर व ४ ते ५ थेंब मोहरीचे तेल टाकून स्नान केल्यास त्वचारोग, खाज थांबून पूर्ण अंगकांती सुधारते.हळदीमुळे त्वचेचा रंग उजळतो तसेच ती रक्तशुद्धीसाठी गुणकारी आहे. पायावर सूज आल्यास हळद, गुळ व गोमुत्र गरम करून प्यावे. डोळ्याचे विकारावर हळकुंड तुरीच्या डाळीत शिजवून डोळ्यात अंजन करावे.

हवमान आणि जमिन

हळद पिकास उष्ण व दमट हवामान चांगले मानवते. मध्यम पाऊस व चांगल्या स्वच्छ प्रकाशात या पिकाची वाढ उत्तम होते. पाण्याचा ताण व जास्त पाऊससमान हे पीक काही वेळ सहज सहन करू शकते, परंतु जास्त दिवस पिकात पाणी साचून राहणे हानिकारक आहे. तसेच कडक हिवाळा या पिकास मानवत नाही. थंडीमुळे हळदीची पानेवाढ काही अंशी थांबते

हे पीक विविध प्रकारच्या जमिनीत घेता येत असले तरीसुद्धा त्या जमिनीचे भौतिक, रासायनिक तसेच जैविक गुणधर्म, जमिनीची जडण – घडण, जमिनीचा उतार या गोष्टी लागवडीपूर्वी समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. या पिकास मध्यम प्रतीची तसेच चांगला निचरा होणारी जमीन आवश्यक असते. भारी काळ्या चिकन, क्षारयुक्त जमिनीत हळदीचे पीक चांगले येत नाही म्हणून हळद लागवडीसाठी शक्यतो अशा जमिनीची निवड करू नये. चांगल्या उत्पादनासाठी मध्यम, काळी, पोयट्याची, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमिन निवडावी. आपल्याकडे हलक्या व माळरानांच्या जमिनीत सुध्दा हळदीचे पीक घेता येईल.

हळदिच्या जाति

  • फुले स्वरूप : ही जात महात्मा फुले कृषी विद्यापीठाने प्रसारित केली असून सदर जात ही मध्यम उंच वाढणारी अशी आहे. सरळ वाढीची सवय असून पानांचा रंग हिरवा असून क्रियाशील पानांची संख्या ६ ते ७ असते. या जातीचा पक्क्तेचा काळ हा ८.५ महिन्याचा असून फुटव्यांची संख्या २ ते ३ प्रति झाड असते. मुख्य हळकुंडाची लांबी ७ ते ८ सें.मी. असते. बियाणे व उत्पादनाचे प्रमाण १:५ असे आहे. हळकुंडे सरळ लांब वाढतात. हळकुंडाच्या गाभ्याचा रंग गर्द पिवळसर असा आहे. या जातीमध्ये पिवळेपणाचे प्रमाण सध्या प्रसारीत असलेल्या जातीपेक्षा जास्त म्हणजे ५.१९% इतके असून उतार २२% इतका मिळतो. या जातीने सरासरी ओल्या हळदीचे उत्पादन ३५८.३० क्विं.हे. दिल्याचे दिसून आले या जातींमध्ये पानावरील करपा रोगास तसेच कंदमाशी या किडीस प्रतिकारक गुणधर्म असल्याचे दिसून आले आहे.
  • सेलम : या जातींची पाने रुंद हिरवी असतात. पिकाच्या एकूण वाढीच्या कालावधीमध्ये १२ ते १५ पाने येतात. हळकुंडे व उपहळकुंडे जाड व ठसठशीत असतात. हळकुंडाची साल पातळ असून गाभ्याचा रंग केशरी पिवळसर असतो. हळकुंडावरील पेर्‍यांची संख्या ८ ते ९ असते. कच्च्या हळदीचे उत्पादन ३५० ते ४०० क्विंटल प्रती हेक्टरी मिळते. या जातीमध्ये कुरकुमीनचे प्रमाण ४.५ टक्के असते. वाळलेल्या हळदीचे ७० ते ७५ क्विंटल प्रती हेक्टरी उत्पादन मिळते. ही जात पक्क होण्यास ८.५ ते ९ महिने लागतात.
  • कृष्णा (कडाप्पा ) : या जातीची हळकुंडे लांब, जाड व प्रमाणबद्ध असतात. हळकुंडाचा गाभा पांढरट पिवळा असतो. दोन पर्‍यामधील अंतर इतर जातीच्या तुलनेने जास्त असते. पेर्‍यांची संख्या ८ ते ९ असून झासांची पाने रुंद आणि सपाट असतात. एकून पिकाच्या कालावधीमध्ये १० ते १२ पाने येतात. पानावरील ठिपके (लिफ ब्लॉच) या रोगास ही जात अल्प प्रमाणत बळी पडते. वाळलेली हळकुंडे थोडीशी सुकलेली दिसतात. वाळल्यानंतर मुख्य हळकुंडाची लांबी जवळ जवळ ६ ते ७ सें.मी. असते.या जातीच्या वाळलेल्या हळदीचे उत्पादन ७५ ते ८० क्विंटल प्रती हेक्टरी येते.
  • राजापुरी : या जातीची पाने रुंद, फिकट हिरवी व सपाट असतात. पिकाच्या वाढीच्या एकूण कालावधीमध्ये १० ते १८ पाने येतात. झाडास फुले क्वचित येतात. हळकुंडे व उपहळकुंडे आखूड व जाड ठसठशीत असतात. हळकुंडाची साल पातळ असून गड्ड्यांचा रंग पिवळा ते गर्द पिवळा असतो. शिजवल्यानंतर वाळलेल्या हळदीचा उतारा १८ ते २० टक्के पडतो व प्रती हेक्टरी कच्च्या हळदीचे उत्पादन ५५ ते ५८ क्विंटल मिळते. ही जात करपा रोगास बळी पडते. पक्क होण्यास ८ ते ९ महिने लागतात. या जातीला स्थानिक बाजारपेठेत तसेच गुजरात व राजस्थान राज्यांतून चांगली मागणी असल्याने भावही चांगला मिळतो. बर्‍याच वेळा हळदीच्या वायदे बाजारातील भाव या जातीवरून ठरला जातो.
  • खाण्याची हळद : ही बहुवर्षीय जात असून ६० ते ९० सें.मी. उंच वाढते. पानांना खमंग वास असून फळे तीनधारी असतात. बोंड, कंद आखूड व जाड असतो. पातळ पाने ६० ते ९० सें.मी. लांब असून कंदापासून ६ ते १० पोपटी हिरव्या रंगाची पाने वाढतात. फुले पिवळसर पांढरी असतात, मात्र लागवडीच्या पिकात फळे धरत नाहीत, कारण ती नपुंसक असतात.
  • कस्तुरी किंवा रानहळद : ही जात वार्षिक असून महाबळेश्वर, कोकण विभाग आणि आंध्रप्रदेशात मोठ्या प्रमाणात लागवड करतात. कंद मोठे गोलाकार, फिकट पिवळे (आत नारिंगी लाल) असून कापराचा वास असतो. प्रक्रियेनंतरच्या (हळकुंडास) गोड वास असतो. ६.१% हिरवट तपकिरी तेल, कापराचा वास असल्याने औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.पाने लांब – वर्तुळाकर व आल्यासारखी टोकदार, मध्यशीरा उठावदार असतात
  • इस्ट इंडियन अरोरूट : कंदातील स्टार्च १२.५ % असून त्याचा उपयोग खर्‍या अरोरूटला पर्याय म्हणून तसेच मुलांना व आजारी माणसांना मिल्क पुडिंग करून देतात.
  • आंबेहळद : कोवळ्या कंदाला कच्च्या आंब्याचा वास असल्याने त्याला आंबे हळद म्हणतात. कोकण, बंगाल, तामिळनाडू व पश्चिम घाटातील भागात प्रामुख्याने लागवड केली जाते. कंद बारीक व आतील गार पांढरा असून कंदाचे लोणचे करतात. बहुवर्षायु जात असून पाने लांब वर्तुळाकार, आल्यासारखी व पानांचा जुडगा खालपासून वाढतो. मधली शीर उठावदार असते. फुले हिरवट – पांढरी असून बोंड तीनधारी असते.
  • काळी हळद : बंगालमध्ये आढळते. ताजे कंद फिकट पिवळे, सुवासिक, सौंदर्यप्रसाधनात वापरतात. कंदामध्ये ९.७६% सुवासिक तेल असते.
  • कचोर : वार्षिक जात असून कोकणात सर्वत या जातींची लागवड आढळते. औषधाकरिता ताजे मूळ व गड्डे रक्त शुद्धीकरणासाठी वापरतात.

किड नियंत्रन

  • कंदमाशी : या पिकास कंदमाशीसारख्या किडीचा मोठा उपद्रव होतो. याच्या नियंत्रणासाठी कंदमाशा शेतामध्ये दिसू लागताच माशा मारण्यासाठी प्रोटेक्टंट ३० ग्रॅम आणि क्विनॉलफॉस २५% प्रवाही २० मी.ली. १० लिटर पाण्यामध्ये मिसळून जुलै ते ऑगस्ट दरम्यान १ ते २ फवारण्या १५ दिवसांच्या अंतराने कराव्यात. याच किटकनाशकाचे पुढील २ हप्ते १ महिन्याच्या अंतराने द्यावेत. अर्धवट कुजले, सडके बियाणे लागवडीस वापरू नये. जुलै ते सप्टेंबर या कालावधीमध्ये शेतात उघडे पडलेले गड्डे मातीने झाकून घ्यावेत.
  • पानातील रस शोषून घेणारा ढेकूण : या किडीची पिल्ले पानाच्या पाठीमागे एकत्रितपणे आढळून येतात. ते पानाच्या पाठीमागे राहून पानातील रस शोषून घेतात. या किडींचा उपद्रव झालेली पाने तांबूस पिवळसर रंगाची दिसून येतात. तिच्या नियंत्रणासाठी प्रोटेक्टंट २५ ग्रॅम + मोनोक्रोटोफॉस ३६ डब्ल्यू. एस. सी. १० मिली १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.
  • पाने गुंडाळणारी अळी : हळद पिकावर ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून ते नोव्हेंबरच्या दुसर्‍या आठवड्यापर्यंत या किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. या किडीची अळी हिरवट रंगाची असून ती अंड्यातून बाहेर पडल्यानंतर स्वत:च्या शरीराभोवती पान गुंडाळून घेते व आत राहून पाने खाते. किडीचा प्रादुर्भाव दिसताच गुंडाळलेली पाने गोळा करून नष्ट करावीत. तसेच कार्बारील ४० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची फवारणी करावी.
  • सुत्रकृमी : काही भागामध्ये या पिकावर सुत्रकृमींचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. पिकाच्या मुळाभोवती राहून सुईसारख्या अवयवाने मुळातील रस शोषण करतात. त्यामुळे पिकाची वाढ खुंटते व पाने पिवळी पडतात. तसेच यांनी केलेल्या छिद्रातून कंदकुजीस कारणीभूत असलेल्या बुरशींचा सहज शिरकाव होतो. सुत्रकृमीच्या नियंत्रणासाठी लागवडीच्या वेळी ट्रायकोडर्मा प्लस ५ किलो /हे. शेणखतात मिसळून द्यावा किंवा फोरेट १० जी. हेक्टरी २५ किलो याप्रमाणात द्यावे किंवा १८ ते क्विं/हे. लिंबोळी पेंडीचा वापर करावा.

रोग नियंत्रण

  • कंदकूज : वेळीच खबरदारी न घेतल्यास या रोगामुळे ५०% पर्यंत नुकसान होऊ शकते. भरपूर पाऊस, भारी काळी कसदार, कमी निचरा असणारी जमीन या रोगास पोषक ठरते. हा रोग ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो. प्रथम पानांचे शेंडे वरून व कडांनी पिवळे पडून खालीपर्यंत वाळले जातात. खोडाचा जमिनीलगतचा भाग काळपट राखी पडतो. याच ठिकाणी माती बाजूस करून पाहिल्यास गड्डाही वरून काळा पडलेला व निस्तेज झालेला दिसतो. या भागावर दाब दिल्यास त्यातून कुजलेले, घाण वास येणारे पाणी बाहेर येते. अशा झाडाचे खोड थोडे जरी ओढले तरी चटकन हातात येते. हा रोग प्रामुख्याने सुत्रकृमी किंवा खुरपणी करताना/आंतरमशागत करताना कंदास ईजा झाल्यास त्यातून पिथियम, फ्युजेरियम यासारख्या बुरशींचा गड्ड्यामध्ये शिरकाव होऊन कंदकुजण्यास सुरुवात होते.तसेच मेटॅलॅक्सिल ८% + मॅकोझेब ६४% हे संयुक्त बुरशीनाशक २.५ ग्रॅम प्रति लिटर किंवा कार्बेंडॅझिम (५० डब्ल्यू. पी.) १ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात किंवा मॅकोझेब २.५ गरम प्रति लिटर यापैकी एका बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी. शेतामध्ये हा रोग आढळून आल्यास याच बुरशीनाशाकांची आलटून पालटून फवारणी करावी.
  • पानावरील ठिपके : या रोगामध्ये पानावरती लंबगोलाकार तपकिरी रंगाचे अंडाकृती ठिपके दिसतात. ते सूर्याकडे धरून पाहिल्यास त्यात अनेक वर्तुळे दिसतात. रोगट भाग पूर्णत: वाळतो व तांबूस राखी रंगाचा दिसतो. असे ठिपके वाढून एकत्रित येतात आणि संपूर्ण पान करपते. या रोगाची तीव्रता सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये दिसून येते. हा रोग कोलेटोट्रिकम कॅपसिकी या बुरशीमुळे होतो. यांच्या नियंत्रणासाठी थ्राईवर ३० मिली + क्रॉंपशाईनर ३० मिली आणि हार्मोनी १५ ते २० मिली १० लिटर पाण्यात किंवा १ टक्का बोर्डोमिश्रण तयार करून फवारणी करावी. हवामानाच्या परिस्थितीनुसार सप्टेंबर ते नोव्हेंबरमध्ये १५ ते २० दिवसाच्या अंतराने फवारण्य कराव्यात.
  • पानावरील ठिपके : हा बुरशीजन्य रोग असून टॉंफ्रिन मॅक्यूलन्स नावाच्या बुरशीमुळे होतो. साधारणपणे ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये आर्द्रतायुक्त हवामानामध्ये या रोगाची सुरुवात. जमिनीलगतच्या पानावर होऊन तो वरील पानावर पसरतो. या रोगाची तीव्रता वाढत गेल्यास हे ठिपके एकत्र येऊन संपूर्ण पान करपते. त्यासाठी लिफ ब्लॉच या रोगासाठी बुरशीनाशकांची फवारणी घेतल्यास रोग आटोक्यात येऊ शकतो.

हळद लागवडीच्या पद्धती आणि लागवडीचा हंगाम

  • सरी वरंबा पध्दत : हळदीचे कंद जमिनीत वाढत असल्याने या पिकाची लागवड सरी वरंबा किंवा रुंद वरंबा पद्धतीने लागावाद करावयाची झाल्यास ७५ ते ९० सें.मी. अंतरावर सर्‍या पाडून घ्याव्यात. शक्य असेल तर सरी पाडण्यापूर्वी शिफारस केलेले स्फुरद आणि पालाश जमिनीत टाकून द्यावे. जमीनच्या उताराप्रमाणे ६ ते ७ सरी वरंब्याचे एक वाकुरे याप्रमाणे वाकुरी बांधून घ्यावीत. वाकुर्‍याची लांबी जमिनीच्या उतारानुसार पाणी बसेल अशी ठेवावी.
  • रुंद वरंबा पध्दत : रुंद वरंबा पद्धतीने रान बांधणी करून काही ठिकाणी अधिक उत्पादन घेतले जाते. या पद्धतीने लागवड केल्यास गड्डे चांगले पोसून उत्पादनात २० ते २५ % वाढ झाल्याचे आढळून आले आहे. या पद्धतीने जमिनीस पाणी देण्यास जास्त त्रास होतो म्हणून अशा पद्धतीने लागण करावयाची असल्यास जमीन समपातळीत असणे आवश्यक आहे किंवा पाणी देण्याच्या सुधारित तंत्रज्ञानामधील ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन पद्धतीचा वापर केला पाहिजे. रुंद वरंबा तयार करताना १५० सें.मी. अंतरावर प्रथम सर्‍या पाडाव्यात.
  • हळदीची लागवड साधारणपणे एप्रिल महिन्याच्या मध्यापासून जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करावी. बियाणाचे डोळे नकळत फुगलेले असावेत. कुजलेले, अर्धवट सडलेले बियाणे लागवडीसाठी वापरू नये. लागवडीसाठी हळकुंड बियाणे वापरले तरी चालतात. मात्र हळकुंड बियाणे ३० ग्रॅमपेक्षा वजनाने मोठे असावेत. सरी वरंबा पद्धतीने लागवड करावयाची झाल्यास वरंब्याच्या दोन्ही बाजूस ३० सें.मी. अंतरावरती गड्डे कुदळीने अगर्‍या घेऊन लावावेत किंवा वाकुरी पाण्याने भरल्यानंतर गड्डे पाण्यामध्ये वरंब्यात ३ ते ५ सें.मी. खोल दाबून घ्यावेत. रुंद वरंबा पद्धतीने ३० x ३० सें.मी. अंतरावरती गड्डे लावून घ्यावेत. लागवडीच्या वेळी गड्डे पुर्ण झाकले जातील याची दक्षता घ्यावी.

Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )