जांभूळ लागवड । Jambhul Lagwad । Jambhul Sheti । जांभूळ पिकाचे उगमस्थान, महत्त्व आणि भौगोलिक प्रसार । जांभूळ पिकाखालील क्षेत्र आणि उत्पादन । जांभूळ पिकास योग्य हवामान । जांभूळ पिकास योग्य जमीन । जांभूळ पिकाच्या सुधारित जाती । जांभूळ पिकाची अभिवृद्धी । जांभूळ पिकाची लागवड पद्धती । जांभूळ पिकास योग्य हंगाम । जांभूळ पिकास लागवडीचे अंतर । जांभूळ पिकास वळण । जांभूळ पिकास छाटणीच्या पद्धती । जांभूळ पिकास खत व्यवस्थापन । जांभूळ पिकास पाणी व्यवस्थापन । जांभूळ पिकातील आंतरपिके । जांभूळ पिकातील आंतरमशागत । जांभूळ पिकातील तणनियंत्रण । जांभूळ पिकाच्या महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण । जांभूळ पिकातील महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण । जांभूळ पिकाच्या फळांची काढणी, उत्पादन आणि हाताळणी । जांभूळ पिकाच्या फळांची साठवण आणि पिकविण्याच्या पद्धती ।
।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।
जांभूळ लागवड : Jambhul Lagwad : Jambhul Sheti :
जांभूळ हे कोरडवाहू जमिनीत तसेच अधिक पावसाच्या प्रदेशात चांगल्या प्रकारे येते. भारतात जांभळाची झाडे सर्वत्र आढळतात. डोंगरावर, जंगलात आणि नदीकाठी जांभळाची झाडे नैसर्गिकरित्या वाढलेली दिसतात. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना तसेच बगीच्यात कुंपणाच्या कडेने वारा प्रतिरोधक म्हणून जांभळाची झाडे लावतात.
जांभूळ पिकाचे उगमस्थान, महत्त्व आणि भौगोलिक प्रसार :
भारत देश जांभळाचे उगमस्थान समजले जाते. भारताखेरीज थायलंड, फिलिपाईन्स, मादागास्कर या देशांत जांभळाची झाडे आढळतात. विशेषत: इंडोनिशियात जांभळाची झाडे मोठ्या प्रमाणावर दिसतात. जांभळाच्या फळामध्ये लोह, खनिजे शर्करा (कार्बोहायड्रेट्स्) आणि इतर अन्नद्रव्ये भरपूर प्रमाणात असतात. जांभळाच्या 100 ग्रॅम खाण्यायोग्य भागात अन्नघटकांचे प्रमाण खालीलप्रमाणे असते.
अन्नघटक | प्रमाण % |
पाणी | 80.0 |
शर्करा (कार्बोहायड्रेट्स) | 20.0 |
प्रथिने (प्रोटीन्स) | 0.7 |
स्निग्धांश (फॅट्स) | 0.1 |
खनिजे | 0.4 |
तंतुमय पदार्थ | 0.9 |
चुना (कॅल्शियम) | 0.02 |
स्फुरद (फॉस्फरस) | 0.01 |
लोह | 1.00 |
उष्मांक (कॅलरी) | 83 |
जांभळाची ताजी पक फळे मीठ लावून खातात. जांभळाच्या फळांपासून रस, सरबत जेली, व्हिनेगार, मद्य तयार करतात. जांभळाच्या फळांचा रस थंड आणि पाचक असतो. जांभळाचे फळ पोटाच्या विकारावर गुणकारी आहे. पंडुरोग आणि मधुमेहावर या फळांचा रस आणि बियांचे चूर्ण देतात. दंतमंजनात जांभळाच्या झाडाच्या सालीची पूड वापरली जाते. जांभळाच्या फळांच्या बियांमध्ये शर्करा आणि प्रथिने जास्त प्रमाणात असल्यामुळे जनावरांच्या खाद्यात बियांच्या भुकटीचा उपयोग करतात. जांभळाच्या झाडाचे लाकूड टिकाऊ असते. जांभळाच्या झाडावर टसर नावाचे रेशीम किडे पाळतात.
जांभळाची झाडे भारताखेरीज थायलंड, फिलिपाईन्स, मादागास्कर, इत्यादी देशांत आढळून येतात. भारतामध्ये बिहारमधील भागलपूर, बंगालमधील बाकुंडा आणि पुरूलिया या भागात जांभळाची झाडे मोठ्या प्रमाणावर आढळतात. महाराष्ट्रात महाबळेश्वर, लोणावळा, सातारा, कोल्हापूर, नागपूर, नगर, धुळे या भागात जांभळाची झाडे आढळतात.
जांभूळ पिकाखालील क्षेत्र आणि उत्पादन :
भारतात जांभळाच्या झाडांची लागवड स्वतंत्रपणे केली जात नसल्यामुळे जांभळाच्या लागवडीखाली क्षेत्र आणि उत्पादन याविषयीची निश्चित आकडेवारी उपलब्ध नाही. जांभळाची झाडे डोंगरावर, जंगलात आणि नदीकाठी नैसर्गिकरित्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली दिसतात. रस्त्यावर दोन्ही बाजूंना सावलीसाठी ही झाडे लावलेली असतात.
जांभूळ पिकास योग्य हवामान आणि जांभूळ पिकास योग्य जमीन :
जांभळाची लागवड प्रामुख्याने उष्ण आणि समशीतोष्ण हवामानात केली जाते. कोकणमधील उष्ण आणि दमट हवामान, भरपूर पाऊस तसेच दुष्काळी भागातील अत्यंत कमी पाऊस आणि कोरडे हवामान जांभळाच्या झाडास मानवते. परंतु जांभळाच्या झाडाला फुले येण्याच्या आणि फलधारणेच्या काळात कोरडे हवामान आवश्यक असते.
जांभळाच्या झाडाच्या वाढीसाठी ठरावीक प्रकारच्या जमिनीची आवश्यकता नसते. माळरानावरील हलकी परंतु थोडी खोली असलेली जमीन, पोयट्याची जमीन, ओढे आणि नदीकाठची गाळाची जमीन आणि कोकणातील जांभ्या खडकाची तांबडी जमीन अशा विविध प्रकारच्या जमिनीत जांभळाची झाडे चांगली वाढतात. त्याचप्रमाणे डोंगरउतारावरील जमिनीत आणि समुद्रसपाटीपासून सुमारे 650 मीटर उंचीवरील महाबळेश्वर, माथेरान, पन्हाळा, लोणावळा, यांसारख्या थंड हवामानाच्या ठिकाणीही जांभळाचे झाड चांगले वाढते आणि भरपूर फळे देते. सुपीक जमिनीत जांभळाची झाडे चांगली वाढून भरपूर उत्पादन देतात.
जांभूळ पिकाच्या सुधारित जाती :
भारतामध्ये जांभळाच्या सुधारित किंवा निवडलेल्या विशिष्ट प्रकारच्या जाती उपलब्ध नाहीत. जांभळाचे अनेक प्रकार आढळतात. त्यामध्ये लिंबोणीच्या आकारापासून तर बोराच्या आकारापर्यंत जांभळाच्या फळांचा आकार असतो. जांभळाच्या चवीला तुरट, अतिशय गोड अथवा चविष्ट अशा अनेक जाती आढळतात. लहान आकाराच्या फळांची चव तुरट असते तर मोठी फळे चवीला गोड असतात. लहान आकाराची बी असणाऱ्या जांभळाला ‘लेंडी जांभूळ’ असे म्हणतात. लागवड करण्यासाठी मोठी किंवा मध्यम आकार परंतु भरपूर गोड गर आणि लहान बी असलेली फळे येणाऱ्या झाडांच्या फळांतील बियांचा लागवडीसाठी उपयोग करावा. जांभळाच्या झाडाचे प्रामुख्याने दोन प्रकार आढळतात.
रा जांभूळ :
जांभळाच्या या जातीची फळे आकाराने लांबट, मोठी आणि गर्द जांभळ्या रंगाची असतात. फळातील गर फिकट गुलाबी रंगाचा, गोड आणि रसदार असतो. फळातील बी लहान असते. जांभळाच्या या जातीची फळे जून-जुलै महिन्यात तयार होतात.
कठ जांभूळ :
या जातीची फळे आकाराने लहान आणि गोल असतात. पक्क फळांचा रंग गर्द जांभळा ते काळसर असतो. फळातील गर जांभळया रंगाचा असून कमी रसदार आणि चवीला तुरट असतो. फळातील बी मोठ्या आकाराचे असते. या जातीची फळे ऑगस्ट महिन्यात तयार होतात.
जांभूळ पिकाची अभिवृद्धी आणि जांभूळ पिकाची लागवड पद्धती :
जांभळाची अभिवृद्धी बियांपासून अथवा भेटकलम किंवा डोळे भरून करता येते. परंतु बियांपासून तयार केलेल्या झाडांच्या फळांमध्ये एकसारखेपणा दिसून येत नाही. तसेच अशा झाडांना फळे लागण्यास अधिक काळ लागतो. जांभळाच्या प्रत्येक बीमधून 3 ते 4 रोपे तयार होतात. त्यांपैकी प्रत्येक बीमध्ये एक रोप अतिशय कमजोर असते तर इतर रोपे जोमदारपणे वाढतात. दोनपेक्षा जास्त रोपे देणाऱ्या बियांपासून जोमदार वाढणाऱ्या रोपांचा लागवडीसाठी वापर केल्यास मातृवृक्षातील गुणधर्म नवीन झाडामध्ये दिसतात. यासाठी बियांपासून सुमारे 5 ते 6 महिने रोपे वाढू द्यावीत. अशी रोपे तयार करण्यासाठी पॉलिथीनच्या 7.5 सेंटिमीटर रुंद आणि 15 सेंटिमीटर लांबीच्या पिशवीत जांभळाचे गर्द जांभळ्या रंगाचे, मोठ्या आकाराचे एक बी लावावे. दोनपेक्षा जास्त रोपे देणाऱ्या बियांच्या पिशव्या वेगळ्या करून ही रोपे 5 ते 6 महिने वाढू द्यावीत. यातील प्रत्येक रोपाला स्वतंत्र मुळे येतात. 5-6 महिन्यांत या रोपांची वाढ 10-15 सेंटिमीटर उंच होते. प्रत्येक पिशवीतील अतिशय कमजोर असलेले रोप काढून टाकावे आणि राहिलेल्या जोमदार रोपांपैकी प्रत्येक रोप मुळासह काळजीपूर्वक वेगळे करून ते पुन्हा स्वतंत्रपणे 15 सेंटिमीटर रुंद आणि 20 सेंटिमीटर लांबीच्या पॉलिथीनच्या पिशवीत लावावे आणि सुमारे 6 महिने वाढू द्यावे. या पद्धतीने उत्कृष्ट दर्जाच्या फळांच्या मातृवृक्षापासून त्याच पद्धतीची झाडे वाढविता येतात. ही पद्धत जांभूळ लागवडीसाठी सोपी आणि कमी खर्चाची आहे. या पद्धतीने मोठ्या प्रमाणावर कमी वेळात रोपे तयार करणे शक्य आहे.
जांभळाच्या लागवडीसाठी 0.5 X 0.5 X 0.5 मीटर आकराचे खड्डे घ्यावेत. खड्डे माती अधिक 2 ते 3 घमेली शेणखत अधिक 1 किलो सुपर फॉस्फेट यांच्या मिश्रणाने भरून घ्यावेत. प्रत्येक खड्ड्यात 250 ग्रॅम लिंडेन पावडर (10%) मातीत चांगली मिसळावी. पावसाळयाच्या सुरवातीला प्रत्येक खड्ड्यात जांभळाचे एक रोपे लावावे.
जांभूळ पिकास योग्य हंगाम आणि जांभूळ पिकास लागवडीचे अंतर :
जांभळाची लागवड स्वतंत्रपणे मोठ्या प्रमाणावर केली जात नाही. जांभळाची दोनचार झाडे माळरानात, शेताच्या बांधावर घराजवळ लावली जातात. जांभळाची स्वतंत्रपणे लागवड करताना दोन झाडांमध्ये आणि झाडाच्या दोन ओळींमध्ये 10 मीटर अंतर ठेवावे. रोपांची लागवड पावसाळयाच्या सुरुवातीला करावी.
जांभूळ पिकास वळण आणि जांभूळ पिकास छाटणीच्या पद्धती :
जांभळाच्या झाडाला नियमितपणे वळण देण्याची अथवा छाटणी करण्याची आवश्यकता नसते. सुरुवातीच्या काळात रोप वाढत असताना जमिनीपासून सुमारे 75 ते 100 सेंटिमीटर उंचीपर्यंत फुटलेल्या फांद्या तसेच फुटवे काढून टाकावेत. दरवर्षी फळांचा हंगाम संपल्यानंतर वाळलेल्या रोगट तसेच अनावश्यक फांद्या छाटाव्यात.
जांभूळ पिकास खत व्यवस्थापन आणि जांभूळ पिकास पाणी व्यवस्थापन :
जांभळाच्या झाडाला खते दिली जात नाहीत; परंतु पहिल्या वर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला प्रत्येक झाडाला 2 ते 3 घमेली शेणखत आणि 50 ते 100 ग्रॅम सुफला आळे पद्धतीने मातीत मिसळून द्यावा. शक्य असल्यास पहिल्या वर्षी पावसाळयानंतर वर्षभर पाणी द्यावे. त्यामुळे झाडाची वाढ जोमाने होते. दुसऱ्या वर्षी सर्वसाधारणपणे प्रत्येक रोपाला 50 ते 100 ग्रॅम मिश्रखत जून-जुलै महिन्यामध्ये आणि 50 ते 100 ग्रॅम युरिया ऑगस्ट महिन्यात द्यावे. तिसऱ्या आणि चौथ्या वर्षी झाडाच्या वाढीनुसार जून-जुलै महिन्यामध्ये शेणखताबरोबर 200 ते 250 ग्रॅम मिश्रखत द्यावे आणि ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये 200 ते 250 ग्रॅम युरिया द्यावा. ज्या ठिकाणी अत्यंत दुष्काळी परिस्थिती आहे अशा ठिकाणी खतांचे प्रमाण कमी ठेवावे. शक्य होईल त्या वेळी झाडांना पाणी द्यावे. झाडांना पाणी दिल्याने झाडांची वाढ चांगली होते. फळे जास्त मिळतात.
पावसाळयातील शेवटच्या पावसानंतर वाळलेले गवत किंवा वाळलेला पाला, भाताचे काड, गोठ्यातील जनावरांच्या पायाखाली आलेले कडब्याचे तुकडे आणि विशेषतः उसाचे पाचट वापरून प्रत्येक झाडाच्या आळ्यावर आच्छादन करावे. यामुळे दुष्काळी भागात झाडाच्या आळयामधील जमिनीच्या खालच्या भागात ओलावा टिकून राहतो आणि झाडाची वाढ जोमदारपणे होण्यास मदत होते. आच्छादनामुळे आळयात तणेही वाढत नाहीत. पूर्ण वाढलेल्या फळे देणाऱ्या झाडाला फळधारणेच्या काळात पाणी दिल्यास फळांचे उत्पादन वाढते. आणि फळांची गळ थांबते.
जांभूळ पिकातील आंतरपिके । जांभूळ पिकातील आंतरमशागत । जांभूळ पिकातील तणनियंत्रण :
जांभळाची लागवड प्रामुख्याने हलक्या, खडकाळ आणि डोंगरउताराच्या जमिनीत केली जात असल्यामुळे सुरुवातीची तीन ते चार वर्षे तूर, चवळी, भुईमूग, सोयाबीन, हरभरा, यांसारखी पिके खरीप हंगामात आंतरपिके म्हणून घेतल्यास जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते. जांभळाच्या बागेत पानकोबी, फुलकोबी, नवलकोल, मुळा, वांगी, गाजर, इत्यादी भाजीपाला पिके आंतरपिके म्हणून घेता येतात. तसेच पेरू, कागदी लिंबू ही फळझाडे पूरक झाडे (फिलर ट्री) म्हणून लावता येतात.
तणनियंत्रण :
तणांचा योग्य वेळी बंदोबस्त न केल्यास पिकाचे उत्पादन कमी होते. तण हे मुख्य पिकाबरोबर जमिनीतील अन्नद्रव्ये, पाणी, सूर्यप्रकाश, हवा यांसाठी स्पर्धा करते. त्यामुळे त्याचा मुख्य पिकावर अनिष्ट परिणाम होतो. म्हणून तणे वेळच्यावेळी खुरपणी करून काढून टाकावीत. हिरवळीची खते उदाहरणार्थ, ताग, धैंचा यांसारखी पिके झाडांमधील मोकळया जागेत पेरून तणांच्या वाढीस प्रतिबंध करावा. पावसाळयात शेवटच्या पावसानंतर तणे काढून, वाळलेले गवत, वाळलेला पाला, भाताचे काड, उसाचे पाचट वापरून प्रत्येक झाडाच्या आळयावर आच्छादन करावे. यामुळे जमिनीत ओलावा टिकून राहतो आणि झाडाची वाढ जोमदारपणे होण्यास मदत होते. आच्छादनामुळे आळयात तणेही वाढत नाहीत.
जांभूळ पिकाच्या महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण :
जांभळाचे झाड रोग आणि किडींना प्रतिकारक असून या फळझाडावर रोग आणि किडींचा प्रादुर्भाव अतिशय कमी प्रमाणात होतो.
फळमाशी :
ह्या किडीची अळी फळातील गर खाते. त्यामुळे फळे गळतात. फळांची प्रत खराब होते.
उपाय : बाग स्वच्छ ठेवावी. झाडाखाली पडलेली फळे गोळा करून नष्ट करावीत. फळे लहान असताना 10 लीटर पाण्यात 10 मिलिलीटर मॅलॅथिऑन ( 50 % प्रवाही) या प्रमाणात मिसळून फवारावे. अथवा 20 मिलिलीटर मॅलॅथिऑन ( 50% प्रवाही) आणि 200 ग्रॅम गूळ किंवा उसाची मळी, 20 लीटर पाण्यात मिसळून हे मिश्रण झाडावर फवारावे. उन्हाळयात सतत वखरणी आणि कुदळणी करावी. त्यामुळे फळमाशीचे मातीतील सुप्तावस्थेतील कोश नष्ट होतात.
पाने खाणारी अळी :
जांभळाच्या रोपांवर तसेच मोठ्या झाडांवर या किडीचा प्रादुर्भाव आढळतो. अळी कोवळी पाने पानाच्या मध्यरेषेत कुरतडून खाते. त्यामुळे पानाच्या फक्त शिराच शिल्लक राहतात.
उपाय : या किडीच्या नियंत्रणासाठी 10 लीटर पाण्यात 10 मिलिलीटर रोगार या प्रमाणात मिसळून फवारावे.
जांभूळ पिकातील महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण :
हा रोग ग्लोमेरेला सिंग्यूलॅटा या बुरशीमुळे होतो. बुरशीचा प्रादुर्भाव झालेल्या जांभळाच्या झाडाच्या पानावर लालसर तपकिरी रंगाचे ठिपके पडतात. फळावर बुरशीचा प्रादुर्भाव झाल्यास फळावर सुरकुत्या पडतात आणि
फळे कुजतात.
उपाय : या रोगाच्या नियंत्रणासाठी 10 लीटर पाण्यात 3 मिलिलीटर डायथेन झेड – 78 हे बुरशीनाशक मिसळून फवारावे.
जांभूळ पिकाच्या फळांची काढणी, उत्पादन आणि हाताळणी :
बियांपासून अभिवृद्धी केलेल्या जांभळाच्या झाडाला लागवडीनंतर 8 वर्षांनी फळे येतात. सर्वसाधारणपणे जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात जांभळाच्या झाडाला फुले येतात आणि एप्रिल ते जूनमध्ये फळे काढणीस येतात. फळे पूर्ण पिकल्यावर, पूर्णपणे काळसर झाल्यावर फळांची काढणी करावी. अशा जांभळाचे फळ फार नाजूक आणि नाशवंत असल्यामुळे फळांची काढणी अतिशय काळजीपूर्वक करावी लागते. फळे तोडायला उशीर झाल्यास ती जास्त पिकून झाडाखाली गळून पडतात. पक्क तसेच अती पिकलेली फळे बेचव लागतात. नंतर फळे करंड्यांत अगर टोपलीत पॅकिंग करून शहरांत पाठवितात. जांभळाच्या एका झाडापासून सुमारे 100 किलोपर्यंत फळे मिळतात. फळे झाडावरून काढल्यानंतर 2-3 दिवसांपर्यंत चांगली राहतात. त्यानंतर मात्र सडतात. जांभळाचे उत्पादनक्षम आयुष्य 60 वर्षे असते.
जांभूळ पिकाच्या फळांची साठवण आणि पिकविण्याच्या पद्धती :
जांभळाची फळे अत्यंत नाजूक आणि नाशवंत असल्यामुळे त्यांची साठवण केली जात नाही. जांभळाची फळे झाडावरच पूर्ण पिकतात. त्यामुळे त्यांच्या स्वतंत्र पिकविण्याच्या पद्धती नाहीत.
सारांश :
जांभूळ हे फळझाड कोरडवाहू परिस्थितीत वाढणारे झाड आहे. जांभळाच्या फळामध्ये शर्करा (काबोहायड्रेट्स्), लोह, खनिजे, इत्यादी अन्नद्रव्ये भरपूर प्रमाणात असतात. जांभळाच्या फळामध्ये औषधी गुणधर्म आहेत. जांभळाच्या फळझाडास उष्ण आणि दमट हवामान भरपूर किंवा कमी पाऊस चालतो. जांभळाची अभिवृद्धी दोनपेक्षा अधिक रोप देणाऱ्या बियांपासून करावी. दुष्काळी भागात झाडाला आच्छादन केल्यास जमिनीतील ओलावा टिकून राहतो. जांभळाच्या झाडावर रोग आणि किडींचा फारसा प्रादुर्भाव होत नाही. जांभूळ फळे लवकर खराब होत असल्यामुळे फळांची काढणी काळजीपूर्वक करावी. फळांपासून रस, सरबत, जेली, व्हिनेगार, मद्य, इत्यादी टिकाऊ पदार्थ तयार करता येतात.