दिंडी .Dindi पालखी ,दिंडी सोहळा ,
।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।
दिंडी :
एका विशिष्ट इष्टदेवतेच्या किंवा आराध्यदेवतेच्या तीर्थक्षेत्री, दरवर्षी एका विशिष्ट तिथिस होणाऱ्या उत्सवास हजर राहून तेथे त्या देवतेचे दर्शन घेऊन पुण्य पदरी पडावे म्हणून अभंग अथवा भजने गात, नामस्मरण करीत पायी जाणाऱ्या व्यक्तीसमूहास दिंडी असे म्हणतात…..
संत ज्ञानेश्वर महाराज,संत तुकाराम महाराज ,संत नामदेव महाराज इत्यादी संत पंढरपूर येथील विठ्ठलाच्या दर्शनाला आपल्या सहकाऱ्यांसह निघत असत… त्यांच्या हाती ध्वज, पताका इत्यादी असायचे. या मिरवणुकीस दिंडी असे म्हणण्यात येत असे…..
कालानुरूप याचे स्वरूप बदलले आहे. आता ही दिंडी वारकऱ्यांची निघते… ते आपसात वाटेत येणाऱ्या खर्चासाठी एक ठरावीक रक्कम गोळा करतात व आपल्या गावातून पंढरीस पायी जाण्यास निघतात. या वारीचा उद्देश आषाढी एकादशीला पंढरपूरला पोहचून विठ्ठलाचे दर्शन घेणे हा असतो. त्यातील बहुतेकांच्या खांद्यावर पताका/ध्वज असतो. कपाळास टिळा, गळ्यात तुळशीची माळ व मुखाने हरिनाम म्हणत वारीतील वारकरी दिंडीतील वारकरी त्यात सामील होतो…..
पंढरीची वारी ही ईश्वरी प्रेमाची एक विलक्षण अनुभूती आहे… पंढरीच्या वारीला शेकडो वर्षांचा इतिहास आहे. पंढरपुरात वर्षात होणाऱ्या चार वाऱ्यांपैकी आषाढी वारीला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेकडो संतांच्या- सत्पुरुषांच्या पालख्या पंढरीस येतात. या पालख्यांमध्ये अनेक दिंडया सहभागी असतात. वारी ही साधना असून दिंडी हे एक साधन आहे.
वारकरी संप्रदाय हा मानवी जीवनामध्ये परमेश्वरी प्रेमाची अनुभूती वारंवार घेऊन ते जीवन खऱ्या अर्थाने समृध्द व संपन्न कसे करावे याचा सुलभ राजमार्ग सांगणारा संप्रदाय आहे… हिंदू धर्माच्या निरनिराळया अवस्थांतून परिणत होत आलेला तो परिपक्व स्वरूपाचा भक्तिपंथ आहे. संत ज्ञानेश्वर- नामदेव- एकनाथ आणि संत तुकाराम यांच्या परमोच्च अनुभूतीतून व तत्त्वचिंतनातून व आचारातून वारकरी संप्रदाय समृध्द व संपन्न झालेला आहे.महाराष्ट्रात नांदलेल्या विविध संप्रदायांमध्ये ‘वारकरी संप्रदाय’ हा एक प्रमुख व अग्रणी संप्रदाय आहे… अनेक थोर अभ्यासकांनी या संप्रदायास ‘महाराष्ट्राची सत्त्वधारा’ संबोधून गौरविलेले आहे.
📿 तुम्हाला माहित आहे का ! लगेच जाणून घ्या तुळशी च्या माळेचा जप कसा करावा 📿