जात्यातले दाणे____(कथा)

।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।

जात्यातले दाणे

जात्याच्या घरघर आवाजाने शेखरला जाग आली. घड्याळात पाहीले तर पहाटेचे ४ वाजले होते. थंडी भयानक पडली होती. बाबा आणि छोटी बहीन गाढ झोपल्या होत्या. आदल्या दिवशीच भुईमूग घालायचे काम संपवले होते. त्यामुळे सगळे दमून शांत झोपले होते. मग आई का जागी?

शेखर अंगावरचे पांघरून अंगाभोवती लपेटून स्वयंपाकघरात आला. बघतो तर रॉकेलच्या बत्तीच्या उजेडात आई जात्यावर तांदुळ दळताना दिसली . माझ्या चाहूलीने जराशी थांबली.

“भल्या पहाटे हे काय चालवले आहेस ?” शेखर डोळे चोळत आईशेजारी बसला.

“अरे , भाकरेचा पीठ संपला हा. म्हणून ह्या दळाप घातलय” चेहऱ्यावरचा घाम बाजूला करत आई बोलली.

भर थंडीत पण माऊली घामाने डगमगली होती.

“ तेतूर, गिरणवाल्याची उधारी पण लय झाली हा, लाज वाटता सारख्या उधार दळून हाडूक”

“ आई, म्हणून काय झाले, आम्ही एक दिवस पेज खाल्ली असती” शेखर जात्याच्या खुंट्याला हात लावत बोलला आणि दळायला मदत करू लागला.

लहानपणी शेखर दळण चालू असताना. जात्याशेजारी बसून राहायचा. गरगर फिरणाऱ्या जात्याबरोबर आईचा हात दिसेनासा व्हायचा तेव्हा रडायला लागायचा. मग सुमती आपले दळण थांबवायची. आजही दोघांनी खुंटा पकडल्यावर जात्याने वेग घेतला होता. भरभर पांढरे पीठ बाहेर पडत होते. दोघांचे हात एक झाले होते.

“ तु खाशीत पेज, पण हेंका भाकरी लागताच, बायोक पण डब्यात व्हयीच ना?” आईचे बोलणे ऐकून झोपून राहीलेल्या बहीनीचा राग आला.

बायो घरात छोटी होती आणि शेखर थोरला. शेखरची आईवर खुप माया होती. अगदी लहान असल्यापासून तो आईला मदत करायचा. त्याची लहानपणाची लूडबूड सुमतीला मोहून टाकायची. त्याला हवा तसा गोंधळ घालायला द्यायची आणि तो पसारा स्वतः कौतूकाने आवरायची. जसजसा शेखर मोठा होत गेला, तसा वयापरत्वे त्याच्या कामात अचुकता यायला लागली. सगळी घरकामे त्याला जमू लागली. अगदी सारवणापासून भांडी विसळायची कामे बेमालूम करायचा. याउलट बायो… उनाड पोरासारखी उंडगत असायची. लोक बायोला मुलगा आणि शेखरला मुलगी बोलायचे.

लहाणपणापासून मुंबईत वाढलेली सुमती लग्नानंतर २ वर्षातच कायमची गावी स्थायीक झाली. हळूहळू जमतील तशी शेतीची कामे शिकू लागली. घरची परिस्थिती हलाखीची असून पण कधी तक्रार केली नाही. आज मुलं मोठी झाली होती. आर्थिक परिस्थितीत काहीच फरक पडला नव्हता. पण संसाराचा गाढा बऱ्यापैकी रेटला होता. बायोने जमेतेम बारावी शिकून शिक्षणाला रामराम केला होता. पण शेखरने मात्र पदवी पर्यंत बाजी मारली होती. आणि आता नोकरीसाठी मामाकडे मुंबईला जाणार होता.

घरी हा निर्णय झाल्यापासून सुमती कधी नव्हे ती कावरीबावरी झाली होती. तिला आपला मुलगा आपल्या सोबत राहावा असं वाटत होतं. एक दोनदा ही खंत नवऱ्याकडे बोलून दाखवली. पण त्याचा काही उपयोग झाला नव्हता.

आईचे वागणे शेखरला कळेना. एकदा दोनदा विचारायचा प्रयत्न केला पण पराकोटीचे उसणे हसू आणून तीने सांगायचे टाळले होते.

शेखरचा मुंबईला जायचा दिवस जस जसा जवळ यायला लागला, तशी ती तसल्याच मनस्थितीत मुलाला लागणाऱ्या सर्व वस्तू सामान गोळा करू लागली.

शेखरला एवढच कळतं होतं की, मुंबईला जाउन चार पैसे कमवणार होता आणि आपल्या आई वडीलांना सुखात ठेवणार होता. आता पर्यंत आई बापाने खुप कष्ट उपसले होते. आता आपली पाळी होती. खुप कष्ट करणार होता. बहीणीचे लग्न, गावी छानसं घर , आई बाबांना देवदर्शन अशी छोटी छोटी स्वप्न उराशी बाळगून होता. पण आपण इथून गेल्यावर आपल्याला घरच्यांची आठवण येणार होती त्याचं काय करायच?

मुंबईला आल्यावर चुकले, तर ओरडायला बाबा नसणार होते. स्वत:च्या ताटातली भाकरी देणारे बाबा नसणार होते. नसणार होती त्यांची माया.

कामात लुडबूड करणारी, सतत काम चुकवणारी, भांडणारी, खाऊ मध्ये छोटी असल्याचा फायदा घेत अधिकचा वाटा घेणारी, तरीही शेखरला प्रिय असलेली बहीन नसणार होती.

आणि आई.. तिच्या विना आपण राहू का? याचे उत्तर गेले आठ दिवस शोधण्यातच रात्री गेल्या होत्या. आपण मुंबईला नोकरीसाठी जाणार म्हणून सगळ्यांना सागंत सुटली होती. खुप आनंदात होती ती. असं आपल्याला वाट्टेय का? मला मुंबईला पाठवण्या साठी ती खरचं खुश आहे का ?

शेखर कुशीवर कुस बदलत होता. झोप काही येत नव्हती. खुप उशीरा डोळा लागला. पहाट झाली असावी. शेखर जागा झाला. स्वयंपाक घरात बत्ती पेटताना दिसली. आंगावरचे पाघंरून झटकत चुलीच्या खोलीत आला. आई कुठे दिसत नव्हती. आज पण दळणाचा घाट घातला होता. दळण पूर्ण करून कुठे गेली असेल. न्हानीकडे तर नसेल ना?

तिथे जाऊन आला. तिथेही नव्हती. कुठे गेली असेल. बाहेर जाणं शक्यच नव्हते. वळेत परत आला देवघरातून प्रकाशाची एक तिरीप बाहेर पडताना दिसले. हळूच दार लोटून आत गेला. पाठमोरी आई देवाजवळ बसून होती.

देवाजवळ बसून सकाळी सकाळी काय करतेय. शेखर विचारात पडला. आईला भल्या पहाटे असं देवाजवळ बसलेले कधीच पाहीले नव्हते. आईला न कळायला देता त्याला जाणून घ्यायचे होते. स्वत:हून ती काही सांगणार नव्हती. आईचा चेहरा दिसत नव्हता म्हणुन शेखर पडवीत आला. पडवीच्या खिडकीतून देवघरात डोकावले. आतील दृश्य पाहून शेखरला गलबलून आले. आईच्या डोळ्यातुन अश्रूंच्या धारा लागल्या होत्या. शेखरचा फोटो घेऊन देवाजवळ काहीतरी आळवत होती. त्या क्षणी आईजवळ जाऊन तिला विचारावे. तिला जवळ घ्यावं, तिचे अश्रू पुसावे अस वाटलं, पण ती काही सांगणार नव्हती, सारवासारव करून टाळणार होती. का बरं रडत असावी? शेखरने कान देवून ऐकण्याचा प्रयत्न केला.

जे बोलत होती ते ऐकून शेखर हडबडून गेला. “ देवा माझ्या शेखर ला माझ्या पासून नको दूर नेऊस” सारखे सारखे तसेच बोलत होती. आतापर्यंत त्याने आईला असं कधी रडताना पाहीले नव्हते. माझी प्रगती होणं तिला आवडणारच होतं. मग अशी का बोलतेय. माझा मुंबई ला जाण्याचा निर्णय सर्वांचा होता. शेखर तिथून परत वळेत येऊन झोपला. खूप वेळाने आई तोंडावरून पदर घेऊन बाहेर आली.

शेखरला झोप काही येत नव्हती. उठून चुलीकडे जाऊन बसला.

एव्हाना उजाडत आलं होतं. सुमतीने परातीत पीठ मळायला घेतले होते. शेखरने आईकडे पहिले. तिचा चेहरा पार उतरला होता. तशातच हसून शेखरला बोलली, “आज कणकवलेक जाऊन ये, काय व्हया नको ता घेवन ये तुका , चार दिवसच ऱ्यवले ना.”

शेखर काही बोलला नाही, तशी उठली आणि फळीवरचा जर्मनचा डबा खाली काढला आणि त्यातील 1000 रुपये त्याच्या हातावर ठेवले. आईने दिलेले एवढे पैसे पाहून शेखर चक्रावला.

“ आई खरं सांग, कालपर्यंत दळण दळायला पैसे नव्हतें, आज एवढे पैसे आले कुठून?

सुमती काही न बोलता भाकरी थापू लागली.

“ आई काय बोलतोय मी? मला पैसे कुठून आणलेस ते कळायला हवं.”

“ तुका काय करूचा हा” एवढे बोलून परत ताव्यावरची भाकरी परतू लागली.

आई सांगणार नव्हती हे कळून चूकला. आईने खाली काढलेला डबा उघडून पहिला, तर त्यात अजून 3000 रुपये होते. आणि त्यात एक बिल ज्याच्यावर आईने आपले मंगळसूत्र गहाण ठेवल्याचे नमूद होते.

आता मात्र सुन्न व्हायची वेळ आली. काहीच न बोलता आईने दिलेले 1000 रुपये पण डब्यात ठेऊन बाहेर पडला. शेखर बाजारात आला, तेव्हा परशा जागेवर नव्हता. थोडा वेळ तिथेच थांबला. परशा दुकान लावून कुठे तरी गेला होता. परशा आणि शेखर शिकायला दहावी पर्यंत सोबत होते. परशाचे कुटुंब निपाणी हुन पोटापाण्यासाठी कणकवलीला स्थायिक झाले होते. त्याच्या बाबांचा भाजीचा धंदा होता. परशा दहावीत नापास झाला आणि बापाला मदत करू लागला. परशाने जरी वेगळा मार्ग स्वीकारला असला, तरी शेखरच्या संपर्कात होता. त्यांच्या भेटी गाठी व्हायच्या. शेखर कायमचा मुंबईला जातो हे समजल्यावर तोही थोडा नाराज होता.

इतक्यात परशा आला. “ मित्रा बस कि लेका.” परशा भाजीच्या दुकानातली खुर्ची समोर करत बोलला. शेखर बसला. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या.

“ परशा तुला काही तरी मला सांगायचे आहे”

“ मग सांग कि, न्हाई कोणी म्हणलय का”?

“ कसं सांगू?

“ अरे मला मित्र मानतोस कि न्हाई, मग सांग कि”

“मला भाजीच्या धंदा करायचा आहे, तू मदत करशील?”

शेखरचे हे वाक्य ऐकून परशाला थोडं नवल वाटले. हा एवढा पदवीधर झालेला भाजीचा धंदा करणार असं वाटले नव्हते.

“ बोल, काय मदत पायजेल तुला?”

“ माझ्याकडे एक पैसा नाहीये, फक्त जी काय आली आहे ती फक्त हिम्मत आहे.”

“ बस लेका, अजून काय लागतंय, हिम्मतच मेन हाय, पैका कसा बी उभा राहतोय”

परशाचे आधारयुक्त बोलणे ऐकून शेखरला खूप बरे वाटले. दोघांचे बराच वेळ बोलणे चालले असतानाच परशाचा बाप पण तिथे आला, परशाने शेखरचे म्हणणे त्याच्या कानावर घातले. आनंदाची गोष्ट म्हणजे त्या गोष्टीला परशाचा बाप ही तयार झाला.

नवीन दुकानाच्या कामाला त्याच दिवस पासून सुरवात झाली. परशा ने त्याच्या माणसांना कामाला लावले. त्याच्या दुकानाच्या बाजूलाच शेखरच्या दुकानाची मांडणी केली. रस्त्यावरच्या दुकानाच्या मांडणीला कितीसा वेळ लागणार. प्लास्टिक कापड टाकून छोटेस तंबू उभा केला. आता फक्त माल भरायचा बाकी होता.

कोल्हापूरहून येणारा फ्रेश माल दुसऱ्या दिवशी सकाळीच येणार होता. शेखर निघताना परशाचा एकच वाक्य बोलला. “ शेखर माझं एक सांगन हाय बघ, तु मेहनत आणि प्रमाणिकपणात कसर करू नकोस, थोडे दिस त्रास हुईल बघ, पुढं सगळं चोकट हुईल.” परशा च्या बापाचे बोल शेखर लक्षात ठेवले.

शेखर दुपारी घरी परतला तेव्हा, आई बाबा आणि बायो तो येण्याचीच वाट बघत होते. सकाळी न सांगता गेलेला पोर कुठे गेला असेल हा, ह्या काळजीने पोखरून गेले होते ते. त्याला पाहताच त्यांचे काळवंडलेले चेहरे खुलले होते. घामाने डबडबलेल्या शेखरला अगोदर बसू दिले. थंडगार पाणी पोटात केल्याबरोबर शेखरला बरे वाटले. जेवनं झाली. सगळे वळेतच बसले होते. शेखरने ओळखले, हीच योग्य वेळ आहे, आई बापाला न विचारता पहिल्यांदा खूप मोठा निर्णय घेतला होता त्याने. थोडी अपराधी पणाची भावना होतीच,

“ आई, बाबा मी भाजीचा धंदा करायचा ठरवला आहे”

शेखरचे हे बोलणे सगळ्यांना अनपेक्षित होते. बाप मध्ये काही बोलणार इतक्यात शेखरने थांबवले. “ मी हा निर्णय स्वखुशीने घेतलाय, तुम्हाला सोडून मी कुठेही जाणार नाही, ज्यामुळे माझ्या आईची , बाबांची घुसमट होईल, मला असा मुलगा नाही व्हायचा नाही कि, जो आई वडिलांनी वाढवल्यावर स्वतःच्या करियर साठी त्यांना सोडून जाईल. हीच ती वेळ असते ज्या वेळी आपले जन्मदाते आपल्याकडून अपेक्षा करत असतात, मला एक कळलेय, आपले आई बाबा त्यांना स्वतःला काय वाटते याची कधीच वाच्यता करत नाहीत. भले स्वताला त्रास होउदे, पण मुलांचे भले व्हायला पाहिजे, आम्ही मुलं मात्र कर्म भूमी निवडताना माता पित्यासह जन्मभूमी विसरतो, मला तसं करायचे नाहीये, शेवटपर्यंत तुमच्या सोबत राहायचे आहे, भले पैसा कमी मिळेल, जो मिळेल तो तुमच्या सोबत खर्च करण्यात जो आनंद असेल तो मला परदेशात नाही मिळणार. यापुढे तुमच्या डोळ्यात मला आनंदाश्रू शिवाय काही दिसायला नकोय. आई तू आज सकाळी वागलीस त्यांमुळे हा निर्णय घेतला नाहीये, तर तिथे फक्त माझ्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले.

लहानपणी मुलं आई वडिलांच्या पंखाखाली मस्ती करतात, चिडतात, हट्ट करतात पण ह्या सगळ्या बाल लीला समजून आई बाप मुलांना लहानाचे मोठे करतात. काळजी घेतात, जपतात , अगदी तसंच मुलं मोठी झाली की आई वडिलांची अपेक्षाही मूलांप्रमाणे असते, तेही लहान मुलाप्रमाणे हट्ट करतात, रागावतात, चिडचिड करतात, आपण मात्र त्याला साठी बुद्धी नाठी असं नाव देऊन मोकळे होतो. समजून घेत नाही, शेवटी एकच सांगतो, आई बाप हे जात्यातल्या दाण्या सारखे असतात, स्वतः दळत चिरडत मुलांना सुख देत असतात, पण त्यांच्या नशिबी परत दाणे होणं नसते.”

शेखरच्या या बोलण्याने त्याचे आई बाप पार गलबलून गेले होते, अगदी निशब्द झाले होते. कारण त्यांच्या मनातील भावना शेखर बोलत होता.

Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )