जाणून घ्या कवठ लागवड बद्दल संपूर्ण माहिती तेही एका क्लीक मध्ये (Kaitha Lagwad Mahiti Kavath Sheti) – Kaitha Farming

कवठ लागवड |Karvand Lagwad | Karvand Sheti |कवठ पिकाचे उगमस्थान, महत्त्व आणि भौगोलिक प्रसार । कवठ लागवडी खालील क्षेत्र । कवठ पिक उत्पादन |कवठ पिकास योग्य हवामान । कवठ पिकास योग्य जमीन । कवठ पिकाच्या सुधारित जाती । कवठ पिकाची अभिवृद्धी । कवठ पिकाची लागवड ।कवठ लागवडीस योग्य हंगाम । कवठ लागवडीस योग्य लागवडीचे अंतर ।कवठ पिकास खत व्यवस्थापन । कवठ पिकास पाणी व्यवस्थापन ।कवठ पिकातील आंतरपिके ।कवठाच्या फळांची काढणी, उत्पादन आणि विक्री ।

।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।

कवठ लागवड |Karvand Lagwad | Kavath Sheti |

कवठ हे एक महत्त्वाचे कोरडवाहू फळझाड आहे. कवठाची झाडे अत्यंत काटक असतात. कवठाची फळे ग्रामीण भागात लोकप्रिय आहेत. कवठाच्या झाडाच्या लाकडाची उपयुक्तता, कवठाच्या फळाचे औषधी उपयोग, कवठाच्या फळावर प्रक्रिया करून तयार होणारे विविध पदार्थ यांमुळे कवठ या फळझाडाच्या स्वतंत्र लागवडीस भरपूर वाव आहे.

कवठ पिकाचे उगमस्थान, महत्त्व आणि भौगोलिक प्रसार ।

उगमस्थान :

कवठ या फळझाडाचे उगमस्थान भारतात आढळते. भारत, म्यानमार, श्रीलंका, इत्यादी देशांत जंगल भागात कवठाची झाडे वाढलेली दिसून येतात. भारतात महाराष्ट्र, गुजरात, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, कर्नाटक, धारवाड, कोकण या भागातील मध्यम कोरड्या हवामानाच्या जंगल भागात कवठाची झाडे वाढलेली आढळतात.

महत्त्व :

कवठाचे फळ कठीण, गोल आणि जड असते. कवठाच्या फळामध्ये भरपूर बी आणि गुलाबी करड्या रंगाचा आंबटगोड गर असतो. फळांतील गराचा उपयोग चटणी, कोशिंबीर, पंचामृत, जेली, जाम, मुरंबा, सरबत, इत्यादी प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करण्यासाठी होतो. कवठाच्या 100 ग्रॅम खाण्यायोग्य भागात खालील अन्नघटक असतात.

अन्नघटकप्रमाण (%)अन्नघटकप्रमाण (%)
पाणी70.0शर्करा (कार्बोहायड्रेट्स्)15.5
प्रथिने (प्रोटीन्स)7.3स्निग्धांश (फॅट्स)0.6
खनिजे2.0तंतुमय पदार्थ5.2
चुना (कॅल्शियम)0.1स्फुरद0.1
लोह0.6रिबोफ्लेवीन0.2
उष्मांक (कॅलरी)97
कवठाच्या फळाच्या 100 ग्रॅम खाण्यायोग्य भागातील अन्नघटकांचे प्रमाण

कवठाच्या कच्च्या आणि पक्व झालेल्या फळांमध्ये औषधी गुणधर्म असतात. कवठाचे पक्व फळ पाचक आणि अर्जीर्णनाशक असते. कवठाच्या कच्च्या फळातील गराचा उपयोग जुलाब आणि अतिसारावर परिणामकारक ठरतो. कवठाच्या पानांमध्ये सुगंधी तेल असते. कवठाच्या झाडापासून डिंक मिळतो. कवठाच्या झाडाचे लाकूड घरबांधणीसाठी, बैलगाडीची चाके, शेतीची अवजारे यांसाठी वापरले जाते.

कवठ लागवडी खालील क्षेत्र । कवठ पिक उत्पादन |

कवठाच्या फळझाडाची स्वतंत्रपणे लागवड केली जात नाही. त्यामुळे या पिकाच्या क्षेत्र आणि उत्पादन यांविषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही. प्रामुख्याने जंगल भागात आणि शेताच्या बांधावर ही झाडे वाढलेली दिसतात. अलीकडे हे फळझाड लावण्याकडे कल वाढत आहे.

कवठ पिकास योग्य हवामान । कवठ पिकास योग्य जमीन ।

कवठाला उष्ण आणि कोरडे हवामान चांगले मानवते. तरीही विविध प्रकारच्या हवामानात कवठाची झाडे वाढलेली दिसतात. आंध्रप्रदेश, कर्नाटक, धारवाड, कोकण या भागातील मध्यम कोरड्या हवामानाच्या जंगल भागात कवठाची झाडे मोठ्या प्रमाणात वाढलेली आढळतात.
कवठाचे झाड अत्यंत हलक्या, बरड, डोंगराळ जमिनीत तसेच नदीकाठच्या पोयट्याच्या, मध्यम काळ्या आणि भारी जमिनीत चांगले वाढलेले दिसते. क्षारयुक्त अल्कली जमिनीत हे झाड चांगले वाढते. या झाडाच्या वाढीसाठी मध्यम खोलीची, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन योग्य असते.

कवठ पिकाच्या सुधारित जाती ।

कवठाच्या प्रचलित सुधारित जाती उपलब्ध नाहीत. मराठवाडा कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनी निरनिराळ्या ठिकाणच्या कवठांचा अभ्यास केल्यानंतर त्यांना असे आढळून आले, की औरंगाबाद येथील हिमायत बागेतील 19 क्रमांकाच्या कवठाच्या झाडावरच्या फळांची प्रत उत्तम आहे आणि त्यावर फळेही भरपूर आहेत. त्यांनी या झाडाला हिमायत बाग 19 असे नाव दिले. या जातीची वैशिष्ट्ये म्हणजे फळाचे सरासरी वजन 350 ग्रॅम, बियांचे वजन 8 ग्रॅम, गराचे वजन 224 ग्रॅम, सालीचे वजन 118 ग्रॅम, साल आणि गराचे प्रमाण 1: 1.8 इतके असते.

कवठ पिकाची अभिवृद्धी । कवठ पिकाची लागवड ।

कवठाच्या झाडांची अभिवृद्धी बियांपासून रोपे तयार करून आणि कलमे तयार करून करतात. कवठाचे भेटकलम बांधण्याचे तंत्र कृषी महाविद्यालय, पुणे येथे प्रथम विकसित करण्यात आले. कवठाची डोळे भरून रोपे तयार करता येतात, असे मराठवाडा कृषी विद्यापीठातील संशोधनात सिद्ध झाले आहे.. बियांपासून रोपे तयार करण्यासाठी कवठाची उत्तम दर्जाची आणि भरपूर फळे देणाऱ्या झाडाची पक्व फळे घेऊन त्यांच्या बिया काढाव्यात. पक्व फळे तोडून संपूर्ण गर बाहेर काढावा. हा गर पाण्यात घालून हाताने चोळावा आणि बिया वेगळ्या कराव्या. बी सावलीत सुकवून पेरणीसाठी वापरावे. बियांची पेरणी लवकर करावी. कवठाच्या बिया जास्त काळ साठविल्यास त्यांची उगवणक्षमता कमी होते. रोपे तयार करण्यासाठी 15 x 20 सेंटिमीटर आकाराच्या पॉलिथीन पिशव्या वापराव्यात. पिशवीच्या खालील भागात 7-8 छिद्रे पाडावीत. नंतर या पिशव्या चांगले कुजलेले शेणखत आणि माती यांच्या मिश्रणाने भराव्यात. प्रत्येक पिशवीमध्ये एक बी पेरावे. बियांची पेरणी जानेवारी ते मार्च महिन्यात करावी. पेरणीनंतर 15-20 दिवसांत बियांची उगवण होते. रोपे 30 ते 40 सेंटिमीटर उंचीची झाल्यानंतर जुलै महिन्यात रोपांची शेतात लागवड करावी.

भेटकलमे तयार करणे ।

कवठाचे भेटकलम तयार करण्यासाठी, प्रथम चांगल्या निरोगी कवठाच्या झाडाच्या बियांपासून खुंटरोप तयार करावे. त्यासाठी जून महिन्यात 20 सेंटिमीटर आकाराच्या 300 गेजच्या पॉलिथीनच्या पिशव्या घेऊन, त्यांना खालच्या अर्ध्या भागात पेपर पंचने 6-8 छिद्रे पाडावीत. या पॉलिथीनच्या पिशव्या 1 भाग चांगले कुजलेले शेणखत आणि 3 भाग पोयटा मातीने भराव्यात. शेणखत व पोयटा मातीच्या मिश्रणात लिंडेन पावडर (10%) मिसळावी. प्रत्येक पिशवीत एक टपोरे बी पेरून लगेच भरपूर पाणी द्यावे. पिशव्यांना रोज पाणी द्यावे. बी पेरल्यानंतर 15 ते 20 दिवसांत बियांची उगवण होते. कवठाच्या रोपांची वाढ सावकाश होते. रोपांच्या जोमदार वाढीसाठी अधूनमधून पिशव्या खुरपून अगदी थोडाथोडा युरिया द्यावा आणि ताबडतोब भरपूर पाणी द्यावे. पेन्सिलच्या जाडीचे बुंधे तयार होऊन भेटकलम करण्यायोग्य रोपे तयार होण्यासाठी सुमारे 1 ते 2 वर्षे लागतात.
भेटकलमाच्या डोळकाडीसाठी मोठ्या आकाराचे, निरोगी आणि भरपूर फळे देणारे झाड निवडावे. या निवड केलेल्या झाडाच्या उंचीच्या साधारणपणे निम्म्या उंचीवर लाकडी वासे अथवा बांबू वापरून ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात मांडव तयार करावा, त्यामुळे झाडाच्या सर्व बाजूंना शेंड्याकडील फांद्यांवर कलमे बांधता येतात. मांडवाच्या एका बाजूला शिडी लावावी. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात साधारणपणे पेन्सिलच्या जाडीइतके खोड असलेली खुंटरोपे मांडवावर ठेवावीत. कलमे करण्यासाठी डोळकाडीसाठी झाडाच्या शेंड्याकडील फांद्या निवडाव्यात. या फांद्या टोकाकडून पाठीमागे 30 ते 45 सेंटिमीटर अंतरावर पेन्सिलच्या जाडीइतक्या जाड असाव्यात. कलमाकडील आणि खुंटरोपावरील कलम करायच्या भागातील पाने आणि काटे काढून टाकावेत. कलमकाडीवर आणि खुंटरोपावर पाच ते सहा सेंटिमीटर लांबीचे काप घ्यावेत. नंतर खुंटरोपावरील काप घेतलेला भाग कलमी काडीवरील काप घेतलेल्या भागावर जोडून हा कलम केलेला भाग सुतळीने किंवा केळीच्या सोपटाने चांगला घट्ट बांधावा. अशा प्रकारे कवठाची भेटकलमे बांधून घ्यावीत.
कलमे केल्यावर खुंटरोपाच्या सर्व पॉलिथीन पिशव्यांना लगेच आणि पुढे दररोज भरपूर पाणी द्यावे. साधारणपणे तीन ते चार महिन्यांनंतर कलमांचा जोड जुळून पूर्णपणे एकजीव होतो. त्यानंतर मातृवृक्षाचे कलम करण्यासाठी वापरलेल्या फांदीवर जोडाच्या खाली सुमारे दोन सेंटिमीटर अंतरावर खोडाच्या जाडीच्या एकतृतीयांश जाडीचा खोल काप चाकूने घ्यावा. त्यानंतर सुमारे पंधरा दिवसांनी हा काप खोडाच्या जाडीच्या निम्म्यापर्यंत घ्यावा आणि पुढे आणखी पंधरा दिवसांनी सिकेटरने पूर्ण काप घेऊन कलम मातृवृक्षापासून अलग करावे.
नंतर ही सर्व कलमे दुसऱ्या झाडाखाली पावसाळा सुरू होईपर्यंत ठेवावीत; मात्र पावसाळ्यात उन्हात ठेवावीत. दुसऱ्या झाडाखाली कलमे ठेवल्यावर सुमारे एक ते दीड महिन्यांनी खुंट म्हणून वापरलेल्या रोपांचे शेंडे कलमांच्या जोडाच्या किंचित वर छाटावेत. पावसाळ्यापर्यंत या तयार कलमांना दररोज पाणी द्यावे. पावसाळा सुरू होताच ही कलमे कोरडवाहू लागवडीसाठी वापरावीत.
कवठाच्या रोपांची अथवा कलमांची लागवड करण्यासाठी 10 मीटर अंतरावर खुणा करून 60 X 60 X 60 सेंटिमीटर आकाराचे खड्डे घ्यावेत. खड्ड्यांच्या तळाशी थोडा वाळलेला पालापाचोळा, गवत किंवा उसाचे पाचट टाकावे. त्यात लिंडेन पावडर (10%) मिसळावी. नंतर खड्डे चांगले कुजलेले शेणखत, एक किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि माती यांच्या मिश्रणाने भरावेत. शेणखत-मातीच्या मिश्रणात लिंडेन पावडर (10%) मिसळावी. पावसाळा सुरू झाल्यानंतर प्रत्येक खड्डयात एक कलम अथवा रोप लावावे.

कवठ लागवडीस योग्य हंगाम । कवठ लागवडीस योग्य लागवडीचे अंतर ।

कवठाच्या रोपांची अथवा कलमांची लागवड चौरस पद्धतीने 8×8 मीटर किंवा 10 X 10 मीटर अंतरावर करावी. रोपांची लागवड पावसाळा सुरू झाल्यानंतर करावी.

कवठ पिकास खत व्यवस्थापन । कवठ पिकास पाणी व्यवस्थापन ।

कवठाच्या झाडाला खतांच्या मात्रा किती प्रमाणात द्याव्यात याबाबत फारसे संशोधन झालेले नाही. तथापि, कवठाच्या झाडाला लागवडीच्या वेळी 500 ग्रॅम सुपर फॉस्फेट, 500 ग्रॅम 7: 10 : 5 हे मिश्रखत आणि 500 ग्रॅम निबोंळी पेंड द्यावी.कवठाच्या झाडाची वाढ प्रामुख्याने पावसाच्या पाण्यावर होते कलमांच्या अथवा रोपांच्या लागवडीनंतर लगेच पाणी द्यावे. पावसाळा संपल्यानंतर जमिनीतील ओलावा टिकवून प्रत्येक रोपाभोवती आळयात गवताचे आच्छादन करावे.

कवठ पिकातील आंतरपिके ।

लागवडीनंतर सुरुवातीच्या 2-3 वर्षे कवठाच्या झाडामध्ये श्रावण घेवडा, गवार, वाटाणा, भुईमूग, मूग, उडीद, मटकी ही पिके आंतरपिके म्हणून घ्यावीत. कवठाची झाडे मोठी झाल्यानंतर तूर, करडई, एरंडी, चवळी, झेंडू, शेवगा, कढीपत्ता, इत्यादी पिके आंतरपिके म्हणून घ्यावीत.

कवठाच्या फळांची काढणी, उत्पादन आणि विक्री ।

बियांपासून रोपे तयार करून लागवड केलेल्या कवठाच्या झाडास 9-10 वर्षांनी फळे येण्यास सुरुवात होते. कलमी झाडाला 5-6 वर्षांनी फळे येतात. कवठाच्या झाडाला जूनच्या महिन्यात फुले येण्यास सुरुवात होते आणि नोव्हेंबर ते जानेवारी या काळात फळे पक्क होतात. काही भागात फेब्रुवारी ते मे या कालावधीत फुले येतात आणि ऑक्टोबरमध्ये फळे काढणीस तयार होतात. कवठाची फळे पूर्ण तयार झाल्यानंतर फळांची साल पांढऱ्या रंगाची होते.
कवठाची साल जाड आणि दगडासारखी कठीण असते. ही फळे पोत्यात भरून बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवावीत. कवठाच्या 10 ते 15 वर्षांच्या झाडापासून सुमारे 250 ते 500 फळे मिळतात.

सारांश ।

कवठ हे फळ शहरी आणि ग्रामीण भागात लोकप्रिय आहे. कवठाच्या झाडाला उष्ण आणि कोरडे हवामान चांगले मानवते. अनेक प्रकारच्या जमिनींत कवठाची झाडे चांगली वाढतात. कवठाच्या झाडाची अभिवृद्धी बियांपासून रोपे तयार करून किंवा भेट कलम पद्धतीने करतात. कवठाच्या रोपांची लागवड चौरस पद्धतीने 10 मीटर अंतरावर करावी. कवठाच्या रोपाची वाढ अतिशय सावकाश होते. म्हणून सुरुवातीच्या काळात रोपांना योग्य प्रमाणात खते आणि पाणी द्यावे. जानेवारी-मार्च या काळात कवठाची फळे काढणीस तयार होतात. कवठाच्या पूर्ण वाढलेल्या एका झाडापासून 250 ते 500 फळे मिळतात. त्यांचे वजन सुमारे 150 किलो भरते.

Recent Post

Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )