।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।
काळाराम मंदिर पंचवटी (Kalaram Temple Panchavati)
नासिक.. पंचवटी च्या काळाराम मंदिराचा अचंबित करणारा इतिहास…
बाजीराव पेशवे मोहिमेवर होते,त्यांनी नासिरजंगाचा पराभव करुन, त्यास शरण येण्यास भाग पाडले.पेशवे पुण्यास परत न येता खरगोण परीसरात गेले. जहागिरीची काही व्यवस् था लावून नर्मदेच्या किनारी रावेरखेडी येथे आले. त्यांना खूप थकवा जाणवत होता.मस्तानीच्या आठवणींनी मन कासावीस होत होते. अंगात ताप असतानाच नदीच्या पाण्यात सूर मारला, प्रचंड भोवऱ्यात सापडले, भोवऱ्यातून बाहेर तर काढले, पण मृत्यूच्या कराल दाढेतून सुटू शकले नाही. बाजीराव पेशव्यांचे ज्येष्ठ पुत्र नानासाहेब पेशवे होते. त्यांची पत्नी गोपिकाबाई, पेशव्यांचे सावकार भिकाजीपंत गोखले( रास्ते) यांची कन्या होती.
शाहू महाराजांनी बाजीराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर नानासाहेबांना पेशवेपद दिले. गोपिका आता श्रीमंत गोपिकाबाई पेशवे झाल्या. त्यांना विश्वास, माधव, नारायण हे तीन मुले झाली. विश्वासराव पानिपतच्या युध्दात मारला गेला. त्या नंतर थोड्या दिवसातच क्षयाच्या आजाराने नानासाहेबांचा मृत्यू झाला. नानासाहेबांनंतर पेशवेपद कोवळ्या वयात द्वितीय पुत्र माधवरावांना देण्यात आले. माधवराव पेशवे कारभार व्यवस्थित चालवत होते. रघुनाथराव पेशवे नानासाहेबांचे लहान भाऊ होते, ते आधी निजामाला मदत मागायला गेले होते, पण नंतर त्यांनी निजामाशी संबंध तोडून टाकले.निजामानी चिडून माधवराव पेशवे,रघुनाथ पेशवे नसताना पुणे लूटले, पण निजामाला मदत करणारे आप्तस्वकीय म्हणजे मल्हारराव रास्ते, त्यांच्या आईचे सख्खे भाऊ होते, त्यानी त्यांच्या मामांना ५००० रुपये दंड केला. गोपिकाबाई माधवराव पेशव्यांना म्हणाल्या, “तू नात विसरलास!नशीब आपले नाते नाही विसरला!दंड मागे घे!”त्यांना वाटले आपला शब्द मोडण्याची, मुलाची हिंमत होणार नाही. पेशवे म्हणाले, “आम्ही जेव्हा पेशवे पदावर बसून निर्णय देतो, तेव्हा तो पेशव्यांचा निर्णय असतो, त्यावेळेस कोणतही नाते लक्षात घेतले जात नाही”.ते त्यांच्या निर्णयावर ठाम राहिले.
“जिथे आमच्या शब्दाला मान नाही, तेथे आम्ही पाणी सुध्दा पिणार नाही. रास्ते घराण्याचा अपमान सहन करणार नाही. आम्ही आता गंगापूर गावी जावून रहाण्याचा निर्णय घेतला आहे.”
गोपिकाबाईंचा हट्टी, करारी, स्वाभिमानी स्वभाव माधवरावांना माहित होता.त्यांचा शब्द म्हणजे दगडावरची रेघ. त्यांनी गोपिकाबाईंबरोबर त्यांचे लहान बंधू गंगाधरपंत यांना त्यांच्याबरोबर काळजी घेण्यासाठी पाठवले. त्या नाशिकला निघाल्या तेव्हा माधवराव पेशव्यांचा भावनेचा बांध फुटला. ते हमसाहमशी रडू लागले. पेशवाईचे वैभव सोडून, मुलाला सोडून आई गंगापूर गावी आल्या.
त्र्यंबकेश्वर मंदिराचे बांधकाम श्रीमंत नानासाहेब पेशव्यांनी सुरु करुन ५- ६ वर्षे झाली होती. त्याला पूर्ण होण्यास दहा वर्ष तरी लागणार होती.
नानासाहेबांचे भाऊ, रघुनाथ पेशव्यांना पेशवे पदाची इच्छा होती, ती काही पुरी झाली नाही. ते पुणे सोडून नाशिक जवळच तीन कोस अंतरावर, चावंडस या गोदातीरावरच्या गावी रहायला आले होते. आनंदीबाईंनी गावातील श्री गणेशाला नवस केला होता, “मुलगा होऊ दे ,मोठे मंदिर बांधू”. नवस फळास आला, मुलगा झाला. सगळीकडे आनंदीआनंद झाला, म्हणून गावातील लोकांच्या संमतीने रघुनाथरावांनी ‘चावंडस’ हे गावाचे नाव बदलून ‘आनंदवल्ली’ ठेवले. आनंदीबाईंच्या नावावरून पण ‘आनंदवल्ली’ नाव पडले असे मानतात. गावातील श्री. गणपती नवसाला पावतो म्हणून सर्वजण त्या गणपतीला “नवश्या गणपती” म्हणू लागले. गोपिकाबाईंना औषधाची बरीच माहिती होती.
गोपिकाबाई पंचवटीत गेल्या. तेथे त्यांनी लाकडांच्या ओंडक्यांनी व फळ्यांनी बांधलेले प्रभू रामचंद्रांचे लहानसे मंदिर पहावयास मिळाले. आत राम, सीता व लक्ष्मण यांच्यातीन काळ्या पाषाणातील सुबक सुरेख मूर्ती होत्या. त्या त्यांचे बंधू गंगाधर पंतांना म्हणाल्या, “दादा ताबडतोब सरदार रंगराव ओढेकरांना बोलावून घ्या”.
थोड्याच वेळात ते तेथे अश्वावर स्वार होऊन हजर झाले. त्या म्हणाल्या, “आम्हाला या मूर्तीबद्दल व मंदिरा बद्दल माहिती हवी आहे”
” बाईसाहेब येथून जवळच तपोवन आहे, नाथपंथी साधूंचे तेथे आखाडे ,झोपड्या आहेत. स्नानासाठी जवळ असलेल्या अरुणा व वरुणा नद्यांच्या संगमावर जातात. संगमावर स्नान करत असतांना एका साधूच्या पायाला कठीण काहीतरी लागले म्हणून त्याने पाण्यात बुडी मारली, तेव्हा स्वयंभू, रामाची मूर्ती व अजून शोध घेतल्यावर सीता, लक्ष्मणाची मूर्ती मिळाल्या. त्यांनी जवळचे ओंडके, फळ्या जमा करुन हे मंदीर उभे केले.
त्या म्हणाल्या, “येथे प्रभू रामचंद्रांचे भव्य मंदिर झाले पाहिजे! “
रंगराव म्हणाले, “त्र्यंबकेश्वराच्या मंदिरा सारखे प्रभू श्रीरामाचे मंदिर येथे उभारु. त्यासाठी लागणारा खर्च आम्ही करु”.
रंगराव ओढेकरांना मूळ तंजावरचे होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचे सावत्र बंधू व्यंकोजी महाराज यांच्या दरबारात सरदार होते. ते जेव्हा उत्तरेच्या मोहीमेवर गेले होते तेव्हा त्यांनी तलवारीने पराक्रम तर केलाच, अनेक महाराजांना पराभूत करुन जडजवाहर, संपत्ती हत्ती,,घोड्यावरुन आणले. श्रीमंत माधवराव पेशव्यांनी रंगरावांचा पराक्रम व प्रामाणिकपणा पाहून, त्यातील अर्धी संपत्ती बक्षिसी म्हणून दिली तसेच नासिक परगण्यातील ‘ओढा’, तसेच कोपरगाव परगण्यातील ‘कुंभारी’ ही गावही जहागिरी म्हणून बहाल केली. त्यांनी ओढा या गावी भव्य वाडा बांधला.वाडा म्हणजे चारही बाजून भक्कम तटबंदी, चार भक्कम बुरुज, असलेला किल्लाच. ओढा या गावाला ही भक्कम तटबंदी केलेली आहे.त्यांच्याजवळ २५ हत्ती होते. सन १७७८ मधे, सरदार रंगरावांनी श्रीरामाचे मंदिर बांधण्याची जबाबदारी स्विकारुन कामाला सुरुवातही केली. मोठमोठ्या कढयात दूध उकळायला ठेवून त्यात मोठमोठे दगड टाकायचे, खूप वेळ उकळल्यावर त्याला कारागीर व सरदार रंगराव तपासून पहायचे. कारण प्रत्येक दगडावर कोरीव काम होणार होते. छिन्नी हातोड्यांच्या सहाय्याने कोरीव काम करताना दगड फूट नये म्हणून दगडाची मजबूती तपासून पहात होते. ते दगड आठ कोस दूर असलेल्या रामशेज च्या डोंगरावरून बैलगाड्यांत ठेवत, त्या बैलगाड्या हत्ती ओढत आणत होते.
प्रभू रामचंद्र वनवासातील दिवसात सीतामाई व बंधू लक्ष्मण यासह पर्णकुटी रहायला येण्यापूर्वी याच डोंगरातील गुहेत वास्तव्यास होते. म्हणून त्या डोंगराचे नाव ‘रामशेज’ पडले.
मंदिराच्या घुमटाचे काम सुरु झाले, तेव्हा घुमटाचा लागणारे कोरीव काम केलेले दगड हत्तीच्या पाठीवरुन बांधकामापर्यंत आणून मग दोराला बांधून वर उचलत होते.दोन कामगार खालून वर आधार देत होते,तर वरती चार कामगार दगड योग्य ठिकाणी ठेवत होते.त्या कामगारांपैकी एक कामगार खाली हत्तीवर कोसळला त्या पाठोपाठ कोरीव काम केलेला दगडही त्याच्या अंगावर कोसळला. त्या कामगाराचा चेंदामेंदा झाला होता.
मंदिराच्या पायाच्या वरती मागील बाजूला दोन हत्तींच्या मूर्ती ठेवलेल्या होत्या त्या काढून एका हत्तीवर त्या कामगाराचा मूर्ती ठेवून त्या कामगाराचा स्मारक बनवले. मंदिराच्या गाभाऱ्यात कोरीव काम केले आहे.खांबांवर पण सुंदर कोरीव काम केलेले आहे.मंदीराच्या भोवती तटबंदी आहे, पूर्व, दक्षिण उत्तर दरवाजे आहे.
राम, लक्ष्मण व सीतामाई,तिघांच्या तर मूर्त्या होत्या पण हनुमानाची मूर्ती सापडली नव्हती. एका कारागीराने काळ्या दगडातील हनुमानाची मूर्ती घडवली.मंदिरासमोर असलेल्या बैठ्या सभामंडपात हनुमानाची मूर्ती ठेवलेली आहे . सभामंडपात चाळीस खांब आहेत. मंदिराच्या चारही बाजूने ओवऱ्या बांधलेल्या आहेत.ओवऱ्यांच्या कमानींची कलाकुसर केलेली आहे.मानवजन्म ८४ योनीतून फिरुन प्राप्त होतो म्हणून ओवऱ्या ची संख्या ८४ आहे.चौदा वर्षे रामाला वनवासात रहावे लागले त्याची आठवण म्हणून मंदिरात जाण्यासाठी चौदा पायऱ्या चढून जावे लागते. श्रीराम, सीतामाई व लक्ष्मण यांच्या मूर्तीची जागा अशी ठेवलेली आहे की, मेष व तूळ संक्रांतीच्या दिवशी सूर्योदयाची कोवळी किरणे प्रभू रामचंद्रांच्या मुखकमलावरच पडतात. रंगराव ओढेकरांनी स्वत:चे त्या काळातील तेविस लाख खर्चून काळ्या पाषाणातून अप्रतिम कलाकुसरीन बारा वर्षे अथक परिश्रम घेऊन “काळाराम मंदिर”उभारलेले आहे. असे नाशिकचे ‘काळाराम मंदिर’ १७९० मधे बांधून पूर्ण झाले.