कलिंगड लागवड । Kalingad Lagwad । Kalingad Sheti । कलिंगड पिकाचे उगमस्थान, महत्त्व आणि भौगोलिक प्रसार । कलिंगड पिकाखालील क्षेत्र आणि उत्पादन । कलिंगड पिकास योग्य हवामान । कलिंगड पिकास योग्य जमीन । कलिंगड पिकाच्या सुधारित जाती । कलिंगड पिकाच्या अभिवृद्धी । कलिंगड पिकाच्या लागवड पद्धती । कलिंगड लागवडीचा हंगाम आणि लागवडीचे अंतर । कलिंगड पिकास वळण । कलिंगड पिकास छाटणी । कलिंगड पिकास खत व्यवस्थापन । कलिंगड पिकास पाणी व्यवस्थापन । कलिंगड पिकावरील महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण । कलिंगड पिकाच्या महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण । कलिंगड आंतरपिके, आंतरमशागत आणि तणनियंत्रण । कलिंगड फळांची काढणी, उत्पादन आणि विक्री ।
।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।
कलिंगड लागवड : Kalingad Lagwad : Kalingad Sheti :
कलिंगड अथवा टरबूज हे फळ सर्वांच्या परिचयाचे आहे. फार पूर्वीपासून भारतात कलिंगडाची लागवड करण्यात येते आहे. कलिंगडाच्या अंगी तहान भागविण्याचे गुण आहेत तसेच त्यात औषधी गुणही आहेत. उन्हाळयात हे फळ फारच आवडीने खाल्ले जाते. पूर्वी फक्त नदीकाठी, नदीपात्रात, वाळूतच हे पीक घेत असत. अलीकडे जवळजवळ सर्वच प्रकारच्या जमिनींत आणि वर्षभर कलिंगडाचे उत्पादन घेतले जाते. कमी काळात आणि कमी पाण्यात कलिंगडाचे उत्पादन घेता येते.
कलिंगड पिकाचे उगमस्थान, महत्त्व आणि भौगोलिक प्रसार :
उगमस्थान :
कलिंगडाचे उगमस्थान आफ्रिका हा देश आहे.
महत्त्व :
उन्हाळयातील दाहकता कमी करणारे असे हे मधुर फळ आहे. कलिंगडाच्या खाण्यायोग्य 100 ग्रॅम भागात खालील प्रमाणे घटकद्रव्ये आहेत.
अन्नघटक | प्रमाण (%) | अन्नघटक | प्रमाण (%) |
पाणी | 96 | चुना | 0.01 |
शर्करा – पदार्थ | 3.3 | स्फुरद | 0.01 |
प्रथिने | 0.2 | लोह | 0.008 |
स्निग्ध पदार्थ | 0.2 | जीवनसत्त्व ‘क’ | 0.001 |
तंतुमय पदार्थ | 0.2 | जीवनसत्त्व ‘ब’ | 12 मिग्रॅ. |
खनिजे | 0.3 | जीवनसत्त्व ‘इ’ | 1 मिग्रॅ. |
भौगोलिक प्रसार :
जगातील अनेक देशांत कलिंगडाचा प्रसार झालेला आहे. भारतात आणि महाराष्ट्रात कलिंगडाची लागवड पुष्कळ आहे. रायगड, ठाणे, धुळे, तसेच सोलापूर जिल्ह्यांत कलिंगडाची लागवड मोठ्या प्रमाणात होते.
कलिंगड पिकाखालील क्षेत्र आणि उत्पादन :
महाराष्ट्रात दरवर्षी 1 लाख हेक्टरवर कलिंगडाची लागवड होते व दरवर्षी सुमारे 100 लाख टन फळे उत्पादित होतात. महाराष्ट्रात कलिंगडाची उत्पादकता हेक्टरी 100 टनांची आहे.
कलिंगड पिकास योग्य हवामान आणि कलिंगड पिकास योग्य जमीन :
हवामान :
थंड आणि कोरडे हवामान या पिकास चांगले मानवते. अलीकडे कडक उन्हाळयाचा आणि भर पावसाळयाचा काळ सोडला तर वर्षभर कलिंगडाची लागवड करता येते. किमान 15° सेल्सिअस तापमानास कलिंगडाचे उत्पादन आणि गुणवत्ता सरस
येते.
जमीन :
या पिकास हलकी, वाळूची, उत्तम निचऱ्याची जमीन मानवते. काळी, खोल, चुनखडीची, दलदलीची जमीन या पिकास हानीकारक ठरते.
कलिंगड पिकाच्या सुधारित जाती :
शुगर बेबी :
लहान आकाराची, गोल, काळपट हिरव्या सालीची, कमी जाडीच्या सालीची, गर्द तांबड्या गराची, ही जात लोकप्रिय आहे. गरात साखरेचे प्रमाण 11 ते 13 % असते.
अशाहीयामाटो :
साल फिकट हिरवी, फळ आकाराने मोठे, साल जाड असते. गर लाल, गरात साखर 12 ते 13% असते.
अर्का माणिक :
फळे मोठी, गोल, साल गर्द हिरवी, उत्पादनास चांगली. याशिवाय अमृत, माधुरी, नामधारी, अशा जाती काही प्रमाणात लागवडीखाली आहेत.
कलिंगड पिकाच्या अभिवृद्धी आणि कलिंगड पिकाच्या लागवड पद्धती :
कलिंगडाची लागवड बी टोकून केली जाते. लागवडीसाठी बांगडी, आळी, सारे, पाट तयार करून त्यात बाजूने लागवड करतात.
कलिंगड लागवडीचा हंगाम आणि लागवडीचे अंतर :
मुख्य हंगाम :
हिवाळा जुलै, ऑगस्ट, फेब्रुवारी या काळातही लागवड करता येते. हेक्टरी बी- 500 ग्रॅम ते 2.5 किलो.
लागवडीचे अंतर 2 मीटर x 0.8 मीटर
कलिंगड पिकास वळण आणि कलिंगड पिकास छाटणी :
वेल विस्तार सारा वाफ्यावर करून घ्यावा. फळधारणा झाल्यावर शेंडा खुडावा, म्हणजे मोजकी पण मोठी फळे मिळतात.
कलिंगड पिकास खत व्यवस्थापन आणि कलिंगड पिकास पाणी व्यवस्थापन :
हेक्टरी खताचे प्रमाण (1) कंपोस्ट कुजलेले खत : 15 टन (2) 19:19:19 मिश्रखत – 250 किलो. कलिगंडाला न कुजलेले खत, कंपोस्ट वगैरे घालू नये. ट्रायकोडर्मायुक्त बायोमील हे खत हेक्टरी 1,500 किलो किंवा प्रत्येक खोडासाठी अर्धा ते पाऊण किलो या प्रमाणात घालावे.
पाणी व्यवस्थापन :
कलिगंडाच्या पिकाला पाणी वरचेवर पण हलके व बेताचे द्यावे. कलिगंडाच्या खोडाजवळ पाणी साचू देऊ नये. कच्चे कंपोस्ट, निचरा नसणारी जमीन आणि खोडाजवळ पाणी साचणे, इत्यादींमुळे मर रोगाचा प्रादुर्भाव होतो.
कलिंगड आंतरपिके, आंतरमशागत आणि तणनियंत्रण :
कलिगंडाच्या पिकात काही वेळा काकडी, खरबूज किंवा मेथी, करडई ही पिके घेता येतात. आंतरमशागतीसाठी खोडाभोवती खुरपणी करावी. तण निंदून शेत स्वच्छ ठेवावे. ही कामे लागवडीनंतर पहिल्या 4 ते 6 आठवड्यांत पूर्ण करावी.
कलिंगड पिकाच्या महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण :
नाग अळी :
या किडीला इंग्रजीत लीफ मायनर हे नाव आहे. ही अळी पान पोखरते त्यामुळे पानावर नागमोडी, पिवळट, जाड रेषा दिसतात. यामुळे पाने पिवळी पडून गळतात आणि त्यामुळे फळांचे पोषण होत नाही.
उपाय : या किडीच्या नियंत्रणासाठी न्युआन 15 मिली. 10 लीटर पाण्यात घेऊन फवारावे.
लाल भुंगेरे :
ही कीड कलिंगडाची पाने व फुले कुरतडतात.
उपाय : या किडीच्या नियंत्रणासाठी कार्बारिल हे कीटकनाशक फवारावे.
फळमाशी :
या किडीची मादी सालीवर भोके पाडून फळात अंडी घालते, त्यामुळे फळ नासते.
उपाय : या किडीच्या नियंत्रणासाठी मॅलेथिऑन (50%) 10 मिली. 10 लीटर पाण्यात घेऊन फुले येण्याच्या आणि फळधारणा होण्याच्या काळात फवारावे.
कलिंगड पिकावरील महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण :
मर :
या रोगामुळे कलिगंडाचे वेल मरतात.
उपाय : या रोगाच्या नियंत्रणासाठी पिकाचा फेरपालट करावा. निचरा सुधारणे, ट्रायकोडर्मा वापरणे.
भुरी :
या रोगामुळे कलिंगडाच्या पानावर पांढरी बुरशी वाढून पानगळ होते.
उपाय : या रोगाच्या नियंत्रणासाठी कॅराथेन किंवा कॅलिक्झिन या बुरशीनाशकाची फवारणी करावी.
केवडा :
या रोगामुळे कलिंगडाची पानगळ होते.
उपाय : या रोगाच्या नियंत्रणासाठी वेलीवर ॲलिएट हे बुरशीनाशक फवारावे.
करपा :
या रोगामुळे कलिंगडाच्या वेलीच्या पानांवर काळे डाग पडतात.
उपाय : या रोगाच्या नियंत्रणासाठी वेलीवर बाविस्टीन, कॉपर ऑक्सिक्लोराईड (सीओसी) फवारावे.
कलिंगड फळांची काढणी, उत्पादन आणि विक्री :
कलिंगडाचे फळ वेलीवरच पिकल्यास काढावे. कलिंगड काढणीयोग्य झाले, हे पुढील लक्षणांवरून ओळखावे.
(1) फळाजवळच्या देठाविरुद्धची बाळी सुकते.
(2) फळावर टिचकी मारल्यास, ‘बद्द’ असा आवाज येतो.
(3) फळाचे देठ लवविरहित, गुळगुळीत होतात. तयार फळे थोड्या देठासह कापून घ्यावीत. कलिंगडाच्या लागवडीपासून साधारणपणे 90 ते 110 दिवसांत फळे तयार होतात. फळांची काढणी 12-15 दिवसांत संपते.
उत्पादन :
कलिंगडाचे सरासरी उत्पादन हेक्टरी 35 ते 40 टन तर चांगले उत्पादन
हेक्टरी 80 ते 100 टन मिळते.
विक्री :
काढलेली तयार फळे सावलीत ठेवावीत. फळांची आदळआपट न करता व्यवस्थित हाताळावीत आणि विक्रीसाठी पाठवावीत.
सारांश :
कलिंगड हे हलक्या जमिनीत, कोरड्या हवामानात, कमी दिवसांत कमी श्रमांत तयार होणारे वेलवर्गीय फळपीक आहे. कलिंगड हे तृषाहरण आणि थकवा दूर करते. कलिंगडाच्या फळात शर्करायुक्त पदार्थ 10 ते 14 टक्के असतो. कलिंगडाच्या शुगर बेबी, अशाहीयामाटो, अर्का माणिक या लोकप्रिय जाती आहेत. कलिंगड फळांचा मुख्य हंगाम उन्हाळयात असतो. कलिंगडावर मर, भुरी हे प्रमुख रोग आढळतात. कलिंगडाचे हेक्टरी उत्पादन सरासरी 35-40 टन आणि अधिकतम उत्पादन हेक्टरी 80-100 टन येते.