जाणून घ्या करवंद लागवड बद्दल संपूर्ण माहिती तेही एका क्लीक मध्ये (Karvand Lagwad Mahiti Karvand Sheti) – Karvand Farming

करवंद लागवड |Karvand Lagwad | Karvand Sheti |करवंद पिकाचा उगमस्थान, महत्त्व आणि भौगोलिक प्रसार । करवंद पिकाखालील क्षेत्र । करवंद पिक उत्पादन ।करवंद पिकासाठी योग्य हवामान । करवंद पिकासाठी योग्य जमीन । करवंद पिकाच्या सुधारित जाती । करवंद पिकाची अभिवृद्धी । करवंद पिकाची लागवड पद्धती । करवंद लागवड हंगाम । करवंद लागवडीचे अंतर ।करवंद पिकास वळण । करवंद पिकाच्या छाटणीच्या पद्धती ।करवंद पिक खत व्यवस्थापन । करवंद पिक पाणी व्यवस्थापन ।करवंद पिकावरील महत्त्वाच्या किडी, रोग आणि त्यांचे नियंत्रण ।करवंद पिकावरील महत्त्वाच्या किडी, रोग आणि त्यांचे नियंत्रण ।करवंदाच्या फळांची काढणी, उत्पादन आणि विक्री ।करवंदाच्या फळांची साठवण आणि पिकविण्याच्या पद्धती ।

।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।

अनुक्रम दाखवा

करवंद लागवड |Karvand Lagwad | Karvand Sheti |

करवंद हे काटक झुडूप असून ते वेलीप्रमाणे सर्वत्र पसरत जाते. त्यामुळे डोंगरघळीत आणि जंगलात करवंदाच्या जाळया आढळतात. करवंदाची झाडाची उंची 3 ते 4 मीटर असते. करवंदाची फुले आकाराने छोटी, पांढऱ्या रंगाची आणि सुगंधित असतात. करवंदाच्या झाडाच्या फांद्यांना असणाऱ्या काट्यांमुळे झाडांचा उपयोग कुंपणाकरिता चांगला होतो. मे-जून महिन्यांत करवंदाची फळे काढणीस तयार होतात. करवंदाच्या पक्व फळांच्या काळया रंगामुळे या फळांना ‘डोंगरची मैना’ असेही म्हणतात. ज्या ठिकाणी सर्वसाधारणपणे इतर कोरडवाहू फळझाडे वाढत नाहीत अशा ठिकाणी डोंगरउतारावर वरच्या भाग कमी खर्चात करवंदाची लागवड करून पैसा मिळविण्यास भरपूर वाव आहे.

करवंद पिकाचा उगमस्थान, महत्त्व आणि भौगोलिक प्रसार ।

करवंदाच्या झाडाचा उगम आपल्याच देशातील असून या झाडाची लागवड भारतात सर्वत्र आढळते. करवंदाच्या काही जाती आफ्रिका आणि मलाया या देशांतून भारतात आल्या आहेत.
मे-जून महिन्यात शहरी तसेच ग्रामीण भागात करवंदाच्या फळांना चांगली मागणी असते. ही कच्ची फळे चटणी तयार करण्यासाठी वापरतात. करवंदाच्या पक्व फळांपासून उत्कृष्ट जेली तयार करतात. करवंदाच्या कच्च्या फळांचे लोणचे करतात. करवंदाच्या फळांमध्ये इतर फळांच्या तुलनेत लोहाचे प्रमाण जास्त असते. करवंदाच्या फळामध्ये ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. तसेच फॅट्स, खनिजे आणि प्रथिने बऱ्याच प्रमाणात असतात. ओसाड माळरानामध्ये कोरडवाहू फळझाडे तसेच बागायती फळझाडांच्या लागवडीचे चांगले संरक्षण करण्यासाठी करवंदाच्या झाडांचा कुंपण म्हणून वापर करता येतो.

अन्नघटकप्रमाणअन्नघटकप्रमाण
पाणी67.1%शर्करा18.2%
प्रथिने2.3%स्निग्धांश9.6%
खनिजे2.8%लोह0.39%
चुना0.16%स्फुरद0.06%
करवंदाच्या पक्व फळांतील 100 ग्रॅम खाण्यायोग्य भागातील अन्नघटकांचे प्रमाण

करवंद पिकाखालील क्षेत्र । करवंद पिक उत्पादन ।

भारतात हिमालयाचा भाग सोडला तर सर्व राज्यांत करवंदाची झाडे वाढलेली दिसतात. महाराष्ट्रात सह्याद्रीच्या डोंगरात करवंदाच्या जाळया आढळतात. महाराष्ट्रात सातारा, पुणे, कोल्हापूर, जळगाव, धुळे, नाशिक जिल्ह्यांत करवंदाची झाडे जास्त प्रमाणात आहेत. करवंदाचे स्वतंत्रपणे लागवडीखालील क्षेत्र आणि उत्पादन यांबाबत निश्चित आकडेवारी उपलब्ध नाही.

करवंद पिकासाठी योग्य हवामान । करवंद पिकासाठी योग्य जमीन ।

उष्ण आणि समशीतोष्ण हवामानात करवंदाची झाडे उत्तम वाढतात. कोकणातील जास्त पावसाच्या, दमट आणि उष्ण हवामानात तसेच देशातील कमी-अधिक पावसाच्या कोरड्या आणि उष्ण हवामानात करवंदाचे झाड चांगले वाढते आणि भरपूर फळे देते. मात्र अतिथंड प्रदेशात (हिमाचल, डेहराडून, काश्मीर) करवंदाच्या झाडाची वाढ चांगली होत नाही.
करवंदाचे झाड अतिशय काटक असल्यामुळे कोणत्याही प्रकारच्या जमिनीत चांगले वाढते. हलक्या, मध्यम, डोंगरउताराच्या, मुरमाड, माळरान जमिनीत करवंदाची झाडे चांगली वाढतात. दलदलीची जमीन मात्र करवंदास मानवत नाही.

करवंद पिकाच्या सुधारित जाती ।

करवंदाच्या सुधारित जाती उपलब्ध नाहीत. सर्वसाधारणपणे फळांच्या रंगावरून आणि आतल्या गरावरून करवंदाच्या जाती ठरविल्या जातात.

हिरवी करवंदे :

हिरवी करवंदे लांबट गोल आकाराची असून फळांवर तपकिरी रंगाची छटा असते. फळातील गर रसदार आणि आंबट असून बी टणक असते. या जातीची फळे खाण्यास आणि मुरंबा तयार करण्यासाठी चांगली असतात.

गुलाबी करवंदे :

गुलाबी जातीची फळे छोट्या ते मध्यम आणि लंबगोल आकाराची असतात. फळांचा रंग आकर्षक, फिकट ते गडद गुलाबी असतो. फळांचा गर कमी आंबट असून बिया जास्त टणक असतात. या जातीच्या कोवळ्या फळांचा वापर वेणी, गजरे, हार आणि शोभेच्या पुष्परचनेत करतात.

काळी करवंदे :

या जातीची फळे सुरुवातीस हिरव्या रंगाची असून फळे पिकल्यावर त्यावर गडद काळी तपकिरी छटा येते. फळांतील गर रसदार आणि आंबट असतो.

पांढरी करवंदे :

या जातीची फळे मध्यम ते छोट्या आकाराची आणि पांढऱ्या रंगाची असून फळांवर पिंगट रंगाची छटा असते.

करवंद पिकाची अभिवृद्धी । करवंद पिकाची लागवड पद्धती ।

करवंदाची लागवड प्रामुख्याने कायमच्या ठिकाणी बिया लावून किंवा रोपे तयार करून करतात. बियांपासून लागवड केल्यास रोपे झपाट्याने वाढतात आणि तिसऱ्या- चौथ्या वर्षांपासून फळे मिळण्यास सुरुवात होते. कायम जागी बी लावून करवंदाची लागवड करण्यासाठी मे-जून महिन्यांत पक्व फळांमधील बी काढून एक-दोन चांगले पाऊस पडल्यानंतर बिया खड्डयात टोकाव्यात. त्यासाठी एप्रिल-मे महिन्यातच खड्डे खणून ते पावसाळ्यापूर्वीच शेणखत आणि मातीने भरून घ्यावेत. डोंगरउतारावरील तसेच कुंपणाच्या चरातील लागवड कायमच्या ठिकाणी बी लावून करावी. बियांपासून रोपे तयार करण्यासाठ मे-जून महिन्यात करवंदाच्या फळातील बी काढून एकदोन दिवस सावलीत वाळवावे आणि नंतर प्रत्येक पॉलिथीन पिशवीत एक बी पेरावी. रोपे तयार करण्यासाठी 7.5 सेंटिमीटर रुंद आणि 15 सेंटिमीटर लांबीची पॉलिथीन पिशवी वापरावी. पिशवीच्या खालच्या अर्ध्या भागात सात ते आठ छिद्रे पाडावीत. नंतर पिशव्या माती आणि चांगले कुजलेले शेणखत यांच्या मिश्रणाने भराव्यात. प्रत्येक पिशवीमध्ये करवंदाचे एक बी पेरावे. करवंदाची रोपे लागवडीयोग्य होण्यास एक वर्ष लागते. पुढील वर्षीच्या पावसाळ्यात एक-दोन चांगले पाऊस झाल्यावर रोपांची कायम जागी लागवड करावी.

करवंद लागवड हंगाम । करवंद लागवडीचे अंतर ।

करवंदाची लागवड डोंगरउतारावर करताना झाडे 3 ते 4 मीटर अंतरावर लावावीत. समपातळीतील चरात लागवड करताना 1 ते 1.5 मीटर अंतरावर करावी. चरातील लागवड शक्य असल्यास दोन ओळींत करावी. दोन ओळींतील अंतर सुमारे 3 मीटर ठेवावे. लागवडीच्या वेळी पाऊस नसल्यास लागवडीनंतर रोपांना लगेच पाणी द्यावे. लागवड डोंगरउतारावर असेल तर उताराला आडवी गोलाकार लागवड करावी.

करवंद पिकास वळण । करवंद पिकाच्या छाटणीच्या पद्धती ।

करवंदाच्या पिकाची जाळीसारखी वाढण्याची प्रवृत्ती असते. परंतु झाड वाढत असताना एक मीटर उंचीपर्यंत मुख्य खोडावर येणाऱ्या फांद्या छाटून टाकाव्यात. त्यामुळे झाडाची वाढ जाळीदार होण्याऐवजी झुडपासारखी करून घेता येते. दरवर्षी फळांची काढणी झाल्यावर झाडाची हलकी छाटणी करावी..

करवंद पिक खत व्यवस्थापन । करवंद पिक पाणी व्यवस्थापन ।

व्यापारी तत्त्वावर लावलेल्या बागेला दरवर्षी पावसाळ्यात झाडाच्या खोडाभोवती रिंगण करून प्रत्येक झाडाला 15 किलो शेणखत आणि 15 ते 20 ग्रॅम सुफला द्यावा. पावसाळा संपल्यानंतर जमिनीतील ओल टिकून राहण्यासाठी रोपाभोवती पालापाचोळ्याचे 30 सेंटिमीटर जाडीचे आच्छादन करावे. पालापाचोळ्यामुळे काही वेळा रोपाला वाळव लागण्याची शक्यता असते. वाळवीच्या प्रतिबंधासाठी 10% लिंडेन कीडनाशक भुकटी जमिनीवर टाकावी. आच्छादन वाऱ्याने उडून जाऊ नये म्हणून त्यावर माती टाकावी. उन्हाळ्यात करवंदाची रोपे जगविण्यासाठी लागवडीनंतर पाणी देण्याची आवश्यकता असते. एकदा जगल्यानंतर करवंदाच्या झाडाला पाणी देण्याची आवश्यकता नसते.

करवंद पिकावरील महत्त्वाच्या किडी, रोग आणि त्यांचे नियंत्रण ।

करवंदाचे झाड अत्यंत काटक असल्यामुळे त्यावर नुकसानकारक किडींचा उपद्रव होत नाही. काही वेळा ओलसर आणि दमट हवामानात करवंदाच्या पानांवर करपा या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होतो. या रोगाच्या नियंत्रणासाठी 2 : 2 : 50 तीव्रतेचे बोर्डो मिश्रण झाडांवर फवारावे. अथवा 0.1% मोरचुदाच्या द्रावणाचा फवारा मारावा. करवंदाच्या झाडावर बॅक्टेरियल कँकर या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास पानाच्या खाली गोल आकाराचे डाग पडतात. पानांच्या वरच्या बाजूला फोडासारखा भाग दिसतो. या रोगाच्या नियंत्रणासाठी पानांवर 200 पीपीएम तीव्रतेचा फवारा मारावा.

करवंदाच्या फळांची काढणी, उत्पादन आणि विक्री ।

बियांपासून लागवड केलेल्या करवंदाच्या रोपांना लागवडीनंतर तिसऱ्या ते चौथ्या वर्षापासून फळे लागण्यास सुरुवात होते. करवंदाच्या झाडाला फेब्रुवारी महिन्यात फुले येऊन एप्रिल ते जूनमध्ये फळे काढणीस तयार होतात. काही वेळा फेब्रुवारीनंतर आलेल्या फुलांपासून पावसाळ्यातदेखील फळे मिळतात. करवंदाच्या एका झाडापासून सरासरी 4 ते 5 किलो उत्पादन मिळते. करवंदाची कच्ची अथवा पक्व फळे तोडल्यानंतर फळांमधून चीक बाहेर पडतो. हा चीक फळांवर पडल्यामुळे फळांवर डाग पडतात आणि फळे खराब होतात. म्हणूनच चीक फळांवर पडून फळे खराब होणार नाहीत याची काळजी घ्यावी. करवंदाची फळे नाशवंत असल्यामुळे काढणीनंतर लगेच विक्रीसाठी बाजारात पाठवावीत.

करवंदाच्या फळांची साठवण आणि पिकविण्याच्या पद्धती ।

करवंदाची फळे झाडावरच पक्व होतात. त्यामुळे करवंदाची फळे पिकविण्यासाठी स्वतंत्र पद्धती नाहीत. करवंदाची फळे अतिशय नाशवंत असल्यामुळे काढणीनंतर एक ते दोन दिवस टिकतात आणि त्यानंतर मऊ पडतात. म्हणूनच करवंदाच्या फळांची फार काळ साठवण करता येत नाही.

सारांश ।

करवंदाचे झाड अत्यंत काटक असून ते वेलीप्रमाणे वाढत जाते. लागवडीनंतर सुरुवातीच्या काळात रोपाची योग्य प्रकारे छाटणी केल्यास रोपाची वाढ झुडपासारखी होते. करवंदाचे झाड दमट आणि उष्ण किंवा कोरड्या आणि उष्ण अशा दोन्ही प्रकारच्या जमिनीत चांगले वाढते. करवंदाची अभिवृद्धी बियांपासून रोपे तयार करून केली जाते. करवंदाचे झाड अत्यंत काटक असल्यामुळे या झाडावर नुकसानकारक किडीचा किंवा रोगांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होत नाही.करवंदाच्या फळामध्ये इतर फळांच्या तुलनेत लोहाचे प्रमाण सर्वांत जास्त आहे. करवंदाच्या एका झाडापासून सरासरी 4 ते 5 किलो उत्पादन मिळते. करवंदाची फळे काढताना फळांवर चीक पसरून डाग पडू नयेत म्हणून योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.

जाणून घ्या पॅशनफ्रुट लागवड बद्दल संपूर्ण माहिती तेही एका क्लीक मध्ये (Passion Fruit Lagwad Mahiti Passion Fruit Sheti) – Passion Fruit Farming

Recent Post

Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )