अत्तर ,अत्तरदाणी
।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।
अत्तर
अमेय घरी आला. लॅपटाॅपची बॅग त्याने हाॅलमधील कॅबिनेटच्या ठरलेल्या खणात ठेवली. त्याच्या वरच्याच ड्राॅवरमध्ये त्याने कारची चावी, घराची चावी, वाॅलेट, रिस्टवाॅच आणि खिशाला अडकवलेलं पेन ठेवलं. फुल शर्टच्या बाह्यांची बटणं सोडत, कोपरापर्यंत बाह्या दुमडल्या त्याने. टायची नाॅट सैल करत तो, सोफ्यावर बसला आणि आवाज दिला अमेयने… “आभा… मी आलोय गं”. आणि पुन्हा एकदा त्याच्या मनात आलं… “मॅनेजमेंटनीही काय अवाच्या सवा मोठा बंगलो देऊन ठेवलाय… रहाणारे आम्ही फक्त अडिच लोक त्यात”.
अमेयचा आवाज ऐकून त्याची बायको आभा… आणि त्या दोघांची १२ वर्षांची लेक आस्मा, आतून बाहेर आल्या. आस्मा जाऊन धप्पकरत बसली, तिच्या बाबाच्या शेजारी… आणि आभाने टेबलवर ठेवलेल्या जगमधील, पाणी आणलं एका काचेच्या ग्लासमधून अमेयसाठी. अमेयने घटघट पाणि प्यायलं… ग्लास लेकीकडे देत म्हणाला… “जा ठेऊन ये सिंकमध्ये… काम कर जरा… आळशी एक नंबर”… आणि खांद्यावर चापट मारली त्याने लेकीच्या. गाल फुगवत, नाक फ्रेंद्र करत आस्मा… ग्लास घेऊन उठली आणि बाबाच्या खिशातील मोबाईलवर डल्ला मारत, आत गेली पळतच. अमेयने जरासं हसत पाहिलं आभाकडे… आणि विचारलं तिला… “सो हाऊ वाॅज युवर डे बायको… आॅल सेटल्ड?”. आभा बाजूला येऊन बसली अमेयच्या, नी म्हणाली… “चंडीगढ इज सो ब्युटिफूल अमेय… खूपच छान वाटतंय मला इथे आता. तुझी बदली झाल्यावर मला तर टेन्शनच आलेलं, की मुंबईत वाढलेलो आपण… कसं काय करायचं मॅनेज वेगळ्याच शहरात? बट धिस सीटी अॅक्सेप्टेड मी फुल्ली इन जस्ट थ्री मन्थ्स”. अमेयने हसतच आभाचा हात धरला हातात, आणि विचारलं तिला… “तू जातेस ती NGO काय म्हणतेय?”. आभाने तिच्या दुसर्या हाताने अमेयचा हात कव्हर केला, नी म्हणाली… “इट इज सो गुड अमेय. खूपच छान काम करतीये ही NGO. प्रचंड अॅक्टिव्ह आहेत हे लोक, बर्याचशा सामाजीक कार्यांमध्ये. मनापासून आनंद होतोय मला, फाॅर जाॅईनिंग देम अॅट राईट टाईम. रादर आजच आम्ही एका वृद्धाश्रमात गेलो होतो विझिटला. तिथे थांबलो… त्या सगळ्या आजी – आजोबांशी गप्पा मारल्या… उष्ण कपड्यांचं वाटप केलं… आणि त्यांचे खूप सारे आशिर्वाद घेऊन परतलो”.
अमेयने मान हलवून दाद दिली आभाला, आणि बोलला… “ग्रेट यार… किप युवरसेल्फ बिझी इन सच सोशल काॅजेस आभा. आणि जे मी तुला आॅलरेडी सांगितलय, ते लक्षात असूदे. डोन्ड सेल युवर टाईम अँड सर्व्हिसेस… डू इट आॅनररी. घरात एकजण रोज स्वतःला, थोडं थोडं विकतोय ते बास आहे”. आभा “येस्स” म्हणत उठली जागेवरुन… आणि बोलली… “अमेय फ्रेश होऊन घे… स्वैपाक तयारच आहे. आस्माssss जेवायला चल”.
तेवढ्यात अमेयला काहीतरी जाणवलं त्याच्या आजुबाजूला… खूप परिचयाचं. पण त्याला नक्की कळेना, नेमकं काय ते. विचार करतच जागेवरुन उठला अमेय, नी फ्रेश व्हायला आत गेला. तेवढ्यात आलेली शिंक अडवायला, दोन्ही हात त्याने नाका – तोंडावर घेतले. शिंक तर बाहेर न येताच परतली, पण अमेय मात्र वास घेऊ लागला त्याच्या हातांचा – बोटांचा. “हा वास… कसलाय हा वास?… साॅलिडच ओळखीचा आहे… सेम… डिट्टो तोच वास… माझ्या लहानपणाशी कनेक्टेड काहीतरी आहे… पण नेमकं काय?”. ह्या विचारातच अमेय हात – पाय – तोंड धुवून, नाईट ड्रेस घालायला गेला. कपडे बदलून झाल्यावर… रोजच्या सवयीनुसार अमेयने, देव्हार्यासमोर उभं रहात कुलदेवतेच्या फोटोला नमस्कार केला. बाहेर हाॅलमध्ये येत, आई – बाबांच्या फोटोंनाही नमस्कार केला त्याने… आणि सण्णकन लिंक लागली त्याची, त्या मघाच्या वासाशी.
“आई… यस्स… आईच. खूप लहान असतांना… म्हणजे पाच – सहा वर्षांचा असल्यापासून, अगदी दहा – बारा वर्षांचा होईपर्यंत आपण आईबरोबर… प्रत्येक ठिकाणी हळदी – कुंकवाला जायचो. आईची शेपूट म्हणत असत आपल्याला सगळे. प्रधानबाईंकडे ही जायचो दरवर्षी. प्रधानबाई उपड्या हातावर एक अत्तर लावायच्या. मला ते उपडे हात एकमेकांमवर घासत… त्यांचा वास घेणं ईतकं आवडत असे की, मग मीच व्हाॅलिंटिअर व्हायचो येणार्या बायकांच्या उपड्या हातांना… अत्तरदाणीतील त्या कापसाच्या बोळ्याला काडी टेकवून, अत्तर लाऊन देण्यासाठी. हा तोच वास होता… अॅम डॅम शुअर. प्रधानबाई स्वतः ते अत्तर बनवत असत घरी, बरंच काय काय एकमेकांत मिसळून. पण असला पक्का ठरलेला होता फार्म्युला त्यांचा… की जरा कणानेही उन्निस – बीस होत नसे, त्या अत्तराच्या वासात. पण हा वास इतक्या वर्षांनी… म्हणजे ऑलमोस्ट तीस वर्षांनी, आपल्या बोटांना कसा काय आला?”
अमेयचं विचारचक्र चालूच होतं की, त्याला आठवलं… त्याने आभाचा हात हातात घेतला होता ते. पानं वाढणार्या आभाजवळ तो घाईतच गेला… आणि तिचे दोन्ही हात हातात घेत, ते उपडे करुन नाकाजवळ नेत… अमेय वास घेऊ लागला. आणि पुन्हा एकदा भरला गेला उरात अमेयच्या, प्रधानबाईंच्या अत्तराचा तो चांगलाच परिचीत गंध. अमेयची ही कृती नक्की न कळल्याने, आभाने विचारलं त्याला काहीशा आश्चर्यानेच… “काय रे… काय झालं?”. अमेयने आभाला विचारलं… “आभा… तुझ्या हातांना येणारा हा सुगंध… हा सुवास… हे काय लावलंयस तू हातांना तुझ्या?”. आभानेही वास घेतला तिच्या हातांचा… आणि काहीतरी आठवून बोलली ती… “ओ येस्स… अरे मी तुला बोलले नाही का… की आज आम्ही एका वृद्धाश्रमात गेलो होतो. अरे तिथे एक आजी होत्या… साधारण ऐंशीच्या आसपास. त्यांच्याकडे एक अत्तरदाणी होती अरे… त्यातून आम्हा प्रत्येक कार्यकर्त्याला, त्या अत्तर लावत होत्या. अँड यू नो व्हाॅट… त्या आजी चक्क मराठी होत्या अरे. अॅक्चुअली आय वाॅझ नाॅट एक्स्पेक्टींग एनी मराठी आजी हियर इन चंडीगढ’स ओल्ड एज होम. म्हणून मग मी त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला अरे.. बट आय केम टू नो दॅट, शी लाॅस्ट हर मेमरी लाँग बॅक”.
अमेयने घाईतच विचारलं आभाला… “आभा… त्या आजी दिसायला कशा होत्या? गोर्या, घार्या… कंबरेपर्यत येणारे दाट केस… आणि अतिशय प्रसन्न अशा?”. आभा म्हणाली अब्सोल्युटली… एक्सेप्ट दॅट लाँग हेअर… बाॅबकट होता रे त्यांचा. पण का विचारतोयस?… व्हाॅट हॅपन्ड?”. अमेय आता चांगलाच रेस्टलेस झाला होता. आभाकडे बघून बोलला तो… “आभा रात्रीचे साडेनऊ वाजलेत… पाऊण तासात आपण पोहोचू त्या वृद्धाश्रमात… लेट्स गो. आस्मालाही बरोबर घे. मी तुला गाडीत सगळं सांगतो… सो डोन्ट आस्क एनीथींग… जस्ट लिव्ह”. आभाने मग एकही प्रश्न विचारला नव्हता.
गाडी वृद्धाश्रमाच्या दाराशी पोहोचली, पस्तीस मिनिटांतच. गाडीतून बाहेर पडल्यावर आभाही आता, अमेय एवढीच उत्सुक होती… त्या आजींना भेटायला, अमेयकडून सगळं ऐकल्यावर. वृद्धाश्रमातील आॅथरीटींशी बोलून, अमेयने त्यांना सविस्तर सांगितलं सगळं. त्यांना मग लाॅबीमध्ये बसायला सांगून… आजींना बोलावण्यात आलं. त्या समोर येताच, अत्तराचा तोच सुवास दरवळला होता… अमेयच्या भोवताली. आजींचे डोळे बघूनच अमेयला खात्री पटली होती, ह्या प्रधानबाईच असल्याची. आठवी ते दहावी ज्यांच्याकडे… रसायन शास्त्र आणि बिजगणितच्या ट्युशन्सला, जात असे अमेय. त्यांच्याच बिल्डिंगमध्ये रहाणार्या, अमेयच्या आईची मैत्रीण असलेल्या, संकेत दादाची आई… म्हणजेच अमेयच्या प्रधानबाई. अमेयचे डोळे भरुन आले… आणि त्याने त्याची ओळख बाईंना देण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण छे…
पार शुष्क झाले होते, ते घारे डोळे आजच्या घडीला. अमेय प्रयत्न न सोडता, पुढे बोलू लागला… “बाई… प्लिज आठवायचा प्रयत्न करा. अहो आम्हा सगळ्यांना… अगदी तुमच्या घरच्यांनाही वाटतंय की, ‘कैलाश मानस सरोवर यात्रेत’ मालपा ला जे लँड स्लाईडींग झालं… त्यात तुम्ही गेलात. तुम्हाला खूप शोधलं हो संकेत दादाने… पण त्याला नाही मिळालात तुम्ही. प्रेतांचे नुसते खच पडलेले, असं म्हणाला संकेत दादा. खूपच रडला होता हो बाई तो… आम्हा सगळ्यांना हे सांगतांना. तुम्ही प्लिज काहितरी प्रयत्न करा आठवायचा. मी संकेत दादाला ताबडतोब फोन करतोय… त्याला इथे तातडीने बोलावून घेतोय. खूपच खुश होईल हो तो… जेव्हा कळेल त्याला की, त्याची आई जिवंत आहे”.
अमेयने भरुन आलेले डोळे पुसतच, मोबाईल लावायला घेतला संकेतला… आणि तेवढ्यात एक सुरकुतलेला, हिरव्या नसा दिसणारा, तलम गोरापान हात… पडला अमेयच्या हातावर. अमेयने वर बघितलं… आजींचे दोन्ही निळेशार डोळे आता भरुन आले होते. अमेयकडे एकटक बघत आजी बोलल्या… “अठ्ठ्यांणवाच्या सप्टेंबरातच कळलं होतं संकेतला की, आपली आई जिवंत आहे. आला होता तो, त्या रेस्क्यू कँपात… जिथे त्या भूस्खलनातून वाचलेली लोकं ठेवलेली. मी ही होते त्यात… गंभिररीत्या जखमी… आणि धक्का बसून वाचा गेलेली. खूप वाईट परिस्थिती होती, आम्हा वाचलेल्या सर्वांचीच. तिथेच एके दिवशी हा माझा मुलगा संकेत आला… उभा राहिला येऊन माझ्यासमोर… दोन मिनिटं बघितलं माझ्याकडे… मला हात जोडले नी चक्क निघून गेला पुढे.
वाचा गेलेली मी… ना आकांत करु शकले मग, ना धाय मोकलून रडू शकले. तब्बल सहा महिन्यांनी माझी वाचा परत आली… आणि मनसोक्त रडून घेतलं मी सर्वप्रथम. इथे – तिथे करत मग दोन वर्षांनी, मला एका भल्या गृहस्थाने इथल्या आश्रमात आणून सोडलं. गेले वीस वर्ष इथेच रहातीये मी. द्यायला पैसे नाहीत जवळ, त्यामुळे इकडची थोडी कामं करतेय. कोणीही माझ्या घरच्यांबद्दल विचारु नये म्हणून, स्मृतीभ्रंश झाल्याचं दाखवतेय. आणि तसं पाहिलं तर तेच खरंय नाही का? उरलाय कुठे मला काही भुतकाळ. पोटच्या पोरानेच पाटी पुसलीये माझी. जिवन बिमा पाॅलिसीचे पैसे… आणि पिटी केसमध्ये सरकारी नोकरी… खूप आहे हे नाही… एखाद्याला पराकोटीचं कृतघ्न व्हायला.
तूला बघून मात्र आनंद झाला हो बाळा… माझं रक्त आणू नाही शकलं कोणाला माझ्यापाशी… पण माझं अत्तर मात्र घेऊन आलं हो तुला इथे. तेव्हा आता जमेल तसं येत जा मला भेटायला. डोळे हे कोणाची वाट बघण्यासाठीही असतात, हेच विसरलीये मी इतक्या वर्षांत”.
एवढं बोलून आजी जायला वळणार, तोच अमेय बोलला… “बाई… माझ्याबरोबर याल?… आमच्याकडे रहाल? मी माझ्या आई – बाबांना, केव्हाचाच गमावून बसलोय. चलाल आमच्याबरोबर आमची आई, नी आस्माची आजी बनून? मी जन्मात माझी बदली, मुंबईला करुन घेणार नाही. तुमची कस्टडी मिळवण्याबाबतचं इथलं सगळं पेपरवरर्क, मी करेन. सोबत कराल आम्हाला आमच्या… आय मीन आपल्या घरी?”.
प्रधानबाईंनी पदराचा बोळा करत, तोंडाला लावला… आणि हमसून हमसून रडू लागल्या त्या. अमेय, आभा, आस्मा… तिघेही पाया पडले त्यांच्या. अमेय जोडल्या हातांनीच बोलला… “मी लवकरच येतो तुम्हाला घेऊन जायला इथून… कायमचं”.
आजींच्या अत्तराइतकेच त्यांचे अश्रूही दर्वळत होते आता. पाठमोर्या चालत जाणार्या आजींकडे बघून… कधीतरी, कुठेतरी ऐकलेला शेर आठवला अमेयला…
‘इत्र से कपडोंको महेकाना बडी बात नही ।
मजा तो तब है, जब खुशबू आपके किरदार से आए’।