कथा राजाच्या लोक कल्याणाची व अधिकाऱ्यांच्या लोभा ची – ओलेहात

।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।

ओलेहात

एकदा जपानच्या बादशहाने आपल्या राजसभागृहात, आपल्या राज्यातील सर्व लहान- मोठया अधिकार्यांची सभा घेतली.

सभेला उद्देशून तो म्हणाला, ‘ मी लोकांच्या कल्याणासाठी, आपल्या राज्यातील नगरांप्रमाणेच खेडोपाड्यांसाठीही वर्षानुवर्षे एवढा पैसा खर्च करीत असताना, राज्याचा कायापालट का होत नाही ? बघावं, तर प्रजा त्याच दारिद्रयात, त्याच अज्ञानात व त्याच रोगराईत खितपत पडली आहे. हे असं का व्हावं ?’

बादशहाच्या या प्रश्नाला उत्तर द्यायला कुणीच अधिकारी उभा राहिना. अखेर स्पष्टवक्तेपणा व निस्पृहता या गुणांविषयी प्रसिध्द असलेल्या विंगचॅंग या आधिकार्याकडे बादशहानं आपली प्रश्नार्थक नजर वळविली.

तेव्हा विंगचॅंग याने प्रथम सेवकाकरवी बर्फाचा एक नारळाएवढा मोठा गोळा मागवून घेतला व तो बादशहाच्या हाती देऊन तो त्याला म्हणाला,

‘महाराज ! हा बर्फाचा गोळा केवढा मोठा आहे, पाहिलंत ना ? आता मी एक सामान्य खेडूत म्हणून या सभागृहाच्या आपल्या विरुध्द बाजूच्या अगदी टोकाला जाऊन उभा राहातो. आपण हा बर्फाचा गोळा पुढल्या रांगेतल्या अधिकाऱ्याकडून मागल्या रांगेतल्या अधिकाऱ्याकडे, त्याच्याकडून त्याच्या मागल्या रांगेतल्या अधिकाऱ्याकडे याप्रमाणे एकदम मागल्या रांगेत उभ्या असलेल्या माझ्याकडे पाठवा, मग मी आपल्या प्रश्नाचे उत्तर देतो.’बादशहाने त्याप्रमाणे केले.

त्याने तो बर्फाचा गोळा पुढल्या रांगेतल्या मंत्र्याच्या हाती दिला. मंत्र्याने तो गोळा मागल्या रांगेत बसलेल्या आपल्या वैयक्तिक कारभाऱ्याच्या हाती दिला. त्याने तो मागल्या रांगेतील जिल्हाधिकाऱ्याकडे, त्याने त्याच्या मागल्या रांगेतील उपजिल्हाधीका-याकडे, त्याने त्याच्याही मागल्या रांगेतील मामलेदाराकडे, असं होता होता, जेव्हा गोळा प्रत्येक रांगेतल्या अधिका-याचे हात ओले करीत करीत, सर्वांत मागल्या रांगेत उभ्या असलेल्या विंगचॅंगच्या हाती गेला, तेव्हा त्याचा आकार सुपारीएवढा होऊन गेला होता !

तो सुपारीएवढा खडा हाती येताच, तो स्पष्टवक्तेपणा व सचोटी याविषयी प्रसिध्द असलेला विंगचॅंग बादशहाकडे धावत गेला व तो खडा त्याला दाखवून म्हणाला,

‘महाराज, आपण मंत्र्याच्या हाती देताना हा बर्फाचा गोळा केवढा मोठा होता, आणि माझ्या हाती पडताना तो किती लहान झाला, हे प्रत्यक्ष पाहिलंच ना ?

तशीच गत आपल्या सर्व कल्याणकारी योजनांची झाली आहे. राज्याच्या प्रत्येक विभागातील लोककल्याणकारी योजनांसाठी आपण मोठमोठया रकमा मंजूर करता, आणि इथून पाठवूनही देता. पण ती रक्कम त्या भागात पोहोचती होईपर्यंत प्रत्येक अधिकारी आपले हात ‘ओले ‘ करुन घेतो आणि प्रत्यक्षात राज्याच्या त्या त्या विभागाच्या विकासासाठी नाममात्र रक्कम खर्च केली जात असल्याने त्या विभागाचा विकास तसाच मागे रहतो. मग राज्याचा कायापालट व्हावा कसा ? आणि गरीब माणूस तरी सुखी व्हावा कसा ?’

अपेक्षा एका आईची

Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )