कवडी (Kavdi)

।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।

कवडी : (Kavdi)

शास्त्रीय दृष्ट्या सायप्रिइडी कुलातील सायप्रिया वंशाच्या सागरी गोगलगाईंच्या शंखांना कवडी म्हणतात. कवड्या विविध रंगांच्या, चकचकीत व सुंदर असल्यामुळे शंख-शिंपल्यांचे संग्राहक त्या मौल्यवान मानतात. पूर्वी आफ्रिकेत आणि भारतात कवड्यांचा नाण्यांप्रमाणे उपयोग करीत; त्याचप्रमाणे त्या दागिने म्हणून वापरीत.

दक्षिण भारतात रेणुका, यल्लम्मा, मातंगी, मरीआई, भवानी, महालक्ष्मी इ. नावांनी गाजलेल्या देवींच्या उपासनाक्षेत्रात कवडीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. गोंधळी, भुत्ये, पोतराज, मातंगी, जोगती, जोगतिणी हे देवीचे उपासकवर्ग आपल्या अंगाखांद्यांवर कवड्यांचे अलंकार परिधान करतात. गोंधळ्यांच्या, भुत्यांच्या, मातंगी-जोगतिणींच्या गळ्यांत कवड्यांच्या माळा असतात; भुत्यांचे शंक्वाकार टोप बाहेरून कवड्यांनी जडविलेला असतो; ते गळ्यातही कवड्यांच्या माळा घालतात;

जोगतिणींच्या ‘जगां’ ना कवड्या गुंफलेल्या असतात; काखेत अडकविलेल्या भंडाराच्या पिशव्यांनाही कवड्या लावलेल्या असतात. मातंगींच्या परड्या कवड्यांनी सजविलेल्या असतात आणि या सर्व उपासकवर्गांच्या कंठातून वक्ष:स्थळावर लोंबत असलेली देवीप्रतिमा ज्या जाड वस्त्रपटावर जडवलेली असते, तो पटही कवड्या गुंफून शोभिवंत केलेला असतो. प्रत्यक्ष देवालाही कवड्यांचा शिणगार प्रिय असल्याची धारणा देवीविषयक लोकगीतांत वारंवार व्यक्त झालेली आहे.

दक्षिणेत ग्रामदेवतांच्या पुजारिणीही गळ्यात कवड्यांच्या माळा घालतात. जुन्या काळी कवडीचा उपयोग नाणे म्हणून करीत असत. कवडी ही जागतिक संस्कृतीत प्राचीन काळापासून आलेली असून ती भगप्रतीक म्हणून समजली गेली आहे. ती अंबादेवीची प्रिय वस्तू आहे. दक्षिणेत ग्रामदेवतांच्या पुजारिणीही गळ्यात कवड्यांच्या माळा घालतात. कवडीच्या योनिसदृश्य आकारामुळे देवीच्या उपासनेत कवडीला असाधारण स्थान असून ही वस्तू जगभराच्या संस्कृतीत योनिप्रतीक मानली गेली आहे.

वांझपणाचे निराकारण करण्यासाठी कवड्यांचा नेहमी वापर केला जातो. सर्जनाच्या देवतांनी त्यामुळेच ती प्रिय मानली असावी. कवड्यांमध्ये सर्व प्रकाराच्या अनिष्टांचे निवारण करण्याचे सामर्थ्य असल्याची लोकश्रद्धा आढळते.

कवडी हे देशभर मातृदेवतेचे प्रतीक म्हणून मिरविले जाते. कवड्या दोन प्रकारच्या. एकीला अंबुकी म्हटले जाते. ही कवडी रंगाने जरा पिवळी, तर दुसरी कवडी राखाडी रंगाची. ती मातागीची. येडेश्वरी, मातंगी, रेणुका, यल्लमा या रुपात देवीला पुजणारे भाविक राखाडी रंगाच्या कवड्या वापरतात. तुळजापुरात पुजाऱ्यांची माळ चौसष्ट कवड्यांची असून त्याचा संबंध चौसष्ट कलांशी असावा. भक्ती, वैराग्य आणि चलन अशी कवडीची तीन रूपे असून प्रत्येकाची श्रद्धा निराळी आहे.

कवडीची आभूषणे मिरविण्याची पद्धतही वेगवेगळी असून आंध्रातील भाविक कवडीचे आभूषण उलट्या बाजूने वापरतात. कवड्यांची माळ आणि आभूषणे बनविणाऱ्यांची तुळजापुरात संत रोहिदास नगर नावाची एक वस्ती आहे.

प्रत्येक प्रातांत कवडीचे पूजन ‘सुफलनकारक’ मानले जाते. आंध्र प्रदेशात विवाहानंतर वधूपित्याला कवडी भेट दिली जाते. पंजाबात मुलगी सासरी जाताना तिला चरखा भेट देतात, त्याला कवड्या चिकटविलेल्या असतात. ओरिसातही रूखवत दिले जाते. त्याला जगथी पेडी असे म्हणतात. त्यातही कवड्या दिल्या जातात.

विवाह समारंभात महाराष्ट्रात सुपारी सोडविण्याचा खेळ पूर्वी नवरा-बायकोमध्ये होत असे. ओरिसात सुपारीऐवजी कवडी वापरली जाते. राजस्थानात विवाहप्रसंगी वधू-वराच्या मस्तकी लोंबतील अशा पद्धतीने कवड्या बांधल्या जातात. आसाममध्ये वडिलधारी मंडळी नवदाम्पत्यासमोर कवड्यांचा खुळखुळ आवाज करतात. देशभरातल्या या पद्धतीना नवनिर्माणाची पूजाच म्हटली जाते.

कवड्याची माळ गळ्यात मिरविणे म्हणजे, स्त्रीच्या नवनिर्मितीच्या शक्तीला वंदन करणे होय. त्यामुळेच कवड्यांची माळ तुळजापुरात नवरात्रात आवर्जून घेतली जाते. श्रीमहालक्ष्मीचा उपासक पोतराजही कवडी अंगावर मिरवितो. एखादा माणूस मृत पावला की, कवड्याची माळ आणि परडी होमकुंडात विसर्जित करण्याची प्रथा आजही पाळली जाते.

कवड्यांच्या आभूषणांचे अनेक प्रकार आहेत. आंध्र आणि कर्नाटकातून आलेल्या भाविकांमध्ये कवडी अंगावर मिरविण्याची पद्धत आहे.

हे समुद्रात सापडणारे, एका प्रकारच्या गोगलगाईचे कवच आहे. याचा वापर नाण्याचा शोध लागण्यापूर्वी चलन म्हणून होत असे. तसेच सारीपाट, चौसर इत्यादी खेळांमधे याचा वापर दान टाकण्यास करण्यात येत असे.

साधू-बैरागी-वासुदेव कवडीच्या माळा गळ्यात घालतात. गाई, बैल, घोडे, म्हशी इत्यादींच्या सुशोभनासाठी कवडयांचा वापर करण्यात येतो.

कवडीला महाराष्ट्रामध्ये पारंपरिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या अधिक महत्त्व आहे. कारण आदिशक्तीचे रूप असलेल्या तुळजापूरच्या तुळजाभवानीचे भक्त कवड्यांच्या माळा परिधान करून देवीची भक्ती करतात. तशी प्रथा पूर्वापार चालत आली आहे. त्याची साक्ष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजही कवड्यांची माळ परिधान करत हाेते. असे अनेक पुरावे सापडतात. म्हणूनच तुळजापूर शहरात नवरात्र उत्सवाच्या वेळी कवड्यांच्‍या माळांची शंभरपेक्षा अधिक दुकाने थाटली जातात.

अाराधनी महिला कवड्यांच्या माळेचा साज घालताना दिसतात. कवड्यांमध्ये अंबुकी कवडी व येडाई कवडी असे दोन प्रकार असतात. कवड्यांच्या माळा दक्षिण भारतातील चेन्नई येथून तुळजापुरात आणल्या जातात. कवडीची माळ गळ्यात घालून अंबाबाई देवीचे भक्त परडी हातात घेऊन जोगवा मागतात.

मृदुकाय (मॉलस्का) संघातील उदरपाद (गॅस्ट्रोपोडा) वर्गातील एक सागरी प्राणी. कवडी ही संज्ञा कवच असलेल्या जिवंत प्राण्यास आणि प्राणी मेल्यानंतर त्याचे राहिलेले कवच या दोन्हींसाठी वापरतात. उदरपाद वर्गात शंखाच्या आणि बिनशंखाच्या गोगलगायींचा समावेश होतो. कवडी हा शंखाच्या गोगलगायींचा एक प्रकार आहे. यांच्या सु. २०० जाती आहेत.

हिंदी महासागर व पॅसिफिक महासागराच्या उष्ण प्रदेशांत हे प्राणी मुबलक प्रमाणात आढळतात. ते प्रवाळ भित्तीबरोबर राहतात. या क्षेत्रात जास्त आढळणार्‍या कवडी प्रकाराचे शास्त्रीय नाव सायप्रिया मोनेटा असे आहे. सामान्य इंग्रजीत त्याला मनीकौरी म्हणतात. याचे कारण आफ्रिका, भारत इत्यादी देशांत एकोणिसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत चलन म्हणून या गोगलगायींच्या कवचांचा वापर केला जात असे.

कवचाच्या आत या गोगलगायीचे मऊ, लिबलिबीत शरीर असून त्याचे डोके, पाद, आंतरांग आणि प्रावार (त्वचेसारखे आवरण) असे भाग असतात. प्रावाराची कड झालरीसारखी असून त्यावर संस्पर्शके असतात. कवच प्रावाराने अर्धवट किंवा पूर्णपणे झाकलेले असते. कवचाची वाढ होत असताना दोन्ही कडा आत वळून कवचाचा पीळ जवळजवळ झाकून टाकतात. त्यामुळे इतर गोगलगायींत असलेला कवचाचा पीळ त्यात दिसत नाही. कवचाच्या खालच्या बाजूस एक लांब आणि रुंद फट असून कवचाच्या कडांवर दातांसारखी संरचना दिसते. कवडी प्राणी मुख्यत: शाकाहारी असून शैवाल व स्पंज यांच्यावर रात्रीच्या वेळी उपजीविका करतो.

कवड्या विविध रंगांच्या, चकचकीत व सुंदर असल्यामुळे शंख-शिंपल्यांचे संग्राहक त्या मौल्यवान मानतात. त्यांचे दागिने म्हणूनही वापर होत असे. कवड्यांवर कोरीव काम करून व रंगकाम करून विविध शोभेच्या वस्तू तयार करतात. पट व द्यूत यांसारख्या घरगुती खेळांत कवड्या फासे म्हणून वापरतात. त्यांना दानकवड्या असे म्हणतात.

जिवंतिका पूजन आणि श्री जिवंतिका आरती (श्रावणी शुक्रवार व्रत) । (Jivantika Puja Aani Jivantika Arati)

1 thought on “कवडी (Kavdi)”

  1. खरं खोटं माहित नाही. पर्ंतु मुतखडा आतल्यात झीरवण्यासाठी फूलपात्रात लींबाचा रस घेऊन त्यात कवड्या टाकून रात्रभर भिजत ठेवल्यास कवड्या त्यात विरघळतात. त्या रसाचं अनुषापोटी सेवन केल्या मुतखडा झिरून जातो असे म्हणतात.

    Reply

Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )