जाणून घ्या केळी लागवडी बद्दल संपूर्ण माहिती तेही एका क्लीक मध्ये (Keli Lagwad) – Banana Farming

केळीचे उगमस्थान । Banana Farming । Keli Sheti । Keli Lagvad । केळीच्या पिकाखालील क्षेत्र आणि उत्पादन । केळीसाठी योग्य हवामान आणि केळीसाठी योग्य जमीन । केळीच्या सुधारित जाती । केळीची अभिवृद्धी । केळीची लागवड पद्धती । केळी पिक लागवडीसाठी हंगाम । केळी पिक लागवडीचे अंतर । केळीच्या पिकाला वळण । केळी पिक छाटणीची पद्धत । केळी पिकास खत व्यवस्थापन। केळी पिकास पाणी व्यवस्थापन । केळी पिकातील आंतरपिके । केळी पिकातील आंतरमशागत । केळी पिकावरील महत्त्वाच्या किडी । केळी पिकावरील महत्त्वाचे रोग । केळीच्या फळांची काढणी । केळी पिकाचे उत्पादन ।

।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।

अनुक्रम दाखवा

केळीचे उगमस्थान, महत्त्व आणि भौगोलिक प्रसार : Origin, Importance and Geographical Distribution of Banana:

केळी या पिकाचे मूळ स्थान भारतातील दक्षिण आसाम राज्यात समजले जाते. या पिकाची लागवड पुरातन काळापासून आशिया खंडाच्या उष्ण कटिबंधातील प्रदेशात होत असल्याचे दिसून येते. ज्या ठिकाणी बाराही महिने भरपूर पाणीपुरवठा आणि बाजारपेठेची व वाहतुकीची व्यवस्था उपलब्ध आहे अशा ठिकाणी केळीची लागवड आर्थिक दृष्ट्या फायदेशीर ठरते.
भारतातून सौदी अरेबिया, इराण, कुवेत, दुबई, जपान आणि युरोपमधील बाजारपेठेत केळीची निर्यात होत असून परकीय चलन मिळवण्याचे केळी हे एक नगदी पीक आहे.
पिकलेली केळी हे उत्तम पौष्टिक अन्न असून या फळात साखर प्रथिने, स्निग्ध पदार्थ तसेच कॅल्शियम, फॉस्फरस, लोह ही खनिजे आणि ‘ब’ गटातील जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. केळीच्या फळातील अन्नघटकांचे प्रमाण खालीलप्रमाणे असते.

अन्नद्रव्येघटकाचे
प्रमाण (%)
अन्नद्रव्येघटकाचे
प्रमाण (%)
पाणी61.4लोह0.04
शर्करा (कार्बोहायड्रेट्स्)36.4
जीवनसत्त्व ब – 1150 मिलिग्रॅम
प्रथिने (प्रोटीन्स)1.3रिबोफ्लेवीन30 मिलिग्रॅम
स्निग्धांश (फॅट्स)0.2निकोटीन आम्ल0.3 मिलिग्रॅम
खनिजद्रव्ये0.7जीवनसत्त्व क 11 मिलिग्रॅम
चुना0.01उष्मांक153 कॅलरी
स्फुरद0.05
केळीच्या फळातील अन्नघटकांचे प्रमाण

मध्य अमेरिका, कॅरेबियन बेटे आणि वेस्ट इंडिज या देशांत केळीची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. पाश्चात्त्य देशांतील उष्ण कटिबंधातील प्रदेशात केळीची लागवड अलीकडच्या काळातील आहे. भारतात तामिळनाडू, केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक, बिहार, पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेश या राज्यांत केळीची लागवड केली जाते. भारतात तिरुचिरापल्ली, मलबार, तंजावर, सालेम हा भाग केळीच्या लागवडीसाठी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रात जळगाव, नांदेड, परभणी, धुळे, पुणे, सांगली, वसई आणि वर्धा जिल्ह्यांत केळीखालील लागवडीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे.

केळीच्या पिकाखालील क्षेत्र आणि उत्पादन : Area under banana crop and production:

भारतातील एकूण फळबागांखालील क्षेत्रापैकी 20% क्षेत्र फक्त केळी पिकाखाली आहे. महाराष्ट्राचा केळी लागवडीच्या क्षेत्रात इतर राज्यांच्या तुलनेत तिसरा क्रमांक असला तरी व्यापारी दृष्टीने पाहता उत्पादनात पहिला क्रमांक लागतो. भारतातील केळीच्या एकूण उत्पादनापैकी 50% उत्पादन एकट्या महाराष्ट्रात होते. सध्या महाराष्ट्रात एकूण 50,000 हेक्टर क्षेत्र केळीच्या लागवडीखाली असून ते भारतातील एकूण केळी पिकाच्या क्षेत्राच्या 20% इतके आहे. महाराष्ट्रातील 80% पेक्षा अधिक क्षेत्र (40,000 हेक्टर) एकट्या जळगाव जिल्ह्यांत आहे. केळी लागवडीचे प्रमुख जिल्हावार क्षेत्र पुढीलप्रमाणे आहे.

जिल्हाक्षेत्र (हेक्टर)
जळगाव40,000
नांदेड1,800
परभणी1,700
धुळे1,400
पुणे1,200
सोलापूर1,000
सांगली1,000
वर्धा1,000
इतर900
एकूण50,000
केळीचे महाराष्ट्रातील जिल्हावार क्षेत्र

वरील जिल्ह्यांशिवाय महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये थोड्याफार प्रमाणात केळीचे उत्पादन घेतले जाते.
महाराष्ट्रात केळीचे उत्पादन दर वर्षी अंदाजे 20 लाख टनांपर्यंत होते. यापैकी एकट्या जळगाव जिल्ह्यांत 16 लाख टन उत्पादन होते.

केळीसाठी योग्य हवामान आणि जमीन : Suitable Climate and Land for Banana:

केळी पिकासाठी हवामान :

साधारण उष्ण आणि दमट हवामान केळीच्या पिकाची वाढ आणि उत्पादनासाठी पोषक असते. तापमान 40 अंश सेल्सिअसच्या वर अथवा 15 अंश सेल्सिअसच्या खाली असल्यास पिकाच्या वाढीवर आणि उत्पादनावर अनिष्ट परिणाम होतो. या पिकाला अधिक पाऊस चांगला मानवतो. परंतु उन्हाळयातील उष्ण वारे व हिवाळयातील कडाक्याची थंडी हानीकारक असते. भारतात कन्याकुमारीपासून हिमालयातील उंच प्रदेशापर्यंत सर्वत्र केळीची लागवड केली जाते. परंतु हवामानानुसार उत्पादनात कमीअधिक प्रमाणात फरक पडतो. केळीच्या लागवडीसाठी समशीतोष्ण आणि दमट हवामान आणि कमी वाऱ्याचा प्रदेश अधिक चांगला असतो. महाराष्ट्रात कोकणातील ठाणे, रत्नागिरी या भागातील हवामान केळीस फारच पोषक आहे.

केळी पिकासाठी जमीन :

केळीच्या पिकाला 1 मीटरपर्यंत खोल, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन उत्तम असते. या पिकाला भारी, काळी कसदार, सेंद्रिय पदार्थयुक्त, गाळाची, भुसभुशीत जमीन मानवते. जळगाव जिल्ह्यात केळीखाली फार मोठे क्षेत्र आहे. याची महत्त्वाची कारणे म्हणजे तेथील काळी कसदार जमीन, पाणी पुरवठ्याची बारमाही सोय आणि उत्तर भारतातील बाजारपेठांशी असलेले दळणवळण ही होत. कमी खोलीच्या जमिनीत सेंद्रिय खतांचा भरपूर पुरवठा करून केळीची लागवड करता येते. क्षारयुक्त जमिनी केळीच्या लागवडीसाठी योग्य नसतात. जमिनीतील अधिक चुनखडी या पिकास हानीकारक ठरते.

केळीच्या सुधारित जाती : Improved Varieties of Banana:

केळीच्या फळांच्या व पानांच्या उपयोगांवरून 30-40 जाती प्रचलित आहेत. प्रत्येक जातीच्या गुणवैशिष्ट्यांवरून निरनिराळ्या प्रकारच्या हवामानात विशिष्ट जातींची लागवड केली जाते. त्याची वर्गवारी तीन प्रकारांत केलेली आहे.

केळी पिकवून खाण्यासाठी जाती :

बसराई, हरिसाल, लाल वेलची, सफेद वेलची, मुठेळी, लाल केळी, राजेळी.

केळी शिजवून किंवा तळून खाण्यासाठी जाती :

राजेळी.

पानाच्या उपयोगाच्या आणि शोभेसाठी जाती :

रानकेळ.

महाराष्ट्रात खालील जातींची लागवड निरनिराळया भागांत केली जाते :

बसराई (कॅव्हेंडिश ) : Cavendish

ही जात कॅव्हेंडिश केळी या नावाने ओळखली जाते. या जातीला भुसावळ, खानदेशी, शेंदुर्णी, इत्यादी नावानेसुद्धा निरनिराळ्या भागांत ओळखतात. महाराष्ट्रातील एकूण केळीच्या लागवडीखालील क्षेत्रापैकी 75% क्षेत्र बसराई जातीच्या लागवडीखाली आहे.
या जातीची लागवड जळगाव जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर केली जाते. या जातीच्या झाडांचा खुंट जांभळट हिरव्या रंगाचा असून खोडाची उंची 1.5 ते 2 मीटर, पाने रुंद आणि पानावर सुरुवातीला शेंदरी जांभळट रंगाचे डाग असतात. कडाक्याच्या थंडीला ही जात बळी पडते. झाडाचे आयुष्य साधारणपणे 18 महिनेपर्यंत असते. घड (लोंगर) मोठे आणि सारख्या आकाराचे असून प्रत्येक घडात 6 ते 7 फण्या असतात. घडाचे वजन 15 ते 20 किलोपर्यंत असते. फळ पिकल्यावर सालीचा रंग हिरवट पिवळा होतो.

हरिसाल (बॉम्बे ग्रीन) : Bombay green

या जातीची लागवड समुद्रकिनाऱ्यालगतच्या दमट व समशीतोष्ण हवामानात यशस्वीरित्या केली जाते. ठाणे जिल्ह्यातील वसई भागात या जातीची लागवड करतात. या जातीच्या फळांना मुंबई बाजारपेठेत चांगली मागणी आहे. या जातीचे झाड 3.5 ते 4.0 मीटर उंच वाढते.
केळीच्या खुंटाचा रंग हिरवा असून बुडाशी जांभळ्या रंगाचे ठिपके असतात. पाने अरुंद व लांब असतात. घडाचे वजन 25 ते 35 किलोग्रॅमपर्यंत असते. घडात प्रत्येकी 150 ते 160 पर्यंत केळी असतात. फळ मोठे व लांब असून पिकलेल्या फळाचा रंग हिरवा असतो. म्हणून या जातीला हरिसाल केळी म्हणतात. या जातीची फळे बसराई जातीच्या फळांपेक्षा अधिक काळ टिकतात.

लाल वेलची : Lal Velchi (Red banana)

या जातीला चंपा, पवन किंवा म्हैसुरी केळी, आंबट वेलची, इत्यादी नावांनीसुद्धा ओळखतात. या जातीची लागवड पुणे, ठाणे आणि समुद्रकिनारपट्टीच्या भागात करतात. केळीचा खुंट तपकिरी तांबूस रंगाच असतो, म्हणून या जातीला लाल वेलची असे म्हणतात.
या जातीची झाडे उंच वाढणारी असून घड लांब, भरघोस आणि जड असतात. घडात 10 ते 15 पर्यंत फण्या असून 200 ते 250 पर्यंत केळी असतात. घडाचे वजन 15 ते 20 किलोपर्यंत असते. फळे आकाराने लहान, अर्ध फुगीर, सोनेरी पिवळया रंगाची असतात. फळांची साल फार पातळ असते व गर घट्ट तांबूस पांढऱ्या रंगाचा असून चवीला आंबटसर असतो.

सफेद वेलची : Safed Velchi

या जातीला कागदी वेलची, सोन्याळ, इत्यादी नावांनीही ओळखतात. या जातीची लागवड ठाणे, रायगड तसेच कारवार भागात केली जाते.
या जातीचा खुंट हिरव्या रंगाचा असून झाड साधारण उंचीचे असते. घडाचे वजन 10 ते 12 किलोपर्यंत असते. घड दाट व लांब असून घडात 12 ते 14 फण्या असतात. या जातीची फळे लहान असल्यामुळे बाजारात मागणी कमी असते. फळे पातळ सालीची, गोड चवीची आणि पिकल्यावर फळांचा रंग फिकट पिवळा असतो. या जातीची फळे जास्त दिवस टिकतात.

राजेळी : Rajeli Banana

या जातीला राजेळी, मिंदोळी, नेंद्राबाळी या नावांनी ओळखले जाते. ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि कारवार या समुद्रकिनाऱ्यालगतच्या भागात या जातीची लागवड करतात.
या जातीच्या खुंटाचा रंग हिरवा असून त्यावर तपकिरी रंगाचे ठिपके असतात. झाड उंच व दणकट असून घड आकाराने लहान असतात. घडात 80 ते 100 केळी असतात. केळाला फक्त तीन बाजू असतात. या जातीचा गर खूप घट्ट, तांबूस रंगाचा, मध्यम गोड असून केळी शिजवून खातात. या जातीची फळे वाळवून सुकेळी बनवितात.

मुठेळी :

या जातीला सोनेकेळी, राजबाळी म्हणून ओळखतात. या जातीची लागवड रायगड, वसई, भागात व्यापारी तत्त्वावर करतात. खुंटाचा रंग पिवळट हिरवा असून झाड उंच असते. पिकलेल्या फळाचा रंग पिवळा असून फळे टिकाऊ असतात. घडाचे वजन 10 ते 20 किलोपर्यंत असते. घडात 100 ते 125 पर्यंत फळे असतात.

लाल केळी : Red banana

या जातीला चंद्रबाळी, तांबडी या नावानेसुद्धा ओळखतात. ठाणे, कारवार या भागात या जातीची लागवड केली जाते. या भागात भाजीसाठी केळीच्या फळांचा उपयोग करतात. लाल रंगामुळे उत्तर भारतात या जातीला चांगली मागणी आहे.
खुंट, फळ आणि गराचा रंग तांबूस असतो. घडात 75 ते 100 केळी असतात. फळे जास्त दिवस टिकत नाहीत. फळधारणा होण्यास जास्त कालावधी लागत असल्यामुळे या जातीची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जात नाही.

केळीची अभिवृद्धी आणि लागवड पद्धती : Growth and Cultivation Methods of Banana:

केळीची लागवड केळीच्या मुनवे किंवा पिलांपासून करतात. केळीच्या झाडाच्या खोडाभोवती मुनवे किंवा पिल्ले येतात. हे मुनवे दोनतीन महिन्यांचे झाल्यावर कंदासह काढून लागवडीसाठी वापरतात. ज्या झाडापासून लागवडीसाठी मुनवे घेतात अशी झाडे जोमदार, भरपूर उत्पादन देणारी आणि पर्णगुच्छ (बंची टॉप) किंवा मोझेक रोगांपासून मुक्त अशी असावीत. पूर्ण वाढ झालेल्या झाडांवरील घड काढल्यानंतर जमिनीपासून मुख्य खोड कापून वेगळे केल्यानंतर या खोडाभोवती दोन प्रकारची पिल्ले येतात. तलवारीच्या पात्यासारखी अरुंद पाने असलेले मुनवे लागवडीस वापरावेत. मोठी पाने असलेले मुनवे लागवडीस योग्य नसतात. लागवडीच्या वेळी मुनवे खोडाच्या मुख्य भागापासून कंदासह अलग करून घ्यावेत. नारळाच्या आकाराचे अर्धा ते एक किलो वजनाचे कंद लागवडीसाठी वापरावेत. कंदावरील मुळांची शेंडे छाटणी करावी. तसेच वरील कोंबांची 30 सेंमी. शेडे ठेवून छाटणी करावी. केळीची लागवड चौरस किंवा आयत पद्धतीने करतात. लागवडीच्या वेळी कंदावरील डोळे वरच्या बाजूला राहतील अशा पद्धतीने लावावेत. अलीकडे ऊतिसंवर्धित रोपे लागवडीसाठी वापरण्याचे प्रमाण वाढत आहे.

केळी पिक लागवडीसाठी हंगाम आणि केळी पिक लागवडीचे अंतर : Season for Banana Crop Planting and Banana Crop Spacing:

पूर्वमशागत : उन्हाळयात जमीन नागरून नंतर वखराच्या पाळ्या देऊन भुसभुशीत करावी. काडीकचरा, धसकटे वेचून घ्यावीत. नंतर हेक्टरी 50 टन (100 गाड्या) कुजलेले शेणखत किंवा कम्पोस्ट खत घालून चांगले मिसळून घ्यावे. नंतर नांगराने सऱ्या किंवा खड्डे करून योग्य अंतरावर लागवड करावी.
केळीची लागवड जून-जुलै महिन्यात जेव्हा हवामान उबदार आणि दमट असते तेव्हा करावी. समुद्रकिनाऱ्यालगतच्या प्रदेशात या पिकाची लागवड मार्च – एप्रिल, जून-जुलै आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर या तीन हंगामांत करतात. केळीची लागवड पावसाच्या सुरुवातीला शक्य तितक्या लवकर करावी

केळी पिक लागवडीचे अंतर :

नांगराच्या साहाय्याने ठरावीक अंतरावर सऱ्या पाडून नांगराच्या तासात चौरस पद्धतीने केळीची लागवड करतात. दोन झाडांतील आणि दोन ओळींतील अंतर हे लागवड करायच्या केळीच्या जातीवर व जमिनीच्या प्रतीवर अवलंबून असते. ठेंगण्या आणि कमी विस्तार होणाऱ्या जातींसाठी 1.25 X 1.25 मीटर ते 2.5 X 2.5 मीटर अंतर योग्य असते. जळगाव-खानदेश भागात जून महिन्यातील लागवड चौरस पद्धतीने 1.5 X 1.5 मीटर अंतरावर करतात. फेब्रुवारी महिन्यातील लागवड 1.35 X 1.35 मीटरवर किंवा आयताकृती पद्धतीने 1.5 X 1.35 मीटर अंतरावर करतात. बसराई जातीची लागवड 2X2 मीटर अंतरावर केल्यास झाडांची वाढ चांगली होऊन घड मोठा पडतो व फळांची प्रत सुधारते. दुहेरी ओळ किंवा पट्टा पद्धत वापरूनही केळीची लागवड केली जाते.

केळीच्या पिकाला वळण आणि केळी पिक छाटणीची पद्धत : Banana Crop Rotation and Banana Crop Pruning Method:

केळीच्या झाडांना वळण किंवा छाटणी करण्याची आवश्यकता नसते. केळीच्या झाडावरील पानांची संख्या तुलनात्मक दृष्ट्या कमी असल्यामुळे ती झाडावर निरोगी अवस्थेत, न फाटता टिकवून ठेवणे उत्पादनाच्या आणि फळांच्या प्रतीच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे. पाने फाटल्यास उत्पादनात घट येते. कारण पाने ही झाडांच्या आणि फळांच्या पोषणासाठी अन्न तयार करतात. केळीची पाने फाटू नयेत म्हणून वाऱ्याच्या दिशेला वारा विरोधक झाडांची लागवड करून वारा थोपवावा.

केळी पिकास खत व्यवस्थापन आणि केळी पिकास पाणी व्यवस्थापन : Fertilizer Management for Banana Crop and Water Management for Banana Crop:

खते :

केळी या पिकाला नत्र, स्फुरद आणि पालाश या अन्नद्रव्यांची मोठ्या प्रमाणावर गरज असते. ही अन्नद्रव्ये सेंद्रिय आणि रासायनिक खतांतून पुरवावी लागतात. हेक्टरी 440 किलो नत्र, 150 किलो स्फुरद आणि 440 किलो पालाश (प्रत्येक झाडास 100 ग्रॅम नत्र, 40 ग्रॅम स्फुरद आणि 100 ग्रॅम पालाश) द्यावे. पूर्वमशागतीच्या वेळी 100 गाड्या (अंदाजे 50 टन) शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत चांगले मिसळावे. कृषी विद्यापीठांनी केळीच्या पिकाला लागणाऱ्या खताच्या मात्रांच्या पुढीलप्रमाणे शिफारशी केल्या आहेत. 200 ग्रॅम नत्र 4 हप्त्यांत म्हणजे लागवडीच्या वेळी, दोन, चार व सहा महिन्यांनी प्रत्येक वेळी 50 ग्रॅम प्रति झाड तर 80 ग्रॅम स्फुरद लागवडीच्या वेळी व पुन्हा दोन महिन्यांनी व 100 ग्रॅम पालाश लागवडीच्या वेळी व पुन्हा 6 महिन्यांनी या पद्धतीने 200 ग्रॅम नत्र, 160 ग्रॅम स्फुरद व 200 ग्रॅम पालाश प्रति झाड अशी खते द्यावीत. प्रत्येक झाडास 500 ते 700 ग्रॅम एरंडीची पेंड द्यावी. शेणखताबरोबर 400 ग्रॅम अमोनियम सल्फेट प्रतिझाड लागवडीच्या वेळी द्यावे.
केळीची मुळे जमिनीच्या वरच्या थरातूनच अन्नद्रव्ये घेत असल्यामुळे वरखते नेहमी वर्तुळाकार पद्धतीने बुंध्याजवळ 10 ते 20 सेंमी. अंतरावर 8 ते 10 सेंमी. खोलीचे आळे करून द्यावीत आणि नंतर मातीने खते झाकून पाणी द्यावे. खतांच्या सर्व मात्रा केळीच्या लागवडीपासून सहा महिन्यांतच द्याव्यात.

पाणी व्यवस्थापन :

केळीच्या लागवडीनंतर कंदाची चांगली वाढ होण्यासाठी झाडांना नियमित भरपूर पाण्याची गरज असते. झाडांना वरखताची मात्रा दिल्यानंतर सरी पद्धतीने हलके पाणी झाडांना द्यावे. वाफ्याची बांधणी झाल्यानंतर पाणी जमिनीत खोलपर्यंत मुरेल अशा रितीने सावकाश द्यावे. बागेतील हवामान दमट ठेवण्यासाठी दोन पाळ्यांतील अंतर कमी ठेवावे. हिवाळयात केळीला 8 ते 10 दिवसांनी आणि उन्हाळयात 6 ते 8 दिवसांनी जरुरीप्रमाणे पाणी द्यावे.

केळीचे एक पीक येण्यास साधारणपणे हवामान आणि जमिनीच्या मगदुराप्रमाणे पाण्याच्या 60 ते 80 पाळया द्याव्या लागतात. उन्हाळयात जेव्हा पाण्याची कमतरता असते तेव्हा जमिनीवर पालापाचोळा किंवा काळचा पॉलिथीन पेपरचे आच्छादन देऊन जमिनीतील ओल टिकविता येते. याशिवाय पाणी देण्याच्या पद्धतीत बदल करून कमी पाण्यात बागा वाढविता येतात.

(1) ठिबक सिंचन पद्धत :

ठिबक सिंचन पद्धतीत पाण्याची खूप बचत करता येते. या पद्धतीच्या वापरासाठी सुरुवातीला भांडवली खर्च खूप येत असल्यामुळे फारच कमी शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन बसविणे शक्य होते. अलीकडे राज्यशासनाने तसेच केंद्र शासनाने ठिबक संचावर अनुदान देणे सुरू केले आहे व याचा परिणाम होऊन ठिबक पद्धतीने पाणी देण्याचे प्रमाण वाढत आहे.

(2) सरी पद्धत :

उन्हाळयात किंवा जेव्हा पाणी कमी असते तेव्हा सरी पद्धतीने पाणी देणे जास्त उपयुक्त असते. यामुळे पाण्याची बचतही होते.

केळी पिकातील आंतरपिके आणि केळी पिकातील आंतरमशागत : Intercropping in Banana Crop and Intercropping in Banana Crop:

केळी हे पीक पाणी आणि अन्नद्रव्याच्या दृष्टीने खादाड असल्यामुळे आणि दोन झाडांतील व ओळींतील जागा कमी असल्यामुळे, केळीच्या बागेत आंतरपिके घेताना आंतरपिकाची निवड करणे फार कठीण जाते. शिवाय बागेत नेहमी दमट हवामान आणि कमी सूर्यप्रकाश खेळत असल्यामुळे आंतरपिकांच्या वाढीवर याचा विपरीत परिणाम होतो. रोग व किडीला बागेतील दमट हवामान पोषक असते. म्हणून केळीच्या बागेत आंतरपिके सहसा घेतली जात नाहीत. केळीच्या बागेची मशागत करताना, खते देताना या आंतरपिकांचा अडथळा होतो आणि केळीच्या वाढीवर व उत्पादनावर याचा विपरीत परिणाम होतो. जळगाव भागात केळीचे पीक 16 ते 17 महिन्यांचे झाल्यावर म्हणजे 90% घड कापल्यानंतर केळीच्या बागेत गहू, हरभरा यांसारखी पिके घेतात. कांद्याचे पीक किंवा बियाण्यासाठी कांद्याची लागवड आंतरपीक म्हणून करतात. ऑक्टोबरमध्ये केळीच्या लागवडीसोबत कांद्याची रोपे लावतात. याला त्या भागात कांदा बागेची लावणी असे म्हणतात.

आंतरमशागत :

लागवडीच्या सुरुवातीच्या तीनचार महिन्यांत बागेत चारपाच वेळा उभ्या-आडव्या कुळवाच्या पाळ्या 20 दिवसांच्या अंतराने देणे आवश्यक असते. यामुळे जमीन भुसभुशीत आणि तणविरहित राहते. झाडांची वाढ जोमाने होते. जमिनीची चांगली चाळणी करून, वरंबे बांधून झाडांभोवती मातीची भर दिल्यामुळे केळीच्या बुंध्याला आधार मिळतो. यानंतर झाडांची चांगली वाढ होण्यासाठी दर 6 ते 8 आठवड्यांनी खांदणी करून बुंध्याजवळ मातीची भर द्यावी.

केळी पिकास वाऱ्यापासून संरक्षण : Protection of banana crop from wind:

केळीच्या लागवडीसोबतच बागेभोवती वारा प्रतिबंधक अशा शेवरीसारख्या लवकर वाढणाऱ्या झाडांची लागवड करावी. केळीची पाने मोठी असल्यामुळे जोराच्या वाऱ्याने लवकर फाटतात. यामुळे उत्पादनावर अनिष्ट परिणाम होतो. हिवाळयात अधिक थंड आणि उन्हाळयात उष्ण वाऱ्यांपासून बागेचे संरक्षण अशा प्रकारच्या वारा प्रतिबंधक झाडांपासून करता येते.

केळी पिकास थंडीपासून संरक्षण : Protection of banana crop from cold:

हिवाळयात तापमान 4 ते 5 अंश सेल्सिअसपेक्षा खाली गेल्यास झाडाची पाने काळी पडून वाळतात. म्हणून रात्रीच्या वेळी वाऱ्याच्या दिशेने शेताभोवती शेकोट्या पेटवून धूर करावा. बागेचे तापमान वाढविण्यास रात्री बागेला पाणी देतात. या दोन्ही बाबींमुळे जमिनीचे तापमान 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढते आणि होणारे नुकसान टाळता येते.

पिल्ले काढणी :

केळीच्या मुख्य खोडाच्या बुंध्यालगत अनेक पिल्ले अथवा मुनवे वाढतात. ही पिल्ले जमिनीलगत कापून काढावीत. यामुळे मुख्य खोडाची वाढ जोमदार होऊन केळीचा घड मोठा पडतो. पिल्ले काढली नाही तर ती मूळ झाडातून अन्नद्रव्ये घेत असल्यामुळे मुख्य झाडाची वाढ खुंटते.

आधार देणे :

केळीचे घड वजनदार असल्यामुळे उंच वाढणाऱ्या केळींना घड लागल्यानंतर बांबूचा आधार द्यावा लागतो, अन्यथा जोराच्या वाऱ्याने झाड आणि घड मोडण्याची शक्यता असते. कमी उंच वाढणाऱ्या बसराईसारख्या जातींना सहसा आधार देण्याची गरज नसते.

केळी पिकातील घडाचे संरक्षण : Bunch Protection in Banana Crop:

हिवाळयात अथवा उन्हाळयात ज्या घडांवर दुपारचे ऊन पडते असे घड आणि अशा घडाचा दांडा वाळलेल्या केळीच्या पानाने झाकून सैल बांधावा. नाही तर फळाची साल वाळून काळसर होते आणि फळाला तडे जातात. फळाची वाढ खुंटून फळांचा आकार बदलतो.

केळी पिकातील तणनियंत्रण : Weed control in banana crop:

केळी हे बारमाही ओलिताचे पीक असल्यामुळे केळीच्या बागेत तणांचा उपद्रव सुरुवातीच्या 4-5 महिन्यांत सतत होत असतो. केळीच्या झाडांना सुरुवातीच्या पाच महिन्यांपर्यंत खताच्या मात्रा आणि पाणीपुरवठा होत असल्यामुळे या काळात बागेत लव्हाळा, हरळी, कुंदा, तांदुळजा, चांदवेल, दुधानी, घोळ, माका, पिवळा धोत्रा, इत्यादी तणे उगवतात. त्यांचा पिकाच्या वाढीवर व उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. म्हणून वेळच्या वेळी ही त काढून टाकणे महत्त्वाचे असते. या तणांचे नियंत्रण तणनाशके वापरूनही करता येते. ग्रामोक्झोन 1.5 लीटर अधिक फर्नाक्झोन 3 किलो प्रति हेक्टर फवारल्यास तणाचा परिणामकारक नाश होतो. केळीच्या बागेत बांधणीनंतर 10 सेंमी. जाडीचा गव्हाचा कुट्टा पसरून दिल्यास तणांचा बंदोबस्त करता येतो.

केळी पिकावरील महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण : Important pests of banana crop and their control:

केळीच्या झाडावर किडींचा किरकोळ उपद्रव होतो. विशेषत: मावा, पाने खाणाऱ्या अळचा, मुळचावरील सोंडे या किडींचा प्रादुर्भाव केळीच्या झाडांवर होतो. या किडींच्या नियंत्रणासाठी योग्य त्या कीटकनाशकांची फवारणी पंधरा दिवसांच्या अंतराने दोन किंवा तीन वेळा करावी.

केळी पिकावरील मावा :

मावा ही कीड केळीच्या पानाच्या खालच्या बाजूस आढळते. पर्णगुच्छ (बंची टॉप) या रोगाचा प्रसार या किडीमुळे होतो. मोनोक्रोटोफॉस (0.04%) या कीटकनाशकाची फवारणी वरचेवर केल्यास या किडीचा नाश होतो.

केळीवरील सोंडकीड :

खोडवा पिकावर ही कीड जास्त प्रमाणात येते. खोडाच्या तळाशी असलेल्या अंड्यातून निघणारी अळी खोडातील अन्नद्रव्ये फस्त करते. त्यामुळे झाडाची वाढ खुंटते. यावर उपाय म्हणून लावणीसाठी पीडित जुने कंद वापरू नयेत. कंद लागवडीच्या वेळी प्रत्येक खड्ड्यात 5 ग्रॅम फोरेट टाकावे.

केळी पिकावरील खोडकीड :

या किडीची अळी खोड पोखरते. त्यामुळे झाडाची वाढ खुंटते. बाह्य खोडावर छिद्राभोवती तपकिरी रंगाचे वलय दिसते. झाडांच्या बुडाशी थायमेट वापरावे.

केळीवरील सूत्रकृमी :

या सूत्रकृमी मुळामध्ये प्रवेश करतात. मुळावर काळे डाग पडतात. झाड ठिसूळ होऊन कोलमडून पडते. यावर उपाय म्हणून लागवडीसाठी निरोगी कंदांची निवड करून कार्बोफ्युरॉन औषध लावून मुनव्यांची लागवड करावी.

केळी पिकावरील महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण : Important diseases of banana crop and their control:

केळीच्या पिकावर मररोग ( पनामा), पर्णगुच्छ, केवडा यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव होतो.

केळी पिकावरील मररोग (पनामा) :

जमिनीत असणाऱ्या बुरशीमुळे केळीची मोठी झाडे आणि पिल्ले या रोगास बळी पडतात. त्यामुळे ती एकाकी सुकतात. या रोगाचा प्रसार झाडाच्या तसेच मुनव्याच्या कंदामधून बुरशी जाऊन होतो. अशा झाडापासून बेण्याची निवड केल्यास या रोगाचा उपद्रव नवीन लावलेल्या बागेला होतो. या रोगाची लक्षणे म्हणजे खुंटावरील साल पिवळी होऊन सुकते. पाने कडेला पिवळी होऊन सुकतात. रोगट खुंटाच्या कंदात काळया रेषा दिसतात. आम्लयुक्त जमिनीत हा रोग जास्त प्रमाणात आढळतो.
उपाय : ज्या ठिकाणी मर रोगाचा प्रादुर्भाव झाला असेल त्या ठिकाणच्या जमिनीत केळीची लागवड करू नये. नवीन लागवडीसाठी निरोगी बेणे वापरावे. बसराई आणि हरिसाल या रोगप्रतिकारक जातींची लागवड करावी. रोगट गड्डे मुळासहित काढून त्यांचा नाश करावा.

पर्णगुच्छ (बोकड्या) :

या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास केळीच्या झाडाच्या शेंड्यावर तलवारीच्या पात्यासारखा झुबका तयार होतो. म्हणून या रोगास बंची टॉप असेही म्हणतात. हा रोग व्हायरसमुळे होतो. ठाणे जिल्ह्यांतील वसई भागातील केळीच्या बागांचे क्षेत्र फार मोठ्या प्रमाणावर या रोगामुळे कमी झालेले आहे.
उपाय : लागवडीसाठी रोगमुक्त कंद किंवा मुनवे वापरावेत. कंद लागवडीपूर्वी ऑरिओफंगीनच्या द्रावणात दीड तास बुडवून लागवड केल्यास या रोगाचा प्रादुर्भाव होत नाही.

केळीचा पोंगा सड रोग (हार्ट रॉट) :

हिवाळयात केळीच्या झाडाच्या गाभ्याचा भाग वरून खालपर्यंत कुजलेला आढळतो. झाडावरील मधोमध असलेले मुख्य पान सडून पानावर पिवळे चट्टे दिसतात. या रोगाचा प्रसार मावा किडीपासून होतो. झाडाच्या मधल्या कोवळया पानावर पांढरट किंवा पिवळचा रंगाचे पट्टे प्रथम दिसतात. पानाच्या वाढीबरोबर चट्टे तांबूस रंगाचे होतात व पानाच्या कडा आतल्या बाजूस गुंडाळल्या जातात.
उपाय : या रोगाच्या नियंत्रणासाठी रोगट झाडे कंदासहित काढून टाकावीत. कीटकनाशकांची फवारणी करून मावा किडीचे नियंत्रण करावे. काकडीवर्गीय आंतरपिके बागेजवळ घेऊ नयेत.

सिगार एण्ड रॉट :

जळगाव भागात या रोगाला ‘फळावरील काळी कोंडी रोग’ असे म्हणतात. या भागात केळीच्या ऑक्टोबर लावणीच्या बागेत या रोगाचा प्रादुर्भाव आढळतो. हा रोग फक्त घडावरील केळावरच दिसतो. फळाची खालची टोके प्रथमत: काळी पडतात आणि कुजून वाळू लागतात. नंतर वाळलेल्या टोकावर रोगकारक बुरशीच्या बीजाणूमुळे करड्या रंगाच्या राखेचा थर तयार होतो. अशी फळे विक्रीस अयोग्य होतात. अशा फळांना बाजारात भाव मिळत नाही.
उपाय : या रोगाच्या नियंत्रणासाठी रोगट फळे काढून नष्ट करावीत. बागेत हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी. उष्ण व दमट हवामानात हा रोग जास्त येतो म्हणून सप्टेंबर – आक्टोबर महिन्यात ताम्रयुक्त औषधाची फवारणी, केळीचा 50 ते 60% निसवा झाल्यावर करावी. यानंतर 15 ते 20 दिवसांच्या अंतराने परत दोन फवारण्या कराव्यात.

पानांवरील करपा (लीफ स्पॉट) :

या बुरशीजन्य रोगाची लागण जमिनीलगतच्या जुन्या पानांवर प्रथम जास्त प्रमाणात दिसते. पानांवर प्रथम फिकट पिवळ्या रंगाचे ठिपके दिसून येतात. नंतर ठिपके पूर्ण पानांवर पसरून सबंध पाने वाळलेली दिसतात.
उपाय : 1 % तीव्रतेच्या बोर्डो मिश्रणाची 15 दिवसांच्या अंतराने तीन वेळा फवारणी करावी किंवा कोणतेही ताम्रयुक्त बुरशीनाशक 500 ग्रॅम 200 लीटर पाण्यात मिसळून फवारावे. पानांवर औषध चिकटून राहावे म्हणून फवाऱ्यामध्ये सँडोव्हीट, यांसारखी चिकट द्रव्ये मिसळावीत.
या रोगाशिवाय जळगाव भागात केळीच्या बागेत उन्हाळयाच्या दिवसांत झाडापासून घड निसटण्याचा प्रकार दिसून आलेला आहे. यावर उपाय म्हणून बागेला पुरेसे पाणी, शिफारसीप्रमाणे शेणखत व पोटॅशची मात्रा योग्य वेळी द्यावी. बागेभोवती शेवरीसारखी झाडे लावून उष्णतेपासून संरक्षण करून घड निसटण्याचे प्रमाण आटोक्यात आणता येते.

केळीच्या फळांची काढणी, केळी पिकाचे उत्पादन आणि विक्री : Harvesting of Banana Fruits, Production and Marketing of Banana Crop:

फळांची काढणी :

केळीच्या फळांची काढणी लागवडीपासून साधारणपणे 12 ते 15 महिन्यांत करता येते. परंतु हा काळ बागेची मशागत, खताच्या मात्रा, पाणीपुरवठा, रोग व किडींचे नियंत्रण आणि हवामान यांनुसार कमीजास्त होतो. झाडाची वाढ चांगली झाली असल्यास लागणीनंतर साधारणपणे सहा महिन्यांनी खोडात सूक्ष्मघड तयार होतो व नऊ ते दहा महिन्यांनी केळफूल खोडाबाहेर पडते. यानंतर तीन ते पाच महिन्यांनी केळीचा घड कापणीस तयार होतो. हिवाळयात घड तयार होण्यास जास्त कालावधी लागतो; तर दमट उष्ण हवामानात घड त्या मानाने लवकर तयार होतात. घडातील फळांचा गडद हिरवा रंग बदलून फिक्कट हिरवा होऊन फळांच्या कडा गोलाकार झाल्यावर घड काढण्यास तयार झाला असे समजावे. अशा प्रकारे तयार झालेला घड तीनचार दिवसांत पिकतो. लांबच्या बाजारपेठेसाठी 75% पक्व घडच काढावा म्हणजेच 10 ते 15 दिवसांत तो पिकतो. वाहतुकीस सोपे जावे म्हणून घड काढताना लांब दांडा ठेवून काढणी करावी. घड काढल्यानंतर झाड बुंध्यापासून कापून टाकावे.

उत्पादन :

केळीचे भारतातील सरासरी उत्पादन प्रति हेक्टरी 15 ते 20 टन आहे. भारतात उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्राचा पहिला क्रमांक असून हेक्टरी 25 ते 35 टनांपर्यंत उत्पादन घेतले जाते. जळगाव जिल्ह्यात केळीचे हेक्टरी उत्पादन 40 ते 50 टनांपर्यंत येते.

विक्री :

मोठे व्यापारी जागेवरच केळी बागेतील घडांची पाहणी करून केळीची खरेदी करतात. मोठ्या बाजारपेठेत केळीच्या घडाच्या वजनावरच विक्री होते. स्थानिक विक्रेते भट्टीत तयार केलेला माल घेऊन डझनाप्रमाणे विक्री करतात.

फळे पिकवणे :
भट्टी लावून :

स्थानिक बाजारपेठेसाठी भट्टी लावून केळी पिकवितात. भट्टी लावण्यासाठी
एका बंद खोलीत केळीचे घड भरून केळीच्या वाळलेल्या पानांनी झाकतात. सेंद्रिय पदार्थ किंवा गोवऱ्या खोलीच्या एका कोपऱ्यात जाळून उष्णता व धूर निर्माण करतात. अशा प्रकारे ही खोली 18 ते 48 तासांपर्यंत बंद ठेवून केळी पिकवितात. 20 ते 22 अंश सेल्सिअस तापमानात पिकलेल्या केळीला पिवळा रंग येऊन जास्त दिवस केळी टिकविता येतात.

शीतगृहात :

15.5 ते 21 अंश सेल्सिअस तापमानात हळूहळू पिकलेल्या केळीला चांगला रंग येऊन बाजारभावही चांगला मिळतो.

द्रावणात बुडवून :

केळी इथिलीन किंवा अॅसिटिलीन वायू असलेल्या खोलीत 20 अंश सेल्सिअस तापमनात किंवा 0.2% • इथरेलच्या द्रावणात दोन मिनिटे घड बुडवून दोन दिवस ठेवतात. एकदोन दिवसांनी केळी चांगला रंग येऊन पिकतात.

फळे पिकविणे आणि फळांची साठवण : Growing of Fruits and Storage of Fruits:

केळीचा तयार झालेला घड काढल्यानंतर 3 ते 4 दिवसांतच पूर्णपणे पिकतो. म्हणून लांबच्या बाजारपेठेसाठी 75% पक्व झालेला घड काढावा म्हणजे 10 ते 15 दिवस तो राहू शकतो. परदेशात केळी पाठवावयाची असल्यास बुरशीनाशक द्रावणात बुडवून सच्छिद्र कार्डबोर्ड किंवा पॉलिथीनच्या पिशव्यांत 12 अंश सेल्सिअस तापमानाच्या कोठीत ठेवतात. घडाच्या टोकास पॅराफीन लावतात. त्यामुळे केळी बराच काळ ताजी राहतात.

सारांश :

केळीचे पीक उष्ण व दमट हवामानात एक मीटरपर्यंत खोलीच्या, पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमिनीत चांगले होते. हे पीक बाराही महिने पाण्याचा पुरवठा व बाजारपेठेशी दळणवळण व्यवस्था असलेल्या ठिकाणी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर ठरते. महाराष्ट्रात या पिकाची लागवड जळगाव जिल्ह्यात फार मोठ्या प्रमाणावर केली जाते. महाराष्ट्राचा भारतात केळी उत्पादनाच्या बाबतीत पहिला क्रमांक लागतो. केळीची लागवड मुनव्यांपासून जून- जुलै महिन्यात करतात. महाराष्ट्रात बसराई जातीची लागवड 1.5 मीटर X 1.5 मीटर अंतरावर करतात. केळीला खताच्या मात्रा लागवडीपासून सहा महिन्यांतच द्याव्या लागतात. उन्हाळ्यात व हिवाळयात बागेभोवती शेवरीची दाट झाडे लावून केळीचे उष्ण व थंड वाऱ्यांपासून संरक्षण करावे लागते. झाडाच्या बुंध्यापासून जमिनीलगत आलेली पिल्ले काढावी लागतात. केळीच्या पिकावर रोगकिडींचा व कीटकांचा उपद्रव होतो. केळीच्या फळांची काढणी साधारणपणे लागवडीपासून 12 ते 15 महिन्यांत करता येते. केळीचे सरासरी उत्पादन प्रति हेक्टरी 15 ते 20 टन आहे. भारतात उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्राचा पहिला क्रमांक असून हेक्टरी 25 ते 35 टनांपर्यंत उत्पादन घेतले जाते. जळगाव जिल्ह्यात सरासरी उत्पादन 40 ते 50 टनांपर्यंत आहे. केळीचा तयार झालेला घड 3 ते 4 दिवसांतच पूर्णपणे पिकतो. म्हणून लांबच्या बाजारपेठेसाठी 75 टक्के पक्व झालेले घड काढावेत; म्हणजे 10 ते 15 दिवस ते चांगल्या स्थितीत राहू शकतात.

ड्रॅगन फ्रुट लागवड कशी करावी त्यासाठी अनुदान किती मिळते ड्रॅगन फ्रुटचे रोग कोणते आणि त्याचे उपाय (Dragon Fruit Lagvad)

Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )