अश्यापद्धतीने करा केळी लागवड आणि मिळवा भरगोस उत्पन्न

केळी लागवड, keli Lagvad । केळी साठी हवामान । केळीच्या जातीची माहिती । केळी साठी रानाची पूर्व मशागत लागवड आणि खते । केळी पाणी व्‍यवस्‍थापन । केळी पिकाची फळधारणा । केळी पिकाची निगा

।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।

केळी माहिती

आंब्यानंतर केळी हे भारतातील सर्वात महत्त्वाचे फळ पीक आहे. चव, पौष्टिक आणि औषधी गुणधर्मामुळे हे जवळपास वर्षभर उपलब्ध असते.सर्व वर्गातील लोकांचे हे आवडते फळ आहे. हे कर्बोदके आणि जीवनसत्त्वे, विशेषत: ब जीवनसत्त्वे यांचा उच्च स्रोत आहे. हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी केळी उपयुक्त आहे.केळीची लागवड पुरातन काळापासून आशिया खंडाच्या उष्ण कटिबंधीय प्रदेशात केली जात आहे. या पिकाचे मूळ स्थान भारतातील आसाम राज्यातील आहे असे समजले जाते. भारतातील एकूण फळबागांखालील क्षेत्रापैकी २० टक्के क्षेत्र फक्त केळी पिकाखाली आहे. भारतात केळीची लागवड तमिळनाडू, केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक, बिहार, पश्चिम बंगाल, आणि आंध्र प्रदेश या राज्यात केळी जाते तर महाराष्ट्रात जळगाव, नांदेड, परभणी, धुले, सांगली, वसई, आणि वर्धा जिल्ह्यात केळीखालील क्षेत्र मोठ्‌या प्रमाणावर आहे.भारतात केळी उत्पादनात प्रथम आणि फळ क्षेत्रात तिस-या क्रमांकावर आहे.महाराष्ट्राचा देशात केळी लागवडीच्या बाबतीत तिसरा तर उत्पादनात पहिला क्रमांक लागतो.पिकलेली केळी ही उत्तम पौष्टिक अन्न असून या फळात साखर, प्रथिने, स्निग्ध पदार्थ तसेच कॅल्शीयम, फॉस्फरस, लोह ही खनिजे व जीवनसत्वे ‘ब’ भरपूर प्रमाणात असतात.

केळी साठी हवामान

केळी हे उष्‍ण कटीबंधीय फळ असून त्‍यास साधारण उष्‍ण व दमट हवामान चांगले.साधारणतः 15 ते 40 डिग्री सेंटीग्रेड पर्यंतचे तापमान या पिकास चांगले. हिवाळयात 12 सेंटीग्रेडचे खाली व उन्‍हाळयात 40 सेंटीग्रेडपेक्षा जास्‍त उष्‍ण हवामान असल्‍यास पिकावर अनिष्‍ट परिणाम होतो. केळीची पाने तापमान 60 सेंटीग्रेडपेक्षा कमी असल्‍यास पिवळी पडतात आणि 44 सेंटीग्रेडपेक्षा तापमान जास्‍त झाल्‍यास केळीची वाढ खुंटते.उन्‍हाळयातील उष्‍ण वारे व हिवाळयातील कडाक्‍याची थंडी या पिकाला हानीकारक असते. जळगांव जिल्‍हयातील हवा दमट नसली तरी केळी खाली जास्‍त क्षेत्र असण्‍याचे कारण म्‍हणजे तेथील काळी कसदार जमिन, पाणी पुरवठयाची चांगली सोय.

केळीच्या जातीची माहिती

केळी च्या ३० पेक्षा अधिक जाती आहेत त्यातील काही प्रमुख जाती खाली पाहूत :

  • बसराई – या जातीला खानदेशी, भुसावळ, वानकेळ, काबुली, मॉरीशस, गव्‍हर्नर, लोटणं इत्‍यादी नांवे आहेत. व्‍यापारी दृष्‍टया ही जात महाराष्‍ट्रात सर्वात महत्‍वाची आहे. महाराष्‍ट्रामध्‍ये केळीच्‍या एकूण क्षेत्रापैकी 75 टक्‍के क्षेत्र या जाती लागवडीखाली आहे. ही जात बांध्‍याने ठेंगणी 5 ते 6 फूट उंच, भरपूर प्रमाणात उत्‍कृष्‍ट व दर्जेदार फळ देणारी असल्‍यामुळे तिला बाजारात अधिक मागणी असते. या जातीला उष्‍ण कोरडे हवामान चन्ग्ले चांगले. या जातीला वा-यापासून कमी नुकसान पोहोचते. या जातीचे घड मोठे असून सारख्‍या आकाराचे असतात. प्रत्‍येक घडाला सुमारे 6 ते 7 फण्‍या असून एका फणित 15 ते 25 केळी असतात. याजातीच्‍या फळाचा आकार मोठा, गर मळकट पांढ-या रंगाचा असून त्‍यास चांगला वास व गोडी खूप असते. ही जात मर या रोगास प्रतिकारक आहे.
  • लालवेलची – या जातीची लागवड कोकण विभागात विशेष आढळून येते. या जाती खोडाचा रंग तांबूस, उंच झाड, फळ लहान व पातळ सालीचे असून चव आंबूस-गोड व रंग पिवळा असतो. या जातीची लागवड भारतातील केळीच्‍या इतर जाती लागवडीपेक्षा जास्‍त प्रमाणात आहे.
  • सफेदवेलची – या जातीचे झाड उंच, खोड बारीक , फळ फार लहान व पातळ सालीचे असून त्‍याचा गर घटट असतो. या जातीची लागवड ठाणे जिल्‍हयात आढळून येते.
  • बनकेळ – या जातीचे झाड 4 ते 5 मिटर उंच, फळ मोठे, बुटाच्‍या आकाराप्रमाणे सरळ व टोकदार असते. ही जात भाजी करिता उपयोगी आहे. या जातीची लागवड कोकण विभागात आढळून येते.
  • वाल्‍हा – या झाडाची उंची दोन मिटर असून फळे जाड सालीचे असतात. फळांची चव आंबूस गोड असते. या जातीची लागवड दख्‍खनच्‍या पठारामध्‍ये विशेषतः आढळून येते.
  • लालकेळ – या जातीच्‍या झाडाची उंची 4 ते 5 मिटर असते. फळ मोठे असून जाड व टणक असते. या जातीची साल लाल व सेंद्री रंगाची असून गर दाट असतो. तसेच चव गोड असते. केळीच्‍या सर्व जातीमध्‍ये ही जात दणकट म्‍हणून ओळखली जाते. या जातीची लागवड ठाणे भागामध्‍ये आढळून येते.
  • हरीसाल – या जातीची लागवड वसई भागात जास्‍त प्रमाणात होते. या जातीची उंची 4 मिटरपर्यंत असते. या जातीची साल जास्‍त जाडीची असून फळे बोथट असतात, तसेच ही जात टिकाऊ आहे. या जातीला सागरी हवामान चन्ग्ले चांगले.
  • सोनकेळ – या जातीच्‍या झाडाची उंची पाच मिटर, भक्‍कम खोड, फळ मध्‍यम जाड व गोलसर आकाराचे असून त्‍याची चव गोड व स्‍वादिष्‍ट असते. ही जात पना या रोगास बळी पडते. हया जातीची लागवड रत्‍नागिरी भागात आढळून येते.
  • राजेळी – ही जात कोकण विभागामध्‍ये जास्‍त प्रमाणात आढळून येते. या झाडाची उंची पाच मिटर, फळ मोठे व लांब असते असते या जातीची कच्‍ची फळे शिजवून खाण्‍यास योग्‍य तसेच सुकेळी करण्‍यासाठी उपयुक्‍त असतात.

केळी साठी रानाची पूर्व मशागत लागवड आणि खते

पूर्व मशागत : जमीन लागवडी पूर्वी लोखंडी नांगराने खोलवर नांगरुन कुळव्‍याच्‍या पाळया देऊन भूसभुसीत कराव्‍या. नंतर त्‍यामध्‍ये हेक्‍टरी ५० गाडया चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्‍ट खत घालून मिसळावे.

लागवड पध्‍दत : लागवड करताना 0.5 x 0.5 x 0.5 मीटर आकाराचे खडडे खोदून किंवा स-या पाडून लागवड करतात. दोन झाडातील अंतर 1.25 1.25 किंवा 1.50 1ञ50 मीटर असते.

खते व वरखते : या झाडाची मुळे उथळ असतात. त्‍यांची अन्‍नद्रव्‍यांची मागणी जास्‍त असते. त्‍यामुळे वाढीच्‍या सुरुवातीच्‍या काळात (पहिले चार महिने) नत्रयुक्‍त जोरखताचा हप्‍ता देणे महत्‍वाचे ठरते. प्रत्‍येक झाडास 200 ग्रॅम नत्र 3 समान हप्‍त्‍यात लावणीपासून दुस-या तिस-या व चौथ्‍या महिन्‍यात द्यावे. प्रत्‍येक झाडास प्रत्‍येक वेळी 500 ते 700 ग्रॅम एरंडीची पेंड खतासोबत द्यावी. शेणखता बरोबर 400 ग्रॅम ओमोनियम सल्‍फेट प्रत्‍येक झाडास लावणी करतांना देणे उपयुक्‍त ठरते.

पाणी व्‍यवस्‍थापन

केळी पिकास एकूण 1800 ते 2200 मि. मि. पाणी लागते. केळीसाठी ठिबक सिंचन अत्‍यंत उपयुक्‍त असून, ठिबक सिंचनासाठी सूक्ष्‍म नलीका पध्‍दतीपेक्षा ड्रिपर किंवा इनलाईन ड्रीपर चा वापर करणे अधिक योग्‍य असते. बाष्‍पीभवनाचा वेग, जमिनीची प्रतवारी वाढीची अवस्‍था इ.बाबींवर केळीची पाण्‍याची गरज अवलंबून असते.

महिनापाण्‍याची गरज (लिटर मध्ये)महिनापाण्‍याची गरज (लिटर मध्ये)
जानेवारी08-10जूलै14
फेब्रूवारी10-12ऑगस्‍ट14-16
मार्च16-18सप्‍टेबर14-16
एप्रिल18-20आक्‍टोबर04-06
मे22नोव्‍हेंबर04
जून12डिसेंबर06
पाणी व्यवस्थापन

केळी पिकाची फळधारणा

लागवडीनंतर 10 ते 12 महिन्‍याच्‍या अवधित झाडावर लॉगर येऊ शकतो. बसराई जातीचे लोंगर 7 ते 12 महिन्‍यात बाहेर पडतात. वाल्‍हा जातीत 6 ते 7 महिने लागतात. लालवेची, सफेदवेलची व मुठळी जाती 9 ते 13 महिने लागतात. तर लालकेळीस लॉंगर येण्‍यास 14 महिने लागतात. झाड चांगले वाढलेले असल्‍यास लागवडीनंतर साधारणपणे 6 महिन्‍यांनी खोडास फुलोरा तयार होवू लागतो. व 9 ते 10 महिन्‍यांनी केळी फूल खोडाबाहेर पडते. व 3 ते 5 महिन्‍यात घड तयार होतो. थंडीच्‍या दिवसात घड तयार होण्‍यास जास्‍त काळ लागतो.घडाने आकार घेतल्‍यानंतर त्‍याच्‍या टोकास असलेले वांझ केळफूल त्‍या घडातील केळयांच्‍या शेजारी फणीपासून थोडया अंतरावर कापून टाकतात. त्‍या केळफूलाचा भाजीसाठी उपयोग होतो शिवाय ते काढून घेतल्‍यामुळे घडातील केळी चांगली पोसून त्‍याचे वजन वाढते.

केळीचा हंगाम मुख्‍यत : महाराष्‍ट्रात ठाणे, वसई भागात जूलै ते मार्च व खानदेश भागात सप्‍टेंबरमध्‍ये असतो. फळ चांगले पोसून गुबगुबित झाले, त्‍यावरच्‍या धारा मोडून ते गरगरित झाले की, ते पूर्ण तयार झाले समजावे. पूर्णपणे तयार झालेला घड तीन ते चार दिवसांत पिकतो.

केळी पिकाची निगा

बागेतील जमिन स्‍वच्‍छ व भुसभुशित ठेवावी. त्‍याकरिता सुरुवातील कोळपण्‍या द्याव्‍यात. केळीच्‍या बुंध्‍यालगत अनेक पिले येऊ लागतात. ती वेळच्‍या वेळी काढून टाकावीत. लागवडीनंतर 4 ते 5 महिन्‍याने झाडांच्‍या खोडाभोवती मातीवर थर द्यावा. आवश्‍यकता भासल्‍यास घड पडल्‍यावर झाडास आधार द्यावा. सुर्यप्रकाशापासून इजा होऊ नये म्‍हणून केळीच्‍या घडाभोवती त्‍याच झाडाची वाळलेली पाने गुंडाळण्‍याची प्रथा आहे. थंडीपासून संरक्षणासाठी बगीच्‍याच्‍या भोवताली शेकोटया पेटवून धूर करावा.

केळी पिकाला इतर फळपिकांच्‍या मानाने जास्‍त पाणी लागते. दिवसेंदिवस पर्जन्‍यमान कमी होत आहे व त्‍यामुळे पाणी पातळी खोलवर जात आहे. त्‍यामुळे केळी खाजलील क्षेत्र कमी कमी होत आहे. त्‍यासाठी ठिबकसिंचन योजना राबवून क्षेत्र टिकवून राहू शकेल व त्‍यात वाढही शक्‍य आहे.

केळी हे सर्व फळांमध्‍ये स्‍वस्‍त आहे व त्‍यामुळे गरीबवर्गीयांसाठी उपयुक्‍त आहे. या पिकांचे क्षेत्र वाढीसाठी विशेष शासकीय सवलतीचा कार्यक्रम नाही. इतर जिरायत व बागायत पिकांप्रमाणे कर्जपुरवठा वगैरे उपलब्‍ध केला जातो. वाहतूकीसाठी रेल्‍वेकडून वॅगन्‍स उपलब्‍ध केल्‍या जातात. पण त्‍यात अल्‍पशी सवलत आहे. केळी उत्‍पादन टिकविणे, वाहतूक जलद व सवलतीच्‍या दराने करणेची व्‍यवस्‍था करणे यामुळे लागवड क्षेत्र वाढीवर चांगला परिणाम होईल.

Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )