कोकम लागवड |Kokum Lagwad | Kokum Sheti |Garcinia indica Farming । कोकम पिकाचे उगमस्थान, महत्त्व आणि भौगोलिक प्रसार । कोकम लागवडी खालील क्षेत्र । कोकम पिकाचे उत्पादन ।कोकम पिकास योग्य हवामान । कोकम पिकास योग्य जमीन । कोकम पिकाच्या सुधारित जाती ।कोकम पिकाची अभिवृद्धी । कोकम पिकाची लागवड ।कोकम पिकास हंगाम । कोकम पिकास लागवडीचे अंतर ।कोकम पिकास वळण । कोकम पिकास छाटणी ।कोकम पिकास खत व्यवस्थापन । कोकम पिकास पाणी व्यवस्थापन । कोकम पिकातील आंतरमशागत । कोकम पिकातील आंतरपिके । कोकम पिकातील तणनियंत्रण ।कोकम पिकातील महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण । कोकम पिकातील महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण ।कोकमच्या फळांची काढणी, उत्पादन व विक्री ।
।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।
कोकम लागवड |Kokum Lagwad | Kokum Sheti |
कोकम हे एक महत्त्वाचे फळझाड आहे. कोकणामध्ये कोकमची लागवड घराच्या परिसरामध्ये, नारळ आणि सुपारी बागेमध्ये तसेच नद्या, ओढे, नाले यांच्या काठी आणि इतर पडीक जमिनीत केली जाते.
कोकम हे आमसुलाचे झाड म्हणूनही परिचित आहे. काही ठिकाणी यास रातांबा असे ही म्हणतात. कोकम म्हणजेच आमसूल हे मसाल्यासाठी आणि सरबतासाठी वापरले जाते. कोकमचे झाड सदाहरित व दिमाखदार वाढते. कोकम फळांचे विविध उपयोग आहेत. लाल रंगाचे ‘अमृत कोकम’ हे पेय व्यापारी दृष्ट्या तयार केले जाते. उष्ण दमट हवामानात, रस्त्याच्या कडेने तसेच खाजगी आणि शासकीय क्षेत्रावर हे फळझाड लावणे, जोपासणे शक्य आहे.
कोकम पिकाचे उगमस्थान, महत्त्व आणि भौगोलिक प्रसार ।
उगमस्थान :
कोकमचे मूळ स्थान मलाया हे आहे.
महत्त्व :
फळाचा रस सरबत करण्यासाठी वापरला जातो. कोकम सरबत तर प्रसिद्धच आहे. याचप्रमाणे आमसूल हा मसाला तत्सम पदार्थही कोकमपासून बनविला जातो. फळातील गर आणि रसापासून सोलकढी, सालीपासून आमसुले, कोकम आगळ तयार केले जातात आणि त्यांचा वापर नेहमीच्या जेवणात केला जातो. कोकमच्या बियांपासून कोकम तेल बनविले जाते. त्याला ‘कोकम बटर’ असे म्हणतात. ह्या कोकम तेलाचा उपयोग औषधी मलमे तयार करणे, सौंदर्य प्रसाधने, साबण, इत्यादींमध्ये केला जातो. कोकम बटरला परदेशातून मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. कोकम फळात खालीलप्रम
अन्नघटक असतात.
अन्नघटक | प्रमाण | अन्नघटक | प्रमाण |
पाणी | 84.9% | प्रथिने | 0.5% |
स्निग्धांश | 0.1% | खनिजे | 0.2% |
शर्करायुक्त पदार्थ | 14.3% | चुना | 0.01% |
स्फुरद | 0.02% | लोह | 0.2% |
उष्मांक | 60 कॅलरी |
भौगोलिक विस्तार :
कोकमची लागवड जावा, सुमात्रा, फिलिपाईन्स, श्रीलंका या देशांत होते. 19 व्या शतकात कोकमची लागवड भारतात सुरू झाली. प्रथम लागवड निलगिरी भागात झाली. त्रिवेंद्रम, मलबार, गोवा आणि दक्षिण कोकण भागात कोकमची लागवड पसरत गेली. महाराष्ट्रात कोकणामध्ये कोकमची लागवड सर्वाधिक आहे.
कोकम लागवडी खालील क्षेत्र । कोकम पिकाचे उत्पादन ।
आपल्या राज्यात कोकमखालील क्षेत्र कोकणकिनारपट्टीत सुमारे 100 हेक्टर असून उत्पादन 1,000 टनांपर्यंतचे मिळते..
कोकम पिकास योग्य हवामान । कोकम पिकास योग्य जमीन ।
कोकम हे उष्ण कटिबंधातील फळझाड असून उष्ण व दमट हवामान यास मानवते. तापमान 21° सेल्सिअस ते 38° सेल्सिअस दरम्यान असेल तर उत्तमच. 1,200 ते 2,000 मिमी. पाऊसमान या पिकास योग्य. जमीन, पाणी धरून ठेवणारी, सेंद्रियपदार्थयुक्तपण योग्य प्रमाणात निचरा होणारी जमीन योग्य होय. कोकणातील जांभ्या दगडापासून बनलेल्या जमिनीमध्ये तसेच गाळाच्या जमिनीमध्ये कोकमची झाडे चांगली वाढतात.
कोकम पिकाच्या सुधारित जाती ।
कोकमच्या विशिष्ट अशा जाती नाहीत. त्याच्या स्थानिक जातींची लागवड मोठ्या प्रमाणात आढळते. कोकम अमृता ही कोकमची सुधारित जात असून एका झाडापासून 138 किलो फळे मिळतात. फळाचे सरासरी वजन 35 ग्रॅम असून साखरेचे प्रमाण 4.5% असते. ह्या जातीच्या फळांचा रंग तांबडा असून त्याची फळे मार्च-एप्रिल महिन्यात काढणीस तयार होतात. प्रत्येक फळामध्ये सर्वसाधारणपणे चार बिया असतात.
कोकम पिकाची अभिवृद्धी । कोकम पिकाची लागवड ।
कोकमची अभिवृद्धी बियांपासून आणि मृदुकाष्ठ कलमाने केली जाते. कोकममध्ये सुमारे 50 टक्के नर आणि 50 टक्के मादी झाडे निघतात. खात्रीशीर मादी झाडे मिळण्यासाठी कलम पद्धतीचा वापर करणे जरुरीचे आहे. यासाठी मृदुकाष्ठ पद्धतीने अभिवृद्धी करणे खात्रीचे ठरते. लागवडीसाठी 5 x 5 मीटर अंतरावर 60 X 60 X 60 सेंमी. आकाराचे खड्डे करून खतमातीने पावसाळयापूर्वी भरावेत व लागवड पावसाळ्यात किंवा पावसाळा संपताच करावी. लागवडीसाठी एक ते दीड वर्षे वयाची, जोमदार वाढणारी रोपे निवडावीत. पहिल्या वर्षी कडक उन्हापासून रोपांचे सरंक्षण करावे. झाडाभोवती वाढलेले गवत काढून टाकून स्वच्छता ठेवावी. रोपांना / कलमांना काठीचा आधार द्यावा.
कोकम पिकास हंगाम । कोकम पिकास लागवडीचे अंतर ।
कोकमच्या लागवडीसाठी पावसाळी हंगाम योग्य असून लागवडीसाठी 5 x 5 मीटर किंवा 6 X 6 मीटर अंतर ठेवावे. हेक्टरी झाडांची संख्या 275 ठेवावी.
कोकम पिकास वळण । कोकम पिकास छाटणी ।
कोकमला छाटणीची गरज नसते; परंतु सुरुवातीला जमिनीपासून 2 ते 3 फूट अंतरावर येणाऱ्या फांद्या काढून टाकाव्यात. तसेच अनावश्यक व दाटीच्या फांद्या काढून झाडाला योग्य आकार द्यावा.
कोकम पिकास खत व्यवस्थापन । कोकम पिकास पाणी व्यवस्थापन ।
कोकमच्या झाडाला वयोमानाप्रमाणे पुढीलप्रमाणे खते घालावीत. खते झाडाच्या विस्ताराखाली वर्तुळाकार चर खणून ऑगस्ट महिन्यात द्यावीत.
झाडाचे वय वर्षे | कंपोस्ट खत | नत्र | स्फुरद | पालाश |
1 | 2 किलो | 50 ग्रॅम | 35 ग्रॅम | 25 ग्रॅम |
2 | 4 किलो | 100 ग्रॅम | 70 ग्रॅम | 50 ग्रॅम |
3 | 6 किलो | 150 ग्रॅम | 105 ग्रॅम | 75 ग्रॅम |
4 | 8 किलो | 200 ग्रॅम | 140 ग्रॅम | 100 ग्रॅम |
5 | 20 किलो | 400 ग्रॅम | 250 ग्रॅम | 250 ग्रॅम |
कोकमच्या झाडाला गरजेप्रमाणे पाणी द्यावे. पाऊस नसताना 10-15 दिवसांच्या
अंतराने पाणी द्यावे. लागवडीनंतर पहिली दोन वर्षे हिवाळ्यात व उन्हाळ्यात आठवड्यातून एक वेळा पाणी द्यावे.
कोकम पिकातील आंतरमशागत । कोकम पिकातील आंतरपिके । कोकम पिकातील तणनियंत्रण ।
लागवडीनंतर 4 – 5 वर्षे आंतरपिके घ्यावीत. वाल, वाटाणा यांसारखी पिके त्यासाठी निवडावीत. खोडाभोवती व मोकळया जागेत मशागत करून, झाडाच्या बुंध्याशी आच्छादन करून तणांचा बंदोबस्त करावा.
कोकम पिकातील महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण ।
कोकमच्या झाडावर पाने खाणारी अळी व पांढरी माशी या किडी आढळतात. या किडीच्या नियंत्रणासाठी 30 मिली. फॉस्फॅमिडॉन 10 लीटर पाण्यात मिसळून फवारावे.
कोकम पिकातील महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण ।
कोकमच्या झाडावर डिंक्या, फळे तडकणे, पानांवरील बोकड्या हे रोग आढळतात. शिफारशीप्रमाणे बुरशीनाशके वापरावीत.
पिंक रोग या बुरशीजन्य रोगामुळे सुरुवातीला पांढऱ्या रंगाचे गोलसर ठिपके फांद्यांवर पडतात. अनेक फांद्यांना या रोगाची लागण झाल्यास झाडाचा जोर कमी होत जातो. या रोगाच्या नियंत्रणासाठी लागण झालेला भाग कापून टाकावा आणि त्यावर बोर्डो पेस्ट लावावी.
कोकमच्या फळांची काढणी, उत्पादन व विक्री ।
रोपे लावल्यापासून 10 वर्षांनी फळे यायला सुरुवात होते. मृदुकाष्ठ कलमाने लागवड केल्यास 6 व्या वर्षापासून उत्पादन सुरू होते. वर्षभरात फळांचे दोन हंगाम होतात. पहिला मे – जून आणि दुसरा ऑक्टोबर-नोव्हेंबर. अशा प्रकारे हिरव्या रंगाची कच्ची फळे पिकल्यानंतर लाल होतात. नंतर ती अलगदपणे काढावीत. फळे काढण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाने विकसित केलेल्या ‘अतुल’ झेल्याचा वापर करावा. झाडावर तयार झालेली फळेच काढावीत. पूर्ण वाढीच्या एका झाडापासून दोन बहारांची मिळून 400-500 किंवा 10-15 किलोपर्यंत पिकलेली फळे मिळतात. कोकमचे उत्पादनक्षम आयुष्य रोपापासून लागवडीचे 70-80 वर्षे व कलमापासूनचे 35-40 वर्षे असते.
कोकमच्या पूर्ण तयार हिरव्या रंगाच्या फळांच्या फोडी करून त्या पोटॅशियम मेटाबाय सल्फाईटच्या द्रावणात बुडवून वाळवतात; त्यामुळे त्यांचा आबंटपणा चांगला टिकून राहतो आणि या हिरव्या फोडी सुमारे 8 ते 10 महिने टिकतात. कोकमची पूर्ण पिकलेली लाल, टणक फळे 10% मीठ टाकून वाळवतात व त्यांपासून आमसूल तयार करतात. कोकमच्या पूर्ण पक्व फळात 1:2 या प्रमाणात साखर मिसळून अमृत कोकम किंवा कोकम सरबत बनवितात. पिकलेल्या कोकम फळांच्या साली व गर आणि मीठ यांच्या मिश्रणापासून कोकम आगळ तयार करतात.
सारांश ।
कोकम हे उष्ण-दमट हवामानातील फळझाड आहे. कोकम फळापासून सरबत पेय बनवितात. कोकम किनारपट्टीत कोकमची मोठ्या प्रमाणात लागवड होते..
कोकमची अभिवृद्धी रोपाने अथवा मृदुकाष्ठ कलमाने केली जाते. लागवड 6 X 6 मीटर अंतरावर करावी. नंतर कलमापासून लागवडीनंतर 6 वर्षांनी रोपापासून 10 वर्षांनी फळे येऊ लागतात. कोकमच्या झाडाला वर्षातून दोनदा फळे येतात; म्हणून दोन वेळा कंपोस्ट व नत्र-स्फुरद-पालाशयुक्त खत घालावे. पूर्ण वाढलेल्या झाडापासून दर वर्षी 400- 500 फळे मिळतात. कोकमचे उत्पादनक्षम आयुष्य रोपापासून झाडाचे 80 वर्षे तर कलमाचे 40 वर्षे असते. कोकमची पूर्ण पक्व फळे झाडावरून काढावीत.