
।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।
राजे लाखोजीराव जाधव – Raje Lakhojirao Jadhav
सिंदखेडकर जाधवांचे घराणे ही मुळ देवगिरीच्या यादव वंशाचीच एक उपशाखा आहे. देवगिरी येथील यादवांच्या रायाचा अंत झाल्यावर यादवांची दैन्यावस्था झाली. उदरनिर्वाहासाठी ते सर्वत्र पसरले. याच घराण्यातले वारस पुढे काही पिढ्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड येथे स्थायिक झाले.
सिंदखेडकर जाधवरावांच्या बखरीनुसार १६ व्या शतकाच्या उत्तरार्धात सिंदखेडची जहागीरदारी एका काझी नावाच्या घराण्याकडे होती. ती जहागीर त्यांच्याकडे बहामनी काळापासून चालत आलेली होती. ई. स. १५७० च्या आसपास रवीराव धोंडे हा काझीचा दिवाण होता. धार्मिक वृत्तीचा काझी अध्यात्माकडे झुकल्याने त्याला जहागिरी च्या कारभारात विशेष रस नव्हता. रवीरावने याचा पुरेपूर फायदा घेतला. त्याने काझीकडून काही प्रशासकीय हक्क मिळवले. आणि हळू हळू आपले हातपाय पसरायला सुरूवात केली. काही काळातच त्याने काझीच्या विश्वासातल्या सगळ्यांचे खून करून पूर्ण मुलुख आपल्या ताब्यात घेतला. अर्थातच तोपर्यंत काझी स्वतः कमकुवत झाला होता. रवीरावचा धोका लक्षात येताच ‘ मुळे ’ नावाच्या काझीच्या वकीलाने रवीरावच्या विरोधात खटपटी सुरू केल्या. रवीरावने त्या वकीलाचा खून कराविला. त्यानंतर रविरावची नजर वकीलाच्या गरोदर पत्नीवर गेली. आपल्या पतीच्या खूनाने क्षुब्ध झालेल्या त्या स्त्रीने रवीरावापासून असलेला धोका ओळखला आणि त्याच्या हातात लागण्याआधीच ती आपल्या परिवाराला घेऊन पैठणचे देशमुख जाधवराव यांच्या आश्रयाला गेली. जाधवांचे आणि मुळेंचे चांगले संबंध असावेत. पैठणची जहागीर लक्ष्मणराव उर्फ लखुजी जाधवराव नावाच्या मनसबदाराकडे होती.
त्यांच्यासमोर मुळेच्या पत्नीने आपली व्यथा मांडली. लखुजी स्वतः फौज घेऊन सिंदखेड येथे आले. त्यांनी रवीरावला पकडून ठार मारले. ही गोष्ट निझामशहाच्या कानावर गेली. काझीस राजकारणात रस राहिलेला नाही हे शहाच्या लक्षात आलं असावं. ई. स. १५७५ साली लखुजी जाधवराव यांच्या जहागिरीला सिंदखेडचा मुलुख जोडण्यात आला. कालांतराने लखुजी सिंदखेड येथे वास्तव्यास आले आणि सिंदखेडचे राजे लखुजी जाधवराव म्हणून ओळखले जाऊ लागले.
१७ व्या शतकात वऱ्हाडाची दोन वेळा पुनर्रचना केली गेली, पण वऱ्हाडचे मुख्यतः दोन भाग पडतात. नरनाळा-गाविलगड पासून बाळापूर ते जालन्यापर्यंत एक भाग, आणि माहूर-बालाघाट हा दुसरा भाग. सिंदखेड हे वर्हाड प्रांतात येत असे. ई. स. १५७४ मध्ये संपुर्ण वऱ्हाड निजामशाहीच्या अंमलाखाली आलेले होते. ई. स. १५७५ मध्ये जाधवांची जहागीर पैठण पासून मेहकर पर्यंत वाढली होती. जाधवरावांकडे एकूण ५२ महालांचा प्रदेश होता.
जाधवराव घराण्याच्या इतिहासाबद्दल दोन समज इतिहासकारांमध्ये प्रचलित आहेत. पहिल्यानुसार जाधव हे देवगिरीचे राजे यादव यांच्या घराण्याच्या एका शाखेचे वंशज आहेत. तर दुसऱ्यानुसार लखुजी राजपुतान्यातील करोली येथील एका राजपूत कुटुंबातील होते. ई. स. १५५० च्या दरम्यान त्या कुटुंबाच्या दोन व्यक्ती महाराष्ट्रात स्थलांतरित झाल्या. त्यांनी शेती करून आपली उपजीविका चालवली. लखुजी त्या कुटुंबाचे प्रमुख होते. पुढे निजामशाहच्या नजरेत लखुजींची योग्यता आली आणि त्यांना सिंदखेडची जहागीर देण्यात आली. पहिली कथा जाधवरावांच्या बखरीत लिहिलेली आढळते. ती सत्य असण्याची शक्यता आहे. खिलजीने यादवांना पराभूत केल्यावर गोविंददेव हे त्या घराण्याचे प्रमुख होते. त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र ठाकुरजी जाधव यांची पैठण जवळ जहागीर असल्याचे कळते. पुढे बहामनी सलतनतीच्या काळात ठाकूरजींचे पुत्र भेटोजी यांनी घराण्याचा लौकिक वाढवला. त्यांचे पुत्र विठ्ठलदेव हे ई. स. १५६५ साली तालिकोट्याच्या युद्धात निजामशहाकडून लढले. विठ्ठलदेव जाधव हे लखुजी जाधवराव यांचे वडील. वडिलोपार्जित जहागीरदारी लखुजींकडे आली. त्यांनी आपल्या शौर्याच्या जोरावर पाचहजारी मनसबदारी मिळवली. ई. स. १५७५ मध्ये सिंदखेड मिळाल्यानंतर त्यांना निजामशाहीत दशहजारी मनसबदाराचा मान मिळाला. लखुजी जाधवराव हे निजामशाहीतील एक प्रमुख सरदार म्हणून उदयास आले.
लखुजी जाधवराव ह्यांच्या तीन पत्नी – यमुनाबाई, भगीरथीबाई आणि गिरिजाबाई. त्यांना चार मुले – दत्ताजी, अचलोजी, रघुजी,बहादुरजी आणि जिजाबाई नावाची एक मुलगी होती. जाधवराव घराण्यातील प्रत्येक पुरुषाने निजामशाहीत आपल्या शौर्याने मनसबदारी कमावली. त्यामुळे पुढे जाधवराव घराण्याला २४००० पायदळ आणि १५००० घोडदळाची मनसबदारी शाहजहानने दिल्याची नोंद आहे. दख्खन मधले कदाचित ते पहिले बलाढ्य मराठा सरदार असावेत. त्यांच्यानंतर भोसले, कायथ, उदाराम पंडीत, या मराठा सरदारांना दख्खन मध्ये महत्त्व प्राप्त झाले. १६ व्या शतकाच्या अखेरपर्यंत भोसले हे लखुजींच्या बरोबरीने महत्वपूर्ण सरदार बनले होते. ई. स. १६०४ मध्ये लखुजींनी आपली मुलगी जिजाबाई हीचा मालोजीराजे भोसले यांचे पुत्र शहाजी राजे यांच्याशी विवाह लावून दिला. त्यामुळे दोन बलाढ्य घराण्यांमध्ये जवळीक निर्माण झाली आणि दख्खन मध्ये मराठा शक्तीचा सूर्य उदयास येऊ लागला.
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडच्या जाधवाचे घराणे प्राचीन आहे. शिवपूर्वकाळात विशिष्ट परिस्थितीत निजामशाही आणि आदिलशाही यांच्या आश्रयाने जी काही मराठी कूळे उदयास आली त्यात सिंदखेडकर जाधवराव, वेरुळचे भोसले, वासीमचे उदाराम देशमूख,पोतले आणि फलटनचे नाईक निंबाळकर,सरनाईक पवार ही कूळे विख्यात होती. जाधव घराणे हे लखूजी जाधवरावांच्या यांच्यामुळे निजामशाहीतच्या आमदानीत पुढे आले. लखूजीने बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडला देशमूखी मिळवली. यादव राजांच्या राजवटीत मराठी राज्य नष्ट झाले परंतु जाधव कुळात जन्मास आलेल्या कन्येच्या जिजाबाई पोटी तिनशे वर्षांनी पुन्हा मराठ्यांचे स्वतंत्र राज्य स्थापन करणारा छत्रपती शिवाजी हा असामान्य पुरुष जन्मास आले शिवाजी राजाला जन्म देणारी जिजाबाई लखुजी जाधवरावांची कन्या होती.
राजे लखुजीराव जाधवराव यांनी निजामशाही तर्फे इ सन १५९५ ते १६२१ या कालखंडात जवळपास सात लढे दिले आणि या सातही लढ्यात दिल्लीच्या मोगलांविरुद्ध मराठा बर्गियांचे प्रमुख या नात्याने मोठा पराक्रम गाजवला, म्हणुनच मोगलांना या काळात दक्षिणेत पाय रोवता आला नाही.. हा लढा दिल्लीचा बादशहा अकबर, बादशहा जहांगीर या दोघांच्या काळात घडून आला..
पहिला लढा – इ सन १५९५ साली शहजादा मुरादने अहमदनगर किल्ल्यास वेढा दिला. त्यावेळी चांदबिबी ने अहमदनगरचे संरक्षण केले. या संघर्षात राजे लखुजीराव यानी चांदबिबीस दक्षिणी मराठा गटाचे नेतृत्व करताना मोलाची मदत केली.
दुसरा लढा – मोगलांनी इ सन १६०० मध्ये अहमदनगर वर दुसरी स्वारी केली, यावेळी चांदबिबीने गोवळकोंडा, बीजापुरच्या फौजा, मलिक अंबर, लखुजीराव राजे, त्यांचे पुत्र व बंधु, मालोजीराजे, विठोजीराजे भोसले, बाबाजी काटे आदी मराठा सरदारांनी मोगलांशी समर्थपणे लढा दिला. परंतु निजामशाही वजीर हमीदखानाने चांदबिबीचा खुन केला. त्यामुळे निजामशाही राजधानी अहमदनगर मोगलांच्या ताब्यात गेली. या काळात वरील मंडळीनी निजामशहाच्या एका वारसास गादीवर बसवुन “परंडा ” ही नवीन राजधानी स्थापित केली.
तिसरा लढा – जहांगीर दिल्लीच्या गादीवर आल्यानंतर त्याने इ सन १६०६ साली दख्खनचा अधिकार खानेखानान यास दिला. मोगल सैन्य व दक्षिणेतील मराठा लखुजीराजे जाधवराव , विठोजीराजे भोसले, बाबाजी काटे, उदाराम देशमुख (ब्राह्मण) आदी मराठा सैन्याच्या संघर्षात त्यांची जहागिरी असलेल्या बालाघाट, वऱ्हाड व खानदेश प्रांत ओसाड पडत असल्यामुळे मलिक अंबरने खानेखानानाशी मित्रत्वाने वागणे चालु केले.
चौथा लढा – निजामशहाने मलिक अंबर व दक्षिणी मराठा सैन्याच्या मदतीने दक्षिणेतील मिळवलेले प्रांत पुन्हा मिळवण्यासाठी जहांगीरने इ सन १६०९ साली शहजादा परिवझ याच्यासोबत खानेखानान व बरीच सरदार मंडळी पाठवली, परंतु मलिक अंबरने मराठा बर्गियांचे प्रमुख लखुजीराजे जाधवराव, त्यांचे पुत्र व बंधु, विठोजीराजे भोसले, शहाजीराजे, बाबाजी काटे व उदाराम देशमुख आणि आदिलशाहीच्या मदतीने मोगलांचा पराभव करून अहमदनगर चा किल्ला, तसेच देवगिरीचा किल्ला जिंकून घेतला. यासमयी मराठ्यांच्या चपळ, काटक व जलद हालचाली करणाऱ्या घोडेस्वारांचा मुख्य उपयोग झाला. या विजयानंतर निजामशहाने राजधानी जुन्नर येथुन देवगिरी येथे स्थापीत केली..
इ सन १६०९-१० साली दौलताबाद किल्ल्यावर शहाजी महाराज साहेब व राजमाता जिजाऊ आऊसाहेब यांचा विवाह पार पडला. या समयी या दोन्ही घराण्यात कुठलेही वैमनस्य नव्हते.
पाचवा लढा – जहांगिरने शहजादा परिवझ याच्यासोबत खानेखानान यास इ सन १६११ मध्ये मोठे सैन्य आणि युद्धसामग्री देऊन दख्खनमध्ये परत पाठवले. त्यांच्या मदतीस गुजराथमधील अब्दुलाखान, राजा रामदास, खान आलम, सैफखान, अलिमर्दान बहादुर जफरखान आदी सरदार व वऱ्हाड मधील राजा मानसिंह, खानजहां, अमीरुल उमरा आदी सरदार पाठवले या दोन्ही सैन्याने एकमेकांशी संपर्कात राहुन निजामशाही प्रांतावर आक्रमण करण्याचे आदेश दिले होते. परंतु अब्दुल्ला खानाने हा आदेश न मानता नासिक प्रांतातुन आपले सैन्य घुसवले. परंतु निजामशहाने व अंबरने बर्गियांचे प्रमुख लखुजीराजे जाधवराव, शहाजी महाराज साहेब, संभाजीराजे भोसले, खेलोजीराजे भोसले, बाबाजी काटे आणि आदिलशाही व कुतुबशाही या एकत्रित सैन्याने गनिमी कावा पद्धतीने मोगलांचा पराभव केला..
सहावा लढा – इ सन १६१५ साली जहांगिरने दक्षिणेत शहजादा परिवझच्या अपयशानंतर शहजादा खुर्रम उर्फ शहाजहान यास निजामशाहीचा प्रांत हस्तगत करण्यासाठी संपूर्ण तयारीनिशी रवाना केले. या लढ्यात मलिक अंबर व मराठा सैन्यात वितुष्ट आल्यामुळे मलिक अंबरास माघार घ्यावी लागली व मोगलांशी तडजोड करून दौलताबादच्या किल्ल्या व्यतिरिक्त निजामशाहीचा या भागातील सर्व प्रांत मोगलांना द्यावा लागला.
इ सन १६१६ साली मलिक अंबरशी वितुष्ट आल्यामुळे निजामशाहीतील प्रतिभाशाली नेत्यांचा समुह, शाही व्यक्ती, तसेच मराठा बर्गियांचे प्रमुख राजे लखुजीराव जाधवराव, व त्यांचे पुत्र व बंधु, बाबाजी काटे देशमुख, तसेच आदम खान, याकुत खान आदी मंडळी शहनवाझ खानाकडे बाळापुर येथे येऊन भेटले. या समयी मोगल व अंबर यांच्यामध्ये लढाई झाली, त्यात मलिक अंबर ला दारुण पराभव पत्करावा लागला.. या लढाईस रोशनगावची लढाई म्हणतात..
जहांगिरने आपल्या आत्मचरित्रात, “मराठा मोठे काटक व शुर होते, तसेच मोठे धैर्यवान, तसेच दक्षिण प्रांताचे वाघाचे केंद्र होते. ” असे मराठ्यांबाबत लिहुन ठेवले आहे… यावरुनच इरफान हबीब या इतिहासकाराने लिहुन ठेवले आहे, ” मोगलांचा दक्षिणेतील विजयरथ हा मराठ्यांनी च रोखला असुन मराठ्यांनी आपली ताकद उत्तरोत्तर वाढवतच नेली. “
सातवा लढा – इ सन १६१७-२० :- जहांगिरने शहजादा खुर्रम यास निजामशाही जिंकण्यासाठी इ सन १६१७ साली दुसऱ्यांदा दक्षिणेत पाठवले, परंतु राजे लखुजीराव जाधवराव, त्यांचे पुत्र दत्ताजीराजे, अचलोजीराजे, बहादुरजीराजे, राघोजी राजे, नातु यशवंतराजे व बंधु भुतजीराजे, तसेच शहाजी महाराज साहेब व त्यांचे बंधू शरीफजीराजे, संभाजीराजे , खेलोजीराजे व त्यांचे बंधु मंडळ यांच्या सहकार्याने मलिक अंबर याने इ सन १६१६ च्या कराराने मोगलांना दिलेला मुलुख इ सन १६१७-२० या काळात परत मिळवला. या काळात सदरील मराठ्यांच्या पराक्रमामुळे शहजादा खुर्रम उर्फ शहाजहान यास एकही विजय मिळवता आलेला नाही.
आठवा लढा – राजे लखुजीराव जाधवराव हे निजामशाहीत “मीर- ए – झमान म्हणजेच वजीर पदावर असल्याची नोंद इंग्रजकालीन व मुगल कागदपत्रात मिळते.
नववा लढा – इ सन १५९५- १६२१ या काळात साली राजे लखुजीराव जाधवराव यांची ताकद वाढतच गेली..यामुळे मलिक अंबर त्यांचा द्वेष करत असे. यांच्या मधील वितुष्ट वाढतच गेले आणि इ सन १६२१ साली राजे लखुजीराव जाधवराव यानी मलिक अंबर यास तलावात बुडवून मारण्याचा प्रयत्न केला होता. तो प्रयत्न अयशस्वी झाला… हा प्रयत्न यशस्वी झाला असता तर याच काळात निजामशाहीत दक्षिणी मराठा जाधवराव व राजे भोसले यांचेच प्राबल्य राहिले असते…
दहावा लढा – राजे लखुजीराव जाधवराव याना दखनी जदुराय हा किताब पहिल्यापासूनच होता आणि त्यांनी सलग २६ वर्ष मोगलांविरुद्ध प्रखर लढा दिला… या लढ्यात प्रामुख्याने राजे जाधवराव, राजे भोसले, काटे देशमुख, हंबीरराव, धारराव, आदी मराठा घराणे सामिल होते.. या सात लढ्यामुळेच शिवपुर्वकाळात मोगल दक्षिण जिंकु शकले नाहीत… या काळात मराठा बर्गियांचे प्रमुख म्हणून राजे लखुजीराव जाधवराव यांची भूमिका महत्वाची होती… शहाजी महाराज साहेब व राजे लखुजीराव जाधवराव हे एकमेकांशी काटे देशमुख यांच्याद्वारे संपर्कात राहत असत व सर्व रणनिती आखत असत. या दोघांनी या काळात मराठा एकत्रीकरण व मराठा सत्ता उत्थापनाचे महत्त्वाचे कार्य केले… म्हणुनच मराठा सत्तेचे एक चाक म्हणजे राजे लखुजीराव जाधवराव यांची हत्या निजामशहाने म्हणजे एका मुस्लिम शासकाने घडवून आणली आणि त्याचवेळी शहाजी महाराज साहेब यांच्या विरोधात देखील शिवनेरीवर फौजा पाठविण्यात आल्या होत्या.
राजे लखुजीराव जाधवराव यांच्या वंशज शाखा
- सिंदखेडराजा परिसरात देऊळगाव राजा,
- आडगाव राजा,
- किनगाव राजा,
- उमरद रुसुमचे (देशमुख),
- जवळखेड व मेहुणा राजा
- सिंदखेडराजा परिसराव्यतिरिक्त वंशजशाखा- करवंड(ता चिखली जिल्हा बुलढाणा),
- भुईंज(सातारा),
- करणखेड (ता चिखली जिल्हा बुलढाणा),
- वडाळी (ता कन्नड)
- माळेगांव बुद्रुक (बारामती),
- मांडवे (सातारा),
- माहेगाव देशमुख (कोपरगांव),
- सारवडी(जिल्हा जालना),
- वाघोली,वाडी, नांदेड (सर्व जिल्हा पुणे),
- अक्कलकोट,भुम,पाटेवडी
सदरील राजे लखुजीराव जाधवराव यांच्या चार पुत्रांच्या वंशजशाखा होत