लिलीच्या कंदांची काढणी आणि साठवण । लिली लागवड । Lily Lagwad | Lily Sheti | लिली लागवडी खालील क्षेत्र । लिलीचे उत्पादन । लिली लागवडीस योग्य हवामान । लिली लागवडीस योग्य जमीन । लिली लागवडीचे महत्त्व । लिलीच्या उन्नत जाती ।लिली पिकाची अभिवृद्धी । लिली पिकाची लागवड पद्धती । लिली लागवडीस हंगाम । लिली लागवडीचे लागवडीचे अंतर । लिली पिकास खत व्यवस्थापन । लिली पिकास पाणी व्यवस्थापन । लिली पिकावरील महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण । लिली पिकावरील महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण ।लिली पिकावरील महत्त्वाच्या विकृती आणि त्यांचे नियंत्रण । लिलीच्या फुलांची काढणी, उत्पादन आणि विक्री । लिली पिकातील तणांचे नियंत्रण ।
।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।
लिली लागवड । Lily Lagwad | Lily Sheti |
लिली हे एक महत्त्वाचे कंदवर्गीय फुलझाड आहे. हार, गुच्छ, तोरणे आणि मंडप सजावटीकरिता लिलीच्या फुलांना वर्षभर सतत मागणी असते. लिलीच्या विविध जाती आणि प्रकार असून त्यांचा उपयोग फुलांच्या वैशिष्ट्यांनुसार हार, गुच्छ अथवा उद्यानाची शोभा वाढविण्याकरिता ताटवे लावून करतात. लिलीची फुले उत्तम प्रकारची कटफ्लॉवर्स म्हणून वापरली जातात. म्हणूनच लिलीच्या लागवडीस भरपूर वाव असून पद्धतशीर लागवड केल्यास या पिकापासून भरपूर उत्पन्न मिळविता येते.
लिली लागवडीचे महत्त्व । Importance of lily cultivation.
लिली हे अत्यंत सुंदर आणि डौलदार फुलझाड असून या फुलझाडाची लागवड उद्यानातील ताटव्यांमध्ये, इमारतीसमोरील प्रांगणात आणि लहानमोठ्या कुंड्यांत केली जाते. लिलीच्या फुलांना फुलदाणीत ठेवण्याकरिता, हारतुरे तयार करण्यासाठी आणि तोरणे आणि मंडप सजावटीकरिता वर्षभर मागणी असते. विशेषतः सणासुदीच्या आणि लग्नसराईच्या दिवसांत लिलीच्या फुलांना चांगला बाजारभाव मिळतो. म्हणून शहराजवळच्या परिसरात लिलीची लागवड फायदेशीर ठरत आहे. चीनसारख्या देशात लिलीच्या काही प्रकारांचे कंद खाण्यासाठी वापरतात. लिलीच्या फुलांना मोठ्या शहरांतून असलेल्या मागणीचा विचार करता या फुलझाडाखालील क्षेत्र वाढविण्यास चांगलाच वाव आहे.
लिली लागवडी खालील क्षेत्र । लिलीचे उत्पादन । The following areas of lily cultivation. Lily production.
भारतामध्ये निलगिरी पर्वताच्या परिसरात लिलीचे उगमस्थान आहे. भारतामध्ये लिलीची लागवड प्राचीन काळापासून करण्यात येत आहे. बायबलमध्येही लिलीचा उल्लेख आढळतो. भारतामध्ये कर्नाटक, तामीळनाडू, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, पंजाब, काश्मीर, महाराष्ट्र, इत्यादी राज्यांत लिलीची लागवड केली जाते. महाराष्ट्रामध्ये ठाणे आणि पुणे या दोन जिल्ह्यांत लिलीची लागवड व्यापारी तत्त्वावर केली जाते.
लिली लागवडीस योग्य हवामान । लिली लागवडीस योग्य जमीन । Suitable climate for lily cultivation. Land suitable for lily cultivation.
लिलीचे असंख्य प्रकार असून काही प्रकार कमी सूर्यप्रकाशात चांगले येतात तर काही प्रकार उष्ण-दमट हवामानात चांगले येतात. सरासरी 15 ते 35 अंश सेल्सिअस तापमानात लिलीच्या पिकाची चांगली वाढ होऊन भरपूर उत्पादन मिळते. दीर्घ काळ अतिकडक थंडी या पिकाला अपायकारक ठरते.
लिलीच्या लागवडीसाठी सुपीक, काळी, भरपूर सेंद्रिय पदार्थ असलेली, पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन निवडावी. जमिनीचा सामू 6 ते 7 इतका असावा. जमिनीत पाणी साचून राहत असल्यास कंदांची कूज होऊन पिकाचे नुकसान होते.
लिलीच्या उन्नत जाती । Advanced varieties of lilies.
लिलीचे असंख्य प्रकार आणि जाती उपलब्ध आहेत. लिलीचे 300 ते 400 प्रकार असून त्यांपैकी सुमारे 100 प्रकार व्यापारी दृष्ट्या महत्त्वाचे आहेत. लिलीचे अॅरॅलि (बेलाडोना लिली) आणि हिपॅस्ट्रम ( ट्रंपेट लिली) हे दोन प्रकार खूपच प्रचलित आहेत. अमर लिली, स्पाईडर लिली, फायरबॉल लिली, क्रुपरँथस लिली, झिपरँथस लिली, डे लिली, फॉक्स टेल लिली, टायगर लिली, वॉटरलिली, प्लॅटेन लिली हे प्रकार महाराष्ट्रात जास्त प्रसिद्ध आहेत.
लिलीमध्ये संकरित जातींचीही सतत भर पडत आहे. ऑरेलियन हायब्रीड, बेलिंगम हायब्रीड, फिस्टा हायब्रीड, गोल्डन चॅलेस हायब्रीड, गोल्डन हारवेस्ट हायब्रीड, ग्रीन माउंटन हायब्रीड, ऑलिंपिक हायब्रीड, पेटेड लेडी हायब्रीड, शेलरोझ हायब्रीड आणि टेंपल हायब्रीड हे प्रमुख संकरित वाण प्रसिद्ध आहेत. लिलीच्या काही प्रचलित जाती आणि त्यांच्या फुलांचे रंग खाली दिले आहेत.
अ.क्र. | जात | फुलांचे रंग |
1 | ब्लंक ड्रॅगान | फुले तुतारीच्या आकाराची, मध्यावर सोनेरी तर पाकळया आतील बाजूस सफेद आणि बाहेरील बाजूस गडद लालसर |
2 | अॅप्रीकॉटग्लो | नारिंगी रंगाची फुले. |
3 | ब्रेडीवाईन | पिवळसर नारिंगी रंगाची फुले |
4 | ब्रोकेड | फिक्कट पिवळया रंगाची फुले |
5 | डेस्टिनी | लिंबासारख्या पिवळया रंगाची फुले |
6 | हेलन कॅरॉल | पिवळया रंगाची फुले |
7 | लाईमलाईट | तुतारीच्या आकाराची पिवळी फुले |
8 | सनसेट ग्लो | गुलाबी आणि मध्यभागी पिवळया रंगाची फुले |
9 | रॉयल गोल्ड | पिवळ्या धमक रंगाची व मध्यावर लालसर रंगाची फुले |
लिलीच्या अनेक जाती प्रचलित असल्या तरी महाराष्ट्रात खालील प्रकार जास्त प्रचलित आहेत.
अमर लिली :
या प्रकाराला बेलाडोना लिली असेही नाव आहे. या प्रकारातील जाती उन्हामध्ये किंवा विरळ सावलीत वाढणाऱ्या आणि बहुवर्षायु आहेत. या प्रकारातील जाती रोग आणि किडींना जास्त प्रतिकारक आहेत. या प्रकारातील काही जाती कुंडीत लावण्यासाठी तर काही जाती जमिनीत लावण्यास योग्य आहेत. या प्रकारातील जातींना लांब दांड्यावर भोंग्याच्या आकाराची फुले येतात. अशी फुले फुलदाणीत ठेवण्यास योग्य असतात. फुले लाल, पिवळी, सफेद अशा विविध रंगांची असतात. स्नोव्हाईट लियो, ज्युपिटर, स्टार ऑफ इंडिया, ब्लॅक प्रिन्स आणि पिंक इंदोरा या प्रकारच्या जाती अमर लिली या प्रकारात येतात.
स्पाईडर लिली :
लिलीच्या या प्रकारातील जाती अत्यंत कणखर आहेत. या प्रकारातील लिली बांधावर लावल्या तरी चांगली फुले येतात आणि कंद पुढील पावसाळ्यापर्यंत जमिनीत तग धरून राहू शकतात. पांढऱ्या रंगाची फुले कळीच्या अवस्थेत तोडून हारासाठी आणि सजावटीसाठी मोठ्या प्रमाणावर वापरली जातात.
टायगर लिली :
या प्रकारातील लिलीला लांब दांड्यावर पिवळसर लालसर रंगाची फुले येतात. पाकळ्यांवर गर्द तपकिरी रंगाचे ठिपके असतात. या प्रकारातील फुले फुलदाणीत ठेवण्याकरिता योग्य असतात…
डे लिली :
या प्रकारातील लिलीला लांब दांड्यावर पांढऱ्या, पिवळया आणि गुलाबी रंगांची फुले येतात. या प्रकारातील फुले फुलदाणीत ठेवण्याकरिता योग्य आहेत.
झिपरँथस लिली :
या प्रकारातील जाती बुटक्या असून जमिनीलगत वाढतात. या प्रकारातील जाती दलदलीच्या जागी तग धरून राहतात. या प्रकारातील जाती इमारतीच्या सभोवती सुशोभनासाठी लावण्याकरिता योग्य आहेत. या प्रकारातील लिलीला पिवळया आणि फिकट गुलाबी रंगाची फुले येतात.
फायरबॉल लिली :
नावाप्रमाणे लालभडक रंगाचा फुलांचा गोलाकार गेंद हिरव्या पानांवर अत्यंत आकर्षक दिसतो. कुंडीत अथवा जमिनीत लावून परिसर सुशोभनासाठी हा प्रकार उत्तम आहे.
लिली पिकाची अभिवृद्धी । लिली पिकाची लागवड पद्धती । Growth of lily crop. Cultivation method of lily crop.
लिलीची अभिवृद्धी बियांपासून, पानाच्या बेचक्यातील कंद (बल्बिल) आणि जमिनीत वाढणाऱ्या लहानमोठ्या कंदांपासून करता येते. मोठ्या प्रमाणावर लिलीची अभिवृद्धी कंदांपासूनच केली जाते. जमिनीतील मोठ्या कंदाभोवती लहान कंद (स्केल) वाढतात. या लहान कंदापासूनही लिलीची लागवड करता येते.
लिलीच्या लागवडीसाठी कंद निवडताना खालील बाबी लक्षात घ्याव्यात :
(1) कंद मोठ्या आकाराचे असावेत.
(2) कंद निरोगी असावेत.
(3) कंदाचा उभा व्यास 7.5 सेंटिमीटर तर आडवा व्यास 6 ते 9 सेंटिमीटर असावा. कंदाचा आकार जातीप्रमाणे निरनिराळा असू शकतो.
(4) कंदाचे वजन 40 ते 50 ग्रॅम असावे.
(5) कंद लागवडीपूर्वी किमान महिनाभर तरी सुकविलेले निवडावेत.
(6) हेक्टरी 40 ते 50 हजार कंद किंवा 2 ते 2.5 हजार किलो बेणे वापरावे.
लागवडीसाठी मोठे कंद निवडल्यास त्यांना लवकर आणि मोठ्या आकाराची फुले येतात. सारख्या आकाराचे कंद लावल्यास जास्तीत जास्त फुले थोड्या कालावधीत फुलतात. बियांपासून लिलीची अभिवृद्धी करण्यास जास्त वेळ लागतो; मात्र ही पद्धत सोपी आहे. हिवाळ्यात पॉलिथीन-गृहात कुंडीत रोपे तयार करतात. उन्हाळयात उघड्या शेतात लिलीची बियांपासून रोपे तयार करता येतात. यासाठी गादीवाफ्यावर बिया पेरून त्यावर चाळलेल्या कंपोस्ट खताचा थर द्यावा. वाफ्यांना नियमित पाणी द्यावे आणि कंपोस्ट खताचा थर वाळणार नाही याची काळजी घ्यावी.
लिली लागवडीस हंगाम । लिली लागवडीचे लागवडीचे अंतर । Lily planting season. Planting Spacing of Lily Cultivation.
लिलीची लागवड खरीप, रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी अनुक्रमे मे-जून, ऑक्टोबर- नोव्हेंबर आणि फेब्रुवारी-मार्च महिन्यांत करता येते. लागवडीपूर्वी कंद 10 लीटर पाण्यात 10 ग्रॅम बाविस्टीन टाकून तयार केलेल्या द्रावणात अथवा अन्य बुरशीनाशकाच्या द्रावणात अर्धा तास भिजवून घ्यावेत.
कुंडीमध्ये लिलीची लागवड करायची असल्यास पोयटा माती आणि शेणखत सम प्रमाणात मिसळून कुंडीत भरावे आणि कंदाच्या आकारानुसार प्रत्येक कुंडीत 1 ते 3 कंद लावावेत.
शेतात लागवड करताना जमीन नांगरून, कुळवून भुसभुशीत करून घ्यावी. 45 ते 60 सेंटिमीटर अंतरावर सऱ्या काढाव्यात आणि सरीच्या बगलेत 30 ते 50 सेंटिमीटर अंतरावर कंद लावावेत.
लिली पिकास खत व्यवस्थापन । लिली पिकास पाणी व्यवस्थापन । Lily crop fertilizer management. Water management of lily crop.
लिलीच्या फुलांच्या उत्पादनाबरोबरच जमिनीमध्ये कंद वाढत असतात. पुढील हंगामातील बेण्यासाठी कंद चांगले पोसले जाणे आवश्यक असते आणि म्हणून लिलीच्या फुलझाडांची व्यापारी तत्त्वावर लागवड करताना नत्र, स्फुरद आणि पालाश ही तीनही द्रव्ये उपयुक्त असतात. जमिनीचा पोत कायम ठेवण्याकरिता शक्य असेल तर प्रथम हिरवळीचे खत वापरावे. लागवडीपूर्वी हेक्टरी 20 ते 25 टन चांगले कुजलेले शेणखत अथवा कंपोस्ट खत शेतात पसरवून टाकावे आणि कुळवाच्या पाळ्या घालून ते मातीत चांगले मिसळून घ्यावे. पिकाला हेक्टरी 150 ते 200 किलो नत्र, 100 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश द्यावे. संपूर्ण स्फुरद आणि पालाश लागवडीच्या वेळी द्यावे. नत्राची मात्रा तीन समान हप्त्यांमध्ये विभागून द्यावी. नत्राचा पहिला हप्ता लागवडीच्या वेळी तर उरलेले दोन हप्ते त्यानंतर 1 महिन्याच्या अंतराने द्यावेत.
कुंडीतील आणि इमारतीच्या अथवा उद्यानाच्या परिसरात लावलेल्या लिलीच्या पिकाला दर चौरस मीटरला 5 किलो शेणखत, 15 ते 20 ग्रॅम नत्र, 10 ग्रॅम स्फुरद आणि 5 ग्रॅम पालाश या प्रमाणात खते द्यावीत.पिकाला जरुरीपुरते परंतु नियमितपणे 7 ते 8 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. प्रमाणापेक्षा जास्त पाणी दिल्यास जमिनीतील कंद सडतात; म्हणून पिकाला पाणी देताना पिकामध्ये पाणी साचून राहणार नाही याची खबरदारी घ्यावी.
लिली पिकावरील महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण । Important pests of lily crop and their control.
लिलीच्या पिकाला मावा, फुलकिडे, पाने खाणाऱ्या अळ्या, खोड पोखणाऱ्या अळ्या, इत्यादी किडींपासून उपद्रव होतो.
मावा :
ही कीड पाने, कोवळे शेंडे, फुलांचे देठ यांवर राहून रस शोषून घेते. त्यामुळे पाने सुकतात, फुलांची प्रत खराब होते.
उपाय : या किडीच्या नियंत्रणासाठी 10 लीटर पाण्यात 15 मिलिलीटर रोगार या प्रमाणात मिसळून पिकावर फवारावे.
फुलकिडे :
हे किडे लिलीच्या कंदातील रस शोषून घेतात, त्यामुळे कंदाच्या बाहेरील पाकळ्यांवर तांबूस रंगाचे खोलगट डाग पडतात. नंतर या बाहेरील पाकळया मऊ पडतात आणि गळून पडतात. अशा कीडग्रस्त कंदांची लागवड केल्यास झाडे खुरटी राहतात.
उपाय : या किडीच्या नियंत्रणासाठी बेण्यावर क्लोरडेन पावडर धुरळावी. कंदांची साठवण 10 अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाला करू नये.
पाने खाणाऱ्या अळया :
या अळया लिलीच्या झाडाची पाने कुरतडून खातात आणि पिकाचे नुकसान करतात.
उपाय : या अळयांच्या नियंत्रणासाठी 10 लीटर पाण्यात 15 मिलिलीटर नुवाक्रॉन या प्रमाणात मिसळून पिकावर फवारावे.
खोड पोखरणारी अळी :
या अळया लिलीच्या झाडाचे खोड पोखरून आत प्रवेश करतात आणि आतील भागावर उपजीविका करतात. झाडाचे खोड पोखरल्यामुळे पानांची वाढ होत नाही, फुले अतिशय कमी प्रमाणात येतात.
उपाय : अळीचा प्रादुर्भाव झालेल्या झाडाचे खोड कापून आतील अळ्या वेचून नष्ट कराव्यात.
लिली पिकावरील महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण । Important diseases of lily crop and their control.
करडी भुरी (ग्रे मोल्ड) :
या रोगाची लागण झाल्यास झाडांच्या पानांवर गोलाकार अथवा अंडाकृती पिवळ्या अथवा लालसर रंगाचे ठिपके दिसून येतात. झाडाच्या इतर भागांवरही असे ठिपके दिसू लागतात आणि पाने सुकून वाळून जातात. उष्ण आणि ढगाळ हवामानात या रोगाचा प्रसार झपाट्याने होतो.
उपाय : या रोगाच्या नियंत्रणासाठी 2% बोर्डो मिश्रणाची अथवा ताम्रयुक्त बुरशीनाशकाची 8 ते 10 दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.
कंदकूज (बल्ब रॉट) :
या बुरशीजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळे कंदावरील पाकळ्यांचा खालचा भाग कुजतो व पाकळया गळतात. झाडाची खालची पाने पिवळी पडू लागतात. नंतर सुकून वाळतात.
उपाय : या रोगाच्या नियंत्रणाकरिता कॅप्टान या बुरशीनाशकाचे द्रावण जमिनीत टाकावे. रोगट झाड उपटून नष्ट करावे.
मऊ कंदकूज (सॉफ्ट बल्ब रॉट) :
हा रोग रायझोपस स्टोलोनिफर नावाच्या बुरशीमुळे होते. ही बुरशी कंदावर झालेल्या जखमांमधून आत शिरते. बुरशीच्या प्रादुर्भावा- मुळे कंद लिबलिबीत होतात आणि सडतात. कंदांवर बुरशीची वाढ झालेली दिसून येते.
उपाय : या रोगाची बुरशी कंदावरील जखमेतून आत शिरते म्हणून कंदाची काढणी करताना कंदाला इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. कंद काढणीनंतर कंदांना ताम्रयुक्त बुरशीनाशक लावावे. लागवडीपूर्वी जमिनीचे निर्जंतुकीकरण करावे.
विषाणुजन्य रोग :
मोझॅईक विषाणूची लागण झाल्यास लिलीची झाडे खुरटी राहतात, झाडाची पाने वेडीवाकडी येतात. पानांचा रंग फिकट पिवळा अथवा फिकट हिरवा होतो. पाने गुंडाळली जातात. पाने अतिशय आखूड देठावर गुच्छासारखी येतात. अशा रोगट झाडांचे कंद चपटे आणि लहान राहतात. कंदांना भेगा पडतात.
उपाय : या रोगाच्या नियंत्रणासाठी निश्चित उपाययोजना नाही; मात्र या रोगाच्या प्रतिबंधासाठी या रोगाचा प्रसार करणाऱ्या मावा किडीचा बंदोबस्त करावा. रोगट झाडे आणि कंद काढून नष्ट करावेत. लागवडीसाठी निरोगी कंदांची निवड करावी.
लिली पिकावरील महत्त्वाच्या विकृती आणि त्यांचे नियंत्रण । Important diseases of lily crop and their control.
पाने करपणे :
या विकृतीमुळे लिलीच्या पानांची टोके जळतात. नत्राची कमतरता आणि मँगनीज व अॅल्युमिनियम या अन्नद्रव्यांचे जास्त प्रमाण असलेल्या जमिनीत ही विकृती आढळून येते.
उपाय : या विकृतीचे निश्चित कारण माहीत नाही. मात्र जमिनीत चुन्याचा ( लाईम ) पुरवठा केल्यास या विकृतीचे प्रमाण कमी होते.
कळी फुटणे :
प्रामुख्याने पॉलिथीन गृहात लागवड केलेल्या पिकामध्ये लिलीच्या कळया फुटून सुकतात. कळीभोवतीच्या वातावरणात अतिशय कमी आर्द्रता, पाण्याची कमतरता, अन्नद्रव्यांची कमतरता यांमुळे ही विकृती निर्माण होते.
उपाय : पिकाला योग्य प्रमाणात अन्नद्रव्यांचा पुरवठा करावा. पिकाला पाण्याचा ताण पडू देऊ नये.
लिली पिकातील तणांचे नियंत्रण । Control of weeds in lily crop.
हरळी अथवा लव्हाळा यांसारख्या बहुवर्षायु तणांच्या बंदोबस्तासाठी सुरुवातीलाच खोल नांगरट करून आणि तणांच्या काशा अथवा गाठी वेचून जाळून टाकाव्यात. जमीन चांगली तापू द्यावी. पांढरी फुली, एकदांडी यांसारख्या तणांच्या नियंत्रणासाठी आवश्यकतेप्रमाणे खुरपणी करावी.
लिलीच्या फुलांची काढणी, उत्पादन आणि विक्री । Harvesting, production and sale of lily flowers.
लिलीची लागवड केल्यानंतर लागवडीसाठी निवडलेली जात, कंदांचा आकार आणि लागवडीचा हंगाम यांनुसार 3.5 ते 4 महिन्यांनी लिलीची फुले उमलू लागतात. लिलीच्या काही प्रकारांत वर्षातील विशिष्ट कालावधीतच फुले येतात. उदाहरणार्थ, फायरबॉल लिलीची फुले मार्च ते मे या काळातच फुलतात. लिलीच्या फुलांची काढणी प्रामुख्याने हा आण सजावटीसाठी तसेत फुलदाणीत ठेवण्यासाठी केली जाते. हार आणि सजावटीसाठी फुले कळ्यांच्या अवस्थेत असतानाच काढली जातात. फुले फुलदाणीत ठेवण्यासाठी फुलांची कळी लांबट होऊन उमलण्याच्या अवस्थेत असताना फुले पूर्ण उमलण्यापूर्वी फुलांचे दांडे कापून फुलांची काढणी करतात. काही वेळा फुलातील परागकण फुलांवर पसरून फुलांचे सौंदर्य बिघडते. म्हणून फुलांचे परागकोश फुटण्यापूर्वीच ते काढून टाकले जातात. हारासाठी
फुले काढली जातात तेव्हा हंगामामध्ये सर्वसाधारणपणे हेक्टरी 4.5 ते 5 लाख फुले मिळतात. तर फुलदाणीत ठेवण्याकरिता फुलांचे दांडे काढले जातात, तेव्हा हेक्टरी एक लाख ते सव्वा लाख फुलांचे दांडे मिळतात.
फुलांच्या कळ्या काढल्यानंतर बांबूच्या करंड्यांत सभोवती पाने अथवा गवत लावून मध्यभागी कळ्या ठेवतात. फुलांचे दांडे एकत्र बांधून त्याभोवती गवत बांधून दूरच्या बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवितात. फुलांचे दांडे वर्तमानपत्राच्या कागदात गुंडाळून कागदी कार्डबोर्डाच्या खोक्यात भरून दूरच्या बाजारपेठेत पाठवितात.
लिलीच्या फुलांची साठवण । Storage of lily flowers.
फुलांचे दांडे काढल्यानंतर काही दिवस त्यांची शीतगृहात साठवण करता येते. फुलांची काढणी केल्यानंतर फुलांचे दांडे 1 लीटर पाण्यात 150 मिलिग्रॅम सिल्व्हर थायोसल्फेट अधिक 100 ग्रॅम साखर मिसळून तयार केलेल्या द्रावणात 24 तास बुडवून ठेवावेत. त्यानंतर शीतगृहातील साठवणीसाठी 1 लीटर पाण्यात 50 मिलिग्रॅम सिल्व्हर नायट्रेट मिसळून तयार केलेल्या द्रावणात बुडवून ठेवावेत. त्यानंतर 1 लीटर पाण्यात 30 ग्रॅम साखर आणि 200 मिलिग्रॅम 8 एच.क्यू.सी. मिसळून तयार केलेल्या द्रावणात 1 अंश सेल्सिअस तापमाना शीतगृहामध्ये 4 आठवड्यांपर्यंत ठेवता येतात.
लिलीच्या कंदांची काढणी आणि साठवण । Harvesting and storage of lily tubers.
लिलीच्या फुलांची काढणी केल्यानंतर काही दिवसांनी झाडाची पाने पूर्णपणे सुकतात. या वेळी जमिनीतील कंद काढून घ्यावेत. कंदांची प्रतवारी करावी. नंतर कंदांना थायरम किंवा बाविस्टीन अथवा डायथेन एम-45 हे बुरशीनाशक चोळावे आणि कंद हवेशीर जागेत थंड ठिकाणी ठेवावेत. शीतगृहात कंद 2 ते 3 महिने साठवून ठेवता येतात.
सारांश ।
लिली हे विविधरंगी फुलझाड असून कुंडीमध्ये तसेच शेतात मोठ्या प्रमाणावर या पिकाची लागवड केली जाते. उद्याने, इमारतीचा परिसर आणि रस्त्याच्या दुतर्फा शोभा वाढविण्यासाठी लिलीची लागवड करतात. हार, गुच्छ, तुरे, तोरणे, मंडप सजावट आणि फुलदाणीत ठेवण्याकरिता लिलीच्या फुलांचा वापर केला जातो.
लिलीची लागवड एप्रिल किंवा मे महिन्यात अथवा हंगामानुसार मोठ्या आकाराचे कंद लावून केली जाते. महाराष्ट्रात हारासाठी स्पाईडर लिली तर फुलदाणीत ठेवण्याकरिता अमर लिली अथवा डे लिलीची लागवड करतात. लिलीच्या पिकाला हेक्टरी सुमारे 40 ते 50 बैलगाड्या शेणखत, 150 ते 200 किलो नत्र, 100 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश द्यावे. पिकाला नियमित परंतु जरुरीपुरते पाणी द्यावे. पिकाची व्यवस्थित निगा ठेवल्यास हारासाठी 4.5 ते 5 लाख फुले एक हेक्टर क्षेत्रातून मिळतात. अमर लिलीसारखा प्रकार फुलदाणीत ठेवण्याकरिता वापरला जातो तेव्हा हेक्टरी एक लाखापर्यंत फुलांचे दांडे मिळतात.
अतिशय महत्वाची माहिती मिळाली, आपल्या या माहिती मुळे मी माझ्या शेतामध्ये हरित क्रांती घडून आणि शकतो ,आपला मी अत्यंत आभारी आहे.