लिंबू पिकाचे उगमस्थान, महत्त्व आणि भौगोलिक प्रसार । Limbu Sheti। लिंबू या पिकास हवामान । लिंबू या पिकास जमीन । लिंबू या पिकाच्या अभिवृद्धी आणि लिंबू या पिकास लागवड पद्धती । लिंबू या पिकास हंगाम । लिंबू या पिकास लागवडीचे अंतर । लिंबू या पिकास वळण । लिंबू या पिकाची छाटणी । लिंबू या पिकास खत व्यवस्थापन । लिंबू या पिकास पाणी व्यवस्थापन । लिंबू झाडांना पाणी देताना काय काळजी घ्यावी । लिंबू पिकातील आंतरपिके । लिंबू पिकातील आंतरमशागत । लिंबू पिकातील तणनियंत्रण । लिंबू पिकातील महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण । लिंबू पिकावरील महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण । लिंबू पिकाच्या फळांची काढणी । लिंबू पिकाचे उत्पादन । लिंबू पिकाच्या फळांची साठवण । फळे पिकविण्याच्या पद्धती आणि विक्री ।
।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।
लिंबू पिकाचे उगमस्थान, महत्त्व आणि भौगोलिक प्रसार :
लिंबाचे मूळस्थान भारत आणि चीन दरम्यानच्या भूप्रदेशात असल्याचे ग्राह्य मानले जाते. त्यातल्या त्यात लेमन हे भारतातील आणि लाईम हे चीनमधील असावे असाही एक तर्क आहे. तथापि लेमन आणि लाईम यांचा भारतातूनच जगभर प्रसार झाला आहे. भारतात आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यांत लिंबाची मोठ्या प्रमाणात लागवड आहे. अलीकडच्या काळात महाराष्ट्रात या पिकाखालच्या क्षेत्रात पुष्कळ वाढ झाली आहे.
महत्त्व :
लिंबाचे फळ टिकण्यास चांगले आहे. पक्व फळातील रसाचा उपयोग जेवणात पेय म्हणून केला जातो. लिंबापासून रस, लोणचे, पेक्टीन, सायट्रिक अॅसिड, इत्यादी पदार्थ करता येतात. लिंबामध्ये औषधी गुणधर्मही आहेत. थकवा दूर करण्यासाठी, पचनक्रिया सुधारण्यासाठी लिंबाचा उपयोग केला जातो. स्कर्व्ही रोग बरा करण्यासाठी लिंबाचा उपयोग फार काळापासून होतो.
पिकाखालील क्षेत्र आणि उत्पादन :
लिंबाची लागवड जगातील बहुतेक देशांत केली जाते. भारतातही जवळजवळ सर्वच राज्यात लिंबू लागवड आढळते. महाराष्ट्रात अहमदनगर जिल्हा लिंबू लागवडीत आघाडीवर आहे. या फळपिकांसाठी महाराष्ट्रात 10,000 हेक्टर क्षेत्र असून दरवर्षी 75,000 टन उत्पादन मिळते.
अहमदनगर जिल्ह्यात एकूण क्षेत्राच्या निम्मे क्षेत्र असून उत्पादकता हेक्टरी 10 टन आहे. या खालोखाल पुणे, सोलापूर जिल्ह्यांत लिंबाची लागवड असून तेथील उत्पादकता 9 टन प्रति हेक्टर आहे. इतर जिल्ह्यांतही कमी-अधिक प्रमाणात लागवड आहे. घरगुती स्वरूपात शेतीवर, परसबागेतही लिंबाची लागवड सर्वत्र आढळते. अर्थात ही आकडेवारी हेक्टरमध्ये मोजली जात नाही आणि उत्पादनही घरगुती आणि वानगी स्वरूपात वापरले जाते, त्यामुळे त्याची नोंद नाही.
लिंबू या पिकास हवामान आणि लिंबू या पिकास जमीन :
हवामान :
थंड आणि दमट हवामान वगळता कोरड्या आणि उष्ण हवामानात लिंबू लागवड यशस्वी होते. अधिक पाऊस पडणाऱ्या भागात कँकर नावाचा रोग कागदी लिंबावर पडतो तेव्हा हे पीक कोकण आणि पूर्व विदर्भात यशस्वी होत नाही. मात्र अशा ठिकाणी सीडलेस लेमन, इटालियन लेमन हे प्रकार होतात.
जमीन :
मध्यम खोलीची, उत्तम निचरा होणारी, चुनखडीमुक्त जमीन लिंबू लागवडीस योग्य ठरते. खोल, काळी जमीन या पिकास मानवत नाही. जमिनीचा आणि सेंद्रिय कर्ब 0.8 ते 1.2 इतका असल्यास उत्तम होय.
सुधारित जाती :
लिंबू पिकाच्या प्रमुख २ जाती | |
१.० लाईम | २.० लेमन |
१.१ कागदी लिंबू | २.१ सीडलेस लिंबू |
१.२ मिठा लिंबू | २.२ इटालियन लिंबू |
१.३ पाट लिंबू | २.३ युरेका लिंबू |
१.४ रंगपूर लिंबू | २.४ ईडलिंबू |
यापैकी लाईम गटातील लिंबात कागदी लिंबू हा प्रकार आणि त्यातील साई सरबती हा महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेला वाण चांगला आहे. फळांचा आकार अंडाकृती किंवा गोल असतो. साल पातळ असते. फुलांचा रंग पांढरा असतो. झुडूपदार असते. साल जाड असते. झाड मध्यम आकारात वाढते आणि फुले बाहेरून जांभळट आणि आतून पांढरी असतात.
लिंबू या पिकाच्या अभिवृद्धी आणि लागवड पद्धती :
लिंबाची लागवड रोपाने अथवा कलमाने केली जाते. रोपांची लागवड करताना 1 वर्ष वयाची रोपे लावावीत. कलम करण्यासाठी जंबेरी हा खुंट वापरावा. सामान्यपणे लाईम प्रकाराची अभिवृद्धी रोपाने केली जाते. तर लेमन प्रकारासाठी कलमे लावावीत.
लागवड करण्यासाठी पावसाळयापूर्वी जमीन तयार करून 5 ते 6 मीटर हम चौरस अंतराने 0.60 ते 0.75 मीटर मापाचे खड्डे खणून ते खत मातीने भरून घ्यावेत.
लिंबू या पिकास हंगाम आणि लिंबू या पिकास लागवडीचे अंतर :
लिंबू लागवड अधिक पाऊस असणाऱ्या भागात ऑक्टोबरमध्ये तर कमी पाऊस पडणाऱ्या भागात जुलै महिन्यात करावी. मध्यम जमिनीत लेमन जाती 7X7 मीटर अंतरावर आणि हलक्या जमिनीत 6X6 मीटर अंतरावर लावाव्यात. लाईम जाती मध्यम जमिनीत 6 X 6 मीटर तर हलक्या जमिनीत 5 x 5 मीटर अंतरावर लावाव्यात.
लिंबू या पिकास वळण आणि लिंबू या पिकाची छाटणी :
लिंबू झाडांची वाढ एकाच खोडावर करावी. खोड पाऊण ते एक मीटर उंचीपर्यंत सरळ वाढवावे. त्यावरील फुटी काढून टाकाव्यात. कलम असेल तर खुंटावर येणारी फूट पहिली 3-4 वर्षे वारंवार काढून टाकावी. झाडांना चांगला डेरेदार आणि मोकळा आकार येण्यासाठी दाटीच्या फांद्या, मर, तसेच पान फोक वर्षातून एकदा शक्यतो पावसाळ्यापूर्वी काढून टाकावेत.
लिंबू या पिकास खत व्यवस्थापन आणि लिंबू या पिकास पाणी व्यवस्थापन :
लिंबू लागवड केल्यानंतर पहिली 3 वर्षे दर 4 महिन्यांनी आणि नंतर वर्षातून दोन वेळा खते द्यावीत. लिंबास वर्षभर फुले-फळे लागतात. तथापि, पावसाळ्यात अधिक फळे लागतात. म्हणून पावसाळयापूर्वीची खतांची मात्रा पुरेशी असावी.
खताचे नाव | फुले येण्यापूर्वी | फळे वाढत असताना | फळे काढल्यानंतर |
1) कंपोस्ट खत | 12 टन | 6 टन | 3 टन |
2) पेंड | 500 कि. | 250 कि. | 500 कि. |
3) 18:46 | 150 कि. | – | – |
4) सल्फेट ऑफ पोटॅश | 50 कि. | 100 कि. | 100 कि. |
5) सूक्ष्म अन्नद्रव्ये मिश्रण | – | 25 कि. | – |
6) फॉस्फीन | 15 कि. | – | – |
लिंबू झाडांना पाणी देताना पुढीलप्रमाणे काळजी घ्यावी :
(1) खोडाजवळ पाणी साचू देऊ नये.
(2) खोडास ओलावा लागू देऊ नये.
(3) बांगडी पद्धतीने आळयातून पाणी द्यावे.
(4) ठिबक पद्धत असेल तर ड्रीपर खोडापासून दूर असावा.
(5) जेथे खते दिली जातात तेथेच पाणी द्यावे.
(6) बहार चालू असताना पाण्याचा ताण पडू देऊ नये.
(7) फळे नसली तरीही झाडांना मोजके पाणी चालू ठेवावे.
लिंबू पिकातील आंतरपिके, लिंबू पिकातील आंतरमशागत आणि लिंबू पिकातील तणनियंत्रण :
आंतरपिके :
लिंबू लागवडीनंतर पहिली 2 वर्षे कांदा, लसूण, कोबी, पालेभाज्या, गाजर, मुळा यांसारखी पिके घ्यावीत. काही ठिकाणी शेवंती, झेंडू, अॅस्टर, गॅलार्डिया ही फुलपिकेही घेणे फायदेशीर ठरते.
आतंरमशागत :
झाडांची आळी अधूनमधून चाळणी करून घ्यावी. आंतरपीक घेतले नसल्यास मधल्या मोकळ्या जागेत कुळवणी करावी. झाडावर नियमितपणे फळे यायला सुरुवात झाल्यावर, दरवर्षी फुले यायच्या अगोदर चाळणी करावी.
तणनियंत्रण :
खोडाजवळ आळयात मशागत करून तणांचा बंदोबस्त करणे अवघड असते. अशा ठिकाणी तणे खोदून अथवा खुरपून काढून टाकावीत. खोडाभोवती आच्छादन करून तसेच तणनाशकांचा वापर करूनही तणनियंत्रण करता येते.
लिंबू पिकातील महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण :
लेमन बटर फ्लाय :
या किडीची अळी पानावर आणि कोवळया शेंड्यावर हल्ला करते. पानांच्या शिरा सोडून मधला भाग खाऊन टाकते.
उपाय : या किडीचा प्रादुर्भाव झालेला दिसताच कार्बारिल 50 टक्के 10-15 दिवसांच्या अंतराने 2-3 फवारण्या कराव्यात.
नागअळी (लीफ मायनर) :
ही अळी पान पोखरून नुकसान करते. पानातील रस शोषला गेल्यामुळे पानावर हरितद्रव्यविरहित रेषा दिसतात; तसेच पाने गुंडाळल्यासारखी होतात.
उपाय : टारझन अथवा फास्फोमिडॉन हे कीडनाशक 8/10 दिवसांच्या अंतराने 2/3 वेळा फवारावे.
लिंबू पिकावरील महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण :
सिट्स कँकर :
हा जिवाणुजन्य रोग असून पानांवर, फळांवर आणि कोवळचा फांद्यांवर लालसर काळे डाग पडतात. या रोगामुळे वाढ कमकुवत होते, तसेच फळगळ आणि फळांची प्रत डागांमुळे खालावते.
उपाय : कॉपर ऑक्सिक्लोराईड + स्ट्रेप्टोसायक्लीन किंवा क्रोसीन हे बॅक्टेरीसाईड दर 100 लीटर पाण्यात 30 ग्रॅम प्रमाणे दर आठवड्यास एकदा याप्रमाणे 3/4 वेळा फवारावे.
मर किंवा उभळ :
योग्य निचरा न झाल्याने मूळकूज होते.
उपाय : बागेतील निचरा सुधारावा किंवा झाडाच्या मुळांजवळ बुरशीनाशकाची जिरवणी करावी. खोडावर बोर्डोपेस्ट लावावी.
लिंबू पिकातील शारीरिक विकृती आणि त्यांचे नियंत्रण :
फळांचा आकार बिघडणे :
काही वेळा फांद्यांवरील काट्यांमुळे फळांना अपाय होतो. फळे बेढब होतात. फळे भेगाळतात, कुजतात.
उपाय : गुंतागुंतीच्या फांद्या छाटून टाकाव्यात. झाडांना मोकळी हवा व प्रकाश मिळेल असे पाहावे.
पाणफोक :
सरळसोट वाढणारे फोक येतात. यावर फुले लागत नाहीत. नत्र व पाणी यांचे प्रमाण वाढल्यास अशी विकृती तयार होते.
उपाय : नत्र व पाणी नियंत्रित करावे. पाणफोक 2-3 डोळे राखून छाटावेत.
लिंबू पिकाच्या फळांची काढणी आणि लिंबू पिकाचे उत्पादन :
रोपांपासून वाढविलेल्या झाडांना 5/6 वर्षांनंतर चांगले उत्पादन येऊ लागते. फळांचा रंग बदलू लागताच फळे काढून, गोळा करावीत. झाडांना वर्षभर फळे येत असली तरी पावसाळयात उत्पादन वाढते. आंबे बहाराच्या उशिराने आलेल्या फळांचे उत्पादन अधिक भरते. फळांचा आकारही मोठा असतो. दरवर्षी लिंबाच्या एका झाडापासून 1,000 ते 1,200 फळे मिळतात. हेक्टरी उत्पादन 10-12 टनांपर्यंत मिळते.
लिंबू पिकाच्या फळांची साठवण, फळे पिकविण्याच्या पद्धती आणि विक्री :
योग्य अवस्थेत काढलेली फळे आठवडाभर चांगली टिकतात. या काळात त्यांना पिवळाधमक रंग येतो. दूरच्या बाजारात विक्रीसाठी फळे 40-50 किलो क्षमतेच्या गोण्यांतून पाठवितात.
सारांश :
लिंबामध्ये मुख्य दोन प्रकार आहेत. लाईम आणि लेमन असे भेद आहेत. महाराष्ट्रात लिंबाची लागवड पुष्कळ ठिकाणी होते. तथापि, अहमदनगर जिल्हा यात आघाडीवर आहे. लिंबास कोरडी व उष्ण हवा मानवते. दलदलीची, चुनखडीची जमीन या फळझाडास मानवत नाही. लिंबाची फळे रोजच्या वापरात तर येतातच शिवाय लिंबू रस, लोणची, सायट्रिक अॅसिड, पेक्टीन करण्यासाठी वापरतात. कागदी लिंबू ही जात लोकप्रिय असून रोपापासून लागवड करतात. 6-7 वर्षांनंतर फळे भरपूर येऊ लागतात. फळे वर्षभर येत राहतात. एका झाडापासून वर्षभरात 1,000 फळे मिळतात. फळे झाडावरच तयार होतात. पक्व फळांना पिवळा रंग येतो. फळे आठवडाभर चांगल्या स्थितीत राहू शकतात.