लिची लागवड |Litchi Lagwad | Litchi Sheti | लिचीच्या फळांची साठवण आणि फळे पिकविण्याच्या पद्धती । लिची उगमस्थान, महत्त्व आणि भौगोलिक प्रसार । लिची पिकाखालील क्षेत्र । लिची पिक उत्पादन । लिची पिकास योग्य हवामान । लिची पिकास योग्य जमीन । लिची पिकाच्या सुधारित जाती । लिची पिकाची अभिवृद्धी । लिची पिकाची लागवड पद्धती । लिची पिकाचा हंगाम । लिची पिक लागवडीचे अंतर । लिची पिकास वळण । लिची पिकास छाटणीच्या पद्धती । लिची पिक खत व्यवस्थापन । लिची पिक पाणी व्यवस्थापन । लिची पिकाची अभिवृद्धी । लिची पिकाची लागवड पद्धती । लिची पिकातील महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण । लिची पिकावरील महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण | लिची पिकावरील महत्त्वाच्या विकृती आणि त्यांचे नियंत्रण । लिचीच्या फळांची काढणी, उत्पादन आणि विक्री ।
।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।
लिची लागवड |Litchi Lagwad | Litchi Sheti |
लिचीच्या फळांचा आकर्षक लाल रंग आणि मधुर स्वाद यांमुळे लिचीची फळे जगभर प्रसिद्ध आहेत. लिचीची फळे सर्वसाधारणपणे द्राक्ष, आंबा आणि स्ट्रॉबेरी यांचा हंगाम संपत आल्यानंतर सुरू होतात. त्यामुळे लिचीच्या फळांना बाजारात चांगली मागणी असते.
लिचीच्या फळांना आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांना जगभर मोठ्या प्रमाणावर मागणी असल्यामुळे आपल्या देशात आणि राज्यात लिचीच्या लागवडीखालील क्षेत्र वेगाने वाढत आहे. म्हणूनच लिचीची व्यापारी तत्त्वावर लागवड करताना, लिचीची लागवड पद्धती, लिचीच्या विविध जाती, लिचीवरील किडी आणि रोग, इत्यादी गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे.
लिची उगमस्थान, महत्त्व आणि भौगोलिक प्रसार ।
लिची ह्या फळझाडाचे उगमस्थान चीन हा देश असून दक्षिण चीनमधील क्वांगतुंग आणि फुकेन या भागात लिचीची लागवड बऱ्याच पूर्वीच्या काळापासून केलेली आढळते. चीनमधून लिचीचा प्रसार प्रथम म्यानमार देशात झाला आणि नंतर 17 व्या शतकाच्या शेवटी लिचीचे फळझाड भारतात आले. 18 व्या शतकाच्या अखेरीस लिचीची लागवड बंगालमध्ये करण्यात आली आणि तेथून पुढे भारताच्या इतर भागांत लिचीची लागवड सुरू झाली.
भारत आणि चीन या दोन देशांमध्ये लिचीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. या देशांशिवाय जगात लिचीची लागवड म्यानमार, अमेरिका, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, ब्राझील, व्हिएतनाम, इंडोनेशिया, वेस्ट इंडिज बेटे, मॉरिशस, इत्यादी देशांमध्ये केली जाते.
लिचीची फळे आंबटगोड आणि मधुर स्वादाची असतात. लिचीच्या फळांमध्ये जीवनसत्त्व ‘क’ भरपूर प्रमाणात असते. त्याचप्रमाणे जीवनसत्त्व ‘अ’, ‘ब’ तसेच लोह, स्फुरद आणि कॅल्शियम ही खनिजे पुरेशा प्रमाणात असतात. लिचीच्या 100 ग्रॅम खाण्यायोग्य भागामध्ये अन्नद्रव्यांचे प्रमाण पुढीलप्रमाणे असते.
अन्नघटक | प्रमाण (%) | अन्नघटक | प्रमाण (%) |
पाणी | 78.0% | शर्करा (कार्बोहायड्रेट्स्) | 16.2 |
प्रथिने (प्रोटीन्स) | 0.8 | स्निग्धांश (फॅट्स) | 0.6 |
खनिजे | 0.7 | जीवनसत्त्व ‘क’ | 0.06 |
उष्मांक | 65 कॅलरी | — | — |
लिचीची ताजी पक्व फळे खाण्यासाठी वापरतात. लिचीच्या पक्व फळांपासून लोणचे, सरबत, स्क्वॅश, वाईन यांसारखे विविध टिकाऊ पदार्थ तयार करता येतात. लिचीची फळे • डबाबंद करून तसेच वाळवून (लिची नट) जास्त टिकविता येतात.
लिची पिकाखालील क्षेत्र । लिची पिक उत्पादन ।
जगामध्ये लिचीच्या लागवडीखाली अंदाजे 67,160 हेक्टर क्षेत्र आहे. भारतामध्ये लिचीच्या लागवडीखालील 11,410 हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी सर्वांत जास्त क्षेत्र बिहार आणि उत्तर प्रदेशात आहे. पश्चिम बंगाल, पंजाब, गुजरात, महाराष्ट्र आणि दक्षिण भारतातील निलगिरी डोंगराचा भाग या विभागात लिचीची लागवड काही प्रमाणात दिसून येते. महाराष्ट्रात ठाणे, महाबळेश्वर, माथेरान या भागात लिचीची लागवड आढळते.
लिची हे पीक दुर्लक्षित राहिल्यामुळे या पिकाच्या लागवडीखालील क्षेत्र आणि सरासरी उत्पादन यांबाबत निश्चित आकडेवारी उपलब्ध नाही. जगातील लिचीचे उत्पादन अंदाजे 2.5 ते 3.0 लाख टन इतके आहे. या उत्पादनापैकी 1.52 लाख टन उत्पादन फक्त भारत आणि चीन या दोन देशांत होते. भारत (92,000 टन) आणि चीन ( 64,000 टन) हे लिची उत्पादनातील प्रमुख देश असून जगाच्या एकूण उत्पादनाच्या 63% उत्पादन या दोन्ही देशांमध्ये होते.
लिची पिकास योग्य हवामान । लिची पिकास योग्य जमीन ।
लिची हे समशीतोष्ण हवामानातील पीक आहे. लिचीच्या फळझाडाला उष्ण आणि दमट हवामान चांगले मानवते. उष्ण व दमट उन्हाळा, सौम्य हिवाळा, धुके नसलेली आणि कोरडी हवा असलेल्या हवामानात लिचीच्या झाडाची वाढ चांगली होते. लिचीच्या झाडाच्या वाढीसाठी 20 ते 35 अंश सेल्सिअस तापमान अधिक उपयुक्त असते. वातावरणाचे तापमान 15 अंश सेल्सिअसच्या खाली गेल्यास लिचीच्या झाडाची वाढ खुंटते.
लिचीच्या झाडाला 1,250 ते 1,700 मिलिमीटर पाऊस पुरेसा होतो. फळधारणेच्या काळात हवेमध्ये 80% आर्द्रता असावी. उष्ण कोरडी हवा आणि अधूनमधून पाऊस पडणे असे वारंवार घडल्यास लिचीची फळे तडकतात. अतिशय उष्ण आणि कोरड्या हवामानात झाडाची फुले आणि फळे गळतात आणि फळे तडकण्याचे प्रमाण वाढते. लिचीच्या झाडाची मुळांवाटे जमिनीतील पाणी शोषून घेण्याची क्षमता कमजोर असते. त्यामुळे जमिनीत पुरेशा प्रमाणात ओलावा असला तरी झाडाला पाण्याचा ताण पडू शकतो. म्हणूनच हवेत योग्य प्रमाणात आर्द्रता असणे झाडाच्या वाढीसाठी आवश्यक असते.
हिवाळयात कडक थंडी संपल्यानंतर हवेत गरमपणा आल्यास चांगला बहार येतो. परंतु बहार येण्याच्या काळात कडक थंडी आणि कोरडे हवामान असल्यास परागीकरण आणि फलधारणा यांवर विपरीत परिणाम होतो. डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत पुरेशी थंडी आणि जानेवारीनंतर तापमान वाढत जाऊन एप्रिल-मे महिन्यात तापमान 35 ते 40 अंश सेल्सिअसपर्यंत जाते. अशा ठिकाणी लिचीची लागवड अधिक यशस्वी होते. अशा प्रकारचे हवामान महाराष्ट्रात अनेक भागांत उपलब्ध आहे. सध्या केवळ ठाणे जिल्ह्यांत लिचीची लागवड होत असली तरी पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणच्या काही भागांत लिचीच्या लागवडीस भरपूर वाव आहे.
लिचीचे झाड अनेक प्रकारच्या जमिनीत चांगले वाढते. परंतु खोल, पोयट्याची, गाळाची, सुपीक आणि पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमिनीत लिचीच्या झाडांची वाढ होते. किंचित आम्लधर्मीय अथवा अल्कधर्मी तसेच अल्प चुनखडीयुक्त जमिनीतही लिचीच्या झाडाची वाढ होते. लिचीच्या झाडाच्या वाढीसाठी जमिनीचा सामू (आम्ल- विम्ल निर्देशांक) 5.5 ते 6.5 च्या दरम्यान असावा.
लिची पिकाच्या सुधारित जाती ।
भारतात लिचीच्या जवळपास 50 जाती उपलब्ध आहेत. भारतामध्ये लिचीची सर्वांत जास्त लागवड बिहार राज्यात केली जाते. बिहार राज्यात लिचीच्या मुझफ्फरपूर, शाही, कसबा, चिनी, देशी आणि पूरबी या प्रमुख जातींची लागवड केली जाते. महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात प्रामुख्याने लिचीच्या स्थानिक जातींची लागवड केली जाते.
मुझफ्फरपूर लिची :
लिचीची ही लोकप्रिय जात असून बिहार राज्यात या जातीची व्यापारी तत्त्वावर लागवड केली जाते. या जातीच्या झाडांना भरपूर फळे येतात. फळांचा रंग नारिंगी-गुलाबी असतो. फळातील गर राखी रंगाचा असून गर घट्ट असतो. गरामध्ये साखरेचे प्रमाण 18% आणि आम्लतेचे प्रमाण 0.8% इतके असते. या जातीच्या लिचीच्या एका फळाचे वजन 20 ग्रॅम इतके भरते. लिचीच्या या जातीमध्ये पक्व झालेली फळे तडकण्याचे प्रमाण कमी असते. लिचीच्या या जातीची फळे लवकर तयार होतात. फळे मे- जून अखेरपर्यंत पक्क होतात. या जातीच्या झाडाला नियमितपणे फळे येतात आणि एका झाडापासून सरासरी 80 ते 100 किलोग्रॅमपर्यंत उत्पादन मिळते.
बॉम्बे लिची :
पश्चिम बंगालमध्ये व्यापारी तत्त्वावर या जातीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. लिचीच्या या जातीची झाडे जोमदार आणि उंच वाढतात. झाडांची सरासरी उंची आणि विस्तार 20 चौरस फुटांपर्यंत असतो. फळांचे घोस मोठे असून फळांचा आकार हृदयासारखा असतो. घोसातील प्रत्येक फळाच्या देठाजवळ एक छोटेसे अपूर्ण वाढ झालेले फळ असते. फळे पिकल्यानंतर फळांच्या वरील सालीला लालसर रंग येतो. परंतु फळांच्या देठाकडील भाग हिरवट रंगाचाच राहतो. बाँबे जातीच्या लिचीच्या एका फळाचे वजन सरासरी 15 ते 20 ग्रॅम इतके भरते. फळातील गर राखी रंगाचा, मऊ आणि गोड असतो. गरात साखरेचे प्रमाण 11.0 % असते तर आम्लतेचे प्रमाण 0.4% इतके असते. गरातील बिया मोठ्या, लांबट आणि चकाकणाऱ्या असतात. या जातीच्या एका झाडाचे सरासरी उत्पादन 80 ते 90 किलोपर्यंत येते.
चायना लिची :
लिचीची ही एक उत्तम प्रतीची जात असून पश्चिम बंगाल आणि बिहार या राज्यांत या जातीची मोठ्या प्रमाणावर लागवड दिसून येते. या जातीच्या झाडाची उंची आणि विस्तार मध्यम असतो. झाडाच्या पानांचा आकार लिचीच्या इतर जातींच्या मानाने लहान असतो. चायना जातीची फळे टपोरी असून पक्व झालेल्या फळांचा रंग लालसर-नारिंगी असतो. एका फळाचे वजन सरासरी 25 ग्रॅम असते. फळातील गर पांढरा, मऊ आणि चवीला गोड असतो. या जातीच्या फळातील बिया इतर जातींच्या तुलनेत लहान आणि चकाकणाऱ्या असतात. या जातीमध्ये फळे तडकण्याचे प्रमाण कमी असते.
सहारणपूर लिची :
उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यांत या जातीची लागवड होते. या जातीची फळे टपोरी असून फळांचे सरासरी वजन 30 ग्रॅमपेक्षा अधिक भरते. फळांचा रंग नारिंगी- गुलाबी असतो. फळातील गरामध्ये साखरेचे प्रमाण 18 % तर आम्लतेचे प्रमाण 0.5 % इतके असते. ही जात उशिरा तयार होणारी असून फळे जून महिन्यात पक्व होतात.
डेहराडून लिची :
डेहराडून या जातीची झाडे मध्यम उंचीची असून झाडाचा विस्तार कमी असतो. या जातीच्या फळांचा आकार हृदयासारखा असून एका फळाचे सरासरी वजन 18 ग्रॅम असते. पक्व फळांचा रंग आकर्षक गुलाबी असतो. फळातील गराचा रंग भुरकट पांढरा असतो. या जातीच्या एका झाडापासून सरासरी 80 ते 90 किलोपर्यंत उत्पादन मिळते. या जातीच्या फळांमध्ये फळांची साल करपण्याचे आणि फळे तडकण्याचे प्रमाण जास्त असते.
रोझ सेंटेड लिची :
या जातीच्या फळातील गराला गुलाबासारखा सुगंध आणि स्वाद असतो आणि यावरूनच या जातीला ‘रोझ सेंटेंड’ असे नाव मिळाले आहे. या जातीची फळे आंबट, गोलसर आणि हृदयाच्या आकाराची असतात. पक्व फळे गुलाबी, गर्द लाल किंवा जांभळट रंगाची असतात. लिचीच्या एका फळाचे सरासरी वजन 20 ते 24 ग्रॅम इतके भरते. फळातील गर पांढरट करड्या रंगाचा, मऊ आणि अतिशय गोड असतो. गरातील बिया लहान परंतु पूर्ण वाढलेल्या आणि चकाकणाऱ्या असतात. या जातीची फळे जून महिन्यात पक्व होतात. कडक उन्हामुळे आणि कोरड्या हवेत काही प्रमाणात फळे तडकतात आणि फळांची साल करपते. बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यांत या जातीची लागवड आढळते. या जातीच्या एका झाडाचे सरासरी उत्पादन 80 ते 90 किलोपर्यंत मिळते.
शाही लिची :
बिहार राज्यातील मुझफ्फरपूर भागात लिचीच्या या जातीची लागवड दिसून येते. या जातीच्या झाडांना भरपूर आणि नियमित फळे येतात. या जातीची फळे लांबट गोलसर आकाराची असून मे महिन्याच्या अखेरीस पक्व होतात. पक्व फळांचा रंग आकर्षक लाल असतो. एका फळाचे सरासरी वजन 22 ते 24 ग्रॅम इतके भरते. ही जात प्रक्रिया करण्यासाठी अतिशय चांगली आहे.
देशी लिची :
पश्चिम बंगाल आणि बिहार राज्यात या जातीची लागवड केली जाते. या जातीची फळे लवकर तयार होतात. फळे मध्यम आणि लंबगोल आकाराची असतात. या जातीच्या एका फळाचे सरासरी वजन 17 ग्रॅम भरते. पक्व फळांचा रंग गर्द लाल असतो. या जातीच्या झाडांना नियमित फळे येतात.
कलकत्ता लेट लिची :
ही उशिरा तयार होणारी परंतु भरपूर उत्पादन देणारी जात आहे. पश्चिम बंगाल राज्यात या जातीची मोठ्या प्रमाणावर लागवड होते. या जातीच्या झाडांचा विस्तार कमी असून उंची 15 ते 20 फूट इतकी असते. पक्व फळे मध्यम आकाराची आणि लाल रंगाची असतात. एका फळाचे सरासरी वजन 20 ते 22 ग्रॅम इतके भरते. फळातील गर मऊ आणि गोड असून गराचा रंग धुरकट पांढरा असतो. गरातील बिया मोठ्या आणि काटेरी असतात. या जातीच्या झाडाला नियमित फळे येतात. एका झाडाचे सरासरी उत्पादन 80 ते 100 किलोग्रॅम असते.
इलायची लिची :
या जातीची लागवड पश्चिम बंगाल राज्यात आढळून येते. या जातीच्या झाडांचा विस्तार मध्यम असतो. फळे मध्यम आकाराची आणि किंचित कोनाची असून पक्व फळांचा रंग नारिंगी, लाल असतो. या जातीच्या एका फळाचे वजन 12 ते 15 ग्रॅम भरते. फळातील गर भुरकट पांढऱ्या रंगाचा आणि चवीला गोड असतो. मे महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात या जातीची फळे तयार होतात.
लेट सीडलेस लिची :
लिचीची ही जात नावावरून बिनबियांची वाटत असली तरी खऱ्या अर्थाने ही जात बिनबियांची नाही. या जातीच्या फळातील बिया आकाराने लहान, चपट्या आणि सुरकुतलेल्या असतात. या जातीची झाडे जोमदार वाढतात. झाडाचा विस्तार 3 मीटर असून उंची 5 मीटर असते. या जातीच्या एका झाडापासून सरासरी उत्पादन 50 ते 80 किलो इतके मिळते. या जातीची फळे टपोरी आणि लांबट असून एका फळाचे सरासरी वजन 25 ग्रॅम असते. पिकल्यानंतर फळे लालभडक रंगाची दिसतात. फळातील गराचा रंग दुधाळ असून गर मऊ आणि गोड असतो. फळातील बियांचे प्रमाण एक ग्रॅमपेक्षाही कमी भरते.
स्थानिक लिची :
कोकणातील घोलवड परिसरात ही जात आढळते. या जातीत दोन प्रकार आढळतात. लिचीचा हळवा वाण कमी कालावधीत तयार होतो तर गरवा वाणास तयार होण्यास एक महिना जास्त कालावधी लागतो. हळव्या जातींची फळे एप्रिल महिन्यात पिकतात तर गरव्या जातींची फळे मे महिन्यात काढणीस तयार होतात. फळे आकाराने मोठी असून पक्व फळांचा रंग लाल असतो. फळातील गर पांढरट रंगाचा असतो. हळव्या जातीच्या एका झाडापासून 75 ते 90 किलोपर्यंत लिचीची फळे मिळतात.
लिची पिकाची अभिवृद्धी । लिची पिकाची लागवड पद्धती ।
लिचीची अभिवृद्धी बियांपासून तसेच कलमांपासून केली जाते. बियांपासून रोपे लागवडीयोग्य होण्यास तसेच या रोपांपासून फळे येण्यास जवळजवळ 10 वर्षांचा कालावधी लागतो. तसेच बियांपासून अभिवृद्धी केलेल्या झाडांची फळे मातृवृक्षावरील फळांसारखीच असतील याची खात्री नसते. म्हणूनच लिचीची अभिवृद्धी बियांपासून न करता कलमांपासून करावी. परंतु निवड पद्धतीने नवीन जाती शोधून काढण्यासाठी बियांपासून लिचीची अभिवृद्धी आवश्यक ठरते. लिचीची अभिवृद्धी फाटे कलमाने, भेट कलमाने, दाब कलमाने, डोळे भरून तसेच गुटी कलमाने करता येते. या पद्धतीपैकी गुटी कलमाने केलेली अभिवृद्धी अधिक यशस्वी होते, म्हणूनच लिचीच्या अभिवृद्धीसाठी गुटी कलम पद्धतीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. गुटी कलम करण्यासाठी लिचीची पेन्सिलएवढ्या जाडीची 1 ते 1.5 सेंटिमीटर व्यासाची फांदी निवडावी. फांदीच्या शेंड्यापासून 40 ते 50 सेंटिमीटर अंतरावर फांदीवरील 2.5 ते 3 सेंटिमीटर रुंदीची गोलाकृती साल काढावी. नंतर साल काढलेल्या जागेभोवती ओले केलेले शेवाळ (स्पॅग्नम मॉस) गुंडाळून पॉलिथीन कागदाने घट्ट बांधावे. गुटी कलमे पावसाळी हंगामात जून महिन्यात बांधावीत. लिचीच्या झाडावर बांधलेल्या गुट्यांना एक ते दीड महिन्यात मुळ्या फुटतात. त्यानंतर ही गुटी कलमे मातृवृक्षापासून वेगळी करून पॉलिथीनच्या पिशव्यांमध्ये लावावीत.
गुटी कलमास अधिक मुळे फुटण्यासाठी आय. बी. ए. या संजीवकाची 1,000 पी.पी.एम. तीव्रतेची पेस्ट साल काढलेल्या जागेवर लावावी आणि नंतर त्यावर ओले शेवाळ गुंडाळावे. ज्या झाडाला दरवर्षी भरपूर फळे येतात, अशी झाडे गुटी कलमे बांधण्यासाठी निवडावीत. पूर्ण वाढलेल्या एका झाडावर 500 ते 600 गुटी कलमे बांधता येतात. लिचीची क्लेफ्ट ग्राफ्टिंग पद्धतीने अभिवृद्धी करण्याचे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले असून या पद्धतीत कलमे जगण्याचे प्रमाण 90% आहे. या पद्धतीने कलमे करण्यासाठी जागेवरच खड्ड्यात बिया लावून लिचीची खुंटरोपे तयार करावीत. कलम करण्यासाठी अर्धा इंच व्यासाचे जाड खुंटरोप निवडावे. खुंटरोपाचा शेंडा जमिनीपासून 15 ते 20 सेंटिमीटर अंतरावर कापावा. या कापलेल्या भागावर मधोमध 5 सेंटिमीटर उंचीचा उभा काप घ्यावा. इच्छित जातीची डोळकाडी निवडून डोळकाडीच्या खालच्या बाजूला 5 सेंटिमीटर उंचीचे पाचरीसारखे काप घ्यावेत. त्यानंतर डोळकाडी खुंटरोपातील उभ्या कापात व्यवस्थित बसवून पॉलिथीन कागदाच्या पट्टीने कलम बांधावे.
लिचीच्या लागवडीसाठी निवडलेली जमीन स्वच्छ आणि सपाट करून घ्यावी. लिचीच्या बागेचे जोराच्या वाऱ्यापासून संरक्षण करणे अतिशय आवश्यक असते. म्हणून लिचीची लागवड करण्यापूर्वी सुरू, जांभूळ यांसारखी उंच वाढणारी वारारोधक झाडे कुंपणासाठी निवडावीत. लिचीच्या झाडाच्या लागवडीसाठी 1 X 1 मीटर आकाराचे खड़े खोदून हे खड्डे 15 ते 20 दिवस उघडे ठेवावेत. नंतर खड्डे चांगले कुजलेले शेणखत आणि माती यांच्या मिश्रणाने भरावेत. प्रत्येक खड्ड्यामध्ये 20 ते 25 किलोग्रॅम चांगले कुजलेले शेणखत, 2 किलोग्रॅम हाडाचा चुरा आणि 300 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश मिसळावे. शक्य असल्यास प्रत्येक खड्यामध्ये लिचीच्या जुन्या बागेतील थोडी माती मिसळावी. नंतर खड्ड्यात पाणी द्यावे. खड्डे खोदून ते खत आणि मातीने भरण्याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे. प्रत्येक खड्ड्याच्या मध्यभागी लिचीचे एक कलम लावावे. पिशवीतील कलम पिशवी फाडून वेगळे करावे. पिशवी फाडताना कलमाच्या मुळांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. लागवडीनंतर लगेच कलमांना पाणी द्यावे. कलम लावल्यानंतर कलमाच्या खोडाजवळ 1 % बोर्डो मिश्रणाचे एक लीटर द्रावण ओतावे.
लिची पिकाचा हंगाम । लिची पिक लागवडीचे अंतर ।
लिचीची कलमे लवकर प्रस्थापित होण्यासाठी लिचीची लागवड पावसाळयाच्या सुरुवातीला जून महिन्यात एक पाऊस पडून गेल्यानंतर करावी. अती थंड अथवा अती कोरड्या हवामानात लिचीची लागवड केल्यास कलमे मरण्याचे प्रमाण वाढते. म्हणूनच जानेवारीनंतर लिचीची लागवड करू नये.
लिचीची लागवड प्रामुख्याने चौकोनी पद्धतीने केली जाते. त्यामुळे आंतरमशागतीची कामे करणे सोपे होते. लागवडीनंतर 20-25 वर्षांत लिचीच्या झाडाचा विस्तार 10 ते 12 मीटरपर्यंत पसरतो. म्हणून लिचीच्या दोन झाडांमधील आणि दोन ओळींमधील अंतर प्रत्येकी 10 मीटर ठेवावे. अतिशय थंड अथवा उष्ण आणि कोरडे वारे वाहणाऱ्या भागात लिचीच्या दोन झाडांमधील आणि दोन ओळींमधील अंतर प्रत्येकी 8 मीटर ठेवावे.
लिची पिकास वळण । लिची पिकास छाटणीच्या पद्धती ।
लिचीच्या झाडाला आधार आणि वळण देण्याची फारशी आवश्यकता नसते. परंतु लागवडीनंतर सुरूवातीच्या एक वर्षाच्या काळात प्रत्येक कलमाशेजारी बांबूची काठी रोवून कलमाला आधार द्यावा. खोडाच्या तळाजवळील फांद्या छाटून, खोड सरळ वाढू द्यावे. सुकलेल्या आणि रोगट फांद्या काढून टाकाव्यात.
लिची पिक खत व्यवस्थापन । लिची पिक पाणी व्यवस्थापन ।
लिचीच्या झाडाला नियमित आणि योग्य प्रमाणात खते देणे आवश्यक आहे. झाडाला शेणखत अथवा कंपोस्ट खत देताना ते संपूर्ण आळयात पसरून द्यावे. रासायनिक खते देताना प्रत्येक झाडाच्या खोडाभोवती बांगडी पद्धतीने 25 ते 30 सेंटिमीटर खोलीवर आणि खोडापासून 30 ते 45 सेंटिमीटर अंतरावर खते द्यावीत. दरवर्षी खताचे प्रमाण 20 ते 25 टक्क्यांनी वाढवत जावे. प्रत्येक झाडाला खालीलप्रमाणे खते द्यावीत.आणि त्यानंतर
झाडाचे वय (वर्षे) | कंपोस्ट खत (किलो) | नीमपेंड (किलो) | सुपर फॉस्फेट (ग्रॅम) | सल्फेट ऑफ पोटॅश (ग्रॅम) | मेग्नेशियम सल्फेट (ग्रॅम) |
2 | 25 | 0.75 | 300 | 250 | 100 |
3 | 30 | 1.00 | 450 | 500 | 150 |
4 | 35 | 1.25 | 500 | 750 | 200 |
5 | 40 | 1.50 | 750 | 1000 | 250 |
पाचव्या वर्षानंतर लिचीच्या झाडाला खतांच्या वरील मात्रा जून महिन्यात द्याव्यात. त्यांनतर डिसेंबर अखेरीस लिचीच्या झाडाची सुप्तावस्था संपून झाडाला मोहोर येण्यास सुरुवात होते. या काळात जानेवारी महिन्यात लिचीच्या झाडाला अमोनियम सल्फेट, डाय अमोनियम फॉस्फेट आणि मिश्रखत (5:10:5) ही रासायनिक खते प्रत्येकी 1 किलो या प्रमाणात प्रत्येक झाडाला देऊन त्यावर पाणी द्यावे. लिचीच्या झाडाला आळे पद्धतीने पाणी द्यावे. ज्या ठिकाणी सरासरी वार्षिक 1,250 मिलिमीटर पाऊस पडतो, अशा ठिकाणी लिचीच्या झाडाला पाणी देण्याची आवश्यकता नसते. पावसाळयात झाडाला पाणी देण्याची आवश्यकता नसते. परंतु उन्हाळयात आठवड्यातून 2 ते 3 वेळा झाडाला नियमित पाणी द्यावे. मोहोर येण्याच्या काळात झाडाला पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी.
लिची पिकातील आंतरपिके । लिची पिकातील तणनियंत्रण |
लिचीच्या झाडाची वाढ सावकाश होते. झाडांना लागवडीनंतर 4 ते 5 वर्षांनी फळे लागतात. त्यामुळे सुरुवातीच्या काही वर्षांत लिचीच्या दोन झाडांमधील मोकळया जागेत आंतरपिके घेता येतात. आंतरपिके निवडताना हवामान, जमीन आणि बाजारपेठेची सोय या गोष्टींचा विचार करावा. आंतरपिकांना लिचीच्या झाडाच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी. आंतरपिकासाठी चवळी, गवार यांसारखी शेंगवर्गीय पिके, पपई, फालसा अथवा केळी यांसारखी कमी कालावधीची फळझाडे अथवा फुलकोबी, पानकोबी अथवा कांदा ही भाजीपाला पिके निवडावीत. पपई आणि केळी ही फळझाडे सरळ वाढणारी असल्यामुळे लिचीच्या बागेत फिलर म्हणूनही घेता येतात. खोडाभोवती आच्छादन करून तणांचा बंदोबस्त करता येतो. लिचीच्या बागेतील तणांचे नियंत्रण करणे आवश्यक आहे. बागेतील तणे पाणी, सूर्यप्रकाश आणि अन्नद्रव्ये यांसाठी लिचीच्या झाडाबरोबर स्पर्धा करतात. खुरपणी करून तण काढून टाकावे. अथवा तणांच्या बंदोबस्तासाठी पॅराक्वॉट आणि ग्लायफोसेट यांसारख्या रासायनिक तणनाशकांचा वापर करावा. डाययुरॉन ( 80% पाण्यात मिसळणारी) 2 किलो क्रियाशील घटक दर हेक्टरी अथवा अट्रॅझीन (50 % पाण्यात मिसळणारी भुकटी) 2 किलो क्रियाशील घटक दर हेक्टरी 500 लीटर मिसळून फवारल्यास 6 आठवड्यांपर्यंत तणांचा चांगला बंदोबस्त होतो.
बागेत तण होऊ नये म्हणून तसेच जमिनीत ओलावा टिकून राहावा म्हणून सुके गवत, गव्हाचा अथवा भाताचा पेंढा, ज्वारीचे धसकट, पालापाचोळा अथवा काळचा पॉलिथिनचे लिचीच्या झाडांभोवती मल्चिंग करावे. सुरुवातीच्या 2 ते 3 वर्षांच्या काळात बागेत चवळी, गवार यांसारखी आंतरपिके घेतल्यास तणांची वाढ होत नाही.
लिची पिकातील महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण ।
लिचीच्या झाडावर लाल कोळी, साल पोखरणारी अळी, मावा, फुलकिडे, पांढरी माशी, इत्यादी किडींचा उपद्रव होतो.
लाल कोळी ( इरिनोज माईट) :
लाल कोळी या किडीची मादी लिचीच्या वाढणाऱ्या कोवळ्या पानांवर अंडी घालते. प्रौढ कीड आणि या किडीची पिले कोवळया पानांतील आणि कोवळया फांद्यांमधील रस शोषून घेतात. त्यामुळे पाने तांबूस करड्या रंगाची होतात, आणि नंतर गळतात. पाने गळून पडल्यामुळे झाडाची अन्ननिर्मितीची प्रक्रिया मंदावते. त्यामुळे झाडाला मोहोर कमी प्रमाणात येतो. मोहोरावर किडीचा प्रादुर्भाव झाल्यास मोहोर गळून पडतो. फळवाढीच्या काळात या किडीचा उपद्रव झाल्यास फळांची वाढ थांबते आणि फळगळ होते.
नियंत्रण: लाल कोळी किडीच्या नियंत्रणासाठी 100 लीटर पाण्यात 450 ग्रॅम पाण्यात मिसळणारे गंधक अथवा 100 मिलिलीटर डायमेथोएट मिसळून 15 ते 20 दिवसांच्या अंतराने तीन ते चार वेळा फवारावे.
साल पोखरणारी अळी :
या किडीचे मादी फुलपाखरू मे-जून महिन्यात लिचीच्या झाडाच्या जुन्या फांद्यांवर अंडी घालते. अंड्यातून अळी बाहेर पडते. अळी फांद्या आणि खोडावरील साल पोखरून खाते. पूर्ण वाढलेली अळी स्वतःभोवती कोश विणून सुप्तावस्थेत जाते.
नियंत्रण : या किडीचा बंदोबस्त करण्यासाठी लिचीच्या झाडाचे खोड आणि फांद्यांवरील अळीने पोखरलेल्या छिद्रांत पेट्रोल किंवा फॉरमॅलीन अथवा कार्बनडायसल्फेटमध्ये बुडविलेले कापसाचे बोळे घालून छिद्रे मातीने लिंपून घ्यावीत.
पाने गुंडाळणारी अळी (लीफ रोलर) :
पाने गुंडाळणारी अळी लिचीच्या झाडाची पाने एकत्र गुंडाळून जाळी तयार करते आणि जाळीच्या आत राहून पानांवर उपजीविका करते. या अळीची मोठ्या प्रमाणावर लागण झाल्यास पानांचे विशेषतः नवीन येणाऱ्या कोवळ्या पानांचे खूप नुकसान होते.
नियंत्रण : अळीने फांद्यांवर तयार केलेली पानांची जाळी आतील अळीसहीत काढून नष्ट करावीत. 700 मिलिलीटर मोनोक्रोटोफॉस (36 %) अथवा 500 मिलिलीटर फेनिट्रोथिऑन 400 लीटर पाण्यात मिसळून दर हेक्टरी फवारणी करावी.
मोहोरावरील तुडतुडे :
लिचीच्या मोहोरावर आंब्यावरील मोहोराप्रमाणेच तुडतुड्यांचा प्रादुर्भाव होतो. ही कीड मोहोरावरील रस शोषून घेते. त्यामुळे मोहोराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.
नियंत्रण : या किडीच्या नियंत्रणासाठी 100 लीटर पाण्यात 100 मिलिलीटर डिमेक्रॉन आणि 200 ग्रॅम गंधक (पाण्यात मिसळणारे) मिसळून फवारणी करावी.
लिची पिकावरील महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण |
लिचीच्या झाडावर रोगांचा प्रादुर्भाव फार कमी प्रमाणात होतो.
मूळकुजव्या :
जमिनीत अधिक काळ पाणी साठून राहिल्यामुळे तसेच काही वेळा बुरशीची लागण झाल्यामुळे मूळकुजव्या हा रोग होतो. या रोगामुळे झाडाची मुळे कुजतात. झाड कमकुवत होते आणि कालांतराने मरते. मुळांवर फ्युजॅरियम या बुरशीची लागण झाली असल्यास मुळांचा आतील भाग लालसर रंगाचा होतो.
नियंत्रण : ह्या रोगाचे नियंत्रण करण्यासाठी जमिनीतील पाण्याचा योग्य निचरा करावा. झाडाच्या खोडाभोवती 1% बोर्डो मिश्रण पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळयानंतर ओतावे.
फळकूज :
हा रोग लिचीची फळे काढल्यानंतर फळांना होतो. फळकूज या रोगामुळे लिचीच्या फळांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. फ्युजॅरियम, पेनिसिलीयम आणि रायझोपस, इत्यादी बुरशींच्या प्रादुर्भावामुळे फळकूज हा रोग होतो.
नियंत्रण : या रोगाच्या नियंत्रणासाठी फळे काढल्यानंतर ती 10 लीटर पाण्यात 10 ग्रॅम बेनोमिल या बुरशीनाशकाची पावडर (0.05% बेनोमिल) मिसळून या द्रावणात दोन मिनिटे बुडवावीत.
तांबेरा :
हा रोग तांबूस रंगाच्या बुरशीमुळे होतो. या रोगाचा प्रादुर्भाव सुरुवातीला नवीन फुटणाऱ्या पानांवर दिसून येतो. पानांच्या खालच्या भागावर तांबूस गेरवा रंगाचे ठिपके दिसतात. पाने जसजशी वाढत जातात तसतसे तांबूस रंगाचे ठिपके वाढत जाऊन संपूर्ण पानभर पसरतात आणि ठिपक्यांचा तांबूस रंग बदलून त्यांना विटकरी लाल रंग येतो. रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाल्यास लिचीची पाने वेडीवाकडीही होतात. पानांच्या कडा आत वळतात. झाडे कमजोर होतात आणि उत्पादन कमी येते.
नियंत्रण: तांबेरा या रोगाच्या नियंत्रणासाठी 10 लीटर पाण्यात 15 ग्रॅम डायथेन एम-45 या बुरशीनाशकाची 15 दिवसांच्या अंतराने 2 ते 3 वेळा फवारणी करावी.
लिची पिकावरील महत्त्वाच्या विकृती आणि त्यांचे नियंत्रण ।
फळांची साल करपणे आणि फळे तडकणे (सन बर्निंग आणि फ्रुट क्रॅकिंग ) : अती तापमान, अतिशय कोरडी हवा आणि जमिनीत कमी ओलावा असल्यास लिचीची फळे तडकतात. तापमान 38 अंश सेल्सिअसच्या वर गेल्यावर आणि हवेतील आर्द्रता 60 टक्क्यांपेक्षा कमी असल्यास लिचीची फळे तडकण्याचे प्रमाण वाढते. फळांच्या वाढीच्या सुरूवातीच्या काळात कोरडी हवा आणि पाण्याचा कमी पुरवठा असल्यास फळाची साल कडक आणि चिवट बनते. अशा फळांची वाढ होताना फळांची साल चिवट आणि कडक असल्यामुळे ही फळे तडकतात.
नियंत्रण : फळवाढीच्या काळात झाडाला पाण्याचा ताण पडू देऊ नये. फळवाढीच्या काळात तापमान वाढल्यास झाडावर 50 पी.पी.एम. तीव्रतेचे एन. ए. ए. हे संजीवक फवारावे.
लिचीच्या फळांची काढणी, उत्पादन आणि विक्री ।
लिचीची फळे हवामान आणि जातीनुसार कमीअधिक दिवसांत तयार होतात. फळे पक्क होण्याचा काळ मे-जून महिन्याअखेरपर्यंत असतो. फळे तयार झाल्यानंतर झाडावर राहिल्यास पक्व फळे गळून पडतात. म्हणून फळांची काढणी उशिरा करावी अथवा अती लवकर करू नये. फळे पूर्ण पिकल्यानंतर झाडावरून काढावीत. लिचीची फळे पिकल्यानंतर फळांना जातीनुसार आकर्षक लाल अथवा नारिंगी रंग येतो. फळाच्या सालीच्या आतील भागाचा रंग लाल होतो. अनेक वेळा फळे चाखून ती काढणीसाठी तयार झाली किंवा नाही हे ठरविले जाते. फळांची काढणी करताना एक एक फळ न काढता फळांच्या देठासह पूर्ण घोस काढावा. फळांचा घोस काढताना फांदीचा काही भाग आणि पानेही काढावीत. त्यामुळे काढणीनंतर फळे अधिक काळ टिकतात आणि झाडांची हलकी छाटणी होते. फळांची काढणी करताना एक एक फळ स्वतंत्रपणे काढल्यास देठाजवळ फळे फुटतात आणि लवकर खराब होतात. सर्व फळे एकाच वेळी पक्क होत नसल्यामुळे फळांची काढणी वारंवार करावी लागते. सर्व फळांची काढणी 2 ते 3 आठवड्यांत पूर्ण करावी.
लिचीच्या झाडाला 5 व्या वर्षांपासून फळे लागण्यास सुरुवात होते. लिचीच्या एका झाडापासून दर वर्षी 80 ते 100 किलो उत्पादन मिळते. लिचीचे दर हेक्टरी सरासरी उत्पादन 8 ते 10 टन इतके मिळते. लिचीचे उत्पादनक्षम वय 40 ते 50 वर्षांचे असते.
लिचीची फळे नाशवंत असल्यामुळे काढणीनंतर लगेच खराब होतात. काढणीनंतर आकार आणि रंगावरून फळांची प्रतवारी करावी. खराब फळे काढून टाकावीत. प्रतवारी केलेली फळे लगेच विक्रीसाठी बाजारात पाठवावीत. जवळच्या बाजारपेठेसाठी फळे पूर्ण पक्व झाल्यावर काढावीत. लांबच्या बाजारपेठेसाठी फळांवर लाल रंगाची छटा असलेली फळे तोडावीत. लांबच्या बाजारपेठेत फळे विक्रीसाठी पाठविताना फळे वाहतुकीत खराब होऊ नयेत म्हणून फळांचे योग्य प्रकारे पॅकिंग करणे आवश्यक आहे. भारतामध्ये प्रामुख्याने बांबूच्या करंड्या, लाकडी पेटारे यांचा लिचीच्या फळांच्या पॅकिंगसाठी उपयोग करतात. करंड्यांच्या किंवा पेटाऱ्यांच्या तळाशी आणि कडेने लिचीच्या पानांच्या अथवा कागदाच्या तुकड्यांचा थर देऊन त्यावर लिचीच्या फळांचे घोस ठेवतात. लिचीची सुटी फळे विक्रीसाठी पाठवू नयेत. अशी फळे वाहतुकीत लवकर खराब होतात. फळांचा स्वाद, रंग आणि ताजेपणा अधिक काळ टिकविण्यासाठी फळांना पॅकिंगपूर्वी प्रीकूलिंग केल्यास फळे जास्त काळ टिकतात.
लिचीच्या फळांची साठवण आणि फळे पिकविण्याच्या पद्धती ।
लिचीची फळे नाशवंत असल्यामुळे सामान्य तापमानाला (20 ते 25 अंश सेल्सिअस) काढणीनंतर एक दिवसापेक्षा अधिक काळ चांगली राहत नाहीत. पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे फळांना तडे जाऊन फळे सुकतात. लिचीची फळे काढणीनंतर जास्त काळ टिकविण्यासाठी काढणीनंतर फळांचे प्रीकूलिंग करावे. नंतर फळे 80 ते 85% आर्द्रता आणि 2-3 अंश तापमानात एक महिन्यापर्यंत चांगली टिकू शकतात. साठवणुकीत अथवा वाहतुकीत फळांवर बुरशीचा प्रादुर्भाव होऊन फळे खराब होऊ नयेत म्हणून फळे 5% थायोयुरियाच्या (1लीटर पाण्यात 50 ग्रॅम थायोयुरिया) द्रावणात अथवा 0.05% बेनोमिलच्या द्रावणात (10 लीटर पाण्यात 10 ग्रॅम बेनोमिल) दोन मिनिटे बुडवावीत.
लिचीची फळे आंब्याच्या फळाप्रमाणे काढणीनंतर अथवा साठवणुकीत पिकत नाही. म्हणून ही फळे झाडावर पूर्ण पिकू द्यावीत आणि नंतरच फळांची काढणी करावी.
सारांश ।
लिची हे समशीतोष्ण हवामानातील फळझाड असून त्याचे उगमस्थान चीन हा देश आहे. भारत, चीन, इंडोनेशिया, थायलंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, इत्यादी देशांत लिचीची लागवड केली जाते. लिचीच्या फळझाडाला उष्ण आणि दमट हवामान चांगले मानवते. खोल, पोयट्याच्या, गाळाच्या सुपीक आणि पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या जमिनीत लिचीची लागवड यशस्वी होते.
महाराष्ट्रातील लिचीच्या स्थानिक जातींची लागवड केली जाते. भारतातील इतर राज्यांत लिचीची लागवड केली जाते. परंतु लिचीच्या अधिक उत्पादन देणाऱ्या सुधारित आणि संकरित जाती निर्माण करणे आवश्यक आहे. लिचीची अभिवृद्धी गुटी कलमाने केली जाते. झाडांची लागवड 10 x 10 मीटर अंतरावर पावसाळयाच्या सुरुवातीला करावी. लिचीच्या बागेत सुरुवातीच्या 2 ते 3 वर्षांच्या काळात आंतरपिके घेतल्यास आंतरपिकापासून उत्पादन मिळते आणि बागेतील तणांचाही बंदोबस्त होतो.
लिचीच्या झाडांवर रोग आणि किडींचा वेळीच बंदोबस्त केल्यास, योग्य खते आणि पाणी व्यवस्थापन आणि मशागतीचे तंत्र अवलंबल्यास लिचीच्या एका झाडापासून 80 ते 100 किलो इतके उत्पादन मिळते.
फळांची योग्य वेळी काढणी, प्रीकूलिंग, व्यवस्थित पॅकिंग (काढणीनंतरची आवश्यक) प्रक्रिया आणि वाहतुकीची जलद साधने यांचा अवलंब केल्यास लिचीच्या बागेपासून भरपूर आर्थिक उत्पन्न मिळते.