महालय श्राद्ध.(Mahalay Shradh)

।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।

महालय श्राद्ध : Mahalay Shradh

अनंत चतुर्दशीच्या दुसर्या दिवसापासून पितृपक्षाचा प्रारंभ होतो. वास्तविक हा काळ आपल्या तीन पिढय़ातल्या पितरांच्या आपल्या निवासस्थानी आगमनाचा व वास्तव्याचा समजला जातो. त्यामुळे तो शुभदायी असतो. आपल्या अपरोक्ष आपल्या पुढच्या पिढय़ांनी केलेल्या प्रगतीचे दर्शन घेऊन पितरांचे हे आत्मे या पिढय़ांना शुभाशिर्वाद देतात, अशी श्रद्धा आहे. असे असतानाही हा काळ हिंदू संस्कृतीमध्ये कोणत्याही नवकार्याच्या शुभारंभासाठी अशुभ मानला जातो. या काळात कोणत्याही नवकार्याचा, खरेदीचा आरंभ न करण्याची परंपरा आहे. परंतु ती चुकीची आहे.

कोणत्याही शुभकार्याचा आरंभ आपण ज्येष्ठांच्या वंदनेने आणि आशिर्वादाने करीत असतो. असे वंदनीय ज्येष्ठ आत्मरुपाने ज्या काळात आपल्या निवासस्थानी येतात, आशिर्वाद देतात तो काळ अशुभ कसा असू शकेल, असा नवा विचार सध्या रुढ होतो आहे. त्याची ही कहाणी.

आपल्या भारतीय संस्कृतीत पितृपक्षाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. आजवर या पितृपक्षाला अशुभ मानले जात होते. कोणत्याही शुभकार्याचा आरंभ या काळात करू नये असा समज रुढ होता. परंतु बदलत्या काळासोबत ही संकल्पना आता बदलते आहे. त्यामुळे मोठी खरेदी अथवा व्यवहार किंवा शुभकार्ये हे आता या काळात पार पाडले जाऊ लागले आहेत. पितृपक्षाचा संबंध यमाशी तसेच मृत्यु पावलेल्या पूर्वजांशी असल्यामुळे तो अशुभ समजला जात असे. परंतु धर्मशास्त्राने मात्र असे सांगितले आहे की, उलट किमान तीन पिढय़ांचे पूर्वज त्यांच्या सध्याच्या पिढय़ांच्या निवासस्थानी स्वर्गलोकात जाण्यापूर्वी आत्मारुपाने येत असतात. त्यांची प्रगती पाहून समाधानी होत असतात. त्यांना सुख, समृद्धी आणि शांतीचा आशीर्वाद देत असतात. अशा काळाला अत्यंत शुभ मानले पाहिजे. त्यामुळेच या काळाकडे बघण्याचा दृष्टिकोन आता बदलतो आहे. पितृपक्षाला पितृपक्ष, पित्तरपाटा, श्राद्धपक्ष, हडपक्ष, पित्रीपोखो, सोळाश्राद्ध पक्ष, कणागत, जतीया, महालया पक्ष आणि अपारा पक्ष अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. हा पितृपक्ष सप्टेंबर ते ऑक्टोबर या दोन महिन्यांच्या दरम्यान असतो. अनंत चतुर्दशीच्या दुसर्या दिवशीपासून तो सुरू होतो आणि सर्वपित्री अथवा महालया अमावस्येच्या दिवशी तो संपतो.

या पर्वाचे वैशिष्टय़ म्हणजे सूर्याचे संक्रमण उत्तरेकडून दक्षिणेकडे होते. हिंदू संस्कृतीतील धर्मशास्त्रानुसार अशी श्रद्धा आहे की, कोणत्याही परिवारातील दिवंगत झालेले तीन पिढय़ांचे पूर्वज हे पितृलोकात जातात. या लोकावर यमराजाची सत्ता असते. ज्या वेळेला चौथ्या पिढीतील एखादा पूर्वज देहांत झाल्यानंतर पितृलोकात जातो तेव्हा त्याच्या पहिल्या पिढीतील जो पूर्वज पितृलोकात असतो तो स्वर्गलोकात जातो. याचे कारण फक्त तीनच पिढय़ातील पूर्वजांना पितृलोकात स्थान असते.

याच काळात सूर्य तुला राशीत प्रवेश करतो. या काळामध्ये अशी श्रद्धा आहे की, आपले जे पूर्वज पितृलोकातून स्वर्गलोकात जाणार असतात ते पितृपक्षाच्या प्रारंभी आत्मारुपाने पृथ्वीवरील आपल्या परिवाराच्या निवासस्थानी येतात आणि सर्वपित्री अमावस्येपर्यंत तिथे वास्तव्य करतात व त्यानंतर सूर्याने वृश्चिक राशीत प्रवेश केला की, स्वर्गलोकात प्रवेश करतात. परंतु स्वर्गलोकात त्यांचा प्रवेश होण्यासाठी अशी अट आहे की, त्यांनी त्यांच्या आयुष्यात आपल्या पितरांना व त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्राद्धविधीच्या रुपाने अन्नदान केलेले असले पाहिजे किंवा त्यांनी त्यांच्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या स्वरुपात अन्नदान केलेले असले पाहिजे. ही अट किती कठोर आहे याची एक कथा आपल्या महाभारतात सांगितली आहे.

ज्यावेळी महाभारताच्या युद्धात कर्णाचा मृत्यू झाला व त्याच्या आयुष्यभरातील पुण्यकृत्यामुळे तो स्वर्गवासाला पात्र ठरला. परंतु स्वर्गाच्या द्वारापाशी त्याला अडवले गेले. तू आयुष्यात सोने, चांदी, हिरे, माणके, एवढेच नव्हे तर स्वतःची कवचकुंडलेही तू दान केलीस. परंतु या दानाचा स्वर्गात प्रवेश मिळविण्यासाठी उपयोग होणार नाही. कारण तू तुझ्या आयुष्यात कधीही कोणत्याही स्वरुपात अन्नदान केलेले नाही तसेच पितरांना श्राद्धविधीच्या रुपाने अन्नदान केलेले नाही. त्यामुळे तुला स्वर्गात प्रवेश मिळणार नाही. त्यावर कर्णाने यमराजांना सांगितले की, मला याची माहिती नव्हती. त्यामुळे माझ्याकडून हा प्रमाद नकळत झाला आहे. यावर मला उपाय सांगा. तेव्हा यमराजांनी आणि चित्रगुप्तांनी कर्णाला पुन्हा 15 दिवस पृथ्वीवर पाठविले आणि या काळात कर्णाने अन्नदान केले. तसेच आपल्या पूर्वजांच्या स्मृत्यर्थ श्राद्धविधी केले. त्यानंतर कर्णाला स्वर्गात प्रवेश मिळाला. स्वतः कर्ण सूर्यपुत्र होता. यमराजही सूर्यपुत्र होते. तरीही त्यांच्यातले हे नाते या नियमावर मात करू शकले नाहीत. एवढा हा नियम कठोर आहे. कर्ण ज्या काळात म्हणजे पंधरवडय़ात पुन्हा पृथ्वीवर आला होता तो काळ पितृपक्ष म्हणून ओळखला जाऊ लागला.

पितृपक्षामध्ये प्रत्येक पितराचे स्थान एकाएका तिथीसाठी निश्चित केलेले आहे. त्यानुसार पूर्वजाला ज्या रितीने मृत्यू आलेला असेल त्यानुसार या तिथी ठरलेल्या आहेत. जे पूर्वज गतवर्षी निधन पावले आहेत त्यांच्यासाठी पितृपक्षातील चौथी भरणी आणि पंचमी भरणी निश्चित केलेली आहे. सौभाग्यवती असताना ज्या स्त्री पूर्वज निधन पावल्या, त्यांच्या श्राद्धासाठी अविधवा नवमी निश्चित केलेली आहे. त्यांच्या श्राद्धासाठी सवाष्ण भोजनासाठी बोलविण्याची प्रथा आहे. कुमारवयात ज्यांचे निधन झाले अशा मुलांच्या श्राद्धासाठी द्वादशी ही तिथी आहे. शस्त्र अथवा अपघात किंवा युद्ध यामध्ये ज्यांचा मृत्यू झालेला आहे अशा पूर्वजांसाठी घट चतुर्दशी किंवा घायल चतुर्दशी ही श्राद्धासाठी निर्धारित केलेली आहे. याशिवाय ज्यांना या तिथींना आपल्या पूर्वजांचे श्राद्ध करता आले नाही त्यांना ही संधी मिळावी यासाठी सर्वपित्री अमावस्या ही तिथी योग्य मानली गेली आहे. त्या तिथीला कोणत्याही पूर्वजाचे श्राद्ध केले तरी चालू शकते.

हिंदू संस्कृतीत असे मानले गेले आहे की, आपल्या पूर्वजांचे श्राद्ध प्रतिवर्षी करणे म्हणजेच त्यांच्यासाठी स्वर्गाचे द्वार खुले करणे. त्यांना स्वर्गात जागा मिळवून देणे. ज्यांच्या पुढील पिढय़ा आपल्या पूर्वजांचे श्राद्ध करीत नाहीत त्या पूर्वजांना पितृलोकातच म्हणजे यमलोकातच राहावे लागते. म्हणूनच पितृपक्षात पूर्वजांचे श्राद्ध घालणे हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. अन्नदानासोबत वस्त्रदान, सुवर्णदान, धातूदान, पशूदान, गो-दान अशी अनेक दानेही केली जातात. आपल्या संस्कृतीत महत्त्वाचे मानले जाणारे मार्कंडेय पुराणात असे सांगितले आहे की, पितृपक्षात प्रत्येक घरात त्यांच्या पितरांचे आत्मे, तसेच त्यांच्या कुलदेवता आणि भूतलोकातील आत्मे हे पाहुणे म्हणून येत असतात. घरामध्ये पूर्वजांचे श्राद्ध यथासांग झाले तर ते आपल्या त्या घरातील सर्वांना आरोग्य, सुख, समृद्धी आणि शांतता याचे आशीर्वाद देतात व स्वर्गाच्या दिशेने मार्गक्रमण करतात.

बंगालमध्ये मात्र पितृपक्षाचे स्वरुप थोडे वेगळे आहे. तेथे दुर्गापूजा उत्सवाचा शुभारंभ महालया अमावस्येला होतो. बंगाली संस्कृतीची अशी श्रद्धा आहे की, याच दिवशी देवीने दानवांच्या निःपातासाठी पृथ्वीवर अवतार घेतला. त्या दिवशी बंगाली घराघरात देवीच्या स्तोत्रांचे पाठ केले जातात व त्यानंतर पूर्वजांचे श्राद्ध केले जाते.

हिंदू संस्कृतीत असे म्हटले आहे की, कोणत्याही श्राद्धविधीसाठी गया हे शहर अत्यंत पुण्यकारक आहे. परंतु प्रत्येकाला तेथे जाऊन आपल्या पितरांचे श्राद्ध करणे शक्य होत नाही. त्यामुळे सर्वपित्री अमावस्येला श्राद्ध केले तर ते गया येथे केलेल्या श्राद्धाइतके पुण्यप्रद ठरते. श्राद्धविधी हा दुपारी व एखाद्या नदीच्या किनारी करावा असा संकेत आहे. नदी नसेल तर तळ्याच्या किनारी करावा आणि तेही शक्य नसेल तर आपल्या घरी तो करावा. श्राद्धाचा विधी हा पूर्वजांच्या ज्येष्ठ पुत्राने अथवा नातवाने करावा, असा संकेत आहे. याचा अर्थ ज्यांना पुत्र नाही त्यांचे श्राद्ध होत नाही असे नाही. तर हा श्राद्धविधी त्यांच्या मोठय़ा कन्येच्या मोठय़ा अथवा धाकटय़ा मुलाने किंवा मोठय़ा बंधूच्या मोठय़ा अथवा छोटय़ा मुलाने केला तरी चालू शकतो.

श्राद्धविधीसाठी वरण-भात, पुरी, भजी अथवा वडे, कढी, चटणी, कोशिंबीर, रव्याची खीर अथवा तांदळाची खीर किंवा लापशी, सर्वसाधारण भाज्या असा स्वयंपाक असतो. ज्याचे श्राद्ध घालायचे आहे त्याच्या आवडीनुसार या पदार्थांमध्ये बदल केला जाऊ शकतो. श्राद्धविधी हा पुरोहिताच्या मार्गदर्शनाखालीच पार पाडावा लागतो. त्यामध्ये दर्भ, काळे तीळ आदी बाबींचे महत्त्व मोठे असते. पिंडदान हा देखील यातला महत्त्वाचा विधी असतो. पिंडाला कावळा शिवल्याशिवाय श्राद्धविधी पूर्ण होत नाही. श्राद्धविधीमध्ये यम, विष्णू आणि शंकर या तीन देवतांची पूजा केली जाते. कावळा हा यमराजाचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे त्याने पिंडाला स्पर्श केला, त्यातील अंश भक्षण केला की श्राद्ध पितरांपर्यंत पोहोचते अशी हिंदूंची श्रद्धा आहे.

पितृपक्षाचा हा सगळा पौराणिक महिमा पाहिला की, नव्या पुरोगामी विचारसरणीनुसार व वेद आणि पुराणे यांच्या नवमतवादी विचारानुसार पितृपक्ष हा देखील आता शुभकार्यासाठी अनुरूप मानला जाऊ लागला आहे. ज्या काळात आपल्या निवासस्थानी आपल्या पितरांचे आत्मारुपाने आगमन झालेले आहे ते आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत त्या काळात शुभकार्याचा आरंभ करणे हे त्यामुळेच योग्य मानले जाते आहे.

Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )