महानदी सरस्वती (Mahanadi Saraswati)

।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।

महानदी सरस्वती – Mahanadi Saraswati

सिंधू सरस्वतीच्या खोऱ्यातच वैदिक भारतीय संस्कृतीचा उगम व विकास झाला… ऋग्वेदात सरस्वती नदीवर तीन संपूर्ण सूक्ते आहेत (ऋग्वेद. ६.६१, ७.९५, ७.९६), शिवाय तिचे उल्लेख इतरत्र आहेतच. ‘महो अर्ण: सरस्वती’ असे म्हणत तिच्या प्रचंड जलसंचयाचे व घनगंभीर प्रवाहाचे वर्णन वेदांत येते. मार्गात येणाऱ्या पर्वतशिखरांना रोंरावणाऱ्या लाटांनी नेस्तनाबूत करीत ही डौलाने वाहते. गृत्समद ऋषी तिचे आवाहन ‘नदीतमे, अंबितमे, देवितमे’ असे करतात (२.४१.१६,१७). महाभारतकाळापासून ती हळूहळू लुप्त होऊ लागली व विसाव्या शतकापर्यंत ती लुप्तच मानण्यात आली. तिचा एक पूर्ववाही प्रवाह प्रयागक्षेत्री गंगा यमुनेला गुप्त रूपात मिळतो व त्रिवेणी संगम होतो अशी भारतीयांची श्रद्धा पूर्वापार चालत आली आहे. याचा शोध घेतला असता, भूगर्भात खरोखरीच असे अनेक प्रवाह आढळले व सरस्वतीच्या शोधमोहिमेला आरंभ झाला. अलीकडे पुण्याच्या डेक्कन विद्यापीठाने हरयाणा राज्यातील राखीगढ इथे उत्खनन केले तेव्हा शुष्क नदीपात्रात अनेक प्रागतिहासिक वस्तू, मानवी सांगाडे सापडले, ज्यांचा काळ इ.स. पूर्व पाच ते आठ हजार वर्षे इतका मागे जातो.

एकेकाळी समृद्ध वैदिक संस्कृती इथे नांदत होती हे यावरून सिद्ध होते. सरस्वती शोध संस्थानच्या मतानुसार यमुना सरस्वती क्षेत्र, सरस्वती साबरमती क्षेत्र व राजस्थान साबरमती विभागात उत्खनन केल्यास १३०० कि.मी लांबीची सरस्वती नदी पुन्हा प्रवाहीत होऊ शकते. कुरुक्षेत्र हा प्रदेश पृथ्वीची नाभी होती. सरस्वती ही अत्यंत वेगवती नदी असून सप्त नद्यांची भगिनी होती असा उल्लेख ऋग्वेदात आढळतो. दृषद्वती, शुतुद्री (सतलज), चन्द्रभागा (चिनाब), विपाट् (व्यास- बियास), इरावती (रावी) या नद्यांनी व अशा अनेक लहानमोठय़ा प्रवाहांनी हीस समृद्ध केले. खरोखरीच ही ‘सिन्धुमाता’ होती. हिच्या तीरावर वेदांतील पंचजनांचा विकास व उत्कर्ष झाला. ऋग्वेदकालीन राज्यकत्रे- मग ते भरतवंशीय असोत, कुरुवंशीय, मत्स्यवंशीय, पांचाल असोत अथवा ययातीचे पुत्र, सर्वानी हिच्या तीरावर यज्ञयाग केले, देवांसाठी आहुती दिल्या व आपले राज्य सुस्थिर केले. भरतकुळाचे आधीचे उपाध्याय होते, ख्यातकीर्त ऋषी विश्वामित्र. नंतर वसिष्ठांनी हे पद भूषवले व दहा राजांच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या सुदासाला इंद्र व वरुणांच्या मदतीने युद्धात विजय मिळवून दिला.

तत्कालीन शासक होते दिवोदास व सुदासासारखे लढवय्ये राजे. या भरतवंशीय राजांमुळेच हिला भारती हे नाव पडले. सरस्वतीच्या खोऱ्यातील सुपीक प्रदेशात प्राचीन वैदिक संस्कृती बहरू लागली. मग जमिनीच्या कसाच्या जोडीने मानवी सुफलनाशीही सरस्वतीचे नाते जोडले गेले. गर्भधारणेसाठी व सुरक्षित प्रसूतीसाठी सरस्वतीची प्रार्थना केली आहे (ऋ. १०.१८४.२) पíशयन संस्कृतीतही सरस्वती अनाहिता या नावाने आढळते. आबान यश्त या जलदेवतेच्या स्तुतीत अनाहिता ही गर्भधारणेसाठी व सुरक्षित प्रजननासाठी उपास्य असल्याचे सांगितले आहे. मुळात निरंतर वाहणारा नदीचा प्रवाह हाच वंशसातत्याचे प्रतीक मानला जातो. म्हणूनच प्राचीन संस्कृतीत नद्या या जीवनदायिनी, पुत्रसंदायिनी मानल्या जातात. सरस्वतीच्या तीरावर अनेक तीर्थक्षेत्रे विकसित झाली. महाभारतात युद्धाच्या समयी बलरामाने सरस्वतीच्या काठाने तीर्थयात्रा केली त्याचे वर्णन आहे. दक्षाच्या शापाने चंद्राचा क्षय होऊ लागला तेव्हा त्याने सरस्वतीक्षेत्री स्नान केले व तो रोगमुक्त झाला, तसेच शंकराने ब्रह्महत्येचे पाप नष्ट करण्यासाठी कुरुक्षेत्री स्नान केले असे अनेकविध प्रसंग पुराणात क्षेत्रमाहात्म्य विशद करताना आले आहेत…..

सरस्वती नदी काही भौगोलिक कारणांमुळे लुप्त झाली असली तरी पुराणांत विविध कथांमधून या लुप्त होण्याची कारणमीमांसा केलेली दिसते… पद्मपुराणात अशी कथा आहे की जेव्हा और्व ऋषीने निर्माण केलेला अग्नी सर्व विश्व ग्रासू लागला, तेव्हा ब्रह्मदेवाच्या विनंतीवरून सरस्वतीने नदीरूप घेतले व एका कलशात तो वडवाग्नी ठेवून ती पश्चिम समुद्राकडे निघाली, पापी जनांचा स्पर्श टाळण्यासाठी ती जमिनीखालून वाहू लागली, अग्नीचा ताप अस झाला की भूपृष्ठावर येऊ लागली. वामनपुराणात जरा वेगळ्या ढंगाने हा कथाभाग येतो. उत्तंक ऋषीच्या आश्रमाजवळ प्लक्ष वृक्षापासून सरस्वती उत्पन्न झाली. कुठे जायचे हे न कळल्यामुळे ती कुंठित झाली, तेव्हा मरकडेय ऋषींच्या मागोमाग जात ती प्रथम कुरुक्षेत्री गेली व नंतर दक्षिण दिशेस वाहत गेली.

सरस्वती आणि दृषद्वती नद्यांच्या मधील भूभागाला मध्यदेश म्हणजेच कुरुक्षेत्र अथवा ब्रह्मावर्त असे संबोधतात. समुद्रात तो वडवानल विसर्जति करताना ती हारिणी, कपिला, नंदा, अशा विविध प्रवाहांनी वाहिली असेही आढळ्ते. या सरस्वतीच्या उपनद्या असाव्यात. महाभारतातील वृत्तांतानुसार सरस्वती एक अप्सरा होती, तीने पुरूरव्याशी संग केला व सरस्वान् नावाच्या पुत्राला जन्म दिला म्हणून ब्रह्मदेवाने तिला नदी होण्याचा शाप दिला. अप्सरा व नद्या यांचे समीकरण किंवा तादात्म्य हा पुराणकथाशास्त्रातील एक स्वतंत्र विषय आहे. ब्रह्मांडपुराणातील कथेनुसार अग्नीचा १६ नद्यांशी विवाह झाला, त्यातील एक सरस्वती होय. शिवाने त्या नद्यांना ‘धिष्ण्या’ असे नाव दिले. वैदिक कोशात धिष्ण्याचे दोन अर्थ दिले आहेत; यज्ञप्रदेश व तात्पर्य धारण करणारी वाणी.

या दोन्ही अर्थानी सरस्वती समृद्ध आहे. सरस्वतीच्या लुप्त होण्याबरोबर तिच्या तीरावर राहणारे सारस्वत लोक हळूहळू स्थलांतर करू लागले. पंजाब, सिंध, राजस्थान, महाराष्ट्र तसेच गोव्यापर्यंत पश्चिम समुद्राच्या काठाकाठाने सारस्वत जनांनी वसाहती केल्या. परंपरेने उत्तरेतील ब्राह्मणांना गौड व दक्षिणेतील ब्राह्मणांना द्रविड म्हणत असत. सारस्वत लोक उत्तरेतून स्थलांतरित होऊन दक्षिणेकडे सरकले तेव्हा, तेथील ब्राह्मणांनी त्यांना गौड सारस्वत म्हणायला सुरुवात केली. हल्ली गौड सारस्वत या नावाने प्रसिद्ध असलेला समाज मूळचा सरस्वती नदीतीरावरील जनसमूह आहे. समाजशास्त्रीय दृष्टिकोनातूनही यावर अधिक संशोधन करता येईल…..

वैदिक ऋषी कवष ऐलूष याचा सरस्वतीशी घनिष्ठ संबंध आहे… इलूषा नावाच्या दासीचा पुत्र म्हणून अंगिरसांनी त्याची हेटाळणी केली, तेव्हा या प्रज्ञावंत कवीने सरस्वतीचे सूक्त गायले (ऋ. १०.३०). तहानेने तळमळणाऱ्या कवषाजवळ ती वाहात आली, ते क्षेत्र ‘परिसारक’ नावाने ख्यात झाले अशी आख्यायिका ऐतरेय ब्राह्मणात आहे. नदीरूपात ही अन्नदायिनी म्हणूनच ‘वाजेभि वाजिनीवती’ (वाज म्हणजे अन्न व अन्नाच्या योगे येणारे बळ) अशी तिची स्तुती केली गेली. मानवी संस्कृतीच्या समृद्धीचे प्रथम गमक म्हणजे त्याची वाणी. बहिणाबाई म्हणतात, माझी माय सरसोती माला शिकवते बोली. नदीच्या खळाळणाऱ्या प्रवाहात तीरावर केलेल्या यज्ञातील मंत्रांचे स्वर मिसळत गेले व पाहता पाहता सरस्वती नदी वाणीच्या रूपात विकसित होऊ लागली व कोणताही भेदभाव न बाळगता सानथोरांच्या जिव्हाग्री विराजमान झाली…..

वाग्देवी सरस्वती: ऋग्वेदात ‘तिस्रो देवी’ या नावाने भारती, इळा व सरस्वती यांचा संयुक्त उल्लेख आढळतो (ऋ. ७.२.८). यातील इळा हा शब्द अन्नवाचक असल्याने व सुपीकतेशी जोडल्याने नदीवाचक आहे, भारती वाणीशी संबंधित आहे तर सरस्वती देवीरूपाशी… निघंटू या ग्रंथात वाक् या शब्दाचे ५७ पर्यायी शब्द दिले आहेत त्यांत इळा, भारती, सरस्वती हे शब्द आहेत. माध्यमिका वाक् म्हणजे अंतरिक्षातील मेघगर्जना / वाणी या रूपात सरस्वतीचा निर्देश वैदिक वाङ्मयात तसेच निरुक्तात केला आहे. देवांना सोम हवा होता तेव्हा सोमाचे अधिकृत अधिकारी गंधर्व यांच्याशी वाग् सरस्वतीने व्यवहार केला. वाणीच्या बदल्यात देवांना सोम मिळाला, परंतु वाणीशिवाय देव मूक झाले, तेव्हा वाणी गुप्तपणे त्यांच्याकडे आली. ऐतरेय ब्राह्मणातील कथाभागानुसार सोमक्रयणाच्या समयी म्हणूनच उपांशुवचन (हळू पुटपुटणे) अभिप्रेत असते. विधींशी पुराकथांची सांगड अशा प्रकारे घातली जाते.

ऋग्वेदात अंभृणऋषीची कन्या म्हणून वागाम्भृणी व तिचे सूक्त येते (१०.१२५) दैवी वाक् म्हणते की मीच रुद्र, वसू, आदित्य, वसर्व देवांना प्रेरणा देते, त्यांना धारण करते. मी या संपूर्ण विश्वाला व्यापून राहते, मी लोकांना एकत्र आणते, उपासकांना यज्ञफल देते, साक्षात्कारी जनांना दर्शन देते त्यांच्यावर शासन करते. खरंच वाणी नसती, भाषेसारखे प्रभावी माध्यम नसते तर आपण सर्व कसे एकत्र आलो असतो? भाषा लोकांना एकत्र आणू शकते आणि दूरही लोटू शकते. शस्त्राविनाही सामथ्र्यशील वाणीमुळे काय घडले हे सांगताना कुंभकर्णाची कथा पाहावी. कुंभकर्णाने तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केले व वर मागणार एवढय़ात सरस्वती त्याच्या जिव्हाग्री बसली. त्यामुळे ‘निर्देवत्व’ (देवांशिवाय मोठेपण) या शब्दाऐवजी ‘निद्रावत्व’ असा शब्द त्याच्या मुखातून बाहेर आला व परिणामस्वरूप तो अखंड निद्राधीन झाला.

मराठय़ांच्या इतिहासात ‘ध’ चा ‘मा’ करणारी आनंदीबाई सरस्वतीच्या दृश्य रूपात (अक्षरलिपीत) हस्तक्षेप करणारी खलनायिका ठरली. रामाचे अवतारकार्य पूर्ण करण्यासाठी साक्षात सरस्वतीने मंथरेच्या मुखी आश्रय घेतला व तिच्या सल्ल्यानुसार कैकेयीने वर मागितले अशीही कथा आहे. साक्षर हा शब्द उलट वाचला तर राक्षस होतो हे अर्थाच्या दृष्टीनेही किती अन्वर्थक आहे नाही का! वाणीचा दुरुपयोग करू नये, नाही तर ती वक्त्यावरच उलटते हे सर्व धर्मात एकमुखाने सांगितले आहे.

Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )