मंगळागौरीची आरती । मंगळागौर पूजा । मंगळागौरी पत्री पूजा । मंगळागौरीच्या वेळी खेळण्यात येणारे खेळ । मंगळागौरीची कथा । मंगळागौरीची आरती । मंगळागौर । Mangalagaur ।
।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।
मंगळागौर : (Mangalagaur)
मंगळागौर हे हिंदू धर्मातील एक व्रत आहे. ते श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहित महिलेने लग्नानंतर पहिली पाच वर्षे करावयाचे असते… यासाठी अशाच इतर नवविवाहितांनाही बोलावून सकाळी एकत्रित पूजा करतात व त्यानंतर रात्री जागरण करतात. जागरणाच्या वेळी, विविध खेळ खेळण्याचा प्रघात आहे. खेळांमध्ये परंपरागत चालत आलेली गाणीही म्हणतात. लाट्या बाई लाट्या सारंगी लाट्या, अठूडं केलं गठूडं केलं आदी गाणे म्हणण्यात येतात. नऊवारी लुगडे नेसून व नाकात नथ, पारंपरिक दागिने घालून हे व्रत करण्यात येते…..
मंगळागौर पूजा :
सकाळी स्नान करून पूजा करण्यात येते… त्यात मंगळागौर म्हणजे पार्वतीची धातूची मूर्ती (बहुधा, अन्नपूर्णा या पार्वतीच्या रूपाची) मांडण्यात येते. शेजारी महादेवाची पिंडही ठेवतात. मंगळागौरीची षोडषोपचारपूजा करतात. मग आरती करून प्रसाद वाटला जातो. त्यानंतर पूजेसाठी आलेल्या सवाष्णींचे भोजन होते. श्री शिव आणि पार्वती हे आदर्श गृहस्थाश्रमाचे उदाहरण मानले जाते… या पूजाप्रसंगी शक्तीतत्वाची आराधना करावी. माता, विद्या, बुध्दी, धृती, शक्तीरूपात राहणा-या देवीची उपासना करावी व तिचे दैवी गुण स्वतःमध्ये यावेत अशी प्रार्थना करावी नवविवाहित मुली श्रावणातल्या मंगळवारी मंगळागौरीचे पूजन करतात… ‘गौरी गौरी सौभाग्य दे ‘ अशी प्रार्थना करतात .सामूहिकरीत्या ही पूजा करण्यात विशेष आनंद मिळतो . कारण या निमित्ताने मैत्रिणी बहिणी सगळ्या एकत्र येतात…..
ही पूजा केल्यावर मौनाने भोजन करायचे असते हे पंचवार्षिक व्रत उद्यापनाने पूर्ण होते. मुलींनी आई-वडिलांना या निमित्ताने वाण द्यायचे असते. माहेरील ज्येष्ठ नात्यांचा आदर करणे या वेळी योग्य ठरले. तसेच मंगळागौरीच्या निमित्ताने फक्त परस्परांना भेटवस्तू देण्यापेक्षा या रकमेतून आवश्यक धन किंवा धान्य इ. सामाजिक संस्थांना द्यावे हे फारच चांगले
मंगळागौरी पत्री पूजा :
वेगवेगळ्या झाडांच्या पत्री (पाने) व फुले या पूजेत वापरली जातात. ही झाडे औषधीदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची म्हणून आयुर्वेदात मानली गेली आहेत अर्जुनसादडा, आघाडा, कण्हेर, चमेली, जाई, डाळिंब, डोरली, तुळस, दुर्वा, धोत्रा, बेल, बोर, माका, मोगरा, रुई, विष्णुक्रांता, शमी, शेवंती वगैरे झाडांची पाने या कामाला येतात…..
पूजा करतांना १६ प्रकारच्या पत्री वहाव्यात असा समज आहे… पूर्वी भारतात आयुर्वेदाचा प्रसार होता. या पूजेच्या निमित्ताने सर्व प्रकारच्या औषधी झाडांची नव्या विवाहितेस ओळख व्हावी व पुढील आयुष्यात गरज पडल्यास ते झाड पटकन ओळखता यावे अशी पत्रीपूजेमागची भावना असू शकते…..
मंगळागौरीच्या वेळी खेळण्यात येणारे खेळ :
वटवाघूळ फुगडी, बस फुगडी, तवा फुगडी, फिंगरी फुगडी, वाकडी फुगडी, आगोटापागोटा, साळुंकी, गाठोडे, लाटा बाई लाटा, घोडा हाट, करवंटी झिम्मा, टिपऱ्या, गोफ, सासू-सून भांडण, अडवळ घुम पडवळ घुम, सवतीचे भांडण, दिंड, घोडा – इत्यादी… असे साधारणतः ११० प्रकारचे खेळ यात खेळले जातात. यात सुमारे २१ प्रकारच्या फुगड्या, ६ प्रकार आगोटा पागोट्याचे असतात…..
या सर्व खेळ प्रकारांमुळे शरीराच्या विविध अवयवांना व्यायाम होतो हा हे खेळ खेळण्याचा मुख्य उपयोग सांगता येईल… पूर्वीच्या काळी केवळ घरातील कामे करणा-या महिलांना या खेळातून आनंदही मिळे. हे खेळ खेळताना महिला त्याजोडीने गाणीही म्हणतात. मंगळागौर हे व्रत कष्टाचे, दमणुकीचे नसून चापल्य देणारे, चैतन्य देणारे व सामुहिक जीवनाचा आनंद देणारे आहे. हे लक्षात घ्यावे. देवीला वाहण्यात येणाऱ्या २१ प्रकारच्या औषधी वनस्पतींची (पत्री) माहिती करून घ्यावी.
मंगळागौरीची कथा :
आटपाट नगर होतं. तिथं एक वाणी होता… त्याला काही मुलगा नव्हता. त्याच्या घरी एक गोसावी येई. अल्लख म्हणून पुकार करी. वाण्याची बायको भिक्षा आणी. “निपुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाही,” असें म्हणून तो चालता होई. ही गोष्ट तिनं नवर्याला सांगितली. त्यानं तिला युक्ति सांगितली. “दाराच्या आड लपून बस, अल्लख म्हणतांच सुवर्णाची भिक्षा घाल.” अशी भिक्षा झोळीत घातली…..
बुवाचा नेम मोडला… बाईवर फार रागावला. मूलबाळ होणार नाहीं असा शाप दिला. तिनं त्याचे पाय धरले. बुवांनी उःशाप दिला. बुवा म्हणालें, “आपल्या नवर्याला सांग. निळ्या घोड्यावर बस. निळा वस्त्रं परिधान कर. रानांत जा. जिथं घोडा अडेल तिथं खण. देवीचं देऊळ लागेल, तिची प्रार्थना कर. ती तुला पुत्र देईल.” असं बोलून बुवा चालता झाला. तिने आपल्या पतीला सांगितलं…..
वाणी रानांत गेला… घोडा अडला, तिथं खणल. देवीचं देऊळ लागलं. सुवर्णाचं देऊळ आहे. हिरेजडिताचे खांब आहेत. माणकांचे कळस आहेत. आंत देवीची मूर्ती आहे. मनोभावें पूजा केली. त्याला देवी प्रसन्न झाली, “वर माग” म्हणाली. “घरदारं आहे, गुरंढोरं आहेत. धन द्रव्य आहे; पोटीं पुत्र नाहीं, म्हणून दुःखी आहे…..”
देवी म्हणाली, “तुला संततीचं सुख नाहीं, मी प्रसन्न झाले आहे तर तुला देते. अल्पायुषी पुत्र घेतलास तर गुणी मिळेल, दीर्घायुषी घेतलास तर जन्मांध होईल… कन्या घेतलीस तर बालविधवा होईल. इच्छा असेल तें मागून घे…..”
त्यानं अल्पायुषी पुत्र मागितला… देवीनं “माझ्या मागच्या बाजूस जा. तिथं एक गणपति आहे. त्याच्यामागं आंब्याचं झाड आहे. गणपतीच्या दोंदावर पाय दे, एक फळ घे, घरी जाऊन बायकोला खाऊ घाल म्हणजे तुझा कार्यभाग होईल.” असं सांगितलं. नंतर देवी अदृश्य झाली. वाणी देवळामागं गेला, गणपतीच्या दोंदावर पाय दिला, झाडावर चढला; पोटभर आंबे खाल्ले; मोटभर घरीं नेण्याकरितां घेतले. खालीं उतरून पाहूं लागला, तो आपल्या मोटेत आंबा एकच आहे. असं चार पांच वेळा झालं. गणपतीला त्रास झाला. त्यानं सांगितलं, “तुझ्या नशिबीं एकच फळ आहे…..”
फळ घेऊन घरी आला, बायकोला खाऊ घातलं, ती गरोदर राहिली. दिवसमासां गर्भ वाढू लागला… नवमास पूर्ण झाले. वाण्याची बायको बाळंतीण झाली. मुलगा झाला. उभयतांना मोठा आनंद झाला. दिवसामासां वाढूं लागला. आठव्या वर्षी मुंज केली. दहाव्या वर्षी लग्न करा म्हणाली. काशीयात्रेशिवाय लग्न करणं नाहीं असा माझा नवस आहे. असा जबाब दिला. काही दिवसांनी मामाबरोबर यात्रेस पाठविलं. मामाभाचे काशीला जाऊ लागले. जातां जातां काय झालं? वाटेनं एक नगर लागलं. तिथं काही मुली खेळत होत्या. त्यांत एकमेकीचं भांडण लागलं. एक गोरी भुरकी मुलगी होती, तिला दुसरी मुलगी म्हणूं लागली, “काय रांड द्वाड आहे! काय रांड द्वाड आहे! तेव्हा ती मुलगी म्हणाली, ‘माझी आई मंगळागौरीचं व्रत करते, आमच्या कुळवंशामध्ये कोणी रांड होणार नाही. मग मी तर तिची मुलगी आहे…..”
हे भाषण मामानं ऐकलं त्याच्या मनांत आलं… हिच्याशी भाच्याचं लगीन करावं, म्हणजे हा दीर्घायुषी होईल… परंतु हें घडतं कसं ? त्याच दिवशीं तिथं त्यांनीं मुक्काम केला. इकडे काय झालं ? त्याच दिवशीं त्या मुलीचं लग्न होतं. लग्नाचे वेळेस नवरा मुलगा आजारी झाला. मुलाच्या आईबापांना पंचाईत पडली. पुढं कोणी तरी प्रवासी मिळेल तर बरं होईल, त्याला पुढं करून वेळ साजरी करूं, म्हणून धर्मशाळा पाहूं लागले. मामाभाचे दृष्टीस पडले. मामापासून भाच्याला नेलं. गोरज लग्न लाविलं…..
उभयतांना गौरीहरापाशी निजवलं… दोघं झोंपीं गेलीं. मुलीला देवीनं दृष्टांत दिला. “अग अग मुली, तुझ्या नवर्याला दंश करायला सर्प येईल, त्याला पिण्याकरितां दूध ठेव. एक कोरा करा जवळ ठेव. दूध पिऊन सर्प क-यात शिरेल. आंगच्या चोळीनं तोंड बांधून टाक. सकाळीं उठून आईला तें वाण दे.” तिनं सर्व तयारी केली. दृष्टांताप्रमाणं घडून आलं. कांही वेळानं तिचा नवरा उठला. भूक लागली म्हणूं लागला. लाडू खायला दिले. फराळ झाल्यावर त्यानं तिला आपली अंगठी दिली. पहाटेस उठून ताट घेऊन बि-हाडी गेला. मामाभाचे मार्गस्थ झाले…..
दुसरे दिवशीं काय झालं? हिनं सकाळीं उठून स्नान केलं, आपल्या आईला वाण दिलं… आई उघडून पाहूं लागली, तों आंत हार निघाला. आईनं कन्येच्या गळ्यांत हार घातला. पुढं पहिला वर मांडपांत आला. मुलीला खेळायला आणलं. ती म्हणाली, “हा माझा नवरा नाहीं. मी त्याचे बरोबर खेळत नाहीं.” रात्रीची लाडवांची व आंगठीची खूण कांहीं पटेना. आईबापांना पंचाईत पडली. हिचा नवरा कसा सापडतो ? नंतर त्यांनी अन्नछत्र चालू केलं. जो ब्राह्मण येईल त्याचे पाय आंगठी घालून मुलीनं धुवावे, आईनं पाणी घालावं, भावानं गंध लावावं, आणि बापानं विडा द्यावा, असा क्रम चालू केला, शेंकडो लोक येऊन जेवूं लागले…..
इकडे मामाभाचे काशीस गेले. पुष्कळ दानधर्म केला… तीर्थयात्रा केल्या. ब्राह्मणांचे आशीर्वाद घेतले. एके दिवशी भाच्याला मूर्च्छा आली. यमदूत प्राण न्यायला आले. मंगळागौर आडवी झाली. त्या दोघांचं युद्ध झालं. यमदूत पळून गेले. गौर तिथं अदृश्य झाली. भाचा जागा झाला, तसा आपल्या मामाला सांगूं लागला, “मला असं असं स्वप्न पडलं.” मामा म्हणाला, “ठीक झालं. तुझावरचं विघ्न टळलं. उद्यां आपण घरी जाऊ.” परत येऊ लागले…..
लग्नाच्या गावी आले. तळ्यावर स्वयंपाक करू लागले… दासींनीं येऊन सांगितलं. “इथं अन्नछत्र आहे तिथं जेवायला जा.” ते म्हणाले, “आम्ही परान्न घेत नाहीं.” दासींनीं यजमानणीस सांगितलं. त्यांनी पालखी पाठवली. आदरातिथ्यानं घरी नेलं. पाय धुतांना मुलीनं नवर्याला ओळखलं. नव-यानं आंगठी ओळखली. आईबापांनीं विचारलं. “तुझ्याजवळ खूण काय आहे?” त्यांनं लाडवांचं ताट दाखवलं. सर्वांना आनंद झाला. भोजनसमारंभ झाला. मामाभाचे सून घेऊन घरीं आले…..
सासूनं सुनेचे पाय धरले… “तुझ्यामुळं माझा मुलगा वाचला,” असं म्हणाली. तिनं सांगितलं. “मला मंगळागौरीचं व्रत असता. ही सगळी तिची कृपा.” सासर माहेरचीं घरचींदारचीं माणसं सर्व एकत्र झाली, आणि त्या व्रताचं उद्यापन केलं…..
तिला जशी मंगळागौरी प्रसन्न झाली, तशी तुम्हां आम्हां होवो, आणि आपलं सौभाग्य अखंड राहो, इतकीच देवाची प्रार्थना करा. ही धर्मराजाला कृष्णानं सांगितलेली साठां उत्तरांची कहाणी, पाचा उत्तरईं सुफळ संपूर्ण.
मंगळागौरीची आरती :
कोणतीही पूजा संपन्न करताना देवीदेवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण आरती म्हणतो. पूजा झाल्यावर ही आरती म्हटली जाते. तशीच रात्रभर जागरण करून सकाळी पुन्हा स्नान करून दहीभाताचा नेवैद्य या मंगळागौरीला दाखविण्यात येतो आणि पुन्हा एकदा मंगळागौरीची आरती करण्यात येते. त्यानंतर मंगळागौरीवर अक्षता टाकून तिचे विसर्जन करण्यात येते. मंगळागौरीची आरतीही अशीच प्रसिद्ध आहे. पारंपरिकता जपणारी ही आरती.
जय देवी मंगळागौरी। ओंवाळीन सोनियाताटीं।। रत्नांचे दिवे। माणिकांच्या वाती। हिरेया ज्योती।।धृ।।
मंगळमूर्ती उपजली कार्या। प्रसन्न झाली अल्पायुषी राया।।
तिष्ठली राज्यबाळी । अयोषण द्यावया। ।१।।
पूजेला ग आणिती जाईजुईच्या कळ्या । सोळा तिकटीं सोळा दूर्वा।।
सोळा परींची पत्री । जाई जुई आबुल्या शेवंती नागचांफे।।
पारिजातकें मनोहरें । नंदेटें तगरें । पूजेला ग आणिली।।२।।
साळीचे तांदुळ मुगाची डाळ। आळणीं खिचडी रांधिती नारी।।
आपुल्या पतीलागीं सेवा करिती फार ।।३।।
डुमडुमें डुमडुमें वाजंत्री वाजती। कळावी कांगणें गौरीला शोभती।।
शोभली बाजुबंद। कानीं कापांचे गवे। ल्यायिली अंबा शोभे।।४।।
न्हाउनी माखुनी मौनी बैसली। पाटाबाची चोळी क्षीरोदक नेसली।।
स्वच्छ बहुत होउनी अंबा पुजूं लागली ।।५।।
सोनिया ताटीं घातिल्या पंचारती। मध्यें उजळती कापुराच्या वाती।।
करा धूप दीप। आतां नैवेद्य षड्रस पक्वानें । तटीं भरा बोनें ।।६।।
लवलाहें तिघें काशीसी निघाली। माउली मंगळागौर भिजवूं विसरली।।
मागुती परतुनीयां आली। अंबा स्वयंभू देखिली।।देउळ सोनियाचे । खांब हिरेयांचे। कळस वरती मोतियांचा ।।७।।